fbpx
राजकारण

मुखवट्यासोबतचा भोंगळ पुरोगामी अव्यापरेषु व्यापार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संसदीय लोकशाहीच्या संकेतानुसार सर्वपक्षीय शोक, श्रद्धांजली इ. व्यक्त झाली. वाजपेयी यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द, भाजपला देशाच्या राजकारणाच्या मुख्यप्रवाहात स्थापित करण्यात, भाजपने वेळोवेळी आपल्या आक्रमक हिंदुत्वाच्यावाटे ओढवून घेतलेली राजकीय ‘अस्पृश्यता’ तोडत विविध प्रादेशिक पक्ष, समाजवादी साथी इ. ना सोबत घेत गैर-काँग्रेसी सरकार चालवण्यात त्यांच्या लवचिक आणि चाणाक्ष ‘उदार’ प्रतिमेचा असलेला सिंहाचा वाटा ह्या सगळ्याची भरपूर उजळणी गेल्या दोन दिवसांत झाली आहे. शिवाय २०१४ च्या नंतरच्या ‘मित्र पक्षांच्याही जीवावर उठलेल्या आक्रमक मोदी सरकारला ‘सौम्य वाजपेयी हा घरचा आहेर’ असले सर्वपक्षीय हिशोब त्यात आहेतच.

राजकीय पक्षांनी लोकशाही संकेतानुसार श्रद्धांजली वाहणे ह्या सगळ्याचे नवल नाही. खरी करमणूक झाली आहे ती उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि डाव्या, पुरोगामी विचारवंत/ बुद्धीजीवी (जे स्वाभाविक ‘मोदी/ भाजप विरोधक’ आहेत) अश्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि लेख वाचून. ‘धर्मांधांच्या मधला कविमनाचा माणूस’, ‘चुकीच्या पक्षातला चांगला माणूस’ असा साधारण ह्या सगळ्याचा सूर आहे. वाजपेयी यांचे उदार काश्मीर धोरण, लाहोर बस यात्रा, कारगिल घडल्यानंतरदेखील आग्रा चर्चा करण्याची तयारी ह्या सगळ्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. अयोध्या राम मंदिर आंदोलनापासून ते कसे दूर राहिले, आणीबाणीनंतर जनता सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होऊनही नेहरूंची तसबीर त्यांनी हटवली नाही, २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर मोदींना ‘राजधर्म’ पाळायची ‘ताकीद’ दिली असे त्यांच्या ‘उदारमतवादाचे’ गोडवे गायले जात आहेत. आणि जे सरळ सरळ नव-उदारवादी मुक्त अर्थव्यवस्थेची भलामण करत आले आहेत ते वाजपेयी, आणि त्यांचे खासगीकरणाचे धोरण- टेलिकॉम क्रांती, सरकारी उद्योग विकणे, किसान क्रेडीट कार्ड, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग इ.इ. यांचे ‘नव्या’ भारताला असलेले योगदान याची उजळणी करत आहेत.

म्हणजे माहोल एकूण असा तयार झाला आहे की वाजपेयी हे उदारमतवादी मसीहा होते, जागतिक दर्जाचे मुत्सद्दी होते, आधुनिक भारताचे शिल्पकार होते. पूर्वी संघ- भाजपचा प्रयत्न ‘वाजपेयी हे नेहरूंच्या जातकुळीतला आमचा चेहरा आहे’ हे सांगण्याचा असे. आता ‘नेहरू हे वाजपेयी यांच्या जातकुळीतले’ होते, त्यांनी वाजपेयी यांची तारीफ केली होती- तेव्हा त्यांना माफ करा’ अश्या विनवण्या करण्याची पाळी पुरोगाम्यांवर येऊ घातली आहे की काय अशी शंका यावी असे त्यांचे वर्तन आहे. तेव्हा ह्या सगळ्या धुपारत्या आणि मूर्तीपूजा करणाऱ्या वातावरणात वाजपेयी नावाचे मिथ जसे घडत गेले त्या प्रक्रियेची, पर्यायाने त्यांना ‘उदार’ असल्याचे सर्टिफिकेट बहाल करणाऱ्या मध्यममार्गी भारतीय ‘उदार-पुरोगामी’ प्रवाहाची झडती घेणे, असा माझा काहीसा मूर्तिभंजक हेतू आहे. त्यापुढे जात फासिझम आणि कला यांचा संबंध, आणि त्याचे अपुरे आकलन यातून फासिझमचा विरोध नेहमीच पांगळा होत राहिला आहे आणि राहील आणि त्यातून फासिझमचे नवे नवे सुसंस्कृत/ आक्रमक पण मुदलात ‘कलात्मक’ मुखवटे आणि चेहरे तयार होत राहतील, तोच ह्या प्रकल्पाचा गाभा आहे, असे माझे प्रतिपादन आहे. त्या चर्चेची सुरुवात ह्या लेखाद्वारे मी करेन.

 

२००२ - वाजपेयींची प्रसिद्ध 'राजधर्म' प्रेस कॉन्फरेन्स
२००२ – वाजपेयींची प्रसिद्ध ‘राजधर्म’ प्रेस कॉन्फरेन्स

बहुमुखी हिंदुत्व

सर्वप्रथम वाजपेयी यांच्या संदर्भातला ‘मुखवटा आणि चेहरा’ हा वाद लक्षात घेतला पाहिजे. सौम्य सोज्वळ वाजपेयी हा मुखवटा आणि अडवाणी- उमा भारती- तोगडिया- मोदी हा सगळा संघ-भाजपचा ‘खरा’ आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा अशी विभागणी सर्वसाधारणपणे होत आली आहे. संघाच्याच गोविन्दाचार्यानी ते बोलून दाखवले होते. पण अशी श्रमविभागणी, वर्गीकरण शक्य आहे का? असलेच तर ते कसे शक्य होते? ह्याचा विचार जरूर आहे. असा विचार करताना अर्थातच खुद्द वाजपेयी हे काही सौम्य/ उदारमतवादी नव्हतेच हे सिद्ध करणारी भाषणे आणि कृती यांचे दाखले काही टीकाकार देत आहेत आणि ते त्या मुखवट्याचे भंजन म्हणून गरजेचे आहेच. १९७०च्या भिवंडी दंगलीनंतर त्यांचे ‘अब हिंदू मार नही खायेगा’ हे भाषण, १९८३ मध्ये आसाममध्ये येणाऱ्या स्थलांतरितांना छाटून तुकडे करायची चिथावणी, ५ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडायच्या आदल्या रात्री ‘कारसेवा को कोई रोक नही सकता- सुप्रीम कोर्ट भी नही, और करसेवा के लिये जमीन समतल करनी होगी’ हे प्रक्षोभक भाषण, अगदी २००२ मध्ये गुजरात दंगलीत ‘पहले आग किसने लगायी’ असा पवित्रा घेत मुस्लिमांना जबाबदार धरण्याची नीती, इ. इ. अनेक दाखले त्यासाठी देता येतील. पण माझ्या मते मुद्दा त्यापेक्षा गंभीर आहे. ‘हिंदूराष्ट्र’ स्थापनेसाठी तयार झालेल्या संघाच्या बदलत्या रणनीतीचे सौम्य आणि आक्रमक हिंदुत्व हे दोन पैलू होते. संघ-भाजप संकुचित सामाजिक पाया आणि राजकीय अस्पृश्यता यांना तोंड देत होते तोपर्यंत वाजपेयी यांचा चेहरा हाच मुख्य राहिला होता. याचा अर्थ असा मात्र नाही की त्यातून मुख्य उद्दिष्टाशी तडजोड करायची ह्या नेत्यांची किंवा संघाची तयारी होती. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा जनता सरकारच्या काळात जेव्हा उपस्थित झाला तेव्हा त्या वेळी सरकारात राहण्यापेक्षा संघ सदस्यत्व प्रथम हे सिद्ध करत वाजपेयी- आणि इतर जनसंघ सदस्यांनी राजीनामे दिले होतेच. मुद्दा आणीबाणीविरोधी आंदोलनातून मिळालेल्या राजकीय स्वीकृतीला बळकट करायचा होता. ‘गांधीवादी समाजवाद’ इथपर्यंत लवचिकता त्यातूनच दाखवता येऊ शकत होती.

दुसरीकडे वाजपेयी यांचा ‘उदार’ चेहरा प्रादेशिक पक्ष, भूतपूर्व समाजवादी यांना म्हणूनच उपयुक्त ठरत होता. संघाला जसा आपला अजेंडा पुढे सरकवण्यात त्या चेहऱ्याचा उपयोग होता तसाच ह्या पक्षांनीही ‘समवन यू कॅन डू बिझिनेस विथ’ असा अर्थ लावत वापरला. गमतीची गोष्ट म्हणजे वाजपेयी ह्यांची उदारता, सुसंस्कृतपण, काव्य ह्या सगळ्यावर अमीट अभिजन, ब्राह्मणी, संस्कृतनिष्ठ छाप होती. पण त्याचा कुणालाही राग नव्हता. १९९०च्या दशकात ‘मंडल विरुद्ध कमंडल’ ही अभूतपूर्व सामाजिक लढाई लढली जात होती. आणि त्या घुसळणीत सर्वमान्य चेहरा ठरत होता तो वाजपेयी यांचा. बाबरी मशीद विध्वंस आणि त्यातून १९९६ मध्ये इतर राजकीय पक्ष राजकीय ‘अस्पृश्यता’ लादत असल्याचे भांडवल करीत वाजपेयी यांनी केलेले भाषण म्हणजे आत्मचिंतन किंवा कबुलीजबाब अजिबात नव्हता तर त्या चोराच्या उलट्या बोंबा होत्या. आणि त्या बोंबा सुसंस्कृत असल्याचे कारण पुढे करत इतर पक्षांना सत्तेच्या वळचणीला जायची घाई झाली होती. इतकेच कशाला, हा चेहरा सौम्य अन आपल्याला पसंत असल्याचे सर्टिफिकेट खुद्द कॉंग्रेसनेच वेळोवेळी दिले आहे, होते. राव- वाजपेयी, वाजपेयी- मनमोहन यांच्या अण्वस्त्र, परराष्ट्र, व्यापार, अर्थ इ. सर्वच क्षेत्रांत अमेरिकाधार्जिण्या धोरणसातत्याने ते सिद्ध होत राहिले. अगदी २००९ मध्ये न्या. लिबरहान यांच्या आयोगाने बाबरी मशीद पाडण्यासाठी वाजपेयी यांनाही अडवाणी- मुरली मनोहर जोशी- उमा भारती यांच्या बरोबरीने दोषी आणि जबाबदार ठरवल्यावर कॉंग्रेसलाच वाजपेयींना निर्दोष ठरवायची घाई होती. ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? हा उदारमतवादी- धर्मनिरपेक्ष मुख्यप्रवाहाचा अपराधगंडभाव तर नाही? म्हणजे हिंदुत्व ह्या मुख्य प्रवाहाला छुपेपणाने अभिप्रेत असे बहुसंख्याक राजकारण उघड उघड करते, अगदी हिंसकपणे करते म्हणून त्याचा तिरस्कार आणि विरोध करायचा पण त्यात एक गोम ठेवायची- ती म्हणजे शाब्दिक/अलंकृत हिंसा आणि रस्त्यांवरचा प्रक्षोभ यांच्यातला अन्योन्यसंबंध कृत्रिमरीत्या पुसून टाकायचा. मग असंस्कृत जमाव आणि त्याच्या हिंसेचा निषेध अगदी सोपा होऊन जातो. दुसरीकडे आपले उदारपणाचे लेबल जपायला ‘सौम्य’ चेहऱ्यांचा आम्हालाही लोभ आहे असा बनाव मांडता येतो. तिसरीकडे हे सर्वमान्य सौम्य- सुसंकृतपण उघडउघड उच्चजातीय/वर्गीय अभिजन रूप घेत असूनही त्याचा साधा उच्चारही अशक्य होऊन जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्यांना मोदींना विरोध करायचा असतो पण वाजपेयी आवडतात ते सरळसरळ जातीवादी असतात. कारण उच्चवर्णीय वळसे आणि अलंकृत झुली ह्यांचा मोह त्यांना प्राथमिक महत्वाचा असतो. आणि हा मोह केवळ उच्चजाती- मध्यम वर्ग यापुरता मर्यादित नाही- तर श्रेणीबद्ध विषम समाजात वाढत्या भांडवली विकासाचा तो अटळ परिणाम आहे. सीमा चिश्ती यांनी एक्स्प्रेस मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘जर वाजपेयी नसते तर भाजपला कुणालातरी तसे बनवावे लागले असते’ हा भाग तर आहेच. पण मुख्यप्रवाहाच्या बाजारात त्याची मागणी आहे हे खरे दुखणे आहे. आता ‘विकासपुरुष’ आणि ‘लोहपुरूष’ यांचा मोदी यांच्यामध्ये संगम झाला आहे, आणि मोदी हे मुत्सद्दी, भाग्यविधाते म्हणून प्रस्थापित झाले आहेत हा बोलक्या मध्यमवर्गाचे हे दुखणे किती विकोपाला गेले आहे याचाच पुरावा आहे; इतकेच नाही तर ‘मंदिर ही विकास है’ अश्या लाईनची पूर्ती आदित्यनाथ यांच्या रूपाने होऊ घातलीच आहे. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे- हे बहुमुखीत्व केवळ सौम्य/ आक्रमक असल्या पर्सेप्शनपुरत्या वर्गीकरणापुरते मर्यादित नाही. आरक्षणाला विरोध आणि समर्थन, रिटेल क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला विरोध आणि समर्थन, स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील सहभागाला विरोध आणि समर्थन असे अनेकविध अंतर्विरोध गेल्या तीस वर्षात हिंदुत्व परिवाराने पहिले, पचवले आणि जोपासले आहेत. त्यासाठीच्या श्रमविभागणीची अनेक रूपे आपल्याला परिचित आहेत. मात्र हे अंतर्विरोध कधीही ‘हिंदुत्वविचारव्यूहाला आव्हान’ अश्या तऱ्हेने व्यक्त होत नाहीत हे त्यातल्या ऐतिहासिक सहमतीचे इंगित आहे.

‘डार्क नाईट रायझेस’ ह्या ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे- कमिशनर गोर्डन आणि डिटेकटीव्ह ब्लेक यांच्यात खडाजंगी होते ती गॉथम शहराचा लाडका अटर्नी हार्वी डेंट आणि त्याच्या खऱ्या रूपाबद्दल. हार्वी डेंटच्या सोज्वळ आणि न्यायप्रिय प्रतिमेचे मिथ जपून त्याने सूडबुद्धीने केलेल्या खुनांची जबाबदारी बॅटमॅन घेतो आणि गोर्डनही त्याचे समर्थन करतो हे कळल्यावर, ब्लेक गोर्डनला त्याचा जाब विचारतो. तेव्हा गोर्डनचा जबाब अविस्मरणीय आहे

अशी एक वेळ येते जेव्हा सर्व व्यवस्था विफल होतात, कायदे-नियम व्यर्थ होतात आणि वाईट शक्ती विजयी होत राहतात. तुलाही अश्या आणीबाणीच्या प्रसंगाचा सामना करायची वेळ येईल. कदाचित तुलाही तेव्हा बॅटमॅनप्रमाणे एखादा मित्र असेल जो त्याचे हात हिंसेच्या घाणीत घालायला तयार असेल ज्यामुळे तुला तुझे हात स्वच्छ ठेवता येतील’.

हे कथानक बहुमुखी हिंदुत्व, त्याचे दुधारीपण अन त्याचे मुख्यधारेतील अविभाज्य स्थान स्पष्ट करते- वाईट शक्ती म्हणजे अर्थातच मुस्लिम, चीनी, परकीय भांडवल, कम्युनिस्ट इ. इ., हार्वी डेंट हे वाजपेयी (आणि आता अडवाणीसुद्धा) यांच्याप्रमाणे शुभ, सुसंस्कृत मिथ; बॅटमॅन हा विजीलान्ते म्हणजे हिंदुत्वाच्या बेनाम बिन-चेहऱ्याच्या टोळ्या आणि त्यांचे मोदी- तोगडिया यांच्यासारखे नायक तर गोर्डन हा ह्या सगळ्याचा मुख्यधारेचा स्वीकार. फरक इतकाच होतो की काही जणांना डेंट- बॅटमॅन यांचे अद्वैत मान्य असते तर काही त्यांच्यात द्वैत मानून आपले हात आणखी स्वच्छ असा बनाव करीत राहतात. असो.

गणवेशधारी कलावंत

फासिझम आणि कला यांचा संबंध हा कळीचा मुद्दा आहे. उदारमतवादी विचारविश्वाला याचा विचार फारसा मानवत नाही. कारण एरवी जीवन आणि कला, सामाजिक बांधिलकी आणि कला असे वाद उभे करून डाव्या विचाराच्या कलाकारांना गोंधळात टाकणे, त्यांचा विद्रोह कसा कलात्मक नाही वगैरे मखलाशी करणे, आणि बांधिलकीची भाषा करणाऱ्याची ‘गणवेशधारी कलावंत’ अशी अवहेलना करणे- ही सगळी गंमतजंमत जगभरात चालवून झाली आहे.  मराठीतील असले वाद आपल्याला परिचित आहेतच. मजा अशी आहे की फासिझम/ प्रतिगामी/ परंपरागत व्यवस्थेचा नोस्ताल्जिक गौरव करणाऱ्या कलाकृतीना मात्र ह्या सगळ्या चौकशीतून छूट मिळालेली आहे. ढसाळ यांची कविता ‘कविता’ आहे का असे प्रश्न त्यातूनच पडतात, पण सावरकरांची ‘भाषाशुद्धी’ आणि संस्कृतप्रचुर कविता, इतकेच नाही तर तिची आधुनिकता म्हणजे शस्त्रसज्जता, बलवान राष्ट्र वगैरे बाळबोध समज, इतिहासाची सोनेरी पाने आणि त्यातला पुनरुज्जीवनवाद यांचा लेखाजोखा घेण्याची हिंमत निर्माण होत नाही. पुनरुज्जीवनवाद्यांच्या प्रस्थापित अलंकारावर, कलेच्या रूढ फॉर्म्सवर, भाषा-सौष्ठवावर असलेल्या मक्तेदारीला म्हणजे तथाकथित ‘कौशल्याला’ प्रश्न करायचाही ‘उदार’ मुख्यधारेचा प्रयत्न असतच नाही. आणि कन्टेन्टची तर बातच सोडा. आधुनिक व्यक्तिवादी व्याकूळता ही स्थिती तेवढी मान्य करून तिचे समाधान म्हणून नोस्ताल्जिक गौरव आणि मिथीकल सुवर्णकाळ भूतकाळात पाहणाऱ्या कृतीना मुख्यधारेत मानाचे पान मिळते. (आणि वाजपेयी यांच्या कविता गायल्यामुळे सरकारी पद्म पुरस्कारदेखील मिळतो)

त्याला आणखी एक किनार आहे. नीत्शेप्रणीत सुपरमॅन हा नाझी आदर्श आणि त्याला मिळत राहिलेले कलेतील महत्वाचे स्थान हा आणखी गंभीर विषय आहे. एझरा पाउंड आणि त्याने फासिझमचे केलेले समर्थन- प्रचार, विख्यात विचारवंत हायडेगर याचे नाझी सदस्य असणे, यांचा पेच सोडवण्याचा जो प्रयत्न होतो तो एकतर ‘त्यांची कला/ वैचारिक निर्मिती आणि त्यांचे राजकारण यांना वेगवेगळे करून पहिले पाहिजे’ असा अगदीच बनचुका असतो. (नशिबाने अजून तरी हिटलर याची चित्रकला हीसुध्दा विशुद्धपणे पाहिली आणि प्रशंसली पाहिजे असला प्रकार झालेला नाही- पण त्याचे आत्मचरित्र आणि त्याचा वाढता खप हे त्याच्या राजकारणाच्या यशाचे द्योतकच आहे) दुसरीकडे नाझी मंत्री गोअरींग याचे उद्गार ‘कला, संस्कृती यांचा विषय निघाला की माझा हात कमरेच्या पिस्तुलाकडे जातो’ हे उद्गार पूर्ण-परिणत फासिझममध्ये कला, संस्कृती यांचे स्वायत्त अस्तित्व टिकूच शकत नाही तर फासिझम हा राजकारण, सामाजिक व्यवहार यांचेच एका भीषण ‘कलात्मक’ कॅनव्हासमध्ये रूपांतर करतो याचे निदर्शक आहेत. (अश्या मांडणीने फासिझम आणि कला यांची चिकित्सा करणारा सुंदर निबंध वाल्टर बेंजामिन याने लिहिला होता) युरोपचे ‘आंतरिक पुनरुत्थान’ होण्यासाठी कलेचा उपयोग असे प्रयोग नाझी जर्मनी- इटलीमध्ये झाले होते. प्रख्यात असा व्हेनिस फिल्म फेस्टीव्हल हा इटालियन फासिझमचा ‘मानवी चेहरा’ बनला. मुसोलिनी याने १९३२ मध्ये त्याची सुरुवात हॉलीवूडच्या बाजारू धंदेवाईक वृत्तीला विरोध, आणि कलात्मक युरोपीय मूल्यांना जोपासण्यासाठी केली होती. (गोबेल्स आणि त्याने प्रचारासाठी सिनेमाचा केलेला वापर हा अगदी उघड होता; पण सहमती ही अनेकविध दिशांनी बनत होती, असते हे लक्षात ठेवणे महत्वाचे) संगीत हादेखील त्यातला महत्वाचा भाग होता. ‘राष्ट्रीय संगीत परंपरा’ ही महत्वाची ठरली आणि आधुनिक संगीत हे बाजारू आणि कलेच्या कसोटीत बाद ठरले. एकदा ‘पुनरुज्जीवन’ हे लक्ष्य म्हणून मान्य केले की बाकी व्यक्तिवादी व्याकुळता, संदिग्ध मानवतावाद वगैरे कलाकुसरीच्या झुली अपोआप लोकप्रिय, आणि सर्वमान्य ठरत जातात. त्यातून तयार होणारे मुखवटे अनेक रंगी, अनेक ढंगी असतात- पण त्यांचे राजकारण समान असते. केवळ संघ-सदस्यत्व हीच त्याची कसोटी नाही, तर पुरोगामी छावणीतही असे नमुने भरले आहेत. प्रस्थापित इतिहास- कला यांचा निशंक स्वीकार, आणि त्यातून मिळणाऱ्या झुली यांचा हिशोब खूपच मोठा होईल. वाजपेयी यांची उदारपणाची अलंकृत झूल ही त्याच आधारे तपासली पाहिजे, तिची ‘पुनरुज्जीवनवादी गणवेश’ अशीच संभावना झाली पाहिजे.

_____

‘हिंदू तन मन आणि हिंदू राष्ट्र हे लक्ष्य’ १० व्या इयत्तेत कवितेत मान्य केल्यानंतर आणि २००० मध्ये ‘पंतप्रधानपद राहील आणि जाईल पण आपण आयुष्यभर संघस्वयंसेवक राहू’ याची ग्वाही दिल्यावर वाजपेयी यांनी कधीच आपले राजकारण लपवून ठेवले नाही असेच म्हणावे लागेल. विनोद असा आहे की सर्वत्र शास्त्र-काट्याच्या कसोट्या लावायच्या गोष्टी करणाऱ्यांना मात्र त्याचा सोयीस्कर विसर पडतो. मग वाजपेयी यांच्या विरोधात सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहिली म्हणून मोतीहारी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला जिवंत जाळायचा प्रयत्न होतो, औरंगाबाद पालिकेत एमआयएम नगरसेवकाने ‘सहिष्णू’ वाजपेयींना श्रद्धांजली वाहायला आक्षेप घेतला म्हणून सर्वपक्षीय नगरसेवक चपलेने मारहाण करतात, इतकेच काय तर वाजपेयी यांना श्रद्धांजली द्यायला गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना भाजप-संघ कार्यकर्ते मारहाण करतात- ह्या सगळ्या प्रकारांना ‘वाजपेयी वि. मोदी’ असले गमतीदार विरोध मानून गळे काढणारयाना २००४ मध्ये सोनिया पंतप्रधान झाल्या तर आम्ही मुंडण करू अशी आगखाऊ भाषा वापरणाऱ्या वाजपेयी मंत्रीमंडळातील सुषमा स्वराज विसरायच्या असतात, एकूणच सोनिया परकीय आहेत म्हणून संघ परिवाराने चालवलेली ‘इटालियन काँग्रेस’ इ. टीका व हीन कुजबूज मोहीम, १९९८-२००४ या काळातले ग्राहम स्टेन्स हत्याकांड, गुजरात दंगली, पोखरण अणुस्फोट, राष्ट्रवादी उन्माद आणि अमेरिकेच्या कह्यात गेलेले परराष्ट्र धोरण, विद्यापीठांत ज्योतिष शिकवायची टूम, इतिहासाचा अभ्यासक्रम बदलून इतिहास ‘राष्ट्रवादी’ असावा म्हणून ‘ख्यातनाम इतिहासकारांवर’ केलेले हल्ले, एम.एफ. हुसेनची चित्रप्रदर्शने, ‘फायर’ आदि चित्रपट यांना लक्ष्य करून हिंदुराष्ट्र कसे असले पाहिजे/ असणार आहे याचा दाखवलेला ट्रेलर हे सगळे ‘उदार’ वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातीलच आहे. आणि त्याबद्दलचे मौन खरेच कानठळ्या बसवणारे आहे. एका अर्थी पुरोगामी, उदार प्रवाह इतका क्षीण झाला आहे की भारत हा बहुपक्षीय संसदीय लोकशाही नसून जणू काही इराणप्रमाणे धर्मपीठकेंद्रित मर्यादित लोकशाही आहे असा समज होऊन त्यातल्या त्यात बरे, आणि उदार असे राजकीय हिंदुत्वाचे पर्याय निवडत लिबरल लोक नोस्ताल्जिक होऊ लागले आहेत आणि इतिहासाला विसरून, त्याला कळत-नकळत पुनर्लेखीत करायला हातभार लावत आहेत. राजकारणाचा लंबक किती उजवीकडे सरकला आहे ते पुरोगाम्यांच्या ‘वाजपेयीरूपी कालचा गोंधळ बरा होता’ ह्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. २०१९ चे घोडामैदान जवळ आहे, तेव्हा अशी भूमिका घेऊन लंबक पुन्हा दिशा बदलेल हे मात्र त्यांचे शुद्ध स्वप्नरंजन आहे.

2

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

1 Comment

Write A Comment