fbpx
राजकारण

गुण गाईन आवडी !

अटल बिहारी वाजपेयींचे मूल्यमापन हा या लेखाचा हेतू नाही , त्यांच्या गुणगानात वाहून गेलेल्या उदारमतवादी पुरोगाम्यांच्या गफलती गैरसमजुती दाखवून देणे हादेखील नाही। मात्र उदारमतवादी पुरोगामी (आणि काही डावे म्हणवून घेणारे सुद्धा!)अटलप्रशस्ती का करत आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न ह्या लेखात करायचा आहे। ढोबळमानाने पुरोगाम्यांच्या अटलप्रशस्तीच्या दोन तऱ्हा दिसतात , एक आहे डावपेच-धोरणात्मक आणि दुसरी आहे राजकीय -तत्त्ववैचारिक. वाजपेयींची कार्यशैली मोदींपेक्षा कशी वेगळी ,संघात असूनही संघाच्या संस्कृतीशी विसंगत कसे , नेहरूंचं मोठेपण त्यांनी कसं नाकारलं नाही , सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध कसे ठेवले वगैरे तर्क देऊन एकंदर संघपरिवाराचा एकाधिकारशाही दंडेलशाही हिंदुत्व विचार आणि वाजपेयी यामध्ये रेघ ओढायचा प्रयत्न उदारमतवादी आणि काही डावे करताना दिसतात. वाजपेयींच्या प्रतिमेच्या आडून मोदी आणि संघावर बाण चालवायचा हा खटाटोप आहे . वाजपेयींची हि प्रतिमा (किंवा मुखवटा ) किती फसवी आणि भ्रामक आहे ह्याची अनेक उदाहरणं देता येतील आणि अटल गुणगानात वाहून न गेलेल्या विचारवंत अभ्यासक पत्रकारांनी गेल्या काही दिवसात त्याबद्दल लिहिलंही आहे ,तरीही असा खटाटोप करण्याची गरज अशा पुरोगाम्यांना का भासावी ? त्यांना अटलबिहारिंच्या संघनिष्ठ हिंदुत्ववादी कर्तबगारीचे विस्मरण तर झाले नाही ना अशी शंका येऊ शकते . मात्र प्रश्न हरवलेल्या याददाश्तचा नाही तर नीतिधैर्य हरवलेलं असण्याचा आहे .

सार्वजनिक जीवनात जबाबदारीच्या पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल खंत /शोक/हळहळ व्यक्त करणे ही एक गोष्ट झाली पण ती व्यक्त करत असताना त्या व्यक्तीच्या भूमिका -विचारसरणी -कृती याबद्दलच्या वस्तुस्थितीची मोडतोड करण्याची ,ती सोयोस्करपणे दडवण्याची गरज का भासावी ,तशी वेळ का यावी हा गंभीर प्रश्न आहे. दोन शक्यता दिसतात. एक म्हणजे आज संघ-भाजप राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या वर्चस्वशाली बनल्यामुळे आणि त्यांच्या दडपशाही-दंडेलशाहीला ऊत आलेला असल्यामुळे अटलबिहारींबद्दल स्पष्टपणे बोलण्याची भीती वाटत असावी , एमआयएमच्या नगरसेवकाना शोकप्रस्तावाला विरोध केल्याबद्दल आणि मोतीहारी येथील समाजशास्त्राच्या प्राध्यापकांना अटलबिहारींवर टीका करणारी फेसबुक कमेंट लिहिल्याबद्दल मारहाण झाल्याचे उदाहरण समोर आहेच. अगदी थेट मारहाणीची भीती जरी नाही तरी दुसरी एक भीती असू शकते ती म्हणजे आज भाजप ‘लोकप्रिय-पॉप्युलर ‘ असताना अशा प्रसंगी स्पष्ट आणि खरे बोलून लोकांपासून -मुख्य प्रवाहापासून वेगळे पडण्याची. मग त्यापेक्षा त्याच मुख्य प्रवाहात आपलं वेगळं होडकं वल्हवण्याचा हिशोब सावध डावपेचात्मक अटल प्रशस्तीमध्ये दिसतो. प्रवाहाला वळण लावण्याची ताकद आणि धमक हरवलेली असल्याचे हे लक्षण आहे. वर उल्लेख केलेल्या दोन शक्यतांपैकी दुसरी शक्यता ह्या पवित्र्याशी निगडित आहे. अटलबिहारींची मिथकवजा प्रतिमा ही मोदींच्या भाजपला छेद देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते अशा समजुतीतून त्या प्रतिमेला खतपाणी घालण्यासाठी वस्तुस्थिती दडवण्याचा त्याकडे पद्धतशीर डोळेझाक करण्याचा प्रयत्न दिसतो. म्हणजे एकंदरच राजकीय सामाजिक जीवनाचा अक्ष उजवीकडे झुकलेला असतानाच्या काळात मोदीप्रणित कट्टर उजव्या /अति-उजव्या राजकारणापासून लोकांना दूर नेण्यासाठी – किंवा मोदी हे कसे विकासपुरुष वगैरे नसून कट्टर उजवेच आहेत हे लोकांना दाखवून देण्यासाठी कॉन्ट्रास्ट म्हणून समावेशक उदार वगैरे अटलप्रतिमा रंगवायची. निव्वळ डावपेच म्हणूनही हा मार्ग कुचकामी निसरडा आणि चकवे लावणारा आहे. ( अटल अडवाणींनी केलेल्या कट्टरतेच्या -मुस्लिमद्वेषाच्या -संकुचित राष्ट्रवादाच्या मशागतीमुळे मोदींना भरघोस पीक घेता आलं हे ढळढळीत वास्तव अगदी सोयीस्करपणे नजरेआड केलं तरीदेखील !) अटलबिहारी आणि मोदी ह्यात अंतर्विरोध नाही तर सुसंगती continuity आहे ,भारतीय राजकारण आणि समाजातील हिंदुत्वाच्या उभाराच्या प्रक्रियेतील ते दोन वेगळे टप्पे आहेत आणि त्यात वरकरणी भासणारे फरक हे तेंव्हाच्या आणि आताच्या सामाजिक राजकीय परिस्थितीमधल्या फरकामुळे आहेत. वाजपेयींच्या काळात समाजात आणि राजकारणात हिंदुत्व इतकं शिरजोर झालं नव्हतं की फसवा उदार मुखवटा फेकून देता यावा अर्थात तेंव्हाही मुखवट्यामागचा असली चेहरा वेळोवेळी दिसण्याची काळजी वाजपेयी घ्यायचेच , उदा.ग्रहम स्टेंस हत्याकांड ,गोव्यातील भाषण. मोदींना असला मुखवटा बाळगण्याची गरज नाही ,मोदींच्या न्यू इंडियामध्ये तथाकथित विकास आणि हिंदुत्वाचा संयोग झालेला आहे आणि त्या संयोगाला लोकांची अधिमान्यता (popular legitimacy) मोठ्या प्रमाणावर आहे. झुंडीने केलेल्या मुस्लिम व्यक्तींच्या हत्या किंवा दलितांवर केलेल्या अत्याचारामुळे मोदी सरकारला लोकांचा रोष पत्करावा लागत नाही , आर्थिक समस्यांची तीव्रता वाढल्यामुळेच ते एकवेळ होऊ शकते अशी परिस्थिती हिंदुत्वाच्या अधिमान्यतेचे द्योतक आहे. त्याचा प्रतिकार वाजपेयींचा तथाकथित कॉन्ट्रास्ट पुढे करून होणार नाही कारण वाजपेयींच्या काळातील भाजपच्या उभाराला आधारभूत असलेले जातवर्गीय समाजघटकांची आजची गरज ही मोदींचा चेहरा आहे,वाजपेयींचा मुखवटा नाही.

डावपेचाच्या यशपयशापलीकडे अशी भूमिका हे खरंतर परिस्थितीपुढे शरणागती पत्करल्याचेच लक्षण आहे. हिंदुत्वाच्या अधिमान्यतेला आव्हान देण्याचे पर्याय देण्याचे आणि लोकशाही हक्क- समता -न्याय या मूल्यांभोवती नवी अधिमान्यता घडवण्याचे प्रयास सोडून आता तीच अपरिहार्यता मानण्याची थकलेली हरलेली ( वाजपेयींच्याच शब्दात टायर्ड अँड रिटायर्ड !) ही मानसिकता आहे। मात्र मोदी विरुद्ध वाजपेयी असा फसवा विरोध उभा करून , वाजपेयींची तळी उचलून धरून मोदींवर बाण चालवण्याचा पवित्रा घेत ही शरणागती लपवण्याची सोय होते , हवेत वार करत आपण लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असल्याची बतावणीही करता येते. असले तकलादू डावपेच लढवणाऱ्यांना एकवेळ स्वतःची फसवणूक करून घेणारे (self delusional) आणि भोळसट म्हणून थोडीशी सवलत देता येईल मात्र अटलप्रशस्तीची जी दुसरी तऱ्हा आहे त्यात मोडणाऱ्या मंडळींना ही सवलतही देता यायची नाही. ह्यांचा तर्कही मोदी विरुद्ध वाजपेयी या गृहितकावर आधारित आहे पण त्यात भोळसटपणा बिलकुल नाही तर हिशोबीपणा आणि चलाखी आहे. अटलप्रशस्तीच्या पहिल्या प्रकारात मोडणाऱ्यांमध्ये समाजवादी काही डावे ज्यांना ढोबळपणे परिवर्तनवादी प्रवाहाच्या जवळचे मानता येईल अशी मंडळी आहेत. दुसऱ्या प्रकारात भरणा आहे तो अभिजन उदारमवाद्यांचा.

भारतातील उदारमतवाद्यांमधील मोठया आणि प्रभावी घटकाच्या दृष्टीने वाजपेयी हे उदारमतवादी किंवा त्यांचे सोबती-वाटसरूच आहेत (अरुण शौरी यशवन्त सिन्हा वगैरे कसे मोदीविरोधातील सहप्रवासी आहेत तसेच!) अर्थात असल्या उदारमतवाद्यांचे जातवर्गीय चारित्र्य आणि विचारसरणी बघता ते जर स्वतःला उदारमतवादी म्हणवून घेत असतील तर त्या न्यायाने वाजपेयींनाही उदारमतवादी ठरवता येईलच . भारतातील उदारमतवाद्यांसाठी डॉ आंबेडकरांनी लिबरल बाय हाफ – अर्धवट उदारमतवादी असा शब्दप्रयोग केला होता आणि असं अर्धंमुर्धं उदारमतवादी असता येत नाही असा इशाराही दिला होता ,बाबासाहेब उदारमतवादी मूल्यांच्या क्रांतिकारक-परिवर्तनवादी आशयाबद्दल असलेल्या असोशीतून बोलत होते मात्र भारतातील हिंदू -ब्राह्मणी अभिजन उदारमतवादी ह्या मूल्यांच्या सघन आशयापेक्षा उदारमतवादाच्या procedural -प्रक्रियात्मक अंगावरच भर देतात ( निवडणुका , जबाबदारीच्या विभाजनाचे तत्व , कायद्यापुढे समानता इत्यादी ) . ही procedural चौकट कायम ठेवून उदारमतवादी मूल्यांच्या -(स्वातंत्र्य समता लोकशाही इ.)मुळावर येणारी व्यवस्था घडवता येते हे आपण भारतात आणि जगात अन्यत्रही बघतच आहोत . मात्र कितीही म्हणलं तरी फॅसिस्ट एकाधिकारशाही कार्यक्रम ह्या चौकटीच्या आत राबवताना त्या चौकटीला हादरे हे बसतातच -तडेही जातात आणि त्यामुळे हे अभिजन उदारमतवादी ( काही प्रमाणिकपणे तर काही स्वतःचे हितसंबंध धोक्यात येण्याच्या भीतीपोटी ) आज मोदींविरोधात बोलताना दिसतात . मात्र त्यामुळे ते तात्विकदृष्ट्या संघ भाजपचे विरोधक असतीलच असं नाही , मोदीप्रणित हडेलहप्पी दंडेलीला त्यांचा विरोध असतो पण ( ब्राह्मणी )हिंदू धर्म मुळातच सहिष्णुतेचा वाहता झरा आहे- ” सगळेच मुस्लिम दहशतवादी नसले तरी सगळे दहशतवादी मुस्लिम असतात’ हे वचन त्यांना कमीजास्त फरकाने मान्य असते , आरक्षणामुळे मेरिट -गुणवत्ता धोक्यात येते असाही त्यांचा समज असतो, आर्थिक विकास हा भांडवली मार्गानेच होऊ शकतो यावर त्यांची नितांत श्रद्धा असते. ( ही यादी वाढवता येईल आणि नावानिशी संदर्भही देता येतील पण तो वेगळ्या लेखाचाच विषय आहे ) म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या ब्राह्मणी -भांडवली कार्यक्रमाचं त्यांना वावडं असायलाच पाहिजे अशी परिस्थिती नाही पण हा कार्यक्रम जरा ‘सुसंस्कृत संयमी सोज्वळपणे ‘ समावेशकतेने -म्हणजे सत्ताधारी प्रभुत्वशाली जातवर्गांच्या सगळ्या घटकांना -प्रतिनिधींना सांभाळून घेत – राबवावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते.

पण मेख अशी आहे की राजकारण म्हणजे काही controlled lab experiment नाही त्यामुळे मग मोदींसारखे ‘अपघात ‘ घडतात ,अर्थात हा अपघात नसून आधुनिक भारताच्या /स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतील अंतर्विरोधांची , मूलभूत सामाजिक अंतर्विरोध सोडवण्यात केलेल्या प्रसंगी हेतुपुरस्सर चालढकलीची उपज आहे, हे एकतर ठिसूळ तात्विक दृष्टीमुळे समजत तरी नाही किंवा त्यापेक्षा ते समजून घेणं परवडत नाही.कारण मग एकंदरच भारतीय उदारमतवादी प्रकल्पाची चिकित्सा करावी लागेल , प्रस्थापित जातवर्गीय हितसंबंधांच्या मुळावर येणारी फेरमांडणी करावी लागेल. थोडक्यात सांगायचे तर सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विषमता आणि बंधने तोडण्याचा नवा लढाऊ कार्यक्रम मांडावा लागेल.

सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विषमता आणि बंधने तोडण्याचा नवा लढाऊ कार्यक्रम हाती घेणे कोमट उदारमतवाद्यांना मानवणे शक्य नाही. त्यापेक्षा मग वर म्हणल्याप्रमाणे ‘सुसंस्कृत -संयमी -समावेशी ‘ वगैरे चेहरा शोधून बाकी रचना तशीच ठेवणे ( status quo ) हे सोपे आणि सोयीस्कर आहे . हा चेहरा भाजपमधला (म्हणजे संघपरिवारातलाच ) असू शकतो किंवा काँग्रेस मृदू हिंदुत्व आणि मुक्त बाजारवादी आर्थिक धोरणे यांची कास धरत राहिली तर तिथलाही असू शकतो. काँग्रेसची शिवभक्त जनेउधारी व्हायची अलीकडील धडपड व सॅम पित्रोदा, मॉन्टेकसिंग आदींचे आर्थिक तत्वज्ञान कवटाळण्याची काँग्रेसची तयारी पाहता या पुढील ‘अटल’ मुखवटा हा काँग्रेस मधलाही असू शकतो.
अभिजन उदारमतवादी करत असलेल्या अटलबिहारी प्रशस्तीचा राजकीय अर्थ हा असा आहे. ही प्रशस्ती पत्रके मुक्तपणे देणाऱ्या उदारमतवाद्यांचे बेगडी पुरोगामीत्व या निमित्ताने नागडे होऊन समोर आले आहे.

नचिकेत कुलकर्णी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज मध्ये 'आधुनिक भारतीय राजकीय विचार'या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आहेत. लोकवाग्मय गृह या प्रकाशन संस्थेतहि ते सक्रिय आहेत.

3 Comments

  1. While i understand that Vajpayee is getting floral tributes, overflowing tributes for being so called moderate, i wish to draw your attention to the fact that Modi is hated by the elite, the savarna liberals because he is an obc, comes from economically poor class and is self made. I also understand that hate towards Modi not just because of Hindutva but also because he has broken the upper caste hegemony of most if the political parties.

    You mentioned the left, far left , right and far right. Did you notice most of the top leadership is upper caste , family business and Modi with Mayawati stand out as few among the top who have not started their family business here.

Write A Comment