fbpx
राजकारण सामाजिक

आक्रस्ताळी नकारात्मकतेचं ‘बाळकडू’

‘देशात व राज्यात सध्या सरकार नावाची यंत्रणा लुप्त पावली असून ‘व्यक्तीपुजकांच्या संघांची जोरदार परेड सुरू आहे. कितीही नाक कापलं तरी भोकं जाग्यावर आहेत. घसा कोरडा करून आक्रस्ताळी नकारात्मकता’ लादण्यात हे व्यक्तिपुजक संघ अहोरात्र कष्ट घेत आहेत. या व्यक्तिपुजकांची लाडकी व्यक्ती ‘बालिश’पणाच्या गर्तेत रूतल्याची साक्ष देत असतानाही ‘आमचा अभिमन्यू कोंडी फोडेल असा अंहकारी अभिमान बाळगण्यातच धन्यता मानली जातेय. होय, मी बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अंधभक्तांच्या अहंकाराबद्दल….! 

नकारात्मकतेचं ‘बाळकडू’ घेतलेल्या या नवसरकार समर्पित टोळ्यांना खतपाणी घालण्याचं काम नेतृत्वाकडूनच होत असणार. हा निश्चितचं  या आत्मकेंद्री सरकारचा ‘अंजेडा’ असू शकतो हे नाकारता येणार नाही याचे अनेक दाखले देखील सतत समोर येत आहेत. 

महाराष्ट्र हे ‘मोर्चाराष्ट्र’ बनलेयं. शेतकरी-कामगार-विद्यार्थी-बेरोजगार ते मराठा-धनगर-आदिवासी-ओबीसी-दलित रस्त्यावर उतरून हिंसक होत आहेत. पण राज्याचं नेतृत्व समर्थकांच्या मखशालीत लपेटण्याच पध्दतशीर कारस्थान मुख्य माध्यमं व अभिजन पांढरपेशा वर्गातून रेटलं जातेय. बुध्दीबळाच्या चाली देखील फिक्या पडतील असा बुध्दीभेद प्याद्यांच्या वतीनं सुरू आहे. गोंधळात महाराष्ट्र बुडलेला असताना सरकार समर्थक पांढरपेशी मात्र किळसवाणी सकारात्मकतेचा जागर करण्यात मश्गुल आहेत. अन याच कथित आत्मविश्वासाच्या जोरावर राज्याच्या सरकारचा डोलारा डामडौलात सांभाळण्याचं अवसान नेतृत्वाच्या अंगात भिनल्याचं चित्र आहे. या अभिजनांनी लाडकं बनवलेल्या नेतृत्वाला आव्हान उभे राहिले की ‘जाती’चं वेष्टन लावून सोशल मिडीयातून पाठराखण करणारी ‘ट्रोल’ आर्मी तात्काळ बिळातून बाहेर पडतेय. या ट्रोल आर्मीची एकचं रणनिती आहे ती म्हणजे ‘फोडा व झोडा’… यांना ना वेदना कळताहेत ना व्यथा… कोणताही समाज न्यायाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गानं पुढे येत असेल तर सरकार समर्पित अभिजनांची  ट्रोल आर्मी जातीय विद्वेषानं सरसावतेय. अन त्यातूनचं सामाजिक सलोख्याचं माहेरघर असलेला महाराष्ट्र विखारी विषाला बळी पडतोयं. आता पुन्हा नव्यानं महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाच्या उद्वेगात होरपळा जातोय. त्याचं कारण म्हणजे आत्मकेंद्री नेतृत्व व त्याची सोबत करणारी आपमतलबी पिलावळ…..!!!

भाजप आय. टी. सेल कडून ट्विटर वर शेअर झालेले चित्र. फेक ट्रेंड #VitthalSevakDevendra

मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची पुजा करण्यास जाणार नाही. असा निर्णय घेतला. हा निर्णय जाहिर करताना त्यांच्यातला ‘वर्चस्ववाद’ व ‘अंहकार’ स्पष्टपणे समोर आला. मला झेड प्लस सुरक्षा आहे. अंगालाही कोणी हात लावू शकणार नाही. वारीमधे साप सोडणारे संदेश पकडले. असा आरोप करत वारकऱ्यांच्या हितासाठी महापुजा करण्याचा निर्णय रद्द केल्याचे ते म्हणाले. 

अन त्याक्षणीच सोशल मिडीयातून मुख्यमंत्र्यांचा ‘समंजसपणाचा मास्टरस्टस्ट्रोक’ अशा मथळ्याखाली मखलाशी सुरू झाली. यामधे दिग्गज पत्रपंडित देखिल आघाडीवर होते. संघ विचाराने झपाटलेले व पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून आजपर्यंत वावरलेले तथाकथित पत्रकार तर या मोहिमेला बळ देत होते. पण या सगळ्यात एक साम्य पुन्हा अधोरेखित होत होते. ते म्हणजे सतत सरकारची पाठराखण करणारा एकचं विशिष्ट जातींचा वर्ग ….!!! 

हे सगळं वाईट असलं तरी वास्तव आहे. राज्याचं नेतृत्व सांभाळत असताना या सरकारचे म्होरके नेहमी सामाजिक एकता व ऐक्य यात चुका करताना दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहेत याची सरकारला उत्तम जाणीव आहे. पण त्यासाठी मराठा समाजावर साप सोडणे, चेंगराचेंगरी करणं हे कुभांड रचण्याचा हेतू काय? हा खरा प्रश्न आहे. 

सर्वात महत्वाची बाब दुर्लक्षित केली जात आहे ती म्हणजे पंढरपूरच्या आंदोलनात धनगर व मुस्लिम आरक्षणाचाही मुद्दा मांडलेला होता. धनगर-मुस्लिम-मराठा असे ऐक्य यावेळी झाले होते. हे सरकारच्या अपयशाचं द्योतक आहे. बहुजनांच्या महाराष्ट्रात विश्वासक नेतृत्व विध्वंसक प्रवृत्तीला पाठिशी घालणार असेल तर या राज्यातला बहुजन खांद्याला खांदा लावून उभा राहतो. माळी-धनगर-वंजारी-मराठा यांच्यात फुटीची बीजे रोवण्याचा खेळ काहीकाळ यशस्वी झाला असेल पण तो चिरंतन तसाच राहत नाही हे या राज्याचे वास्तव आहे. अखेर या कृषक जातीत भाऊबंदकी नसली तरी ‘बांधभावकी’ आहे. शेताच्या बांधाला बांध अन दावनीला दावण असं या समाजाचं नातं आहे. शेती-माती-संस्कृतीच्या एकाच धाग्यात हे समाज बांधलेले आहेत. त्यामुळं पंढरपूरातलं आंदोलन हे धनगर व मराठा जातीतल्या व्यथितांचं ऐक्य होवून झालेलं आंदोलन आहे. 

मराठा मुक मोर्चा, मुंबई, ऑगस्ट २०१७. फोटो – हिंदुस्तान टाईम्स.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

शिक्षण व रोजगारात आरक्षण, शेतीमालाला भाव…. पण चार वर्षातल्या सरकारच्या जातीय बेरजेच्या राजकारणाचा अंदाज आलेल्या बहुजनांनी मनुस्मृतीचे समर्थक मनोहर उर्फ संभाजी भिडे च्या अटकेची मागणी नव्यानं केली आहे. हा खरा कळीचा मु्द्दा आहे. हा संघर्ष केवळ सरकार विरूध्द समाज असा राहिलेला नसून हा संघर्ष आता बहुजनांच्या मागण्या व अभिजनांची मानसिकता असा सुरू झाल्याचे चित्र आहे.  कारण, राजमाता जिजाऊंची बदनामी केल्याचा आरोप असलेल्या बाबासाहेब पुरंदरेला विरोध असतानाही नाकावर टिच्चून ‘महाराष्ट्र भूषण’ देणं… कोरेगांव-भिमा प्रकरणात कट्टरतावादी धार्मिक म्होरक्यांना पुढं करून सामाजिक तेढ निर्माण करणं… जात-पात विसरून शेतकरी संपात सहभागी झालेल्या शेतकरी आंदोलनात जाणीवपुर्वक फुट पाडणं.. शेतकरी संघठनांच्या नेत्यांना सत्तेतली पदं बहाल करून चळवळ मोडीत काढणं अन त्यापेक्षाही जहालवादी म्हणजे शहरी ग्राहक व ग्रामीण उत्पादक यांच्यात भेद करून ध्रुवीकरणाचं राजकारण करणं..  या सर्व आपत्तीचं कारण सरकार नावाची यंत्रणा घडवून आणतेय व त्याला सरकारचा चाहता पांढरेपशा वर्ग पाठबळ देतोय ही मानसिकता राज्यातल्या बहुजनांत वाढीस लागली आहे. अन त्यातूनच विविध जाती व वर्गात उद्रेक तोंड वर काढत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरूवातीला विश्वासक नेतृत्व वाटतं होतं. सत्तेत रूळताना ते आश्वासक झालं अन आता सत्ता परिपक्व होत असताना हेच नेतृत्व सामाजिक सलोख्याच्या बाबतीत विध्वसंक होतेय असा समज या उत्पादक व कृषक समाजाचा बनतोय हे नाकारता येत नाही. 

काकासाहेब शिंदे

त्यामुळं सध्या जो मराठा समाजाच्या संतापाचा कडेलोट सुरू आहे तो हाताळताना जखमेवर मीठ चोळल्याची भावना वाढली आहे. पंढरपूरची वारी ही याच बहुजन कृषक समाजाच्या सहिष्णुता व मानवतेच्या परंपरेनं नावलौकिकास साजेशी झालेली आहे. अन याच वारीतल्या बहुजनांच्या पोराबाळांनी सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. पण धारकरी व वारकरी यांना एकाच तराजू मधे तोलणार्या मानसिकतेचं सरकार असेल तर त्या सरकारला विठ्ठलाच्या दरबारातचं जाब विचारायला हवा या भावनेतून आषाढीवारीतल्या आंदोलनाचा जन्म झाल्याचे नाकारता येत नाही. रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार घडला त्यावर्षी दलितांनी विठ्ठलाच्या पुजेपासून तत्कालिन मुख्यमंत्र्यांना वंचित ठेवलं होतं. संत तुकारामांच्या भूमीत घातक रासायनिक प्रकल्प येतोय याचा निषेध म्हणून  वारकऱ्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना पुजा करू दिली नव्हती. कारण या राज्यातल्या बहुजनांचा विश्वास पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी वाहिलेला आहे. अन सरकार देखील याच विठ्ठलाच्या साक्षीनं बळीराजाच्या सौख्य व समृध्दीचं साकडं विठ्ठलाला घालतं. पण मराठा क्रांती मोर्चानं देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याचा पवित्रा ठाम ठेवल्यानंतर ‘वारीमधे साप सोडण्याचा प्रयत्न होणार होता. चेगराचेंगरीच्या घटना करण्याचा डाव होता. हे छत्रपती शिवाजी राजांचे मावळे असूच शकत नाहीत.’ अशा बेफाम शब्दात आंदोलनकर्त्यांची मानहानी केल्याचा संताप उसळला.ज्या पंढरपूरात दहा ते पंधरा लाख सहिष्णु वारकरी जमा झालेत त्यांना अशाप्रकारे भयभित करण्याचे काम कोणताही परिपक्व नेता करू शकत नाही. पण फडणवीस यांनी ते केलं. आषाढी वारी संपल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेवून याबाबत अधिक माहिती देता आली असती पण ऐन एकादशीच्या आदल्या दिवशी त्यांना हा गौप्यस्फोट केला अन अगोदरच उद्रेकाच्या तोंडावर असलेल्या मराठा समाजाचा संयम तुटला. हे करण्यामागे नेमकं कारण काय ? वारकर्यांना त्रास नको म्हणून मी पुजेला जाण्याचा निर्णय रद्द केला. या एका सभ्यतेनं त्यांनी भूमिका स्पष्ट केली असती तर काय बिघडलं असतं..? पण टीका सहन करण्याची मानसिकता नसावी. किंबहुना वर्चस्ववादी स्वभावाचा हा परिणाम असावा ? त्यातच स्वप्रतिमेच्या न्यूनगंडाने तरी झपाटलेले असावे ? अशा स्वाभाविक प्रतिक्रीया विविध स्तरातून उमटू लागल्या. त्यातच पुन्हा एकदा अभिजनांचा पांढरपेशी वर्गानं सोशल मिडीयात डोके वर काढत, ‘ मुख्यमंत्र्याची जात’ नोंदवून मराठा समाजावर शरसंधान सुरू केले. हा सगळा प्रकार एका विशिष्ट रणनितीचा तरी असू शकतो किंवा निर्माण झालेल्या परिस्थिचा ‘फोडा व झोडा ‘ या अजेंड्यांचा भाग असू शकतो अशी शंका उपस्थित केली जातेयं. 

किसान लाँग मार्च.
फोटो – ब्लूमबर्ग क्विंट

एकंदर महाराष्ट्र हा सामाजिक सलोख्यातून सामाजिक विध्वसांच्या दिशेनं जात असताना सरकार नावाची यंत्रणा राजकिय लाभाचाच अधिक विचार करताना दिसत आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या ऐक्यभावनेवर दूरगामी परिणाम करणारे आहे. राज्याच्या नेतृत्वानं आत्मकेंद्री राहून या परिस्थीचा सामना करण्याचे धाडस केले तर आगामी काळ महाराष्ट्राला विद्वेषाच्या गर्तेत लोटणारा ठरेल याचीच अधिक भिती आहे. शेवटी आक्रस्ताळी नकारात्मकता अन किळसवाणी सकारात्मकतेचं ‘बाळकडू’ राज्यातल्या सामाजिक ऐक्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. ते पेलण्याचा कितीही आत्मविश्वास असला तरी राज्याच्या सामाजिक सौहार्दतेचा तोल जाणार नाही ही जबाबदारी देखील सरकारचीच आहे. 

कारण, या संघर्षाचे मुळचं इथल्या कृषक समाजाच्या स्थित्यंतरात दडलेले आहे. या शेतकर्याला महाराष्ट्रात बळीराजा म्हणतात. शेतकर्याला बळीराजा हा शब्द वापरणे ही बाब सामान्य नाही. ती गांभिर्यानं न घेता उपेक्षेनं मारावी अशी तर नाहीच नाही. बळीराजाच्या अपार कष्टाची, शेतीवरील विलक्षण श्रध्देची, निष्कपट आचरणाची, मनाच्या उमदेपणाची बाजू घेताना संत तुकाराम महाराज देखील ईश्वरा सोबत भांडतात. संत तुकाराम म्हणतात, 

हरि तु निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठिण |

नव्हे ते करिसी आन, कवणे नाही केले ते 

बळी सर्वस्वे उदार । जेणे उभारिला कर ।

करूनी काहार । तो पाताळी घातला । 

तेव्हा, आंदोलनं राजकिय असल्याचा आभास निर्माण केला तरी या ‘बळीराजा’ला (शेतकर्याला) न्याय देणं.. सन्मानानं त्याला जगण्याचा अधिकार मिळवून देणं हे कोणत्याही सरकारचं उत्तरदायित्व आहे.

लेखक राईट ॲंगल्स चे नियमित वाचक आहेत.

1 Comment

  1. Dattaprasad Reply

    अप्रतिम लेख…
    अग्रलेख काय असतो हे हा लेख वाचून कळते,
    आजच्या वर्तमानपत्रातील संपादकांनी असे लेख जरूर वाचावेत, नुसते नावाला संपादक न राहता लेख काय आणि कसे असतात हे या लेखावरून लक्षात येईल.
    मालकांची चाटुगिरी करण्यापेक्षा असे लेख संपादकांनी वाचून लिहिन्याचा प्रयत्न करावा..
    पत्रकारीतेत असणाऱ्यांनी असे लेख जरूर वाचावेत….
    उत्तम लेख आहे हा….
    पुढे पण असे लेख वाचायला नक्कीच आवडतील…
    अप्रतिम लेख….
    खूप खूप धन्यवाद असा सुंदर लेख वाचायला मिळाला म्हणून…..

Reply To Dattaprasad Cancel Reply