fbpx
राजकारण

आणीबाणी आणि हिटलरशाही समान होते का?

१९७५ मध्ये देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने जोरदार निषेध नोंदवत वर्तमान पत्रात अर्धपान जाहिराती दिल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कुटुंबाकडे सर्व सत्ता राहण्यासाठी ही आणीबाणी लावल्याचं सांगितलं. भाजपची पालक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशी आणीबाणीविरोधात सामील होती याचे मोठमोठे दावेही करण्यात आले. पण आणीबाणीच्या विरोधात राहून लढा देणारे मार्क्सवादी, समाजवादी आणि काँग्रेसमधील काही गट यांनी मात्र त्यांच्या योगदानाबद्दल असे काही दावे केले नाहीत की जाहिरातबाजी. काँग्रेसनेही या काळावर टीका केलेली नाही. मात्र इंदिरा गांधी यांनी स्वतः १९७८ मध्ये यवतमाळ येथे बोलताना आणीबाणीबद्दल खंत व्यक्त केली होती. भाजपचे काही नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र त्या काळाची तुलना हिटलरच्या फॅसिस्ट सत्तेशी केली आहे.
आणीबाणीच्या काळामध्ये लोकशाहीची मूल्यं पायदळी तुडवली गेली यात शंकाच नाही. पण त्याची हिटलरच्या फॅसिस्ट सत्तेशी सुरू असलेली तुलना इथेच संपते. कारण हिटलरच्या काळात प्रामुख्याने होत असलेल्या गोष्टी म्हणजे लोकांना भावनिकदृष्ट्या आवाहन करून चिथवणं, एखाद्या विषयावर तीव्र विरोध करून स्टॉर्म ट्रूपर्सना सक्रीय करणं आणि अल्पसंख्यांक असलेल्या ज्यूंवर हल्ले करणं. हिटलरच्या सत्तेचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे मोठ्या उद्योगपतींना प्रोत्साहन देणं आणि कामगारांच्या हक्कांची दडपशाही करणं. त्याच काळामध्ये भूतकाळातल्या काही घटनांना ‘सोनेरी क्षण’ म्हणून उल्लेख करून त्या लोकांच्या गळी उतरवणं, अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणं, परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली शेजारी देशांशी संबंध बिघडवून घेणं या गोष्टी प्रामुख्याने घडत होत्या. आइनस्टाइनसारखे शास्त्रज्ञ देश सोडून गेले. विशिष्ट वंशाच्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणं हेच एक मोठं धोरण तेव्हा राबवलं गेलं. आणीबाणीमध्ये सत्तेचा जो दुरूपयोग झाला त्यात कोणत्याही अल्पसंख्यांक गटाला लक्ष्य करण्यात आलं नव्हतं. त्यावेळी रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना खूप त्रास झाला, बांधकामं पाडून टाकण्यात आली, गरिबांना नसबंदीसाठी जबरदस्ती करण्यात आली. त्याचा मुस्लिमही बळी ठरले मात्र मुद्दाम मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं नाही.

फॅसिस्ट राज्यामध्ये लोकशाहीचं अवमूल्यन करून लोकांमध्ये उन्माद निर्माण करून, भावनिक मुद्द्यांना महत्त्व देऊन रस्त्यावरच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्याचं काम प्रामुख्याने केलं. पण ज्या इंदिरा गांधींनी स्वतः आणीबाणी लादली त्यांनीच ती मागेही घेतली आणि लोकशाही मार्गाने निवडणुकाही लावल्या ज्यात त्यांना मोठा फटका बसला. जर्मनीतल्या फॅसिस्ट राज्यसत्तेने देशाला बरबाद केलं.
आणीबाणीविषयी अनेकप्रकारे चर्चा होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यामध्ये नक्की भूमिका काय होती? संघाने आणीबाणीला कडाडून विरोध केला आणि त्याविरोधात लढा दिल्याच्या कहाण्या या काल्पनिक आहेत. उत्तर प्रदेश आणि सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या टीव्ही राजेश्वर यांनी आपल्या ‘इंडिया-द क्रूशियल इयर्स’ या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की, “त्यांचा (संघ) केवळ याला (आणीबाणीला) पाठिंबाच नव्हता तर त्यांना इंदिरा गांधींशिवाय संजय गांधी यांच्याशीही संपर्क स्थापित करायचा होता.” करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राजेश्वर यांनी सांगितलं की, बाळासाहेब देवरस यांनी “पंतप्रधान कार्यालयाशी संबंध प्रस्थापित करून देशामध्ये तत्कालीन वातावरणात राबवल्या जाणाऱ्या गोष्टींना पाठिंबा दिला. देवरस यांना इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटायची इच्छा होती. पण इंदिरा गांधी यांनी ती धुडकावली.” त्यामुळे भाजपची निर्मिती ज्या जनसंघातून झाली त्यांना आणीबाणीच्यावेळी केलेला सत्तेचा दुरुपयोग योग्यच वाटत होता. त्यावेळी एक घोषणा देण्यात आली होती “आपातकाल के तीन दलाल-संजय, विद्या, बन्सीलाल.” याच विद्याचरण शुक्ला यांना भाजपने नंतर निवडणुकीचं तिकीट दिलं आणि बन्सीलाल यांच्यासोबत हात मिळवणी करून हरयाणामध्ये सरकार स्थापन केलं. संजय गांधी यांच्या पत्नी मनेका यांनी आणीबाणीचा निषेध न नोंदवता भाजपने मंत्रीपद देऊ केलं.

सध्या आणीबाणी नसतानाही सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ही कितीतरी जास्त दडपशाहीची आहे. अनेकांनी तिला अघोषित आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. आणीबाणीवर टीका करणाऱ्या नयनतारा सहगल म्हणतात की, “…आपल्याकडे अघोषित आणीबाणी असल्याबद्दल शंका नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशा पद्धतीने घाला घातला जात आहे, हे आपण सर्वच पाहतोय.” संघाच्या भारत कल्पनेच्या विरोधात असणाऱ्या निरपराधांना मारलं जात आहे. विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला देशद्रोही म्हणून ठपका ठेवला जातो. त्या पुढे म्हणतात की, “गौरी लंकेशसारख्या लेखिकेला मारण्यात आलं. आणि अशा पद्धतीने अनेक लोकांना जे कुटुंबामध्ये एकमेव कमावते होते मारण्यात आलं. पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. उलट त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. त्यामुळे आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आपल्याकडे आहे.”
धार्मिक अल्पसंख्यांकांना मारणं, गोमांस, लव्ह जिहाद, घर वापसीच्या नावाखाली लोकांना ठेचून मारणं हे अगदी सहज गोष्ट झाली आहे. हे हुकूमशाहीच्याही पलीकडचं आहे आणि अल्पसंख्यांकांना देशामध्ये दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याच्या कारस्थानाचा एक भाग आहे. अशावेळी सत्ताधारी गप्प राहून त्यांनी तयार केलेल्या रस्त्यावरच्या गुंडांना हा संघाचा कार्यक्रम राबवण्याची मुभा देतात.
आणीबाणी आणि फॅसिस्ट हुकूमशाही यामध्ये आपल्याला फरक करता यायला हवा. आणीबाणीमध्ये सत्तेचा वापर करून लोकशाही मूल्यं धुडकावून लावण्यात आली होती तर फॅसिस्ट सत्तेत हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करून समाजामध्ये दुही पाडून अल्पसंख्यांकाना लक्ष्य करण्यात आलं. दोन्ही प्रकारांत लोकशाहीची हानी झालीच. पण राष्ट्रवादाच्या नावाखाली विशिष्ट लोकांना दुय्यम नागरिक ठरवणं म्हणजे सांप्रदायिक राष्ट्रवादाकडे एक पाऊल आहे.

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment