fbpx
राजकारण विशेष

गांधी उत्सवातील भामटे

आजपासून तीन महिन्यांनी महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण जयंती भारतातच नव्हे तर पूर्ण जगात उत्साहाने साजरी होईल. अशा कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप आल्यामुळे, जत्रेत जसे हवेसे, नवशे, गवशे यांच्या बरोबरीने चोर आणि भामटेही सामील होतात, तसेच या जयंतीचेही झाले आहे. फरक एवढाच की जा उत्सवाचे यजमानच भामटे आहे. साधे सुधे नव्हेत तर अव्वल दर्जाचे धूर्त भामटे आहेत. सध्या केंद्रात असलेले भाजपाचे सरकार हे वस्तुतः महात्म्याच्या खुनाला जबाबदार असलेल्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेचे सरकार आहे. महात्म्याची हत्या करून समाधान न झाल्याने, महात्म्याच्या विचारांची हत्या पदोपदी करण्याचे उद्योग ही विचारसरणी आजतागायत करत आलेली आहे. या विचारसरणीच्या अनुयायांच्या मनात महात्मा गांधी व गांधी विचारांबद्दल कमालीचा तिरस्कार व अनादर आहे. हा अनादर, विश्वहिंदुपरिषदेच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या सुरक्षेसाठी, दिल्लीतील राजघाट येथील गांधी समाधी दिनांक २३ व २४ जून अशी दोंन दिवस सामान्य जनतेस दर्शनासाठी बंद ठेवून सरकार ने व्यक्त केला आहे . आणि ही गोष्ट या धूर्तांनी केवळ गांधीजींचा अनादर करण्यासाठी केलेली एक सुटी घटना नाही तर गांधीजींचे क्षुल्लकीकरण करण्याच्या व्यापक कटाचा हा एक भाग आहे. म्हणूनच गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यास निघालेल्या सरकारचा अंतस्थ हेतू समजून घेणे फार महत्वाचे आहे.

गांधीजींचा अनादर करण्याची, त्यांचे क्षुल्लकीकरण करण्याची ही एकमात्र घटना नाही. यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली गांधीजींच्या हाती झाडू सोपवून, गांधीजींचे जीवित कार्य म्हणजे केवळ स्वच्छ भारत. गांधी म्हणजे केवळ स्वच्छतेचे प्रतीक असा प्रचार या सरकारने जाणीवपूर्वक आणि सातत्याने केला. हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, स्वदेशी या गांधीजींच्या त्रिसूत्रीला अडगळीत टाकण्यासाठी, गांधी म्हणजे स्वच्छता इतका सरळसोट संदेश लोकांत भिनविण्याचे काम या जाहिरातबाज सरकारने गांधींची छबी व नाव स्वच्छ भारत कार्यक्रमासाठी वापरून केले.

खादी ग्रामोद्योगच्या दैनंदिनीवर, संघाचे सरकार सत्तेवर येई पर्यंत, गांधीजींचा सूतकताई करतानाचा फोटो असायचा. आता त्या दैनंदिनीवर प्रधानसेवक महात्मा मोदी चरख्यावर बसून सूत कातताना दिसतात. यावर जेव्हा आक्षेप घेण्यात आले, तेव्हा संबंधित मंत्रालयाने, मोदींच्या फोटो मुळे खादीविक्री वाढली असा दावा केला. यातून दोन गोष्टी साधल्या गेल्या. एक म्हणजे महात्मा गांधींपेक्षा मोदीजी लोकप्रिय आहेत असा संदेश देता आला आणि दुसरे म्हणजे खादी उत्पादनात, उत्पादक हाच उपभोक्ता असल्यामुळे, वस्त्रोद्योगाचे बाजारीकरण मर्यादित करून त्यातील शोषणास आळा घालण्याचा जो मूळ गांधी विचार खादी उत्पादनात होता, तो विचारच गुंडाळून ठेवला गेला. खादी उत्पादन हे बाजारी अर्थव्यवस्थेचाच एक भाग आहे हे ठसवून गांधीजींच्या खादीविचाराचे अवमूल्यन साधण्यात आले. महात्मा गांधी व त्यांचा खादी विचार या दोघांचेही एकाच वेळी क्षुल्लकीकरण करण्याचा हा गांधीविरोधी सरकारचा प्रयत्न होता.

नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी या व्यक्तीचा खून तर केला, पण त्याने गांधी विचार संपला नाही. गांधी विचाराचा मुडदा पाडायचे प्रयत्न आता गांधीहत्येस जबाबदार असणारी विचारसरणी करीत आहे. सत्य, अहिंसा, सर्वधर्मसहभाव व त्या मार्गे भारतीय राष्ट्रवादावर आधारित, शांती व सद्भावनापूर्ण भारतीय समाजाचे स्वप्न महात्म्याने पहिले. त्या भारतात, सध्याचे सरकार, विद्वेषाचा उन्माद माजविण्याचा गांधीविरोधी कार्य करीत आहे. केवळ दुसऱ्या धर्मावर श्रध्दा ठेवतो म्हणून एखाद्या व्यक्तीचा / समूहाचा द्वेष करण्याची शिकवण या देशात दिली जात आहे. अमुक एका पशूचे मास बाळगले किंवा खाल्ले अशा संशयावरून धर्मांधतेचे विष पाजून तयार केलेले गुंड, असहाय माणसांना ठेचून मारत आहेत. गाई बैलांची वाहतूक करणाऱ्या मोटारचालकांना भर रस्त्यात दिवसा उजेडी ठार केले जात आहे. लव जिहाद चा आरोप ठेवून माणसांना जिवंत जाळले जात आहे. आणि भगव्या कपड्यातील गुंड समाजात धर्मरक्षणाच्या नावे हिंसेला प्रोत्साहन देत अनिर्बंधपणे फिरत आहेत. शासन अशा खुनी गुंडांना पाठीशी घालत आहे, प्रसंगी समर्थन करीत आहे. या सगळ्यातून एक असंवेदनशील समाज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. कायदा व सुव्यवस्था यांबाबत अनादर निर्माण होईल असे माणसांना जिवंत जाळण्याचे व्हिडियो सोशल मीडियात प्रसृत केले जात आहेत. अशा गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटून आल्यावर त्यांच्या विजयी मिरवणुकाही काढण्यात येत आहेत. न्यायालयांवर भगवे झेंडे लावले जात आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना, त्यांनी परधर्मातील स्त्रीवर अत्याचार केला म्हणून समर्थनार्थ वकिलांच्या संघटना रस्त्यावर उतरून, हाती तिरंगा घेऊन मोर्चे काढीत आहेत. सरकारवरील टीका म्हणजे देशद्रोह असा माहोल तयार केला जात आहे. सामाजात धर्माच्या नावे उभी फूट पाडून, विद्वेषाच्या चरमसीमेकडे ढकलण्याचे काम अविरत सुरु आहे. हा सर्व कार्यक्रम म्हणजे गांधी विचारांची हत्या नाही तर दुसरे काय आहे ?

मग प्रश्न असा येतो कि या सरकारला गांधींची १५०वी जयंती साजरी तरी कशाला करायची आहे ? ज्या संघाने गांधींचा जिवंत असताना व मृत्यूपश्चातही सदैव द्वेषच केला त्या संघाचे गांधीप्रेम अचानक उचंबळून आल्यासारखे का दिसते ? संघाचे गांधीप्रेम पूतना मावशीचे असले तरी ते अचानक उचंबळून आलेले नाही. गांधींना सोयीस्करपणे वापरण्याच्या धूर्त राजकारणाचा तो भाग आहे. संघ आणि भाजपाचे प्रवक्ते, गांधींच्या विचाराचे खरे वारस आम्हीच आहोत अशी भाषा करताना आज दिसत असले तरी याची सुरवात पन्नास वर्षांपूर्वीच झालेली आहे. त्या काळात गांधी हत्येस जबाबदार मंडळी म्हणून समाजाचा संघावर रोष होता, तो पुसून काढण्यासाठी, जणू गांधीजींचा आत्माच गोळवलकरगुरुजींच्या शरीरातून बोलत आहे अशा अविर्भावात संघाचा प्रचार सुरु होता. कारण गांधी हत्येमुळे संघाची प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात मालिन झाली होती. गांधी हत्ये नंतरही गांधीजींचे गारुड या देशाच्या जन्मासातून समाप्त होत नाही याची जाणीव हिंदुत्ववाद्यांना तोपर्यंत झाली होती आणि गांधीविचाराला विरोध केल्यास आपला विचार हा देश कदापि स्वीकारणार नाही याची जाणीव संघाच्या धुरिणांना झाली होती. म्हणून गांधींचे गैरसोयीचे विचार वगळून, त्यांच्या विचारातील राजकीय व सामाजिक आशय बाजूला ठेवून, स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेणारा, सकाळ संध्याकाळ रामनाम घेणारा, रामराज्याचा गोष्टी करणाऱ्या, गोहत्येस विरोध करणार गांधी आपलासा करून घ्यायचे धोरण संघाने आखले.

पुढे १९७४ साली जयप्रकाशांच्या नवनिर्माण आंदोलनातही, जयप्रकाशांच्या अहिंसेचा स्वीकार केल्याचा देखावा संघाने उभा केला. जयप्रकाशांची स्तुती करताना एके ठिकाणी ” गांधी व गोळवलकरांनी सुरु केलेले कार्यच जयप्रकाश पुढे नेत आहेत” हे विधान त्याच साठी होते. गांधींचा वारस म्हणून दावा करणाऱ्या काँग्रेसला बदनाम करण्याचे कार्य हे आंदोलन आपोआपच करत होते. जयप्रकाशांच्या आंदोलनात सामील होऊन आपल्यावरील गांधी हत्येचा कलंक धुवून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न संघाने केला व तो बऱ्याच प्रमाणात तडीसही नेला. आणि आता गैरसोयीचा गांधी लोकांच्या विस्मरणात टाकून, गांधीजींचाच कार्यक्रम ही गोष्ट जनमानसात बिंबविण्यासाठी, गांधीजींची १५०वी जयंती साजरी करण्यास संघ व भाजप सज्ज होत आहे. ही जयंती साजरी होत असतानाच गांधीजींच्या खुन्यांचे उद्दात्तीकरण करत राहून हिंदू मुस्लिम ऐक्य, सर्वधर्म समभाव, अहिंसा यासारख्या गांधीविचारांच्या गाभ्याला गौण स्थान देऊन रामराज्याचा पुरस्कर्ता, धर्मपरिवर्तनाच्या विरोधात लढणारा, गोहत्या न करण्याचा आग्रह धरणारा अशी सनातनी हिंदू गांधींची प्रतिमा त्यांना लोकांमध्ये रुजवायची आहे.

अर्थात जनमानसात पूजनीय असणाऱ्या विभूतींचा वापर सोयीनुसार करण्यात संघाची मंडळी वाकबगार आहेत. हिंदू धर्माची महती जगासमोर मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या बलोपासनेलाही संघाने त्यांच्या सोयीनुसार वापरले आहे. वास्तवात विवेकानंदानी सांगितलेली बलोपासना, अध्यात्मिक बल मिळविण्यासाठी आवश्यक सशक्त मन तयार करण्यासाठी होती आणि त्यासाठी स्वामीजींनी फुटबॉल खेळण्याचा व गोमांस भक्षणाचा सल्लाही दिला होता हे संघ कधीच सांगणार नाही. भारतात इस्लामचा प्रसार तलवारीच्या बळावर झाला असे मानणे वेडेपणाचे आहे हे स्वामीजींचे मत देखील संघ कधीच जगासमोर येऊ देणार नाही. जनमानसात आदर असणाऱ्या सर्वच विभूतींचा वापर आपल्या धर्माच्या नावे चाललेल्या संकुचित राजकारणासाठी करून घ्यायचा ही संघाची पूर्वापार चालत आलेली नीती आहे. या नीतीत, त्या व्यक्तीच्या विचारांचे स्थान गौण आहे. आणि या नीतीतूनच संघ, बुद्ध, शंकराचार्य, गुरु नानक, शिवाजी महाराज, राणाप्रताप पासून ते थेट गांधी, भगतसिंग, डॉ आंबेडकर या सर्वांनाच आपलया शाखेत ओढून, जणू आपण या विभूतींच्याच विचारांचे पालन करीत आहोत असा आभास तयार करतो. या विभूतींचेच विचार प्रत्यक्षात आणण्याची संघाची सर्व धडपड आहे, त्यासाठीच आम्ही झटत आहोत तेच आमचे ध्येय आहे असा भ्रम पसरवण्याची कला संघाने अवगत केलेली आहे. प्रत्यक्षात कोणाच्याच विचारांशी संघाला घेणेदेणे नाही. परंतु या महापुरुषांच्या लोकमान्यतेचा आपल्या सोयीने वापर करणे हीच संघाची कार्यपद्धती आहे. आणि त्याला अनुसरूनच संघाला गांधीजींची १५० वी जयंती साजरी करावयाची आहे. गांधी समाधी दर्शनास बंद करण्याच्या निर्णयावर जशा प्रतिक्रिया उठावयास हव्या होत्या तश्या उमटल्या नाहीत. म्हणूनच गांधी विचारांवर ज्यांची खरोखरीच निष्ठा आहे त्या सर्वांनीच, संघाचा हा गांधी सोयीने आत्मसात करायचा कावा उधळून लावावयास हवा.

गांधींच्या रामाचा आणि संघाच्या रामाचा काहीही संबंध नाही. गांधीजींचे रामराज्य हे समाजातील अत्यल्पमतालाही महत्व देणारे लोकशाही राज्य होते. गांधीजी गोहत्या बंदी कायद्याने नव्हे तर गोवंशाच्या रक्षणातून गोहत्या बंद करू इच्छित होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सनातनी हिंदू असलेले गांधीजी सेक्युलर राज्याचे पुरस्कर्ते होते या गोष्टी जनतेसमोर मांडून, संघाचा गांधीप्रेमाचा कावा उधळून लावणे गरजेचे आहे.

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

Write A Comment