fbpx
विशेष

झुंडीचा दहशतवाद 

 

१८ व्या शतकाच्याशेवटी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचं हत्याकांडाचा निषेध प्रसिद्ध जॅझ गायक बिली हॉलिडेनं ‘स्ट्रेंज फ्रुट’ हे गाणं म्हणून केला होता. एबेल मीरोपोल या शिक्षकाने ही कविता लिहिली होती.

Southern trees bear strange fruit, Blood on the leaves and blood at the root,

Black bodies swinging in the southern breeze, Strange fruit hanging from the poplar trees.

Pastoral scene of the gallant south, The bulging eyes and the twisted mouth,

Scent of magnolias, sweet and fresh, Then the sudden smell of burning flesh.

Here is fruit for the crows to pluck, For the rain to gather, for the wind to suck,

For the sun to rot, for the trees to drop, Here is a strange and bitter crop.

अमेरिकेमध्ये विशेषतः दक्षिण भागात काळ्या वर्णाच्या लोकांना काहीही कारण नसताना दगडाने ठेचणं, फाशी देणं, जीवंत जाळणं असे प्रकार सर्रास सुरू होते. गुलामगिरीची प्रथा मोडीत निघाल्यावर काळ्या लोकांनाही गोऱ्यांप्रमाणे समान नागरिकतेचे अधिकार प्राप्त झाले आणि तेच या हत्यासत्रांमागचं मूळ कारण होतं वर्णवर्चस्व टिकवून ठेवणं.  त्याआधी युरोपमध्ये चेटकीण असल्याचा आरोप करून अनेक बायकांना झुंडीने जिवंत जाळून  मारल्याची असंख्य उदाहरणं आहेत. हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे आज भारतामध्ये आधी गोमांस भक्षणाच्या केवळ संशय आणि खोट्या आरोपांवरून आणि आता कसल्याही अफवेवरून लोकांच्या ठेचून हत्या होत आहेत. अत्यंत निर्घृण असा पायंडा या हत्या समाजामध्ये पाडत आहेत आणि बहुसंख्य समाज एखाद्याला ठेचून मारणं ही अगदी सहज बाब असल्याप्रमाणे या हिंसक घटना स्वीकारतो आहे. त्यातील काही निगरगट्ट त्याचं उघड समर्थन देखील करत आहेत.

भाजपचं सरकार सत्तेत आल्यावर गोवंश हत्या बंदीच्या नावाने त्यांनी एक सिग्नलच दिला आणि गोरक्षक झुंडीने मग मुसलमान आणि दलितांच्या मागे लागले. एकाअर्थी सरकारने त्यांना गोरक्षेच्या नावाखाली माणसं मारायचं लायसन्सच दिल्यासारखा सगळा प्रकार. उत्तर प्रदेशात महंम्मद अखलाखला सप्टेंबर २०१५ मध्ये गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून ठेचून मारण्यात आलं. त्यानंतर लोकांना या आणि अशा अनेक कारणांनी ठेचून मारण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यानंतर लगेचच अॉक्टोबर २०१५ मध्ये उत्तराखंडच्या सहारनपूर येथे २० वर्षांच्या मुलाला गायींची चोरून विक्री करत असल्याच्या आरोपावरून जमावाने ठार मारलं.  त्याच महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये रफिक आणि हबीब या दोघांना गाय मारल्याच्या संशयावरून ठार मारण्यात आलं. मध्य प्रदेशमधल्या हरडा जिल्ह्यामध्ये गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी महंम्मद हुसेन आणि बायको नसीमा बानो यांना गोमांस नेत असल्याचा आरोप करून रेल्वे स्टेशनवर मारून टाकलं. मार्च २०१६ मध्ये झारखंडमध्ये मजलूम अंसारी आणि इम्तियाज खान हे दोघं स्वतःचीच गुरं नेत असताना त्यांनी अत्यंत छळ करून ठार केलं आणि त्यांचे मृतदेह झाडाला लटकवून टाकले. जुलै २०१६ मध्ये विकसित गुजरातच्या उनामध्ये सात दलितांना बांधून झोडण्यात आलं. कारण काय तर ते मेलेल्या गायीची उस्तवारी करत होते. या व्हिडीओचा तमाशा तर सगळ्या देशाने पाहिला. याच महिन्यात कर्नाटकाच्या चिकमंगळूरमध्ये गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांनी एका दलित कुटुंबावर हल्ला केला. याच महिन्यात मध्य प्रदेशमध्ये हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन मुस्लिम महिलांना गोमांस नेत असल्याचा आरोप करून फटाकावलं. नंतर त्या नेत असलेलं मांस हे म्हशीचं निघालं. त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये झीशानच्या घरावर गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून हल्ला करण्यात आला. तो पळाला. पण नंतर त्याला पोलिसांनी अटक केली आणि हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याएेवजी झीशानची बायको आणि भाऊ यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली. अॉगस्टमध्ये दोन दलित भावांना नागडं करून मारण्यात आलं कारण ते मेलेल्या गायीची कातडी कमावत होते. हरयाणाच्या मेवतमध्ये तर हद्द झाली. गोरक्षकांनी एका मुस्लिम जोडप्याला मारून टाकलं आणखी एका जोडप्याला आएशा आणि जफरुद्दीन यांना जबर मारहाण केली आणि २१ व १६ वर्षांच्या दोन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. एप्रिल २०१७ मध्ये अलवारमध्ये आपल्या डेअरी व्यवसायासाठी गायी नेत असलेल्या पहलू खानला जमावानं ठार मारलं. या महिन्यात जम्मूमध्ये भटक्याविमुक्त जमातीच्या एकावर २०० गोरक्षकांनी हल्ला केला. यामध्ये अटक झालेले आज सगळे जामिनावर सुटले आहेत. मे २०१७ मध्ये मालेगावमध्ये काही व्यापाऱ्यांवर गोरक्षकांनी हल्ला केला. जून २०१७ मध्ये एेनूल अन्सारीवर झारखंडमध्ये जमावाने हल्ला केला गोमांस घेतल्याच्या संशयावरून. जून २०१७ मध्येच राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यात ५० गोरक्षकांनी तामिळनाडू सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गायींची चोरटी वाहतूक करत असल्याच्या संशयावरून मारहाण केली. जून २०१७ मध्ये दिल्ली-मथुरा ट्रेनमध्ये जुनेद, हाशीम आणि शकिर या भावांवर गोमांसाच्या संशयावरून हल्ला करून मारलं. त्याचवेळी झारखंडमध्ये उस्मान अन्सारीला त्याच्या घराबाहेर मेलेली गाय आढळली असा कांगावा करत मारण्यात आलं. याच राज्यात आणखी एका असगर अन्सारीला गोमांस वाहून नेत असल्याने ठार केलं. सलीम इस्माईल शहा या ३२ वर्षांच्या मुलाला नागपूरमध्ये मारण्यात आलं.

आता तर ठेचून मारणं गोमांसापुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. मे महिन्यामध्ये अॉडिओ इंजिनीअर निलोत्पल दास आणि उद्योजक अभिजीत नाथ यांना मूलं चोरणारे समजून ठेचून मारण्यात आलं. २७ जूनला अहमदाबादमध्ये एका भिकारी बाईला १००० लोकांच्या जमावाने असंच मूल चोरणारी समजून ठार मारलं.

या सगळ्या घटनांची मुद्दाम उजळणी केली कारण आजही त्या अंगावर येतात आणि यातील बहुसंख्य बळी हे मुस्लिम समाजाचे आहेत व त्याखालोखाल दलित. कधीतरी एकदा लोकलज्जेखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हत्या सहन केल्या जाणार नाहीत, असं अगदीच बारीक आवाजात म्हटलं खरं. पण कायद्याने अशा हत्या करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून त्यांनी काहीही केलेलं दिसत नाही. उलट पंतप्रधानांचं हे वक्तव्य झाल्याझाल्याच  रांचीमध्ये एकाला जमावाने ठार मारलं.

या सगळ्या घटनांमध्ये एकच गोष्ट वारंवार पुढे  येते की, एका विशिष्ट विचारांनी प्रेरित झालेला एक जमाव पुढे येतो आणि एखाद्यावर खोटे आरोप करून त्याला गुन्हेगार ठरवतो.अशा पद्धतीने नागरिकांनी उठून कायदा हातात घेणं आणि पोलीस यंत्रणा, न्यायालयांनी बघ्याची भूमिका घेणं हे देशातील सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत गंभीर आहे. कारण बहुसंख्यांक समाज मागास असलेल्या दलित, मुस्लिम महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचं हे थेट कारस्थान आहे.  त्यासाठी पाकिस्तानातून दहशतवाद्यांनी यायची गरज नाही. देशातील आपलेच नागरिक समाजाच्या उतरंडीमध्ये सर्वांत खालच्या पातळीवर असलेल्या नागरिकांना मारून नष्ट करत आहेत. याची दखल घेण्याएेवजी सर्व शासन यंत्रणा आणि आपल्यासारखे नागरिकही शांतपणे त्याकडे बघतो. कधीतरी हळहळ व्यक्त करतो. ठेचून मारण्याच्या घटना आपल्यासाठी नित्याच्याच असल्याप्रमाणे आपण मागच्या पानावरून पुढे जातो. जे थोडेफार आवाज या हत्यांविरोधात उठतात त्यांना तुम्ही अमूक वेळी का नाही आवाज उठवला? काँग्रेस सरकार असताना कुठे गेला होतात? काँग्रेसच्या राज्यात सगळं आलबेल होतं का? असले प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडलं जातं. भारतात घडणाऱ्या सगळ्या वाईट घटनांबद्दल कोणताही एक नागरिक सातत्याने आवाज उठवू शकत नाही हे सर्वांना माहित आहे. तरीही सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भाजपचे ट्रोल सळो की पळो करून सोडतात.

जमावाने केलेल्या या बहुतांशी हत्यांमध्ये पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचंच चित्र आहे. वरील एवढ्या घटनांपैकी केवळ झारखंडमधल्या एका घटनेमध्ये गोरक्षकांना शिक्षा झाली. मूळातच भाजपचे प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचं संविधान मान्य नाही. त्यामुळे त्यांचे स्वयंसेवक पूर्वीपासूनच संविधानाला समांतर असतील असे गट स्थापन करून विविध उपक्रम राबवत आले आहेत. त्यातच भाजपचे सरकार बहुमताने केंद्रांत आणि अनेक राज्यांमध्ये आल्यावर त्यांनी गोरक्षकांच्या नावाखाली आपले पोलिसही निर्माण केले. गोरक्षक याला कोणताही संविधानाचा आधार नसताना केवळ समाजातल्या मुस्लिम, दलित, आदिवासी यांच्यावर वचक बसावा म्हणून बेकार, गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम भाजप सरकारने देशभर केलं. त्यामुळे त्यांचा उन्माद आणखी वाढला. कायदा हातात घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. काहीच कारवाई होत नसल्याने यांची भीडही चेपली गेली. एखाद्या माणसाविरोधात संशय निर्माण करून, त्याच्याबद्दल अफवा पसरवून त्याला जमावाने मारून टाकण्याचं सत्र सातत्याने सुरू झालं. कायदा कशापद्धतीने प्रभावहीन ठरवून, स्वतःच न्यायाधीश बनून, मार खाणारा किंवा मरणारा अपराधी होता कि नव्हता याची शाहनिशाही न करताच त्याला शिक्षा सुनावून मोकळं व्हायचं, अशी एक घृणास्पद समांतर शासन व्यवस्थाच भाजप सरकारने निर्माण होऊ दिली आहे. ही इतकी घातक आहे की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाच त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

भाजपला काश्मिरमधली जनता रस्त्यावर उतरून निषेध करते ते चालत नाही. पण स्वंघोषित गोरक्षक झुंडीने लोकांना थेट मारून टाकतात ते मात्र भाजपला चालतं. आतापर्यंत मध्य पूर्वेकडील मुस्लिम देशांना इथला सुशिक्षित समाज नावं ठेवत होता की तिथली यंत्रणा शरिया कायद्यानुसार चालते. पण भारतामध्ये सध्याची परिस्थिती ही शरिया कायद्यासारखीच झाली आहे. न्यायालयामध्ये दाद मागण्याची गरजही पडू नये अशी दक्षता या गोरक्षकांकडून आणि तत्सम झुंडींकडून घेतली जात आहे. मुस्लिमांना दहशतवादी म्हणून हिणवताना अगदी हिंदू धर्मामधला सुशिक्षत वर्गही पुढे होता. आता तोच सुशिक्षित वर्ग गोरक्षकांचं समर्थन करताना दिसतो. त्यांच्याविरोधात एकही निषेधाचा शब्द त्यांच्याकडून येत नाही. उलट दोन गटांमधल्या भांडणातून हा प्रकार घडला असेल, त्यांचं आपापसामध्ये काही पूर्वीपासूनचं भांडण असेल, अशी कुजबूज केली जाते. पण या गोरक्षांविरोधात ठोस भूमिका घ्यायला मात्र बहुसंख्य हिंदू तयार होत नाहीत. मुसलमानांना परस्पर धडा शिकवला जातोय हे बरचं आहे, अशी भावना यामागे दिसते. पण गप्प बसण्याच्या कृतीमुळे फॅसिस्ट विचारांना आपण खतपाणी घालतोय याकडे मात्र दुर्लक्ष होतयं. विशिष्ट जाती-धर्मामध्ये असुरक्षिततेचं वातावरण सातत्याने राहिलं तर समाजही शांततेमध्ये जगू शकत नाही हे या भाजप समर्थकांना एेकूनही घ्यायचं नाही.  हा झुंडीचा दहशतवाद अशासाठी खतरनाक आहे की तो प्रत्येक मुस्लिम आणि दलिताला केवळ आरोपी नाही तर गुन्हेगार ठरवून मोकळा होतो आणि इथली शासन यंत्रणा त्याला पाठबळ, रसद पुरवते.

हा सगळा राग मुस्लिम आणि दलितांवर आहे कारण ज्या हिंदू धर्माचा पुरस्कार संघ आणि भाजप करतात तो प्रतिगामी असाच आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्वापार चालत आलेली जात व्यवस्था, चातुर्वण्य व्यवस्था या दोन्ही गोष्टी दलितांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. दलित हे कायम या जात व्यवस्थेची शिकार ठरले होते. मुस्लिम द्वेषही संघाच्या यादीमध्ये कायम वरच्या स्थानावर आहे. संघाचे प्रेरणास्थान वि दा सावरकर, सरसंघचालक गोळवलकर यांची मुस्लिमांचा आत्यंतिक द्वेष करणारी विधानं जगजाहीर आहेत. भाजप आणि संघाच्या समर्थांना मूळातच इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने सावरकर आणि हेडगेवारांच्या आधीचा इतिहास त्यांना माहित नसतो. १८५७ च्या लढ्यामध्ये बहादूरशहा जफरला हिंदुस्थानच्या गादीवर बसवायचं असा ठराव करून इतर सर्व लढले. ए. जी नूरानींनी “सावरकर अॅण्ड हिंदुत्व” या त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे की, मुस्लिम राज्यकर्ते हे ब्रिटिशांच्या विरोधात हिंदूंपेक्षाही जास्त त्वेषाने लढले. ब्रिटिश सत्तेचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिशांचं आधुनिक शिक्षणही नाकारलं आणि त्या काळामध्ये बळी जाणारेही बहुसंख्य मुस्लिम होते. त्यातुलनेत, उच्चवर्णीय हिंदूंनी मात्र ब्रिटिशांची आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारली आणि प्रगती केली. पण शिक्षणाला विरोध केल्याने कालांतराने मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षणाचं प्रमाण कमी झालं ते अद्याप कमीच आहे. त्यामुळे खरंतर परकीय ब्रिटीश असताना सोयीस्कर इतिहास शिकलेले संघवाले अजूनही मुस्लिमांनाच परकीय म्हणतात.  मुस्लिमांना “पाकिस्तानात जा”, असं बिनदिक्कत म्हणायलाही त्यांना लाज वाटत नाही. जे मुसलमान पाकिस्तानात गेले नाहीत त्यांचं उलट कौतुक व्हायला पाहिजे होतं कारण त्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवला. मात्र संघाच्या हातात सत्ता आल्यावर भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या तर त्यांनी आधी चिंधड्या उडवायला सुरुवात केली. भारतामध्ये राहिल्याबद्द्ल सातत्याने मुस्लिमांकडून प्रामाणिकतेचं आणि देशभक्तीचं प्रमाणपत्र मागितलं जाऊ लागलं. त्याचा पुढचा टप्पा म्हणून झुंडी झुंडी जमून एकट्या दुकट्या मुसलमानाला पकडून ठेचून मारू लागल्या.

सावरकर, गोळवलकर, हेगडेवार यांनी कायम मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्टांना शत्रू मानलं आणि हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिम-ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व देण्याच्या गोष्टी केल्या. मूळात द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतालाच सावरकरांनी जन्म दिला.

नेहरूंनी या देशाला असलेला धर्मांधतेचा धोका तेव्हाच ओळखला होता. त्यांनी १९६१ मध्येच देशाला सावध केलं होतं की, “अल्पसंख्यकांमधील धर्मांधता समजू शकते. पण बहुसंख्यकांमधील धर्मांधतेकडे अनेकदा राष्ट्रीयत्व म्हणून पाहिलं जातं.” नेहरूंचं हे विधान आज खरं ठरतयं. काळाचा वेध घेणारं नेतृत्व किंवा बुद्धिवंत म्हणतात ते याला !

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

Write A Comment