fbpx
कला साहित्य

डाल्टन ट्रम्बो – प्रतिभावंताची जिद्द

डाल्टन ट्रम्बो हे हॉलिवूडचे जुन्या पिढीतील एक नामवंत चित्रपटकथा व पटकथाकार. १९३६ ते १९७३ इतकी त्यांची प्रदीर्घ कारकिर्द. अनेक महत्वाचे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. रोमन हॉलिडे, द ब्रेव्ह वन, एक्झोडस आणि स्पार्टाकस ही काही नावे वानगीदाखल. ऑस्करसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. ते विचाराने कम्युनिस्ट होते. १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कट्टर कम्युनिस्ट विरोधी विचार होते, त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला होता. पण ह्याकशाचीही पर्वा न करता डाल्टन ट्रम्बो यांनी ते कम्युनिस्टअसल्याचे कधीही लपवले नाही. ट्रम्बो व त्यांच्याबरोबरचे हॉलिवूडमधील इतर नऊजण यांना अमेरिकी सरकारच्या दडपशाहीमुळे एक वर्षाचा तुरुंगवास सोसावा लागला, नंतरही त्यांच्यावर बंदी घातली गेली, हा सगळा काळा इतिहास हॉलिवूड टेन ह्या नावाने ओळखला जातो. हे हॉलिवूड टेन नावाचे बदनाम प्रकरण व त्याला ज्या जिद्दीने ट्रम्बो यांनी तोंड दिले त्याची कहाणी ट्रम्बो नावाच्या २०१५च्या चित्रपटात आहे. आधी डाल्टन ट्रम्बो यांचा परिचय करून घेऊ.

लेखक व्हायचे ह्या ध्येयाने ट्रम्बो हे कळत्या वयापासूनच पछाडलेले होते. सुरवातीला काही मासिकातून त्याचे लेख प्रकाशित झाले. १९३४ मध्ये ते हॉलिवूड स्पेक्टॅटर नावाच्या नियतकालिकाचे व्यवस्थापकीय संपादक झाले, एक्लिप्सनावाची त्यांची कादंबरीही प्रसिध्द झाली आणि वार्नर ब्रदर्स हया बड्या चित्रपट स्टुडिओत कथा विभागात कामही मिळाले. १९३६मधील रोड गॅंग ह्या गुन्हेगारीपटापासून त्यांना पटकथा लेखनाचेस्वतंत्र काम मिळायला सुरवात झाली आणि दहा वर्षांच्या कालावधीत यशस्वी लेखक म्हणून त्यांचा बोलबाला झाला.१९४५ पर्यंत म्हणजे केवळ नऊ-दहा वर्षात त्यांनी एकतीस चित्रपटांच्या पटकथा किंवा कथा लिहिल्या. त्यापैकी १९४०च्या किटी फॉयल ह्या चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. ह्याच दरम्यान १९३९मध्ये जॉनी गॉट हिज गनही त्यांची युध्दविरोधी कादंबरीही प्रसिध्द झाली व तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र १९४४मध्ये आलेल्या थर्टी सेकडंस ओव्हर टोकयो ह्या युध्दपटाची पटकथाही त्यांनी लिहिली,त्यामागची पार्श्वभूमी वेगळी होती. १९३९ ते १९४५ हा दुसर्‍यामहायुध्दाचा काळ. जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर ह्या नाविक विमानतळावर जबरदस्त हवाई हल्ला केला. त्यात अमेरिकेचे नाविक, सैनिक, नागारिक इत्यादी मिळून दोन हजारपेक्षा जास्त लोक मेले, एक हजारापेक्षा जास्त गंभीर जखमी झाले. इतरही हानी झाली. ह्यामुळेच अमेरिकेचा दुसर्‍या महायुध्दात थेट प्रवेश झाला. ह्यानंतर १९४२मध्ये अमेरिकेने जपानच्या टोकयो आणि इतर चार शहरांवर हवाई हल्ला केला. ह्या टोकयो हवाई हल्ला ह्या सत्यघटनेवरच थर्टी सेकडंस ओव्हर टोकयो हा चित्रपट होता.ह्यात त्यावेळेचा ख्यातनाम अभिनेता स्पेन्सर ट्रेसी ह्याने काम केले होते.

तथापि याच सुमारास अमेरिकेत कम्युनिस्ट विरोधी वातावरण तापू लागले आणि ते भयगंडाच्या टोकाला गेले. तेथील शासन, शासनातील अधिकारी, शासन यंत्रणा, सेनेटर ह्यांनी कम्युनिस्टविरोधी मोहीम उघडली. कोण कम्युनिस्ट आहे याची चौकशी करण्यासाठी समित्या नेमल्या. आर्थर मिलर आणि इलिया कझान यांच्या संबंधाने ह्याआधी दडपशाही, कलाकार आणि कलाकृतीहा लेख दिला होता, त्यात म्हटल्याप्रमाणे तेथील सेनेटरांची एक समिती १९३८ साली स्थापन करण्यात आलेली होती. हाऊस अन-अमेरिकन अॅक्टीव्हिटीज कमिटी (HUAC – एचयूएसी) ह्या नावाने तिचे कामकाज चालायचे. ह्या समितीसमोर मुख्यत: हॉलिवूडमधील अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांची सुनावणी झाली. त्यांना प्रश्न विचारला जायचा तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचे सभासद आहात का किंवा कधी होता का? तसेच त्यांना त्यांचे जे सहकारी कम्युनिस्ट आहेत त्यांची नावे सांगायला सांगितले जायचे. ज्यांची उत्तरे द्यायला नकार दिला किंवा ती समाधानकारक नव्हती किंवा समितीने ज्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा ठपका ठेवला त्यांची ब्लॅकलिस्ट बनवली गेली व त्यांना काम मिळणे बंद झाले. एकूण तीनशे वीस हॉलिवूड कलाकारांची अशी ब्लॅकलिस्ट बनवण्यात आली होती. ह्यातील बहुतेकांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम झाला. काहींची करिअर संपली तर काही ह्या वेडेपणाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा काम करू शकले.

ह्याच एचयूएसी समितीने पुढे १९४७ मध्ये हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या ७९ व्यक्तींवर आरोप केला, त्यांच्या सिनेमातून कम्युनिस्ट प्रचार होत आहे व त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचा हुकूम दिला. जगविख्यात जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांनाही हिटलरच्या नाझी राजवटीमुळे त्यावेळेस जर्मनीतून स्थलांतर करावे लागले होते, काही देश बदलवत ते अमेरिकेत आले होते व हॉलिवूडमध्ये कार्यरत होते. त्यांचे कम्युनिस्टधार्जिणे विचार जगजाहीर असल्याने त्यांनाही सुनावणीसाठी हजर राहण्याचा हुकूम दिला गेला. ब्रेख्त समितीसमोर हजर झाले, गोलमाल उत्तरे दिली, इंग्लिश माहीत नाही, चुकीचा अनुवाद झाला असे सांगितले आणि नंतर युरोपला निघून गेले. सुनावणीसाठी हजर राहून उत्तरे दिली ह्या कारणामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण इतर व्यक्तींपैकी डाल्टन ट्रम्बोसह एकूण नऊजण लेखक-पटकथा लेखक होते व एक दिग्दर्शक होते. हे दहाजण सुनावणीसाठी हजर झाले पण त्यांनी एक ठाम भूमिका घेतली. समितीने त्यांना ते कम्युनिस्ट पार्टीचे सभासद आहेत याची कबूली देण्यात सांगण्यात आले. तोपर्यंत कम्युनिस्ट असणे हा कायद्याने गुन्हा नव्हता. त्यामुळे घटनादत्त अधिकाराचा दाखला देत ह्या दहाजणांनी उत्तर द्यायचे नाकारले. समितीला हा प्रश्न विचारायचा अधिकारच नाही अशी भूमिका घेतली. घटनेच्या पहिल्या दुरुस्तीनुसार त्यांना प्रायव्हसीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे असे उत्तर दिले. पण समितीने त्यांच्यावर ते समितीचा अवमान करत आहेत असाआरोप केला. तसेच समितीचे कामकाजही न्यायरितीने चालले नाही. समितीने ह्या दहाजणांना एका वाक्यात उत्तर द्या, फक्त हो किंवा नाही उत्तर द्या असे निर्देश दिले होते, मात्र जे कम्युनिस्टविरोधक होते त्यांना मुक्तपणे बोलू देण्यात येत होते. दहाजणांना विश्वास होता सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने न्याय देईल. पण तसे न होता त्यांना १००० डॉलर दंड व सहा महिने ते एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली. प्रत्यक्षात तुरुंगात जावे लागले. तुरुंगात त्यांना सामान्य गुन्हेगारांसारखीच वागणूक मिळाली. अगदी विवस्त्र करून तपासणीही करण्यात आली. त्यांचे भोग इथेच संपले नव्हते. हॉलिवूडच्या ४८ बड्या स्टुडिओजनी एकत्र येऊन ह्या दहाजणांवर बंदी घालणारे एक निवेदन प्रसिध्द केले. निवेदनात दिलेले होते, ह्या दहाजणांना आम्ही तत्काळ कोणताही मोबदला न देता कामावरून काढून टाकत आहोत. स्वत:ला निर्दोष सिध्द केल्याशिवाय आणि ते कम्युनिस्ट नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिल्याशिवाय आम्ही त्यांना पुन्हा कामावर घेणार नाही. तसेच कोणत्याही कम्युनिस्ट माणसाला काम देणार नाही. अशा धोरणातील जोखीम आम्हाला माहीत आहे, ह्यात निरपराध लोकांवर अन्याय होऊ शकतो याची आम्हाला जाणीव आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. सर्जनशील लिखाण अशा भीतीच्या वातावरणात लिहता येत नाही. तसे होऊ नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ. ह्या निवेदनावर विचार केला तर किती साळसूदपणे ते लिहिण्यात आलेले आहे ते दिसते. ४८ बड्या स्टुडिओजनी शासनासमोर सपशेल लोटांगण घातले असा त्याचा खरा अर्थ होता. हे हॉलिवूडमधील त्यावेळचे अतिशय बलाढ्य स्टुडिओ होते. खरे तर जर त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले असते, तुमचा गैरवाजवी हस्तक्षेप थांबवा नाहीतर आम्ही सिनेनिर्मिती बंद करतो तर सरकारचे डोके कदाचित ठिकाणावर आले असते. त्याऐवजी हे स्टुडिओज वाहवत गेले आणि स्वत:च स्वत:वर बंधने घातली. वॉल्ट डिस्ने आणि त्याचे सहकारी मित्र तर यांच्या अनेकपटीने पुढे होते, त्यांनी सिनेमात बारिकसारिक तपशील काय असावा ह्याचे मानदंड ठरवून दिले. त्यातही ह्या दहांपैकी एकाने तुरुंगात असताना माफी मागून व कबूलीजबाब देऊन सुटका करून घेतली. मात्र बाकीचे आपल्या भूमिकेवर ठाम होते.

ट्रम्बो व इतर आठजण त्यांना दिलेल्या तुरुंगवासाची शिक्षा भोगूनच सुटले. ट्रम्बो यांनी तर अकरा महिने तुरुंगात काढले. पणसुटल्यावरही ब्लॅकलिस्टमुळे आणि ४८ बड्या स्टुडिओजच्या विरोधामुळे यापैकी कोणालाही काम द्यायला चित्रपट निर्माते व स्टुडिओ तयार नव्हते. त्यांच्यापैकी काहीजण मग इतर देशात गेले, काहींनी घोस्ट रायटींग म्हणजे दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने लेखन केले केले. डाल्टन ट्रम्बो यांनी ह्या दडपशाहीविरुध्द जो लढा दिला तो मानवी जिद्द, प्रतिभा, मेहनत, मनोधैर्य याचे एकउत्तम उदाहरण आहे. त्याचेच चित्रण २०१५च्या ट्रम्बो चित्रपटात येते. त्यांना काम मिळणार नाही हे उघडंच होते. पण शेजारी व समाजातील लोकांकडूनही त्रास होत होता. त्यांनी आपले घर विकले व पत्नी व तीन मुलांसह ते मेक्सिको सिटी इथे रहायला गेले. टोपणनावाने कथा-पटकथा लिहायचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी पत्नी, टीनएजर मुलगी निकोला व नऊ -दहा वर्षांचा मुलगा ख्रिस्तोफर यांना मदतीला घेतले. आधी ट्रम्बो सरळ किंगबदर्स ह्या बी ग्रेड चित्रपटांच्या निर्मात्यांना भेटले आणि काम देण्याची विनंती केली. निर्माते म्हणाले, तुमचे मानधन आम्हाला परवडणार नाही, तुमच्या पटकथांचा प्रेक्षक वेगळा, आमचा वेगळा, पण ट्रम्बो यांचे उत्तर तयारच होते, त्यांनी कमी मोबदला स्वीकारला, निर्मात्यांना हवी तशी पटकथा लिहून दिली आणि तिही अगदी कमी कालावधीत. किंग बदर्सशिवाय काही बड्या कलाकारांसाठीही दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने कथा-पटकथा लिहूनदिल्या. त्यावेळेस लेखनाचे काम करावे लागायचे टाईपरायटरवर, नंतर त्या पटकथा निर्माता किंवा दिग्दर्शकाकडे पोचवाव्या लागत. ट्रम्बो स्वत: त्या द्यायला गेले असते तर गुपित ऊघडं झाले असते. ह्या कामासाठी त्यांनी आपल्या मुलीची व मुलाची मदत घेतली.चित्रपटात दाखवले आहे, ट्रम्बो सतत टाईपरायटरवर टाईप करत, अनेकदा बाथटबमध्येही ते काम करत. कुटुंबियांसाठीसुध्दा त्यांच्याकडे वेळ नव्हता. एकतर त्यांना पैसे हवे होतेच आणि बंदीला न जुमानता काम करत रहायचे होते, त्यातूनच स्वत:चे नाव परत मिळवायचे होते. स्वत:साठी काम मिळवताना ते बंदी घातलेल्या इतरांनाही काम मिळवून देत होते. ह्या बंदीच्या काळात त्यांनी सुमारे पंधरा चित्रपटांसाठी कथा किंवा पटकथा लिहिल्या, त्यातही मुख्यत: पटकथा लिहिल्या. बड्या कलाकारांसाठीही दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने कथा-पटकथा लिहून दिल्या असे जे म्हटले आहे त्यात १९५३चा रोमन हॉलिडे हा ग्रेगरी पेक आणि ऑड्रे हेपबर्न ह्या बड्या कलाकारांचा अतिशय गाजलेला सिनेमामहत्वाचा. ह्या रोमन हॉलिडे सिनेमाला पटकथेचे ऑस्कर मिळाले. डाल्टन ट्रम्बो यांनी जॉन डिघ्टन यांच्यासह याची कथा-पटकथालिहलेली होती, पण काळ्या यादीत नाव असल्याने इयानमॅकलेलन हंटर यांचे नाव पुढे केले होते. आपल्याच सिनेमालामिळालेले ऑस्कर दुसरा घेत आहे हे त्यांना घरी बसून बघावे लागले. तसेच किंग बदर्सना काही कथा दिल्यावर १९५६ मध्येत्यांच्याच द ब्रेव्ह वन सिनेमासाठी कथा-पटकथा दिली आणि ह्यासिनेमाला सर्वोत्कृष्ट कथेचे ऑस्कर मिळाले. ह्या सिनेमासाठीडाल्टन ट्रम्बो यांनी रॉबर्ट रीच असे नाव घेतले होते. हा पुरस्कार निर्मात्यांतर्फे दुसरा कोणी स्वीकारत आहे त्यांना घरी बसून टीव्हीवर बघावे लागले. बड्या स्टुडिओजना ट्रम्बो टोपणनावाने लिहित आहेत संशय होताच, त्यांच्या अशारितीने काम करण्यातही सतत अडथळा आणण्याचे ह्या अतिरेकी उजव्यांचे प्रयत्न सुरूच होते, त्यालाही डाल्टन ट्रम्बो पुरुन उरले. एकदा तर ह्या स्टुडिओजचा एक अधिकारी किंग बदर्सना भेटला आणि तुम्ही ट्रम्बो यांना काम देता म्हणून प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकायचे आवाहन वर्तमानपत्रातून करतो अशी धमकी दिली. किंग बदर्स म्हणाले खूशाल करा, आमचा प्रेक्षकवर्ग वर्तमानपत्रच वाचत नाही!

यानंतर १९६०मध्ये ब्लॅकलिस्ट रद्द झाली त्यालासुध्दा डाल्टन ट्रम्बो हे एक कारण होते. कर्क डग्लस हा एक बडा अभिनेता, त्याने स्टॅनली क्युब्रिक ह्या नंतर खूप नामवंत झालेल्या दिग्दर्शकाला घेऊन १९६०मध्ये स्पार्टाकस हा भव्य ऐतिहासिक सिनेमा बनवलाआणि याची पटकथा डाल्टन ट्रम्बो यांनी लिहिली. एका गुलामाच्या नेतृत्वाखाली रोमन साम्राज्याविरुध्द उठाव झाला त्याची ही कथा. कर्क डग्लससह लॉरेन्स ऑलिव्हिए, पीटर उस्तिनोव्ह असेही दिग्गज त्यात होते. कर्क डग्लसने सगळे दबाव झुगारुन डाल्टन ट्रम्बो यांनाच त्याचे श्रेय दिले, पडद्यावरही त्यांचे नाव आले. ट्रम्बो यांना स्टुडिओत येण्यासाठीही बंदी होती, कर्क डग्लसने त्यांना स्पार्टाकस सिनेमाच्या कामासाठी पास दिलाआणि अनेक वर्षांनी ते स्टुडिओत पुन्हा प्रवेश करू शकले. हेडा हूपर ही एक फार नाव न मिळालेली अभिनेत्री होती. पुढे तिने गॉसिप कॉलमिस्ट म्हणून मात्र खूप लोकप्रियता मिळवली. ती कट्टर कम्युनिस्ट विरोधक होती आणि ट्रम्बो यांच्या तर जणू मागावरच होती. स्पार्टाकस सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सुमारास तिने लिहिले होते, ह्या सिनेमाचा लेखक एक कॉमी आहे आणि पटकथाही एका कॉमीने लिहिलेली आहे, ह्यावर बहिष्कार टाका.तसेच सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा कम्युनिस्ट विरोधी लोक थिएटरबाहेर निदर्शने करत होते, पण अमेरिकेचे अध्यक्ष खुद्द जॉनएफ. केनेडी यांनी त्या जमावातून वाट काढत थिएटरमध्ये प्रवेश केला आणि नंतर सिनेमाची तारीफ केली. १९६०मध्येच ओट्टो प्रेमींगर ह्या दिग्दर्शकानेही त्याच्या एक्झोडस सिनेमाच्या कथा-पटकथेसाठी डाल्टन ट्रम्बो यांचे नाव जाहीरपणे दिले. अशारितीने ह्या दोन्ही सिनेमांमुळे ब्लॅकलिस्ट रद्द झाली. त्यांचे हे सिनेमे व एकूण कारकीर्द याचा विचार केला तर हा किती प्रतिभावंतलेखक होता ते कळते. पण केवळ कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांचाअसा छळ झाला. अथक संघर्ष करून त्यातून त्यांनी मार्ग काढलाआणि स्वत:चे नाव परत मिळवले, अमेरिकेला दखल घ्यायला लावली. तुरुंगातून परत आल्यावर साधारण १९५०पासून बड्या स्टुडिओजचा सक्रिय बहिष्कार, हेडा हूपरसारखे सक्रिय विरोधक यांचा सामना करत काम मिळवणे, वेळेत पटकथा लिहून देणे, हे प्रतिभा आणि अखंड मेहनत ह्यामुळे शक्य झाले. ह्या दहा वर्षात अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले, तर १९३६ ते १९७३ ह्या ३७ वर्षांच्या एकूण कारकिर्दीत साधारण ६५ चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले. स्पार्टाकस सिनेमाच्या शेवटी ह्या गुलामाला पकडायला सैनिक येतात तेव्हा प्रत्येक गुलाम “आय अॅम स्पार्टाकस” – “मीच स्पार्टाकस आहे” – म्हणतो, हा अतिशय गाजलेला व अविस्मरणीय प्रसंग. त्याचे संदर्भ नंतरही काही कलाकृतीतून मिळतात.

ह्यानंतर साधारण दहा वर्षांनी ट्रम्बो यांना हॉलिवूडतर्फे सन्मानित करण्यात आले. तसेच १९५६च्या द ब्रेव्ह वन सिनेमासाठीचेऑस्कर अवार्ड अॅकॅडमीतर्फे १९७५मध्ये डाल्टन ट्रम्बो यांनादेण्यात आले. १९७१मध्ये त्यांच्याच जॉनी गॉट हिज गन ह्या युध्दविरोधी कादंबरीवर चित्रपट आला, त्याचे दिग्दर्शनही ट्रम्बो यांनी केले होते. १९७३मध्ये आलेल्या पॅपिलॉन ह्या चित्रपटाचे ते सहपटकथालेखक होते. एका अतिशय प्रसिध्द कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता व ह्यात स्टीव्ह मॅक्वीन आणि डस्टीन हॉफमन यांनी काम केले होते. तसेच त्याच वर्षी द एक्झिक्युटीव्ह अॅक्शन हा त्यांचा चित्रपट आला. हा जॉन एफ. केनेडी यांच्या खूनामागे काय कारस्थान आहे त्याचा शोध घेणारा थरारपट होता.हाच त्यांचा शेवटचा चित्रपट. १९७६मध्ये त्यांचे निधन झाले.

ट्रम्बो चित्रपटाबाबत एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे, ह्यात ट्रम्बो यांची भूमिका ब्रायन क्रॅन्स्टन ह्या अभिनेत्याने एकदम उत्तम केली होती. हा अभिनेता म्हणजे एक अस्सल हिरा असून २०१६मध्ये आलेल्या ऑल द वे ह्या चरित्रपटात त्याने अमेरिकेचे प्रेसिडेंट लिंडन बी जॉन्सन यांची अशी काही झपाटल्यासारखी केली होती की नंतर लिंडन बी जॉन्सन यांच्या भूमिकेत इतर कोणाला बघायला फार कष्ट होतात.

डाल्टन ट्रम्बो यांचा मुलगा ख्रिस्तोफर हा हॉलिवूड टेन नावाच्या बदनाम प्रकरणाबाबतीत एक अधिकारी व्यक्ती मानला जायचा. ख्रिस्तोफर यांनी त्यांच्या वडिलांच्या ब्लॅकलिस्ट काळातील पत्रव्यवहारांवर आधारित ट्रम्बो: रेड, व्हाईट अॅन्ड ब्लॅकलिस्टेड हे नाटक २००३मध्ये लिहिले. त्याचे ऑफ ब्रॉडवेवर प्रयोगही झाले. पुढे हे नाटक व काही डॉक्युमेंटरी फुटेज मिळून त्याने २००७मध्ये ट्रम्बो नावाचा एक सिनेमाही पीटर अस्किन्स यांच्या सहयोगाने बनवला. हॉलिवूड टेन प्रकरण घडले त्यावेळेस ख्रिस्तोफर फक्त नऊ -दहा वर्षांचे होते, पण त्याचा परिणाम इतक्या खोलवर त्यांच्यावर होता की निधनापूर्वी २०११मध्ये रोमन हॉलिडेचे श्रेय डाल्टन ट्रम्बो यांना द्यावे अशी विनंती ख्रिस्तोफर यांनीअॅकॅडमीला केली व त्यानुसार ह्या सिनेमाच्या पटकथेचे ऑस्कर मरणोत्तर डाल्टन ट्रम्बो यांच्या नावावर करण्यात आले, रेकॉर्डवर तशी नोंद करण्यात आली.

अमेरिकेतील त्या काळातील ह्या वेडाचारामुळे आर्थर मिलर,बर्टोल्ट ब्रेख्त आणि डाल्टन ट्रम्बो यांना काय काय सहन करावे लागले ते आपण बघितले. इलिया कझान यांनी कम्युनिस्ट मित्रांची नावे सांगून स्वत:ला वाचवले खरे, पण त्यांनाही काही मानसिक यातना झाल्या असतीलच कारण ते उदारमतवादी होते, वंशभेदविरोधी होते. पण वॉल्ट डिस्ने आणि त्याचे सहकारी मित्र हे मात्र उघडे पडले. त्यांनी सिनेमात बारिकसारिक तपशील काय असावा ह्याचे मानदंड ठरवून दिले, असे जे वर दिले आहे त्याचा तपशील बघू. वॉल्ट डिस्ने हे कम्युनिस्ट विरोधक होते, शिवाय त्यांच्या विचारांवरून ते सनातनी वृत्तीचे होते असे दिसते. त्यांनी मोशन पिक्चर अलायन्स फॉर द प्रीझर्व्हेशन ऑफ अमेरिकन आयडियल्स नावाची सिनेनिर्मात्यांची संस्था सुरू केली. नावावरुन स्पष्ट आहे, अमेरिकन संस्कृतीची-आदर्शांची जपणूक करणे हे त्यांचे उद्दीष्ट होते. हे तर ठीकच आहे. पण त्यांनी सिनेमांतून कोणते विचार दिले जाऊ नयेत हे सांगणारी एक यादीच जाहीर केली. ही बंदी-यादी अशी होती, मुक्त भांडवलशाहीची बदनामी करणारे, संपत्तीसंचयाला वाईट ठरवणारे, नफा मिळवण्याच्या उद्देशाला वाईट ठरवणारे, असे काही सिनेमात दाखवू नका. तसेच सामान्य माणसाचे उदात्तीकरण करणारे, सामुहीक कृतीचे उदात्तीकरण करणारे काही सिनेमात दाखवू नका. ही यादी वाचली तर वॉल्ट डिस्ने आणि त्याच्या सहकारी मित्रांना लेखक, सृजनशील व्यक्ती कशा काम करतात ह्याची कल्पना तरी होती का प्रश्न पडतो. इतक्या बारिकसारिक गोष्टींबाबत बंधने आली तर लेखक लिहूच शकणार नाही. फक्त बाळबोध, प्रचारकी लिहिले जाईल. व्यक्तीरेखांचा स्वभावधर्म, परिस्थिती अशा अनेक बाबीनुसार कथानक पुढे जात असते, त्यात संघर्ष असावा लागतो. अगदी भांडवलशाहीचे समर्थन करणारा सिनेमा काढायचा असेल तरी त्यात भांडवलशाहीवर टीका करणारी व्यक्तीरेखा असू शकते. मग ती आणावी की नाही, आणली तर त्यावर बंदी घातली जाईल का विचार करत बसायचं का? पण त्यांचे विचार असे होते याचा अर्थ आर्थिक, सामाजिक बाबतीत तळाशी असलेले, वंशभेद, वर्गभेद याचे चटके सोसणारे, शोषित लोक – तो वर्गच त्यांच्यासाठी बहुधा अस्तित्वात नव्हता. सुखवस्तूवर्गच त्यांचा टार्गेट ऑडियन्स होता आणि त्याला आवडतील, मानवतील असेच चित्रपट त्यांनी दिले. वॉल्ट डिस्ने यांना अमेरिकन संस्कृतीचा मानबिंदू, उद्यमशीलतेचे प्रतीक मानले जायचे. त्यांच्या निधनानंतर फेरमूल्यमापन होऊन त्यांना अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक खुद्द अमेरिकतच म्हटले गेले. जे कलाक्षेत्रातील व्यक्तीबाबत खरे आहे ते राजकिय नेतृत्वाबाबत व राज्यकर्त्यांबाबत तर जास्तच लागू होते. धोरणे ठरवताना ते कोणत्या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून धोरणे ठरवतात, आर्थिक, सामाजिक बाबतीत तळाशी असलेले लोक, शोषित लोक त्यांच्या अजेंड्यावर असतात का की केवळ संस्कृतीचा उदोउदो करणे, वरच्या वर्गाच्या हिताची धोरणे आखणे हे काम ते करतात ह्यावर त्यांचे मूल्यमापन हवे.

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

Write A Comment