fbpx
सामाजिक साहित्य

पु. ल. देशपांडेंचे साहित्य आणि ब्राह्मणी दृष्टीकोन

पु. ल. देशपांडेंचं साहित्य हे आजही मराठी शहरी मध्यमवर्गाकडून डोक्यावर घेतलं जातं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या पुस्तकांच्या नवनव्या आवृत्त्या सातत्याने येत असतात. महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तीमत्वांमध्ये त्यांची गणना होते. सध्याच्या स्टँडअप कॉमेडी प्रकाराच्या कितीतरी वर्ष आधी पु. ल. यांनी त्यांच्या वाचकांना, प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं. केवळ साहित्यच नाही तर नाटक, चित्रपट, संगीत, टेलिव्हिजन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या विनोदाला निखळ विनोद म्हणून म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही अनेकांना भुरळ पडते. कदाचित त्यामुळेच की काय, त्यांच्या साहित्याविषयी वेगवेगळ्या अंगांनी चर्चा क्वचितच झाली आहे. लोकप्रिय लेखक ही बिरुदावली त्यांना दिल्याने त्यांच्या साहित्याची चिकित्सा फारशी वाचायला मिळत नाही किंवा तसं करणं अनेकांनी टाळलं असावं. कारण आपल्याकडे टीका ही व्यक्तीशः घेतली जाते. त्यात साहित्य, कला यांचा विविध अंगांनी केलेला उहापोह हा अनेकांना मान्य होत नाही. एकूणच प्रश्न विचारणंच आपल्या समाजामध्ये गैर आहे.

पुलंच्या साहित्यातील विनोदाला असलेली झालर ही जाती व्यवस्थेबद्दल असलेला पक्षपातीपणा, बहुजन-कष्टकरी विरोधी दृष्टीकोन, स्त्रियांविषयी तुच्छता-टिंगल, शारिरीक व्यंगांवरून टिंगल, मुस्लिमद्वेष, कम्युनिस्ट द्वेष, महात्मा गांधी आणि त्यांच्या कामाबद्दल टिंगल याची आहे. हे वाचून मोठ्ठं आश्चर्य वाटेल. पण लोकवाड्.मय गृहतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या संजय मेणसे यांच्या ‘ब्राह्मणी मानसिकता आणि पुल देशपांडे’ या पुस्तकामध्ये या सर्व मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा केली आहे. मूळात एखाद्या व्यक्तीचं, तिच्या कामाचं सातत्याने कौतुक होत असेल तर आपल्याकडे व्यक्तीपूजा सुरू होते. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल, तिच्या कामाबद्दल मूल्यमापन अशक्य होऊन बसतं. त्या व्यक्तीविरोधामध्ये बोलणं किंवा प्रश्न विचारणं हा गुन्हा समजला जातो. अशावेळी मेणसे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. त्यांनी पुलंच्या लेखनातील सातत्याने येणाऱ्या काही मुद्द्यांवर बोट ठेवून त्यामागे नक्की काय हेतू असावा असा प्रश्न उपस्थित केला आहे. वाचकांना या पुस्तकातले मुद्दे पटतील किंवा नाही. पण साहित्यिक किंवा समीक्षक नसताना, पुलंच्या एका वाचकाने अशाप्रकारे प्रवाहाच्या विरोधात जाऊन, विचार करून आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणं यातच लेखकाचं विशेष कौशल्यं आणि कौतुक आहे.

आता ब्राह्मणी मानसिकता म्हणजे काय, याची लेखकाने विस्तृत चर्चा केली आहे. या शब्दाकडे केवळ जातीवाचक म्हणून न पाहता जात व्यवस्था टिकून राहण्यासाठी, वर्ण-वर्ग-वर्चस्ववाद, खालच्या जातींविषयी तिरस्कार, समाजातल्या बदलांमुळे जाती व्यवस्थेला धोका निर्माण होत असेल तर त्याची टिंगल, पुरुषी अहंकार, स्त्रियांना दुय्यम स्थान, मुसलमान म्हणजे परकीय शत्रू, सौंदर्याच्या विशिष्ट कल्पना या गोष्टी ब्राह्मणी मानसिकतेमध्ये येतात. अशावेळी अब्राह्मणी दृष्टीकोनातून म्हणजे ब्राह्मणी मानसिकतेला छेद देत, पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’ आणि ‘असा मी असामी’ या १९५७ ते १९६४ या काळात लिहिलेल्या चार लोकप्रिय पुस्तकांचे विश्लेषण लेखकाने केलं आहे. लेखकाच्या मते, ही पुस्तकं प्रकाशित झाली त्या काळात मध्यमवर्ग हा बहुतांशी ब्राह्मणी मानसिकतेने व्यापलेला होता. पुलंचं सर्वच लिखाण या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतिबिंब या लिखाणामध्ये डोकावत राहतं.

Buy ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे । संजय मेणसे
ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे । संजय मेणसे
मुखपृष्ठ : किशोर मांदळे
पाने : १२४ । किंमत : १५०/-
ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक : https://tinyurl.com/2s4y9x43

या पुस्तकांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे येतात. त्यात सुरुवातीलाच लेखक सांगतात की, त्यांनाही पुलंचं लिखाण प्रचंड आवाडायचं. मात्र कालानुरूप काही गोष्टी खटकू लागल्या. अंतू बर्वा हे व्यक्तीमत्व सादर करणाऱ्या त्यांच्या एका मित्राला नेहमी कार्यक्रमांमध्ये हशा आणि टाळ्या पडायच्या. पण तेच सादरीकरण त्याने जेव्हा एका खेड्यात केलं तेव्हा शेतकरी प्रेक्षकांनी त्याला शून्य प्रतिसाद दिला. कारण पुलंचा वाचक वर्गच मूळी शहरी भागातला उच्च जातीय, मध्यमवर्गीय होता. पुल देशपांडे पुरोगामी समाजात जेवढे लोकप्रिय होते तेवढेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी वर्तुळातही होते. पुल महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्वं बनण्यात याचा काही संदर्भ आहे का, असा प्रश्न लेखकाला पडला आहे.

बटाट्याची चाळ या पुस्तकाच्या कथानकाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबईच्या मध्यमवर्गीय भागात बराच जोर होता. तरीही बटाट्याच्या चाळीत एकही संघ समर्थक नाही किंवा सावरकर समर्थकही नाही. पुलंच्या पुस्तकांमध्ये गांधीवादी किंवा सर्वोदयी मंडळींची मोकळेपणाने निंदा नालस्ती केली आहे. बटाट्याची चाळमध्ये हणमंतराव दशपुत्रे संस्कृती आणि जानवे या विषयावर भाषण करतात. त्या उताऱ्यात पुढील वाक्यं येतात, “… ते दिवस मोहनदास करमचंद गांधी ह्या गुजराती पुढाऱ्याने चालवलेल्या सबगोलंकारी चळवळीचे होते. पण मी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. ब्रह्मतेजापुढे वाणिजनाचा काय प्रभाव पडणार होता? माझ्यामागे मनू होता, याज्ञवक्ल्य होता, पराशर होता, अत्री होता, वसिष्ठ होता. त्यांच्यामागे साडेतीन केशरी देशसेविका आणि एक शेळी होती… पहिल्या दहा वाक्यांत मी सत्याग्रहाची अशी रेवडी उडवली की ज्याचे नावं ते ! चरख्यावरील सूत आणि जानव्याचे सूत, माझी ‘चर’ आणि ‘खा’ कोटी, पंचगव्य आणि शेळीचे दूध यांची मी केलेली बिनतोड तुलना ऐकून आणि ‘सनातन धर्माला’ वाचवा ही माझी नारायण पेशव्याच्या (ध चा माँ फेम) सुरात फोडलेली आरोळी ऐकून जनता खवळली… ” गांधीच्या सत्याग्रहाविषयी मतभेद असू शकतात. पण त्याची अशा पद्धतीने खिल्ली उडवून विनोद निर्मिती होते का, असा सवाल लेखक विचारतात. त्याचवेळी उजव्या विचारसणीच्या लोकांची तशीच टिंगल मात्र पुलंच्या पुस्तकांत येत नाही. ती करणं शक्य नसल्याने त्यांच्यावर काहीही लिहिणं पुलंनी टाळलं तर नाही ना, असा सवाल लेखक विचारतात. अगदी साने गुरुजींवरही तिरकस लिखाण पुलंच्या या पुस्तकांमध्ये आढळतं.

आता स्त्रियांविषयी टीका-निंदा करून विनोद निर्मिती हे एकूणच भारतीय समाजातील पुरुषी मानसिकता आहे. बायको कशी वाईट आणि नवरा कसा तिच्यापुढे बिचारा यातून आजही विनोद केले जातात. पण सातत्याने यावरच लिहिणं, स्त्रियांविषयी विशिष्ट सौंदर्य कल्पना रंगवणं जसं की गोरीपान, नाकेल आणि त्या व्याख्येत न बसणाऱ्या महिलांवर टिप्पणी करणं उदाहरणार्थ ढोलासारख्या दिसणाऱ्या कल्पलताबाई, वर्गातील मिशा असलेली पारशी मुलगी, भाजणीच्या रंगाची धर्मांतरित ख्रिश्चन मुलगी ही विशेषणं महिला विरोधी आहेत. महिला विरोधाच्या आडून पुलंचं नाथा कामत हे पात्र बहुजन समाजातील महिलांविषयी विशेष घृणा दाखवतं. म्हणजे विलेपार्ले ते चर्चगेट प्रवासात त्याला सांताक्रूझ, खार, वांद्र्याला मैत्रिणी भेटत, मात्र माहीम-माटुंगा ही भाकड स्टेशनं आणि लोअर परेलवर सुंदर मुलगी मिळणं दुरापास्त असली विधानं ही बहुजन मुली सुंदर नसतात या ब्राह्मणी मानसिकतेतूनच आली आहेत.

त्यांच्या लिखाणामध्ये मुस्लिमांच्या रंगवलेल्या प्रतिमा या नकारात्मक आहेत. हरितात्याचा मुस्लिमद्वेष करणारे अनेक उद्गार, बापू काणेने खांसाहेबांना जेवणाचा डबा देताना “घ्या तुमची कोंबडी, कुत्री… लवकर चेपा आणि चला” असा संवाद, त्यांच्या लिखाणात येत राहतात. खरंतर पुल देशपांडे यांना पुरोगामी म्हटलं जातं, समाजवादी वर्तुळाशी त्यांचा निकटचा संबंध होता. तरीही त्यांच्या लिखाणामध्ये विशिष्ट दृष्टीकोन आढळतो. कदाचित आपल्या वाचकांना खूष करण्यासाठी असेल.

पु ल देशपांडे हे सावरकर दर्शन प्रतिष्ठान कार्यक्रमात विनायक दामोदर सावरकर ह्यांच्यावर भाषण करताना.
पु ल देशपांडे हे सावरकर दर्शन प्रतिष्ठान कार्यक्रमात विनायक दामोदर सावरकर ह्यांच्यावर भाषण करताना.

बटाट्याच्या चाळीच्या शेवटच्या प्रकरणामध्ये बदलणाऱ्या चाळ संस्कृतीबद्दल लेखक खंत व्यक्त करतो. मूळात पुलंच्या लेखनामध्ये चाळ व्यवस्थेला दिलेलं ग्लॅमर हेच अत्यंत क्रूर आहे. जो माणूस चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहिला आहे तो हे उत्तम सांगू शकतो की गैरसोय म्हणजे काय असते. पण बदलणारी परिस्थिती, नवीन येणारी संस्कृती ही ब्राह्मणी मानसिकतेमध्ये बसत नाहीत. त्यामुळे पुस्तकात मग अशी खंत व्यक्त केली जाते, “काही वर्षांपूर्वी स्वयंपाकघरात आईला खोबरं किसून देणारी नाही तर तांदूळ निवडून देणारी मुलगी आता कठड्याला टेकून दिलाची आणि मोहब्बतीची गाणी म्हणालयला लागली”, “आता ह्या पोरी मोठमोठ्याने गॅलरीत जाऊन आवस वाढा गे माय म्हणणाऱ्या भिकारणींसारख्या प्रेमाचा आवस गळा काढून मागत होत्या. चाळीला वाटे, जागच्या जागी कोसळून जावे.”

आता ही पात्रं जे बोलतात ती पुल देशपांडेंची मतं नाहीत असा बचाव केला जातो किंवा काळाच्या मर्यादेची ढाल पुढे केली जाते. पण पुल या पात्रांची अशा मतांबद्दल खिल्ली उडवतायत किंवा त्यांच्यावर तिरकस टीका करतायत असं दिसत नाही, या पात्रांविषयी वाचकाला कौतुक/आदर वाटावा अशाच प्रकारे ती रंगवली आहेत. लेखकाने हेसुद्धा दाखवून दिलं आहे की, काळाची मर्यादा म्हणताना पुलंचं लेखन ज्या काळात झालं त्या आधी महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, साहित्यिक उलाढाली झाल्या होत्या. महात्मा फुलेंपासून शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, साहित्य क्षेत्रात लोकहितवादींची शतपत्रे, केशवसूत कोल्हटकर, प्रबोधनकार यांनी अब्राह्मणी परंपरांचे सुरुवात त्यांच्या क्षेत्रात केली होती. पण त्याचं प्रतिबिंब पुलंच्या लेखनात पडत नाही. एका विशिष्ट वर्गाला आवडणारा किंवा आठवणीत रमणारा काळच ते समोर उभा करतात.

लेखकाला आणखी एक पडलेला प्रश्न म्हणजे पुलंनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं असं वारंवार सांगितलं जातं. त्यांनी कशावर हसायला शिकवलं? कुणावर हसायला शिकवलं? कसल्या विनोदांवर हसायला शिकवलं? त्याचं उत्तरही लेखक पुढे देतात. विनोदी साहित्याच्या निर्मितीचं प्रयोजन गंभीर असू शकतं. जी गोष्ट उघडपणे सांगणं अडचणीचं असतं ती गोष्ट विनोदी अंगाने सांगितली की खपून जाते, नकळत स्वीकारलीही जाऊ शकते आणि कुणाचाही रोष न घेता योग्य तो संदेश पोहोचवता येतो. ही समीक्षा वाचल्यावर पुलंचं साहित्य नक्की कोणत्या कारणासाठी लोकप्रिय झालं असावं असा प्रश्न निश्चितच पडतो आणि त्यांच्या लिखाणाच्या मर्यादा लक्षात येतात.

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

2 Comments

  1. Manoj Nirgudkar Reply

    पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याला ब्राह्मणी ठरवणे बरोबर वाटत नाही. ते ब्राह्मणी वातावरणात वाढले म्हणून त्यांच्या लिखाणाला ब्राह्मणी पार्श्वभूमी आहे. परंतु याचा अर्थ ते ब्राह्मणी संस्कृतीचा उदोउदो करत आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्यांचा वाचक वर्ग शहरी आणि मध्यमवर्गीय होता येथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याला जातीय रंग देणे चुकीचे वाटते. साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मण समाजामुळे त्यांचे एकपात्री प्रयोग हाऊसफुल्ल जात होते हे काही पटत नाही.
    1. व्यक्ति आणि वल्ली हे पुस्तक विनोदी नाही. लेखनाने अतिशय ताकदीने रंगवलेल्या व्यक्तिरेखांमुळे ते गाजले. नारायण, चितळे मास्तर, अंतु बरवा, रावसाहेब, नंदा प्रधान या विनोदी व्यक्तिरेखा नाहीत. त्यातील काही संवादांमुळे विनोद निर्माण होत असेल. परंतु त्या 100% विनोदी व्यक्तिरेखा नाहीत.
    2. बटाट्याची चाळ हे 1930-40 च्या सुमारास चाळीमध्ये राहणार्‍या लोकांचे चित्रण आहे. त्याला स्थळ आणि काळाच्या मर्यादा आहेत. 2022 साली ते लिखाण चुकीचे होते आणि लेखकाने चाळीत रहाण्याचे उदात्तीकरण (to glorify) केले आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. बटाट्याची चाळ हा एकपात्री प्रयोग आवडला म्हणून कुणी आपला बंगला सोडून चाळीत राहायला गेल्याचे उदाहरण ऐकिवात नाही.
    कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्यावरही अशा प्रकारचा आरोप केला जातो.

  2. सदानंद बेंद्रे Reply

    विद्रोहाची ऐतिहासिक आग वर्तमानात आणि भविष्यातही धगधगत ठेवा साहित्यिकांनो ! विझतेय असा संशयही आला तरी लेखण्यांमध्ये शाईऐवजी घासलेट भरा आणि उठवा आगीचे डोंब. दोन समाजांमधली दरी कधीच बुजू देऊ नका. ती बुजते आहे असा संशयही आला तर लेखणीने खोदून खोदून ती वाढवा. एकीकडे तथाकथित प्रस्थापितांच्या पितरांची थडगी उकरून काढा, आणि दुसरीकडे तथाकथित शोषितांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मनात विष पेरा ! मात्र हे करताना आतल्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष करा. कारण तो तुम्हाला विचारेल “बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विद्रोह हाच आहे का? दया क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाच्या वाटेवर आपण खरंच चालत आहोत का?”

    असो ! भूतकाळाला आणि त्या काळातल्या विनोदाला वर्तनामानकाळाच्या आणि जातीयवादाच्या कोर्टात उभं करणं फारच सोयीचं आहे, नाही ? याच कोर्टात इतर जातीधर्माचे असे अनेक दिवंगत लेखक उभे करता येतील ज्यांचं लिखाण एखाद्या विशिष्ट समाजाला आवडलं नाही, पटलं नाही किंवा जातीयवादी वाटलं. पण तो अडाणीपणा होईल. मेणसे आणि त्यांच्यासारख्या इतर सगळ्या साहित्यिकांना माझ्या अशा शुभेच्छा आहेत, की आपली रेघ मोठी करण्यासाठी त्यांना इतरांची रेघ पुसायची गरज पडू नये आणि जे घर मागे सोडून आलो त्या घरावर दगडगोटे फेकण्यात उर्जा फुकट घालवण्यापेक्षा स्वतःच्या घराची सर्वांगीण उन्नती कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याची सुबुद्धी मिळावी.

Write A Comment