एच डी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, सिताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू आदी बहुतांश सर्व भाजपेतर नेत्यांना आमंत्रणे गेली आहेत. अर्थातच सोनिया आणि राहूल गांधी हे तर असणारच आहेत. सांगण्याचा मुद्दा काय, तर मोदी-शहा यांच्या अश्वमेधाच्या घोड्याचा लगाम कुणीच पकडू शकत नाही या गुर्मीने भाजपने किती नुकसान करून घेतलं याचा अंदाज या दोघांना आलेला असला तरी ते तसं दाखवणार नाहीत. दुसरं म्हणजे त्यांच्या तालावर नाचणारी प्रसारमाध्यमे इतके काटेकोर थोबाड फुटले असतानाही बातम्यांना अशी काही कलाटणी देताना दिसत आहेत की, जणू काही मोदी शहा या द्वयीने स्वतःच्या चेहऱ्याचे स्नायू किती भक्कम आहेत हे दाखवण्यासाठीच तोंडावर आपटून दाखवलं असावं. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस जदचं सरकार किती काळ चालेल, हे सरकार टिकेल का, अशा वायफळ चर्चांमध्ये मुख्य धारेतील प्रसार माध्यमे असली, तरी कर्नाटकचे अन्वयार्थ इतके त्रोटक नाहीत. कर्नाटकचा संदेश हा संपूर्ण भारतीय राजकीय पटलावर एक नवे समीकरण घडवू पाहात आहे, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
राजकारणामध्ये प्रत्येक जय हा दिर्घकाळासाठी फायदेशीर नसतो, तर अनेकदा पराजय हादेखील खूप फायद्याचा ठरतो. म्हणजे समजा काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून सामोरा आला असता, तर काँग्रेस पक्षाचे कर्नाटकातील स्थानिक नेतृत्व व दिल्लीतील हायकमांड यांनी देवेगौडा यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली नसती. अशा वेळी भाजपाने वेगाने हालचाली केल्या असत्या. कसेही करून सरकार बनवलेच असते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकांनी दिलेला कौल काँग्रेसला फायद्यातच पडला. मुख्य म्हणजे या एका निवडणुकीने भाजपेतर सगळ्या पक्षांच्या आशा पल्लवीत झाल्या. या आशा केवळ भाजपला हरविण्याबाबत नव्हत्या. तर भाजपला हरवताना भाजपविरोधात असलेल्या काँग्रेस या सर्वात मोठ्या पक्षाला जो त्याग करण्याची समज यायला हवी ती या निमित्ताने आली असावी, असे सर्वांना वाटू लागले आहे. अर्थात ही समज आली किंवा कसे, हे काळाच्या कसोटीवरच समोर येणार आहे, त्यामुळे याबाबत घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
येदुरप्पा यांच्या मात्र राजकीय कारकीर्दीची सांगता ही एखाद्या ग्रीक ट्रॅजेडीसारखीच म्हणावी लागेल. मोदी आणि शहा या जोडगोळीने त्यांच्या राजकीय आयुष्याच्या सायंकाळी त्यांना असे तोंडघाशी पाडणे फारच वाईट होते. संख्याबळ जमणे अशक्य आहे, हे माहित असताना केवळ केंद्रातील सत्ता व प्रचंड पैशाची ताकद या जीवावर वाट्टेल ते घडवून आणू शकतो, या मोदी शहांच्या गुर्मीने येदुरप्पांचा घात केला. भाजपच्या पारड्यात गेल्या वेळी न गेलेली सगळी लिंगायत मते या निवडणुकीतक आणून देणाऱ्या या नेत्याची पार वाताहत झाली. यापेक्षा काँग्रेस आणि जद एस एकत्र आल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसू, अशी भूमिका घेऊन काही काळ जाऊ दिला असता तर पुढे काही तरी संधी मिळण्याची तरी शक्यता होती. मात्र भाजप सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचे अत्यंत हीन प्रदर्शन या सर्व काळात जगासमोर झाले. काँग्रेस व जदच्या आमदारांना दिलेली पैशाची अमिषे केंद्रीय संस्थांची घातली गेलेली भिती या सगळ्यांची ध्वनीफिती सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत ज्या वेगाने फिरल्या त्यातून गेलेली पत ही बड्या मिडिया कंपन्यांच्या मोदींच्या बाजूने दिल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रीय बातम्या आणि चॅनेल्सवरील चर्चांनी भरून निघणे केवळ अशक्य आहे. सर्वत्र केवळ आणि केवळ मोदी व शहांची जिरल्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट फेसबूक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवरून फिरत आहेत. मुख्य म्हणजे यातून जदच्या नेत्यांची जी मने दुखावली गेली आहेत ती पुन्हा भाजपच्या कुठल्याच अमिषाला फार चटकन बळी पडण्याची शक्यता आता फार कमी आहे. बिहारमधील काही वर्तमानपत्रांत तर भाजपच्या या भूमिकेमुळे नितीश कुमार यांच्या गोटातही प्रचंड चिंतेचे वातावरण असून पुन्हा काही वेगळा विचार करता येईल का, याबाबत नितीश व त्याच्या काही खास पाठीराख्यांमध्ये चर्चा झाल्याचे या वृत्तांमध्ये म्हटले आहे.
मोदींचा करिश्मा कितपत कायम आहे किंवा कसे याबाबत दिल्लीतील मोठे राजकीय पत्रकार संपादक विविधांगांनी चर्चा करीत आहेत. मोदींचा करिश्मा कदाचित कायम असेल असे क्षणभर गृहित धरायलाही हरकत नाही. मात्र हा करिश्मा २०१४ सालीदेखील देशातील एकूण मतदारांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिकांना भूल पाडू शकलेला नव्हता हे विसरता कामा नये. त्यामुळे मोदी यांचा करिश्मा व शहा यांचे निवडणूक व्यवस्थापन हे जगातील सर्वोत्कृष्ट आहे, असे गृहित धरले तरी त्यांच्या अहंकारामुळे, त्यांच्या मग्रूरीमुळे, त्यांच्या वागणुकीतील उद्धटपणामुळे देशातील साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान असलेले सर्व पक्ष एकत्रित आले तर या करिश्म्याचं व निवडणूक व्यवस्थापनाचे काय लोणचे घायचे का, असा प्रश्न भाजपपुढे उभा राहिलेला आहे.
नेमक्या या गोष्टीचीच दखल घेतल्यानेच येदुरप्पा यांना विधानसभेत बहुमत अजमावण्यापूर्वीच राजानीमा देण्यास सांगण्यात आले. कारण झाली तेवढी शोभा पुरे झाली, उरली सुरली झाकली मुठ सव्वालाखाची ठेवा, असा थेट सल्ला नागपूरहून आल्याचे भाजपच्याच गोटातील लोकांचे म्हणणे आहे. अन्यथा शहासाहेबांना तर काहीही करून विधानसभेत बहुमताची परीक्षा हवीच होती. आता या मागे त्यांचा नक्की काय तर्क होता, हे समजत नाही. कदाचित काँग्रेस किंवा जदमधील ज्या आमदारांशी संपर्क झाला ते नक्की काय करतात हे त्यांना पहायचे असावे. मात्र याचा परिणाम देशभरातील लोकांवर काय होतो आहे, याची जाणीव संघाच्या धुरीणांना झाल्यामुळे त्यांनी लाज झाकण्यापुरते तरी कपडे भाजप नेत्यांच्या अंगावर राहतील, असे पाहिले, असेच यावरून दिसते.
यापूर्वी अनेक निष्पक्ष पत्रकारांनी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून उदारमतवादी भूमिका घ्यावी, असे सुचवून पाहिलेले आहे. मात्र जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. शहा व मोदी यांच्याकडे जणूकाही जादूची कांडी असून ते कुठल्याही विपरित परिस्थितीत निवडणुका एक हाती जिंकू शकतात, असा त्यांनी समज करून घेतला होताच, भाजपमधीलही अनेकांचा तो झाला होता व मोदी भक्तांच्या उन्मादामुळे देशातीलही अनेकांचा तसा समज झालेला आहे. त्यामुळेच अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातच काहीतरी गडबड करून निवडणुका जिंकल्या जातात, असे अनेक भाजपेतर पक्षाच्या समर्थकांना वाटत राहते. तर ही जादुची कांडी खरोखरीच आपल्या हाती असल्याचा भ्रम या द्वयीचाही झाल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यातील मग्रुरीची पातळी इतकी वाढली आहे, की कुणाही सभ्य व्यक्तीला त्याची शिसारी यावी. अर्थात प्रत्यक्षात कुठलीही निवडणूक मोदी शहा सहजपणे जिंकणारच हा केवळ भंपकपणा आहे. या देशातील शंभर सव्वाशे कोटी जनतेला अशा प्रकारे दोन माणसे आपल्या व्यवस्थापन कौशल्यावर वा चोवीस तास प्रसारमाध्यमांवरून त्यांच्या समोर वटवट वटवट करून एका भ्रामक जगात गुंतवून ठेवू शकत नाहीत. हा देश इतका वैविध्यपूर्ण आहे की, या देशाच्या ज्ञात इतिहासामध्ये इतक्या प्रचंड भूभागावर अशा प्रकारे एकहाती वर्चस्व असलेला कुणीही महाभाग झालेला नाही व भविष्यातही होणार नाही. या देशात एकमेकांच्या वैविध्याचा आदर करत व त्याची देवाणघेवाण करतच एखादा माणूस मध्यम मार्गाने नेतृत्व करू शकतो. मध्यम मार्गाचा व या द्वयीचा काडीइतकाही संबंध नसल्याचे यांच्या एकंदरच वक्तव्यांवरून व गेल्या चार साडे चार वर्षांच्या कारभारावरून लक्षात यायला हरकत नाही.
त्यामुळेच स्वतःच्या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर असलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे मोदी व शहा यांनी कर्नाटकच्या निमित्ताने स्वतःची नको तितकी शोभा करून घेतली आहे. पैसे व भिती या दोघांचा वापर करून लोकप्रतिनिधी कह्यात येऊ शकतात, हा भ्रम कर्नाटकमधील काँग्रेस व जदच्या आमदारांनी खोटा ठरवला आहे. केवळ तितकेच नाही, तर कर्नाटकमधील या विजयामुळे देशभरातील भाजपेतर पक्षांना आता खऱ्या अर्थाने एकजुटीसाठी एक शक्तीवर्धक गुटी मिळाली आहे. काँग्रेस नेतृत्वाला त्यांच्या त्यागामुळे देशभरातील छोट्या मोठ्या भाजपेतर पक्षांचे नेतृत्व करण्याची संधी समोर आली आहे. ज्या सेक्युलरिजम या शब्दाची मोदी, भाजप व संघ परिवाराने गेली चार वर्षे यथेच्छ टिंगल टवाळी केली. सेक्युलॅरिजमला मानणाऱ्या पं. नेहरूंना देशातील प्रथम क्रमांकाचे व्हिलन म्हणून रंगविण्याचा प्रयत्न केला, त्या सेक्युलर विचारधारेच्या पक्षांची मोट बांधणे आता शक्य होणार आहे. देशातील सेक्युलर व्होटबँक ही आक्रमक हिंदुत्ववादी व्होट बँकेपेक्षा कितीतरी मोठी आहे. चार्वाकापासून ते तुकोबा, बसवेश्वरापर्यंतची परंपरा असणारा बहुतांश हिंदू हा संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या ठाम विरोधात आहे, वारंवार मतदानाची टक्केवारी हे सिद्ध करत असली तरी त्या जनाधारावर अधिकार सांगण्याच्या लढाईतूनच या सगळ्या पक्षांचे काँग्रेससोबत जुळणे कठीण होत होते. आता काँग्रेस जर खरोखरीच कर्नाटकात केला तशा त्यागास तयार असेल, तर देशातील सगळ्या प्रसारमाध्यमांमधून चोवीस तास मोदी शहा नामाचा जप करा, सगळ्या बड्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या क्रीडा पानापर्यंत मोदी चालीसाने रकाने भरा, काहीही फरक पडणार नाही. २०१९ला या द्वयीचा या पेक्षाही दारूण पराभव निश्चित होईल. मात्र त्यासाठी काँग्रेसने सर्वाधिक त्याग व सर्वाधिक मेहनतीची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
1 Comment
I think it will be too early to conclude that oppostion will / can come together and can do miracles