fbpx
कला

वेडेपणाचा वारसा

तेंडुलकरांच्या पंच्याहत्तरी निमित्त दिनेश ठाकूर यांनी पृथ्वी थिएटरमध्ये ‘तेंडुलकर संगोष्टी’ असा दिवसभराचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला मधला थोडा वेळ तेंडुलकर येऊन गेले. त्यांना अशा कार्यक्रमांत तेव्हा फारसा रस उरला नव्हता. त्यांना बोलण्याची विनंती करण्यात आली. ते पाचेक मिनिटं बोलले. ते म्हणाले, “मी फार निराश झालोय. ही निराशा माझ्या व्यक्तिगत कारणांनी आलेली नाही. समाज म्हणून आपण ज्या दिशेने चाललो आहोत, जे सभोवताली घडतं आहे त्याने मी कोसळून गेलोय. रात्र रात्रभर मला झोप येत नाही. ” अशाच प्रकारचं ते काही याच दरम्यान पुण्यात बोलले होते. “कधी कधी माझा मी अनावर होतो आणि ओक्साबोक्सी रडतो. या व्यवस्थेचा चुथडा करणाऱ्यांना संपवावसं वाटतं.” त्याचाच मागे पुढे कधी तरी कोकणात एका गप्पांच्या कार्यक्रमात एका लहान मुलीने त्यांना प्रश्न विचारला होता की, तुमच्या हातात पिस्तुल दिलं तर तुम्ही कोणाला गोळी घालाल ? तेव्हा तेंडुलकर लगेच उत्तरले होता की मी नरेंद्र मोदींना गोळी घालीन !

एका बेभान वेडेपणापोटी तेंडुलकरांनी केलेल्या या विधानाचे पडसाद देशभर उमटले. अनेकांना तेंडुलकर हिशेबी वाटत आले आहेत. होते, असतीलही. पण त्यांना जेव्हा जे म्हणावसं वाटे तेव्हा ते कुठलाही मागचा पुढचा हिशेब न बघता बेदरकारपणे म्हणत आणि लिहितही. असं म्हणायला, लिहायला जो वेडेपणा लागतो आणि समाजाला अंगावर घ्यायची जी ताकद लागते ती त्यांच्याजवळ होती. तेंडुलकरांच्या त्या विधानावर तोंडसुख घ्यायला मग फौजच तयार झाली. मराठी साहित्या आणि वृत्तपत्रीय वर्तुळात त्यांना टार्गेट केलं गेलं, जणू काही तेंडुलकर उठून दुसऱ्या दिवशी मोदींवर गोळी चालवायला निघणारच होते. एका साहित्यिकाच्या तोंडी हिंसेची भाषा शोभत नाही, असं म्हणत सनसनाटीपणाचा तेंडुलकरांना सोसच आहे, असा आरोप होऊ लागले. आजच्या काळात ते हे बोलले तर एका फटक्यात देशद्रोही आणि फासावर चढवायच्या लायकीचे झाले असते. 2002 च्या गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये झालेल्या नरसंहाराबद्दल चकारही न काढणारे साहित्यिक, पत्रकार आणि तथाकथित विचारवंत मोदींच्या त्या काळातल्या वर्तनाबद्दल चुकूनही तोंड न उघडणारे महाभाग त्या कृत्याच्या प्रतिक्रियेबद्दल मात्र कमालीचे संवेदनशील आणि न्यायमूर्ती झाले होते. मोदींचा त्या काळात मसीहा म्हणून उदय झाला होता आणि त्यांच्यावर हल्ला करू बघणारे तेंडुलकर हे हिंसक पाखंडी बनले होते.

आज तेंडुलकरांच्या मृत्यूला 10 वर्षे पूर्ण होत असताना ही घटना ठळकपणे मला पुनःपुन्हा आठवत राहते. तेंडुलकर ह्या प्रखर टीकेतून गेले. बाहेर पडले. तसे ते नेहमीच अशा जाळातून जात राहिले. पण त्यांनी पटेल ते बोलायचं सोडलं नाही. पूर्वी कधीतरी एकदा मराठी नाट्यपरिषदेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये ते असंच एक वाक्य बोलले. त्यांना नाटककार म्हणून श्रीमंत गोगटे पुरस्कर देण्यात आला होता. उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते म्हणाले, “कोण हे श्रीमंत गोगटे? यांचा नाटकाशी काय संबंध? याच्याएेवजी मला थिएटरच्या डोअर कीपरच्या नावाने बक्षिस दिलं असतं तर आनंद झाला असता.” त्यानंतर कोण गदारोळ उठला ! बक्षिस घेणारे तेंडुलकर अतीशहाणे कृतघ्न आणि अवसानघातकी ठरले होते.

आज तेंडुलकरांच्या नाटकांवर, साहित्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या वेडेपणावर बोलायला हवं. एक लेखक समाजात साठ-सत्तर वर्ष वावरतो, काळाची सगळी स्थित्यंतरं बघतो, त्यातले हेलकावे, बरे-वाईट बदल टिपतो, सामान्य माणसाचं ह्या जगण्यात काय होतंय ते बघतो, सांस्कृतिक पवित्रे निरखत राहतो, सामाजिक घुसळणीला प्रत्यक्षाप्रत्यक्ष साक्षीदार होतो आणि त्यातून जगण्याबद्दलचं आपलं आकलन बनवतो. त्याचं तो प्रत्यक्ष जीवनात काय करतो ? लेखन ही त्याची कृती आहेच. पण लेखनाबाहेरही जगणं उरतंच आणि ते अस्वस्थ करतं तेव्हा तो ह्या जगण्याकडे हातावर हात ठेवून स्वस्थ बघत बसतो की कृतीच्या काही समांतर वाटा शोधतो, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या दुर्बिणीतून मी मराठी साहित्य सृष्टीकडे बघतो तेव्हा तेंडुलकरांचे समकालीन लेखक मला मादाम तुसाँच्या संग्रहातले मेणाचे पुतळे वाटतात. एका बंदिस्त वास्तूतल्या निवडक-समर्पक प्रकाश झोतात आपली चकचकीत निर्मळ कांती मिरवत हसतमुख राहणारे, तृप्त वाटणारे पण निर्जीव आणि तेंडुलकर त्या वास्तूत अस्वस्थपणे फिरणाऱ्या वेड्या भुतासारखे वाटतात.

तेंडुलकरांची सगळी मतं पटणारी नसतील, मलाही ती अनेकदा पटलेली नाहीत. त्यांचं वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींबद्दलचं आकलन मला कधी कधी बुचकळ्यात टाके. पण त्याचबरोबर हेही सांगायला हवं की, स्वातंत्र्योतेतर कालखंडातल्या भारतीय राजकारणाबद्दल विशेषतः मतलबी राजकारण्यांबद्दल, गर्तेत जात चाललेल्या राजकीय संस्कृतीबद्दल त्यांची समज विलक्षण होती. त्यांची उमेद पत्रकारितेत गेली आणि त्यांनी पत्रकारिता ही जगाकडे बघायची खिडकी म्हणूनच पाहिली. यात त्यांनी घेतलेल्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती, दंगलींची वार्तांकनं, शोध पत्रकारिता, नेहरू फेलोशिपच्या निमित्ताने देशा-परदेशात केलेली गुन्हेगारी जगतातील पायपीट, अनेक लोकचळवळींमध्ये स्वतःहून जाणं आणि त्या समजून घेणं, सतत लोकांना भेटत राहणं, त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांचं चिकाटीने एेकत राहणं, आपल्या समकालीनांकडे पाठ फिरवून कला जगता येणाऱ्या लेखक-कलावंतांच्या दर नव्या [पिढीशी संवाद साधत राहणं, सभोवतालच्या सांस्कृतिक घडामोडींविषयी सजग आणि चिकित्सक असणं अशा गोष्टींमुळे त्यांचं लेखकपण आणि माणूसपण सदैव ताजंतवानं राहिलं. त्यांची जगण्याकडे-माणसांकडे, माणसांच्या वर्तनाकडे बघण्याची दृष्टी अतिशय वेगळी आणि आपल्या अनुभवातून कमावलेली होती. त्यातून ते ज्या निष्कर्षापाशी येत ते समाजाला धक्कादायक वाटत. कारण समाज त्याच्या संस्कारित नजरेतून आपल्या जीवन धारणा बनवून जगाकडे बघतो. पण तेंडुलकर हे ‘सुसंस्कार’ या तथाकथित गोष्टीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांची पाटी कोरी असे. मग त्यांना वास्तवाचे उलटसुलट पडलेले पेच दिसत आणि ह्या प्रखर वास्तवाला तोंड देत त्यात तगून राहण्यासाठी माणसांनी केलेल्या धडपडी, तडजोडी, वेडीवाकडी वर्तनं ते समजून घेत. म्हणूनच बेस्ट बेकरी हत्याकांडात आपल्या डोळ्यासमोर आपल्या कुटुंबाची हत्या होताना पाहणाऱ्या झहिरा शेखने कोर्टात साक्ष फिरवल्यावर अनेकांना जबर धक्का बसला तरी तेंडुलकर “मी झहिराला समजू शकतो. मला तिला भेटायचं आहे,” असं म्हणाले होते. माणसांबद्दल त्यांना अपार कुतूहल होतं. इतकं कुतूहल आज माझ्यापाशी, माझ्या पिढीपाशी आहे का, हा प्रश्न मला अस्वस्थ करतो..

तेंडुलकरांनी आपल्या समकालीन लेखकांशी काहिसं फटकून राहणं पसंत केलं असलं तरी दि. बा. मोकाशी, विद्याधर पुंडलिक, म. वा. धोंड, शिरीष पै हे त्यांचे प्रिय लेखक होते. भाऊ पाध्ये त्यांना खूप जवळचे वाटत. भाऊ हा थोर समाजशास्त्रज्ञ आहे, त्याला जसा समाज कळला तसा कुणाला कळलेला नाही असं ते म्हणत. भाऊंवर अत्रेंनी अश्लिलतेच्या आरोपाखाली टीका केली तेव्हा संपूर्ण साहित्यसृष्टी, समाज एका बाजूला होता आणि भाऊंच्या बाजूने फक्त दुर्गा भागवत, तेंडुलकर आणि दिलीप चित्रे तिघंच होते. तेंडुलकरांनी चाकोरीबाहेरचं जग कुणाचाही मुलाहिजा न राखता बेडरपणे दाखवणाऱ्या लेखकांचा पक्ष नेहमीच घेतला. त्यांनी बाबूराव बागुलांच्या कथांना उचलून धरलं. नामदेव ढसाळांच्या ‘गोलपीठा’ला प्रस्तावना देण्याआधी नामदेवबरोबर हिंडून ते जग, त्याचं एक्सप्रेशन समजून घेतलं. चिं. त्र्यं. खानोलकरांना रंगायनमध्ये घेऊन जाणारे आणि त्यांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नंतर बहुचर्चित ठरलेल्या नाटकाचं तिथे पहिल्यांदा वाचन करणारेही तेंडुलकरच होते.

अर्थात तेंडुलकरांच्या स्वभावामध्ये अनेक आंर्तविरोधही होते. मानवी गुणदोषांपासून कोण मुक्त राहिला आहे. तेंडुलकरांना गाडगीळ, गोखले, भावे यांच्याबद्दल आस्था वाटत नव्हती, असा एक निष्कर्ष मी काढला होता. गंगाधर गाडगीळांनी तर त्यांच्यावर ‘आजकालचे साहित्यिक ’ ह्या पुस्तकामध्ये प्रछन्न टीके केली होती. ह्या टीकेतून जी. ए. कुलकर्णी आणि चिं. त्र्यं. खानोलकरही सुटले नव्हते. तेंडुलकरांना सुनीताबाई देशपांडे यांच्या लिखाणाविषयी, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी कौतुक वाटत असे. पण पुलंविषयी ते प्रतिकूल मतच देत. अनेकदा ते योग्यच असे. पण कधी कधी मला वाटे यात पूर्वीची दुखरी असूया तर नसेल ना. जयवंत दळवींनी ‘लग्नं’ हे नाटक लिहिलं, त्यातलं लेखकाचं जे मध्यवर्ती पात्र आहे ते दळवींनी तेंडुलकरांना समोर ठेवून लिहिलं आहे, असा अनेकांचा कयास आहे. (गंमत म्हणजे तेंडुलकरांच्या सदैव प्रेमात असलेले ‘सखाराम बाइंडर’चे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनीच ‘लग्नं’ही दिग्दर्शित केलं.) पण ते जर खरं असेल तर दळवींनी हे पात्र अत्यंत दूषित बुद्धीने रंगवलेलं आहे, असं म्हणालयला हवं. तेंडुलकरांनी यावर कधी भाष्य केलं नाही. ते स्वतःच्या कलाकृतीवरही सहसा भाष्य करीत नसत. मात्र तेंडुलकरांचे दळवींबद्दल मत बरं नव्हतं. तेंडुलकरांना ‘पद्मश्री’ मिळाली तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावर लेख लिहून टीका केली होती. बहुतेक आणीबाणीनंतरचा तो काळ असावा. तेंडुलकर म्हणाले होते या सन्मानाचा मी शस्त्रासारखा वापर करीन. त्यावर दळवींनी लिहिलं होतं, “तेंडुलकर पद्मश्रीची सुरळी करून लढणार आहेत का ?” पण या सन्मानामुळे तेंडुलकरांनी सत्तेचं मिंधेपण पत्करलं, असं कधीही दिसून आलं नाही. अशीच गोष्ट शरद पवारांनी दिलेल्या रमण्याबद्दल झाली. पवारांनी तीनशे लेखकांना एक लाख रुपये वाटले. दुर्गा भागवत वगळता पु. ल. देशपांडेंसह साऱ्यांनी ते घेतले. त्यावर चहुबाजूंनी टीका झाली. तेंडुलकर म्हणाले, मला जगण्यासाठी पैसे लागतात. मी घेणार. त्यावर एका संपादकाने ‘प्रेषितांचे पायही मातीचे असतात,’ अशी टीका केली. त्यावर तेंडुलकरांनी ‘मग संपादकाचे पाय काय धातूचे असतात?’ असं उत्तर दिलं होतं.

जगण्यासाठी माणसाने काय वाट्टेल ते करावं अगदी चोरीसुद्धा करावी, असं तेंडुलकर म्हणत. अनैतिक होणं ही माणसाची गरज आहे, असं म्हणणारे तेंडुलकर हे एकमेव लेखक मी पाहिले आहेत. जगताना मी मोह टाळले नाहीत, असं खुलेपणाने ते सांगत. सेक्स आणि हिंसा ह्या माणसाच्या आतच आहेत आणि त्या त्याच्या गरजा आहेत. त्या काढून टाकता येणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ‘सखाराम बाइंडर’ आणि ‘बेबी’ ह्या नाटकांतून घडवलेलं वासनेचं उग्र दर्शन मी तसं त्यानंतर कुठल्याही नाटकांतून पाहिलं नाही. ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’ प्रमाणे त्यांच्या या नाटकांवरही टीका झाली. ह्या सर्व टीकांना सामोरे जाणारे तेंडुलकर एकदोनदा गडबडले असं मला वाटतं. ‘घाशीराम कोतवाल’च्या विरोधात नाना फडणवीसाच्या बदनामीचा आरोप ठेवून उडवलेल्या गदारोळाला उत्तर देताना तेंडुलकरांनी “हे अनैतिहासिक नाटक आहे,” असं म्हटलं आणि ह्या गोलमाल विधानाने आणखी टीका ओढावून घेतली. वास्तविक त्यांनी हे माझं इतिहासाचं इंटिप्रिटेशन आहे, असं म्हणालयला पाहिजे होतं. पण कदाचित शिवसेनेवरचं राजकीय रुपक रचताना यातल्या इतिहासाच्या मुद्द्यावर आपल्यावर टीका होईल, हे त्यांनी गृहितच धरलं नसावं आणि आकस्मित हल्ल्याने ते गडबडून गेले असावेत. वस्तूतः टीकाकारांपाशी नाना फडणवीसाच्या शुद्ध चारित्र्याचा कोणताच पुरावा नव्हता. उलट नंतरच्या काळात नानाचं अधिकृत आत्मचरित्रच प्रकाशित झालं ज्यात नाना फडणवीसाने आपल्या काबूत न येणाऱ्या स्वतःच्या कामजीवनाची कबुली दिली आहे. इथे मला फ्रेंच नाटककार ज्याँ अनुई याच्या ‘बेकेट’ या गाजलेल्या नाटकाचं उदाहरणं आठवतं. या नाटकात राजा हेन्री आणि त्याच्याच कृपेने कँटबरीच्या धर्मपीठाचा प्रमुख झालेला त्याचा मित्र बेकेट यांच्याचला संघर्ष रंगवला आहे. त्यात शेवटी राजा बेकेटचा खून करवतो. ह्या संघर्षातला नॉर्मन सत्ताधीश आणि सॅक्सन वंशाची प्रजा यांच्यातल्या दुहीची पार्श्वभूमी आहे. अनुईने दाखवलेला बेकेट हा सॅक्सन आहे. पण ती गोष्ट चुकीची असल्याचं एेतिहासिक सत्य समोर आलं. तेव्हा नाटकाच्या संहितेत ही चूक सुधारावी असा आग्रह धरला गेला. पण अनुईने त्यास साफ नकार दिला. तो म्हणाला, “मी नाटककार आहे. इतिहासकार नाही.माझ्या समोर आलेल्या इतिहासातूनच प्रेरणा घेऊन मी नाटक लिहिलं आहे.” अशी भूमिका तेंडुलकरांनी घेतली असती तर हेही त्यांच्या वेगळेपणाचं उहाहरण ठरलं असतं. अर्थात हे माझं नंतरचं आणि खूप काळ उलटून गेल्या नंतरचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात पुढ्यात ठाकणारी परिस्थिती वेगळी असू शकते.

‘गहराई’ सिनेमाच्या वेळी मग तेंडुलकरांनी ही आपली व्यावसायिक गरज असल्याचं सांगून टाकायला हवं होतं. ते काही अंधक्षद्धेचे समर्थक नव्हते. पण म्हणून त्यांनी भुताखेताचे सिनेमे लिहू नयेत, असं कुठेय? अनेक पुरोगामी विचारवंत म्हणवणारे पोटापाण्यासाठी तडजोडी करतातच आणि तेंडुलकर हे पूर्णवेळ लेखनावर पोट असणारे लेखक होते. पण यावेळी ते स्वानुभवाचे दाखले देत राहिले आणि आणखीन फसले. असो.

तेंडुलकरांच्या जवळपास प्रत्येक कलाकृतीची दखल घेतली गेली. परंतु त्यांनी अखेरच्या काळात लिहिलेल्या ‘कादंबरी दोन’ ची मात्र कोणी दखल घेतली नाही, याची मला खंत वाटते. त्याआधीची ‘कादंबरी एक’ पडली होती. त्यामुळे वाचकांनी आणि समीक्षकांनीही तेंडुलकरांच्या कादंबरीच्या वाट्याला जायचं नाही, असं जवळपास ठरवून टाकलं होतं. तेंडुलकरांनी या कादंबऱ्यांना अशी सपक शीर्षक का द्यावीत, याचं मला कोडं कधीच उलगडलं नाही. ह्या शीर्षकांमुळे या कादंबऱ्या बिनचेहऱ्याच्या राहिल्या. तशी ‘कादंबरी एक’ ही दुर्लक्षणीय नव्हती. पण ‘कादंबरी दोन’ अचाट आहे. यात तेंडुलकरांनी आपल्या लेखकीय क्षमता पूर्ण पणाला लावल्या आहेत. मराठीतील ही एक सणसणीत कादंबरी आहे आणि माझ्या दृष्टीने ती श्रेष्ठतेच्या कसोटीवर टीकणारी आहे. अतिवास्तववादाचा कलात्मक वापर करीत दंतकथा, लोककथा, मिथककथा, निरुपण, आख्यान, रिपोर्ताज असा वेगवेगळ्या साहित्यबंघांचा वापर करत रचत नेलेली ही कादंबरी म्हणजे भारतीय राजकारणावरचं प्रखर भाष्य आहे. हा एक असा आरसा आहे ज्यात वर्तमान राजकारणाचं, राजकारण्यांच्या शैलीचं प्रतिबिबब लख्खं दिसतं. एक आटपाट नगरात उंदीर माजले आहेत. दहशत गाजवू लागले आहेत आणि माणसं उंदरासारखी सरपटत चालू लागली आहेत. भयाच्या सावटाखाली जगत आहेत. अशा नगरात एका कोवळ्या मुलीवर बलात्कर करून तिचा निर्घृण खून केला जातो, इथून सुरू हेणारी कथी असंख्य अकल्पित वळणं घेत जाते आणि मती गुंग करते. नगरातल्या काही माणसांना शेपूट फुटते आणि ते हनुमान मंदिरात शपथ घेऊन ‘उत्क्रांतीवादी पुच्छ सेने’ची स्थापना करतात. त्रिशुलासारखी पाती असलेली शस्त्रं मिरवत धिंगाणा घालतात. हे चित्रण बारा वर्षांपूर्वी जेव्हा ही कादंबरी लिहिली तेव्हापेक्षा आज जास्त खरं आहे. तेंडुलकरांच्या साहित्यावर आज बोलायचं नाही, असं ठरवूनही या ‘कादंबरी दोन’ विषयी चार शब्द लिहावेसे वाटले ते मराठी वाचकांकडून झालेल्या तिच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे. या कादंबरीवर खूप लिहिलं, बोललं जायला हवं. मूळात ती वाचली जायला हवी.

अखेरच्या काळात तेंडुलकर एक महत्त्वाचं लेखन करत होते त्यांच्या काळाविषयी. एकदा मला त्यांचा फोन आला. म्हणाले, “काय करतोयस ? मी काहीतरी लिहिलंय. जे वाचून तुझं मत देशील का? ” मी हो म्हणालो आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला एक वही दिली. तीच ‘माझा काळ’ या नावाने पुस्तक रुपाने त्यांच्या निधनानंतर राजहंसने प्रकाशित केली. तेंडुलकरांना शेवटच्या आजारपणात फार लिहिता आलं नाही. त्यांचं लेखन त्यांच्या पौगंडावस्थेच्या काळापर्यंतच येऊन थांबलं. त्या दरम्यान पुढच्या काळामध्ये त्यांना काही संदर्भ हवे होते, ते त्यांना मी टाइम्सच्या संदर्भ ग्रंथालयातून देत असे. तर त्यांनी मला दिलेल्या वहीतला मजकूर इंटरेस्टिंग होता. पण मला सर्वात इंटरेस्टिंग वाटलेली गोष्ट म्हणजे या लेखनाची सुरुवातच त्यांनी “मोदींना गोळी घालीन” असं विधान केलं होतं त्या गावातल्या गप्पांच्या कार्यक्रमाच्या प्रकरणापासून आहे. हे प्रकरण प्रकाशकांनी पुस्तकातून वगळलं आहे. ते पुढच्या मजकूराशी संबंध राखणारं नव्हतं. म्हणूनही गाळलं असेल. पण तेंडुलकरांनी त्या घटनेपासून प्रारंभ करून मागे जात पुन्हा आपला काळ वर्तमानाच्या त्या बिंदूपाशी आणून ठेवायचा असावा. हे प्रकरण प्रलक्षित राहू नये म्हणून मी नंतर ते प्रकाशकांकडून मागवून घेऊन महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात छापलं. यात तेंडुलकरांनी चित्रमय शैलीत सगळा वृत्तांत कथन केला आहे. यात त्यांनी आपली भूमिका हिंसेचं समर्थन करणारी नाही, असं स्पष्ट म्हटलं. तो त्या क्षणाचा उद्वेग होता पण तोही खरा होता, असंही म्हटलंय. कोकणातल्या त्या गावात एका मुलीने तो प्रश्न विचारणं काही लोकांनी त्या उत्तरावर नजर ठेवणं, उत्तरानंतर त्वरेनं हालचाली करणं या योजनाबद्ध गोष्टी असाव्यात तशा घडत गेल्याचं त्या लेखात तेंडुलकर म्हणतात.

हे सगळं एक मोठं वादळ उटून गेल्यावर नितळपणे बघणं, त्याविषयी बोलणं आणि काळाच्या एका मोठ्या टापूत त्याचं परीक्षण करणं ह्यासाठी लागणारी व्यापक दृष्टी तेंडुलकरांपाशी होती. आपलं मत हे निर्णायक आहे, असं त्यांनी कधीच मानलं नाही. मी बोलतो कारण बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही, असं ते म्हणत आले आणि पुनःपुन्हा बोलत राहिले. त्यातून पुनःपुन्हा वावटळ उठत राहिली. धुरळा उडत राहिला. एक म्हातारा लेखक उगाच बडबडतो आहे, असं म्हणून समाजाला त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करता आलं असतं. पण तसं झालं नाही. त्यांच्या विधानांची नेहमीच दखल घेतली गेली आणि त्याचे पडसाद उमटत राहिले. याचं कारण त्यांच्यापाशी एक मोठी नैतिकता होती. लेखकीय नैतिकता. अनेकजण तेंडुलकर दांभिक आहेत, असं म्हणत. पण त्यांनी आपल्या धारणांशी, त्यांच्या मूळाशी असलेल्या नैतिकतेशी कधी विसंगत वर्तन केल्याचं माझ्या तरी अनुभवात नाही. त्यांच्या याच नैतिकतेमुळे त्यांचा दाब निर्माण झाला. भालचंद्र नेमाड्यांचं एक प्रसिद्ध विधान आहे, “आपल्या जुन्या किल्ल्यांमध्ये आणि वास्तूंमध्ये गोल घुमटासारख्या अशा जागा केलेल्या असायच्या जिथून बोललेलं त्या सर्व परिसरात स्पष्टपणे एेकू येई. हा असा एक आश्चर्यकारक बिंदू जिथे पुटपुटलं तरी के सर्व समाजभर मोठ्यानं पडसाद उमटवील अशी जागा नेमकी सापडेपर्यंत तिचा शोध घेत राहणं एवढं लेखक करू शकतो.”

तेंडुलकरांना असा आश्चर्यकारक बिंदू सापडला होता. त्यामुळेच ते बोलले त्याची वाफ झाली नाही. असा एक नैतिक कणा असलेला लेखक/माणूस समाजाला टोचणी लावत असतो. त्याच्या विवेकबुद्धीला प्रश्न करत असतो. इतर लेखकांना विचारप्रवृत्त करत असतो. तेंडुलकरांचे समकालीन लेखक (काही अपवाद वगळता) भोवतालच्या समाज वास्तवाविषयी मूक राहिले. पण आमची पिढी राहिली नाही. माझ्या पिढीतले अनेक लेखक, कवी, कलावंत आज वास्तवाला प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त होत आहेत. यामागे आपली/समाजाची होणारी घुसमट, सर्वंकष सत्तेविरुद्धचा राग या गोष्टी जशा आहेत तशीच विजय तेंडुलकर नावाचा एक लेखक याविरोधात बोलत होता ही बळ देणारी जाणीव देखील आहे. तेंडुलकरांनी आम्हाला बोलायचं, लिहायचं, नाकारायचं बळ दिलं हेचं त्यांचं सर्वात मोठं योगदान. तेंडुलकर नावाचा लेखक आमच्यात होता ही कल्पनाच माझ्यासाठी रोमांसच आहे.

 

लेखक विख्यात नाटककार, कथालेखक व समीक्षक आहेत.

2 Comments

  1. Avantika Nirupama Reply

    This was an amazing lekh. Tendulkar as a whole brought more meaning to many of my day to experiences, and because of that he is a loved one. All life is confusing and people’s interpretations make it even more confusing and at times meaningless. He is one of the few people whose writings gave permission to look at life as is. I felt very lost all my life and now I think I have found the key of why life looks meaningless. If I meet him now, would be delighted to offer it to him.

  2. जयंत सर तुम्ही निर्विवाद थोर आहात

Write A Comment