fbpx
WhatsApp व्हायरल

डोन्ट बी अ सकर!

आज एक क्लीप सोशल मिडियावर वायरल झाली आहे. ती आहे अमेरिकन वातावरणाबद्दल पण मुंबईच्या आणि पर्यायाने भारताच्या राजकीय वातावरणाशी एकदम मिळती जुळती !
“डोन्ट बी अ सकर ” या नावाची ही डॉक्युमेंटरी अमेरिकन वॉर डिपार्टमेंटने १९४३ साली बनविली. दुसऱ्या महायुद्धातून विद्वेषाच्या राजकारणातून उद्भवणारे भीषण परिणाम पाहून अमेरिकन सरकारने आपल्या समाजातील वांशिक द्वेष निपटून काढण्यासाठी जी काही उपाययोजना सुरु केली त्यातील एक प्रयत्न म्हणून ही डॉक्युमेंटरी प्रसृत करण्यात आली होती.

ही अमेरिकन क्लीप या वातावरणाशी मिळती जुळती असण्याचं कारण म्हणजे एक अमेरिकन माणूस भर चौकात येतो आणि जोरजोरात भाषण देऊ लागतो. अमेरिकेला बिन-अमेरिकन लोकांपासून मुक्त करा. तिला निग्रो, परदेशी, कामगार, कॅथलिक असे कोणतेच लोक अमेरिकेमध्ये नको असतात. त्याचं जोशपूर्ण भाषण एेकणारा एक माणूस खूप प्रभावित होतो. पण जेव्हा भाषण करणारा कामगारही या देशात नको, असं म्हणतो तेव्हा मात्र हा माणूस चक्रावतो. कारण तो स्वतः कामगार असतो. मग त्याच्या बाजूला उभा असलेला एक प्राध्यापक त्याला समावून सांगण्याचा प्रयत्न करतो की, जर्मनीमध्ये नाझींनी अशाच प्रकारे वंशवादाला सुरुवात केली होती. ते केवळ अतिरेकी किंवा वेडे नव्हते. तर ती त्यांची विचारपूर्वक केलेली खेळी होती. ते अखंड देशाला जिंकू शकत नव्हते त्यामुळे त्याचे तुकडे तुकडे करून ते देश जिंकू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात द्वेष भरायला सुरुवात केली. हे काम सोपं नसलं तरी त्यांनी खूप मेहनत करून हे काम केलं. माणसं मूळात कोणताही पूर्वग्रह घेऊन जन्माला येत नाहीत. पण काही स्वार्थी माणसं त्यांना या समाजामध्ये पूर्वग्रहदूषित बनवतात कारण त्यांना त्यातून फायदा असतो. पण सामान्य माणसाला त्यातून काहीच मिळत नाही.

हेच भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या मुस्लिम, दलित, ख्रिश्चन द्वेषाविषयी म्हणता येईल. मुस्लिम, ख्रिश्चन परकीय आहेत, ते या देशाचे नागरिक असूच शकत नाहीत, हे वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप लोकांच्या गळी उतरवू पहात आहे. दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या “बंच अॉफ थॉट्स”मध्ये तर त्यांनी जाहीर करून टाकलंय की, मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे.वि दा सावरकर यांनी तर अल्पसंख्यांक हे हिंदू राष्ट्राचा भागच होऊ शकत नाहीत, असं सांगून गेलेत. मूळात मुस्लिम राज्यकर्ते १२ व्या शतकापासून भारतात आहेत. खरंतर त्याही आधीपासून. ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने व्यापारासाठी भारतात प्रवेश मिळवून ब्रिटीश म्हणजे ख्रिश्चन यांनी १०० वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. या दोन्ही राज्यकर्त्यांना भारताचा संपूर्ण धर्म बदलून टाकणं सहज शक्य होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. आजही भारतात बहुसंख्य हिंदूच आहेत. तरीही या दोन धर्मांबद्दल खोटी भीती निर्माण करून कधी लव्ह जिहाद, कधी गोमांस खाल्लं म्हणून मुस्लिमांना तर कधी धर्म परिवर्तन केल्याच्या आरोपावरून ख्रिश्चन पाद्रींना मारलं जातं, धमकावलं जातं. मुस्लिमांना वारंवार आपली देशभक्ती सिद्ध करण्याचं आव्हान केलं जातं. पण मूळात हिंदू म्हणून काय देशभक्ती सिद्ध होते? जातीय-धार्मिक दंगली घडवून लोकांना विभागून ठेवायचं की त्याची परिणती कथुआसारख्या निर्घृण बलात्कार आणि खूनात होते. यातून आपण नक्की काय मिळवणार आहोत? मुसलमान, ख्रिश्चन, दलित जर देशातून गेले तर भारताचे सर्व प्रश्न सुटणार का? सूज्ञांनी याचा विचार करावा.

काहीशी तशीच परिस्थिती या मुंबईची आहे. मुंबई ही देशाचीआर्थिक राजधानी असल्याने तिच्यावर हक्क सांगण्यासाठी जसे सत्ताधारी-श्रीमंत लोक उत्सुक असतात तसेच रोजी रोटी कमावण्यासाठीही गरीबही इथे येत राहतात. पण शिवसेना-मनसे सारखे पक्ष गेली कित्येक वर्षे मुंबई परप्रांतीयांपासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करत आहेत. शिवसेनेने आधी मुंबईतल्या दक्षिण भारतीय लोकांना लक्ष्य केलं आणि मग उत्तर भारतीयांना. मनसेही तोच कित्ती गिरवत सध्या उत्तर भारतीय टॅक्सी-रिक्षा चालक, इस्त्रीवाला, भाजीवाले अशा अनेकांना लक्ष्य करत आहेत. मूळात परप्रांतीयांना इथून हुसकावून लावून मुंबई वाचणार कशी? कारण मुंबई ही केवळ इथल्या चकचकीत दुनियेवर किंवा मराठी माणसावर चालत नाही. त्याच्या मागे असलेल्या कष्ट करणाऱ्या हातांवरही ती चालते. मुंबई ही मूळात इथल्या कामगार वर्गाच्या रक्ताने आणि घामाने बनली आहे. तिच्यावर हक्क सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षांना निश्चित नाही. मराठी माणसाच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी केवळ परप्रांतीयांचा एक बागुलबुवा मराठी लोकांच्या मनात तयार केला आहे. त्यामुळे निवडणुका लढवणं आणि मराठी मतं एकत्र करणं सोपं जातं. पण या राजकीय पक्षांनी नक्की मराठी माणसाला काय दिलं? हे दोन्ही प्रश्न स्वतःला विचारून बघा. उत्तर आपोआप मिळेल.

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment