fbpx
WhatsApp व्हायरल

जॉन लेनन – अ ड्रीम यू ड्रीम टुगेदर

सध्या व्हॉट्सअॅपवर येणारे व्हिडिओ डाऊनलोड करायचे म्हणजे अनेकदा भितीच वाटते. त्यात नक्की काय असेल हे सांगता येत नाही. अनेकदा अश्लील चित्रफिती तरी असतात किंवा एखाद्या समाज विशेषाविषयी द्वेष पसरविणारा एखादा संदेश त्यात असतो. बरे हे भारतातच सुरू असते असे नाही, जगभरात व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर हा याच कारणांसाठी होत असतो. जात, धर्म, प्रांत, लिंग रंग ज्या ज्या म्हणून गोष्टीवरून एखाद्या समाज विशेषाविषयी द्वेष भावना पसरवता येईल, तो समाजमाध्यमांचा वापर करून पसरवला जातो. समाजमाध्यमांचा अशा प्रकारे द्वेष भावना पसरविण्यासाठी धर्मांध वा वंशभेदी व्यक्ती संघटनांकडून वापर केला जात असला तरीही त्याला तितकाच ठाम विरोध याच माध्यमांचा वापर करून जगभरातील समतावादी लोकांकडून हळू हळू सुरू झाला आहे. समतेशिवाय शांतता नांदू शकत नाही आणि प्रेमाशिवाय समता नांदू शकत नाही, इतका साधा, सोपा विचार अत्यंत सर्जनशीलपणे  समाजमाध्यमांवरून मांडला जातो आहे. ही चित्रफित याचे जिवंत उदाहरण आहे.

जगभरातल्या विविध १७ शहरांमधील रस्त्यांवर आपल्या कलेचे सादरीकरण करणाऱ्या १८ विविध संगीततज्ज्ञांनी जॉन लेनन यांचे इमॅजिन या गाण्याचे सादरीकरण या क्लिपमधून ज्या पद्धतीने केले आहे, त्यातून समाजमाध्यमांचा वापर द्वेषभावना पसरविण्याच्या विरोधात वा प्रेम वा समतेचा संदेश पोहोचविण्यासाठी किती कल्पकतेने करता येऊ शकतो, हेच सिद्ध होते.

हे गाणं जॉन लेनन या विख्यात गायक व लेखकाने १९७१ साली लिहिलं होतं. युद्ध विरोधाचा संदेश देणाऱ्या या गाण्यात लेनन सांगतो की धर्माशिवायच्या किंवा देशाशिवायच्या जगाचा विचार करून पाहा. म्हणजे ज्या जगात धर्माच्या नावावरून एकमेकांचा द्वेषच नसेल, देशा देशांमध्ये साधन संपत्तीच्या वाटपावरून युद्ध होणार नाहीत… या जगात भूकही नसेल आणि हावही नसेल…सारे लोक जणू भातृभावाने राहतील…एक तिळ सात जणांत करंडून खातील…असा या गाण्याचा आशय आहे. खरंतर सध्याच्या जाज्ज्वल्य देशप्रेमाचे भरते आलेल्या काळात व धर्माच्या नावावरून आठ वर्षांच्या कोवळ्या बालिकेवर बलात्कार करून मर्दानगी सिद्ध केली जाणाऱ्या काळात हा विचार पुस्तकांतून किंवा भाषणांमधून लोकांपर्यंत नेणे खूप कठिण आहे. पण लेननचे शब्द व संगित त्या गाण्याच्या ठेक्यासोबत कधी अलगद आपल्या हृदयाचा ठाव घेतात हे समजत ही नाही. ही लेननच्या शब्द व सुरांची कमाल जगभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते ती या तंत्रज्ञानाने. ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून धर्मांध फॅसिस्टांनी द्वेष पसरवला व पसरवत आहेत, त्याच तंत्रज्ञानाचा वापर इतका सुंदरही होऊ शकतो, हेच या चित्रफितीचं वैशिष्ट्य आहे.

 

लेनन हा सत्तरच्या दशकात ज्या रॉक बँडने संपूर्ण तरुणाईला वेड लावलं त्या बिटल्सचा जन्मदाता. कामगार वर्गीय कुटुंबात जन्मलेला लेनन बिटल्सच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. १९७०च्या दशकात तो युद्धविरोधी तरुणांच्या चळवळीचा अध्वर्यू बनला. त्याची भांडवली महासत्ता अमेरिकेला इतकी भिती वाटली की निक्सनला त्याच्या निवडणुकीत लेननच्या गाण्यामुळे अडथळे येतील, असं वाटल्याने त्याला अमेरिकेबाहेर काढले. त्याचं गाणं दिवसेंदिवस थेट गरिबांच्या बाजूने व डाव्या विचारांच्या बाजूने झूकत गेलं. अखेर १९८१ साली त्याला गोळी घातली गेली. जे लॉर्काचं झालं, जे दारियो फोचं झालं, जे अवतारसिंग पाशचं झालं, तेच लेननबरोबरही झालं.

या चित्रफितीचे महत्त्व असे की, लेननचं हे गाणं केवळ भौगोलिकदृष्ट्या १७ विविध देश व शहरांमधील संगिततज्ज्ञांच्या सहभागाने बनलेलं नाही. ते सगळेजण वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या धर्म, पंथांचे आहेत. तरीही ते एकच गाणं गात आहेत. लेननचं इमॅजिन..शब्द व सुर यांची ताकद ही सगळी बंधनं तोडण्याइतकी महाप्रचंड असते, याची प्रचिती यापेक्षा वेगळी ती कोणती असू शकते.

या वरील नकाशावरून या एकाच सुराच गाणाऱ्या वाजवणाऱ्यांमधील भौगोलिक, वैविध्याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. वर नकाशात दिसणाऱ्या लाल फुग्यांवर तुम्ही क्लिक केल्यास त्या त्या गायक वा वादकाचा देश व त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते.

गाण्यात पियानो, डबल बास आणि डबल व्हायोलिनचा वापर केला गेला आहे. जबल वायोलिन हे वाजवण्यास अत्यंत कठीण असे वाद्य असून कर्नाटकी संगीत घराण्यातील कलाकार जिंगर शंकर यांनी ते वाजवले आहे. कर्नाटकी संगितातील विणा आणि घटम या वाद्यांचाही या गाण्यात वापर केला असला तरी घटम वाजवला आहे एका जपानी स्त्री कलाकाराने. यात बासरी, तबला, सतार या वाद्यांबरोबरच हार्मोनिका, गिटार आणि ड्रम या पाश्चिमात्य वाद्य यांचाही समावेश आहे. हवाईन युक्‌लेली हे या गाण्यात ब्राझीलीयन कलाकाराने वाजवलं आहे. तसंच अफ्रो क्युबन आणि डॉमिनिकन कोंगावर धरलेल्या ठेका लाजवाब आहे.

भांडवलशाहीला पर्याय नाही, हे सध्या अनेक पुरोगाम्यांचेही आवडते वाक्य आहे. गाण्यातील ओळी या भूमिकेला थेट विरोध करतात

“You may say I’m a dreamer

But I’m not the only one

I hope someday you’ll join us

And the world will be as one”

या चित्रफितीतून १३ देशांमधील १७ शहरांतील २३ कलाकारांनी सादर केलेले इमॅजिन म्हणजे, व्हॉट्सअप, फेसबूक, ट्विटर या समाजमाध्यमांचा केवळ द्वेष द्वेष  आणि द्वेष पसरविण्यासाठी व त्या योगे महाभयंकर हिंसाचार घडविण्यासाठी वापर होत असताना खरंतर जॉन लेननचा एका प्रकारे पुनर्जन्मच म्हणायला हवा. त्याच्या त्या धर्मरहित, देशरहित माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे हा महान संदेश मनुष्य अश्म युगापासून देत आहे व जगाच्या अंतापर्यंत देत राहिल हेच खरे!

 कलाकारांची यादी :

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment