सामाजिक

बाई म्हणजे SEX डॉलच !

“हृदय हे त्याग करू शकतं. तशीच योनीही करू त्याग करू शकते. हृदय हे एखाद्याला माफ करून गोष्टी सुधारू शकतं. ते अनेकांना सामावून घेऊ शकतं. ते काहींना बाहेरही काढू शकतं. तसंच योनीही करू शकते. त्याला (हृदय) आपल्यासाठी दुखतं-खुपतं, ते आपल्यासाठी मोठं होऊ शकतं, मरू शकतं आणि रक्तबंबाळ होऊ शकतं. आणि (योनी) रक्तबंबाळ होऊन आपल्याला या भयंकर, आश्चर्यकारक जगामध्ये आणू शकते.”

इव्ह एनस्लेरच्या “व्हजायना मॉनोलॉग्ज” या नाटकातील ही योनीची सुरुवातीची ओळख. एकदम योग्य. या जगामध्ये माणूस येतो तोच मुळी स्त्री योनीच्या मार्गे. त्याला जगात येण्याचा दुसरा मार्ग नाही. पण जस जसा तो मोठा होत जातो तसा बाई किंवा पुरुष, बनत जातो. आणि पुरुष ज्या मार्गातून आपण आलो आहोत त्याला विसरून जातो. पुरुष कधी कधी इतका क्रूर होतो की, आपल्या जीवनाच्या त्या मार्गालाच उद्ध्वस्त करत सुटतो. गेल्या आठवडाभर माध्यमांमध्ये सुरू असलेल्या आसिफा आणि उन्नाव बलात्काराच्या दोन घटनांनी मन पुन्हा एकदा विषण्ण झालं आहे. अशाच भावना दिल्लीच्या निर्भयाच्या बलात्काराच्यावेळी, नंतर कोपर्डीमधल्या मुलीवर झालेल्या निर्घृण बलात्काराच्या वेळी, मग उन्नाव आणि आता समोर आलेला आसिफा या छोट्याशा मुलीवरचा बलात्कार, प्रत्येक बलात्काराची घटना समोर आली की चीड येते, संताप वाटतो आणि हे कधी थांबणार असा प्रश्न पडत राहतो.

हे पुन्हा पुन्हा होतं. हे कोणाही बरोबर होतं. हे अनेक वर्ष सुरू आहे.  ज्या योनीतून आपण जगात प्रवेश केला त्या योनीला उद्ध्वस्त करून टाकाण्याचं हे सत्र कधीपासून सुरू आहे? स्त्रीवादी लेखिका सुझॅन ब्राऊनमिलर यांच्या मते, “बाईच्या मनात भय उत्पन्न करण्याचं, बलात्कार हे पुरुषासाठी एक शस्त्र झालं. हा शोध पुरुषाला अगदी आदीम काळातच लागला. जेव्हा आग आणि दगडाच्या कुऱ्हाडीचा शोध लागला तेव्हाच.” आता खरोखरचं आदीम काळामध्ये झालेली ही जाणीव आधुनिक काळातही बदलली जात नसेल तर बलात्काराच्या प्रश्नाकडे नक्की कसं बघायचं, कोणी कोणाला काय शिकवायचं आणि कोणी कोणाला धैर्याने घ्यायला सांगायचं? पण एक मात्र खरं की बलात्कार हे प्राण्यांमध्ये होत नाहीत. त्यांचं नर-मादी जवळ येणं हे नवीन प्राणी जन्माला घालण्यासाठी इतकं सरळ असतं. काही चिपँझीसारख्या प्राण्यांमध्ये तर मादी नराला नकारही देऊ शकते. पण माणसांमध्ये हीच प्रक्रिया एवढी सरळ साधी नसते. स्त्री-पुरुषाने एकत्र येणं यात आनंदाचा भागही असतो. सेक्स केवळ नवीन माणूस जन्माला घालण्यासाठी नसतो. तो माणसाला एक आनंद देतो. त्यामुळेच ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. केवळ पुरुषाला जेव्हा लैंगिक आनंद हवा असतो तेव्हा तो मिळवण्यासाठी अनेकदा तो बाईच्या परवानगीची वाट पाहत नाही. तो जबरदस्ती करून, तिच्यावर आपल्या लैंगिक इच्छा लादून पाहिजे ते मिळवतोच. मग त्यातून त्या बाईला कितीही वेदना झाल्या तरी चालतील, हे पुरुषी नियमांनुसार स्वाभाविकतेतच गणलं जातं. समस्या ही बाईवर आपली लैंगिक इच्छा लादण्याची आहे. त्यासाठी त्याला अोळखीची, अनोळखी, लहान-मोठी, म्हातारी अगदी काही महिन्यांची मुलगीही चालते. अशी काय भावना पुरुषाच्या मनात येते, जेणेकरून तो बाईकडे केवळ उपभोगाचीच वस्तू म्हणून बघतो? फक्त योनी दिसणं गरजेचं आहे. सअादत हसन मंटोच्या “ठंडा गोश्त” आणि “खोल दो” या दोन कथा पुरुषातील हीच पाशवी वृत्ती दाखवतात.

ठंडा गोश्तमध्ये फाळणीच्यावेळी झालेल्या दंगलींचा फायदा उठवत पैसे लुटणारा ईश्वरचंद एका मेलेल्या बाईवर बलात्कार करतो. पण जेव्हा ती मेल्याचं त्याला कळतं तेव्हा तो भयंकर अस्वस्थ होतो. आपल्या बायकोबरोबर तो संबंध ठेवू शकत नाही. केवळ मेलेल्या बाईवर बलात्कार केल्याचं कळल्यावर त्यातला माणूस अचानक जागा होतो. मग बलात्कार होणाऱ्या बाईला कसं वाटत असेल? तिच्या काय भावना असतील? दुसऱ्या कथेमध्ये एका मुलीवर वारंवार बलात्कार केला जातो तेव्हा सलवार खोल दो, असं तिला सांगितलं जातं. त्या बलात्काराचा इतका परिणाम तिच्यावर होतो की, पुरुष समोर आला की तिच म्हणू लागते खोल दो. तिचा बाप समोर येतो तेव्हाही ती हेच म्हणते, “खोल दो.” बलात्काराचे मानसिक परिणाम किती खोलवर होतात हेच या कथा सांगतात. यामध्ये खरंतर बाईवर जबरदस्ती करणं आणि पुरुषी अहकांर चुचकारणं हेच केवळ साधलं जातं. त्यात लैंगिक इच्छा किती भागवली जाते माहीत नाही. त्यामुळेच सिमॉन दी बुवा आपल्या “सेकंड सेक्स” पुस्तकात सांगते की, बाईचा पहिला शरीरसंबंध हा बलात्कारासारखाच असतो. तिला आपल्या हळूवारपणे आपल्या शरिराचे लाड करून घेण्याची गरज वाटते तर पुरुषाला तिच्या योनीमार्गात घुसण्यात जास्त रस असतो.

दोन वर्षांपूर्वी लेस्ली उडविनने बीबीसीसाठी “इंडियाज डॉटर्स” म्हणून निर्भया प्रकरणावर एक डॉक्युमेंटरी बनवली होती. ती भारतात प्रसारित करायला अर्थातच भाजप सरकारने नकार दिला. खरंतर या निर्भया प्रकरणाचाही फायदा उठवतच भाजपने तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसला कोंडीत पकडलं होतं. निर्भयावर बलात्कार करणाऱ्यांना तोपर्यंत शिक्षा झाली होती आणि ते तुरुंगातही गेले होते. पण त्या शिक्षेनंतरही त्यांच्या मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता. त्यांना तेव्हाही तसंच वाटतं होतं की, बलात्कार करण्यासाठी मुली, बायका जबाबदार असतात. त्या तोकडे कपडे घालतात, त्या अपरात्री घराबाहेर पडतात. हीच मानसिकता तुरुंगाच्या बाहेर असलेल्या त्यांच्या वकिलांनीही बोलून दाखवली. म्हणजे दोघांमध्ये फरक काहीच नाही. त्यामुळे बलात्काराला शिक्षा कितीही मोठी द्या अगदी फाशीची, पण ही पुरुषी मनोवृत्ती काही बदलत नाही याचं ही डॉक्युमेंटरी उत्तम उदाहरण होती.

भारताच्या पुराणकथा, इतिहास हा अशाच परस्पर आंतर्विरोधांनी बनलेला आहे. बलात्कार मान्यही करतात, गुन्हेगाराला शिक्षाही सुनावतात, पण तो परत होऊ नये म्हणून त्यात काहीच नाही. हिंदूं धर्माच्या अगदी जुन्या पुस्तकांमध्येही बलात्काराविषयी उल्लेख आहेत. वसिष्ठाने म्हटलं आहे की, “ बलात्काराने भोगल्या गेलेल्या वा चोराच्या हाती सापडलेल्या ‘दूषित’ स्त्रीचा त्याग करू नये… ऋतूकालाने ती शुद्ध होते.” अत्रीने म्हटलं आहे की, “म्लेंच्छांनी वा पापी लोकांनी एकदा भोगलेली स्त्री प्राजापत्य नावाच्या प्रायश्चिताने व रजोदर्शनाने शुद्ध होते.” मत्स्यपुराणाने म्हटलं आहे की, “जो मनुष्य जबरदस्तीने परस्त्रीला दूषित करेल, त्याला वध हाच दंड होय. स्त्रीचा काही अपराध नाही.” पण अशा स्त्रीला होणारे अपत्य मात्र दुसऱ्याला द्यावे, असे देवलाने म्हटले आहे. (हिंदू संस्कृती आणि स्त्री- आ. ह. साळुंखे) मासिक पाळीनंतर ती स्त्री शुद्ध होते, असं मानण्याची एक प्रथा होती. पण दोषी पुरुषाचा वध केल्याने इतक्या वर्षांत बलात्कार थांबवलेले नाहीत. वधापेक्षाही भयंकर शिक्षा युरोपमध्ये दिल्या जात होत्या. डोळा फोडणे कारण त्या डोळ्याने त्याने त्या बाईकडे बघितलं आणि त्याचा एक अंडकोष कापणं. काही ठिकाणी ती बाई आणि पुरुष दोघांनाही शिक्षा होत होती तर कधी त्या बाईला आपल्या मर्जीविरोधात त्या बलात्कारी पुरुषाबरोबर लग्नं करावं लागत होतं. म्हणजे सर्व बाजूंनी बाईचं खच्चीकरणच होत होतं. आताही परिस्थिती काही वेगळी नाही. बलात्कारपीडीत महिलेला कोणी स्वीकारत नाही म्हणून तिचं नाव, चेहरा लपवला जातो. तिच्या आयुष्याला कायमचा हा डाग लागतो की, तिचं पुनर्वसन कठीण होऊन बसतं. त्यातून ती बाई गरोदर राहिलं तर गर्भपात करणं किंवा त्या मुलाला जन्म देऊन आयुष्यभर वाढवणं हे किती मानसिक त्रासदायक आहे. ही जखम कधीच भरून येणारी नाही. सरकारी योजना, हेल्पलाईन यांनी फारसा फरक पडलेला नाही. स्त्रीकडे उपभोगाची, मालकीची वस्तू म्हणून बघणं हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत बलात्कार थांबू शकत नाही. तसंच स्वतःची वस्तू नसेल तर दुसऱ्याची वस्तू नष्ट करणं हे अदगी सहज केलं जातं. ही भावना पुरुषांमध्ये येते कुठून? मला वाटतं आपल्याच समाजातून.

पुराण काळापासून अशा कितीतरी सीता, अहिल्या, रेणुका, द्रौपदी, शूर्पणखा यांच्या कितीतरी कथा सांगता येतील ज्यामध्ये पुरुषी वृत्ती डोकावते. अहिल्या ही दिसायला सुंदर होती म्हणून इंद्र तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन आला आणि तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. म्हणून अहिल्येला शाप मिळाला आणि तिचं दगडात रुपांतर झालं. त्या इंद्राला काहीच नाही. बरं तिला पुन्हा माणसांत आणलं कोणी तर स्वतःच्या पत्नीचा संशयावर गरोदरपणी त्याग करणाऱ्या रामाने. रेणुकेने तर केवळ गंधर्वांची कामक्रीडा सहज बघितली होती तर तिच्या मुलाने परशूरामाने बापाच्या सांगण्याने तिचं डोकंच उडवलं. आज परशूरामच हिंदुत्ववाद्यांसाठी आदरस्थानी आहेत. शूर्पणखेने केवळ राम तिला आवडत असल्याचं व्यक्त केल्यामुळे तिचं तर नाक-कान कापून लक्ष्मणाने तिला विद्रूप केलं. ही उदाहरणं एक प्रकारे प्रतीक आहेत पुरुष प्रधान संस्कृतीची. त्यांच्या मनात वर्षानुवर्षे स्त्रीची काय प्रतिमा आहे हे यातून कळतं. हे अद्यापही कायम आहे. अनेक वर्ष स्त्रियांनी दिलेला लढा, स्त्रीमुक्तीच्या चळवळी विशेषतः १९८०च्या दशकामध्ये बलात्काराविरोधात उठवलेला आवाज यांनी समाजामध्ये अनेक बदल घडवून आणले. पण पुरुषी वृत्ती कमी झाली नाही. पुरुषाच्या डोक्यामध्ये असलेला बाई म्हणजे लैंगिक भूक भागवण्यासाठी, हक्क गाजवण्यासाठीची वस्तू ही भावना अद्याप कायम आहे. प्रचंड प्रमाणात समाज प्रबोधन आणि पुरुष जागृतीने कदाचित काही फरक पडू शकतो.

बहमन खोबाडीच्या “टर्टल्स कॅन फ्लाय” या चित्रपटाच्या कथेत तीन लहान भावंडं आहेत, मोठा भाऊ १२-१४ वर्षांचा, बहीण १०-१२ वर्षांची आणि सर्वांत धाकटा दोन-तीन वर्षांचा. अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यावर हे तिघं बहुदा त्यांचे आई-वडील मारले गेले आहेत ते इराक-टर्की बॉर्डरच्या शरणार्थी कॅम्पमध्ये रहायला येतात. मुलीला त्या लहानग्याबद्दल काहीतरी चीडचीड असते. शेवटी कळतं की, तो लहानगा तिचा भाऊ नाही तर सैनिकांनी केलेल्या सामूहिक बलात्कारामुळे तिला झालेलं मूल आहे. चित्रपट पूर्ण होताना हादरून जायला होतं. सैनिकांनी केलेल्या अत्याचाराच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मूळातच शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी युद्धामध्ये बायका आणि मुलं यांना लक्ष्य केलं जातं. त्यात बायकांवर होणारे बलात्कार तर आपल्याकडे नोंदवलेही जात नाहीत. सुझॅन ब्राऊनमिलरच्या “अगेन्स्ट अवर विल” या पुस्तकामध्ये युद्धात झालेल्या बलात्कारावर एक संपूर्ण प्रकरण आहे. त्यात पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैनिकांनी बायकांवर कसे अतोनात अत्याचार केले त्याच्या कहाण्या अंगावर शहारे आणतात. युद्धाच्या काळात एखाद्या सैनिकाला सिफिलीस झाला असेल तर त्याला एखाद्या बाईशी शरीरसंबंध ठेवण्यात मनाई करण्यात आली होती अगदी वेश्येशीही नाही. कारण वेश्येच्या माध्यमातून हा रोग इतर सैनिकांमध्ये पसरू शकतो. पण हे सैनिक तरीही वेश्यांशी संबंध ठेवायचे आणि त्यांचं एक स्तन कापून टाकायचे कारण पुढच्या सैनिकाला कळलं पाहिजे की या वेश्येला सिफिलिसची लागण झालेली असू शकते. या पुस्तकामध्ये पाकिस्तानच्या झालेल्या फाळणीच्यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी बंगाली बायकांवर केलेल्या बलात्काराचा सविस्तर उल्लेख आहे. एखाद्या गावात घुसून तिथल्या बाईवर सामूहिक बलात्कार ही गोष्ट सर्रास सुरू होती. त्यानंतर त्यातील बहुतेक बायकांना पुन्हा मूळ घराचा आसरा मिळाला नाही. त्यावेळी बांगलादेशमध्ये गर्भपाताची फारशी चांगली सोय नसल्याने ज्यांना शक्य होतं ते कलकत्त्यामध्ये बायकांना गर्भपाताला पाठवायचे. पण बहुसंख्य बायकांनी घरगुती उपायांनीच गर्भपात करवून घेतले आणि त्यात अनेकींचा जीव गेला. बांग्लादेश तत्कालीन राष्ट्रपती मुजुबूर रेहमान यांनी या बलात्कारित स्त्रीयांच्या पुनर्वसनासाठी त्यांना “युद्धातील हिरो” असंही म्हणून पाहिलं. पण समाजाने त्यांना स्वीकारलं नाही. दंगलींमध्येही काही वेगळे प्रकार घडत नाहीत. भारतामध्ये हिंदू-मुस्लिम दंगली जास्त होत असल्याने अल्पसंख्यांक समाजाच्या स्त्रीया-मुलं ही पहिलं लक्ष्य ठरतात. गुजरातच्या दंगली असो किंवा मुझफ्फरनगरच्या बायका क्रूरतेतून सुटत नाहीत. नवरा, वडिल किंवा घरच्यांच्या पुढ्यात बलात्कार करणं असे अनेक विकृत मार्ग दंगली, युद्धामध्ये अवलंबले जातात. पण त्यावर कोणीही बोलायला तयार नसतं.

शत्रूपक्षातील बायकांवर बलात्कार करा, हा अत्यंत विकृत दृष्टीकोन अनेक ठिकाणी आढळतो. आज ज्यांना भारतरत्न द्या म्हणून मागणी होत आहे ते वि. दा. सावरकर यांनी आपल्या “सहा सोनेरी पानं” मध्ये हेच लिहून ठेवलं आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराला युद्धात हरवल्यावर त्याच्या सूनेला सैनिकांनी पकडून आणलं. त्या बाईला शिवाजी महाराजांनी सन्मानाने परत पाठवलं. चिमाजी अप्पाने सुद्धा एका पोर्तुगीज गर्व्हनरच्या बायकोला असचं परत पाठवलं. सावकरांना ही कृती “सद्गगुण विकृती” वाटते. जेव्हा शिवाजी महाराज, चिमाजी अप्पा यांनी हे केलं तेव्हा त्यांना गझनीचा महंम्मद, महंम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी यांनी हजारो हिंदू स्त्रीया आणि मुलींवर केलेले बलात्कार, विनयभंग अत्याचार लक्षात घ्यायला हवे होते, असं म्हणून सावरकर या दोघांनी त्या दोन शत्रूंच्या बायकांवर बलात्कार करायला हवे होते, असंच सांगतात. एकीकडे शिवाजी महाराजांसारखा माणूस परकीय बाईबद्दल आदर व्यक्त करत असताना त्यांच्या खूप नंतरच्या काळात जन्माला आलेला माणूस मात्र पुरुषी अहंकारच बाळगून जगतो हे कशाचं द्योतक मानायचं? अशा या सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी करणाऱ्यांनी बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणं केवळ दांभिकपणाचे लक्षण आहे.

दुर्देवाने याच विचाराचा वारसा आजचे हिंदुत्ववादी चालवतात आणि दुसरीकडे विकासाच्या नावाने बिनधास्त थापा मारतात. भाजप आमदार सुरेंद्र सिंग उन्नाव बलात्काराविषयी म्हणतात, “तीन मुलं असलेल्या बाईवर कोणीही बलात्कार करू शकत नाही…’’ म्हणजे मुलं जन्माला घातलेली योनी ही फारशी उपभोग्य नाही, त्यामुळे ती जबरदस्तीने कशाला कोण मिळविल, असा हा विचार. पोलीस सेवेत काम केलेले आणि सध्या मानवी विकास मंत्री असलेले सत्यपाल सिंग म्हणतात, “असे आरोप अनेकदा खोटे असतात.” पण खरा निघाला तर काय करणार. काश्मिरमधील भाजप मंत्री दर प्रकाश गंगा यांना बलात्कार म्हणजे हाताला खरचटण्याएवढं साधं वाटतं. “या घटना होतच असतात”, ही प्रतिक्रिया त्यांनी कथुआनंतर दिली. बरं बायकांना तर परिस्थितीचं भान हवं. भाजप खासदार मिनाक्षी लेखी म्हणतात की, “घटनेला अति प्रसिद्धी देऊ नका.”

पण ही वृत्ती इथे थांबत नाही. मराठीतील प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे यांच्या “गवारीची भाजी आणि आस्था” या कथेमध्ये एक वाक्य आहे, “when the rape is inevitable, just lie down and enjoy it.” या लेखिका मराठीतील बोल्ड समजल्या जातात. आपल्याकडील स्त्री लेखिकांच्या बोल्डनेसची पातळी काही सन्मानीय अपवाद वगळता काय हे यावरून लक्षात यायला हरकत नाही.

नन्स, वेश्या यांच्यावरही बलात्कार होऊ शकतो लग्नाअंतर्गतही बलात्कार होतो याला अलीकडे मान्यता मिळू लागली आहे. “आमेन” पुस्तक लिहून सिस्टर जेस्मीने चर्चमध्ये नन्सचं, सिस्टर्सचं होणारं लैंगिक शोषण उघडपणे मांडलं. हिंदू धर्मामध्येही देवाला वाहिलेल्या बायका या पुरुषांच्या उपभोगासाठीच असतात. तर इस्लामध्ये असलेल्या अशाच लैंगिक शोषणावर तहमिना दुर्रानी यांनी “ब्लास्फेमी” नावाचं पुस्तक लिहिलं आहे. अनेकदा बलात्कारासारख्या गुन्ह्यांना सौदी अरेबियातील मध्ययुगीन शिक्षांचा उपाय सुचवला जातो. मात्र शरिया कायद्यानुसार बलात्कार सिद्ध करण्यासाठी त्याचे प्रत्यक्षदर्शी चार साक्षीदार उभे करावे लागतात. अन्यथा त्या स्त्रीवरच अनाचाराचा आरोप सिद्ध होऊन तिला दगडानी ठेचून मारण्याची शिक्षा आहे. हे आलं त्यामागे स्वतः महंमद पैगंबर यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना कारणीभूत आहे.  पैगंबरांच्या पत्नी आयेशा या त्यांच्यासोबत एका दौऱ्यावर गेल्या होत्या. परतत असताना हा सगळा काफिला वाटेत थांबला. पुन्हा प्रवास सुरू होतानाच नेमका आयेशा यांच्या गळ्यातील एक हार तुटला व त्यातील मणी खाली पडले. त्या ते मणी गोळा करताना काफिला निघून गेला. त्यामुळे त्या मागे एकट्याच राहिल्या. काही वेळाने मागून एक पैगंबरांचा सैनिक येत होता. त्याने आयेशा यांना पाहिले व त्यांना तो परत मदिन्याला घेऊन आला. मात्र त्यानंतर मदिन्याच्या लोकांमध्ये आयेशा आणि त्या सैनिकाबाबत कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज महंमद यांच्या कानावर पडताच ते व्यथित झाले व त्यांनी आयेशा यांना त्यांच्या माहेरी पाठवून दिले. मात्र त्यामुळे आयेशा प्रचंड उद्विग्न झाल्या. अखेर पैगंबरांवर कुराणाच्या काही ऋचा अवतरल्या व त्याने आयेशा या शुद्ध पाक असल्याची ग्वाही दिली. तसंच कुणावरही हे आरोप करताना त्यात चार साक्षीदार असल्याशिवाय करू नये, असं सांगितलं. आता प्रभूरामांनी सितामाईंसोबत जे केलं त्याच्याशीच बरीच मिळती जुळती ही कथा आहे. बाईवर कायम संशय व्यक्त करणाऱ्या समाजावर स्वतःच्या पत्नीपेक्षा बहुतांश पतींचा विश्वास का बसतो या प्रश्नाची उकल वर्षानु वर्षे होतच नाही. पुन्हा साक्षीदारांचा मुद्दा ज्या संदर्भात उपस्थित झाला आहे. त्याचे संदर्भ पार बदलून शरियामध्ये थेट बलात्काराला चार साक्षीदारांची अट कशी आली हे जगभरातील कायदे बनविणारे हे पुरुष किंवा पुरुषी मानसिककतेचेच बळी असतात हे समजून घेतल्याशिवाय समजणार नाही.

भारतासारख्या देशात तर बलात्कारामागे जातीय नेणिवांचाही विचार करावा लागतो. दलित, आदिवासी बायकांवर होणारे बलात्कार नोंदवलेही जात नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाल्याच्या घटना आहेत पण त्यांना दाद कोण देणार. मुंबईसारख्या शहरात दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्टीमध्ये बायकांवर बलात्कार होतात त्याची तर गणतीच नसते. त्यांना न्याय मिळण्याची गोष्ट तर दूरच राहिली. बॉलिवूड कलाकार शायनी अहुजाने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला तर संपूर्ण बॉलिवूड त्याच्या मागे धावून आलं. पण त्या मोलकरणीच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही. काश्मिरमध्ये किंवा ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सैनिक करत असलेले बलात्कार अनेकांना मान्यच होत नाहीत. केवळ भारतमाता की जयचे नारे देत सर्वजण सैनिकांना डोक्यावर घेतात. बाई जितकी गरीब आणि मागास समाजाची तितकी तिला न्याय मिळण्याची प्रक्रिया प्रचंड धीम्या गतीने होते. अनेक जणी तर घरच्यांचा पाठिंबा नाही म्हणून किंवा गुन्हेगार श्रीमंत-उच्च जातीचा असेल तर दबावामुळे तक्रारी अर्धवट सोडतात. सध्या चर्चेत असलेल्या आसिफा बलात्कार आणि खून प्रकरणामध्येही भटक्या-विमुक्त गुज्जर समाजाच्या या मुलीला मरणानंतरही न्याय मिळेल, अशी तिच्या आईवडिलांची अपेक्षा नाही. त्यामुळे ते कारगिलच्या डोंगरामध्ये परत रहायला गेले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी अनाथ, परित्यक्ता स्त्रियांसाठी आश्रम चालवला होता. त्यात अनेक स्त्रिया या ब्राह्मण जातीच्या होत्या. त्यांना विधवा असताना गरोदर राहिली म्हणून तोंड दाखवायला जागा नव्हती. हा लैंगिक अत्याचाराचाच प्रकार होता. फुले दांपत्याने या बायकांना आसरा दिला होता. नाहीतर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

बलात्कार ही घटना केवळ शारिरीक इजा करून थांबत नाही त्यानंतर त्याचे त्या बाईवर, तिच्या घरावर, तिच्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो. समाज ज्या पद्धतीने तिला वाळीत टाकतो त्यानंतर रोजचं जगणं हे तिच्यासाठी मुश्किल होतं. सहानुभूतीसाठी अनेक जण येतात. मात्र तिच्याशी लग्नासाठी अभवानेच कुणी तयार होतो. किती जण तिला आपली नातेवाईक, मैत्रिण म्हणवून घ्यायला तयार असतात, किती जण तिला काम-नोकरी देतात, बलात्कार झाल्यावर कँडल मार्च, निषेधाच्या घोषणा देणं चांगलंच आहे. पण हे तात्पुरते उपाय झाले. मात्र यामागील पुरुषी मानसिकतेच्या मुळाला आळा घातला जात नाही तोवर बलात्कार झाल्यानंतर केवळ निषेध व्यक्त करत राहणंच आपल्या हातात राहील.

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत

1 Comment

  1. ashok shinde Reply

    भयानक आहे हें सगळंच जगाचा कुठलाही कोपरा आणि कुठलाही मोठा व्यक्ती ह्याला बदलवू शकलेला नाही..

Write A Comment