fbpx
राजकारण सामाजिक

कथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव

आठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील एका मुलीवर बलात्कार करण्याचं ते कारस्थान होतं. बहुसंख्य हिंदूंच्या भागातून गुज्जर आणि बाकेरवाल समाजाच्या या भटक्या विमुक्त लोकांना कायमचं हाकलून देण्याचा हा डाव होता.

या घटनेनंतर काश्मिरमधून वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या प्रतिक्रियाही हेच सांगतात. “भटक्या विमुक्त जमातीला त्यांच्या जमिनीवरून हाकलून देण्यासाठी हा बलात्कार वापरण्यात आला,” असं या घटनेचं पहिल्यांदा वार्तांकन करणारे टीव्ही पत्रकार मुफ्ती इस्लाह यांचं म्हणणं होतं. (Source:https://www.news18.com/news/india/8-year-olds-rape-and-murder-in-kathua-was-plotted-for-months-1717097.html?ref=hp_top_pos_3) .

त्याशिवाय या बलात्काराचा वापर करून कथुआ मधल्या मुस्लिम समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याचा डावही उजव्या हिंदू आणि कडव्या राष्ट्रवादी संघटनांनी खेळला आहे. धर्माच्या नावावर काश्मीर खोरं आणि जम्मू यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे. येत्या निवडणुकांसाठी या दोन भागांना धर्माच्या नावाने विभागून फायदा उचलण्यासाठी हे करण्यात आलं. त्यासाठी संपूर्ण घटना एका विशिष्ट पद्धतीने बघणं गरजेचं आहे.

फारशी प्रसिद्ध नसलेली एक हिंदू एकता मंच म्हणून संघटनेने बलात्काराच्या आरोपींसाठी मोर्चा आयोजित केला. “बलात्कारापेक्षाही भयंकर मोर्चा” म्हणून आउटलूक मासिकाने त्याचं वार्तांकन केलं. (Source: https://www.outlookindia.com/magazine/story/a-rally-worse-than-a-rape/299870).

या बलात्काराचे तपशील खूपच क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला एका दुपारी आसिफा बानो दोन घोड्यांना घेऊन घराबाहेर पडली. पाळलेल्या जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाणं हे तिचं नेहमीचच काम होतं. पण तिला कुठे माहित होतं की, क्रौर्याने बरबटलेली काही माणसंच तिची वाट बघत आहेत. जेव्हा आसिफा संध्याकाळपर्यंत घरी आली नाही तेव्हा तिच्या आईला काळजी वाटू लागली. लगेचच गुज्जर समाजातल्या लोकांनी रात्री तिचा शोध सुरू केला. शेवटी त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आसिफा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यापुढे मात्र या घटनेने अत्यंत घाणेरडं वळण घेतलं.

ज्या पोलिसांवर लोकांच्या रक्षणाची, कायदा-सुव्यवस्था नीट राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती तेच पशू निघाले. त्यातील एक २८ वर्षीय स्पेशल पोलीस ऑफिसर दिपक खजुरिया हा सर्च टीमचा भाग होता. त्यांनी आठवडाभर तिला शोधलं. पण बिचाऱ्या आसिफाच्या कुटुंबाला काय माहित की खजुरिया या बलात्काराच्या कारस्थानाचा एक हिस्सेदार होता. जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात खजुरियावर आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. माजी महसूल अधिकारी संजी राम याच्यावर प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. ही घटना लपवून ठेवण्यामध्ये या ६० वर्षीय आरोपीचा मुख्य हात होता. त्यासाठी त्याने पैसे आणि आपलं वजन वापरलं. संजी राम हा या देवस्थानाचं काम पहायचा. त्याचा भाचा खजुरिया याची बाकेरवाल समाजाबरोबर अनेकदा भांडणं झाली आहेत. या सगळ्यामध्ये पुरावे नष्ट करण्यात आले.

एवढ्यावरच ही घटना थांबत नाही.

पीडीपी-भाजप सरकारमध्ये असलेले भाजपचे दोन मंत्री चौधरी लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा यांनी या सगळ्यात बलात्काराशी संबंधित आरोपींच्या बाजूने उडी मारली. हिंदू एकता मंचने आयोजित केलेल्या बेकायदेशीर मोर्चामध्येही त्यांनी सहभाग घेतला. या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी भारताचा तिरंगाही फडकवण्याची नाटकं यांनी केली. आता तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे. या मंचाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं म्हणून जोरदार मागणी केली कारण त्यांचा जम्मू आणि काश्मिर पोलिसांवर विश्वास नाही. पण हे सगळं होत असताना जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री ज्यांनी कडक कारवाई करून आधीच या दोन मंत्र्यांची हाकालपट्टी करायला हवी होती ते काहीच केलं नाही. जम्मूमधील वकीलांनीही धार्मिकतेच्या मुद्द्यावर अत्यंत कडवी भूमिका घेऊन आसिफाच्या प्रकरणात न्याय मिळण्यात अडथळे निर्माण केले. त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारं चालानच अडवून धरलं. जम्मूच्या बार असोसिएशनने आसिफा बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चालानच्या विरोधात निदर्शनं करून पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचा आरोप उलट पोलिसांवरच केला.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्यांनी सविस्तर आसिफाला देवस्थानात कसं डांबून ठेवलं, तिच्यावर कसा अत्याचार झाला, सामूहिक बलात्कार झाला, तिला गळा आवळून कसं मारण्यात आलं त्यानंतरही तिचं डोकं दगडाने ठेचण्यात आल्याचं सविस्तर वर्ण केलं आहे.

दुर्दैवाने जम्मूमधील माध्यमांनी या प्रकरणाकडे मनात पूर्वग्रह ठेवून पाहिलं. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून त्याप्रमाणे त्यावर वार्तांकन करणं गरजेचं होतं. पण तसं होताना दिसलं नाही. अगदी थोडी माध्यमं सोडली तर दिल्ली, नोयडा आणि मुंबईमधल्या मोठ्या मिडीया समूहांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केलं. तीन महिने माध्यमांनी या घटनेवर बोलणं टाळलं. खरंतर यातूनच त्यांची वृत्ती दिसून येते आणि या घटनेकडे बघताना केवळ आसिफा एका विशिष्ट समाजातून आली होती म्हणून हे घडलं का, असा प्रश्न पडतो. कदाचित असेलही!

एका बाजूला धार्मिकतेच्या नावाखाली विभाजन होत असताना दुसऱ्या बाजूला सद्सदविवेकबुद्धी जागे असलेले काही नागरिक धर्म, जात विसरून पुढे आले. दीपिका राजवट ज्या आसिफा प्रकरणी वकील आहेत, गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेश कुमार झल्ला ज्यांनी या प्रकरणी तपास केला, टीव्हीवर या विषयाला वाचा फोडणाऱ्या पत्रकार निधी राजदान हे सर्व काश्मिरी पंडीत आहेत. नाझीर मसूदी, मुफ्ती इस्लाह, हकीम इर्फान, नासीर गनाई, समीर यासिर या पत्रकारांनी कोणताही आडपडदा न ठेवता आसिफाच्या प्रकरणी जीव तोडून वार्तांकन केलं. काश्मिरी मुसलमान आणि काश्मिरी पंडीत यांच्या वादावर नेहमी चर्चा होत असली तरी त्याच लोकांनी या प्रकरणामध्ये एकत्र येऊन त्या मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हीच कदाचित या निर्घृण घटनेनंतरची एकमेव सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.

जे लोक आता या प्रकरणी जागे होऊन राजकारण करू पाहत आहेत त्यांना आसिफाला न्याय देण्यात काहीही स्वारास्य नाही. केवळ निवडणुकीच्या आधी गुज्जर आणि बाकेरवाल समाजाची मतं त्यांना मिळवायची आहेत. काश्मिरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करून आणि ती आणखी वाढवण्यात या लोकांची राजकीय पोळी भाजली जाते. आसिफाच्या प्रकरणानंतरही काश्मिरी मुसलमानांविरोधात दुही आणखी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होताच. पण तो फोल गेला. आसिफाविषयी त्यांच्या मनात कोणतंही प्रेम नसून केवळ काश्मिरी मुसलमानांविरोधात राजकारण करण्याचा हा डाव होता.

लेखक हे श्रीनगरस्थित वरिष्ठ पत्रकार आणि विश्लेषक असून जर्मनीच्या डॉच वेल्ले या प्रसारण माध्यमाचे बॉन येथे ते संपादक होते. भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक माध्यमांमध्ये ते मुक्त पत्रकारिता करतात.

3 Comments

  1. Height of cruelty and politics in the name of religion. People have become so ruthless tht they don’t even spare a children. Extremely disturbing.

  2. Khalil girkar Reply

    समर्पक लिखाण.
    चिमुरडीवरीलबलात्कारासारखे नृशंस कृत्य करणाऱ्याला वाचवण्यासाठी धर्माचा, जातीचा, राजकीय पक्षाचा सहारा घेतला जाणे अत्यंत नीच कृत्य आहे. माणूसकी नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही हेच कळेनासे झाले आहे.

  3. Khalil girkar Reply

    समर्पक लिखाण.
    चिमुरडीवरीलबलात्कारासारखे नृशंस कृत्य करणाऱ्याला वाचवण्यासाठी धर्माचा, जातीचा, राजकीय पक्षाचा सहारा घेतला जाणे अत्यंत नीच कृत्य आहे. माणूसकी नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही हेच कळेनासे झाले आहे.
    या मागील सर्व राजकारण व राजकारणाचा अश्लाघ्य प्रकार उत्तमप्रकारे समोर आणला आहे

Write A Comment