fbpx
सामाजिक

कॅमल टो पॅन्टीजच्या निमित्ताने….

अलीकडेच एका “अवर लिप्स आर सिल्ड” नावाच्या उत्पादनाची जाहिरात बघायला मिळाली. याला “कॅमल टो पॅन्टीज” म्हणून ओळखलं जातं कारण उंटाचे खूर ज्या पद्धतीने विभागलेले असतात तशी महिलांसाठीची चड्डी. बघता क्षणी त्याचा अर्थ कळला नाही म्हणून गुगल सर्च केलं, तर गेल्यावर्षीपासून हा ट्रेंड सुरू झाल्याचं समजलं. घट्ट, तोकडे कपडे घालताना योनी मार्गाचा आकार कपड्यांवरून ज्या नैसर्गिक पद्धतीने दुभागलेला दिसतो तो इतरवेळी लपवला जातो. पण आता साध्या कपड्यांमध्येही तो अाकार “कॅमल टो पॅन्टीज ” वापरून बिनधास्त दाखवा, असं ही जाहिरात सांगते. काहींना हे फेमिनिस्टांच्या डोक्यातलं खूळ वाटेल. पण खरं तर हे भांडवली व्यवस्थेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या फॅशन इंडस्ट्रीत जागतिक अर्थव्यवस्था कासवाच्या गतीने चालत असताना त्यात तेजी आणण्यासाठी ग्राहकांच्या गळी उतरवलेलं आणखी एक खूळ! असली खूळं जनमानसात रुजवताना त्याला “ नैसर्गिक“ वगैरे शब्द वापरला की, महिलाही खूश होतात आणि हमखास ती वस्तू विकत घेतात. “कॅमल टो पेन्टीज” ही काही अशी पहिली वस्तू नाही. या आधी स्तन, कुल्ले मोठे दिसण्यासाठी पॅडिंगच्या ब्रेसियर्स आणि चड्ड्याही महिलांमध्ये लोकप्रिय आहेतच. फाटक्या जीन्सनंतर आता चिंधी झालेले बूट हाही एक नवीन ट्रेंड आहे. फाटके कपडे घालणं किंवा वस्तू वापरणं हे गरिबांवर वर्गीय शोषणातून लादलं गेलेलं असतं. फॅशन हा प्रकार भांडवलशाहीचं आवडतं आपत्य आहे. भांडवली उत्पादन संबंधाशी त्याचा थेट संबंध आहे. कामगारांच्या प्रचंड शोषणावर हा उद्योग उभा आहे. घर आणि कामाच्या ठिकाणी मोहक आभासी प्रतिमा निर्माण करण्यासाठी कपडे, केशभूषा, पादत्राणे, पिशव्या आदी सगळ्या वस्तु यात मोडतात. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यंतरी जवळपास हजार पाऊंडाची चामड्याची पँट घातल्यावर त्यावर लेबर पार्टीकडून प्रचंड टिका झाली होती. ज्या पँटला त्यांनी तब्बल १००० पाऊंड मोजले ते बनवणाऱ्या कामगाराला त्या बदल्यात अवघे १.४९ पाऊंडचा मेहनताना मिळाल्याचं लेबर पार्टीने समोर आणलं होतं. फॅशनही अशी समाजाती आहेरे वर्गाने तयार केलेल्या आभासी प्रतिमांवर आधारित असल्याने गरिबांवर लादलेल्या फाटके कपडे व पादत्राणांचीही असली तरी ती प्रत्यक्षात त्यांच्याच शोषणातून केलेली त्यांची क्रूर चेष्टाच म्हणायला हवी.

सातत्याने नवनवीन कृप्त्या लढवून, जाहिरातींसाठी नव्या संकल्पना राबवून अशा अनेक वस्तू फॅशन उद्योग बाजारामध्ये आणतो व जुन्या बाद करून टाकतो. त्यांचा एकमेव उद्देश असतो तो म्हणजे नफा कमावणं. त्यासाठी मूर्ख बनवायला मध्यमवर्गही तयारच असतो. यातल्या अनेक गोष्टी लोकांच्या जीवावरही बेतात. अमेरिकन लेखिका, पत्रकार नाओमी वुल्फच्या मते, जगामध्ये ३३ बिलियन डॉलर एवढी डाएट इंडस्ट्री, २० बिलियन डॉलर एवढी कॉस्मेटिक इंडस्ट्री, ३०० मिलियन डॉलर एवढी कॉस्मेटिक सर्जरी इंडस्ट्री आणि सात बिलियन डॉलर एवढी पॉर्न इंडस्ट्री आहे. भांडवलशाहीच्या या शाखा सॉफ्ट टार्गेट म्हणून महिलांनाच निवडतात. त्याचं कारणही ते सांगतात की, महिलांच्या माध्यामातून एखादी वस्तू खपली तर कुटुंबातले इतर सदस्य, तिच्या मैत्रिणी, आई-बहिणी, शेजारी असे अनेक जण त्या वस्तूकडे आकर्षित होतात. खऱंतर हे फारच भाबडं किंवा बालिश कारण आहे. यामागे भांडवली बाजारपेठेच्या ओघाने येणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीकडे दुय्यम माणूस आणि उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा असलेला दृष्टीकोनच कारणीभूत आहे. स्त्रिला एक माणूस म्हणून दर्जा न देता भांडवली सौंदर्यशास्त्राच्या निकषात बसणारी सुंदर आणि बिनडोक बाहुली बनवून ठेवणं हे पुरुषप्रधानतेचं व पर्यायाने भांडवली व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षणच म्हणायला हवं. आपण कितीही स्वतःला आधुनिक म्हणवून घेतलं तरी  “कॅमल टो पेन्टीज” प्रॉडक्ट “अवर लिप्स आर सिल्ड” या नावाने बाजारात जाहिरात करतं. बाईचे बंद ओठ हे पुरुषप्रधान मानसिकतेसाठी अत्यंत गरजेचे असतात. कारण तिने तोंड उघडून प्रश्न विचारला तर पुरुषी मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते.

प्रस्थापित सौंदर्याच्या निकषांनुसारच सुंदर दिसावं हे प्रत्येक स्त्रिला वाटत राहतं कारण तसं दिसणं हा तिच्या अस्तित्वाचा गाभा आहे, हे लहानपणापासून तिच्या आजूबाजूच्या जगातून गळी उतरवलं जातं. भांडवली संस्कृती टी.व्ही., सिनेमा, इंटरनेट विविध माध्यमांतून तुमच्यावर नेणिवा आणि जाणिवांचा जो ताबा घेत असते त्यातूनच सौंदर्यप्रसाधनं आणि तत्सम वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचं काम सहज होऊन जातं. एखादा फॅशन ट्रेंड बाजारात आणायचा. मग प्रचंड जाहिरातबाजी करून तो लोकांच्या गळी उतरवायचा. प्रचंड नफा कमवायचा आणि पुन्हा नवीन उत्पादन बाजारात आणायचं.  बरं या सगळ्याची उत्पादन गरिब देशांमध्ये तयार करून घ्यायची. तिथल्या कामगारांना कोणत्याही सोयी-सुविधा द्यायच्या नाहीत. कामाचे तास दिवसाला १२ ते १४ ठेवायचे. तुटपुंज्या पोटही धड भरणार नाही, अशा वेतनावर, रोगट वातावरणात ही उत्पादनं तयार केली जातात. जाहिरातही अशी करायची की केवळ बाईच प्रभावीत होणार नाही तर तिचा नवरा, मित्र यालाही आपली बायको, मैत्रिण अशीच दिसावीशी वाटेल याचीही कंपन्या काळजी घेतात. पुरुषांना खूष करण्यासाठी, त्यांना चांगले दिसतो आहोत असे वाटावे म्हणून वैद्यकीयदृष्ट्या अशक्त ठरत असतानाही बारीक राहण्यासाठी अनेक मुली, बायांचा जीवाचा आटापिटा हे ओघाने येतंच.

आता हे ट्रेंड काय काय असू शकतात याचा विचार केला तरी डोकं गरगरेल. बहुतेक ट्रेंड हे स्त्रियांच्या शरिर सौंदर्याशीच निगडीत असतात. त्वचा गोरी बनवण्यापासून ते गालाला कृत्रिम खळी पाडण्यापर्यंत, सरळ केस कुरळे तर कुरळे केस सरळ करणं, केसांना रंग लावणं, शरीरावरचे केस काढणं ते अगदी भुवई, नाक, जीभ, बेंबीला पिअर्सिंग करणं. वजन कमी करण्याचा आटापिटा, पोट सपाट दिसण्याचा आटापिटा मग त्यातून चरबी काढून टाकण्याच्या लायपोसक्शनसारख्या शस्त्रक्रिया. स्तन मोठे करण्याच्या शस्त्रक्रिया. क्लिवेज दिसावेत म्हणून उरोजांना उभारी देणाऱ्या ब्रेसियर्स किंवा पॅड अशा अनंत गोष्टींमधून हजारो कोटींची जगभरात उलाढाल होते. सेलिब्रिटींना या जाळ्यात ओढल्यावर ते उदाहरण मध्यमवर्गीयांना खुणावणारं असतं. वर दिलेलं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा बाईंचं उदाहऱण बोलकं आहे. ब्रिटनमधील सिलेब्रटी मॉडेल आणि पेज ३ वर सातत्याने टॉप राहणारी कॅटी प्राइसने ‘बीइंग जॉर्डन’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये आपले स्तन मोठे करण्यासाठी तिने दोन वेळा केलेल्या सर्जरीचं वर्णन केलं आहे. स्तन मोठे करणं हेच केवळ तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट असल्यासारखं भारावून ती लिहिते. पण त्याचवेळी कामधंदा न करणारा तिचा बॉयफ्रेंड, तो तिला करत असलेली मारहाण या गोष्टींचे तिला फारसे वैषम्य वाटत नाही.

सध्या मोठे कुल्ले असणाऱ्या मॉडेल्सचा ट्रेंड असल्याने बट् इम्प्लांट सर्जरीचा धंदा जोरात आहे. एकूण कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरीने जगभरामध्ये बायकांना साचेबद्ध सौंदर्यामध्ये बसवण्याचे अत्यंत महागडे कारखानेच उघडले आहेत. भूक कमी लागावी म्हणून आतडी कापण्यापासून ते नाक सरळ करणं, तोंडाचा जबडा नीट करण्यापर्यंत अनेक शस्त्रक्रियांना लाखो महिला बळी पडल्या आहेत, पडत आहेत. अमेरिकन टीव्हीवरील आणखी एक लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे जोन रिव्हर्स. तिनेसुद्धा सौंदर्याच्या व्याख्येत बसण्यासाठी अनेकदा प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. आता वयाच्या ८० व्या वर्षी मात्र तिला या गोष्टी चुकीच्या असल्याची उपरती झाली. ती म्हणते की, “मी माझ्यावर एवढ्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत की मी मेल्यावर माझा देह टप्पर वेअरला दान करण्यात येईल.” यातील गंमतीचा भाग सोडून द्या पण या खोट्या सौंदर्याच्या मापात बसण्यासाठी स्त्रियांचा प्रचंड अट्टहास चालतो की त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. भारतासारख्या देशामध्ये लग्नं होणाऱ्या बाईची “व्हर्जिनिटी” महत्त्वाची मानली जाते. लग्नाआधी दुसऱ्याशी शारीरिक संबंध ठेवणं हे फारचं गंभीर मानलं जातं. लग्नाच्या पहिल्या रात्री जोडप्याच्या पलंगावर अनेक ठिकाणी पांढरी चादर घातली जाते जेणेकरून रक्ताचा डाग त्या बाईच्या लैंगिक निरागसपणाची ग्वाही देईल. पण योनीच्या तोंडावर असलेला हा पडदा केवळ सेक्स केल्याने नाही तर इतरही बऱ्याच कारणाने फाटू शकतो. तरीही तिच्यावर संशय कायम असतोच. या व्हर्जिनीटीच्या खुळापायी हायमन म्हणजेच योनीचा पडदा दुरूस्त करण्यासाठीच्या शस्त्रक्रियांचे फॅडही जोरात आहे. हे केवळ शारिरीकदृष्ट्या त्रासदायक नाही तर भयंकर संतापजनक आहे. “सुंदर दिसण्यासाठी दुःख सहन करावं लागतं,” अशी फ्रेंच म्हण आहे. त्याप्रमाणे सौंदर्यासाठीच्या शस्त्रक्रिया या पाश्चात आणि आता आशियायी देशांध्येही इतक्या सर्रास झाल्या आहेत की त्यात कोणालाच काही गैर वाटत नाही.

भांडवलशाही व्यवस्था स्त्रीदेहाचा वापर करून स्त्रियांमध्येच एक आपली मोठी बाजारपेठ निर्माण करतात. त्यातून त्यांचं केवळ शोषण होतं आणि स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्री स्वातंत्र्याच्या विचारांना खिळ घातली जाते. काही वर्षांपूर्वी मी एका महिलांच्या कॉन्फरन्सला गेले होते. तिथे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ अशा आशियायी देशांतून महिला आल्या होत्या. त्यातल्या अनेक जणींनी अगदी डोळ्यांना त्रास होईल इतका बटबटीत मेकअप केला होता. त्यावर मला सांगण्यात आलं की, मेकअप करणं हे बोल्डनेसचं लक्षण मानलं जातं. कारण अनेक समाजांमध्ये महिलांना मेकअप करू दिला जात नाही. तो केवळ वेश्या करतात असं मानलं जातं. मेकअप करण्यात गैर काहीच नाही. पण ते खरोखरचं बोल्डनेसचं लक्षण आहे का? स्त्रीचा चेहरा सुंदर असणं म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष कुणी, कधी आणि कसे ठरवले?  परदेशी आर्यांच्या गोरेपणाचे आपल्या देशाला कितीते अप्रूप! बरं मुलगा काळाकुळीत असला तरी त्याला  गोरीपान, दाट-मऊ आणि लांब केस असणारी, बारीक बांधा असणारीच मुलगीच सौंदर्यवान वाटते आणि तिच्या बरोबरच संसार करण्याची स्वप्न पडत राहतात. या गोरेपणाच्या वेडापायी मग फेअरनेस क्रीम्स, जाडी कमी करण्यासाठी कसली कसली औषधं-गोळ्या आणि डाएट, केस लांबसडक मऊ दिसण्यासाठी वेगवेगळे शॅम्पू या गोष्टी भारतीय स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. भारतासारख्या देशात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अगदी उत्तर-पूर्व भागांतही वेगवेगळ्या वर्णाचे, उंची, जाडीचे लोक राहत असताना केवळ एकच सौंदर्याचा निकष कसा काय असू शकतो?

हाच प्रश्न साऊथ आफ्रिकेमध्ये ८०च्या दशकामध्ये मरियम मकेबा या प्रसिद्ध गायिकाने विचारला होता. तिला ‘ममा आफ्रिका’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘काळे गाणे’ या तिच्या मराठीतून प्रसिद्ध असलेल्या आत्मचरित्रामध्ये सौंदर्याबद्दल तिने खूप वेगळं निरीक्षण नोंदवलं आहे. तिने जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेमध्ये आपल्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले, तेव्हा ती इतर गो-या गायिका बघून थक्क झाली होती. त्यांचे कपडे, मेकअप, स्टाइल याने खूप प्रभावित झाली आणि त्यांच्यासारखं दिसण्यासाठी हट्टहास करू लागली. खूप सारा मेकअप करणं, लाल ओठ आणि गुलाबी गाल दिसण्यासाठी मेकअपचे थरच्याथर लावणं हे तिने सातत्याने करून पाहिलं. पण शेवटी तिला लक्षात आलं की गो-या लोकांची सौंदर्याची कल्पना वेगळी आहे आणि काळ्या लोकांची वेगळी आहे. बहुतेक सौंदर्यप्रसाधनं ही गो-या लोकांसाठी बनवलेली असतात. त्याचा कितीही वापर केला तरी मूळात काळी त्वचा असणारा माणूस गोरा होऊच शकत नाही. त्यानंतर तिने गो-या गायिकांप्रमाणे सुंदर दिसण्याचा अट्टहास सोडून दिला आणि केवळ आपल्या कलेवर प्रेम केलं. पण मरिअमसारखी चक्रातून बाहेर पडणाऱ्या व्यक्ती म्हणजे अपवादच. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अजूनही हिरो-हिरोइन हे जाड दाखवले जातात कारण त्या समाजाची सौंदर्याचे निकष वेगळे आहेत. पण तेच नट हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले की बारीक दिसण्यासाठी, सिक्स पॅक बॉडी बनवण्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घेताना दिसतात. अगदी बॉलिवूडमध्येही ९०च्या दशकापर्यंतचे हिरो हे सिक्स पॅक बॉडी नसणारेच होते. हा ट्रेंड पाश्चिमात्य देशांतून आला आणि आता तर गल्लोगल्ली सिक्स पॅक असणारी पोरं दिसतात. फिटनेसपेक्षा शरिराला विशिष्ट आकार देण्यात त्यांना जास्त रस असतो. त्यासाठी स्टिरोइड्स घ्यायलाही मागे पुढे पाहिलं जात नाही.

या सगळ्याचा परिणाम असा होतो की, ती स्त्री मानसिक आणि शारिरीक अत्याचाराला बळी पडते. कधी ती स्वतःहून ते ओढावून घेते तर कधी तिचा नवरा, भाऊ, मित्र, वडील तिच्यावर हे निकष लादतात. या व्यवस्थेमध्ये दोन्ही बाजूंनी तिचं केवळ शोषणच होतं, बाहेरून आणि घरातूनही. नाओमी वुल्फ आपल्या ‘द ब्युटी मिथ’ या पुस्तकामध्ये म्हणते की, १८४० च्या सुमारास झालेल्या भांडवलशाहीच्या उदयानंतर स्त्रियांकडे एक वस्तू म्हणून बघितलं जाऊ लागलं. त्याच सुमारास स्त्रियांचे नग्न फोटो जाहिरातींमधून छापून यायला सुरुवात झाली. सुरुवातीला सिगरेटच्या पाकिटांवर हे फोटो छापून यायचे. औद्योगिकी क्रांतीबरोबरच सौंदर्याच्या व्याख्येचा उदय झाला. बाईचा चेहरा हे तिचं नशीब ठरू लागलं आणि लग्नाच्या मार्केटमध्येही सौंदर्य महत्त्वाचं ठरू लागलं. एकीकडे अर्धनग्नं मॉडेल स्टेजवर रॅम्पवॉक करू लागल्या. पण अशा महिला कोणत्याच पुरुषाला आपली बायको, बहीण, आई म्हणून घरात नको होत्या. पॉर्नस्टार सन्नी लिओनीवर एक डॉक्युमेंटरी आहे “मोस्टली सन्नी” नावाची. त्यामध्ये भारतामध्ये तिचा असिस्टंट म्हणून काम करणारा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात राहणारा मुलगा दाखवला आहे. तिचे कपडे, मेकअप, वेळा ठरवणं अशी सर्व कामं तो करतो. सन्नीच्या कामाची तो खूप स्तुती करतो. त्याची आईही हा मुलगा जे काही आहे ते सन्नीमुळे आहे, हे अगदी तोंडभर कौतुकाने सांगते. पण याच मुलाला उद्या लग्नं करायचं असेल तर त्याला आणि त्याच्या आईला सन्नी लिओनीसारखी पॉर्नस्टार मुलगी चालणार नाही. त्यांना सुसंस्कारी वगैरे मुलगी लागेल. हे भारतातलं सत्य आहे. पोर्नोग्राफी हे पुरुषी मानसिकतेचं अत्यंत बीभत्स व हिंसक रूप आहे. त्यामधून केवळ स्त्रीदेहाची विटंबनाच नव्हे तर तिच्याविरोधातली हिंसाही वाढीस लागते. एका बाईला आपला देह पैशांसाठी विकावा लागणं यापेक्षा एखाद्या समाजाचं अधःपतन कोणतं असू शकतं?

एकीकडे स्त्रीदेहाचं उत्तान प्रदर्शन आणि दुसरीकडे स्त्रीयांना स्वतःच्याच शरिराची घृणा वाटावी असा दबाव यामध्ये आजची स्त्री हेलकावे खात आहे. या मानसिकतेतून स्त्रीला सोडवण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट देशांमध्ये झाला. गेल्यावर्षी न्यूयॉर्क टाइम्सने रेड सेंचुरी म्हणून एक लेख मालिका चालवली होती. त्यातला एक लेख सोशलिस्ट देशांमधल्या महिलांच्या लैंगिक समाधानाबद्दल होता. वेगवेगळ्या सोशलिस्ट स्टेटमधल्या महिला ज्या आता उतार वयात आहेत त्यांना त्यांचे अनुभव विचारण्यात आले आणि त्यांनी सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जगणाऱ्या त्यांच्या मुलींपेक्षा सोशलिस्ट काळात त्यांना असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलं. त्याचं कारणही असं होतं की, सोशलिस्ट स्टेटमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून सामाजिक सुरक्षा आणि हक्क देण्यात आले होते. कॉमन किचन, मुलं सांभाळण्यासाठी पाळणाघरं, घटस्फोटाची सोपी प्रक्रिया, एकट्याने मुलं सांभाळणाऱ्या बायकांना (सिंगल पॅरेंटिंग) सुरक्षा, शिक्षण-आरोग्याच्या सुविधा अशा अनेक गोष्टी सरकारनेच देऊ केल्या होत्या. त्यामुळे नवऱ्याची मर्जी सांभाळणं, स्वयंपाक करणं आणि मग मुलं सांभाळणं या पारंपरिक भूमिकेतून सोशलिस्ट स्त्रीया कधीच बाहेर पडल्या होत्या. सेक्स एज्युकेशनचे धडे तर टीव्हीवरून वयात येणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना सरकारकडून दिले जायचे. आपला साथीदार निवडण्याचा आणि त्याला सोडण्याचाही पूर्ण हक्क स्त्रियांकडे होता. अगदी लग्नापूर्वीच्या सेक्सला सरकारी पाठिंबा होता पण त्यात जबाबदारीची जाणीव होती. गर्भनिरोधक गोळ्यांची सहज उपलब्धता, गर्भपाताचा अधिकार हे स्त्रियांना सहज मिळत होते. बिगर कम्युनिस्ट युरोपीयन देशांमध्ये मात्र चर्चच्या संमतीने राज्यकारभार सुरू होता. त्यामुळे गर्भपात, लग्नाआधी शरीर संबंध हा गोष्टी महापाप होत्या. कम्युनिस्ट देशांमध्ये लैंगिक स्वातंत्र्याची प्रेरणा अर्थातच अलेक्झांड्रा कोलनताई, क्लेरा झेटकिंग सारख्या सुधारणावादी स्त्रियांची होती. कोलनताई यांच्या मते, प्रेम, सेक्स या गोष्टी आर्थिक फायद्यापासून वेगळ्या ठेवायला हव्यात. कोलनलाई यांनी स्त्रियांच्या आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्याबरोबरच लैंगिक स्वातंत्र्याची मागणीही लावून धरली. बायकोकडे आपल्या ताब्यातील वस्तू म्हणून बघणं आणि लैंगिकतेसह इतरही बाबीत स्त्री-पुरुषांकडे असमानतेनं पाहणं या पुरुषी मानसिकतेमुळे लैंगिकतेविषयी समस्या निर्माण होतात, असं त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडलं आहे. वेश्या व्यवसायाला कडाडून विरोध करतानाच त्यामागे असलेल्या आर्थिक आणि सामाजिक कारणांचा उहापोह त्यांनी केला आहे.

दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटरलचा पूर्ण पराभव झाल्यानंतर जर्मनीचे दोन भाग झाले. पश्चिम जर्मनीमध्ये युरोपच्या तर पूर्व जर्मनी रशियाच्या अधिपत्याखाली आलं. या पूर्व जर्मनीमध्ये वेश्या व्यवसायच नव्हता कारण लैंगिक स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात होतं. फॅशन शोज, सौंदर्य स्पर्धा, स्त्रियांच्या शरिराचं उत्तान प्रदर्शन करणारे फोटो, उत्पादनांवर स्त्रियांचे फोटो आणि पोर्नोग्राफी या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या कारण त्यांची गरज नव्हती. स्त्री-पुरुष समानता ही प्रत्येक पातळीवर होती. समुद्र किनारी, सहलीसाठी स्त्री पुरुष नग्नं फिरायचे अगदी लहान मुलांसमोरही. पण त्याबद्दल कोणताच आक्षेप नव्हता. कारण स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरिराबद्दल आदर निर्माण करणारी शिकवणूक सोशलिस्ट स्टेटमध्ये होती. “डू कम्युनिस्ट हॅव बेटर सेक्स?” या काही वर्षांपूर्वी आलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये तत्कालीन दृश्यं, व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून लैंगिक स्वातंत्र्य हे कसं अस्तित्वात येऊ शकतं आणि ते कसं सरकारच्या पाठिंब्याने राबवलं जाऊ शकतं हे दाखवून देण्यात आलं आहे. त्याचवेळी पश्चिम जर्मनीतल्या बायका मात्र स्वयंपाक, मूल, नवरा आणि चर्चचा आदेश यामध्ये अडकल्या होत्या. दुसऱ्या बाजूला समाजात पोर्नोग्राफी, सौंदर्य स्पर्धा यातून स्त्री देहाचं शोषण होत होतं. बायकांना लैंगिक स्वातंत्र्य दिल्याने समाजाची चौकट मोडून पडेल, स्वैराचार माजेल वगैरे कल्पना किती अप्पलपोटी आणि भ्रामक आहेत हे कम्युनिस्ट देशांनी दाखवून दिलं आहे. पण भांडवलशाहीचा भडीमार एवढा तीव्र असतो की, असे प्रयत्न अनेकदा त्यामध्ये हाणून पाडले जातात. जर्मनीची भींत पडल्यावर पूर्व जर्मनीत तेच झालं जे आधी पश्चिम जर्मनीत होत होतं. आजची लोकशाही सरकारं असा पुरोगामी विचारही करू शकणार नाहीत कारण ती लोकशाही भांडवली पायावरच उभी असते. इथले प्रमुख राजकीय पक्षदेखील हा पाया भक्कम व्हावा यासाठीच प्रयत्न करत राहतात. या पायावर स्त्री देहाच्या प्रदर्शनाचे भांडवली सौंदर्य निकषानुसार इमले उभे करतात. त्यामुळेच हा भांडवली पाया ढासळवण्यासाठी जोवर स्त्रिया पुढे येत नाहीत, तोवर स्त्रीमुक्ती या शब्दाला व्यवस्था फारसे गंभीररित्या घेणारच नाही!

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत

18 Comments

  1. Tushar suryawanshi Reply

    श्रुती जी,
    तुमचा “कॅमल टो पॅन्टीजच्या निमित्ताने” हा लेख वाचला अतिशय वास्तव आणि पितृसत्ताक पद्धतीवर, भांडवल दारावर, सोंदर्यावर, खूप प्रभावी मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे एकंदरती स्त्री शोषणाच्या अंगाने जाणार आपला लेख ठरला आहे मला प्रचंड आवडणार हा लेख आहे आवडणारा म्हटलेलं योग्य असेल का मला माहित नाही कारण पुन्हा एकदा आवडणं आलं म्हणजेच ती वृत्ती आलीच परंतु आपल्याला कळावं की आपल्या लेखाला जळगाव सारख्या शहरात वाचला गेला आणि वाचला जातो आहे,
    आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा.
    मी देखील काहीसा प्रयत्न करत आहे अभ्यासाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आपली मला खुप मदत होईल अशी आशा बाळगतो.

    तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी.
    [email protected]
    9503521235.

  2. manasee date Reply

    Shruti,
    very good study and very clear attitude. It is so true that the women should be aware of their exploitation.
    I had been to Srilanka and the best thing I found there was that all the girls in the hotels or elsewhere did not try to look fair and so they were looking more beautiful.
    There is a nice message from Sudha Murty about beauty.

  3. It’s very nice written by author.All women should think on it seriously, stop others to judge their personality.

  4. श्रृति, अप्रतीम लेख. स्त्रीवादाचे अनेक महत्वाचे पैलू तू कणखरपणा मांडले आहेस.
    Proud of you dear

  5. श्रृति, अप्रतीम लेख. स्त्रीवादाचे महत्वाचे पैलू तू कणखरपणे मांडले आहेस.
    Proud of you dear

  6. नरेंद्र पाटील Reply

    अभ्यासू आणि उत्कृष्ट लेखन.

  7. महेंद्र पाटील Reply

    चांगला लेख आहे,वास्तवदर्शी

  8. Its related to current situation such good thouts written by auther

  9. Vry clear eye opening thoughts .. thanx shruti.. n plz write more n more.. so that truth u hv focused may get reflected on minds of todays woman n she can see her image in society clearly.. she will not run behind such fake advertisements

  10. श्रुती जी खूप छान लिहिले आहे.
    पुरुषी मानसिकता व त्याचे बळी
    उत्तम लिखाण

    देवा झिंजाड

  11. प्रा. ए. एन. पाचंगे Reply

    पुरुषी भांडवली व्यवस्था स्त्रियांना कशा पद्धतीने गुलाम बनवते तिचे वस्तुकरण कशा पद्धतीने करते याचे जागतीक व भारतीय संदर्भ देऊन आतीशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे.
    हा लेख भारतातील सर्व सामान्य स्त्री – पुरुष वाचक वर्गापर्यंत, महाविद्यालयीन तरुण – तरुणी पर्यंत पोहचणे खूप गरजेचे आहे

  12. Vikesh timande Reply

    Dear Shruti
    It is really a need of today’s world to understand the nexus of capitalism and women.
    You have a sharp study of it and clear vision, I am very thankful fir this enlightenment.

Write A Comment