fbpx
विशेष

हुड हुड दबंग दबंग !

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर येथील दंडाधिकाऱ्यांनी पाच वर्षांची सजा फर्मावली. तीन वर्षांपेक्षा अधिक सजा झाल्यास आरोपीला न्यायालयात जामीन मिळत नाही. त्यामुळे आता जामीनासाठी सलमान खानला सत्र न्यायालया जावे लागणार. त्यामुळे एक दिवस सलमानला जोधपूरच्या तुरुंगात काढावा लागला. ते अभिनेते असोत वा नेते, आपल्याकडील अभिजन, श्रीमंत वर्ग तुरुंगात जाण्याच्या नावाने फारच बिचकतो. गुन्ह्यात अटक होणे ही सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने काही भूषणावह गोष्ट नाहीच म्हणा. पण तरीही एखाद्या प्रकरणात आरोपी म्हणून सिद्धता झाल्यावरही तुरुंग म्हटला की या वर्गाच्या अंगावर काटा येतो. त्यात प्रामुख्याने तुरुंगात नसलेली वातानुकूल यंत्रणा आणि इंग्लीश पद्धतीचा संडास या दोन गोष्टींची भिती असते. असो. सलमानभाई सुद्धा काल जोधपूरच्या त्या न्यायालयात हजर राहिले ते अगदी काळा शर्ट, जिन्स वगैरे घालून. ४० अंश सेल्शिअसपेक्षा अधिक तापमान असलेल्या प्रदेशात साधारणतः कोणत्या वेळी कोणते कपडे घालावे याचेही भान या वर्गाला नसते. त्याच काळ्या शर्टामध्ये कधीतरी कल्याण ते सीएसटी किंवा विरार ते चर्चगेट असा प्रवास करायला लावला तर शर्ट हे चांगले दिसण्यापेक्षा वातावरणाला साजेशा पोताचे व रंगाचे असावे याची अक्कल यांना येऊ शकते. मात्र ही अक्कल या महाभागांना नसते, कारण यांचा प्रवास कायम कार टू कार्पेट असा वातानुकूल यंत्रणेच्या पलिकडचा नसतो. अभिनेत्यांना बाहेर चित्रीकरणाच्या वेळी जेवढे उन्हातान्हात राबावे लागते व भांडवली पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना जाहिरसभांसाठी जेवढे उन खावे लागते ते सोडले तर यांचे आयुष्य हे थंडगार हवेत सर्व सुखसोयीयुक्तच असते.

असो सलमान खान हा सध्या हिंदी सिनेसृष्टीतला सूपरस्टार आहे. सूपरस्टार हे पद साधारणतः दिलीप कुमार यांच्या वेळेपासून तयार झाले. सूपरस्टार ज्या सिनेमात काम करतो तो हमखास चालण्याची हमी असते, यावर पुढे अमिताभ बच्चन यांच्या गळ्यात हे पद गेल्यापासून शिक्कामोर्तबच झाले. सलमानभाई यांच्या गळ्यात ही सुपरस्टार पदाची माळ पडली ती वॉन्टेड या सिनेमापासून. सलामन खानच्या पूर्वीचे दोन्ही सूपरस्टार यांच्यात अभिनयाची प्रचंड क्षमता होती. सलमानभाईंच्या ना चेहऱ्यावरची रेषा हलत ना वजने उचलून उचलून कमावलेल्या बॉडीमुळे नाचताना त्यांच्या शरिराची लकब दिसत.

तरीही सलमान खान हे सूपरस्टार का होतात? सलमान खान हे सद्य सांस्कृतिक परिस्थिचे फळ आहे. त्यामुळेच काहीही अभिनय क्षमता नसतानाही हे होऊ शकते. यंग अँग्री मँन म्हणून बच्चन यांचा झालेला उदय त्या परिस्थितीला अनुरुप होता. शहरीकरणाचा वेग वाढत असला तरी ग्रामीण शहरी दरी खूप मोठी होती. असलेली शहरं वाढत असली तरी त्याचा वेग तितकासा नव्हता. त्या वाढत्या शहरीकरणासोबत बकालीही तितकीच वाढ होती. त्यासोबत येणाऱ्या बेकारीतून तरुणांची टोळकी नाक्या नाक्यावर उभी राहून मराठी बोलीभाषेत ज्याला `उंडगे धंदे’ म्हणतात तसे प्रकार करत होती. भाऊ पाध्यांचा वासूनाका याच विश्वावर बेतलेला आहे. या सर्वाला कंटाळलेला तरुण सनदशीर, लोकशाही मार्गाने नव्हे तर आक्रमक हिंसक मार्गाने तोड काढण्याचा प्रयत्नच करू शकतो, असे साधे सोपे उत्तर तेव्हा आपल्याकडील चित्रपट लेखकांनी शोधले.

त्या पूर्वीचा म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या काळातील किंवा स्वातंत्र्यानंतर लगेचच जर हिंदि सिनेमाचा इतिहास या सगळ्याच्या विपरित होता. गर्म हवा या सिनेमात फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेले दंगे व त्यातून झालेली वाताहत दाखविली आहे. मात्र सिनेमाच्या शेवटी कैफी आजमी यांनी एक आशेचा किरणही सोडला आहे. दंग्यात निर्वासित झालेले कुटुंब आपले गाव सोडून जात असताना कौमी एकताचे नारे देणाऱ्या मोर्चात त्यांचा लहान मुलगा सामील होऊ का असं विचारतो आणि दुःख व चिंतेने भरलेल्या बलराज सहानींच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्याची हलकीशी छटा येऊन ते त्याला परवानगी देतात. कैफीसाहेबांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला गेला की, असा प्रसंग तुम्ही का लिहिलात, तेव्हा ते म्हणाले की, खरी परिस्थिती ही खूपच विपरित होती. पण शेवटी कलेचा वापर आपण कशासाठी करत असतो? कला ही लोकशिक्षणासाठी, लोकांच्या धारणा मानवतेच्या दृष्टीकोनातून सुदृढ होण्यासाठी असते. लोकांना निराश करून हाती काही लागत नाही. त्यांना कुठेतरी आशा दिसायला हवी. हाच प्रकार नया दौर या दिलीप कुमार यांच्या सिनेमातही पाहायला मिळतो. बस व घोडागाडी यांच्या शर्यतीत बस जिंकणार यात वादच नाही. मात्र त्यामुळे लोकांचे रोजगार बुडता कामा नयेत. विकास व्हावाच पण तो विकास समाजातील मूठभर माणसांसाठी नाही तर सर्वव्यापी असावा, असा संदेश हा सिनेमा देतो.

त्यानंतरच्या काळातील बच्चन यांच्या दिवार सिनेमात पाहा. जाओ पहले उस आदमी का साईन ले कर आओ जिसने मेरे हाथ पर लिखा की मेरा बाप चोर है… अशी खूप मोठी सोलोलक्वी बच्चन यांच्या वाट्याला आली आहे. त्यांच्या या तर्कावर थेटरमध्ये टाळ्या पडतात मात्र त्यांची आई निरुपा रॉय त्याच्यावर उत्तर देते की ज्यांनी तुझ्यावर किंवा आपल्या कुटुंबावर अत्याचार केले ते माझे कोण होते, तूतर माझा आहेस. हेच संस्कार तु माझ्याकडून शिकलास? अमिताभ बच्चन यांचा या तर्कावर निरुत्तर होण्याचा मुद्राभिनयही लाजवाब झाला आहे. यालाच जोडून मेरे पास बंगला है गाडी है, बँक बॅलन्स है वगैरे वगैरे डायलॉग झाल्यावर शशी कपूर यांच्या तोंडी असलेले मेरे पास माँ है हे वाक्य जोडून पाहा. अर्थ थेट आणि स्पष्ट आहे.

दिवारमध्ये अमिताभ बच्चन हेच केंद्रीय भूमिकेत असले तरी सिनेमा कुठेही त्यांच्या स्मगलिंग वा चोरीचे उद्दातीकरण करत नाही. मात्र १९९० नंतर जागतिकीकरणाचे धोरण अमलात आल्यावर त्याचा जो काही सांस्कृतिक परिणाम समाजावर झाला, त्यातून पैसा हाच समाजजीवनाच्या केंद्रस्थानी येऊन उभा राहिला आहे. पैसा कसा कमावला, यापेक्षा तो कमावला ना, हेच महत्त्वाचे होऊन बसले आहे. त्यामुळेच हिंदीत सिनेमे कोणते निघू लागले तर धूम, धूम टू, धूम थ्री हे. थेट चोरच केंद्रस्थानी! कथेच्या नायकाने कल्पकपणे केलेल्या चोऱ्यांचेच उदात्तीकरण! हे सिनेमे ज्या समाजात सुपर हीट होतात त्या समाजात मल्ल्या, निरव मोदींसारखे प्रत्यक्ष जीवनात अनेकांचे आदर्श का ठरणार नाहीत?

सांगण्याचा मुद्दा असा की, सलमान खान हे या पिढीचे हिरो आहेत, असे म्हणणे साफ चूक ठरेल. सलमान खान हे या नवउदारवादी संस्कृतीचा परिपाक आहेत, हे वास्तव नाकरता कामा नये. नवउदारवादाने आणलेले शोषण व संपत्तीचा केवळ दोन ते तीन टक्के लोकांकडे झालेला संचय, ८० टक्के समाजाची रोज खाण्याची वानवा असताना, शिक्षणाची वानवा असताना, आरोग्याच्या नावाने बोंब असताना, या सगळ्याला छेद देत एखाद्याला वर यायचे असल्यास समाजातील अशक्त, कमकूवत माणसाकडून ओरबाडून घेणे, हेच ही नवउदारवादी संस्कृती शिकवते. त्यामुळे सलमानचा फॅन हा सलमानचा पडद्यावरील अभिनय किंवा तो अभिनय ज्या कथासूत्राभोवती गुंफला आहे, ती कथा पाहायला, ऐकायला जात नाही. ती सलमान या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलेली असते. प्रत्यक्ष जिवनातली त्याची ही दबंगगिरी, त्याचे ते छाती पुढे काढून चालणे, हातातले टरक्वाईजचे ब्रेसलेट, त्याचे ऐशव्यर्यासोबतचे प्रेम. तिने नकार दिल्यावर त्याने केलेले तमाशे, या सगळ्या सगळ्याच्या ती प्रेमात असते. दारू पिवून एखाद्याला त्याने उडवले असले तर त्यात काय झाले, संरक्षित प्रजाती असलेल्या प्राण्याची शिकार केली तर ठीक आहे, काय फरक पडतो, असा सहज सवाल त्यांच्या मनात येतो.

सलमान खानच्या या व्यक्तिमत्वामुळेच तो हिरो असतो व तो हिरो राहणार. कारण बहुतांश समाजाच्या सांस्कृतिक नेणिवांची जडणघडणच त्या प्रकारे झालेली आहे. समजा सलमान नसला नसला तर त्याची जागा भरून काढायला तसाच एखादा लागेल. त्याच्या या असल्या व्यक्तिमत्वामुळे तो अडचणीत येणार याची कल्पना त्याच्या आप्तेष्टांनाही नीट होती. त्यामुळेच तर त्याचे वडिल जे मुस्लिम कट्टरतावादाच्या विरोधात व मुल्ला मौलवींच्या पुनरुज्जीवनवादी विचारसरणीच्या विरोधात ठाम उभे राहतात, त्यांनी भाजपबरोबर आणि विशेषतः मोदींबरोबर मधूर संबंध तयार केले. भाजपच्या उर्दू वेबसाईटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. स्वतः सलमान अहमदाबादला मोदींबरोबर संक्रातींला पतंग उडवायला गेला. मात्र पतंग उडवण्याची कला मोदींना त्याच्या पेक्षा जास्त अवगत आहे. पतंग नुसती उडवता येऊन चालत नाही. वेळ पडल्यास समोरच्याची कणी कापून त्याची पतंग गुल करण्याचे कसबही अंगी असावे लागते. सिनेमातली दबंगगिरी गल्लीत चालू शकते, दिल्लीत नाही, हे समजण्यासाठी व्यवस्था काय आहे त्याचे भान असावे लागते. ते कदाचित सलीम खान यांना असेल, पण शेकडो कोटी रुपयांचा फायदा करून देणाऱ्या त्यांच्या मुलाला नाही. त्याचाच परिणाम सध्या दिसतो आहे. अर्थात आपल्या देशात न्यायव्यवस्थेत लढण्यासाठी व न्यायाचे अर्थ अर्थाजर्नाच्या पश्चात काढून देणारे अनेक विधिज्ञ आहेतच. त्यामुळे सलमानभाई एक दिवस तुरुंगात खितपत पडले असले तरी ते तिथे किती दिवस राहतात पाहायचे. खरंतर यामुळे परिस्थितीत फरक काहीच पडणार नाही. ज्या व्यवस्थेचे हे अपत्य आहे ती व्यवस्था जर बदलली नाही, तर असे सलमान तयार होतच राहणार, रस्त्यावर झोपलेली माणसे काय आणि जंगलात फिरणारी काळविटे काय, त्यांच्या मौजमजेसाठी ते हूड हूड दबंग म्हणत धिंगाणे घालतच राहणार. या धिंगाण्यांच्या विरोधात काही करायचे असेल, तर पर्यायी निकोप सांस्कृतिक चळवळ उभी करावी लागेल. बहुतांश समाजाचा तयार झालेला कलावादी, भांडवली दृष्टीकोन बदलून तो मानवी जिवनाचे अर्थ समजून घेण्याकडे वळवावा लागेल. लढाई खूप मोठी आहे. ती फक्त सलमानला शिक्षा व्हावी यासाठीची नाही, तर कितीतरी योजने त्याच्या पलिकडची आहे ती या अर्थाने!

लेखक एक राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

Write A Comment