fbpx
राजकारण

भाजपचं जंगलबुक

मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये झालेला भाजपच्या स्थापना दिवसाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधी पक्षांना उद्देशून वापरलेल्या प्राण्यांच्या विशेषणांवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. साप, मुंगूस, मांजर, कुत्रा, चित्ता, वाघ असे सगळे प्राणी केवळ पूर आल्यावर प्राण वाचवण्यासाठी एका वटवृक्षावर चढतात असे उदाहरण शहा यांनी दिले. या उदाहरणातील महापूर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असून हे प्राणी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, बसपा, तेलुगु देसम, तृणमूल काँग्रेस हे आहेत, असंही त्यांनी सांगून टाकलं. खरंतर स्वपक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याला अशी नैसर्गिक आपत्तीची उपमा देण्याच्या त्यांच्या शहाणपणाचं कौतुकच व्हायला हवं. अलिकडे कुणास ठाऊक का पण अमित शहा खरं बोलू लागले आहेत. कर्नाटकातील येडुरप्पा सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी भर पत्रकार परिषदेत येडुरप्पा शेजारी बसले असतानाच दिल्याचं उदाहरण ताजंच आहे.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधी पक्षांना सत्तेसाठी हपापलेले लांडगे म्हणून घेतलं. वर स्वत:ला सिंहाची उपमा देण्यासही मा.मुख्यमंत्रीसाहेब विसरले नाहीत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या दोघांनाही कुठल्या प्राण्यांची उपमा दिली असती, अशी चर्चा त्यानंतर शिवसैनिकांमध्ये रंगली होती. असो दोन-चार वर्षांपूर्वी होणारी भाजप नेत्यांची भाषणं आठवून पाहा त्यामध्ये केवळ एकच शब्द असायचा, “विकास”. तो कसा असतो हे मोदीजी, शहा हे खूप रंगवून रंगवून सांगत असत. त्यामुळे लोक त्यांना मतं देऊन मोकळे झाले. पण गेल्या चार वर्षांत विकास जन्मलाच नाही अर्थात राम जन्मला ग बाई राम जन्मला म्हणत त्रिशुळ तलवारी घेऊन मिरवणुका काढणाऱ्यांकडून विकास जन्माला घालतील अशी अपेक्षाही फोलच आहे म्हणा. पण मधल्या मधे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने लोकांना मात्र आता जंगलबुक  सिनेमा पहात असल्याचा आभास नक्कीच निर्माण झाला आहे.

मुंबईतल्या बीकेसी येथील मैदानात झालेल्या सभेला लाखोंची गर्दीची होती, भाजप समर्थकांमुळे कसा मुंबईमध्ये ट्रॅफिक जॅम झाला अशा बातम्या सुरुवातीला पेरून जाहिरातबाजी करण्यात आली खरी. पण प्रत्यक्षात जेव्हा दोन प्रमुख नेत्यांनी भाषणं केली तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे का, असा प्रश्न पाहणाऱ्याला पडला. कारण इतक्या मोठ्या गर्दीचा प्रतिसाद पार थंड अगदी बर्फासारखा. कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फळी असलेल्या पक्षात असा प्रतिसाद म्हणजे भलतंच काहीतरी. एकतर जमलेल्यांमधले किती जमवलेले होते हे तरी शोधावं लागेल किंवा इतका थंड प्रतिसाद कार्यकर्ते देतात म्हणजे फारच मोठी नाराजी असल्यास त्याचे कारण शोधावे लागेल. त्यातूनच मग बेंबीच्या देठापासून ओरडत विरोधकांना लांडग्याची उपमा देत त्यांच्यावर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला गेला. मूळात विरोधी पक्षांनी एकत्र येण्याला भाजपचा आक्षेप का असावा? भाजप नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एनडीएमध्येही अनेक घटक पक्ष आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत फटका बसल्यावर मात्र भाजप सावध झाला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांची युती विजय झाली. आतापर्यंत हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळे ते एकत्र येऊ शकतील, असं भाजपला कधीच वाटलं नव्हतं. तसंच ते एकत्र येऊन काय उजेड पाडणार, असा  गर्वही उघड दाखवला जात होता. पण प्रत्यक्षात मात्र उलटचं घडलं. त्यानंतर भाजपचे साथीदार चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगु देशम पक्ष एनडीएमधून बाहेर पडला. शिवसेना तर सत्तेत राहूनही  वेळोवेळी कानफटात मारण्याचे काम करतेच आहे. त्यांनीही निवडणुका एकट्याने लढण्याची धमकी दिलीच आहे. अशावेळी एक एक साथीदार सोडून चालला असताना असलेलं बहुमत विरोधकांच्या ऐक्यापुढे  पुढच्या निवडणुकीमध्येही टिकवणं हे मोठं आव्हान भाजपपुढे निर्माण झालं आहे.

त्या भीतीतून शाह यांनी जंगल बुकची सफर घडवली. सगळे भाजप विरोधक जर खरोखरच एकत्र आले आणि त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली तर पक्षाला नक्कीच धोका आहे, हे ते सूज्ञ राजकारणी असल्याने चांगलंच ओळखतात. त्यामुळेच आपल्या भाषणामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही राज्ये ताब्यात आली तरच भाजपचा सुवर्ण काळ येईल, असं त्यांनी सांगितलं. पण ते जलेबी फापडा खाण्याइतकं आता सहज सोपं राहिलेलं नाही आणि पश्चिम बंगालमध्ये तर नक्कीच नाही. कारण मोदी लाटेमध्ये काँग्रेससारखा पक्ष कोलमडला तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काॅंग्रेसने, बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या युतीने तर तामिळनाडू मध्ये जयललिता यांनी मात्र आपल्या पक्षांची वाताहत होऊ दिली नाही. त्यामुळे काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा देता देता आता भाजपला उलटा फटका बसू लागला आहे. बिहारमध्ये लालू नितीश जोडी फोडल्याने लालू यांच्या बाजुने त्यांच्या पूर्वीच्या जनाधराने जोरदार कौल द्यायला सुरुवात केली आहे. त्याला महादलित समाजातील ही अनेक जातींचा पाठिंबा वाढतो आहे. लालूंना एम्समध्ये भरती करण्यासाठी दिल्लीला रेल्वेने नेलं गेलं. या रेल्वे मार्गावर जितकी स्थानके बिहारमध्ये होती त्यांचे फलाट पंधरा वीस हजारांच्या गर्दीने फुलून गेले होते. लालू यादव झिंदाबादच्या घोषणा त्या रेल्वेच्या धडाक घडाकच्या आवाजात भाजपला ऐकू गेल्या नसल्या तरी घटनाक्रम माहित असल्याने त्या धडाक धडाकची भिती नक्कीच त्यांच्या मनात आहे. विरोधकांनी एकत्र येण्याच्या प्रयत्नांमध्ये काही बैठकाही घेतल्या. अनेक टीकाकारांचं मत आहे की, विरोधी पक्ष एकत्र येऊच शकत नाहीत कारण कोणत्याही राज्यात जागा वाटपावरून त्यांच्यात भांडणं होणार. पण राजकारणामध्ये होऊच शकत नाही, असं काहीच नसतं. अनेक शक्याशक्यता असू शकतात, त्या पडताळून पाहिल्या जातात आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती कशी असेल, त्यानुसार त्यावर शिक्कामोर्तब होते. अन्यथा डाॅ. लोहियांच्या लोकशाही समाजवादासोबत हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचा संगम कसा काय झाला असता. तेव्हा या दोन टोकांना काँग्रेसने एकत्र आणलं आता भाजपमुळे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे इतकचं काय ते. त्यामुळे विरोधक एकत्र येऊच शकत नाहीत, ही भविष्यवाणी खूपच घाईने केलेली ठरू शकेल. तसंच एखाद्या पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो तेव्हा कमी जागा मिळणं ही बाब गौण ठरू शकते. उत्तर प्रदेशमध्येही बसपाने दोन्ही जागांवप सपाच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला होता.

अद्याप कर्नाटक विधानसभा निवडणुका बाकी आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये मिझोराम, जानेवारी २०१९ मध्ये छत्तीसगड, तामिळनाडू आणि राजस्थान या तीन राज्यांच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत काहींच्या मते, लोकसभा निवडणुका जाहीर होतील आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत जिथे आणखी एक वर्ष बाकी आहे तिथेही सहा महिने आधीच लोकसभेबरोबर निवडणुका लागतील. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा निसटचा विजय तर सर्वांनीच पाहिला. गेली पाच वर्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पप्पू पप्पू म्हणून हिणवून मूर्ख म्हणून प्रतिमा बनवली गेली होती. तिथे तर मोदी किंवा शाह यांच्यापुढे टिकाव लागू शकेल, असा काँग्रेसचा एकही नेता नाही. तरीहू राहुल गांधींनी स्वतःच्या जोरावर गुजरातमध्ये निकाल खेचून आणले आणि एक आश्वासक विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं स्थान निर्माण केलं. आता तोच प्रयोग ते कर्नाटक मध्येही करू पाहत आहेत. तिथे मात्र मुख्यमंत्री सिद्धरमय्यांसारखं सक्षम नेतृत्व पक्षाकडे आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये तर अनेक ठिकाणी भाजप समर्थकांनी सुरू केलेल्या जातीय, धार्मिक दंगली हे पक्षाचा विकास कसा भंपक आहे याचंच द्योतक आहे. कारण विकासाच्या भूलथापांच्या आडून भाजपने आपला धार्मिक, जातीयवादी अजेंडा राबवण्याचं काम तेव्हाचं सुरू केलं होतं. आता गळ्याशी आल्यावर उघड जातीय हिंसाचार सुरू झाला आणि त्यावर पंतप्रधान मात्र गप्प आहेत. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये जिथे हिंदुत्व ही गोष्ट लोकप्रिय नाही की त्याचं आकर्षणही नाही. तिथे ममता बॅनर्जी या अद्यापही वैयक्तिक पातळीवर लोकप्रिय आहेत आणि रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची तयारी आहे तिथे भाजपसारख्या पक्षाला शिरकाव करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घ्यावा लागत आहे. बंगालच्या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये हे सर्व सुरू आहे. तिथे हिंदू-मुस्लिम दुहीचा फायदा उठवण्याची भाजपची रणनिती स्पष्ट आहे.

नरेंद्र मोदींच्या लाटेचं कौतुक गेली चार वर्ष सुरू आहे. सत्ता मिळेपर्यंत ते ठीक होतं. पण सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी  हिंसाचार, जातीयता, धार्मिक दंगली अशाच लाटा जास्त आणल्या. आधी भातरमातेच्या नावाने हिंदू राष्ट्रीवादाचे टुमणे सुरू केले. भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना विशेषतः मुस्लिमांना त्यामध्ये लक्ष्य केलं. अगदी आपल्या देशाच्या तरुण पिढीलाही राष्ट्रद्रोही ठरवायला मागे पुढे पाहिलं नाही. मग गोमांस बंदीच्या नावाखाली पुन्हा मुस्लिम आणि दलितांना झोडपायला, मारून टाकायला सुरूवात केली. आता थेट रामाच्या नावाने रामनवमी आणि हनुमान जयंती पासून दंगलीच सुरू केल्या. या लाटा जास्त धोकादायक आहेत कारण सरळ सरळ समाज तोडण्याचं काम त्या करत आहेत.

सामाजिक परिस्थिती अशी चिघळत असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपचे स्वतःचेच दलित खासदार नाराज आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश दिल्ली इथले खासदार सावित्रीबाई फुले, छोटेलाल खारवाल, अशोक कुमार दोहरे, यशवंत सिंह आणि उदित राज यांनी पत्र लिहून ट्विटरच्या माध्यमातून भाजप किती दलितविरोधी पक्ष आहे हे जगजाहीर करून टाकलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये दलित अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये झालेल्या बंदच्याविरोधात देशभर दलित संघटनांनी निदर्शनं केली. त्यात ११ जण ठार झाले. पण सरकारचं त्यावर काहीच स्पष्टीकरण आलं नाही. त्यामुळे शाह यांना आपल्या मुंबईतल्या भाषणामध्ये स्पष्टीकरण द्यावं लागलं की, सरकार दलितांसाठी असलेल्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. देशभरामध्ये शेतकरी, आदिवासी, मुस्लिम महिला यांचे मोर्चे निघत आहेत. विविध प्रकारे सरकार विरोधात नाराजी व्यक्त होते आहे. त्याने काहीच फरक पडत नाही, असं तोंडदेखलं भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पण फरक पडतोय हेच त्यांच्या बदललेल्या व घसरलेल्या भाषेवरून सिद्ध होतं.

हे संपूर्ण देशातलं अशांततेचं वातावरण आणि त्याचवेळी विरोधी पक्षांच्या जवळ येण्याच्या चाललेले प्रयक्न यामुळे भाजप नेतृत्वातली अस्वस्थता लपून राहिलेली नाही. हीच अस्वस्थता या मुंबईच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमामधून दिसून आली. एकतर या कार्यक्रमाला पंतप्रधान किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या इतर नेत्यांची उपस्थिती नव्हती. लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी वगैरे तर अडगळीतच पडले आहेत.  शाह आणि मुख्यमंत्री यांनी केलेल्या भाषणांमध्ये जणू काही ठरवून विरोधकांच्या एकजुटीवर हल्ला करायचा अशा पद्धतीने ती भाषणं झाली. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर तर शाह यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकांवर तोंडसुख घेतलं. तेही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन. अगदी कार्यक्रमानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्येही विरोधी पक्ष, पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव याबद्दल विचारलेले प्रश्न शाह यांनी उडवून लावले. त्यांनी पोटनिवडणुकीतला विजय हा काही फार गांभीर्याने घेण्याचा नाही, अशा आविर्भावामध्ये उत्तरं दिली. मात्र तसं खरचं असतं तर शाह यांना विरोधी पक्षांना एवढ्या प्राण्यांची उपमा देण्याची गरज भासली नसती. भाजपच्या पायाखालची वाळू तर सरकलेली आहे. लाटेचा आनंद लुटत राहिलं तर पायाखालची वाळू किती सरकते याचा अंदाज येत नाही. लाट ओसरल्यावरच पायाखालचा खोल खड्डा दिसायला लागतो. तो खड्डा आता भाजपला दिसू लागला आहे.

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत

4 Comments

  1. Mahesh Phanse Reply

    Just because BJP is doing something wrong, that does not prove corrupt Lalu Prasad Yadav correct.

  2. कलंत्री Reply

    आपल्या राजकारणाचा आणि विचारसरणीचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. यावर तुम्ही लिहायला हवे. मोदी, राहुल आज आहेत उद्या नसतील.

  3. Sushant Patil Reply

    मस्त लेख. आपले सर्वच लेख वाचनीय असतात. गतकालातील उदाहरणांचा वापर करुन सद्यस्थितीचे विश्लेषण करण्याची आणि ते कुठेही न भरकटता मुद्देसुद लिहण्यात आपला हातखंडा आहे. विषयाचा सखोल अभ्यास करुन असेच वाचनीय लेख लिहत राहा.

Write A Comment