सामाजिक

पत्रकारिता : ब्राह्मणी आणि सत्यशोधकी

भारतीय समाजातील विषमता आणि जन्माधिष्ठित उच्चनीचतेमागील सत्त्याचा शोध घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून सत्यशोधक पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्त्पूर्वी बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी १८२१साली संवाद कौमुदी आणि १८२२मध्ये मिरत उल अखबार हे फारसी भाषेतील वृत्तपत्र सुरु केले होते. रॉय यांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह या प्रश्नांच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती सुरू केली. तसेच अंधश्रद्धेवर कडाडून टीका करत सामाजिक सुधारणेला चालना दिली. ब्राह्मो समाजाची स्थापना करुन चळवळ उभी केली. महाराष्ट्रात १८३२साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनीही स्त्रीशिक्षण, जातीभेद, विधवाविवाह, पुनर्विवाह या प्रश्नांचा पाठपुरावा केला. पेशवाई १८१८साली बुडाली तरी चातुर्वर्ण्य व्यवस्थेची उतरंड मजबूत होती. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक सत्ता ब्राह्मणांच्या हाती एकवटली होती. पंचांगात पाहून रोज कुठले ना कुठले विधी करायला लावून शूद्रांना लुबाडले जात होते. शूद्रही देवाधर्माचे काम म्हणून मुकाट्याने करत होते. पेशवाईत ब्राह्मणांना मोठ्याप्रमाणात वतनदाऱ्या मिळाल्या होत्या. इंग्रज आल्यानंतर राजकीय सत्ता त्यांच्या हातून गेली, पण प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे हिसंबंध शाबूत ठेवले होते. शिवाय समाजाच्या इतर सगळ्या क्षेत्रावरील त्यांचे नियंत्रण अबाधित होते. ब्राह्मण, पुरोहित तसेच कुलकर्णी, देशमुख, जहागिरदार या वतनदारांमुळे सगळे शूद्र भरडले जात होते. धार्मिक कर्मकांडांमुळे लुबाडले जात होते. सावकारीमुळे भिकेला लागत होते. ज्योतिराव फुल्यांनी वतनदार आणि पुरोहितशाहीच्या विरोधात शूद्रांना संघटित करुन चळवळ सुरु केली. १८४८साली त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी देशात पहिल्यांदा शाळा काढली. यामुळे ब्राह्मण अभिजनवर्गात खळबळ उडाली. सनातन्यांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली. फुल्यांनी १८५१साली पुण्याच्या रास्ता पेठेत मुलींकरिता शाळा काढली. या शाळा बंद पाडण्यासाठी सनातन्यांनी आकाशपाताळ एक केले. फुले चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर, पुरोहितशाही आणि सावकारशाहीवर कोरडे ओढत होते. दक्षिणा आणि ब्राह्मण भोजनाच्या नावाखाली शूद्रांना कसे लुबाडले जाते, याच्या विरोधात त्यांनी ‘तृतिय रत्न’, नावाचे नाटक लिहिले. १८५५मध्ये कष्टकऱ्यांसाठी रात्रशाळा काढली.

फुल्यांनी हे समाजसुधारणेचे, शिक्षणाचे कार्य सुरू केल्यानंतर दर्पण, ज्ञानप्रकाश, प्रभाकर, निबंधमाला, विविध ज्ञान विस्तार, लोककल्याणेच्छु तसेच केसरी या पत्रांच्या माध्यमातून विष्णुशास्त्री चिपळूणकर तसेच सनातन्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू केली. फुल्यांचा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर ‘शूद्रांचा अपरिपक्व ग्रंथ’, अशी चिपळूणकरांनी हेटाळणी केली. ही वृत्तपत्रे सत्यशोधक समाजाच्या सभेचे वृत्त देताना ‘शूद्रांच्या सभेचा वृत्तांत’ असे शीर्षक देऊन टवाळी करत. या टीकेमुळे फुले यांनी ‘शूद्रांनी ब्रह्मराक्षसाच्या दास्यत्त्वातून असे मुक्त व्हावे’, अशा मथळ्याचे आवाहन केले. ते अर्थातच कोणत्याही पत्राने छापले नाही. उलट लोककल्याणेच्छु या पत्राने आपल्या सनातनी विचारानुसार उपरोधिक भाषेत टीका केली : ‘आमचे प्रसिद्ध महाज्ञानी, महाविचारी, महाशोधक तत्त्ववेत्ते अजम जोतिराव गोविंदराव फुले यांनी एका मोठ्या ग्रहस्थाच्या शिफारशीने एक अप्रायोजक अशा प्रकारचे आत्मश्लाघ्येचे व ब्राह्मणांच्या निंदेचे पत्र आम्हांकडे पाठविले आहे. त्यास आमच्या पत्रात जागा मिळण्याचा संभव नाही, याबद्दल अजम फुले आम्हास माफी करोत’. पण फुल्यांचा हा मजकूर ‘शुभवर्तमानदर्शन’ तसेच ‘चर्चसंबंधी नानाविध संग्रह’ या दोन पत्राने मात्र तो छापला. फुले आणि इतर ब्राह्मणेतरांचे म्हणणे ही सनातनी वर्तमानपत्रे जराही छापत नव्हती, पण ख्रिस्ती पत्रे छापत होती.

चिपळूणकरांनी निबंधमालेच्या एका अंकात ‘मोहरीचा दाणा जसा या पारड्यात टाकला की, त्या पारड्यात टाकला तरी त्याच्या वजनाने पराजूचा काटा केसभरही ढळत नाही. त्याप्रमाणेच मि. जोतिसारख्या महापंडितांच्या स्तुतीततही अर्थ तितकाच व निंद्येतही तितकाच ! तेव्हा आमचे ज्ञातिबांधव दोघांचीही सारखीच पर्वा करतात’, असे स्पष्ट केले. इतकेच नव्हेतर पुढे जाऊन ते म्हणाले : ज्या अर्थी जोतिबांचा समाज अद्याप बाल्यावस्थेत आहे. एकीकडे हडपसर आणि दुसरीकडे भांबुर्डे याच त्यांच्या प्रचंड सीमा होत, त्या अर्थी असल्या शूद्र सभेवर हत्यार धरण्यास आम्ही उत्साह पावत नाही. स्वामींच्या आर्य समाजाप्रमाणे त्यांचा जेव्हा अवाढव्य विस्तार होईल व सत्य समाज मंदिराच्या अग्रभागी जोतिरावांचा संगमरवरी पुतळा त्यांच्या शुभ यशाचे स्मारक म्हणून स्थापला जाईल तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थ तत्त्वाविषयी विचार करता येईल’. चिपळूणकरांसारख्या वर्तमानपत्रातील तथाकथित अभिजनांना ब्राह्मणी श्रेष्ठत्त्वा केवढा  माज होता, हे यावरुन दिसते. तेव्हाच्या वर्तमानपत्राबद्दल फुले म्हणतात : आत्ताची वर्तमानपत्रे चालविणारी मंडळी आडमार्गाने जातात. केवळ धंदा म्हणून याकडे पाहतात. स्वतःच्या आचरणात काळेबेरे असलेल्या वर्तमानकत्र्यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे. स्वतःला आणि स्वतःच्या पुरुषपणाला गैरसोयीची फसलेली वस्तुस्थिती प्रामाणिकपणे मान्य करुन लेखनाद्वारे मांडावी. समाजहिताचे भान कधीही सुटू देऊ नये, पुरावे देऊनच विधाने करावीत. पण वर्तमानपत्रांतील ब्राह्मणी अभिजनांचा दृष्टिकोन तेव्हातर नाहीच पण आजही बदलला नाही.

प्रस्थापित वर्तमानपत्रे छापत नसल्याने सत्यशोधकांची बाजू मांडण्यासाठी फुल्यांनी ‘सत्सार’ हे अनियतकालिक काढले होते. त्यात त्यांनी पंडिता रमाबाई तसेच ताराबाई शिंदे यांची बाजू मांडली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी १८४९साली ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक सुरु केले पुढे ते दैनिक झाले आणि जवळपास शंभर वर्षे चालले या पत्रात लोकहितवादी, के. ल. छत्रे, न्या. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्त्मा जोतिराव फुले , कृष्णराव भालेकर, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सुधारकांचे लेख छापून येत. पुढे कृष्णराव भालेकर यांनी १८७७साली ‘दीनबंधू’ हे वर्तमानपत्र सुरू केले. या दीनबंधूने सत्यशोधकांची वैचारिक बाजू समर्थपणे लोकांपुढे मांडली आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर कठोर हल्ले चढविले. याच पत्राच्या माध्यमातून फुले यांनी धार्मिक रूढी, परंपरा यांच्यावर टीकात्मक लेख लिहिले तसेच धर्मग्रंथांची चिकित्सा केली. दीनबंधू दोन वर्षांनंतर बंद पडले. ते पुन्हा सुरु केले जात होते आणि बंदही पडत होते. शेवटी सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यातील त्यांच्या ग्रंथालयातील वासुदेव लिंगाजी बिर्जे यांच्या मदतीने १९०७मध्ये ते पुन्हा सुरू केले आणि तेव्हाच वेदोक्त प्रकरण घडले. त्यावेळी दीनबंधूने परखडपणे लिखाण करुन सत्यशोधकांची बाजू मांडली आणि वेदोक्त प्रकरणावर टीका केली. बिर्जे यांच्य मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी तानूबाई बिर्जे यांनी दीनबंधू हिंमतीने चालविला. १८८१साली केसरी वर्तमानपत्र सुरु झाले. आगरकर त्याचे पहिले संपादक त्यांनी सुरुवातीच्या काळातच केसरीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पण नंतर बालविवाह, स्त्रीशिक्षण यावरुन टिळकांशी तसेच इतर सनातन्यांशी त्यांचे टोकाचे मतभेद झाले. तेव्हा १८८७साली त्यांनी केसरीला रामराम केला. तेव्हा टिळक केसरीचे संपादक झाले. स्त्रीशिक्षणाबद्दल टिळक म्हणतातः ‘आमच्या बायकांस लिहिता वाचता येऊन त्यांस गृहकृत्ये चांगल्या तऱ्हेने करण्याचे शिक्षण मिळावे, राहिल्या वेळात पुराणादी वाचून त्यांनी आत्मोन्नती करावी, स्त्री व पुरुष यांची कर्तव्ये या जगात भिन्न भिन्न आहेत व यामुळे कधीही एकाचे शिक्षण दुसऱ्यांशी जुळणार नाही’. फुले १८९०ला वारले तेव्हा अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच सत्यशोधकी योगदानाचा गौरव केला. पण टिळकांच्या केसरीने त्यांच्या निधनाची ओळही छापली नाही. टिळक किती सनातनी आणि कोत्या मनाचे होते, हे यावरुन दिसते.

सत्यशोधकी पत्रकारिता नंतर वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून पुढे चालत राहिली. आगरकरांनी शतपत्रांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद, ब्राह्मणांचा हेकेखोरपणा यावर सडेतोडपणे टीका केली. पेशवाईमुळे विद्येचा ऱ्हास झाला. चातुर्वर्ण्यव्यवस्था अधिक जाचक झाली. याच काळात शेठ, सावकार आणि भटजींचे प्रस्थ वाढले, असे त्यांनी परखडपणे ब्राह्मण्यपुरस्कर्त्या सनातन्यांना सुनावले. दीनबंधूनंतर मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’च्या माध्यमातून म. फुले आणि भालेकरांचा वारसा पुढे नेला. दीनमित्र १९१० साली सुरू झाले ते अखंडपणे १९६७पर्यंत चालू होते. डॉ. आंबेडकरांनी १९२०मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. त्यामध्ये बाबासाहेबांनी जळजळीत वास्तव दाखविणारे १४ लेख लिहिले. मुंबईतील तेव्हाच्या वर्तमानपत्रांबद्दल बाबासाहेब म्हणतात : सध्याची बरीचशी वर्तमानपत्रे विशिष्ठ अशा जातींचे हितसंबंध सांभाळणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. सर्व जातींच्या हिताची भूमिका वर्तमानपत्रांनी घेतली तरच ते सर्वांच्या हिताचे ठरते. आत्मकेंद्रीत आणि स्वार्थाने प्रेरित वृत्तपत्रे ही समाजासाठी नुकसानकारकच ठरणारी असतात’, हे त्यांनी मूकनायकच्या पहिल्याच अंकात नमूद केले होते. आंबेडकरांनी नंतर बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत यांच्या माध्यमातून सत्यशोधकी परंपरा पुढे नेली. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरही प्रबुद्ध भारत चालत राहिले. सत्तावन्नसाली रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाल्यावर पक्षाचे मुख्यपत्र म्हणून या वर्तमानपत्राने नंतर दोनतीन वर्षे दमदार वाटचाल केली. चातुर्वर्ण्य, विषमता, सामाजिक अन्याय, अस्पृश्यता यावर हल्ले चढविले. विशेष म्हणजे, मध्यंतरी बंद पडलेला प्रबुद्ध भारत अलिकडे नुकताच बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने सुरू केला आहे.

ब्राह्मणेतर चळवळीतील विचाराच्या प्रसारासाठी अहमदनगरच्या ग्रामीण भागातून मुकुंदराव पाटील यांचे दीनमित्र, पश्चिम महाराष्ट्रात तरुण मराठा, मराठा दीनबंधू, सुदर्शन, विश्वबंधू, शाहू विजय, प्रगती, बेळगाव येथून प्रसिद्ध होणारे राष्ट्रवीर तसेच सत्यवादी या वर्तमानपत्रांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. बेळगावचे राष्ट्रवीर आजही साप्ताहिक म्हणून चालू आहे. बाळासाहेब पाटील यांची बांधिलकी सत्यशोधकी विचारांना होती. त्यामुळे अधंश्रद्धा, जातीभेद, अस्पृश्यता, रूढी, परंपरा, कर्मकांड यावर त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी १९२६ला सांगली येथून ‘सत्यवादी’ काढायला सुरुवात केली. नंतर १९३०साली त्याचे प्रकाशन कोल्हापुरातून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर ते सायंदैनिक बनले आणि १९५३पासून आजतागायत  ‘सत्यवादी’ दैनिकाच्या स्वरुपात प्रसिद्ध होत आहे. साने गुरुजींच्या साधनेने अस्पृश्यतेच्या विरोधात तसेच समतेच्या विचारासारठी लढा दिला. डॉ. बाबा आढाव यांनी या साप्ताहिकातून सत्यशोधक विचारांचा नेटाने प्रचार केला. डॉ. आढाव यांनी सत्यनारायणासारख्या कर्मकांडांवर आणि अंधश्रद्धेवर हल्ले चढविले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही मोहीम यशस्वीपणे राबविली तसेच सत्यशोधकी विचारांचा तसेच आचारांचा सातत्याने आग्रह धरला. साधनेबाबत हे कौतुकास्पद असले तरी हे पत्र समाजवादी पक्षाच्या अधिक जवळ राहिले ते निखळ सत्यशोधकी होते, असे म्हणता येत नाही. सत्यशोधकी पत्रकारितेची महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण अशी मोठी परंपरा आहे.

महात्मा फुले यांनी अपार कष्ट करुन तन, मन, धन आणि बौद्धिक व्यासंगाने चातुर्वण्र्य व्यवस्था तसेच ती ज्या संकुचित विचारावर उभी आहे त्या विचारांची वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिप्रामाण्याच्या जोरावर ठिकऱ्या उडविल्या. सावित्रीबार्इंसह अश्लाघ्य टीका, पदोपदी अवहेलना, अवमान, बहिष्कार तसेच व्यक्तिगत हल्ले सहन करत ब्राह्मण्याशी अविरतपणे अर्धशतकाहून अधिक काळ संघर्ष केला. शिक्षणाच्या प्रसारासह प्रबोधन करुन सत्यशोधक चळवळ उभी केली. शेकडो अनुयायी आणि हजारो सत्यशोधक समर्थकांची फौज उभी केली. राजा राममोहन रॉय आणि महात्त्मा फुले यांनी समाजसुधारणाच नव्हेतर भारतीय समाज प्रबोधनाचा इतिहास निर्माण केला. बहुजनसमाजाची संकल्पना वास्तवात साकार केली तसेच ब्राह्मण्यापुढे शक्तीशाली आव्हान उभे केले. त्यामुळे चिपळूणकर टिळकांच्या नेतृत्त्वाखालील ब्राह्मणी व्यवस्थेची फुल्यांनी उभे केलेल्या आव्हानापुढे त्रेधा तिरपीट झाली. फुले १८९०साली गेल्यानंतरदेखील सत्यशोधकांची चळवळ चालू राहिली. प्रसंगी ब्राह्मणी धूर्तपणाच्या काव्यांना तोंड देताना कमालीची आक्रमक झाली. त्यातूनच ब्राह्मणेतर चळवळ उदयाला आली. ती सत्यशोधक चळवळीपासून काही प्रमाणात अवनत झाली. फुल्यांनी ब्राह्मण्याचा विरोध केला होता. तथापि, ब्राह्मणांचा द्वेश कधीच केला नव्हता. सुसंस्कृत आणि अभिजन म्हणविणाऱ्या ब्राह्मणांची पापं त्यांनी आपल्या पदरात घेऊन त्यांच्या विधवांना माणुसकीच्या श्रेष्ठ मूल्यांनुसार आश्रय दिला. ब्राह्मणांच्या अवहेलनेने ते तसूभरही आपल्या ध्येयापासून ढळले नव्हते. त्यांची चळवळ कधीही ब्राह्मण या जातीविरोधी गेली नव्हती. विषमतेच्या विरोधात ते समतेची तसेच न्यायाची बाजू मांडत होते. ब्राह्मणांमधल्या सद्सद्विवेक बुद्धिला ते साद घालत होते. सुसंस्कृत अशा विरोधकांची भूमिका बजावत होते. फुले आणि सत्यशोधकांची इतकी निखळ प्रांजल भूमिका असतानाही चिपळूणकर टिळक प्रभृतींनी आणि त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पत्रकारितेनेही याची कधी दखल घेतली नव्हती. उलट या चातुर्वर्ण्यसमर्थक ब्राह्मणी पत्रकारितेने टोकाचे पवित्रे घेऊन फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीवर हेत्त्वारोप केले. त्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता केवळ टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानली. त्यांना एकाद्या शत्रूसारखी वागणूक दिली. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीने ब्राह्मण्यासह ब्राह्मणांनाही लक्ष्य करायला सुरुवात केली. ही चळवळीची अधोगती होती. याला जसे ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्त्व जबाबदार होते तसेच चिपळूणकर टिळकांची सनातनी ब्राह्मणी अभिजन पत्रकारिताही तितकीच जबाबदार होती. म्हणूनच जवळकर यांची टिळकांना देशाचे दुष्मन ठरविण्यापर्यंत मजल गेली. ब्राह्मण्याचा समाजाच्या प्रत्येक अंगावर प्रभाव होता. त्यामुळे सत्यशोधक चळवळीने सामाजिक, शैक्षणिक तसेच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात ब्राह्मण्याच्या विरोधात पर्याय उभे केले. समाजात नवी मूल्ये रुजविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण भारतीय स्वातंत्र्य जसजसे दृष्टिपथात येऊ लागले तसतसे बहुजनांची पावले राज्यकारभाराच्या दिशेने पडू लागली. सामाजिक प्रश्नांच्या संबंधातले आग्रह हळुहळू कमी होत गेले आणि सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा कल वाढला. सत्ता आल्यानंतर अर्थातच सत्तेचे राजकारण सुरू झाले. त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळले तर सामाजिक लढे, प्रबोधन या बाबी इतिहास जमा व्हायला सुरुवात झाली. यातून ब्राह्मण्य या प्रवृत्तीला चांगलीच उसंत मिळाली. कारण तिला आव्हान देणाऱ्या सत्यशोधक तत्त्वज्ञानाला नंतर वालीच उरला नव्हता.

सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ जसजशी उताराला लागली तसतशी पत्रकारितेतील ही परंपराही क्षीण होत गेली. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वातंत्र्य, लोकशाही, समता, सामाजिक न्याय अशी मूल्ये समाजात रुजली होती. ब्राह्मण्याने हिंदुत्त्वाचे स्वरुप घ्यायला सुरुवात केली होती. पण हे घटक स्वातंत्र्याच्या चळवळीपासून फटकून दूर राहिल्याने ते देशातल्या मध्यप्रवाहात त्यांना स्थान नव्हते. उदारमतवाद्यांकडे देशाची सूत्रे होती आणि राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशाची जडणघडण चालू ठेवली. देश सगळ्याच बाबतीत मागासलेला होता. त्यामुळे गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितपणा दूर करण्याचेच मोठे आव्हान होते. तेच आव्हान पेलण्यात सत्ताधारी गुंतले होते. तेव्हा उसंत मिळलेल्या ब्राह्मण्याने चातुर्वर्ण्याची भाषा दूर सारून जनसामान्यांवर हिंदुत्त्ववादी राजकारणाचे मायाजाल पसरत समाजात कट्टरता वाढविण्यास सुरुवात केली. देशातील राजकीय सत्ता वगळली तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय तसेच कलेच्या क्षेत्रावर त्यांचेच निर्णयक प्रभुत्त्व होते. इतिहासदेखील त्यांच्या वर्चस्वाला पूरक ठरेल, अशा धोरणीपणाने त्यांनी लिहिला होता. त्यांच्या हाती नव्हती ती केवळ राजकीय सत्ता. ती हस्तगत करणे एवढेच त्यांच्यापुढे उद्दिष्ट होते. समता, बुद्धिप्रामाण्य यांचे आग्रह कमीकमी झाले तसतसे ब्राह्मणेतर समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड आणि पुढेपुढे तर कट्टरता वाढत गेली आणि धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची कल्पना लोकप्रिय होत गेली. आणि नव्वदच्या दशकापासून लोकशाहीवादी आणि डाव्यांपुढे शक्तीशाली हिंदुत्त्वाचे आव्हान उभे राहिले. संघपरिवाराचे देशातील सत्तेच उद्दिष्ट साकारण्यासाठी ब्राह्मण्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रशासन, नाट्यसिनेमा आणि एवूâणच सांस्कृतिक क्षेत्राने, शिक्षणव्यवस्थेने तसेच प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांचा यात सिंहाचा वाटा होता.

स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसारमाध्यमे आणि पत्रकारितेवर प्रामुख्याने चिपळूणकर टिळक यांच्या सनातनी विचारांचा प्रभाव होता. स्वातंत्र्योत्तर काळात तीच परंपरा उत्तरोत्तर दृढ होत गेली. त्यांनी ब्राह्मणी मध्यमवर्गीय मूल्ये आणि संस्कृती जतन केली. राजकीय पातळीवर काँग्रेसची भलामण करण्यात माध्यमे धन्यता मानत होती. तरीही ब्राह्मण्याच्या हितबंधांत बाधा येणार नाही, याची परोपरीने काळजी घेत होती. आणीबाणीनंतर मात्र लोकशाही स्वातंत्र्याचा डंका पिटत काँग्रेसला पर्याय म्हणून जनता पक्षाची तरफदारी केली. पण इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकारणात बहुसंख्यांकवादाला आपल्या फायद्यासाठी खतपाणी घातले तेव्हा सगळी माध्यमे पुन्हा त्यांच्या भोवती पुन्हा गोंडा घोळू लागली. ऐंशीच्या उत्तरार्धात आणि नव्वदीच्या दशकात बहुसंख्य माध्यमांनी हिंदू अतिरेकाचे उदात्तीकरण सुरु केले. राम जन्मभूमी बाबरी मशीद वाद, आडवाणी यांची रथयात्रा, बाबरी मशिदीचे पाडकाम, त्यानंतर झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली यात बऱ्याच माध्यमांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपण हिंदू धर्मांधतेचे समर्थन करण्याची भूमिका घेतली. अतिरेकी विधाने, अतिरेकी गैरकृत्ये, समाजात विद्वेशाचे वातावरण निर्माण करणारी बेदरकार जात्यंध विधाने यांना वारेमाप प्रसिद्धी देऊन त्यांनी हिंदू अतिरेकी शक्तींसाठी राजकीय सत्तेचा मार्ग प्रशस्त केला.

देशात दहशतवादाचा उदय होत असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे युग सुरू झाले. त्यामुळे दहशतवादाच्या दहशतीचा प्रभाव देशात सर्वदूर पडायला लागला. परिणामी दहशतवादाची तीव्रता उत्तरोत्तर वाढत गेली. दहशतवादासंबंधी सनसनाटी बातम्या पाहण्यासाठी टीव्हीवर लोकांच्या उड्या पडू लागल्या. प्रेक्षकसंख्या वाढत गेली. त्याप्रमाणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे महत्त्वही वाढत चालले. दहशतवाद आणि प्रसारमाध्यमे ही परस्परावलंबी असतात तसेच ती परस्परपूरक असतात. त्यांचे परस्परांत हितसंबंधही निर्माण होतात, असे जगभरातील दहशतवादाच्या संबंधातील तज्ज्ञांचे मत आहे. त्याची प्रचिती या देशातही येऊ लागली. वर्तमानपत्रांची शक्ती कायम राहिली पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ताकद आणि जनमानसावरील त्यांची पकड भूमिती श्रेणीने वाढत गेली. तेव्हा माध्यमांची म्हणूनही  एक दहशत तयार झाली आणि मी मी म्हणणारे त्यापुढे चळचळा कापू लागले. शक्ती, प्रभाव आणि दहशत वाढल्याने माध्यमांनी वेगाने न्यायसंस्था आणि कार्यपालिकेच्या अधिकारावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. सार्वभौम शासनाकडून आपणास हवे तसे निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ लागले. सायंकाळच्या चर्चेत रोजच्या रोज ‘मिडिया ट्रायल’ला सुरुवात झाली आणि तात्त्काळ निवाडेही व्हायला लागले. संसद, न्यायालये आणि कार्यपालिकेचे सार्वभौमत्त्व प्रसारमाध्यमांनी हिसकावून घेऊन ती सर्वशक्तीमान बनली. योग्य काय अयोग्य काय ?सत्त्य काय, असत्त्य काय ? जनहित काय जनअहित काय ? देशहित काय देशद्रोह काय ? राष्ट्रवादी कोण राष्ट्रद्रोही कोण ? हे ते स्वतःच ठरवून रोजच्या रोज हवेतसे शिक्के मारून निवाडे द्यायला लागले. ‘नेशन वाँट्स टू नो’, असे सांगून भल्याभल्यांची बेदरकारपणे झाडाझडती घेऊ लागले. त्यांचे म्हणणे पुरते ऐकून न घेताच त्याच्यावर आरोपांच्या फैरी झाडू लागले. त्यांनी छू म्हटले की अंगावर जायला तयार असलेल्या आमंत्रित पाहुण्यांमार्फत पाणउतारा करु लागले. इतकेच काय संरक्षण, परराष्ट्र व्यवहार या विषयात दोन पाकिस्तानी आणि दोन भारतीय लष्करी तज्ज्ञांना बोलावून घनघोर वादावादी करुन देशभरात युद्धज्वर वाढवू लागली. यच्चयावत माध्यमांवर ब्राह्मण्याच्या विचारांचा पगडा असल्याने त्यांनी सहाजिकच हिंदू कट्टरतेच्या उदात्तीकरणाला प्रोत्साहन देऊ लागली. त्यातून कट्टरपंथी हिंदुत्त्व देशाच्या मध्यप्रवाहत आले. माध्यमांच्या सुदैवाने लोकप्रियता हरवून बसलेले उदारमतवादी पण भ्रष्ट झालेले काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे अहोरात्र माध्यमांचा धिंगाणा चालला होता.

हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेवर आल्यावर याच सगळ्या माध्यमांनी त्यांच्या पायाशी लोळण घेतली आणि त्यांच्याभोवती आरत्या ओवाळायला सुरुवात केली. देशहिताचा आव आणत घरचे कार्य असल्याच्या उत्साहात सत्ताधाऱ्यांचेच अजेंडे राबवावयाला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या तैनाती फौजांप्रमाणे विरोधकांवर तुटून पडायला लागले आहेत. खरे म्हणजे, कधी नव्हे ते आज केंद्रात आणि राज्याराज्यांत आज त्यांचेच राज्य आले आहे. त्यामुळे इमाने इतबारे ते आपले ब्राह्मणी कर्तव्य पार पाडत आहेत. ते सत्यशोधकी भूमिका कशी घेतील ? तशी अपेक्षाही मूर्खपणाची आहे. प्रसारमाध्यमे ब्राह्मण्य पुरस्कर्त्या ब्राह्मणांच्या प्रभावाखाली आहेत, यात वाद नाही. पण महाराष्ट्रात ती वर्षानुवर्षे केवळ ब्राह्मणांच्या एकाच पोटजातीच्या ताब्यात आहेत. या पोटजातीतील सर्वच ब्राह्मण्यपुरस्कर्ते नाही. काही सन्माननीय प्रागतिक अपवाद होते आणि आहेतही. अशा माध्यमांमध्ये बहुजनांना फारसे स्थान असणे शक्यच नाही पण एका मक्तेदार पोटजातीशिवाय इतर पोटजातींना म्हणजे अगदी पुढारलेल्या चित्त्पावन ब्राह्मणांनाही माध्यमांमध्ये फारसं स्थान नाही. उलट ते दुय्यम स्वरुपाचे आहे. विशेष म्हणजे, पेशव्यांनी ज्यांना पाणके ठरविले होते त्यांच्याकडेच प्रसारमाध्यमांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही यच्चयावत सूत्रे आहेत ! याला योगायोग म्हणायचे ?

संदर्भ : सत्यशोधक चळवळ वाटचाल आणि चिकित्सा – डॉ संभाजी खराट

लेखक महाराष्ट्रातील अव्वल राजकीय विश्लेषक व भाष्यकारांपैकी एक महत्वाचे विश्लेषक आहेत

2 Comments

  1. अमोल Reply

    खूप छान लिहिलंय.. ब्राह्मणेतर चळवळीने ब्राह्मण्याविरुद्ध रणशिंग पुकारले ह्या चळवळीत सीकेपी, मराठा, जैन पासून ते सर्व बहुजन समाजाचा सहभाग होता मात्र कालांतराने ह्या चळवळीचा फायदा मुख्यतः पुढारलेल्या बहुजनातील जातींनाच झाला.. अजून एक प्रबोधनकार ठाकरें व त्यांच्या प्रबोधन नियतकालिकाचा उल्लेख होणे प्रस्तुत ठरले असते

  2. Namadev Jadhav Reply

    Absolutely Correct analysis ,,..need to awake Bahujan people to cope up Bramhins tactics,,..thank u for giving eye opening article

Write A Comment