fbpx
सामाजिक

साऊ, तू आमचं प्रेरणास्थान……

प्रिय साऊ,

सत्य की जय हो!

सावित्रीबाई तुम्ही आमचे प्रेरणास्थान! प्रेरणास्थान म्हणजे जिच्या कार्यकर्तृत्वातून जात-पुरुषप्रधान समाजात जगण्याची, तग धरण्याची आणि अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, मिळत असते आणि मिळत राहिल. १९ व्या शतकात होत्या बर्‍याच जणी. ज्या विषमताग्रस्त समाजाच्या काळपाषाणाला धडका देण्याचा प्रयत्न करत होत्या. कोणी आनंदीसम भगिनी प्रसंगी आपल्या नवर्‍याचा मार, अवमानकारक  शब्दशस्त्रांचे बाणही झेलले, पण न डगमगता आपल्या शिक्षणासाठी अगदी परदेशही गाठला. पण पतीचं ‘ नियंत्रण’ अटकेपार होतं, हेही समजलं आम्हाला तुझ्या मुळे. कोणी ‘पंडिता ’या धर्मात आम्हा बायकांचा निभाव नाही लागणार म्हणत धर्मही बदलून टाकला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं, समजलं तसं, ’स्त्रीधर्मा’ची उलट तपासणी केली. कुणी स्त्रियांसाठी आश्रम उभारले. इतिहासात भेटतात अशा आनंदी, रमा, पंडीता आम्हाला. पण तुझ्या सम तुच! अगदी निराळी! आनंदी, रमा, पंडीता उभ्या राहिल्या त्या तू अंगावर शेणदगडांचा मारा झेललास म्हणूनच.

साऊ, तुच सार्‍याजणींसाठी मुक्तीचं पाऊल! लहान वयात संसाराचा भार संभाळत संभाळत तु निर्माण केली एक नवी पाऊलवाट. एक वादळ. हो! तुच आमचं प्रेरणास्थान! कारण ज्या काळात स्त्रिया होत्या अज्ञानात, ढकललं होतं त्यांना अंधार कोठडीत – धर्म, परंपरेच्या नावाखाली. चिणलं जात होतं त्यांच उभं आयुष्य. स्त्रियांचं जीणं म्हणजे ना घराबाहेर पडणं, ना स्वतंत्र विचार करणं, ना व्यक्त होणं. जणू होत्या त्या ’मालकीच्या वस्तू’ कडेकोट नियंत्रणाखालच्या. अशा अंधारयुगात स्त्रियांनी शिकलं तर अन्नाच्या आळ्या होतात, किडे पडतात, नवरा मरतो असं भय स्त्रियांना दाखवलं जात होतं. तुच घेऊन आलीस त्यांच्या आयुष्यात प्रकाशझोत. जोतीरावांकडून गिरवली धुळाक्षरे आणि निघालीस भिडेवाड्याकडे निर्भिडपणे. पण बायकांचा असा  ज्ञान संघर्ष झेपणारच नव्हता सनातन्यांना. याच अविचारी टोळीने भिरकावला तुझ्यावर दगड. खरकटं पाणी टाकलं तुझ्या अंगावर. पण तू घेतला वसा टाकला नाहीस. शेण, दगडांचा माराही सोसलास मुलींना शिकवण्यासाठी. तुझी ही पहिलीवहीली मुलींची शाळा म्हणजे समाजाच्या अर्ध्या हिश्श्याला उघडलेलं ज्ञानाचं कवाड! धिक्कारत धर्मशास्त्रांचा अन्यायी अध्याय तु आद्य शिक्षिका झालीस.

होय ! तुच आमचं प्रेरणास्थान! कारण तू नसती दिलीस हिम्मत, करुन दिली नसतीस अक्षर ओळख तर काय स्थिती झाली असती आमची? त्या काळी लाऊन दिली जात होती कोवळ्या, बाल वयातील मुलींची लग्न. का ? तर म्हणे धर्म! चिमुरड्या मुलीची लग्न थोराडांसोबत. मग काय लग्न, आनंद, काही कळण्याच्या आतच विधवापण. लहान वयात विधवापण आलं तर दोष मुलीचाच. तीच पांढऱ्या पायाची. पुन्हा लग्न करण्याची बंदी. आमच्या सृजन क्षमतेवर त्यांचा कडेकोट बंदोबस्त. या सर्व अन्यायाविरुध्द ’ब्र’ उच्चारण्याचे बळ तुच आमच्यात पेरलंस. यासाठी तु पराकाष्ठा केलीस.

जशी मुलींची, शूद्रांची शाळा तु सुरु केलीस तशीच सत्यशोधक नेतृत्व करीत घडवून आणले पुनर्विवाह, सुरु केलेस. आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधकगृह. विधवा काशीबाईला हृदयाशी कवटाळलस तेव्हा जातीपातीच्या भिंतींचा नाही वाटला तुला अडसर. विधवांनासुद्धा आहे आई होण्याचा अधिकार हे तू कृतीतून ठणकावून सांगितलस. पुकारा केलास विधावांच्याही जैविक मातृत्वाचा. पण तू इथेच नाही थांबलीस. एक क्रांतिकारक पाउल तुम्ही उभयतानी टाकलंत. सनातनी सडक्या मेंदुनी हिणवल ज्या नवजात अर्भकांना अनौरस म्हणून, तुम्ही त्यांचे आईबाप झालात. ‘सामाजिक मातृत्व’ संकल्पना सत्यशोधकानी जगली. औरस – अनौरस आकृतीबंधच नाकारलास तू साऊ.

साऊ, तुझ्या समताभूमीतला तो हळदी-कुंकू समारंभ, समारंभाची तुझी नोटिस ’एका जाजमावर बसावे’ शिकवून गेला मला खराखुरा भगिनीभाव. सत्यशोधक भगिनीभावाची तुच प्रेरणा आहेस साऊ! तुझा तो कामाचा आवाका, तुझा समभावी दृष्टिकोन मी जाणला सत्यशोधक समाजाच्या तुझ्या कार्यातून. विधवाविवाह महिला संघाच्या स्थापनेतून, दुष्काळ निवारण सभेच्या कामातून अन् प्लेग निवारण महिला कमिटीतून. पाण्याला नसते जात हे तू शिकवलस. तुझ्या घरतील पाणी खऱ्या अर्थाने सार्वजनिक केलंस. पाणी हे जीवन, अमृत अशी लफ्फेदार भाषणे कारणाऱ्यांनाही जमलं नाही ते तू धाडसाने केलंस. तुमची सत्यशोधक प्रेरणा घेऊन आम्ही लढा पुकारला आहे समन्यायी पाण्याचा.

आपला लढा, आपले प्रश्‍न आणि पुढाकारही आपणचं घेतला पाहिजे हे शिकवलस तू आम्हाला. परंपरेचा टेंभा मिरवत न बसता तू खोचलास कंबरेला पदर. जातपात, धर्म परंपरांच्या जोखडातून मुक्ती साधायची तर समस्त शोषित स्त्रियांच्या एकजूटीचा मार्ग तुच दाखवलास आम्हाला. तुझ्या सत्यशोधक वाटेने आल्या असंख्यजणी. सावित्रीबाई रोडे यांनी केलं पुण्याच्या सत्यशोधक समाजच नेतृत्व. मुक्ताबाई मांग निघाली ज्ञाननिर्मितीच्या लढ्याचे नेतृत्व करायला. साऊ, तुझ्या कडून मी बंडखोरीचा वारसा स्विकारला आहे. तुम्ही उभा करु पहात असलेला समाज आजही अस्तित्वात आलेलाच नाही. परिस्थिती अधिकाधिक बिकटच होत चालली आहे. तू भ्रुणहत्येचा कृतीकार्यक्रम दिला. पण विज्ञानच वैरी झालंय बायकांचं. संशोधनही होतात पुरुषप्रधान चौकटीतच. लिंगनिवड चाचण्या करतात ह्या जात-पुरुषी मानसिकता अन् मारुन टाकतात जन्माच्या आधीच उद्याच्या स्त्री-व्यक्तित्वाला, तु विचारला होतास तोच प्रश्‍न मी तुझ्याच शब्दात विचारत आहे ’तयास मानव म्हणावे काय?’ साऊ, तू , ताराबाई शिंदे, मुक्ताबाई मांग, सावित्रीबाई रोडे, तान्हुबाई बिर्जे सार्‍याजणी शिकवत होतात स्त्री-पुरुषांची समता, जीवनाचे हक्क. पण आज मुलीला साधा जन्माला येण्याचाही अधिकार नाकारला जातोय. तुम्ही पुढाकार घेतला होता सत्यशोधक विवाहांसाठी, पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी. पण आज जात-जमात पंचायती ’महापंचायती’ झाल्यात. स्त्रियांचे जीवंत असणेच त्यांना खूपतय जणू. स्त्रियाना जगण्याचीच त्यांनी मोठी पंचाईत करून ठेवली आहे.

साऊ ,मला प्रेरणा मिळते इतिहासाच्या पानात तुझा संघर्ष वाचताना. तू नायगावला लावून दिलं होतस एकमेकांवर प्रेम करणार्‍या जोडप्याचं लग्न. जोतीरावांना तुझ्रा शेटजींना पत्र धाडून कळवला होतास सारा प्रसंग. गाव लाठ्या-काठ्या घेऊन जोडप्याला मारायला आला. तु ढाल झालीस त्यांची. समजदार सत्यशोधक साऊ एकीकडे अन् परंपरांच्या जुन्या जळमटांनी पंगू झालेला उभा गाव दुसरीकडे. असाच होता हा प्रसंग – जणू युध्दच. तू त्या जोडप्याला सहजीवन जगण्याचा अधिकार आहे हे दिलं होतं गावकर्‍यांना पटवून. पण आज हा वारसा काळाच्या पडद्याआड जाणूनबुजून दडवला जातोय. मुलीनं पारजातीतील मुलाशी लग्न केल तर जन्मदाताच डोक्यात दगड घालतो तिच्या. नाही कुणी प्रेम करायचं म्हणे. ’महापंचायतीं’नीतर खूपच वाट लागली आहे बाईच्या जीवनाची. म्हणे मुलीमुलांनी गप्पा मरत उभं रहायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही, अमुक कपडे-तमुक कपडे घालायचे नाहीत, एकट्या बाईनं कुठं बाहेर पडायचं नाही. साऊ, तुच केला होतास ना यासाठी पहिला विद्रोह! तुच ओलांडला होतास घराचा उंबरठा, तू घरा बाहेर पडली नसतीस तर ……. कल्पना सुध्दा नको करायला.

तु लढली होतीस स्त्रीहिंसाचाराच्या विरोधात, तू मोडली होतीस जाचक परंपरा, तू नाकारला होता मनुवाद, नाही झालीस फक्त जोतीबांची सावली. तू सत्यधर्मप्रकाशात तेजोमय झालीस. खरं सहजीवन, सामाजिक मातृत्व, सत्यशोधक भगिनीभाव तुच शिकवला आम्हाला. हो, आज तुझे स्मरण करत आम्ही स्त्रिया तुझा विचार-कार्य वारसा पुढे घेऊन जाण्याची शपथ घेतो. साऊ, तुम्ही ज्ञानज्योत लावली. आज आम्ही शिक्षणातील मनुवाद-मनीवादाविरुध्द लढण्याची शपथ घेतो.

साऊ तू पहिली क्रांतिकारी शिक्षिका, विधवांचा प्रतिपाळ करणारी माता, दुष्काळात अन्नछत्र चालविणारी, अनाथ मुलांची आई, ज्ञानासाठी संघर्ष करणारी सत्यशोधक समाजाची अध्यक्ष “विद्यादात्री”  सावित्रीबाई !

साऊ, तुम्ही हिंसाचाराविरुध्द मशाल पेटवली तिच मशाल हाती घेऊ न स्त्रीहिंसाचाराविरुध्द लढण्यासाठी आम्ही कटीबध्द होत आहोत. स्त्रियांना पशू मानणार्‍या संस्कृतिविरुध्द आम्ही बंडाचा झेंडा हाती घेत आहोत. तुम्ही सत्यशोधक भगिनीभावाची बीजं पेरलीत आम्ही त्याचा महावृक्ष करण्याची शपथ घेत आहोत. हो आम्ही लढा बळकट करणार आहोत महिला आरक्षाणासाठीचा. जातीच्या नावणार अत्याचाराच्या वेदना भोगाव्या लागणाऱ्या भगिनींचा आवाज बनणार आहोत आम्ही. जगतिकीकरणाच्या तुरुंगात ढकलल्या गेलेल्या शेतकरी स्त्रियांची दुख वेशीवर मांडणार आहोत आम्ही. हो ‘मनूचा मेक ओव्हर’ घ्यायला निघालेलांचा समाचार घेणार आहोत आम्ही. बायकांनी १०-१० अपत्य जन्माला घाला अस सांगत आम्हाला फक्त जननयंत्र बनऊ पाहणाऱ्याविरुद्ध एल्गार पुकारणार आहोत आम्ही. हो नव्या पेशवाईला मुळासकट गाडणार आहोत आम्ही. साऊ, तुझाच कित्ता नव्या रूपात गिरवणार आहोत आम्ही. साऊ, तुमच्या स्मृतीदिनी हेच नमन!

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment