fbpx
राजकारण

बियर आणि पकोडे

या देशातील प्रमुख सत्ताधारी पक्षाला या देशाची बिलकूलच चिंता नाही, अशी टीका सध्या वारंवार होते आहे. मात्र हे काही योग्य नाही. आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चिंता आहे की, सध्या महिलांनी बिअर पिण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. तसंच त्यांच्याच सरकारमधील एक पूर्वाश्रमीचे स्वतःला फार पुरोगामी समजणारे एक विजय सरदेसाई नावाचे मंत्री आहेत, त्यांना गोव्यात येणारे स्वदेशी पर्यटक म्हणजे अत्यंत घाणेरडे किंवा फडतूस लोक आहेत, असा साक्षात्कार झाला आहे. हा शोध त्यांनी लावला म्हणजे त्यांना सोशलमिडियावर फिरणारी एक क्लिप दिसली म्हणे की एका बसच्या खिडकीतून एक माणूस रस्त्यावर लघूशंका करतो आहे. हे पाहिल्यावर विजयराव सरदेसाईंना गोव्याच्या अत्युच्च संस्कृतीची चिंता वाटू लागली व त्यांनी गोव्याच्या सरस्वती पुजकांनी बनविलेल्या जगभरातील अत्युच्च संस्कृततीला मलीन करणाऱ्या या घाणेरड्या लोकांपासून गोव्याला वाचवण्याच्या चिंतेपोटी असे विधान केले. इतकेच काय देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पकोड्याच्या विधानावरून देशभरात सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे राग आला आणि पकोडे बनविणाऱ्यांच्या विरोधात देशभरात अनेकजण उभे राहातात की काय, अशी चिंता वाटू लागली व त्यांनी सांगितले की हे काही योग्य बोलले जात नाही. पकोडे बनविण्याची अशा प्रकारे मस्करी करू नये.

तर देशाच्या राज्यकर्त्यांना अगदीच काही चिंता नाहीत, असे समजणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. प्रश्न अास आहे, की प्रत्येकाला कसली ना कसली चिंता असतेच ही चिंता नक्की कुणाची केली जाते त्यावरून चिंता करणाऱ्या विषयी सहानुभूती , आपलेपण, राग, लोभ, द्वेष विविध भावना अनेकांच्या मनात निर्माण होतात.

आता मनोहर पर्रिकरांची चिंताच पाहा ना. महिलांमध्ये बिअर पिण्याचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे त्यांना चिंता आहे. बिअर या पेयामुळे नशा येते. जवसाला आंबवून पुढे त्याचे उर्ध्वपतन करून वगैरे बिअर हे पेय बनवतात. या पेयाचे बरे किंवा वाईट जे काही परिणाम मानवी शरिरावर व्हायचे ते सर्वांवर सर्वसाधारपणे सारखेच होतात. म्हणजे बिअरचे प्रमाणात सेवन बरे किंवा अति सेवन वाईट, असे डॉक्टर वगैरे सांगतात. मात्र पुरुषाने बिअर प्यायल्यास ते फारच चांगले असते असे आजवर एकाही डॉक्टरने किंवा या विषयातील तज्ज्ञाने सांगितलेले माहित नाही. बिअर महिला पित असल्यामुळे पर्रिकरांना चिंता वाटते कारण ते संघाच्या मुशीतून आलेले आहेत. पहिल्या सरसंघचालकांपासून ते सध्याच्या सरसंघचालकांपर्यंत महिलांबाबत काय दृष्टीकोन आहे हे वेगळे सांगायला हवे असे नाही. स्त्रियांनी आपल्या पतीची सेवा करावी, इथपासून ते त्यांचे खरे कर्तव्य हे चूल व मूल आहे, बलात्कार हे इंडियात होतात भारतात होत नाहीत किती म्हणून उदाहरणे द्यावित. तर अशा विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या महनिय गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना महिलांनी बिअर पिण्याची चिंता वाटणे चूक नाही किंबहुना ते स्वाभाविकच आहे.

एकेकाळी स्वतःला अति डावे म्हणवणारे विजय सरदेसाई हे इकडून तिकडे पटापट उड्या मारण्यात पटाईत नेते आहेत. गोव्यातील निवडणुकीपूर्वी हे काँग्रेससोबत होते. नंतर भाजपचे तोडाफोडीच्या राजकारणातून सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी वेळेतच आपल्या निष्ठा भाजपच्या पायाशी वाहून मंत्रिपद पदरात पाडून घेतले. गोव्यात आलेल्या कुठल्यातरी पर्यटकांच्या बसमधून लंघूशंका करणाऱ्याची व्हिडिओ क्लिप दाखवून स्वदेशी पर्यटकांवर तोंडसुख घेणाऱ्या या महनिय मंत्र्यांना असा विद्वेष देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येकजण जर इतर राज्याबद्दल करू लागला तर एका जिल्ह्यापेक्षाही छोट्या असलेल्या या राज्यातील लोकांवरही फार मोठी नामुष्की येऊ शकते याचे भान नाही का? पण त्यांना चिंता आहे ते त्यांच्या गोव्यातील सरस्वतीपुजक अत्युच्च संस्कृतीचे त्यातून त्यांनी देशी पर्यटकांना शिव्या घातल्या तर मातृभू आणि पितृभूच्या गप्पा मारणाऱ्या संस्कृती रक्षकांना ते योग्यच वाटणार.

आता अनेक वेळा अनेकांनी चघळून चघळून बेचव झालेल्या पकोड्याकडे येऊ. पकोडा आणि पकोडे बनवणारे यांचा सध्या भाजपला इतता उमाळा आला आहे की, बॉम्बे टू गोवा या सिनेमातील त्या जाड्याप्रमाणे संपूर्ण भाजप अम्मा पकोडा म्हणून टाहो फोडत असल्याचाच आभास भारतीय जनतेला व्हावा.

उपराष्ट्रपतींपासून ते मध्यप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्यापर्यंत अनेकांना पकोडे तळणे हे फार मोठे कौशल्य असून हा रोजगार म्हणजे अदानींचे बंदर विकसित करण्याइतकाच मोठा व्यवसाय असल्याचा अविष्कार झाला असावा. मुळात मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे जे वचन २०१४ साली दिले होते त्या वचनपूर्तीच्याबाबतीत हे सरकार सपशेल तोंडावर आपटले आहे. खरेतर अच्छे दिनच्या टॅगलाईनखाली मोदी यांनी दिलेले कुठलेही वचन ते पूरे करू शकलेले नाहीत. अगदी त्यांची छप्पन इंचापर्यंत फुगलेल्या छातीकडे दुर्लक्ष करून अतिरेकी चक्क लष्कराच्या छवण्यांवर हल्ले करून आपल्या जवानांना शहीद करत आहेत. गेल्या साडेतीन वर्षामध्ये देशाचे जवळपास ४०० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. छाती छप्पन इंच फुगवण्याचा हाच अर्थ होता हे तेव्हा जनतेच्या लक्षात आले नाही इतकेच नाहीतर परिणाम काहीसे वेगळे दिसले असते. असो तर पकोडे तळणे व विकणे हा रोजगार नाही, असे नाही. किंबहुना तत्सम छोटे मोठे असे अनेक रोजगार आहेत. त्याला स्वयंरोजगार म्हणतात. ते रोजगार मोदींमुळे तयार होत नाहीत. ते मनुष्य स्वतःला जगण्यासाठी व त्याच्या कुटुंबाला जगवण्यासाठी करत असतो. जगात जन्माला आलेला प्रत्यक प्राणी हा त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी पोट भरतो व पोट भरण्यासाठी तो काही ना काही मार्ग शोधतोच. अगदी पक्षीसुद्धा झाडांवर घरटी बांधतात. तुम्ही झाडे पाडली तर ते घरटी बांधण्याचे सोडत नाहीत. ते स्थलांतर करतात किंवा इमारतींच्या खोबणींमध्ये घरटी बांधतात. तर मेंदुचा इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा प्रचंड विकास झालेल्या मनुष्य प्राण्याबद्दल तर बोलायलाच नको. त्यामुळे मोदींनी स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या प्रयत्नांवरून व त्यांच्या कष्टावरून स्वतःची पाठ थोपटून घेणे हा वावदूकपणा आहे, हे त्यांना सांगून समजणार नाही. ते त्यांना आता मतदानातून हळू हळू लक्षात येऊ लागले.

प्रश्न आहे तो या सगळ्यांना जी चिंता आहे त्यापेक्षा वेगळी चिंता देशातील जनता करते आहे. मात्र या सगळ्या महनिय नेत्यांना व त्यांच्यासाठी दिवसाचे तासन तास काही सकारात्मक काम करायचे सोडून सोशलमिडियावर वेळ काढणाऱ्या त्यांच्या भक्तांना मात्र एकच चिंता आहे ती म्हणजे दिवसागणिक जवळ येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काय होणार याची. त्यामुळेच महिला बिअर पिऊ लागल्या आहेत इथपासून ते पकोड्यापर्यंत अनेक गोष्टींच्या चिंतांनी त्यांना ग्रासले आहे. या सगळ्यांमध्ये काही प्रामाणिक लोकही आहेत. भाजपचे खासदार व ज्येष्ठ खासदार स्वपनदास गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून असलेली एक भिती व्यक्त केली आहे. स्वपनदास म्हणतात की जर २०१९ साली मोदी सत्तेवर आले नाहीत तर भारत पुन्हा एकदा अस्थिरतेच्या खाईत लोटला जाईल. ही भिती जाहिरपणे व्यक्त करणाऱ्या स्वपनदास यांचे कौतूक करायला हवे. कारण वर उल्लेखिलेल्या किंवा देशभरात विविध प्रकारच्या चित्रृविचित्र वक्तव्यांद्वारे चिंता व्यक्त करणाऱ्या सगळ्या महनीयांच्या मनातील सर्वात मोठी भिती स्वपनदास यांनी उघडपणे देशातील एका मोठ्या वर्तमानपत्रात लेख लिहून व्यक्त केली आहे. अर्थात भितीवर मात करण्यासाठी त्यातून मार्ग काढावा लागतो. चिंता २०१९ची असेल तर जी मायबाप जनता ती खुर्ची देणार आहे, त्यांच्या भल्यासाठी काही करू नका किमान त्यांना जी वचने २०१४ला निवडणुकीच्या दरम्यानम दिली होती, त्याच्या १० टक्के वचने जरी पूर्ण केली तरीही ही जनता तुमच्या नावाने गुलाल उधळेल. पण त्याच्याऐवजी नको ते सल्ले देत राहिलात आणि पॅलेस्टीनमध्ये मोदींचे स्वागत किती ग्रेट झाले म्हणून स्तुतीसुमनांचे ढीग रचू लागलात, तर मात्र सध्याच्या सोशलमिडीयाच्या काळात लोकांची स्मरणशक्ती दीर्घकालीन टीकवली जाते हे लक्षात ठेवायला लागेल. २०१४च्या निवडणुकीत पूर्वीच्या सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या त्या काकू, तो गणप्या अजूनही लोकांच्या मोबाईलवर सेव्ह आहेत. अर्थव्यवस्थेची जी काय अवस्था मोदीजींनी आणली त्यामुळे लोकांनी गेल्या साडेतीन वर्षात मोबाईलही बदललेले नाहीत, हे लक्षात ठेवावे व भलत्या सलत्या चिंता आपल्या पक्षाच्या नेत्यांनी करणे सोडून द्यावे, खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाची चिंता करावी असा सल्ला आदरणीय मोदीजींनी आपल्या पक्षातील धुरीणांना द्यावा.

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

1 Comment

  1. sapkal ganesh Reply

    avedhydaru satta aani deshidaru chi tochanari batmi payje sar

Reply To sapkal ganesh Cancel Reply