fbpx
विज्ञान

राम लीला

सैद अलीपूर हा हरियाणातील एक मागास जिल्हा आहे. येथील राम किसान यादव हा इसम गेल्या दहा पंधरा वर्षांत प्रसिद्धीच्या झोतात आहे. शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नसले, तरी, योगासने, प्राणायाम शिकविणे , मग त्याला जोडून आयुर्वेद आणि पुढे जाऊन नूडल्स पासून ते साबणा पर्यंत विविध वस्तू बनवून त्यांची जाहिरात करणे, आणि सरकार, नोकरशाही मध्ये अर्थपूर्ण संबंध जोपासून त्या जोरावर धंदा भूमिती श्रेणीने वाढविण्याचे याचे कसब अचंबित करणारे आहे.
अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनात याने उडी घेतली होती. काळेधंन परत आणण्यासाठी, भ्रष्टाचार मिटविण्यासाठी हा बाबा स्वतःचे शीरही कापून देईल असे ऐकणाऱ्याला वाटावे एवढ्या पोट तिडकीने हा कळवळून दूरदर्शन वाहिन्यांच्या मुलाखतींत बोलत असे.
प्रत्यक्षात एप्रिल २०१४ मधेच या बाबाचे ढोंग एका पत्रकार परिषदेत उघडे पडले होते. समोर माईक असल्याचे विसरून, भाजपच्या जिल्हा पातळीवरील एक नेता, महंत चंद नाथ, बाबा बरोबर गपशप करू लागले, विषय पैशाचा निघाला. चंद नाथ बाबाला सांगू लागला कि हल्ली फार कठीण परिस्थिती आहे. रोकड इथून तिथे पाठवायची फार मुश्किल झाले आहे, बाबा ने त्याला कुजबुजत झापला. अरे गप की लका, समोर माईक आहे, आपण काय बोलतोय ते जगाला ऐकू जातंय, म्हणाला बाबा. हा व्हिडियो आजही यु ट्यूब वर पाहायला मिळतो (https://www.youtube.com/watch?v=fqZk1uUEk8c)

बाबाच्या कथनी आणि करनी मध्ये फरक आहे, बाबाने योगविद्येचा आणि आयुर्वेदाचा धंदा केला, बाबा संन्याशाचे सोंग घेऊन मायेच्या मागे लागलाय हे आक्षेप घेण्यात काही हशील नाही. बाबाने धंदा करावा, पैसा कमवावा, त्याची मर्जी. आक्षेप या गोष्टीवर आहे की बाबाचा धंदा फसवणुकीवर आधारित आहे.
बाबा धादांत खोट्या गोष्टी सांगतोय, जनतेला फसवतोय आणि सरकार कारवाई करायचे सोडून त्याला कुठे सवलतीत जमीन दे, कुठे करांमध्ये सूट दे असले उद्योग करतंय. त्याच्या कार्यक्रमांना मंत्रीगण हजेरी लावतात, बाबाची सरकारमधील उच्चपदस्थांबरोबरची उठबस जनता टी व्ही वर पाहते. बाबाच्या गंडवायच्या धंद्यात सरकार सहभागी आहे हा दुसरा आक्षेप आहे.
सोबत जोडलेली बाबाची एक जाहिरात पहा. तीत म्हंटलय की” पंचवीस वर्षाच्या आमच्या सखोल संशोधनानंतर, एक करोड रुग्णांवर प्रयोग करून सिद्ध झालेले हे आमचे आयुर्वेद मिशन आज निकोप जीवन शैलीच्या रूपाने देशास अर्पण करण्यात आनंद वाटतो”. एक करोड लोकांवर प्रयोग केले ? कोणी केले ? कोण डॉक्टर, संशोधक यात सहभागी होते? कुठली युनिव्हर्सिटी, आरोग्य विद्यापीठ यात सहभागी होते? कुठे केले ? त्याच्या नोंदी कुठे आहेत ? कोठल्या आरोग्य नियतकालिकांत हे प्रसिद्ध झाले ?
एक कोटी रुग्णाचे संशोधन, एका रुग्णाची नोंद एका पानावर धरली तरी एक कोटी पानांच्या नुसत्या नोंदीच होतील. ३०० पाने प्रति खंड, या हिशोबाने फक्त रुग्ण नोंदीचे ३३ हजार खंड होतील. कुठे आहेत ह्या संशोधनाच्या नोंदी ? कशाचाच काही पत्ता नाही, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.
पुढे अजून अकलेचे तारे याच जाहिरातीत तोडले आहेत. ” दिव्य मधुमशिनी, हे आमचे औषध स्वादुपिंडास मजबूत करते व मधुमेह नैसर्गिक रित्या बरा करते ” असे जाहिरात म्हणते. स्वादुपिंड मजबूत करणे आणि त्यायोगे मधुमेह आटोक्यात आणणे ही अव्व्ल थाप आहे. मधुमेह नेमका कसा होतो याच थोडं जरी ज्ञान या जाहिरात लिहिणारास असते, तर ही अक्षरे त्याच्या लेखणीतून उमटलीच नसती.
याच जाहिरातीत पुढे म्हंटलय की देशभरात, स्वामीजी आणि आचार्यजी यांच्या दैवी मार्गदर्शनाखाली निष्णात झालेल्या दहा हजार वैद्यांकरवी, दहा हजार आरोग्य केंद्रे व दवाखाने चालविली जातात. कोण हे स्वामीजी आणि आचार्यजी ? हे काय शिकलेत आणि कुठे शिकलेत ? दैवी मार्गदर्शन म्हणजे काय ? आणि दहा हजार दवाखाने ? काय या बेसुमार थापा !
याच जाहिरातीत पुढे म्हंटलय की संशोधन आणि प्रकाशन या क्षेत्रात आमच्या संस्थेमध्ये २०० तज्ज्ञ अहोरात्र योग व आयुर्वेद या मध्ये संशोधन करण्यात गुंतलेले आहेत. कोण हे २०० तज्ज्ञ ? त्यांचे शिक्षण काय आणि कुठे झालेय ? हे रिसर्च सेंटर आहे तरी कुठे ? कसला रिसर्च करताय ? खरं तर कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने काही वर्षांपूर्वीच भारतातील पारंपरिक औषधी वनस्पतींचे सखोल डॉक्युमेंटेशन काही वर्षांपूर्वीच प्रसिद्ध केलय.
बंगलोरस्थित “फाउंडेशन ऑफ रिव्हाईटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रॅडीशन्स” या डॉक्टर दर्शन शंकर यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या संस्थेने सुद्धा अशाच स्वरूपाचे काम प्रसिद्ध केले आहे. या बाबाचे २०० संशोधक नेमके काय दिवे लावतायत ? त्यांचं तथाकथित रिसर्च वर्क कधीच प्रकाशित कस काय झालं नाही ?
बाबा रामदेव, त्याचा कोण तो आचार्य आणि जाहिरातीत सांगितलेले त्याचे हे दोनशे संशोधक यांची अक्कल काय असेल याची एक झलक जाहिरातीतच दिसते.
“फार्माकोलॉजि आणि क्लिनिकल ट्रायल ” या मथळ्याखाली लिहिलंय की ” आधुनिक वैद्यक फार विक्षिप्त पद्धती औषधे शोधण्यासाठी वापरते. ब्लड प्रेशर, कँसर व डायबिटीसचे विषाणू हे लोक आधी उंदरांमध्ये टोचतात, आणि मग त्यांना वेगवेगळी औषधे देऊन, कोठल्या औषधाचा इष्ट परिणाम होतो ते शोधत बसतात ” ब्लड प्रेशर, कँसर आणि मधुमेह हे विषाणूमुळे होतात हे जर बाबाचे ज्ञान असेल तर बाबा औषध काय जबरी बनवीत असेल याचा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.
तर असा हा आपला रामदेव बाबा सध्या चर्चेत आलाय तो अलीकडेच मद्रास आय आय टी मध्ये होऊ घातलेल्या कॅन्सर परिषदेच्या गोंधळामुळे. बाबा रामदेव हा आजवर योगगुरू म्हणून जगाला ज्ञात होता, गेल्या काही वर्षांत तो हजारो कोटीची उलाढाल करणारा उद्योगपती म्हणूनही प्रसिद्ध झालाय. परंतु हा माणूस डॉक्टर कधीच नव्हता. जेमतेम पाचवी शिकलेल्या या इसमास वैद्यकाचे ज्ञान असेल अशी अपेक्षाही करता येत नाही. परंतु आय आय टी मद्रास येथे होऊ घातलेल्या कॅन्सर परिषदेसाठी आय आय टी ने या रामदेव बाबाला वक्ता व प्रमुख अथिति म्हणून निमंत्रित केले. कँसर वरील आयुर्वेदिक औषोपचाराविषयी त्याचे भाषण परिषदेत ठेवले. देशभरातील कॅन्सर तज्ज्ञांना रामदेव कँसर रोखण्यासाठी व झालेला कँसर बरा करण्यासाठी काय उपचार करावेत याचे ज्ञान देणार होता. गाईचे मूत्र पिऊन कँसर बरा होतो अशी रामदेवची श्रद्धा आहे. तसे त्याने वेळोवेळी बोलूनही दाखविले आहे. रोज पाचहजार लिटर गोमूत्र गोळा करण्याचा प्रकल्पही तो उत्तराखंड सरकार च्या सहकार्याने उभा करण्याच्या बेतात आहे.
या परिषदेची जी काही जाहिरात आय आय टी ने केली, त्यात परिषदेच्या प्रयोजकांमध्ये एक नाव एम डी अँडरसन कँसर रिसर्च इन्स्टिट्यूट या ऑस्टिन, टेक्सास विद्यापीठ या नामांकित संस्थेचेही होते. सदर जाहिरात पाहून काही ट्विटर युजर्सनी, जिथे रामदेव सारखा फ्रॉड माणूस प्रमुख पाव्हणा आहे अशा परिषदेतील अँडरसन इन्स्टिट्यूट च्या सहभागावर प्रश्नचिन्ह उभे केले. अँडरसन इन्स्टिट्यूटने ट्विटर वर तात्काळ खुलासा केला : “आम्ही भूतकाळात या परिषदेचे निमंत्रक, प्रायोजक राहिले आहोत. परंतु या खेपेस मात्र आमचा या परिषदेत काहीही अधिकृत सहभाग नाही, आमच्या इन्स्टिट्यूट पैकी कोणी तिथे दिसलाच, तर तो त्याच्या वैयक्तिक हौसेपोटी, व्यक्तिगत खर्चाने आला आहे असे समजावे”
या अमेरिकन इन्स्टिट्यूटने रामदेवच्या परिषदेतील प्रमुख पाहुणा असण्यावरून परिषदेस दुरूनच दंडवत घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, लाजे पोटी कि काय रामदेव बाबाने सुद्धा आपण या परिषदेस जाणार नसल्याचे जाहीर केले. आता अँडरसन इन्स्टिटूटही सहभागी नाही, रामदेव सुद्धा येणार नाही, मधल्या मध्ये आय आय टी मद्रासची नाचक्की मात्र झाली. आय आय टी मद्रास चे प्राध्यापक डॉक्टर करुणारंगन म्हणाले, अँडरसन इन्स्टिटयूट नेहमीच ही परिषद प्रायोजित करते. या वर्षीसुद्धा त्यांनी तसे आश्वासन दिले होते. आता का मागे फिरले काय कळत नाही. रामदेव बाबाचे इतर कोठल्यातरी कार्यक्रमांस त्याच तारखेला अगोदरच जायचे ठरल्यामुळे त्याला इथे यायला जमणार नाहीये, इन्स्टिट्यूटच्या सहभागी न होण्याचा काही संबंध नाही असं ही करुणारंगननी पत्रकारांना सांगितले.
गेल्या नोव्हेंबर मध्ये हिमंता बिस्वा शर्मा या भाजपाच्या आसाममधील आरोग्य मंत्र्याने, माणसाला जडणाऱ्या व्याधी हे त्याच्या कर्माचे फळ आहे. कधी कधी आपल्याला एखादे लहान मूल कॅन्सरने जर्जर झालेले दिसते, ते त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असते. प्राक्तनात जे असते ते माणसाला भोगायलाच लागते असा कर्मविपाकाचा सिद्धांत आपल्या भाषणात सांगितला होता. अशा सिद्धांतावर पूर्ण विश्वास असणारे लोक सत्तेत असले की त्यांचा आरोग्यमंत्री असे जाहीरपणे बोलेल तर त्यात नवल असे काहीच नाही. खरं तर एकदा कर्मसिद्धांत पटवून घेतला की सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेचा भार उचलणे किती व्यर्थ आहे ते लगेच लक्षात येते. उगाच वायफळ खर्च कशाला करा ? गेल्यावर्षी ऑक्सिजन अभावी उत्तर प्रदेश मधील सरकारी इस्पितळातील तीस मुले तडफडून मेली. त्यांचे गतजन्मातील कर्माचे फळ त्यांना मिळाले. कशाला फुकट बोंबाबोंब करता ? तरी विरोधक आणि मीडिया, हिमंता बिस्वाच्या विधानावर तुटून पडले. त्यावेळी बाबा रामदेव बिस्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. रामदेव त्यावेळी पत्रकारांना म्हणाला की सर्व काही कर्माशी जोडलेले आहे. जन्म आणि मृत्यू कर्मानेच होतो. आजार होण्यास बरीच इतरही कारणे असू शकतात परंतु कर्म हे निश्चितच एक महत्वाचे कारण आहे.

खरं तर आय आय टी जी संस्था, अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. जगभरात आय आय टी च्या नावाचा दबदबा आहे. येथे चालणारे संशोधन आणि येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वादातीत मानली जाते. राज्यकर्त्यांच्या विचारधारेशी स्वतःस सुसंगत करण्याच्या नादात, मद्रास आय आय टीने रामदेव सारख्या निखळ भोंदू इसमाला एका गंभीर शास्त्रीय परिषदेत मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित केले. आय आय टी ने आमंत्रण दिल्यावर अँडरसन इन्स्टिट्यूट ने परिषदेतून माघार घेऊन भारतातील तमाम शैक्षणिक व संशोधन संस्थांसाठी स्पष्ट संदेश दिला आहे.
” तुम्हाला तुमच्या राज्यकर्त्यांचे लांगूललाचंन करणे शास्त्रीय संशोधनापेक्षा महत्वाचे वाटत असेल, आणि त्यासाठी कंबरेचे सोडून डोक्याला बांधायची तुमची तयारी असेल, तर खुशाल करा. नागडे नाचलात तरी आमची काही हरकत नाही. पण यात आमचे नाव वापरू नका. विज्ञानाच्या नावाखाली भोंदूगिरीस प्रतिष्ठा देण्याच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही”

 

लेखक जोहान्सबर्गस्थित व्यवस्थापन सल्लागार आहेत. इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, संविधान हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.

Write A Comment