fbpx
राजकारण

मोदी नावाचा चमत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी लोकसभेत केलेल्या भाषणाभोवतीच आता संपूर्ण राजकीय विश्व फिरू लागले आहे. मोदींची हीच कला त्यांना कायम तारून नेते. याच जीवावर त्यांनी गुजरात दंगलीचा त्यांच्यावर असलेला डाग धुवून टाकला. गुजरातने आर्थिक विकासाचे नवे आयाम कायम केल्याचा आभास निर्माण केला आणि त्यात केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण देशाला गुरफटून टाकलं.

नरेंद्र मोदींवर तुम्ही प्रेम करा किंवा त्यांचा द्वेष करा त्यांना तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही, असं त्यांचे विरोधकही म्हणतात. मोदींची ही ताकत नक्की कशात आहे, याबाबत विविध राजकीय तज्ज्ञ तसेच राजकीय नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. मोदींनी देशात धार्मिक उन्माद वाढविण्याचं काम केलं, असा गुजरात दंगलीनंतरचा सर्वसाधारण समज आहे. मात्र असे असेल तर बाबरी मशिदीच्या ध्वंसानंतर मुस्लिमांविषयीचा द्वेष अधिक वाढला की गुजरात दंगलीनंतर याचाही विचार व्हायला हवा. मोदी ज्या संघाच्या मुशीतून तयार झालेलं नेतृत्व आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मापासून त्यांनी मुस्लिम, ख्रिस्ती, कम्युनिस्ट यांच्या विषयी कधी प्रेमाची भूमिका घेतली होती, त्यांची या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याची भूमिका ही आजची आहे काय, याचाही विचार करायला हवा. अटलबिहारी वाजपेयी हे सर्वधर्मसमभाव मानणारे संघातून आलेले नेते होते काय? मोदी सत्तेवर येईस्तोवर गेली नव्वद वर्षे संघाचे राजकारण काय होते, मग नेमके मोदींनाच इतके प्रचंड बहुमत कसे काय प्राप्त झाले, अशा अनेक प्रश्नांची मालिकाच यामुळे तयार होते. त्याची उत्तरे शोधल्याशिवाय मोदींचा पेच सुटणे थोडे कठिण आहे.

मोदी यांची विचारधारा कधीच लपून राहिलेली नाही. किंबहुना संघाच्या मुशीतून आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याची तशी ती लपून राहात नाही व तेही तसा प्रयत्न कधी करत नाहीत. प्रश्न आहे तो मुस्लिम द्वेषावरच इतके प्रचंड बहुमत मिळायचे होते तर ते नेमके मोदींनाच का मिळाले, की त्याच वेळी नक्की समाजातील मुस्लिम द्वेषाने अत्युच्च पातळी गाठली होती व त्यामुळे आता संघाच्या मुशीतील व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवायला हवे, असा विचार भारतीय जनमानसाने केला असावा, असाही एक प्रश्न उपस्थित होतो.

मोदींचे विकासाचे मॉडेल व त्याने देशभरातील मध्यमवर्गीयांना घातलेली भूरळ, भारताला विकसित देशांच्या मांदीयाळीत उभे करण्याचे त्यांनी जनतेला दिलेले वचन याचा त्यांच्या यशामध्ये नक्की किती वाटा होता हेदेखील तपासायला हवं. अशा कितीतरी मुद्द्यांनी मिळून मोदी हा फिनाॅमेनन बनलेला आहे. मोदींबद्दल सामान्य माणसामध्ये असलेलं आकर्षण मात्र ही व्यक्ती आपल्यातलीच एक कुणीतरी आहे या मुद्द्याभोवतीच घोटाळणारं आहे. ऐंशीच्या दशकाच्या शेवटापासूनच या देशातील मध्यम जातींच्या राजकीय आकांक्षा वाढू लागल्या होत्या. नव्वदीच्या दशकात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर त्या भारतीय राजकीय पटलावर अधिकाधिक सुस्पष्टपणे अधोरेखित झाल्या. या सगळ्याचा अंदाज संघातील धुरिणांना आला होता. किंबहुना मनुस्मृतीला प्रमाण मानणारी संघटना उभी करताना लोकशाही चौकटीत राज्यसंस्था हाती येणे कठिण आहे याची पूर्ण कल्पना गोळवलकरांना होती. किंबहुना तोच त्यांच्या आणि सावरकरांमधील वादाचा मुख्य मुद्दाही होता. संसदीय लोकशाहीत जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे सुस्पष्ट होतं. असं असताना ब्राह्मणी अधिसत्ता कायम करण्यासाठी फाळणीने संघाला फारच सोपा फार्म्युला दिला. मुस्लिमांना शत्रू दाखवल्यावर जातीचे अभिनिवेश काही काळा पुरते का होईना गळून पडतात हे त्यांच्या लक्षात आलं. संघाच्या नाड्या जरी ब्राह्मण समाजच्या हातात ठेवल्या तरी सत्तेची पदे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना देण्याचे राजकीय शहाणपण संघाने कायम दाखवले. त्यातूनच गोपिनाथ मुंडे, कल्याण सिंग, उमा भारती, नरेंद्र मोदी आदी प्रभुतींना भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वात स्थान मिळाले होते.

मोदींनी स्वत:च्या प्रतिमेचे वृद्धीकरण करताना जाणीवपूर्वक या देशातील निम्न स्तरीय जात वर्गाच्या राजकीय आकांक्षांना फुंकर घालण्याचे काम केले. स्वत:ची चायवाला म्हणून त्यांनी उभी केलेली प्रतिमा असो वा सुरुवातीला प्रियंका गांधी यांनी त्यांना निच संबोधताच स्वत:च्या निम्न जातीय प्रतिमेला दिलेली ही शिवी आहे हा त्यांचा पलटवार असो हे त्यांच्या राजकीय रणकुशलतेचेच द्योतक होते. त्यांच्या चायवाला असण्याची टवाळी तेव्हा काँग्रेसमधील केंब्रिज शिक्षित मणीशंकर अय्यर यांनीतर उडवलीच पण सोशल मिडियावरुनही मोदी विरोधकांनी त्याची यथेच्छ टिंगल टवाळी केली. मोदींचे चायवाला असणे हे या देशातील साठ पासष्ठ टक्के जनतेला त्यांच्याशी थेट नाळ जोडणे आहे याचे भानच संबंधित प्रभुतींना नव्हते असे दिसते.

मोदी हे भारतातील अभिजन शासक वर्गापैकी नाहीत. त्यांना फाड फाड इंग्रजी येत नाही. ते ओबीसी आहेत. ते पूर्वी चहा विकायचे या गोष्टींनी या देशातील बहुतांश लोकांच्या नेणिवा ते आपल्यातलेच आहेत या विचारांनी व्यापून गेल्या. एकीकडे संघाच्या उच्च वर्णीयांची साथ व दुसरीकडे बहुजनांच्या आपडो माणसने व्यापलेल्या नेणिवा ही त्यांच्या ताकदीची मुख्य कारणे आहेत. त्यांचे संसदेतील भाषण व त्यापूर्वी त्यांनी झी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पकोडे विकणे हा रोजगारच असल्याचा लावलेला दिव्य शोध याकडे या राजकीय रणनितीचा भाग म्हणून पाहिल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
संसदेतील भाषणाचा सगळा भर हा गांधी घराण्यावर होता. त्यासाठी त्यांनी अगदी पं. नेहरूंच्या जागी पटेल पंतप्रधानपदावर बसण्याच्या लायकीचे होते इथपासून सुरुवात केली. त्याला ऐतिहासिक दाखल्यांनी मोदीविरोधक उत्तरे देत आहेत. त्याने मोदी समर्थक जनाधाराला फारसा फरक पडणार नाही. कारण मोदी हे प्रकरणच मुळात अतार्किक आहे. जिथे तर्काची पोच संपते तिथेच असे फिनाॅमेनन तयार होतात. मोदींनी त्यांच्या जनाधाराला हाच संदेश दिला की, तुमच्यातलाच मी एक, साधा चहावाला, तेली समाजतला, इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील किंवा ल्युटन्समधील इंग्रजी बुद्धिवंतांना न आवडणारा. मी पंतप्रधानपदी आल्याने आपल्यापैकी बाकी कुणाच्याच नाही तर गांधी घराण्याच्या पोटात दुखते आहे. गांधी घराणे हे या देशातील राज घराणे असल्याचीच धारणा या देशातील गांधी घराण्याच्या विरोधातील व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अशा दोन्हींच्या मनात पक्की आहे. या राज घराण्याची सत्ता एका चहावाल्या तेली समाजाकडे आल्याचे त्यांना पचत नाही. त्यांना ते शेतकरी पटेलांकडेही जाऊ नये असे ४७ साली वाटत होते, याच राजघराण्यातील एक राजीव गांधी यांनी तो पंतप्रधानपदी असताना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी अंजय्या या शेतकरी रेड्डी जातीतील मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या आपमानाचाही दाखला मोदी यांनी दिला. मोदींनी आपल्या जनाधाराच्या मनावर हेच ठसवायचा प्रयत्न केला एक चहावाला, तेली समाजाचा नायक जो आज पकोडे तळणाऱ्यांच्या बाजूने बोलतोय त्याच्या वाटेत हे उच्च वर्णीय, इंग्रजी बेलणारे राज घराण्यातील अभिजन आडकाठ्या आणत आहेत.

त्यांच्या राज्यसभेतील भाषणाच्या दरम्यान काँग्रेसच्या रेणुका चौधरी मोठ्याने हसल्यावर त्यांनी रामायण सिरियलमधील शुर्पणखेचे नाव न घेता तिची उपमा रेणुका चौधरींना देऊन टाकली. अनार्य शुर्पणखेचे आर्य लक्ष्मणाने नाक कापून तिला विद्रुप केल्याचं हे उदाहरण खरतर काँग्रेस पक्षाला खूप चांगल्या पद्धतीने मोदींवर उलटवता येऊ शकले असते. मात्र चौधरी यांनी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नरमाईचा सुर लावत पंतप्रधान आधारवर बोलत असताना चुकीचे बोलत असल्याने मी हसले वगैरे असली थातुरमातुर कारणे दिली. मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत चहाच्या जीवावर अच्छे दिनचे स्वप्न दाखवत बाजी मारून नेली होती. मोदी येती निवडणूक पकोड्याच्या जीवावर आणखी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मारून नेण्याची रणनिती आखत आहेत.

याला तर्काने भांडणे हा इलाज खचितच नाही. पकोडे विकणे हा रोजगार असेल तर देशातील कोट्यवधी बेकारांना काँग्रेसने त्यांच्यासाठी लढण्याची जबाबदारी उचलून पकोड्याच्या गाड्या जिकडे जागा मिळेल तिकडे सुरू करायला सांगावे. देशभरातील सर्व मोक्याच्या जागी बेकारांनी ठाण मांडून बसावे व अर्थार्जन करावे. याला नियमाकडे बोट दाखवून शसानाने उठवण्याचा प्रयत्न केल्यास मात्र काँग्रेसने असेल नसेल तितकी ताकद एकवटवून त्याच्या विरोधात उतरायला हवे.

विनय कटियार जर म्हणत असतील की या देशात मुसलमानांना जागाच नाही. त्यांनी हिंदू व्हावे किंवा पाकिस्तानत जावे किंवा जर ते म्हणत असतील की ताजमहाल पाडूनच टाकायला हवा, तर त्यांना विरोधकांनी थेट हे करून दाखवाच अन्यथा फुकाच्या बाता मारू नका असे सांगायला हवे. माणूस माकडापासून झाला नाही हा दिव्य शोध लावणाऱ्या शिक्षण मंत्र्याकडे संसदेतच हे अभ्यासक्रमात घालून दाखवा व मग तोंड वर करून बोला हे आव्हान द्यायला हवे.

मात्र हे करण्याऐवजी जर याच्या विरोधात तर्क देण्याचे काम विरोधक करत राहिले किंवा फोटोशॉप साठी उच्च शिक्षित विद्यार्थ्याकडून पकोडे तळून त्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्याकडेच लक्ष पुरवले तर त्याचा उलटा परिणामच हेण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय आकांक्षा वाढलेल्या बहुजनांना मोदी त्यांची शुद्ध फसवणूक करत असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या आकांक्षांची परिपूर्तता ही मोदी नाही तर आम्ही करू शकतो याचा विश्वास जागृत करावा लागेल. तो चिदंबरम, सिब्बल, सुरजेवाला या आॅक्सफर्ड, केंब्रिज शिक्षित इंग्रजी उच्च वर्ग वर्णीयांच्या हातात सत्ता देऊन ती अत्यंत तार्किकपणे चालवण्याच्या उदाहरणातून होऊ शकत नाही, हे लक्षात येईल तेव्हाच मोदी या राजकीय प्रश्नाचे उत्तर सापडेल.

लेखक मुंबईस्थित राजकीय विश्लेषक व राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

Write A Comment