fbpx
कला

भन्सालीचा पद्मावत :  बडा घर पोकळ वासा

 

संजय लीला भन्सालीचा पद्मावत अखेर भारतभर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी लाखो प्रेक्षकांनी परंपरावाद्यांच्या विरोधाला न जुमानता तो थिएटरवर जाऊन बघत सुमारे ५० कोटींचा गल्ला मिळवून दिला. जौहार आणि सतीप्रथेपेक्षा थेटरात जाऊन पिक्चर बघण्याची प्रथा आधुनिक आणि आधुनिकोत्तर भारतात मोठी आहे.

गेलं वर्षभर पद्मावतीच्या नावाने श्री करणी सेना, भारतीय क्ष‌त्रिय समाज, सूरजपाल अमू सारखे भाजपचे बेताल नेते आणि अनेक तथाकथित परंपराभिमानी उर बडवत होते. भन्साली आणि दीपिका पदुकोणचं मुंडकं छाटून आणणाऱ्याला ५ कोटी आणि दीपिकाचं नाक कापून आणणाऱ्याला १० लाखांची बोली लागली होती. अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका करणाऱ्या रणवीर सिंगचे पाय छाटून आणा, असं फर्मान निघालं होतं. हा सिनेमा प्रदर्शित झाला तर शेकडो रजपूत स्त्रिया जौहार करायला मळवट भरून तयार होत्या. करणी सेनेसह अनेक सेना थिएटरवर हल्ला करायला सज्ज झाल्या होत्या. बसगाड्यांची तोडफोड, दुकानांची लूटमार अशा दंगलसदृश वातावरणाचं नेपथ्य लावून झालं होतं. पण ह्या सगळ्या बनावाशी आम पब्लिकला देणंघेणं नव्हतं. ह्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लोकांनी सिनेमा बघितला आणि त्याच्यात बंदी आणण्यासारखं काय आहे, असा उलटा सवाल करून करणी सेनेला उताणी पाडलं. लोकेन्द्र कालवी नावाच्या करणी सेनाप्रमुखाचा राजकीय अजेंडा धुळीला मिळवला.

पद्मावत लोकप्रिय झाला आहे आणि हीटही झाला आहे, हे पहिल्या दोन दिवसांतच स्पष्ट झालं आहे. 200 कोटींचा हा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा कदाचित उत्पन्नाचे नवे विक्रमही रचेल. पण म्हणूनच त्याच्या गुणवत्तेचंही मोजमाप करणं गरजेचं होऊन बसलं आहे. कसा आहे हा संजय लीला भन्साली या नव्या शोमनचा पद्मावत? तो नेत्रदीपक आहे, भव्य आहे, सुंदर फ्रेम्स, अप्रतिम रंगसंगती, मधुर संगीत यांनी युक्त आहे; पण आतून पोकळ आहे. भुसा भरलेल्या सुंदर बाहुलीसारखा तो आपल्या समोर स्वतःला मिरवत राहतो, पण प्राण नावाची गोष्ट त्यातून गायब आहे. तो जिवंत असल्याचा भास होतो. युद्धाच्या दृश्यांमुळे, नृत्यगायनाच्या प्रसंगांमुळे, जौहार करायला निघालेल्या रजपूत बायकांच्या मागे घोंघावणाऱ्या प्रचंड कोरसमुळे शौर्याचा, त्यागाचा, उदात्ततेतचा भास होत राहतो. पण ह्या सगळ्यामागचं मानवीमन दिसत नाही. पद्मावतची गोष्ट एका वाक्यात सांगता येईल. एका सुंदर स्त्रीला आपल्या हवसची शिकार बनवायला निघालेल्या एका क्रूर, दुष्ट आणि स्त्रीलंपट राजाची फजिती. आमच्या गिरणगावात मी लहानपणी पाहिलेल्या जल्लाद, मंत्रपुष्पांजली सारख्या कामगार रंगभूमीवरच्या नाटकांचे प्लॉट याहून वेगळे नसत. त्यात सुद्धा ट्रीक सीन्स असत आणि आम्ही ते डोळे विस्फारून बघत असू. पद्मावत मधल्या क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजीचे चाळे मंत्रपुष्पांजली मधल्या जादुगाराहून वेगळे नाहीत. पण ती नाटकं करणारे बाळ बागवे, आप्पा घाडी ही मंडळी लालबाग-चिंचपोकळीच्या कोपच्यात शेवट पर्यंत राहिली. भन्साली मात्र सातासमुद्रापार पोचला आहे. कारण त्याची स्वप्नं मोठी आहेत. दौड पंचकल्याणी घोड्याची आहे. त्याचं रंगरेषांचं ज्ञान मोठं आहे. ऐवज मांडायची चतुराई आहे. त्याच्या मागे वायकॉम १८ आणि कोण कोण उभं आहे. असू दे. आपण त्याचा ऐवज बघू.

पद्मावतच्या आधी संजय लीला भन्सालीने बाजीराव मस्तानी आणि रामलीला हे चागंले सिनेमे दिले. ते आशयात उजवे होते आणि सादरीकरणातही. ह्याच भन्सालीने गुजारिश ही सुंदर फिल्म दिली. अर्थात त्यानेच कचकड्यांचा देवदासही दिला. पण एकुणात तो काही गयागुजरा सिनेमावाला नाही. तो डोकं ताळ्यावर ठेवून सिनेमाला भिडतो. तसा त्याचा लौकिक आहे. पण पद्मावत मध्ये हा लौकिक कामाला येत नाही. पद्मावत हा मलिक मुहम्मद जायसी या सुफी संताच्या साहित्यकृतीवर आधारलेला आहे आणि तो कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही, असं चित्रपट सुरू होण्याआधी सांगितलं जातं. मूळात पद्मावतीच्या इतिहासदत्त अस्तित्वाविषयीच अनेक शंका आहेत. जायसीच्या काव्यामुळे ती दंतकथा झाली आणि राजपूतांच्या अस्मितेचं प्रतिक बनली. म्हणजे भन्साली एक दंतकथा आपल्या कलाकृतीचा विषय म्हणून निवडतो. ही दंतकथा निवडताना लोकमानसात असलेल्या तिच्यातल्या पात्रांच्या रूढ प्रतिमेचं ओझं त्याच्यावर आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे तो पद्मावती म्हणजे शील आणि त्याग, महारावळ रतनसिंह म्हणजे शौर्य, अल्लाउद्दीन म्हणजे वासना अशी तो कप्पेबंद विभागणी करून आपल्या पात्रांना टाइपकास्ट करून टाकतो. त्या व्यक्तिरेखा बनण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकतो. अल्लाउद्दीनच्या सहृदयतेचा एकही क्षण दिसणार नाही, रतनसिंहाच्या ठायी भीतीचा लवलेशही दिसणार नाही, पद्मावतीला एकही दुर्गुण चिकटणार नाही याची तो काळजा घेतो. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे बऱ्यावाईट गोष्टींनी, अनेक अंतर्विरोधांनी भरलेलं असतं. कोणतीही व्यक्ती संपूर्णपणे आदर्श नसते. ती चुका करते आणि भव्यतेचा इतिहासही रचते. पण तिच्यातलं पांढऱ्याकाळ्या रंगांच्या मिश्रणांनी तयार झालेलं करडेपण तिच्यातलं माणूसपण सघन करतं, जिवंत करतं. भन्सालीच्या बाजीराव मस्तानीतला बाजीराव किंवा रामलीला मधला राम आणि लीलाही या दृष्टीने कसे जिवंत झालेले आहेत ते पाहता येईल. पण बाजीराव हा इतिहास होता आणि रामलीलातल्या रोमिओ-ज्युलिएटप्रेरित प्रेमकथेला गुजरात-कच्छ मधल्या रबाडी आणि जडेजा (चित्रपटात यांची नावं रजाडी आणि सनेडा अशी आहेत.) जातीय संघर्षाची पार्श्वभूमी होती. पण पद्मावतीच्या दंतकथेत असे संमिश्र मानवी कंगोरे भन्सालीला सापडत नाहीत आणि तसे निर्माण करण्याची धमकही त्याच्यात नाही. त्याला खुणावतात फक्त त्यातली भव्य दृश्य. त्यांच्या आकर्षक फ्रेम्स. त्यांतली चित्रमयता आणि कथेच्या मागे पार्श्वध्वनीसारखा वाजणारा प्रादेशिक संगीताचा नाद. पद्मावत मधल्या पात्रांमधले मानवी नातेसंबंध उभे राहात नाहीत. त्यांच्यातल्या करड्या छटा गायब आहेत. मेवाड मधला समाज, त्या समाजातला सामान्य माणूस, त्याचे हर्षविमर्ष यांचा पद्मावतमध्ये मागमूस नाही. त्याचवेळी राजा रतनसिंहाच्या निमित्ताने त्यावेळचं राजकारण, रजपूत राजांमधले परस्परसंबंध, परकीय आक्रमकांशी सामना करताना आखले जाणारे डावपेच, सत्तास्पर्धा, मेवाडचा भूगोल, चित्तोडचं ऐतिहासिक महत्त्व याविषयीही भन्सालीची संहिता आणि कॅमेरा मौन बाळगतात. मग चित्रपटात काय आहे, ज्यामुळे आम प्रेक्षक खिळून राहतात?

चित्रपटात नजरेला सुखावणारं सौंदर्य ठासून भरलं आहे. भन्साली सौंदर्यवादी आहे. त्याला कलाकृतीतले रंग, रेषा, नाद, लय आणि ताल या गोष्टी अधिक नादावतात. पण त्या तेवढ्याच कुठल्याही चित्रपटासारख्या कलाकृतीसाठी पुरेशा असतात का? निदान पद्मावत सारख्या एका समाजाच्या शौर्य आणि त्यागाच्या तथाकथित उदात्त परंपरेला उजागर करणाऱ्या चित्रपटासाठी तरी पुरेशा नसतात. पद्मावतीची ही दंतकथा म्हणजे इतिहास नसला तरी तिच्यामागे इतिहासाचा अदृश्य पडदा सतत हलतो आहे. पद्मावतीचा त्याग काहीतरी मूल्य मांडतो आहे आणि त्यांचा गौरवही करतो आहे. जेव्हा इतिहास घडत असतो तेव्हा तो केवळ दोन राजांच्या लढायांचाच इतिहास नसतो. जीत आणि जेते यांच्या संघर्षाचाच इतिहास नसतो, तर तो त्या काळातल्या समाजाचा, त्याच्या धारणांचा, त्याच्या जीवनसंघर्षांचाही इतिहास असतो. इतिहासाला भिडू पाहणाऱ्या कुठल्याही कलाकृतीला तो इतिहास आज का सांगायचा, हे स्वतःशी स्पष्ट असावं लागतं. तो केवळ डोळ्यांना सुखावणाऱ्या आणि कानांना तृप्त करणाऱ्या गोष्टींमुळेच कलाकृती सादर करणाऱ्याला आवडत असेल तर त्याच्या कलावंतपणात काहीतरी गडबड आहे, असं म्हणावं लागेल.

पद्मावती या १४व्या शतकात होऊन गेलेल्या एका राजपूत महाराणीने एका यवनाच्या वासनेची शिकार बनण्यापासून स्वतःला वाचवत आपल्या प्राणांची आहुती दिली आणि संपूर्ण राजपूत खानदानाची अब्रू राखली, असं सांगणाऱ्या गोष्टीत बाईच्या शीलाला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. आमच्या स्त्रीचं शील हे आम्हाला प्राणाहून प्रिय आहे, तिचं नखही तुम्हाला दिसणार नाही, ती पवित्र आहे आणि पवित्रच राहील, हीच आमची परंपरा आहे आणि ती आम्हाला शिरोधार्य आहे, असं ही गोष्ट आपल्याला सांगते. आज एकविसाव्या शतकात आपल्याला स्त्री चारित्र्याच्या शुचितेचं, पावित्र्याचं, मांगल्याचं हेच मूल्य अभिमानाने मिरवायचं आहे का? राजपूत स्त्रिया सती जात, जौहार करत ही भारतीय समाजाला आजही उदात्त आणि तेजोमय परंपरा वाटत असेल तर ही भारतीय समाजाचीच शोकांतिका नाही का?

राजपूत स्त्रियांना जौहार का करावा लागे? कारण राजपूत पुरुष वारंवार लढाया हरत. ते शूर जरूर होते. निधड्या छातीचे होते आणि शत्रूवर तुटून पडण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नव्हतं, हे खरंही असेल. पण त्यांच्या ठायी युद्धकौशल्य नव्हतं. नेहमीच शत्रूवर समोरून चाल करून तुटून पडणं शहाणपणाचं नसतं, युद्धात मुत्सद्देगिरी नावाची गोष्ट असते आणि प्रतिपक्षाचे कच्चे दुवे हेरून चाली रचाव्या लागतात, हे अनेक राजपूत राजांना अवगत नव्हतं, असं इतिहास सांगतो. त्यामुळे राजपूत राजांना अनेकदा पराभव पत्करावे लागले. केसरिया या गोंडस नावाने हाराकिरी करावी लागली आणि त्यांच्या बायकांना विहिरी, हौद अथवा अग्नी जवळ करत जौहार करावे लागले. पद्मावत चित्रपटातला राजा रतनसिंह हाही डावपेचात कमकुवत आहे, हे वारंवार लक्षात येतं. अल्लाउद्दीन खिलजीला भेटायला जाताना तलवार घेऊन जा, असं पत्नी पद्मावती सांगते, तरीही तो मूल्यांच्या बाता करत निःशस्त्र भेटायला जातो आणि कैद होतो. चित्रपटात रतनसिंहची मुत्सद्देगिरी दाखवणारा एकही क्षण नाही. तो स्वभावाने साधा, सरळ आहे आणि त्याचा हाच गुण त्याच्या राजकारणात दिसतो. पद्मावतीच्या उक्तीतून जितकी चतुराई प्रकट होते तिच्या शतांशानेही चतुराई रतनसिंहच्या कृतीतून दिसत नाही. त्याला इतर राजपूत राजे का मदत करत नाहीत, याची चर्चा सिनेमात येत नाही. केवळ खिलजीला घाबरून सगळे राजे दडी मारून बसतात की या राजांमध्येही आपापसात बेबनाव असतात? अल्लाउद्दीन खिलजीशी तलवारीने लढत असताना पराक्रम गाजवणाऱ्या आणि अल्लाउद्दीनला जवळ जवळ पराभूत करणाऱ्या रतनसिंहाला दूर उभं असलेलं खिलजीचं सैन्य पाठून बाण मारून ठार करतं. त्यावेळी तेवढ्याच अंतरावर उभं असलेलं रतनसिंहाचं सैन्य आपल्या राजाची हत्या निमूट बघत बसतं. का? कारण शत्रूवर पाठीमागून वार करायचा नाही, हे महान मूल्य. रतनसिंहाच्या राजपूतांनाही अल्लाउद्दीन खिलजीला बाणांनी ठार मारता आलं असतं, पण ते चवताळून सगळेच्या सगळे त्यांच्याहून तिप्पट चौपट आकाराच्या सैन्यावर समोरून चाल करून जातात, म्हणजे मरायलाच जातात. आता इथे आपल्याला शत्रूवरही कपटी हल्ला न करणाऱ्या सैन्याचा अभिमान वाटेल. ही आपली परंपरा आहे, असं म्हणत छाती गौरवाने फुगेल आणि पराभवातही आपल्या राजपूतांच्या औदार्याची उदात्त छटा दिसेल. पण थांबा, आपली परंपरा ही नाही. अगदी रामायणातही आदर्शाचा पुतळा असलेल्या रामाने वाली-सुग्रीव युद्धात वाली वरचढ ठरतो आहे असं दिसताच लक्ष्मणाला त्याच्यावर आडून बाण सोडायला लावला होता आणि त्याचा वध केला होता. महाभारतात मातीत रूतून बसलेलं चाक काढणाऱ्या निःशस्त्र कर्णाला ठार मारायचा आदेश कृष्णाने अर्जुनाला दिला होता. कृष्णाच्या कपटीपणाचा आपण कृष्णनीती म्हणून गौरवाने उल्लेख करतो. वास्तविक अल्लाउद्दीन खिलजी आपल्या उक्तीतून आणि कृतीतूनही प्रेमात आणि युद्धात काहीही गैर नसतं असं रतनसिंहाच्या नाकावर टिच्चून सांगत असतो आणि रतनसिंह मात्र राजपूतांच्या मूल्यांना गोंजारत बसतो. इथेच शिवाजी महाराज का टिकले आणि कसे श्रेष्ठ ठरले, हे पाहता येतं. अफजलखानाला निःशस्त्र भेट देतानाही पोटात वाघनखं ठेवणारे शिवाजी महाराज किती धूर्त आणि द्रष्टे होते, हे कळतं. शाहिस्तेखानाच्या महालावर शत्रू गाफिल आणि निद्रेत असतानाच त्यांनी हल्ला चढवला होता. ते औरंगजेबाला थेट जाऊन भिडले असते तर आज इतिहास वेगळा झाला असता. पण हे राजकीय डावपेच आणि राजकीय धोरणीपण राजपूत राजांपाशी नव्हतं. त्यांच्यापाशी परंपरेचा पोकळ अभिमान होता. या अभिमानापोटी त्यांनी आपल्या बायकांची फरफट केली. या अभिमानाचं जोखड त्यांनी अख्ख्या समाजाच्या गळ्यात बांधून त्याला अहंकाराच्या चिखलात सडत ठेवलं.

पद्मावतची गोष्ट ही आपल्या पुरुषंच्या पतनानंतर यवनांना आपलं शरीर भ्रष्ट करु न देणाऱ्या शीलवान स्त्रियांपाशी येऊन ठेपते आणि तिथेच संपते. मध्ययुगात स्त्रीचं शील हीच तिच्यासाठी जीवनमरणाची गोष्ट बनवली गेली होती. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या कराल जबड्यात स्त्रीचं अवघं अस्तित्वच करकचून दाबलं गेलं होतं. मनूने स्त्री ही शूद्र आहे, पुरुषाच्या पायाची दासी आहे, तिला अजिबात स्वातंत्र्य देऊ नका असं निक्षून सांगितलं होतं. या मनूचा वसा गौरवाने मिरवणाऱ्या लोकांची आज देशात सत्ता आहे. त्यांना हिंदूंच्या सगळ्याच परंपरा डौलाने आणि गर्वाने मिरवायच्या आहेत. सतीची चाल ही हिंदू स्त्रियांची गौरवशाली परंपरा होती, असं ते आजही छाती ताणून सांगतात. पद्मावतच्या प्रदर्शनाला विरोध करणारी नऊ राज्यं भाजपची सत्ता असलेली राज्य होती ती उगीच नाही. १९८९ साली राजस्थानात रूपकुंवर ही बाई सती गेली, तेव्हा या प्रथेचा पुन्हा जागर झाला होता. या सतीप्रथेला तेव्हा देशातून विरोध होत असताना या परंपरेच्या रक्षणासाठी आणि रुपकुंवरच्या सती जाण्याच्या कृतीच्या समर्थनासाठी कल्याणसिंह कालवी हा तेव्हाचा स्थानिक आमदार पुढे सरसावला होता. हा कल्याणसिंह कालवी म्हणजे करणी सेनेचा प्रमुख लोकेंद्र कालवी ह्याचा पिता होय. ही धर्माभिमानाची परंपरा पिढ्यानपिढ्या कशी चालत आली आहे, हे यावरून लक्षात येईल. पण खेदाची गोष्ट अशी की ज्या संजय लीला भन्सालीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संपूर्ण देशातले बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी लोक उभे राहिले त्या भन्सालीने ह्याच क्रूर हिंदू प्रथा-परंपरेचं आपल्या सिनेमातून गौरवीकरण केलं आहे. तिला उदात्ततेचा मुलामा दिला आहे. कधीकाळी ज्या राजपूत स्त्रिया एका अगतिकतेपोटी आणि हतबलतेपोटी सामूहिक जौहार करायच्या आणि तो करताना नऊ-दहा वर्षांच्या विवाहित बालिकांपासून गर्भवती आणि वृद्ध बायका एका झुंडीच्या मानसिकतेने ओढल्या जायच्या, जौहार करण्याआधी अफू-गांजा पिऊन बेहोष व्हायच्या त्यांच्या शोकांतिकेचा एक बारीकसा स्वरही जरी या भन्सालीला दाखवता आला असता तरी त्याच्या मोठ्या गफलतींकडे सहानुभूतीने बघता आलं असतं. पण गतानुगतिकतेच्या साखळदंडांनी जखडलेल्या बायांच्या पावलातलं जडपण या भल्या दिग्दर्शकाला कुठेही जाणवलेलं नाही. जे करणी सेनेला म्हणायचं आहे तेच संजय लीला भन्सालीलाही म्हणायचं आहे. हिंदुत्ववाद्यांना ज्याचा अभिमान आहे त्याचाच भन्सालीलाही अभिमान वाटतो आहे. एकविसाव्या शतकात स्त्रिया सर्व बाजूंनी आपल्या कर्तृत्वाच्या पताका फडकावत असताना पुरुषवर्चस्ववादी मनोवृत्ती आज अधिक तीव्र होत त्यांच्यावर हल्ले चढवत असताना, बलात्कार आणि महिला अत्याचारांच्या प्रकारांनी विकृत टोक गाठलेलं असताना जर भन्साली परंपरावाद्यांच्या बाजूने उभा राहात जौहार करण्याच्या आणि सती जाण्याच्या प्रसंगांना भव्य करत असेल तर तो मोठा गुन्हा आहे. पद्मावती ही आजच्या स्त्रियांची आदर्श ठरू शकत नाही. पण तीच आमचा आदर्श आहे असं सांगणाऱ्या लोकांच्या आणि त्यांना अभय देणाऱ्या राज्यकर्त्यांच्याच अब्रूरक्षणाचं काम करणाऱ्या भन्सालीच्या मागे उभे राहणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेच आज करणी सेनेच्या ऐवजी तोंडघशी पडले आहेत. आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशासाठी वापरायचं हा प्रश्न आज पद्मावतच्या निमित्ताने नव्याने उभा राहिला आहे आणि भूमिका घेणाऱ्यांचीही सत्वपरिक्षा पाहणारा काळ आला आहे.

 

 

लेखक विख्यात नाटककार, कथालेखक व समीक्षक आहेत.

3 Comments

  1. या देशातले तमाम विवेकवादी भन्साळीच्या सिनेमातील कथेसाठी त्याच्यामागे उभे राहिलेले नाहीत. ते उभे राहिले त्याच्या ते मांडू देण्याच्या हक्काच्या पायमल्ली होण्याच्या विरोधात. दोघातला फरक समजून घ्यावा. बाकी लेख उत्तम आहे.

    • Mahendra Kale Reply

      There is famous quote by Voltaire : “I do not agree with what you say but I will defend to the death for your right to say”

  2. Mahendra Kale Reply

    There is famous quote by Voltaire : “I do not agree with what you say but I will defend to the death for your right to say”

Reply To Mahendra Kale Cancel Reply