fbpx
सामाजिक

शैव-संस्कार-सम्पन्ने, जातीभेद न करायेत…

१९३९ साली महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी छ. संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व त्या ठिकाणी छ. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत एक शासकीय फलक लावला. त्यात अंत्य संस्कारामध्ये स्थानिक स्त्रिया, महार समाजाने केलेल्या कार्याबद्दल लिहिले. अलीकडील काळात तो फलक गायब करण्यात आलेला आहे.

दि. २८ डिसेंबर २०१७ रोजी वढू बुद्रुक गावात इतिहासाला केंद्रस्थानी ठेवून एक घटना घडली. छ. संभाजी महाराज यांची समाधी एकाबाजूला आणि त्याच्या समोरच गोविंद गायकवाड यांची समाधी. त्याच्या बाजूस ‘गोविंद महार समाधीकडे’ असा फलक लावला गेला आणि एकच वादळ उठले. हे वादळ फक्त वढू बुद्रुक गावापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा वणवा पहातापाहता उभ्या महाराष्ट्रात पोहचला. त्या वादळाचा केंद्रबिंदू होता छ. संभाजी महाराजांचा इतिहास आणि पेशवाईचा पाडाव. औरंगजेबाने हालहाल करून संभाजीला मारले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे कोणी गोळा केले? कोणी शिवले आणि कोणी अग्नी दिला? हे प्रश्न ऐरणीवर आले.

हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याची उत्तरे आणि त्यानिमित्ताने इतिहासाची सत्य बाजू आणि अब्राह्मणी आकलन नेमकेपणाने पुढे आले पाहिजे. कारण स्वराज्यसंवर्धक छ. संभाजींची जीवनयात्रा उणीपुरी ३२ वर्षांची. त्यातील शेवटची ९ वर्षे कैद, हालहाल आणि डोळे काढणे, शरीराचे तुकडे तुकडे करून संपविणे या घटना घडल्या. औरंगजेब बादशहा इतर सर्व मोहिमा सोडून संभाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मुक्काम ठोकून बसला. अशी काय ताकद, विचार आणि कर्तृत्व होते संभाजीचे? हा खरा प्रश्न आहे.

छ. संभाजीच्या इतिहासाची मांडणी ब्राह्मणी छावणीने अत्यंत विपर्यास्त स्वरूपात केली आहे. त्यांना बदफैली, वेडा, भांडणखोर, बाईवेडा, धर्मवेडा इ. प्रकारची प्रतिमा रंगवली गेली. त्यासाठी इतिहास, कथा, कादंबऱ्या, चित्रपट यासारख्या माध्यमांमधून अशी प्रतिमा जनतेपुढे सतत राहिल असा प्रयत्न करण्यात आला आहे. अब्राह्मणी छावणीतील इतिहासकारांनी संभाजीराजाच्या नेमक्या समर्थस्थळांवर प्रकाशझोत टाकला आहे. वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, शरद पाटील, डॉ. जयसिंग पवार यांसारख्या इतिहासकारांनी छ. संभाजीचा खरा इतिहास, त्यावर जमलेल्या ब्राह्मण्यवादी विचारांच्या पुटांना दूर करत आपल्यासमोर मांडला आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटना, दंगा, जाळपोळ, दगडफेक या सर्वांशी संभाजीराजांचा इतिहास आणि पेशवाईचा पाडाव या ऐतिहासिक घटना कारणीभूत ठरल्या आहेत. आज पेशवाई नव्या स्वरूपात अवतरली आहे. देश आणीबाणीच्या परिस्थितीत ढकलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सनातन्यांनी इतिहासाची मोडतोड करत इतिहासालाच हत्यार बनवत कुप्रबोधन सुरू केले आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करत ब्राह्मणी धर्म, मूल्य, इतिहास अधोरेखित आणि पुनरूत्पादित केला जात आहे. कोरेगाव भीमा लढ्याला २०० वर्ष पूर्ण होताना इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचा डाव खेळत सत्य इतिहास दडपण्यासाठी प्रसंगी दंगाही केला गेला आहे.

या संदर्भात प्रश्न महत्त्वाचा आहे तो छ. संभाजींची कारकीर्द इतकी काळीकुट्ट का रेखाटली गेली? का पेशवाईचा पाडाव जिव्हारी लागला आहे? पेशवाईच्या काळातच इतिहासाचे सर्वात मोठ्याप्रमाणात ब्राह्मणीकरण सुरू झाले. अर्थ-राजकीय सत्तेचा एखादा तुकडा जरी हाती आला तर सनातनी किती आक्रमकपणे वर्चस्ववादी-विषमतावादी विचारांचे विष पसरवितात याचा इतिहासात पेशवाईच्या निमित्ताने आणि आता केंद्र, राज्यात आलेल्या पेशवाईच्या निमित्ताने आपण अनुभवत आहोत.

छ. संभाजींचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर गडावर झाला. वयाच्या ९-१०व्या वर्षीच संभाजी मुघल मनसबदार झाला. १६६५ पर्यंत मुघलांकडे ओलीस राहिला होता. १६७१ला संभाजींकडे कारभार सोपवला होता. १६८१ मध्ये संभाजींचा विधीवत राज्याभिषेक झाला होता. त्यांनी  पोर्तुगिज, सिध्दी आणि इंग्रज यांच्याशी संघर्ष केला. बंगाल, पटना, कर्नाटक मोहिमा फत्ते केल्या होत्या. छ. संभाजी जसे तलवार गाजवत होते तसेच संस्कृतपंडित म्हणूनही अलौलिक कामगिरी त्यांनी केली होती. बुधभूषणमसह एकूण सहा ग्रंथ त्यांनी संस्कृतमध्ये लिहिले होते.

छ. शिवाजी व छ. संभाजी राजांच्या इतिहासाचे ब्राह्मणीकरण का केले गेले? त्याची नेमकी कारणे वा. सी. बेंद्रे, कमल गोखले आणि शरद पाटील यांच्या संशोधनातून पुढे आली आहेत. कमल गोखले आणि शरद पाटील यांनी शिवाजी-संभाजी पितापूत्र शाक्तपंथाचे (तात्रपंथाचे) उपासक असल्याचे म्हटले आहे. आग्य्राहून सुटका झाल्यानंतर श्रुंगेरीच्या शाक्तांच्या मठात संभाजींना ठेवणे, शाक्त प्रभावित असलेल्या गावच्या वतनदाराशी सोयरीक शिर्के-देशमुखांच्या कन्या येसूबाईशी संभाजींचा विवाह लावणे आणि शाक्त संस्कारात वाढलेल्या येसूबाईला स्वत:चा शिक्का  ‘श्रीसखी राज्ञी जयति’ देणे, छ. शिवाजींनी दुसरा राज्याभिषेक शाक्त पध्दतीने करणे या घटना शिवकालिन इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. शाक्त/तंत्रपंथ हा जातीव्यवस्थाविरोधी पंथ होता. स्त्रीसत्ताकतेचा पुरस्कर्ता होता. शैव-संस्कार-सम्पन्ने, जातीभेद न करायेत  म्हणजे, शैव संस्काराने दीक्षित झालेल्यांनी जातीभेद पाळू नयेत असा विचार आणि आचार सांगितला होता.

औरंगजेबाने छ. संभाजींना ज्या पध्दतीने मारले ती पध्दत ब्राह्मणी धर्मातील हिंसाचारावर आधारित आहे. औैरंगजेबाच्या पदरी असणारे बहुसंख्य सरकारकून, कारभारी, वकील इ. हे ब्राह्मण होते. छ. संभाजीवर ब्राह्मण्यवाद्यांचा विशेष राग होता. कारण, तो संस्कृत जाणणारा होता. संस्कृत ही देवांची भाषा. भूदेव म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणांचाच त्यावर अधिकार. या अधिकारालाच आव्हान देण्याचे काम संभाजींनी केले होते. स्त्रीसत्ता शाक्त संस्कारात वाढल्याच्या परिणामी पत्नीला सखी मानणे, तिला शिक्का तयार करून देणे म्हणजे स्त्रियांची प्रतिष्ठा-सन्मान देण्याची कृती संभाजी करतात, हे ब्राह्मण्यवाद्यांच्या दृष्टीने महान गुन्हे होते. औरंगजेबाकरवी संभाजी आणि कवी कलष यांना हालहाल करून मारले  गेले. संभाजीचे डोळे काढणे, कलषाची जीभ उपटणे या प्रकारच्या शिक्षा मनुस्मृतीनुसार देण्यात आल्या आहेत. ही बाब इतिहासात का दडवली गेली?

आज संभाजींच्या इतिहासात इतर जातीच्या माणसाने काही केलेलं नाही अशी भूमिका जाती अहंकारातून घेतली जात आहे. त्याला भिडे-एकबोटे यांनी निर्माण करून दिलेली वैचारिक पार्श्वभूमी, चुकीच्या इतिहास कथनाची पार्श्वभूमी आहे. परंतु इतिहासात भावनेला महत्त्व नाही. जाती अहंगंड व न्यूनगंडानाही नाही. शिर्के देशमुख यांनी संभाजींच्या शरिराचे तुकडे गोळा केले आणि शिवले असतील. परंतु अग्नी देण्याचे काम गोविंद महार (गायकवाड) यांनी केले. औरंगजेबाने संभाजींच्या देहाची खांडोळी केल्यानंतर त्याला अग्नी दिल्यास अंत्यविधी करणाऱ्यास देहांताची शिक्षा फर्मावली होती. शिर्के-देशमुखांना औरंगजेबाने देहांताची शिक्षा सुनावलेली नाही, असे इतिहास सांगतो. छ. संभाजींच्या समाधीच्यासमोर मात्र हातात कुऱ्हाड, भाले घेतलेल्या दाम्पत्याची चित्रे दगडावर कोरलेली सापडतात. औरंगजेबाने गोविंद महार व कुटुंबियांना मारून टाकले, त्यांच्या स्मृतीत पुढील पिढीने ‘वीर’ उभे केले. दगडात सामाविलेल्या इतिहासाचा अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.

शाहू आणि येसूबाई यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर वढू येथे संभाजीराजे व कवी कलश यांची समाधी बांधली आणि त्याची देखभाल करण्यासाठी भिकाराम गोसावी यांना जमीन इनाम दिली. आग्य्राहून सुटका झाल्यानंतर शृंगेरी मठात संभाजींना ठेवणे, छ. शिवाजी माहाराजांचा दुसरा राज्यभिषेक निश्चळपुरी गोसाव्याच्या हातून होणे, संभाजी व कवी कलशाच्या समाधीची देखभाल करण्यासाठी शाक्त भिकाराम गोसावी नेमणे या सर्व कृती जातीभेदाला तिलांजली देणाऱ्या आहेत. संभाजींची समाधी म्हणजे शाक्त संस्कारानुसार लिंगपूजा करण्यासाठी पिंड तयार करण्यात आली. मरणोत्तर शाक्त संस्कार करवून येसूबाईने संभाजी राजांना न्याय दिला. निरुती दुर्गेच्या प्रदेशात छ. शिवाजी, संभाजी आणि येसूबाई शाक्त संस्कार जगले हाच खरा इतिहास!

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

1 Comment

  1. Nootan Malvi Reply

    This article is the need of the Time..Brevo Pratima tai…

Reply To Nootan Malvi Cancel Reply