fbpx
सामाजिक साहित्य

“पाऊलखुणा”कारांचे पेशवा गुणगान अभियान

भीमा-कोरेगाव लढाईतील पेशव्यांच्या गनिमी काव्याला सोनेरी पान म्हणून गोंजारत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा काही संशोधक वीरांचा प्रयास हा वरकरणी कौतुकास्पद वाटला तरी यामागची जातीय मानसिकता लपून राहात नाही.जॉन वायलीच्या बखरवजा लेखनाचा हवाला देत सात भागात आख्यान लावणाऱ्या या मंडळींनी १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव लढाईत पेशव्यांचा पराजय नव्हे तर विजयच झाला होता, हे बिंबवण्याचा खटाटोप केलेला आहे.

गेली २०० वर्षं इथे एक विजयस्तंभ उभा आहे आणि त्याला १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवंदना दिल्यानंतर गेली ९० वर्षं दलित समाज तिथे आपल्या लढाऊ पूर्वजांना वंदन करायला सतत जातो आहे. या इतक्या वर्षांत त्यांना तुमचा विजय नव्हे तर पराजयच झाला होता, असं कोणी सांगितलं नाही की तो स्तंभ कोण अद्याप उखडूनही टाकलेला नाही. इंग्रजांनी धडधडीत खोटं बोलून आणि समाजात जातीय दुही पसरवण्याच्या हेतूनेच तो स्तंभ उभा केला आहे, असा आरोप जाहीरपणे कुणी केल्याचं ऐकिवात नाही. भारतात महार समाजाविषयी इतर जातींच्या समाजात अत्यंत आत्मीयता आहे अशातला भाग नाही, उलट त्यांच्याविषयी हीनतेचीच भावना आहे. ब्राह्मणांनी ही द्वेषमूलक भावना हजारो वर्षे जोपासली. त्यांना ह्या त्यांच्यालेखी हीन असलेल्या लोकांच्या विजयाची गाथा सांगणारा स्तंभ इतक्या वर्षांत अन्य जातीच्या लोकांना हाताशी धरून पाडावा असं का वाटलं नाही? इतिहास जर आजवर खोटाच सांगितला जातो आहे असा त्यांचा दावा असता तर त्यांनी हे कृत्य अगदी सहज केलं असतं. त्यांनी ते केलं नाही यात त्यांचा उदारपणा आहे, असं आता कोणी सांगू धजेल तर त्याला सांगावं लागेल, इतकी सहिष्णुता कडव्या धर्मवादी सनातनी ब्राह्मणांमध्ये कुठल्याही काळात नव्हती. अगदी विसाव्या शतकात उदारमतवादी वारे समाजात वहात असताना ज्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणविसाच्या कथित बदनामीवर आक्षेप घेत नाटक बंद पाडण्यासाठी जो धुमाकूळ घातला त्याहून त्यांच्या लेखी कितीतरी मोठा प्रमाद भीमा-कोरेगावचा विजयस्तंभ उभारून झाला होता. तेव्हा इंग्रज या देशातून जाताच त्यांनी इंग्रजांची ही विजयी मोहोर तात्काळ गाडून टाकली असती. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणारे संशोधक वीरही इतकी वर्षं का गप्प बसले? याच वर्षी हा इतिहास हिरीरीने पुढे आणायचं कारण काय? कारण हेच की दलित आणि बहुजन समाज एकत्र येत पेशवाई गाडून टाकायचा एल्गार करत मोठ्या संख्येने एकत्र आले आणि जातीयतेची वीषवल्ली फोफावल्याचा काही लोकांना साक्षात्कार झाला.

इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या गटाने सात भागात भीमा कोरेगाव लढ्याची रोमहर्षक मांडणी केली आहे. शत्रू पक्षाची अर्थात ब्रिटिशांची भीतीने गाळण उडाली, त्यांना पळता भुई थोडी झाली, त्यांची लांडगेतोड केली, त्यांना सळो की पळो करून सोडले अशी जागोजाग शब्दयोजना करुन पेशव्यांच्या गनिमी काव्याला, त्यांच्या चतुराईला, कल्पकतेला, मुत्सद्दीपणाला आणि अर्थातच शौर्याला मनोमन मुजरा केलेला आहे. असं करणं अजिबात चूक नाही. लढाईचं वर्णन करणारा कुठलाही पक्ष आपल्या बाजूचं असं वीरश्रीयुक्त वर्णन करतोच. भारत-पाक लढ्याचं भारतीय नजरेतून केलेलं वर्णन आणि पाकने आपल्या नजरेतून केलेलं वर्णन यात जमीनअस्मानाचं अंतर असतं. चीनसोबतची लढाई आपण हरलो पण त्यात आपण दिलेल्या कडव्या झुंजीचं वर्णन आपण कौतुकाने करतो आणि पराजयातलीही विजुगीषा जागवतो. त्यामुळे भीमा कोरेगावच्या लढाईचं इतिहासाच्या पाऊलखुणा तपासणारे करत असलेलं वर्णन आणि दलित समाज व त्यातील अभ्यासक या लढाईचं करत असलेलं वर्णन यात टोकाची तफावत असणार, हे निःसंशय.आता प्रश्न येतो खरेखोटेपणा करण्याचा. दोन्ही बाजूंना आपला इतिहास खरा आहे असं सांगण्याची निकड का वाटते? त्यांचे हेतू काय आहेत? दलित समाजाला ही आपली शौर्यगाथा अभिमानाने मिरवावीशी वाटणं, हे अत्यंत नैसर्गिक आहे. ज्या समाजाला हजारो वर्षं उच्चवर्णीय जातगटांनी पिळलं, ज्यांना जनावरासारखी वागणुक दिली आणि त्यांचा आत्मसन्मान पदोपदी ठेचत नामोहरम केलं त्या समाजाला भीमा कोरेगाव लढाईत प्राणपणाने लढून पेशव्यांना पिटाळून लावणाऱ्या पूर्वजांविषयी अभिमान वाटणं, ते आपल्या अस्मितेचं चिन्ह वाटणं हे सर्वथा समर्थनीय आहे. भीमा कोरेगावच्या सिदनाक, रायनाक आणि त्यांच्या कडव्या झुंजार शिपायांमध्ये ते आपल्या लढ्याची प्रेरणा शोधत असतील तर ही अत्यंत उचित गोष्ट आहे, ज्यामुळे त्यांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ मिळणार आहे. आता इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्यांची भूमिका काय आहे? ते पेशवे हरलेच नाहीत, उलट जिंकले असं का म्हणत आहेत? कारण त्यांना ह्या पायतळी गाडलेल्या समाजाने आपल्या पेशव्यांना हलक्या लोकांनी हरवल्याची बात सहन होत नाही. आज एकविसाव्या शतकातही, एका तोंडाने जातीयता घालवण्याच्या बाता करणाऱ्यांना ती सहन होत नाही. त्यामुळे पेशव्यांच्या अब्रूरक्षणासाठी ते लगेच लेखण्या परजतात. आपलं जातवर्चस्व अबाधित राहावं म्हणून जिवाचा आटापिटा करतात. आता ते म्हणतील, आम्ही पुराव्याने बोलतो. पुरावे दोन्ही बाजूंनी वापरता येतात आणि त्यांचं अर्थनिर्णयन करता येतं.

इतिहास ज्याची पळपुटा बाजीराव अशी ओळख देतो त्याने पुणे सोडून पलायन केल्यावर दिड महिना इंग्रजांना हुलकावणी देत राहाणं हा त्याचा मोठा
पराक्रम असल्यागत पाऊलखुणाकार सांगताहेत. बाजीरावाने वर्तुळाकार पलायन केलं आणि तो पुन्हा पुण्याच्या वेशीजवळ आला, ही चतुराईची गोष्ट खरीच पण पुढे ते असं म्हणतात, आपण पुणे घेतले तर तिथेच अडकू म्हणून बाजीरावाने सोलापूरच्या दिशेने गमन केले. जणू काही बाजीराव पुणे पुन्हा जिंकून घेणारच होता असा आभास यातून निर्माण केला आहे. पहिल्या भागात पाऊलखुणाकार म्हणतात, ‘या लढाईत मराठ्यांचा निःसंशय विजय झाला, पण नंतर योगायोगाने पेशव्यांचा पराभव झाला.’ ज्यांचं राज्य खालसा झालं त्यांचा पराभव योगायोगाने कसा होता? तोही एका छोट्या निर्णायक विजयानंतर? आणि हेच पाऊलखुणाकार उत्तरार्धात म्हणतात, ‘इंग्रजांचा विजय झाला नाही की पेशव्यांचा पराजय झाला नाही.’ स्टॉन्टनच्या छोट्या सैन्यावर विजय मिळवून काही साध्य झालं नसतं म्हणून ३ हजार सैन्याची तुकडी मागे ठेऊन पेशवे छत्रपतींना घेऊन निघून गेले?

एक साधी गोष्ट कोणाच्याही लक्षात येईल की, भीमाथडीला पेशव्यांचं २८ हजार सैन्य होतं आणि त्यांच्याशी लढायला कॅप्टन स्टॉन्टनकडे ५०० शिपाई होते. या असमान लढाईत पेशव्यांच्या सैन्यातले ५०० लोक मारले गेले तर स्टॉन्टनच्या तुकडीतले, ज्यात महार संख्येने अधिक होते, २७५ लोक मारले गेले. ‘त्यांनी आमचा एक कापला तर आम्ही त्यांचे दहा कापू’, अशा भाषेत शौर्याचं मोजमाप करणाऱ्यांना यात कोणाचा जय झाला हे सांगावं लागू नये. शिवाय पेशव्यांच्या सैन्यातल्या ज्यांनी कोरेगावमध्ये घुसून पराक्रम गाजवला आणि इंग्रज अधिकारी मारले ती अरबांची तुकडी होती, ज्यांची उच्चवर्णीय जातीयवादी आजही ‘लांडे’ अशी संभावना करतात. लढाईचं जे वर्णन आहे त्यात कॅप्टन स्टॉन्टनची दमछाक झाली यात वादच नाही पण त्याच्या शिपायांनी जी मर्दुमकी गाजवली ती अजोड नाही काय? ते देखील ज्यांचं पाणी मराठ्यांनी तोडलं, ज्यांना अन्नही मिळालं नाही त्या भुकेलेल्या सैन्याने हे करून दाखवावं यातलं शौर्य खुल्या दिलाने मान्य कराल की नाही? आणि हे सैन्य म्हणजे ज्यांना आपण नीच वागणूक दिली, ते आपलेच बांधव होते, याची कुठेच जाणीव नाही. उलट शेवटी शेवटी तर स्टॉन्टनचंच, ‘त्याने शरणागती पत्करली नाहीवा लूट होऊ दिली नाही’, असं कौतुक आहे आणि ‘नेटिव्ह सैनिक त्याच्याशी धड वागत नसताना त्याने बाणेदारणा दाखवला’, असा उल्लेख केला आहे. हे नेटिव्ह सैनिक कोण? त्याच्या पलटणीतले महार शिपाई? म्हणजे इंग्रजांचा धूर्तपणा उघड करायला जाणाऱ्यांनी त्यांना झुकतं माप देऊन आपले बांधव म्हणत महारांनाच अनुल्लेखाने मारलेलं आहे.

कुठल्याही लढाईतली हारजीत यांच्याशी त्या त्या सैन्याने गाजवलेलं शौर्य, दाखवलेला मुत्सद्दीपणा, लढाईतल्या चाली यांचा जसा संबंध असतो त्याहूनही गहिरा संबंध हा राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक हीतसंबंधांतून आणि केल्या गेलेल्या राजकारणातून उगवलेल्या रागलोभांचा असतो. पानिपतची लढाई पेशवे का हरले? पाऊलखुणाकार असं सांगतात की, ‘इंग्रजांच्या आमदनीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाला हे उघड आहे, पण हे पेशवाईपासून चालू आहे हा समज निराधार आहे.’ याच्याइतकं निराधार विधान दुसरं नाही. पेशवाईत जातीय अत्याचारांनी चरमसीमा गाठली होती. अस्पृश्यतेने टोक गाठलं होतं. ब्राह्मणी व्रतवैकल्यांना उधाण आलं होतं. महारांच्या गळ्यात मडकं आणि हातात झाडू पेशवाईत आली. उत्तर पेशवाईत रंगबाजीला ऊत आला आणि बायकाही असुरक्षित झाल्या. दुसरा बाजीराव हा तर पराकोटीचा रंगेल होता. याचे पडसाद समाजात उमटत नसतील? महार-मांगांत राग खदखदत नसेल? अहो, याच्या मुळेच तर ते सैन्य अन्नपाण्याविना लढलं आणि ५०० सैनिकांना गारद करते झालं. महारांना पाण्यावाचून राहायची सवय असणारच आणि त्यांचं पाणी तोडण्यात पेशवे आणि त्यांच्या तालमीतले मराठे सरदार तत्पर असणारच.

साधा प्रश्न असा आहे की, पेशव्यांच्या सैन्यात एकही महार का नव्हता? ह्या शोषित घटकाने बजावलेल्या पराक्रमाची ओळख त्यांचा स्मृतिस्तंभ उभारून कायम ठेवावी, असं इंग्रजांना वाटलं तर तो त्यांचा उदारपणाच म्हणायला पाहिजे. पण या स्तंभावरचा Triumph हा शब्द पेशवाईच्या समर्थकांना चांगलाच झोंबलेला दिसतो. तुम्ही त्यांचे स्तंभबिंभ काय ते उभारा, पण TRIUMPH? अब्रह्मण्यम. ये नॉ चालबे. त्यामुळेच लढलेल्यांच्या जातीचा इंग्रजांच्या दफ्तरी उल्लेख नाही, हे सांगण्याचा आटापिटा. ते महार नव्हतेच हो, असं हे पाऊलखुणाकार थेट का सांगत नाहीत? हिंदूंमधील जातीपातीचा सत्तास्थापनेसाठी उपयोग करणारे इंग्रज धूर्त, कावेबाज होतेच. पण ह्या जातीपातींतले द्वेष पराकोटीचे जोपासले कोणी? ब्राह्मण, कायस्थ, मराठा सरदार पेशवाईत एकमेकांचा दुस्वास का करत होते? ब्राह्मणांसारखं धोतर नेसणाऱ्या सोनारांना पेशव्यांनी काय शिक्षा दिली? ह्या सामाजिक सत्यांबद्दल न बोलता पेशव्यांच्या गनिमी काव्याबद्दल बोलत राहायचं हाच एक धूर्तपणा आहे. अत्यंत लाजिरवाणा इतिहास लपवायचा आणि पळपुट्यांचा गनिमीकावा उच्चरवाने सांगायचा, पेशवे हे जणू शिवशाहीला आणि मराठेशाहीला उत्कर्ष बिंदूपर्यंत घेऊन गेले, असा आव आणायचा हा एक डाव आहे. याला सांस्कृतिक गनिमीकावा म्हणता आलं असतं, पण त्याला बामणीकावा म्हणणंच श्रेयस्कर. उच्च जातीय दांभिकता जोपासणारी पेशवाई बुडाली हे उत्तम झालं. पण ह्याच पेशव्यांचे वारसदार आज अवती भोवती आहेत. त्यांचं जातीय राजकारण एल्गार परिषदेने अधोरेखित केलं, म्हणून ती परिषदच जातीय ठरवायचा हा डाव आहे.

जेव्हा जेव्हा जातीय राजकारण उघड होतं तेव्हा त्याच्या हीतसंबंधीयांना राष्ट्रवाद आठवतो. ते जातीपाती विसरा, आपण एक आहोत असं अचानक बोलायला  लागतात आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्यांसाठी पुढे सरसावतात. भीमा कोरेगावच्या सोनेरी पानाचा इतिहास म्हणजे एक असाच खोटा राष्ट्रवाद आहे. तो सामाजिक सत्यांकडे डोळेझाक करून भूतकाळाला रोमँटिक रूप देतो. या पाऊलखुणाकारांनी मध्येच एके ठिकाणी कौस्तुभ कस्तुरे यांचा संदर्भ दिलेला आहे. हे तेच कस्तुरे, ज्यांनी अलीकडे, रामदास स्वामींना शिवाजीमहाराजांनी चाफळला सनद दिली होती, असा जावईशोध तथाकथित पुराव्यांनिशी लावला. ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी लगेच हे खोटं असल्याचं सांगितलं हे बरं झालं. नाहीतर ‘पाऊलखुणाकार’ जो शब्द वापरतात तो इतिहासाची विल्हेवाट हा शब्द पुन्हा एकदा साक्षात झाला असता. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हे ऐतिहासिक पुराव्यांनिशी सिद्ध होऊनही ज्यांना दादोजीचा पुतळा हलवला हा घाव जिव्हारी लागतो, त्यांची जातीयता किती खोलवर भिनलेली आहे हे लक्षात येतं. इतिहासावरचे हे छुपे हल्ले ओळखून त्यांना वेळीच रोखायला हवं नाहीतर ‘भिडे भिडे पोट वाढे’ या म्हणी प्रमाणे ऐतिहासिक घटनांमधल्या मोकळ्या जागा सोयिस्करपणे भरून इतिहासाचंच पोट वाढवलं जाईल.

 

लेखक विख्यात नाटककार, कथालेखक व समीक्षक आहेत.

Write A Comment