fbpx
सामाजिक

अशी घडली भीमा कोरेगावची दंगल

–सदर लेख, १ जानेवारी रोजी वढू /कोरेगाव येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

पुण्यापासून पूर्वेला नगर रस्त्यावर ३० किलोमीटर भीमा कोरेगाव, त्याच्यापुढे ४ किलोमीटर वरील सणसवाडी आणि त्याच्या उत्तरे कडील चाकण-शिक्रापूर रस्ता. या पुण्याच्या नवविकसित भौगोलिक त्रिकोणात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दंगल झाली. अर्थात याला दंगल म्हणणे जरा कठीणच आहे.
एका बाजूला सुसंघटीत – सशस्त्र आणि अफवांच्या उन्मादपूर्ण स्थितीतील दोन-तीन हजाराचा जमाव आणि दुसऱ्या बाजूला भीमा कोरेगावच्या स्तंभाला वंदन करून नववर्षाचा शुभारंभ करण्यासाठी मुलाबाळांसह आलेली दोन – एक लाख कुटुंबवत्सल जनता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या असंघटीत आणि विस्कळीत जनतेवर उपरोक्त भौगोलिक त्रिकोणात अनपेक्षित सशस्त्र हल्ले झाले. तेव्हापासून महाराष्ट्र ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. कोणी – कोणत्या हेतूने, उदिष्टाने आणून ठेवले आहे महाराष्ट्राला या जातीयुद्ध सदृश्य परिस्थितीत?
कोरेगावभिमाचा इतिहास
१९९०-९१ म. फुले स्मृती शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त या महामानवांनी महाराष्ट्रात त्यांच्या हयातीत ज्या-ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी जमून महामानवांना अभिवादन करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यात मुलींची पहिली शाळा ज्याठिकाणी भरायची तो भिडे वाडा, सावित्रीबाईंचे माहेरचे गाव नायगाव, डॉ. आंबेडकरांनी बुद्धमूर्ती पहिल्यांदा बसवली ते देहूरोडचे बुद्धविहार, त्याचप्रमाणे एकदा भेट दिलेला भीमा कोरेगांवचा स्तंभ ही ठिकाणे होती.
कोरेगाव या ठिकाणी भीमा नदीकाठावर १ जानेवारी १८१८ साली पेशवे आणि इंग्रज यांच्यात शेवटची लढाई झाली. पेशव्यांचे नेतृत्व सरदार बापू गोखले यांच्यासारख्या धुरंधर सेनापतीने केले आणि त्यांच्या बरोबर २० हजारहून अधिक सैन्य असूनही कॅप्टन स्ट्रॉटनच्या नेतृत्वाखालील ’ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री सेकंड बटालियन फस्ट रेजिमेंट ‘ (BNISBF) या एतद्देशीय सैनिकांचा समावेश असलेल्या व त्यातही महार सैनिकांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या सैन्याने पेशव्यांचा पराभव केला. या लढाईनंतर पेशवाईचा अंत झाला. पेशवाईच्या कालखंडात जातीव्यवस्थेच्या क्रूर प्रथांनी कळस गाठला होता. स्त्रिया व बहुजन समाज या कुप्रथांमध्ये भरडला गेला होता. दुष्काळामुळे शेतसारा भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बेंबीत सुरुंगाची दारू ठोसून त्यांना पेशवाईत शनिवार वाड्यासमोर उडवले जात होते. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांना पेशव्यांनी बंदी घातली, त्या काळात स्त्रिया असुरक्षित-भोगदासी बनवल्या गेल्या, अस्पृश्यांच्या ग़ळ्यात मडके, कमरेला झाडू बांधले गेले. या कुप्रथांमुळे समाज रसातळाला गेला होता. त्याचे वर्णन महाराष्ट्रातील लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांपासून गंगाधर बाळकृष्ण सरदारांपर्यंत अनेक अभ्यासकांनी केले आहे. त्यामुळेच ’ बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री सेकंड बटालियन फस्ट रेजिमेंट ‘ (BNISBF) विशेषतः त्यातील महार सैनिक पेशव्याविरोधात अंत्यत त्वेषाने लढली असे मानणारा एक मतप्रवाह आहे. त्यांनीच १ जानेवारी १८१८ ची लढाई ‘महारांचा शौर्यदिन’ म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तर पेशवाईचा पाडाव म्हणजे समतेचा उदय नव्हे, त्याचबरोबर या लढाईनंतरही अस्पृश्यता वगैरे नष्ट झाली नाही. उलट १८५७ नंतर ‘ आम्ही तुमच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करणार नाही ’ हे येथील ब्राह्मण व मुस्लिमांना दिलेले आश्वासन पाळत महार पलटण ही सैन्याची तुकडी ब्रिटीशांनी बरखास्त केली. त्यामुळे ब्रिटीश नीती बद्दल चिकित्सा बाळगली पाहिजे असे प्रतिपादन करणाराही दुसरा मतप्रवाह येथे आहे. तर शौर्य दिन साजरा करणे हे इंग्रजधार्जिणे, राष्ट्रविरोधी धोरण व भूमिका असल्याचा तिसरा मतप्रवाह आहे. या मतप्रवाहाचे प्रतिनिधीत्व खुद्द पेशव्यांचे वंशज तसेच पुण्यातील मिलींद एकबोटे, सांगलीतील मनोहर उर्फ संभाजी भिडे प्रभुतीनी वारंवार केले आहे. पेशव्यांचे वंशज काही काळापूर्वी न्यायालयात गेले. परंतू, न्यायालयाने १ जानेवारीच्या शौर्यदिनावर बंदी आणण्यास नकार दिला. खरेतर या लढाईतील विजयानंतर ब्रिटीशांनी या ठिकाणी स्तंभ उभारला आहे, त्यावर या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांची यादी दिली आहे. त्यात महारांव्यतिरिक्त कुणबी-मराठा-बलुतेदार जातींमधून आलेल्या सैनिकांचीही नावे आहेत, असे सांगणारा चौथा मतप्रवाहही इतिहास अभ्यासकांमध्ये आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी या लढाईला दोनशे वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रात तसेच देशात जातीव्यवस्था कायम आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारची धोरणे बहुजनांवर अन्यायकारक आहेत. शेतकरी कर्जमुक्ती नाही. उलट कर्जबळी ठरत आहेत. रोजगार कमी होत आहेत, दलित व स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. या भारतातील कष्टकरी जनतेने संघर्षातून स्वातंत्र्य मिळवलेले आहे. त्याचा फायदा मिळणे तर दूरच पण त्याच्या हिताचे रक्षण करणारी राज्यघटनाच बदलण्याचा घाट नव्या पेशवाई सरकारने घातला आहे. सरकारचे मंत्री तशी राजरोस विधाने करत आहेत. नुकताच अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी व खर्डा येथील बलात्कार व खोट्या जात प्रतिष्ठेसाठी केलेल्या हत्या प्रकरणातील न्यायालीन निकाल लागले. या निर्णयांवर जातिव्यवस्थेचा प्रभाव पडल्याची भावना महाराष्ट्रातील दलित समूहा मध्ये आहे. म्हणून कोरेगाव भीमा लढाईच्या २००व्या वर्षाच्या निमित्ताने समतेच्या संदेशाला उजाळा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने १ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सामान्य जनता कोरेगाव भीमाला जमणार हे सांगायला ज्योतिष्याची आवश्यकता नव्हती. दरवर्षी येथे लाखो लोक येतात. शांततेने जमतात. लाखोंची पुस्तक विक्री होते, नववर्षाचे संकल्प केले जातात, शुभेच्छांची देवाण-घेवाण होते, स्थानिक लोकही सौहार्दपूर्ण असे स्वागतच करतात. त्यात या वर्षी संख्या वाढणार होती परंतु पोलिसांनी त्याची कोणतीही दाखल घेतल्याचे दिसले नाही.
वढू आणि संभाजीमहाराज
वढु (बुद्रूक) या गावात संभाजीराजांना औरंगजेबाने हाल-हाल करून मारले होते. हे ठिकाण १९३९ साली प्रख्यात इतिहासकरा वा.सी. बेंद्रे यांनी शोधून काढले. या ठिकाणी संभाजी महाराजांची व जवळच त्यांचा शाक्त पंथीय सहकारी कवी कलश यांची समाधी आहे. ही जागा गावकुसाबाहेर आहे. औरंगजेबाने आपल्या कोणत्याही शत्रूला दिली नाही अशी कठोर शिक्षा छ. संभाजीराजांना दिली. संभाजीराजे हे संस्कृत पंडित होते. त्यांनी मनुस्मृतीच्या नियमाविरुद्ध वर्तन करून ब्राह्मणाच्या जन्मजात अधिकारांवर आक्रमान केल्याचा राग तत्कालीन भट-पंडितांमध्ये होता. म्हणूनच त्यांनी संभाजीराजांना मनुस्मुतीच्या नियमानुसार शिक्षा देण्याचा सल्ला औरंगजेबाला दिला. परिणामी मनूधर्मानुसार अधिकार नसताना वेद मंत्र वाचले म्हणून डोळे काढणे, वेद कंठस्थ केले म्हणून शिरच्छेद व शेवटी त्यांच्या देहाचे तुकडे करून फेकणे अशी शिक्षा औरांजेबाने दिली. इतकेच नाही तर संभाजीराजांचे अंत्य संस्कार कोणीही करू नये असे फर्मानही काढले. परंतु ते तुकडे गावकुसाबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतील गोविंद महार यांनी एकत्र केले व संभाजीराजांचे अंत्य संस्कार केले. या ऐतिहासिक गोष्टीवर वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, शरद पाटील या इतिहासकारांनी प्रकाशझोत टाकला आहे. दुसरीकडे आमची आडनावे शिवले आहेत कारण आम्ही राजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून शिवले म्हणून, असा दावा गावातील मराठा मंडळीनी अलीकडेच सुरु केला आहे. त्यांच्या जातीभावानाना फुंकर घालून मराठा विरुद्ध दलित आणि त्या नंतर संभाजीराजांच्या हत्ये प्रसंगीच्या क्रूरतेची वर्णने करत मुस्लीमविरोध वाढविणे अशी दुहेरीनिती घेऊन मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे गेली अनेक वर्ष पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. म. फुले यांनी छ. शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधल्याने आणि १९३९ ला वा.सी.बेंद्रे यांनी छ. संभाजी महाराजांची वढू स्थित समाधी शोधल्याने त्यांची थोडीशी अडचण झाली आहे.
दंगलीचे वढू उपकथानक
दिनांक २८ डिसेंबर रोजी उपरोक्त गोविंद महार यांच्या वंशज असलेल्या राजेंद्र गायकवाड यांनी ‘ गोविंद महार यांच्या समाधीकडे ‘ असा फलक लावला. हा फलक काढून टाकण्यात आला व गावातील काही मंडळींनी जमून गोविंद महार यांच्या समाधीवरील पत्राच्या शेडची मोडतोडही केली. त्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होऊन ४९ लोकांना अटकही झाली. १ जानेवारी २०१८ रोजी संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काही तरी अघटीत घडणार अशी जोरदार अफवा पसरवली गेली. गेल्या काही वर्षापासून या परिसरात पुण्यातील हिंदू आघाडी नामक संघटनेचे नेते मिलींद एकबोटे कार्यरत आहेत. तीन आठवड्यांपासून या परिसरात सभा घेऊन भीमा कोरेगाव येथे जमणारे देशद्रोही आहेत, असा प्रचार केला जात होता. दिलीप प्रभाकर जोशी यांनी दिनांक २८ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथील पत्रकार परिषदेत, ‘भारत हा जगात एकच देश असेल की, ज्याचे काही देशद्रोही नागरिक परकीय सत्तेचा आपल्या देशावर झालेला विजय आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. व तेथील सरकार त्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांचा कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून सर्व व्यवस्था करते.’ असे सांगितले होते. या प्रचारात आता संभाजी महाराजांच्या समाधी बद्दलच्या अफवेची भर टाकण्यात आली. २९, ३०, ३१ डिसेंबर २०१७ या तारखांना भीमा कोरेगाव वढु (बु), सणसवाडी या गावाना शांतता होती पण, तरीही अपरिचित व्यक्तिंचा वावर वाढलेला होता. याच दरम्यान ३० डिसेंबर २०१७ रोजी भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीने ‘वढु(बु) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर झालेल्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये या करीता आम्ही दि. १ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण कोरेगाव भीमा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांनी घेतला आहे’. असा ठराव करून तो पोलीस निरिक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिला होता. पोलिसांनी त्याकडेही दुर्लक्ष केले.
दि. १ जानेवारी २०१८ रोजी काय घडले ?
दि. १ जानेवारी २०१८ ला सकाळपासून भीमाकोरेगावला स्मृती स्तंभाकडे मानवंदना देण्यासाठी पुण्याच्या, अहमदनगरच्या व चाकणच्या बाजूने गर्दी वाढत होती. दुसरीकडे वढु(बु) या ठिकाणी तोपर्यंत गोविंद महार समाधीच्या मोडतोडीबद्दल दि. ३० डिसेंबर २०१७ रोजीच तक्रार दाखल झाल्याने पोलीस कारवाई करण्यात आली होती. अफवेमध्ये या बातमीची भर टाकून वढु(बु) या ठिकाणी सकाळी १० वाजता हजारोंचा जमाव भगवे झेंडे घेऊन जमलेला होता. भीमा कोरेगावच्या जवळपासच्या गावांच्या मोकळ्या पटांगणांवर महाराष्ट्रभरातून स्तंभ वंदनेसाठी आलेल्या लोकांच्या गाड्या लावलेल्या होत्या. तेथून ते सर्व जण लहान मुले, स्त्रिया, वृद्ध इ. पायी ३-४ कि.मी. चालून भीमाकोरेगावच्या स्तंभाच्या दिशेने जात होते. १ जानेवारी २०१८ ला सकाळी वढु(बु) येथे सभा होऊन त्यात चिथावणीखोर वक्तव्ये झाली असावीत. कारण तेथून निघणार्या समुहाने वढु(बु)च्या बाहेरच पटांगणात उभ्या भीमा कोरेगावसाठी आलेल्या लोकांच्या गाड्या फोडल्या. तेथून हा जमाव घोषणा देत सणसवाडी, कोरेगाव आणि चाकण-शिक्रापूर रोडच्या दिशेने गेला. सणसवाडी रस्त्यावर पोहचताच त्यांनी स्तंभाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर आणि गाड्या कडेला लावून पायी जाणाऱ्या आंबेडकरी जनतेवर प्रचंड दगडफेक सुरु केली. सणसवाडीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्क केलेल्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर रस्त्यावरील सलीम इनामदार यांचे कपड्याचे दुकान पेटवण्यात आले. या दगडफेकीने फोडण्यात आलेल्या तसेच जाळलेल्या गाड्यांवरच्या नंबर प्लेट पाहता त्या सर्व दुसऱ्या जिल्ह्यांमधून आलेल्या होत्या. उभ्या असलेल्या गाड्यांचे पंचशीलाचे किंवा निळे झेंडे काढून त्या काठ्यांनीच गाड्या फोडण्यात आल्या. गाड्या ज्या पद्धतीने जळालेल्या आहेत ते पाहता रॉकेल, पेट्रोल, डिझेलसारख्या ज्वालाग्राही पदार्थांचा वापर झाला असावा हे निश्‍चित.
यानंतर हा जमाव सणसवाडीच्या दिशेने दोन पेट्रोलपंप ओलांडून पुढे गेला. त्या पेट्रोल पंपावरील व आजूबाजूच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर सलीम खान यांच्या भंगारच्या दुकानाला आग लावण्यात आली. ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे सणसवाडी बंद असल्याने दुकानात कुणीही नव्हते. नंतर या जमावाने रस्त्याच्या समोरील बाजूस असगर अली अन्सारी यांच्या दुकानाबाहेरील टायर जाळले. दुकानात शटर बंद करून असलेल्या अन्सारींचा भाऊ शटर उघडून, जीव मुठीत घेऊन पळाला. दरम्यान आग दुकानात शिरली. शेजारील हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व त्याच्या पलीकडील भाऊसाहेब खेत्रे यांचे सर्वेश ऑटोलाईन्स हे दुकानही पेटले. दरम्यान या दुकानामागील रज्जाक भाई यांच्या गॅरेजसमोर उभे MH- 12 -786 व MH- 12 – 2757 ‘सबका मालिक एक’ लिहलेले दोन ट्रक पेटवण्यात आले. मुख्य रस्त्यापासून हे गॅरेज ५००-८०० मीटर आत आहे. तेथे उभे असलेले ट्रक ड्रायव्हर घेऊन गेले म्हणून वाचले असे रज्जाक भाईंनी सांगितले. राणाभाई मारबल हे शिवराज प्रजापती यांचे दुकान फोडण्यात आले. त्याच्या पलीकडे असलेली हरिभाऊ दरेकर यांची लाकडाची वखार शेजारील आगी मुळे पेटली.
सुदाम शंकर पवार हे बौद्ध गृहस्थ. सणसवाडीच्या उत्तरेला त्यांना धरणग्रस्त म्हणून मिळालेली दोन एकर जमीन आहे. त्यात दीड एकर ऊस आहे. तर अर्ध्या एकरात एक मोठे सभागृह, बुद्धविहार व मोकळे पटांगण आणि २९ खोल्यांची चाळ आहे. १ जानेवारी २०१८ रोजी अंधार पडू लागल्यानंतर जमाव साधारणता दीड किलोमीटर चालत गेला व इस्पात कंपनीच्या बाजूने आत घुसला व पटांगणात उभ्या असलेल्या गाड्या फोडल्या. ऊसाला चौहोबाजूने आग लावण्यात आली. विहाराच्या काचा फोडण्यात आल्या. त्यांच्या समोर असलेले दरेकर व हरगुडे यांची घरे, मळे सुरक्षित राहिली. त्यांच्या घरापर्यतच्या रस्त्यावर कुठेही जाळपोळ, दगडफेक नाही. फक्त सुदाम पवारांनाच लक्ष्य केलेले दिसते. सणसवाडीतील रवी कांबळे, आठवले यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. भीमा कोरेगावमध्ये बिल्डींगमधून दगडफेक झाली. त्या ठिकाणी एल्विन फर्नाडीस या प्रख्यात चित्रकार व शिल्पकाराचा स्टुडीओ आणि मुथा या जैन व्यापार्याची मालमत्ता जाळण्यात आली.
याप्रकारामुळे अहमदनगरवरून येणाऱ्या लोकांना अडवण्यात आले. आणि स्तंभाजवळच्या लोकांना सर्व बाजूंनी जळालेल्या गाड्यांच्या धूराचे लोट दिसत होते. परंतू, पोलीसांनी पुलावरून पुढे जाण्यास मज्जाव केला. दरम्यान, एकमेव पुणे-भीमाकोरेगाव रस्ता चालू होता. त्यातून एक आगीचा बंब सणसवाडी पर्यत पोहचला तोही जाळून टाकण्यात आला. या परिसरात त्या दिवशी महाराष्ट्रातून आलेल्या ५००० गाड्यांची मोडतोड झाली व सुमारे ५० कार, लक्झरी बसेस जाळण्यात आल्या. वढु(बु) ला जमून चाकण रोड, सणसवाडी, भीमा कोरेगाव चौक येथे गेलेल्या भगवे झेंडे घेतलेला जमाव हाही बाहेरून आला होता. गावकऱ्यांचा त्याच्यांशी संबंध नसल्याचे म्हंटले आहे. परंतु हा जमाव जमविणाऱ्याची नावे ते सांगतात. आणि पोलिसांना तर ती निश्चित माहिती आहेत. एड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यामुळेच ती जाहीर केली आहेत. सणसवाडी येथे नुकसान झालेले दरेकर वगळता सर्व जण काही वर्षापूर्वी बाहेरून येऊन स्थायिक झालेले आहेत. ते सर्वजण एकतर मुस्लिम किंवा बौद्ध आहेत. स्थानिक मराठा, माळी शेतकरी कुटूंबाचे कोणतेही नुकसान झालेले समोर आले नाही. अल्पसंख्यानाकांची कापड, भंगार दुकाने, ट्रक सणसवाडीत जळाली आणि शेजारच्या आगीमुळे खेत्रे-दरेकर यांचे नुकसान झाले असे दिसते.
म्हणजेच गाववाल्यांचा सहभाग नाही आणि गाववाल्यांचे नुकसान नाही बाहेरून अपरिचित सुसंघटित जमाव जमवून कॉलनीतल्या, वस्तीतल्या मुस्लिमांवर हल्ले करणे- त्यावेळी पोलीसांनी हल्लेखोरांना बघ्याची भूमिका घेत सामील होणे असा गुजरात दंगल पॅटर्न जो अलीकडे २०१३-१४ च्या काळात सासवड, हडपसर, पिंपरी-चिंचवड येथे वापरण्यात आला होता. तो मुस्लिमांसह बौद्ध, ख्रिश्चन व जैन यांच्याबाबत १ जानेवारी रोजी वापरण्यात आला. हे काम ब्राह्मणी हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोकच नियोजनबध्द पद्धतीने करू शकतात हे जग जाहीर आहे. भीमा कोरेगावच्या निमित्ताने वढूचा मुद्दा जोडून मराठा-माळी विरुद्ध दलित असे भांडण लावायचे, त्या दंगलीत अल्पसंख्याकाना लक्ष करून त्यांच्या मालमत्ता जाळायच्या आणि या प्रकारात गुंतउन बहुजन मुलांना तुरुंगात धाडून त्याचे भवितव्य बरबाद करायचे असा भयानक कट या ठिकाणी आमलात आलेला आहे.
महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील मध्यमवर्ग जो राखीव जागांमधून आर्थिक सुस्थितीत आला आहे. तो भीमा कोरेगावला स्वताच्या, भाड्या-तोड्याच्या गाड्यांमधून येतो. या परिसरात गाड्यांना लक्ष्य केलेले पाहता बौद्धांच्या या समृद्धीचा विषमतावादी ब्राह्मणी शक्तींना असलेला द्वेष बाहेर पडल्याचे दिसते. १५-२५ वयोगटातील मुलांची माथी भडकवून त्यांच्या हाती दगड देण्याचा काश्मीर पॅटर्नची पुनर्रावृत्ती घडवण्यात आली आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या निरनिराळ्या व्हीडियो व ऑडीओंची सायबर सेल मार्फत सत्यता पडताळणी केली पाहिजे.
पोलीस व प्रशासनाची भूमिका
१ जानेवारीला सणसवाडी, भीमा कोरेगाव रस्त्यावर पूर्णपणे अनुपस्थित होते. राज्यमंत्री दिलीप कांबळे गाडीतून उतरलेच नाहीत आणि महाराष्ट्र शासनाने यावर्षी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री स्तंभाला मानवंदना देण्यास हजर राहणार असे जाहिर केले होते. तरीही श्री. बडोले ३१ डिसेंबरला हजर परंतु १ जानेवारीला मात्र गैरहजर. असे का? पोलीसांची भीमा कोरेगावच्या स्तभांजवल तुरळक उपस्थिती होती. परंतू, मोठी कुमक वढु(बु) ला होती. मग, उन्मादीत जमावाला का रोखले गेले नाही ? तो जमाव ४-४ कि.मी. चालत मुख्य रस्त्यावर येऊन दगडफेक करेपर्यत पोलीस गप्पच का होते ? सणसवाडीत ग्रामपंचायतीचा ठराव बघता व परिसरात चाललेल्या हिंदूत्व आघाडीतील सभांमधील प्रचार पाहता पोलीसांना यावर्षी काहीतरी अघटीत घडणार हे समजले नाही का ? आणि त्याबाबत प्रतिबंधात्मक कृती केल्याचे अजिबात दिसले नाही.
गाड्या जाळण्यासाठी ज्वालाग्रही पदार्थासह केलेली तयारी, इमारतीच्या वरच्या मजल्यावर दगड जमा करणे हे पाहता एक पूर्वनियोजित कट या मागे असल्याचे दिसते. गुप्तचर यंत्रणांना हे का समजले नाही? अजूनही जळलेल्या गाड्यांचे व इतर पंचनामे बाकी आहेत.
महाराष्ट्रभरातून आलेल्या शेकडो गाड्या फोडण्यात व जाळण्यात आल्याने नंतर महाराष्ट्रभर बंद निमित्ताने प्रतिक्रिया उमटलेली दिसते.
आता पुढे….
महाराष्ट्र शासने विनाविलंब न्यायालीन चौकशी करून चिथावणी देणाऱ्यासह जाळपोळ करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. वढु(बु) मधील गैरसमज दूर झालेले असून तेथील ग्रामस्थांनी सलोख्याचा करार केल्याचे पोलीस व माध्यमांसमोर जाहिर केले आहे. हा एकजुटीचा वढू प्याटर्न महाराष्ट्रा समोर नेला पाहिजे. वढू बुद्रुक येथे ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या कराराची अंमलबजावणी केली पाहिजे. गोविंद महार यांच्या समाधी स्थळासह एकूण सुधारणांसाठी तीर्थ स्थळास २५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले पाहिजे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून संभाजी महाराजांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिणारे प्रख्यात इतिहासकार वा. सी. बेंद्रे तसेच कमल गोखले, जयसिंगराव पवार व शरद पाटील यांचे इतिहास लेखन महाराष्ट्र शासनाने कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे व त्यांच्या लिखाणातील वेच्यांचे फलक वढू परिसरात लावण्यात यावेत. भीमा कोरेगावच्या १८१८ च्या लढाईत पेशव्यांविरुद्ध लढण्यात इतर जातीजामातींचा सहभाग पाहता ’ सामाजिक परिवर्तन ऐक्य स्तंभ ’ घोषित करून १९९० ते २००० पर्यंत चालू होते त्याप्रमाणे भारतीय सैन्य व महाराष्ट्र शासनातर्फे मानवंदना सुरु केली पाहिजे.
१ जानेवारीपासून शेतकरी कर्जमुक्ती, रोजगार वृद्धी, दलित आदिवासी, भटक्या-विमुक्तांचे महत्त्वाचे प्रश्न सार्वजनिक चर्चा विश्वातून गायब झाले आहेत. हे सुज्ञानी लक्षात घेतले असेल. महाराष्ट्रातील बहुजनाच्या दोन पिढ्या मुसलमानांना विरोध करण्यात गेल्या. आता पुढील दोन पिढ्या दलितांविरोधात लढवून बरबाद करण्याचा २१व्या शतकातला अजेंडा ओळखला पाहिजे. हाच १ जानेवारी व नंतरच्या घटनांपासून घ्यावयाचा बोध आहे.

लेखक सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते व समतावादी प्रबोधक आहेत.

10 Comments

  1. Santosh Shinde Reply

    अतीशय सुंदर व आभ्यासपुर्ण मांडणी दंगलखोरांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. सरकारकडे योग्य पाठपुरावा करून आपण जागृत राहिले पाहिजे. लढेंगेजितेंगे

    – संतोष शिंदे,, संभाजी ब्रिगेड, पुणे

  2. Patil Sanjeev Dhanji Reply

    आपन यथायोग्य माहीती दिली आहे,ईतिहासकार है सर्व विश्वासपात्र आहे.है सत्य आहे अश्या विचारांची महारष्टाला गरज आहे. [email protected]

  3. Sandeep Ayare Reply

    अतिशय स्वच्छ आरशासारखा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

  4. adarsh damodar Reply

    खूप छान सर.तुमच्या सर्व लेखका मुळेच हा भारत समोर जाणार आहे.

  5. डॉ. पाचपिंडे Reply

    सर्वंकष माहितीने परिपुर्ण असा हा लेख आहे. वस्तुनिष्ठ। माहिती पुरविल्याबद्दल rightangle.in या वॉल/संकेत स्थळाचे व ढमाले सरांचे अभिनंदन व आभार !

  6. डॉ. पाचपिंडे Reply

    खूपच छान माहितीपूर्ण व वास्तवदर्शी लेख आहे. right angles.in व किशोर ढमाले सरांचे आभार व अभिनंदन !

  7. It is hard to believe that govt of maharashtra does not know the predators of this riot, knowingly they are ignoring, it shows state sponsored riot, It this case PIL has to registered against state govt.

Reply To adarsh damodar Cancel Reply