fbpx
राजकारण

रात्र वैऱ्याची आहे…

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला यावर्षी दोनशे वर्ष पूर्ण झाली. गेली दहा वर्षे भीमा कोरेगावला जमणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतच आहे, यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होणार हे उघड होते, त्यातच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या (गोवंश-हत्याबंदि, दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि संविधान बदलण्याच्या वल्गना) दलित विरोधी पावलांनी कोरेगावला येणाऱ्या समुहात रागाची, संतापाची भावना असणे साहजिक होते. असं असतानाही कोरेगाव येथील स्मारकाजवळ कुठलाही अतिरिक्त बंदोबस्त नव्हता.

१ जानेवारीच्या काही दिवस आधीच वढू येथील गोविंद महारांच्या समाधीवरचा मंडप कुणा अज्ञाताने पाडला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर स्थानिक समाजाच्या मदतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या गोविंद महारांच्या समाधीच्या या अवहेलनेची तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटली होती. इतक्या तणावपूर्ण वातावरणात भीमा कोरेगावला लाखोंच्या संख्येने जर अनुयायी येणार असतील तर तिथे अतिरिक्त कुमक असावी, वाहतुकीचे आणि सुरक्षेचे नियोजन असावे असे सरकार यंत्रणेतल्या कुणालाच वाटले नसावे हे आश्चर्यजनक आहे.

शिवाजी महाराजांचं नाव वापरून राज्यातल्या तरुण पिढीला धार्मिक कट्टरतेकडे नेणारे एक मोठे टोळके या राज्यात आहे, त्याच्या प्रमुखांच्या पायातल्या काट्यापासून ते अस्तित्वात नसलेल्या विषयातल्या एम. टेक पर्यंतच्या सुरस कहाण्या whatsapp च्या माध्यमातून राज्यभरात पसरवल्या जातात. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा इतिहास विसरून शिवाजी महाराज आणि समुद्राचा काय संबंध असे विचारण्याचे बौद्धिक दारिद्र्य या समूहाजवळ आहे. बेरोजगारी, दारिद्र्य, सामाजिक विषमता यासारख्या मुळ प्रश्नांना बगल देऊन आपापल्या जातीचा अन धर्माचा आधारहीन अभिमान तरुणांच्या डोक्यात भिनवायचा आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढवून निवडणुका जिंकायच्या हाच कार्यक्रम या टोळक्याचा आहे. सांगली मिरज भागातील तरुणांचे एक मोठे पथक या उद्देशाने कार्यरत असते तशीच पुणे शहरातसुद्धा या धार्मिक किड्यांची एक शहरी आवृत्ती थैमान घालत असते. भीमा कोरेगावला सध्या सुरु असलेली दंगल ही या धार्मिक किड्यांचीच करणी आहे. मराठा समाजाच्या घोळक्यात घुसून जय भवानी जय शिवाजीचे नारे देत दोन दगड भिरकवायचे मग दलित तरुणांच्या घोळक्यात घुसून त्याला उत्तर द्यायचे, दोन्ही समाजातले बेअक्कल मग उरलेली कामगिरी पार पाडतात अशा योजनाबद्ध पद्धतीने ही दंगल पेटवण्यात आलेली आहे. हे असे होईल याची कल्पना शासनाला नव्हती असे म्हणणे हास्यास्पद आहे. गेल्या काही दिवसांत ज्याप्रकारचा संताप सोशल मिडीयावरील लिखाणातून पुढे येत होता त्यावरून असे काही होणार याची कल्पना आलीच होती. जे सरकार भाजपविरोधी लिहिणाऱ्या तरुणांवर पाळत ठेवून त्यांना नोटीसा पाठवू शकते ते सरकार सोशल मिडीयावरील अस्वस्थतेला ओळखू शकले नाही हे अशक्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे कुण्या एका विशिष्ट जातीधर्माचे नव्हते. महाराजांचे कित्येक किल्लेदार हे महार समाजातील होते. मदारी मेहतर हा महाराजांचा विश्वासू अंगरक्षक होता. शिवाजी महाराजांचं राज्य हे सगळ्यांना आपलेसे वाटत होते म्हणूनच ते स्वराज्य होते. कालांतराने पेशव्यांच्या हाती सत्ताकेंद्र गेल्याने त्यांनी त्यांच्या विचारांचा राज्यकारभार चालवला, शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाला छेद देत जातीपातीचं, ब्राह्मणगुरुत्वाचं राजकारण करण्यात पेशवाईने धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला सर्वाधिक वाईट कालखंड तो होता. म्हणूनच जेव्हा इंग्रजांनी पेशवाई नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा समाजातल्या वंचित वर्गाने त्यात सहभाग नोंदवला. भीमा कोरेगावच्या लढाईत ब्रिटिशांच्या नेटिव्ह इंफंट्रीने पेशवाई सोबत जी लढत दिली ती इंग्रज विरुद्ध पेशवे अशी न राहता शोषित विरुद्ध शोषक अशी झाली. कोरेगावचं शौर्य स्मारक हे त्या लढाईचं स्मारक आहे, मात्र अलीकडच्या जात जमातीच्या संकुचित राजकारणात फक्त समाजाच्या अस्मिता फुलवणारी प्रतीके शोधली जातात आणि मग राजकारणाच्या भट्ट्या पेटवायला आयतंच इंधन मिळतं.

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत अल्पेश ठाकोर , हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी हे तीन युवक सरकारविरोधात एकत्र आल्याने भाजपची तिथे चांगलीच अडचण झाली होती. बहुजन एकता झाल्यास आपल्याला आपल्या होम पिच वर घाम गाळावा लागतो, खोटे आरोप करावे लागतात आणि इतके करून वर अश्रूही गाळावे लागतात हे संघाला चांगलेच माहीत आहे. तशाच प्रकारची संपूर्ण बहुजन युती जर महाराष्ट्रात झाली तर आपल्याला तोंडही दाखवायला जागा मिळणार नाही या भीतीने त्यांनीच हे कारस्थान घडवून आणले असावे असं म्हणायला वाव आहे.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे लोक आज त्यांचंच नाव वापरून महाराष्ट्रातल्या दोन जातींत संघर्ष पेटवत आहेत. मात्र दोन्ही समाजातील शहाणे लोक हा डाव ओळखून वेळीच सावध होतील, ही अपेक्षा आहे व ३ जानेवारीला झालेल्या महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने आता ही आशा बळावली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ज्या मुद्द्यावर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे ते महत्त्वाचे आहे. त्यांनी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात राज्यातील आंबेडकरवादी समाजाला एकजुटीची जी हाक दिली आहे, त्यातून राज्यातील मराठा युवकांमध्येही एक अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील मराठा व बहुजन मुलांच्या डोक्यात विष कालवण्यात कोण लोक आहेत, हे महाराष्ट्रातील अनेकांना माहित आहे. सत्यशोधक समाजाची पाळेमुळे खोल रुजलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न कोण करतय हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही नेत्यांना माहित होते. दुर्दैवाने त्यांच्या राज्यकाळात यावर कोणतीही राजकीय भूमिका घेतली गेली नाही. काही नेत्यांनी तर विद्वेषाचे बिज पेरणाऱ्या या नेत्यांना राजाश्रय देण्यापर्यंतही मजल मारली होती. अर्थात अनेक पुरोगामी संघटना, मराठा युवकाच्या संघटना या असल्या प्रवृत्तींचा कायम विरोध करत आल्या आहेत व करत आहेत. जेम्स लेन प्रकरणानंतर मिठाची गुळणी घेऊन बसलेल्या या प्रवृत्ती शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधासाठी खोट्या इतिहासाची साक्ष देऊन मराठा बहुजन तरुणांना भडकावत होते. भीमा कोरेगाव प्रकरणातही या राज्यातील दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचा हा डाव होता. मात्र प्रकाश आंबेडकर व अनेक आंबेडकरी नेत्या कार्यकर्त्यांनी हा डाव वेळीच ओळखून तो हाणून पाडला हे कौतुकास्पद आहे. देशातील फॅसिस्ट सरकार व राज्यातील पेशवाई संपवायची असेल, तर आजच्या बंदच्या निमित्ताने मराठा-दलित एकजुटीने फुले-शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडविण्याची शपथ शिवाजी महाराजांच्या साक्षीने सर्व बहुजन, दलित युवकांनी घेऊन कामाला लागायला हवे. लढाईतील एका टप्प्यावर दिलासा मिळाला असला तरी रात्र वैऱ्याची आहे, हे समजून सर्व शोषितांनी पेशवाई समर्थक शोषकांच्या विरोधात एक व्हायला हवे.

 

लेखक एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सार्वजनिक धोरण या विषयाचे व्याख्याते आहेत.

1 Comment

Reply To Ankur Cancel Reply