fbpx
राजकारण

महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारा बंद

एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी हाक दिली की मुंबई बंद व्हायची. जॉर्ज यांचा बंद म्हणजे टोटल बंद! जॉर्ज यांनी टॅक्सी चालक-मालक यांची संघटना उभारली होती. मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधान असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिका, गुमास्ता अशा कितीतरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी अत्यंत मेहनतीने संघटित केले होते. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकीय बंदलाही या सगळ्या कामगार संघटना हिरीरीने पाठिंबा द्यायच्या व वाहतुकीची साधनेच नसल्याने मुंबई पूर्णपणे बंद व्हायची. ट्रेन बंद पाडण्यासाठी तेव्हा जॉर्ज यांचे कार्यकर्ते ट्रॅकवर उतरायचे. जॉर्ज फर्नांडिस स्वतःही त्यांचे नेतृत्व करायचे. दादर स्थानकात असेच रेल्वे ट्रॅकवर रेल्वे बंद पाडायला ते उतरले असताना रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावर तुफान लाठ्या बरसवल्या होत्या. जॉर्ज पोलिसांच्या माराला कधीच घाबरायचे नाहीत. त्यामुळे कार्यकर्तेही जोशात असायचे. पुढे जॉर्ज यांनी बिहारमध्ये आपला राजकीय बेस हलवला व मुंबईतील त्यांच्या युनियन्सनी राजकीय भूमिका घेणे सोडून देणे. तोवर शिवसेनेचाही उदय झाला होता. शिवसेनेची राडा संस्कृती मराठी वस्त्यांतील बेकार तरुणांमध्ये लोकप्रिय होत होती. गिरणगावातील कम्युनिस्टांचे गड सेनेने राडे करून मोडून काढले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर हे तरुण आक्रमक होत हल्लाबोल करायला तयारच असायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई बंदचा इशारा दिला की, मुंबई ठप्प होत असे. शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेबांच्या हयातीतच उद्धव यांच्याकडे आले व त्या संघटनेचा बाज बदलला. राडेबाज शिवसैनिक खूपच मवाळ झाला. मुंबई बंदची घोषणा तर सेना कधीच विसरून गेली. दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला बहुतांशवेळा सेनेचा विरोध असायचा, त्यामुळे अनेकदा तणावसदृश्य वातावरण असायचं. मात्र महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री व गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा रमाबाई नगरमध्ये पोलिसांनी गोळीबार केला, त्यात १३ जणांचा बळी गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांमध्ये उद्वेगाचं वातावरण होतं. तेव्हा बंदचा इशारा न देताही मुंबई दोन दिवस जवळपास बंदच राहिली होती. मात्र भीमा कोरेगाव नंतर झालेला बंद व त्यात काही प्रमाणात फरक आहे. रमाबाई नगर प्रकरणानंतर दलित तरुणांमध्ये नेतृत्वाविषयी प्रचंड चीड तयार झाली होती. त्यातूनच रामदास आठवले यांना रमाबाईला मारहाण करेपर्यंत प्रकरण गेले. सगळ्याच नेत्यांकडून दलित जनतेची अपेक्षापूर्ती होत नव्हती. राजकीयदृष्ट्या काहीही दृष्टीपथात दिसत नव्हते, त्या उद्वेगातून दलित जनता रस्त्यावर आली व तिने मुंबई बंद पाडली. कालच्या बंदमध्ये मात्र शिस्तबद्धता होती. आवाहन प्रकाश आंबेडकरांचे होते, मात्र कारण भीमा कोरेगावचे होते. प्रकाश आंबेडकरांनी हा बंद शिस्तबद्ध व अहिंसक असावा, असे वारंवार प्रसारमाध्यमांमधून सांगितले होते. त्यामुळे रिपाइंच्या विविध गटातटाचे कार्यकर्तेही या बंदमध्ये उतरले तरी त्यांनी फारशी शिस्त मोडली नाही. रेल्वे रोको, मेट्रो रोको, बस रोको झाला. अर्थात काही ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याच. मात्र इतक्या मोठ्या महानगरात बंदचा कॉल दिलेला असताना कार्यकर्ता नी कार्यकर्त्यावर कंट्रोल करणे कुणालाच शक्य नसते. तरीही मुंबईत इतक्या वर्षांनी बंदला प्रतिसाद मिळाला व तोही प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या बंदला हे कसे काय झाले, याचे राजकीय क्षेत्रातील जाणकारांनाही प्रचंड आश्चर्य वाटते आहे.

सत्तरच्या दशकापासून मुंबई व औरंगाबाद ही दलित चळवळीची मोठी केंद्र राहिलेली आहेत. दलित पँथरपासून रिपाइंच्या चळवळी मुंबई शहरातच जन्मल्या व फोफावल्या. वडाळ्याच्या सिद्धार्थ विहारमधून अनेक कल्पक चळवळींचाही जन्म झाला. बसपाचे नेते कांशीराम हे देखील सिद्धार्थ विहारमधूनच प्रेरणा घेऊन तयार झालेले नेतृत्व होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र गेल्या वीसेक वर्षामध्ये मुंबईतील दलित चळवळीला पार ओहोटी लागली. पूर्वीच्या नेत्यांचे आपसात पटत नव्हते. मात्र ते विचारधारेचे वाद होते. नामदेव ढसाळ हे कम्युनिस्टांच्या नादाला लागल्याचा राजा ढालेंचा आरोप असे, तर ढालेंना एकांगी बौद्धवादच प्रिय असल्याचा ढसाळांचा आरोप असे. हे वाद विकोपाला जात मात्र त्या वादातूनही विचारधारेचे बारिकसारिक तपशील सामान्य कार्यकर्त्यासमोर येत असत व त्यातून त्यांचे राजकीय पोषणच होत असे.

कालांतराने दलित चळवळीचे लुम्पनायझेशन फार वेगाने होऊ लागले. अर्थात हे लुम्पनायझेशन केवळ दलित चळवळीचेच झाले असे नाही. तर महाराष्ट्रातील बऱ्याच पुरोगामी चळवळींचा ऱ्हास हा नव्वदीच्या दशकात सुरू झाला. देशात नवउदारीकरणाचे वारे वाहू लागले. आधीच व्यावसायिक शहर असलेल्या मुंबईचा चेहरा मोहरा अधिकच बदलू लागला. मुंबईतील गिरण्या बंद पडून संघटित कामगार देशोधडीला लागला होता. एकीकडे टोलेजंग इमारती व दुसरीकडे झोपड्यांची वाढत चाललेली बकालता, असे दृश्य अधिकाधिक ठाशीव होऊ लागले होते. बेकारांचे तांडेच्या तांडे तयार होत होते. याच दरम्यान मुंबई केवळ सेवा क्षेत्रापुरते शहर करायचाच निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे औद्योगिक कामगारांसाठी या शहरात दुय्यम दर्जाचीच कामे उरली होती. या सगळ्याचा अपरिहार्य परिणाम दलित चळवळीवर होतच होता. अनेक दलित वस्त्या या मोक्याच्या ठिकाणी होत्या. त्यावर मुंबईतील जमिनींच्या व्यवहारात दिसणारी हजारो कोटींची सोन्याची खाण पाहून मुंबईतील धन्नासेठची लाळ गळतच होती. त्यातूनच मग मुंबईतील अनेक दलित झोपडपट्ट्यांमध्ये एसआरएच्या नावाखाली बिल्डरांचे बोर्ड लागू लागले. एकेकाळी आंबेडकरवाद, मार्क्सवाद, कथा, कादंबरी, नाटके अशी रसरशीत विचारमंथनाची ही ठिकाणे होती. याच वस्त्यांमधून अण्णाभाऊ साठे ते बाबूराव बागूल अशी मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नेणारी लेखक मंडळी उदयाला आली होती. ढसाळांच्या कविता याच वस्त्यांमध्ये जन्माला आल्या होता. त्या वस्त्याच उद्‌ध्वस्त करण्यासाठी अनेकांना बिल्डरांनी गळाला लावले. चळवळ कमकुवत व्हायला सुरुवात झाली ती इथूनच.

त्यातूनच मग भाईंचे भाऊ वगैरे पक्षात नेते वगैरे होऊ लागले. रंगीबेरंगी कपडे, ट ला ट प ला पच्या कविता व विनोदी बिनअर्थाचे बोलणे हेच काय ते दलित चळवळीचे संचित असे नव्या पिढीला वाटावे, अशी परिस्थिती निर्माण झाली. `मुंबई माझ्या प्रिय रांडे…’ म्हणणाऱ्या आणि राष्ट्रध्वज गेला गाढवाच्या… असे लेख लिहीणाऱ्या ढसाळ-ढालेंच्या पँथरचा जमाना संपून हा नवा इस्टमन कलर नेते व यमकाच्या बुगुबुगु कवितांचा जमाना आला होता.

या सगळ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपलाही राजकीयदृष्ट्या फारसे चांगले दिवस नव्हते. मात्र इतर दलित पक्षांप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांचे लुम्पनायझेशन फारसे झाले नव्हते. एकतर या पक्षाची बांधणी त्यांनी अत्यंत भक्कमपणे विचारांच्या आधारावर केली होती. तसेच पक्षाला एकांगी बौद्ध चेहरा देण्याचे त्यांनी हेतुपूर्वक टाळले होते. भारिप बहुजन महासंघाच्या सुरुवातीच्या काळा मुंबईत त्यांचाही जनाधार चांगला होता. मात्र कालांतराने त्यांचे एकेक नेते व्यक्तिगत राजकीय हव्यासापोटी रामदास आठवलेंच्या गटात गेले. प्रकाश आंबेडकर हे अत्यंत गर्विष्ठ असल्याचे खाजगीत आरोप करीत, हे एकेकजण बाहेर पडले होते. शिस्तबद्ध तत्वज्ञानावर आधारित पक्ष बांधण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या कधीच पचनी पडत नसतो. त्यांना वळचणीला राहणारेच चालतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबाबत प्रसार माध्यमे असोत की इतर पुरोगामी पक्ष हे कायम संशयानेच पाहात असत. त्यामुळेच त्यांना विदर्भ व मराठवाड्यातील काही भाग सोडला तर फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मोदी सरकार आल्यानंतर शिवशक्ती भीम शक्तीच्या प्रयोगाने मुंबईतील अनेक दलित तरुणांना काहीतरी वेगळे मिळेलची आशा लावणाऱ्या आठवलेंच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर मात्र दलित तरुणांचा वेगाने हिरमोड होऊ लागला होता. रिपाइं आठवले गट भाजपचे समर्थन करण्यातच सगळी शक्ती वाया घालवतोय, अशी तीव्र भावना दलित समाजात रुजायला सुरुवात झाली होती. याच वेळी प्रकाश आंबेडकरांनी मात्र पद्धतशीरपणे डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांची मोट बांधली व सरकारच्या विरोधातला असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना इशारा देण्यासाठीच संगनमतानेच दादर येथील आंबेडकर भवन भाडोत्री गुंड लावून काहीजणांकडून बुलडोझर लावून पाडण्यात आले. त्यावेळी भर पावसात त्यांनी काढलेल्या मोर्चाला जो प्रतिसाद मिळाला होता, त्यावरूनच प्रकाश आंबेडकर मुंबईतही जम बसवत असल्याचे लक्षात यायला लागले होते. मात्र भीमा कारेगावच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला जो प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मुंबईतील दलितांमध्ये आंदोलनाच्या या संधीमुळे नवचैतन्याचीच लाट पसरली. लढाऊ समाजासमोर नव्या अर्थकारणाने उभ्या राहिलेल्या बिकट आर्थिक प्रश्नांमुळे राग धुमसतच होता, तो या निमित्ताने जोरदारपणे बाहेर पडला.

यामुळे मुंबईतील दलित समाज एकहाती प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आला आहे, असे म्हणता येत नसले तरी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आदर व सहानभुती आता तयार झाली आहे. आर्थिक प्रश्नांच्या जटीलतेमुळे आठवलेंवरील राग ते मंत्रिमंडळात असल्याने वाढत जाणार यात वाद नाही. त्यामुळेच मुंबईत आता आंबेडकर यांचा जोरदार जम बसणार. मुंबई बंदने अनेक नेते घडवले आहेत. या वेळच्या बंदने एका जुन्या नेत्याचे ताकदीने राज्याच्या राजकारणात पुनरागमन झाले, हाच या बंदचा खरा अन्वयार्थ आहे.

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment