fbpx
सामाजिक

जिजाऊंच्या लेकींनो, भिमाईच्या मुलींनो…

कोपर्डी, कर्जत ।। खर्डा, जामखेड ।। लोणी-मावळा, पारनेर ।।

जिल्हा अहमदनगर

अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेले बलात्कार आणि अत्यंत निर्घृणपणे केलेल्या त्यांच्या हत्या तसेच एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे थेट शाळेतून अपहरण करुन केलेली हत्या, अशा तीन संवेदनाक्षम खटल्यांचे नुकतेच निकाल लागले. तिन्ही घटना ग्रामीण भागातल्या होत्या. तिन्ही घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांत घडल्या होत्या. जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात त्यांचे खटले चालू होते. विशेष म्हणजे, तिन्ही खटल्याचे निकाल सन २०१७च्या नोव्हेंबर महिन्यात लागले. अगदी आठदहा दिवसांच्या फरकात. त्यातील एक खटला राज्यात बराच गाजला तर दुसऱ्याची थोडीफार चर्चा झाली होती. तिसरा खटला काय होता, त्याचा काय निकाल लागला, याचा फारसा कोणाला पत्ता लागला नाही.

यातले कर्जत तालुक्यातील कोपर्डीचे प्रकरण महाराष्ट्रात बरेच गाजले. तिथल्या शाळकरी मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा कोपर्डीतील प्रकार एवढा हिंस्त्र होता की आख्ख्या महाराष्ट्राच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. या गावातल्या नूतन मराठी माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयात नववीत शिकणारी पंधरा वर्षे वयाची मुलगी शाळेच्या खोखो टीममध्ये खेळायची. चुणचुणीत आणि खेळात चपळ होती. नेहमीप्रमाणे एकदा इतर मुलींबरोबर शाळेला निघाली होती. तेव्हा तिघे टोळभैरव मोटार सायकलीवर बसुन त्यांच्या भोवती घिरट्या घालत होते. त्यातल्या एका आरोपीने सगळ्यांदेखत त्या मुलीचा हात धरून जवळ ओढले. घाणेरडे शब्द वापरून ‘चल, माझ्याबरोबर निजायला. आता तुला सोडत नाही’, असे म्हणून खरोखरच ओढत नेऊ लागला. तेव्हा ती मुलगी घाबरून आरडाओरडा करायला लागली. इतर मुलीही या प्रकाराने गांगरून गेल्या. पण मुलगी आरडाओरडा करायला लागली म्हणून त्याचे मित्र म्हणालेः ‘सोड तिला. आत्ता नको. नंतर बघू,’ तेव्हा कसाबसा त्याने तिचा हात सोडला. नंतर मोटारसायकलीवर बसून त्यांच्याभोवती फेऱ्या घालत बिनधास्तपणे छेडछाड केली. या प्रकाराने घाबरलेली पोर दोन दिवस शाळेकडे फिरकलीच नाही. पण आरोपी तिच्या मागावरच होते. ती कधी घराबाहेर पडते, याची वाटच पाहात होते. अखेर दोन दिवसांनंतर तिन्हीसांझेला काही कामासाठी ती आजीच्या घराकडे सायकलने गेली. ते पाहून आरोपी एका निर्जनस्थळी दबा धरून बसले. परत येताना तिला गाठून मारहाण करत तिथंच तिला निर्वस्त्र केले. घळीत ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आख्खे शरीर ओरबाडून कुस्करले. छातीवर पाठीवर कडकडून चावे घेत हालहाल केले. अनन्वित अत्याचार केले. प्रतिकार करते म्हणून सांध्याकोपरातून हातपाय तोडले. बलात्कारानंतर अर्थातच तिला जिवे मारले. क्रौर्याची परिसीमा इतकी की मान पिरगळून समोरचा चेहरा थेट पाठीवर आणला होता. हा सगळा प्रकार चालला असताना त्याच्या दोघा मित्रांनी त्याची मोटारसायकल तिथून सुरक्षित जागी नेली. त्यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग दिसत नव्हता. पण गुन्ह्याच्या कटात सहभाग होता. बलात्कार करणाऱ्या मित्राला त्यांनी मदतही केली होती.

पिडित मुलगी मराठा समाजातली तर तिच्यावर अत्याचार करणारे दलित समाजातले होते. दलितांची या गावात फार घरं नाहीत. गाव मराठ्यांचे पण तरीही त्यांनी बेदरकारपणे हे कृत्य करण्याचे धाडस केले, हे विशेष ! मराठ्यांना सरंजामी म्हटले जाते. ते तसे असते तर हे धाडस झाले नसते. कोपर्डीतले मराठे सर्वसामान्य होते. म्हणूनच या प्रकाराने आख्खं गाव भेदरलं होतं. पोलिसांचा तपास त्यांच्या नेहमीच्या खाक्याने चालला होता. तेव्हा गावातल्या तरुणांनी त्या दुर्दैवी तरुणीवर झालेल्या अत्याचाराची छायाचित्रे व्हॉटसअप आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर टाकली. ही भीषण छायाचित्रं अतिशय वेगाने तालुक्या तालुक्यातून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कारखाने, कंपन्या, कोर्ट कचेऱ्यांच्या खात्याखात्यातून थेट मंत्रालयापर्यंत गेली. शहाण्ण्व कुळी, पंचकुळी, देशमुख तसेच भावकी आणि पैपाव्हण्यातही गेल्याने राज्यातल्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज संतापाने खदखदायला लागला. अत्याचार करणारे दलित असल्याने अर्थातच दलित समाजाबद्दल टोकाचा संताप होता. या निमित्ताने सर्वसामान्य मराठ्यांतही जातीची अस्मिता धुमसायला लागली. अन्यथा जातीची ती अस्मिता धनदांडग्यांच्या घरातच पाणी भरायची.

मराठा समाज हा गावातल्या बायाबापड्यांची अब्रू लुटणारा, बेदरकारपणे अत्याचार करणारा, व्यसनी, भ्रष्ट, अशिक्षित, असंस्कृत तसेच सत्तापिपासू असे वर्षानुवर्षे चित्र रेखाटून त्याला सरंजामदार ठरविण्यात आले होते. गरीब मराठा तोंड बंद करुन या बदनामीचा मार वर्षानुवर्षे सहन करत आला. काही धनदांडग्या मराठ्यांचे वर्तनही तसेच होते. पण केवळ या रांझेपाटलाच्या औलादीमुळे सगळ्या मराठयांना खलनायक ठरविण्यात आले होते. सगळा समाज तुच्छतेचा धनी ठरला होता. या समाजातही दारिद्र्य आहे. तोही शोषितपिडित आहे. त्यातही सुशिक्षित आणि पापभिरू लोक आहेत. तेही सुसंस्कृत आहेत. काळाच्या ओघात त्यांनीही सचोटी आणि स्वच्छतेचे मूल्य अंगिकारले आहे, यावर मराठेतरांचा विश्वासच नव्हता. काहींना तो ठेवायचाही नव्हता. त्यामुळे सब घोडे बारा टक्के, या न्यायाने सगळेच मराठे भ्रष्ट, धनदांडगे आणि सरंजामी ठरविले गेले होते. एखाद्या नेत्याने कितीही प्रागतिक भूमिका बजावल्या, सामाजिक बांधिलकीतून काही निर्णय घेतले तरी त्याला ‘मराठा स्ट्राँगमॅन’ म्हणून लेबल लावून टाकायचे. एकदा त्याचेच तोंड काळे केले की तर बाकीचे सगळे आपोआपच गावगुंड ठरवून बाजूला करता येतात. मुस्लिमांच्या बाबतीत जी रणनीती अवलंबिली जाते तीच रणतीनी वापरून मराठ्यांना बदनाम करण्यात आले. अभिजनांच्या या खेळीमुळे मराठे आधीपासूनच नाराज होते.

राज्यात बहुतांशी शेतकरी मराठा आणि बहुतांशी शेती कोरडवाहू. या कोरडवाहू शेतीतून फारसं काही हाताला लागत नव्हते. आयुष्याला ठिगळं लावून कसंबसं जगणारा हा शेतकरी जागतिकीकरणानंतर पुरता मोडून पडला. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करायला लागला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वेगाने फैलावत गेल्याने सबंध ग्रामीण महाराष्ट्र झाकोळून गेला होता. मग तो शेतकरी मराठा असो वा इतर बहुजनसमाजाचा. गावोगाव सुशिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित बेरोजगार तरुणांचे तांडे उभे होते. दारिद्र्य, बेकारी आणि बेरोजगारीने आख्खा ग्रामीण महाराष्ट्र हैराण होता. त्यांना न्याय मिळवून देणे लांबच. उलट शहरी मध्यमवर्गीय ब्राह्मणी मानसिकतेच्या मध्यप्रवाहात हा बकाल ग्रामीण समाज आणि त्याचे प्रश्न दखलपात्रही नव्हते. मग हा असंतोष संघटित करुन त्याला योग्य दिशा देण्याचे भान कोणाला होणार ? उजवे डावे असे बहुतेक राजकीय पक्ष आणि विशेषतः प्रसारमाध्यमं ही याच ब्राह्मणी मध्यमवर्गीय मानसिकतेनून या प्रश्नांकडे पाहात होती. आख्ख्या शहरी समाजाची मानसिकता दूषित करत होती. समाजातला कर्ता मध्यप्रवाहच ब्राह्मणी मध्यमवर्गीय मानसिकतेचा गुलाम झालेला असल्याने या शेतीशी निगडीत असलेल्या समाजघटकावर सरंजामीपणाचे शिक्के मारून त्यांच्या प्रश्नांची बोळवण केली जात होती. त्यातच कोपर्डीची घटना घडल्याने सर्वसामान्य मराठा खडबडून जागा झाला. या अत्याचाराने गरीब मराठा आणि विशेषतः तरुण कमालीचे सैरभैर झाले. असंतोष धुमसत धुमसत राज्यभरतातल्या कानाकोपऱ्यात गेला. आता दलितही आमच्यावर अत्याचार करु लागले, अशी सुप्त चीड होती. कोपर्डीच्या हिंस्त्र प्रकाराने संतापलेले राज्यभरातले तरुण समाजमाध्यमावर महिनाभर आपली स्फोटक मतं व्यक्त करत चर्चा घडवून आणत होते. त्याला शहरी मध्यमवर्गीयांतून आणि विशेषतः दलित आणि ओबीसी घटकांतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रतिवाद केला जात होता. प्रसंगी हेटाळणीही केली जात होती. आणि माध्यमं त्यांना फूस लावून आगीत तेल ओतण्याचे काम करत होती. कोंबडं झुंजवण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू झाला होता. अशा वातावरणात गरीब मराठा मुलीवर झालेल्या अत्याचारातून जातीच्या अस्मितेला आणखीनच धुमारे फुटले. मराठे म्हणजे कधीही एकत्र न येणारी जात. उलट, सतत परस्परांशी झुंजणे. दगाफटका करणे. हे या जातीचे गुणविशेष सांगितले जातात. मराठे कधीच एका पक्षात नसतात. त्यांच्या जातीचा कोणताही पक्ष नाही. शिवाय, ते कधीही जातीसाठी मतदान करत नाहीत. नाहीतर २७ ते ३० टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात इतर कोणाचीही सत्ता आली नसती. तर असे हे मराठे कोपर्डीनंतर कधी नव्हे ते एकत्र आले. रस्त्यावर उतरले. प्रतिष्ठेच्या गोशातून लेकीसुनांनाही बाहेर काढले. शेलगटाच्या कथित प्रतिष्ठेला वैतागलेल्या मुलीही पडत्या फळाची आज्ञा घेऊन मोर्च्यात सामील झाल्या. महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना प्रशस्त वाटावे, यासाठी बारकाईने नियोजन केले होते. घोषणा सुरु झाल्या की महिलांना माना खाली घालाव्या लागतात, या कारणास्तव मोर्चा मूक झाला. गणवेशधारक शाळकरी मुली मोर्च्याचे नेतृत्त्व करु लागल्या. पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या या ‘जिजाऊच्या लेकी’ शिवरायांच्या आणाभाका घेत तडफेने बोलू लागल्या. महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाचा शिवाजी महाराजांनी कसा चौरंग केला, याचे उदाहरण देऊ लागल्या. कोपर्डीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या तसेच राजकारण, समाजकारण कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्या सर्वसामान्य घरातल्या या ग्रामीण मुली महिलांवरच्या अत्याचाऱ्यांच्या विरोधात ताडताड बोलू लागल्या, हा बदल सुखावह होता. मराठा मुली जातीच्या माध्यमातून का होईना, पण गोशातून बाहेर येणे गरजेचे होते. ती प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात मराठा मोर्च्यामुळे सुरू झाली. या निमित्ताने घराबाहेर आलेल्या या लेकीसुनांना कधी ना कधी जातीपलीकडच्या महिलांच्या व्यासपीठावर जावे लागणार आहे. त्याकरिता सामाजिक प्रश्नावर घराबाहेर पाऊल पडणे आवश्यक होते.

राज्यभरातून मराठ्यांचे ५८ अभूतपूर्व मोर्चे झाले. ते शांततेत पार पडले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे. तसेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण मिळाले पाहिजे, या मोर्च्याच्या प्रमुख मागण्या होत्या. राज्यातील मोठ्या लोकसंख्येच्या समाजातील असंतोष लक्षात घेऊन सरकारने कोपर्डी प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला. अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. आणि अवघ्या सोळा महिन्यांत कामकाज पूर्णही झाले. निकाल ऐकण्यासाठी लोकांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा लोकांनी जल्लोषात या निकालाचे स्वागत केले. काही उत्साही लोकांनी तसेच निकाल ऐकायला आलेल्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आनंदाने फटाके उडविले आणि पेढेही वाटले. पण ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही, याचे भान त्यांना नव्हते.

कोपर्डी येथील बलात्कार आणि खुनाच्या प्रकारात प्रत्यक्ष कोणी साक्षीदार नव्हता. त्यामुळे पिडितेला न्याय मिळवून देणे, हे मोठे आव्हान होते. सरकारचा दबाव असल्याने पोलिसांनी नंतर सखोल तपास केला त्यामुळे केवळ सबळ परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावार तसेच न्यायवैद्यक तपासणीच्या अहवालानुसार न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. अर्थात या शिक्षेवर पुढे उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब व्हावे लागेल. त्याहीपुढे राष्ट्रपतींनी हीच शिक्षा कायम केली तर फाशी दिली जाते. पुढे काय होईल ते होईल. कदाचित अन्य दोघा आरोपींची वरच्या न्यायालयात शिक्षा कमीदेखील होईल. पण सत्र न्यायालयात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याने आपल्याला न्याय मिळाला, असा दिलासा पिडित मुलीच्या कुटुंबियांना मिळाला. तसेच आपल्या मोर्च्याची मागणी मान्य झाली, असा संदेश मराठा समाजात गेला. निकाल यापेक्षा काही वेगळा लागला असता तर काही खरे नव्हते, अशी स्थिती होती. निकालामुळे ते थांबले हे बरे झाले.

खर्डा, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर

जामखेड तालुक्यातील खर्डा या गावात रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. जामखेड हा कर्जतला लागून असलेला तालुका. या शाळेत नितीन आगे हा १७ वर्षे वयाचा दलित मुलगा इयत्ता ११वीत शिकत होता. वडिल मजुरी करायचे. या मुलाचे त्याच शाळेतील एका मराठा समाजातील मुलीशी प्रेमसंबंध होते. वडिलांच्या फिर्यादितही तसे नमूद केले आहे. नितीन आणि ती मुलगी कुठेतरी रस्त्यात बोलताना शाळेतल्या मुलांनी पाहिले आणि त्यांनी ही गोष्ट गावभर केली. एका सकाळी ज्यादा वर्ग असल्याने तो शाळेत गेला होता. मराठा मुलीशी दलित मुलाच्या प्रेमसंबंधाचे प्रकरण भावकी, पैपाव्हण्यात आणि गावात चवीने चघळले गेले असणार. अब्रूचे असे धिंडवडे निघाल्याचे पाहून संतापाने पिसाटलेल्या मुलीच्या भावासह गावातले आठदहा लोक चार मोटारसायकींवरुन २८ एप्रिल २०१४ रोजी सकाळी शाळेत जातात. नितीनला वर्गातून बाहेर काढतात. शाळेपुढच्या मैदानात नितीनला लाथाबुक्कयाने बुकलत लगेच लाठ्याकाठ्याने मारहाण करायला लागतात. मारहाण करतच मोटारसायकलवरुन त्याला गावाजवळच्या वीटभट्टीवर नेले जाते. तिथून एका लिंबाच्या बागेत नेऊन मारहाण केली जाते. शेवटी गळा दाबून मारले जाते. मग त्याने जणुकाही आत्महत्या केली हे भासविण्यासाठी कान्होबाच्या देवळाजवळच्या एका लिंबाच्या झाडावर मृतदेह लटकविण्यात येतो. नितीनच्या वडिलांनी खुनाची तक्रार नोंदविल्यावर अल्पवयीन दलित मुलाचे अपहरण आणि खून, या आरोपाखाली पोलिसांनी तेरा जणांना अटक केली. यात तीन आरोपी अल्पवयीन होते. खटला चालू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार मिळून एकूण २६ साक्षीदार होते. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी तपास करुन आरोपपत्र दाखल केले होते. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हे नोंदविले होते.

तपासानंतर प्रत्यक्ष खटल्याचे कामकाज सुरु झाले तेव्हा फिर्यादी, नितीनची आई, डॉक्टर आणि पोलिस हे वगळता बाकीच्या सगळ्या १४ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरविली. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, निलेश महादेव गोलेकर, विनोद अभिमन्यू गोलेकर, राजकुमार शशीराव गोलेकर, भुजंग सूर्यभान गोलेकर, सिद्धेश्वर विलास गोलेकर, संदीप तुकाराम शिकारे, विशाल हरिभाऊ ढगे, या सर्वच्या सर्व नऊ आरोपींना सत्र न्यायाधीश विवेक हूड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींनी शाळेत येऊन मारहाण करीत नितीन आगे याला मोटारसायकलीवरुन नेले, असा जबाब न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी पोलिसांना दिला होता. शिक्षक बाळू जोरे, शिक्षिका साधना फडतरे, शिपाई विष्णू जोरे आणि सदाशिव मुरलीधर डाडर हे शाळेतील महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. पण मॅजिस्ट्रेटपुढे नोदविलेल्या साक्षी आपण दिल्या नसून पोलिसांनी धमकी देऊन कोऱ्या कागदावर सही घेतल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच शाळेत असे काही झाल्याचे आपण पाहिले नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. शाळेची घंटा वाजविण्याच्या दांडक्याने आरोपीने नितीच्या गुडघ्यावर फटका मारला, हेही शिपायाने न पाहिल्याचे सांगितले. शाळेतील दोन शिक्षक आणि दोन शिपाई यांनी आधी दिलेल्या साक्षी नंतर न्यायालयात फिरविल्या. रस्त्यावरुन डंपर घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरने सकाळच्या वेळी चार मोटारसायकलींवरुन आरोपी नितीनला घेऊन निघाल्याचे पाहिले होते. पण या साक्षीदारानेही आपली साक्ष फिरविली आणि आपण असे काही पाहिले नसल्याचे सांगितले. नितीनला गहिनीनाथ गोळेकर यांच्या लिंबाच्या बागेत मारहाण केली जात असताना आणखी एकाने पाहिले होते. तो शेजारच्या गावचा होता. पण त्यानेही आपली साक्ष नंतर फिरविली. पुढे कान्होबाच्या देवळाजवळ मारहाण करताना आणखी एकाने पाहिले होते. त्यानेही आपली साक्ष फिरविली. नितीनबरोबर शिकणाऱ्या त्याच्या वर्गातल्या एका मुलाला सकाळी ११.३०च्या सुमारास काही लोक घरी येऊन मोटार सायकलीवरुन कान्होबाच्या देवळाजवळ नेतात. तिथे त्याला नितीनबाबत विचारतात. तो नीट सांगत नाही म्हणून आरोपी त्याच्या मुस्काडात मारतो. पण तो अल्पवयीन मुलगाही नंतर आपली साक्ष फिरवितो. काहीजण नितीनला मारहाण करीत आहेत, असा निरोप एकाने त्याच्या घरी जाऊन दिला होता. नितीच्या वडिलांनाही त्याने हे सांगितले होते. पण नंतर तो ठाम राहिला नाही. मुलाच्या मारहाणीची माहिती मिळताच नितीनची आई शाळेकडे धावत निघाली होती. तेव्हा वाटेत मोटार सायकलीवरुन परतताना एक आरोपी भेटतो आणि ‘आम्ही नितीनचे कामच केले’, अशी बढाई तो तिच्यापुढे मारतो. पण यालाही काही दुजोरा मिळत नाही. नितीनच्या बहिणी, आई, नातेवाईक तसेच पोलिस आणि वैद्यकीय अधिकारी वगळता जवळपास सगळ्याच साक्षीदारांनी आपली साक्ष फिरविली. इतके सगळे साक्षीदार फुटल्याने न्यायालयाने खर्डा प्रकरणातील सगळ्यच्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आगे याच्या हत्येनंतर राज्यातील दलित तसेच सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे आणि धरणी धरून निषेध केला होता. हा खटला जलदगति न्यायालयात चालवावा. खटला लढविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा. तसेच नितीन आगे याच्या खुन्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या तत्कालीन सरकारने प्रत्येक मागणी मान्य केली. पण प्रत्यक्षात या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही. कायद्यावर विश्वास ठेऊन न्यायाची अपेक्षा करणाऱ्या पिडित आगे कुटुंबियांच्या पदरात न्यायाऐवजी अन्यायच येतो. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारातही सगळे साक्षीदार फितूर होतात. सगळेच आरोपी निर्दोष सुटतात. सरकारी वकील आरोप सिद्ध करु शकले नाहीत, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे. मृत आगे आणि शाळेतील ती मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते, असा नितीनचे वडील आणि बहिणींचा दावा होता. पण या प्रेमप्रकरणाचा कोणताही ठोस पुरावा त्यांना देता आला नाही. त्यामुळे ही केवळ सांगोवांगी गोष्ट असून सरकार पक्षाला त्याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा सादर करता आला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. विशेष म्हणजे, ज्या मुलीबरोबर नितीनचे प्रेमप्रकरण होते त्या मुलीला साक्षीदार म्हणून बोलावले नाही, तिला तपासले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्या मुलीची चौकशी केली असती, साक्षीदार म्हणून बोलावले असते तर यातून काही ना काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता होती. किमान तिची मनःस्थिती काय आहे, हे तरी स्पष्ट झाले असते. पण जिजाऊच्या या लेकीचे तोंड बंद राहावे, अशीच तजवीज यात केली गेल्याचे दिसते. अगदी पोलिसांनीही ?

या प्रकरणात मोटार सायकली, मोबाईल फोन, शाळेतील ओळखपत्र, घंटा वाजविण्याचा हातोडा, लाठ्याकाठ्या पुरावा म्हणून सादर केल्या, पण सरकारपक्ष त्यांचा गुन्ह्याशी संबंध प्रस्थापित करु शकला नाहीत. नितीनचे ओळखपत्र पोलिसांनी आरोपीकडून घेतले, याचा त्यांना गुन्ह्याशी संबंध लावता न येणे म्हणजे आश्चर्यच आहे. अपहरण आणि मारहाणीआधी तसेच नंतर आरोपींची काहीएक फोनाफोनी झालेली असणार, पण त्यांचा संबंध प्रस्थापित करण्यात आला नाही. पुरावा म्हणून नुसते फोन ताब्यात घेण्याने त्याचा हत्येशी संबंध कसा काय जोडता येतो, हे तपास करणाऱ्यालाच ठाऊक ! मोटारसायकलींचा वापर, लाठ्याकाठ्याची मारहाण, घंटा वाजविण्यात आलेल्या दांडक्याने केलेली मारहाण, याचाही संबंध लावणे गरजेचे होते. आगेच्या हत्येच्या प्रकरणातील हे पुरावे आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नव्हते, असे न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे एकूणच आगे हत्या प्रकरणातील पोलिसांच्या तपासाच्या संबंधातही गंभीर स्वरुपाचे प्रश्न निर्माण होतात. सगळ्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली असली तरी नितीन आगेचा मृत्यू हा मारहाणीने आणि गळा आवळूनच झाल्याचे वैद्यकीय पुराव्यावरुन न्यायालयाने मान्य केले. पण खून कोणी केला आणि तो का केला, हे प्रश्न निकालानंतर अनुत्तरितच राहिले.

कोपर्डीच्या निकालानुसार तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर खर्ड्याच्या निकालात सगळ्याच्या सगळ्या नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. दोन शेजारच्याच तालुक्यांतील घटना. दोघांचेही भिन्नभिन्न निकाल. तेव्हा या दोन निकालाची तुलना होणार. तशी ती सध्या चालू आहे. या प्रकरणात जलदगति न्यायालय, विशेष सरकारी वकिलांची नेमणूक या मागण्या मान्य केल्या होत्या. पण त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. तपास कसा चाललाय ? खटला कशा पद्धतीने लढविला जातोय ? याच्यावर कुणाचेच लक्ष नव्हतं. सरकारचे काय अगदी दलित संघटनांचेही नव्हते. त्यामुळेच पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. नाहीतर त्यांनी या प्रकरणातील मुलीची साक्ष काढली गेली असती. त्यातून पौगंडावस्थेतील या मुलामुलीचे संबंध शोधून गुन्ह्याची उकल करता आली असती. हेतु स्पष्ट झाला असता. पण एका निष्पाप अल्पवयीन दलित मुलाच्या निर्घृण हत्येपेक्षा त्या मुलीच्या आणि विशेषतः संबंधित कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेची काळजी तपास यंत्रणेला होती काय ? असा प्रश्न निर्माण होतो. पोलिस यंत्रणा निःपक्षपाती असली पाहिजे. पण ती यंत्रणा बऱ्याचदा प्रलोभनांना आणि राजकीय दबावाला बळी पडते. पण खर्ड्यात जातीच्या प्रभावानेही ती आंधळी झाली होती, असे दिसते. याची पोलिस यंत्रणेत शहानिशा होणे गरजेचे आहे. या खटल्यात गावातले, गावबाहेरचे अनेक महत्त्वाचे साक्षीदार मोठ्या संख्येने उलटले. शाळेतले शिक्षक हे विद्यार्थ्यांना नुसतेच शिकवत नाहीत तर त्यांच्यावर सचोटीचे आणि सत्याचे संस्कारही करतात. पण खर्ड्यात ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेची ही शाळा होती तिच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सत्याकडे पाठ फिरवावी, हे धक्कादायक आहे. आपल्याच विद्यार्थ्यावर तीही शाळेच्या आवारात झालेल्या मारहाणीबद्दल तसेच अपहरणाबद्द त्यांनी कानावर हात ठेवावेत, याच्याइतके दुर्दैव ते काय ? सामाजिक बांधिलकीतून शिक्षणाला वाहून घेणाऱ्या रयतची ही अवस्था समाजाचे नैतिक अधःपतन कोणत्या थराला गेले आहे, हेच दाखवते.

दुर्दैवाने या निकालाने कायद्यासमोर सगळे समान नाहीत हे सत्य अधोरेखित केले आहे. त्यात न्यायालयापेक्षा, जातीच्या प्रभावाखाली वावरणारे लोक, माणुसकीची चाड नसलेला समाज तसेच पोलिस आणि सरकारी यंत्रणा जबाबदार आहेत. या निकालाने दलित समाजात तसेच प्रागतिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून सगळ्या प्रकरणाचीच सीबीआयमार्फत नव्याने तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. दिवसाढवळ्या लोकांसमोर अपहरण, मारहाण आणि हत्या होऊनही सगळेच आरोपी सुटतात, याचे दलित समाजात दुःख आहे. काही अपवाद वगळले तर बाकी कुणाला ना खेद ना खंत, अशी स्थिती आहे. दलितांमधील नाराजीमुळे आता सरकारने हालचाल सुरू केली आहे. उलटलेल्या साक्षीदारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सरकारतर्फे न्यायालयात करण्यात येत आहे. खर्डा प्रकरणात लागलेल्या खटल्याचा निकाल रद्द करावा तसेच खटला पुन्हा सुरुवातीपासून नव्याने सत्र न्यायालयात चालवावा, असा अर्ज सरकारने नुकताच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केला आहे. पण जी संवेदनक्षमता कोपर्डी प्रकरणात सरकार आणि यंत्रणेने दाखविली ती खर्ड्याच्या प्रकाराबाबत दूरान्वेही नव्हती. मराठा मोर्च्याने तो दबाव आणला होता. खर्ड्याबाबत दलित समाजानेही मोर्चे काढले होते, पण यंत्रणेवर दबाव आला नाही. कायद्यापुढे सगळे समान असताना असा दंडक राज्यघटनेने घालून दिला आहे. पण सरकार, पोलिस आणि समाजाने हा दंडक झुगारून चार्तुवर्ण्य व्यवस्थेतील पक्षपातीपणाने वर्तन केले. उलटलेल्या साक्षीदारांवर कठोर कारवाई होऊ शकेल. पण मूळ खटल्याचीच वाट लागल्याने पुन्हा नव्याने खटला चालविण्याबाबत करण्यात आलेल्या सरकारच्या अर्जावर न्यायालय काय भूमिका घेणार, हा मोठाच प्रश्न आहे.

लोणी-मावळा, ता. पारनेर जिल्हा पुन्हा अहमदनगर

लोणी-मावळातल्या हनुमानवाडीतून दहावीत शिकणारी एक मुलगी २२ ऑगस्ट २०१४ रोजी चाचणी परीक्षेसाठी सकाळी साडेनऊला घरातून पायपीट करत निघते. लोणी-मावळातून एसटीने आळकुटी येथील साईनाथ विद्यालयात जाते. नववीला तिला ८७टक्के गुण मिळालेले असतात. त्यामुळे शाळेत हुशार म्हणून ओळखली जाणारी ही मुलगी डॉक्टर होण्याच्या स्वप्नाने झपाटेली असते. त्यासाठी किमान ९१ टक्के मार्क मिळविण्याचे उद्दिष्ट तिने ठरविलेले असते. चाचणी परीक्षेचे पेपर दिल्यानंतर संध्याकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे ५ वाजता आळकुटीहून बसने लोणी-मावळाला येते. तिथून एकदीड किलोमीटरवर असवेल्या हनुमानवाडीकडे पायी निघालेली असताना वाटेत पावसाची सर येते. तेव्हा एका झाडाखाली ती आडोश्याला थांबते. हनुमानवाडीकडून तिचा एक लांबचा भाऊ मित्रासोबत मोटार सायकलीवरुन दुसऱ्या एका गावाला निघालेला असतो. तिला एकटीला पावसात उभी पाहून म्हणतोः चल तुला घरी सोडतो. पण ती म्हणते : ‘नको. आता एवढ्यात पाऊस थांबेलच, मी जाते’. त्यालाही पण काम असल्याने तो पुढे निघतो. तेवढ्यात समोरून तिघे मोटार सायकलीवरुन येत असतात. तेही ओळखीचे. मोटार सायकल नवी घेतली काय ? असे तो विचारतो. समोरचा सांगतो, ‘आत्ताच दहापंधरा दिवसांपूर्वी घेतली’. कशी चालते वगैरे चर्चा सुरू झाल्यावर त्याच्या मागे बसलेला मित्र खाली उतरुन डोकंबिकं पुसून घेतो. तो पुन्हा विचारतोः ‘एवढी हळू का चालवतो ?’ ‘रस्ता निसरडा झालाय. कुटंतरी घसरायची’, असे सांगून ते निघतात. पावसाची सर गेल्याने कपडे झटकून मित्र मागे बसता बसता एकदा मागे वळून पाहतो. तेव्हा झाडाखाली उभारलेली मुलगीही घराकडे निघालेली असते. आणि तिघांची मोटार सायकल तिच्या मागून चाललेली असते. दोघे पुन्हा मोटार सायकलवर बसुन पुढे निघतात.

संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले तरी मुलगी घरी कशी आली नाही म्हणून घरचे काळजी करायला लागतात. शेवटी वाट पाहून तिचे भाऊ, वडील तिला बघायला निघतात. वडील लोणी-मावळातल्या तिच्या मैत्रीणीच्या घरी चौकशी करतात. पण तिझा एकच पेपर असल्याने ती दुपारीच घरी आलेली असते. मग शाळेत फोन करुन विचारणा केली जाते. शिक्षक सांगतात पाचवाजताच ती निघाली. तिचे भाऊ, आई आणि नातेवाईक रस्त्यात इकडे तिकडे तिला शोधत असतात. तेव्हा अचानक एके ठिकाणी एक सँडल पडलेला आढळतो. सँडल तिचाच असल्याने जवळपास शोधाशोध सुरू होते. तेवढ्यात चारीच्या पुलाखाली ती पडल्याचे लक्षात येते. रक्ताने आणि चिखलाने माखलेल्या अवस्थेतील तिचा देह पाहून आई हंबरडाच फोडते. डोक्यावर तसेच कानाजवळ मोठी जखम असते. तिच्या नाकातोंडातही चिखल आणि रक्त असते. एका खांद्यावर लटकलेले शाळेचे दफ्तर. तेही चिखलाने माखलेले. आई तिच्याकडे जाऊ लागताच नातेवाईक तिला रोखतात. ताबडतोब पोलिसांना कळवतात. थोड्याच वेळात पोलिस येतात. पंचनामा होतो. बॉडी पोस्ट मॉर्टेमकरिता औरंगाबादला पाठविली जाते.

रात्रीच ही बातमी सगळ्या गावाला कळते. तिच्याबरोबर रोज बसने आळकुटीला येजा करणारी मैत्रिण आणि तिच्या घरातले सुन्न झालेले असतात. मैत्रिण रडत रडत तिच्या आठवणी काढत होती. दुसऱ्या दिवशी एक गोष्ट तिला एकदम आठवली आणि तिने तडक तिच्या वडिलांसह पिडित मुलीचे घर गाठले. गावातलाच एक पोरंबाळं असलेला थोराड मुलगा हनुमानवाडीवरुन लोणी-मावळाला येताजाता तिला नेहमी त्रास द्यायचा. या त्रासानं ती कंटाळली होती. एकटेदुकटे पाहून रस्त्यात घाणेरडे शब्द वापरायचा. ‘येते का’, असे विचारायचा. हत्येआधी एकदोन दिवस हा त्रास तिने पुन्हा मैत्रिणीला सांगितला होता. सांगता सांगत एसटीतच रडायला लागली होती. मैत्रिणीने तिला समजावले. शिवाय, ही गोष्ट तिच्या घरच्यांना सांगायचा आग्रह धरला. कारण त्याशिवाय त्याचा त्रास संपणार नाही, असे तिने परोपरीने सांगितले. पण ही गोष्ट घरी सांगितली तर घरचे शाळाच बंद करतील. माझे शिक्षणच थांबेल, अशी भीती तिला वाटायची. त्यामुळे ही गोष्ट कुणालाही सांगू नको, मी पण घरी सांगणार नाही, असे ती मैत्रिणीला बजावत होती. हे दोनच दिवसांपूर्वीचे संभाषण मैत्रिणीने तिच्या घरच्यांना आणि पोलिसांनाही सांगितले. हनुमानवाडीतील तिच्या लांबच्या भावानेही रस्त्यात भेटलेल्या तिघांबद्दलची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी एकामागेमाग एक तिघांनाही अटक केली. घटनेपूर्वी तासभर आधी तिघांनी हार्डवेअरच्या दुकानातून मोठा स्क्रू ड्रायव्हर खरेदी केला होता. खरेदी केल्यावर उरलेले दहा रुपये परत घेण्याऐवजी ते राहू दे, असे त्यांनी दुकानदाराला सांगितले. दुकानदाराला हे जरा विचित्रच वाटले होते. कारण खेड्यापाड्यात असे पैसे कोणी सोडत नसते. उलट एखादी गोष्ट जास्त स्वस्त कशी मिळेल, असाच प्रयत्न असतो. त्यामुळे दुकानदाराला त्यांचे वागणे खटकले होते.

कोपर्डीइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक क्रूर घटना पारनेरच्या लोणी-मावळात घडली होती. तिघाही आरोपींनी माहाण करत आळीपाळीने हातपाय धरून तिच्यावर बलात्कार केला होता. ओरडत, आक्रंदत, हाताने मारत, लाथा झाडत तिघांनाही तिने निकराचा प्रतिकार केला होता. तिच्या शरिरावर १६ जखमा होत्या. बलात्कारानंतर एकाने तिच्या डोक्यात मोठ्या धारदार स्क्रू ड्रायव्हरने वार केला. तर दुसऱ्याने डोक्यात दगड घातला होता. तिच्या जवळपास सगळ्या अंगावर ओरबाडल्याचे ओरखडे होते. तिच्या देहाच्या शवविच्छेदनानंतर तसेच आरोपींच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिघांनीही बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. शेवटपर्यंत ती प्रतिकार करत असल्याने त्यांनी तिला जिवे मारण्याचे प्रयत्न केले. दीडदोन किलोचा दगड डोक्यात घातला. स्क्रू ड्रायव्हरने डोक्यात खोक पाडली. तरीही ती प्रतिकार करते आणि आरडाओरडा करते म्हटल्यावर दोघांनी हातपाय धरून तिसऱ्याने तिच्या नाका तोंडात चिखल कोंबला. तेव्हाच ती मरण पावली. चिखलाने दमछाक होत असताना जिवाच्या आकांताने श्वास घेण्याच्या प्रयत्नात तो चिखल तिच्या पार फुफ्फुसापर्यंत गेल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.

या खटल्यात सगळ्या साक्षीदारांनी जराही न डगमगता साक्षी दिल्या. पिडित मुलीच्या मैत्रिणीने न घाबरता त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले. उलट सुलट तपासणीतील प्रश्नांच्या भडिमाराला सडेतोड उत्तरे दिली. विशेष म्हणजे, या खटल्यातील एकही साक्षीदार फुटला नाही. हत्येतील क्रौर्य लक्षात घेता सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी १० नोव्हेंबर २०१७रोजी तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. याच न्यायाधीशांनी नंतर पंधरा दिवसांनी कोपर्डीचा निकाल दिला. तो निकाल राज्यभर गाजला. थोरामोठ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिक्रिया दिल्या. वृत्त वाहिन्यांवर चर्चा झाल्या. पण प्रसिद्धीचे हे भाग्य लोणी-मावळा प्रकरणाला लाभले नाही. घटना घडली तेव्हा. खटला चालला तेव्हा आणि निकाल लागून तिघांना फाशी सुनावली गेली तेव्हाही ! किंबहुना असा काही निकाल लागलाय, याचीही कल्पना बहुतेक प्रसारमाध्यमांनाही नव्हती. मग लोकांना माहिती होण्याचा प्रश्नच नाही.

लोणी-मावळातील पिडित मुलगी मराठा समाजातली होती. तिच्यावर बलात्कार करणारे आणि खून करणारे दोघे मराठा होते तर तिसरा वडार समाजाचा म्हणजे ओबीसी होता. या घटनेतील क्रौर्य कोपर्डी इतकेच किंवा अधिक भयावह होते. शिकणाऱ्या या दोघीही मुली कुटुंबातल्या पहिल्या पिढीतल्या होत्या. लोणी-मावळातील मुलीची शिकून डॉक्टर होण्याची जिद्द होती. पण मराठा गावगुंडांनी तिचा घास घेतला. या घृणास्पद हत्येने मराठ्यांची अस्मिता जागी झाली नाही. एरवी खुट्ट झालेतरी जागे होणाऱ्या डझनावारी मराठ्यांच्या संघटनांतील एकाही संघटनेला पारनेर प्रकरणाची खबर लागू नये ? अगदी खटला चालला आणि तिघांना फाशी झाली तरीही ! कोणी म्हणेल पारनेरचे प्रकरण कोपर्डीच्या आधीचे होते. दोन्ही खटले एकाच न्यायाधीशांपुढे चालले. एकाचवेळी. आणि निकालही पंधरा दिवसांच्या फरकाने नोव्हेंबर महिन्यातच लागला. त्याचे काय ? मराठ्यांच्या संघटनांना या निकालाचे सोयरसुतक नव्हते. कोपर्डीच्या निकालानंतर जिजाऊच्या लेकी आपल्या अत्याचारित भगिनीच्या न्यायासाठी रस्त्यावर आल्या. ही स्वागतार्ह गोष्ट होती. पण लोणी-मावळातील पोरही जिजाऊचीच लेक होती की ! या हत्येने जिथे मराठ्यांच्या संघटना जाग्या झाल्या नाहीत तिथे इतर सामाजिक संघटना आणि दलित संघटनांबद्दल काय बोलायचे ? जिजाऊच्या लेकींना जसा याचा पत्ता नव्हता तसा सावित्री, अहिल्या आणि भीमाईच्या लेकींनाही नव्हता !

राजकारणासाठी माणसं जाणीवपूर्वक धर्माधर्मात, जातीजातीत तसेच पोटजातीजातीत विभागली जात आहेत. एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात आता बहुजन महिला जिजाऊच्या, सावित्रीच्या, अहिल्येच्या आणि भीमाईच्या लेकी बनल्या आहेत. तू जिजाऊची लेक ? तर ही घे सावित्रीची लेक. तू सावित्रीची लेक ? तर ही बघ अहिल्येची लेक, भीमाईची लेक. जात्यंध पुरुषसत्ताक पद्धतीने गेल्या पाचसात वर्षांत या पिढ्यान्पिढ्या दडपलेल्या लेकीसुनांमध्येही आता आभाळाएवढ्या भिंती उभ्या केल्या आहेत. एखाद्या खतरनाक गुन्हेगाराप्रमाणे त्यांना जातीच्या अंडा सेलमध्येच त्यांना डांबण्यात आले आहे. कारण जातीशिवाय तिचा इतर कोणत्याच महिलेशी संबंध येता कामा नये. मंडलनंतर जातीचे कंगोरे धारदार बनले आणि उत्तरोत्तर ते अधिक धारदार बनत चालले आहेत, हे भीषण वास्तव आहे. सामाजिक न्यायाबाबत मंडलचे योगदान सांगितले जाते. तशी ही मंडलचीच एक काळी बाजू आहे, हे प्रांजलपणे मान्य केले पाहिजे.

हल्ली जातीच्या अस्मिता इतक्या ज्वालाग्राही झाल्या आहेत की कोणत्याही कारणाने त्यांचा भडका उडतो. प्रश्न ताबडतोब भावनिक बनतो. नसेल तर राजकारणासाठी तो भावनिक बनविला जातो. जातीच्या अस्मिता त्यांचे राजकारण तसेच धर्माच्या अस्मिता आणि त्यांचे राजकारण हे अगदी ‘सारक्याला वारकं’ आहे. आपल्या जातीवर अन्याय झाला. आपली जात डावलली गेली, तर ज्ञातिबांधव खडबडून जागे होतात. जागे होत नसतील तर जागे केले जातात. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, माळी असो की धनगर असो. अगदी नवबौद्ध, चर्मकार आणि मातंगही. याला कोणीही जात अपवाद नाही. आपल्यावर इतर जातीच्या लोकांनी अन्याय केला तर मग ती जात अस्मितेने पेटून उठते. जिजाऊच्या लेकीवर इतर कोणी बलात्कार आणि खून केला तर मराठा अस्मिता पेटून उठते. कोपर्डी हे त्याचे उदाहरण. कोपर्डीच्या निमित्ताने मराठ्यांनी राज्यभर मोर्चे काढले. काही अपवाद वगळले तर इतरांची भूमिका बघ्याचीच होती. याही स्थितीत प्रकाश आंबेडकर आणि काही दलित नेत्यांनी मात्र निःसंदिग्धपणे याचा निषेध केला. जातीने चौकशी करण्याचा, पिडित कुटुंबाला दिलासा देण्याकरिता ते कोपर्डीपर्यंत गेले. शिवाय, समाजात शांतता राखण्याची काळजी घेतली. ही वस्तुस्थिती. पण हे सन्माननीय अपवाद वगळले तर जातीजातीतील हेव्यादाव्यांचे चित्र विदारक आहे. खैरलांजीमध्ये दलितांवर कुणबी (ओबीसी असले तरी मराठेच) अत्याचार करतात तेव्हा फक्त दलित जागे होतात. तेच मोर्चे काढतात अन निदर्शने करतात. भटक्या विमुक्तांच्या बाबतीत काही घटना घडली तर त्यांनीच लढायचे. बाकीच्यांनी सहानुभूती दाखवत बघ्याची भूमिका वठवायची, हे ठरूनच गेले आहे. आताही नितीन आगेच्या प्रकरणात सगळे आरोपी निर्दोष सुटल्याने नवबौद्धच हा प्रश्न लावून धरत आहेत. इतरांची भूमिका बघ्याची किंवा फारतर तोंडदेखल्या सहानुभूतीची आहे. कारण तो त्यांच्या जातीचा प्रश्न आहे, असेच इतरांना वाटते. आपल्या जातीसाठी आपण लढावे. त्यांच्या जातीसाठी ते लढतील, अशी भूमिका आज सगळ्याच जातीत रूढ झालेली आहे. यात अपवाद फक्त ब्राह्मणांचा आहे. ब्राह्मण महिलेवर, सत्ताधारी मराठ्यांच्या महिलेवर किंवा एखाद्या ‘सिलिब्रिटी’वर काही प्रसंग ओढवलाच तर सगळी प्रसारमाध्यमे तुटून पडतात. त्यामुळे त्यांना रस्त्यावर यायची गरज पडत नाही. बाकी सगळ्यांना रस्त्यावर उतरून शिरा ताणाव्या लागतात. आता पुण्यातल्या डीएसकेचेच प्रकरण बघाना माध्यमे कशी त्यांच्यासाठी सरसावली आहेत. असो.

तर आगेच्या प्रकरणात एकही साक्षीदार त्याच्या बाजूने उभा राहात नाही, हा काय योगायोग आहे ? या निष्पाप मुलाच्या हत्येपेक्षा लोकांना आपली जात महत्त्वाची वाटते. गावातील बहुसंख्य लोक जी भूमिका घेतात त्यानुसार साक्षीदार न्यायालयात भूमिका वठवतात. लोकच नाहीतर अगदी शिक्षक आणि तेही रयतचे. जातीच्या प्रभावामुळे आपल्या विद्यार्थ्याच्या हत्येने त्यांच्यातले स्वत्त्व जागे झाले नाही. मग इतरांना तरी आगेबद्दल ममत्त्व का वाटावे ? सहाजिकच या निष्ठूर लोकांना आपल्या १४ वर्षांच्या लेकीला काय वाटते, याची दखलही घ्यावीशी वाटली नाही. त्यांनी तिला थेट अंधार कोठडीत पाठविले. आजतागायत. जिजाऊच्या लेकींनी तरी तिचा शोध घ्यावा.

लोणी-मावळातल्या मुलीवर मराठ्यांनीच बलात्कार केला आणि तिला जिवेही मारले. तेव्हा भावकी आणि गाववाले तिच्या बाजूने राहिले ही चांगली गोष्ट झाली. पण तो प्रश्न मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनला नाही. ज्वालाग्राही अस्मिता यावेळी पेटून उठली नाही. महाराष्ट्रभर पसरलेल्या मराठ्यांच्या चर्चेतही तो प्रश्न नव्हता. मराठ्यांनी यावर आत्मपरीक्षणही केले नाही. याचा अर्थ असा की, राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या भगिनीवर ‘इतर कोणी’ अत्याचार केला तर आमची अस्मिता पेटून उठते. पण मराठा मुलीवर मराठा गावगुंडाने अत्याचार केला तर मराठ्यांची अस्मिता पेटून उठत नाही. अशावेळी आम्ही या घटनेकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहतो. म्हणजे, आपल्या स्त्रीवर आपल्या जातीच्या लोकांनी जबरदस्ती केली तर तो जातीचा प्रश्न बनत नाही. कळत नकळत रुजलेला हा दृष्टिकोन केवळ मराठ्यांमध्ये नव्हेतर सगळ्या जातीत रुजला आहे. अगदी दलितांतही. मराठा गावगुंडांनी एखादीवर अत्याचार केला तर त्या पिडितेचेच ज्ञातीबांधव रस्त्यावर येतात. आकाशपाताळ एक करतात. पण मध्येच असे लक्षात आले की अत्याचार ‘इतरांनी’ नव्हे तर आपल्याच भाऊबंदांनी केले आहेत. तेव्हा जातीचा दृष्टिकोन गळून पडतो. पेटलेला असंतोषाचा वणवा बघताबघता विझून जातो. मोर्चे जागच्या जागी थांबतात. जवखेड्यात काय झाले ? तेच झाले. लोणी-मावळात काय झाले ? अत्याचार करणारे दोघे मराठे असल्याने तिथे तो अस्मितेचा प्रश्न बनला नाही. अस्मितेचा प्रश्न कोपर्डीचा बनला. खैरलांजीचा बनला. आणि आता खर्ड्याचा बनला. उद्या कदाचित सोनईचा बनेल. आपल्या जातीतल्या महिलेवर इतरांची नजर पडता कामा नये. इतरांनी अत्याचार केला तर तिच्या न्यायासाठी, तिच्या सन्मानासाठी आमची अस्मिता पेटून उठते. पण आमच्यातल्या कुणी आमच्या भगिनीच्या इभ्रतीला हात घातला तर आमची अस्मिता जागीच होत नाही. ती गोठलेलीच राहते. कोणत्याही स्त्रीच्या अगदी शत्रूच्याही स्त्रीच्या इभ्रतीला कोणी हात घातला तर शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. मग आपला तुपला न करता ते थेट त्याचे हातपाय कलम करुन कडेलोट करत. त्यांच्यासाठी महिलांची इभ्रत सगळ्यात महत्त्वाची होती. मग ती महिला कोणत्याही जातीची असो. म्हणून रांझ्याच्या पाटलाचा कडेलोट करायला क्षणाचाही विलंब लावला नाही. तेव्हा त्यांनी पाटलाची जात पाहिली नाही. विशेष म्हणजे, शिवछत्रपतींचा काळ सरंजामी होता. तरीही महिलांच्या सन्मानाला त्यांनी त्यांच्या राज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. त्याकरिता त्यांनी स्वतः वस्तुपाठ घालून दिले होते. त्यांच्या सैन्यात महत्त्वाच्या पदावर मुस्लिम होते. अस्पृष्य ठरविलेले अंगरक्षक होते. काही किल्लेदारही अस्पृष्य होते. त्यांनी जमेल तितका चार्तुवर्ण्य धाब्यावरच बसविला होता. पण बहुतांशी मराठ्यांना या ऐतिहासिक शिकवणीऐवजी गोब्राह्मण प्रतिपालक ठरविलेल्या महाराजांच्या खोट्यानाट्या इतिहासाचेच अप्रूप आहे.

कोपर्डी, खर्डा, लोणी-मावळा या खटल्यांच्या पाठोपाठ सोनई हत्याकांडाचा निकालही आता लवकरच लागण्याची शक्यता आहे. ही घटना पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातलीच. नेवासा तालुक्यातली. सोनई आणि खर्ड्याच्या प्रकरणात कमालीचे साम्य आहे. खर्ड्यात नितीन आगेची हत्या झाली. कारण मराठा मुलीशी प्रेमसंबंध. सोनईत मेहतर समाजातील तिघांचे तुकडे तुकडे करण्यात आले. का ? कारण यातील एकाचे मराठा मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते, असे सरकार पक्षाचे म्हणणे. पण तिने ते न्यायालयात नाकारले. या प्रकरणात तिघांच्या हत्या कमालीच्या निर्घृण होत्या. त्यानंतर तिचे आत्मबल शाबूत असेल ? असे म्हणतात की दोघांचे तुकडे करुन एका ठिकाणी पुरले होते तर तिसऱ्याची खांडोळी करुन बोअरवेलच्या भगदाडात घातली होती. एकाची हत्या कथित प्रेमप्रकरणामुळे करण्यात आली. त्याची हत्या ठरलेलीच होती. पण ऐनवेळी इतर दोघे त्याच्याबरोबर आल्याने त्यांचीही हत्या करण्यात आली. तिघेही दलितांपेक्षाही खालच्या स्तरातील मेहतर समाजाचे. माणसांची विष्ठा काढण्याचे त्यांच्यावर परंपरेने लादलेले काम. म्हणजे, अपिहार्य असे कर्तव्य. गतजन्मातील पाप फेडण्याचे कर्तव्य करत असताना सवर्णासारख्या उच्च जातीच्या मुलीशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करुन केलेला आणखी एक प्रमाद. या मेहतरांचे पूर्वज शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. अत्यंत विश्वासू. म्हणून महाराजांनी स्पृश्यास्पृष्याचे भेद बाजूला त्यांना जवळ बाळगले होते. महाराजांबरोबर थेट अंतःपुरातही त्यांचा वावर असायचा. आज त्याच महाराजांचे वंशज म्हणून मिरविणारे चार्तुवर्ण्याची पायरी ओलांडली म्हणून मेहतरांची खांडोळी करतात !

मेहतर तशी गरीबातील गरीब जात. त्यांचे संख्याबळ म्हटले तर नगण्यच. अशावेळी कोण त्यांच्या बाजूने उभे राहणार ? आणि कोण मोर्चे काढणार ? शिवाय, सरकारवर त्याचे दडपण ते कितीसे येणार ? तेही संघटित मराठ्यांच्या विरोधात. गुन्हेगार प्रबळ जातीतले म्हटल्यावर जिवावर आल्यासारखाच पोलिसांचा तपास असतो. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय लागतो ? कुणास ठाऊक ? तो अत्याचार करणाऱ्या मराठ्यांच्या बाजूने लागला तर आश्चर्य वाटू नये. या चारही प्रकरणाचा विचार केला तर दोन मुली राक्षसी पुरुषी वासनेला बळी पडतात. तर उरलेल्या दोन प्रकरणात मराठे जातीच्या अहंकारातून चर्तुवर्ण्याच्या मर्यादा ओलांडू पाहणाऱ्या दलितांची हत्या करतात. दोन मराठा मुली वासनेच्या शिकार होतात तर कदाचित याच समाजातल्या दोन मुलींच्या स्वप्नांचे पंख छाटले गेल्याची शक्यता आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तर दलितांबरोबरच त्या मुलींनाही मोठी किंमत चुकवावी लागते. जातीच्या प्रतिष्ठेची तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेची. शिवाय, अन्याय करणाऱ्या दलितांना कठोर शिक्षा होते, मात्र अन्याय करणारे सवर्ण मराठे सहीसलामत सुटतात. यातून समाजातल्या अंगभूत पक्षपातीपणाचा प्रत्यय येतो.

पुरुषसत्ताक चार्तुवर्ण्यवाद्यांनी आपल्या हितसंबंधांसाठी जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, अहिल्येच्या लेकी, भीमाईच्या लेकी अशी स्त्रियांची विभागणी केली. पण तुम्ही सगळ्या पिढ्यानपिढ्या दडपल्या गेलेल्या स्त्रिया आहात. आणि असल्याच तर तुम्ही सगळ्या एकाचवेळी जिजाऊच्या, सावित्रीच्या, अहिल्येच्या आणि भीमाईच्या लेकी आहात, हे पक्के लक्षात असू द्या. गावोगाव स्त्रिया आणि मुलीबाळींवर अत्याचार करणारे गावगुंडच आहेत. मग ते मराठा असोत, ओबीसी असोत की दलित असो. हिंदू असोत की मुस्लिम. अत्याचार करताना ते जात बघत नाहीत. ती दुबळी, एकाकी, भीडस्त, गरीब असली तर लगेच त्यांचं पुरुषत्त्व जागं होतं. मग ती सवर्ण आहे की दलित. दुसऱ्या जातीची की आपल्या जातीची. याचा भेदभाव ते करत नाहीत. पण अत्याचार झाल्यानंतर अत्याचार न करणारा समाज मात्र आपला की तुपला, या जातीच्या निकषातून विरोध करायचा, गप्प बसायचं की तटस्थ राहायचं, हे ठरवितो. हे सगळ्यात दुर्दैवी आहे.

आज गावोगाव मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर आणि विशेषतः मुलीबाळींवर अत्याचार होत आहेत. घरोघरच्या मुली शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. बहुतांशी मुली शिकणाऱ्या पहिल्या पिढीतल्याच आहेत. फारच कमी कुटुंबं आहेत की ज्यांच्या मुली शिकत नाहीत. भटक्याविमुक्तांचे अतिशय मागासलेले घटक आणि आदिवासी यांच्याच घरातल्या स्त्रिया प्रामुख्याने शिक्षणापासून वंचित असाव्यात. हल्ली मोठ्या संख्येने मुली शिक्षणासाठी घराबाहेर पडतात, शिक्षणाबरोबरच त्यांची स्वप्नेही आकाशात भरारी घेत आहेत. तथापि त्या घराबाहेर येत असल्याने गावगुंडांचं भलतंच फावलंय. शिवाय, तक्रार करावी तर शाळाच बंद व्हायची, ही सार्वत्रिक भीती आहे. त्यामुळे तर या मवाल्यांची भीड आणखीनच चेपली आहे. त्यामुळे सहाजिकच अत्याचाराचे, सहन करण्याचे, ब्लॅकमेलिंगचे प्रमाणही वाढले आहे. या सगळ्याच मुली आज भक्ष्य ठरल्या आहेत. मग त्या कोणत्याही जातीच्या असोत. त्यांना सगळ्या गावगुंडांचा त्रास आहे. मग ते परक्या जातीचे असोत की आपल्या जातीचे. त्यामुळे पुरुष, जातीचे पुढारी, धर्माचे ठेकेदार हे काय भूमिका घेतात याकडे न पाहता जिजाऊच्या लेकींनी, सावित्रीच्या लेकींनी, अहिल्येच्या लेकींनी तसेच भीमाईच्या लेकींनी परस्परांना आधार द्यावा. अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी धावून जावे. यात तुलनेने जिजाऊच्या लेकी थोड्या पुढारलेल्या आणि बलवान असतील तर त्यांनीच यात पुढाकार घेणे कर्तव्य ठरते. या लेकी जेव्हा जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन परस्परांच्या मदतीसाठी धावतील तेव्हाच स्त्रियांकरिता न्यायाची कवाडे उघडी होतील. खरे म्हणजे, ती त्यांनाच उघडावी लागतील.

लेखक महाराष्ट्रातील अव्वल राजकीय विश्लेषक व भाष्यकारांपैकी एक महत्वाचे विश्लेषक आहेत

3 Comments

  1. सुशांत Reply

    डोळ्यात अंजन घालणारा परखड विश्लेषण करणारा लेख लिहिल्याबद्दल आपलं अभिनंदन. फक्त इतर जातीच्या व्यक्तींनी अन्याय केला की जातीच्या अभिमान उभा करणाऱ्या लोकांना अन्याय हा अन्याय असतो मग तो जिजाऊ च्या लेकीवर होउदे किंवा भिमाईच्या मुलीवर होउदे याची जाणीव करून देणे सुद्धा कालबाह्य झालेल्या वेळी आशा गोष्टींची जाणीव करून देणे खरंच गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या या दोन जातींनी सर्व धर्मीय सर्व जातीय अन्याया विरोधात उभे राहुन या वंदनीय दैवतांचे स्वराज्याचे आणि सुराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सशक्त समाजाची उभारणी करणं गरजेचं आहे.

  2. We all salute to your above article which is an eye opening to all who are really concerned about womanhood and their safety. It is all the more important to those who pretend to be followers of our great Maharaja Chchatrapati Shivaji Raje. You have raised very valid point of view by very strategic analysis of three cases. This article needs lot of publicity towards educating all And specially so called social leaders.

Reply To सुशांत Cancel Reply