fbpx
सामाजिक

कोरेगावाचा अपमान !…

भारतीय इतिहासामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी अशा आहेत की, ज्याबद्दल संशोधनही झाले नाही किंवा लिखाणही झाले नाही. जेम्स लेन याने शिवाजी महाराजांचे घराणे शोधण्याचा प्रयत्न केला त्याला जातीय वळण आले आणि ती चर्चा त्याच ठिकाणी थांबली. शिवाजींचे एवढेच माहीत आहे की, सिंदखेडाच्या जिजाऊ या जाधव कुटुंबातल्या होत्या आणि त्यांचा विवाह हा भोसले कुटुंबातील शहाजी भोसले यांच्याशी झाला. शिवाजींना भाऊ किंवा बहीण होती का? याबद्दल इतिहासात अजून काही उल्लेख नाही व त्याचबरोबर इतिहासाने शिवाजी महाराजांनी आपले सैन्य कसे उभे केले? त्याची प्रशिक्षणाची जागा आणि त्याचबरोबर त्यांना सैन्य उभे करताना द्रव्य आणि सुरक्षितता ही कोणी पुरवली याबद्दल फारसा उल्लेख नाही; आणि म्हणून कथित कहाण्याच किंवा एक प्रकारच्या दंतकथाच शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात. एका बाजूला बलाढ्य आदिलशाही आणि दुसऱ्या बाजूस मोगलशाही या दोघांच्या पोलादी पकडीतील क्षेत्रात सैन्य उभे करणे ही कर्तबगारीच आहे; त्याचे संशोधन व्हावे हीच अपेक्षा. दुसरे असे की, शिवाजी महाराजांनी सामाजिक रूढी, परंपरा आणि विषमतावादी संस्कृतीलाही छेद दिला असे दिसते. त्यांच्या किल्ल्यांचे रखवालदार हे सर्व नाथ होते, तर सैन्यामध्ये अठरा बलुतेदार आणि आलुतेदार यांचा समावेश होता. हे सैन्य उभे करत असतांना त्यांचे पहिले सहकारी कोण ? याची सुद्धा माहिती नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास हा सध्याच्या अवस्थेत गोब्राह्मण प्रतिपालक असा रंगवला जातोय आणि दुसऱ्या बाजूस मराठ्यांचा इतिहास म्हणजेच शिवाजी महाराजांचा इतिहास असा रंगवला जातो. शिवाजींचा आणि संभाजींचा अध्याय संपल्यानंतर पेशवाई आली. त्या पेशवाईने शिवाजींचा उल्लेख ही केलेला नाही. किंबहुना घरंदाज मराठयांनीसुद्धा शिवाजीचा इतिहास पुसण्यास मदतच केली असे दिसते. शिवाजीला शोधून इतिहासपटलावर पुनर्स्थापित केले ते महात्मा फुले यांनी. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडापर्यंत शिवाजीचा उल्लेखही कोणी करत नसे. ‘जय भवानी, जय शिवाजी या घोषणेचा घरंदाज मराठ्यांच्या इतिहासात उल्लेख सापडत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी लेटर हेड काढले त्यावरती ‘जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा छापली व त्या लेटर हेडचा त्यांनी वापरही केला.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गूढ आहे तसेच पुणे-शिरूर रस्त्यावरील कोरेगावाचेही आहे. ज्या ठिकाणी ब्रिटीश आणि एतद्देशीयांमध्ये ज्या लढाया झाल्या त्यांचा इतिहास त्यांनी दगडावरती कोरला आणि त्या लढाईमध्ये त्यांच्या बाजूने जे सहभागी आणि हुतात्मा झालेल्यांच्या नावाने स्मारक उभे केले. असेच एक स्मारक सध्या ‘भीमा कोरेगाव या नावाने ओळखले जाते. महार समाजातील मंडळी याला हा आपला गौरवशाली इतिहास आहे असे संबोधतात. याचे कारण, कोरेगावाला पेशवाईने सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या माथी गाडगे आणि मडक्याच्या प्रथेचा अंत केला. पेशवाईचा झेंडा उतरून ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) हा शनिवार वाड्यावर फडकवला आणि यानंतर भारतामध्ये एकही स्वतंत्र राज्य राहिले नाही, तर सर्वजण ब्रिटीशांचे मांडलिक झाले. अस्पृश्य समाजात आताच्या काळात लेखक, विचारवंत, भाष्यकार, विविध विषयांचे तज्ज्ञ असे निर्माण झाले आहेत. ही सर्व मंडळी भीमा कोरेगावाचा उल्लेख अस्पृश्यांचा ‘गौरवशाली इतिहास असा करतात. निश्चितच हा गौरवशाली इतिहास आहे. अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगे, मडके आणि कमरेला झाडू अशी मानवतेला लांच्छनास्पद व्यवस्था सुरू करणाऱ्या पेशवाईला हरवले आणि तिचा कायमचा नाश केला. या इतिहासाचे सुध्दा गूढ आहे. पेशवाईने गाडगे मडक ही व्यवस्था निर्माण केल्यानंतर अस्पृश्य किंवा महार समाजाने सैनिकी प्रशिक्षण कसे आणि कुठे घेतले ? त्यांना प्रशिक्षण देणारे कोण होते ? त्यांचे नेतृत्व करणारे कोण होते ? त्यांनी हे प्रशिक्षण कसे घेतले? या अस्पृश्य आणि महार समाजातील इतिहासाबद्दल लिहले गेले नाहीच पण, विश्लेषण ही झाले नाही. या समूहातील भावूक व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला कोरेगावाला भेट देत असत असे म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब एकदाच या ठिकाणी येवून गेले.
कोरेगावाची लढाई सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारी एक लढाई आहे. या धार्मिक गुलामगिरीला/मनुवादी व्यवस्था, राजेशाहीचा वरदहस्त असणारी ही व्यवस्था कायमस्वरूपी संपवली ही या लढ्यातील सर्वात जमेची बाजू आहे. कोरेगावाच्या लढाईला सामाजिक गुलामगिरीतून पूर्ण मुक्त असे पहिले जाते. मी हे मानतो की, ही भावनिक मांडणी आहे. त्याची सैद्धांतिक मांडणी करण्याची गरज आहे. एखादा तरी अस्पृश्य किंवा महार समाजातील व्यक्ती पुढे येवून भावनिक न होता हा इतिहास यापुढे मांडेल अशी अपेक्षा करतो. कोरेगावाच्या लढाईमध्ये ब्रिटीशांना आपली मदत होईल आणि ब्रिटीशांचे राज्य भारतावरती पूर्ण होवून जाईल याची जाणीव अस्पृश्य, महार समाजाला होती की नाही हे संशोधन झाल्याशिवाय कळणार नाही. आज जशी अस्पृश्य आणि महार समूहाची मानसिकता आहे, तीच त्याच वेळीसुद्धा असेल असे मला वाटते. पेशवाईच्या विरोधात लढतांना ब्रिटीशांना मदत होईल आणि त्याबदल्यात ब्रिटिशांकडून आपल्या सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्याची हमी करारनाम्यामार्फत करून घेतली पाहिजे अशी जाणीव तत्कालीन अस्पृश्य समाजात दिसत नाही. आजही मला हीच मानसिकता अस्पृश्य/ महार आणि आता बौद्ध झालेल्यांची दिसते. कुठल्याही लढाईमध्ये वाटाघाटी असते, देवाण-घेवाण असते आणि करार होतात. हा करारनामा नंतरच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचा आधार असतो हे आम्ही लक्षात घेतलेले नाही.
माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय आयुष्यामधला अनुभव संघटित ठरवण्यापेक्षा व्यक्तिगत ठरवतात. ‘नवरदेवाच्या अगोदरच हे नवरदेव होतात; आणि म्हणून लग्न होत नाहीत. कोरेगावाच्या लढाईत ब्रिटिशांना फायदा होणार, तरीही आपले धार्मिक, सामाजिक स्वातंत्र्य ब्रिटीश सरकार बहाल करेल अशी करारनाम्यामार्फत तरतूद करण्याची नामी संधी आल्यानंतरही तिचा वापर न करणे, हा इतिहासातला काळा ठपका आहे. अशा प्रकारचा करारनामा झाला असता, तर जे काम ज्ञानबा कांबळे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यासारख्या असंख्य समाजसुधारकांनी केले ते त्यांना करण्याची गरज राहिली नसती.
या लढ्यातून अजून एक शिकायला येते ते म्हणजे की, अस्पृश्य आणि महार समाजातील व्यक्ती शूर, कृतिशील, दिलेर आणि धाडसी असल्या, तरी त्यांनी स्वत:हून गाडगे आणि मडक्याच्या पेशवाईच्या विरोधात बंड पुकारले नाही. तर ब्रिटीश ऑफिसरचे नेतृत्व येईपर्यंत ते थांबले. याचा अर्थ म्हणजे स्वत:बद्दल आपण नायक होवू शकतो याचा विश्वास त्यांना नव्हता. असाच आत्मविश्वास, आत्मभानाचा अभाव आजही चळवळीमध्ये कार्यकर्ता किंवा सामान्य माणसात दिसतो. आणि मग स्वत: काही करू शकतो याच्याबद्दल विश्वास नसलेला माणूस तो हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानतो. त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवला पाहिजे. तो त्या वेळेस ठेवला असता तर पेशवाईने गाडगे, मडके, झाडूची प्रथा सुरू केली त्याचवेळी बंड केले असते तर आज गाडग, मडक्याची चर्चा करण्याची गरज पडली नसती.
१९९० पर्यंत कोरेगाव स्तंभाला फार कमी लोक भेट देत. १९९० साली कार्यक्रमाला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या वर्षापासून लष्कराने येवून सकाळी मानवंदना द्यायला सुरुवात केली. आजही अनेक जण अनभिज्ञ आहेत की, कोरेगावाचा स्तंभ हे महार बटालियनचे मानचिन्ह आहे. आणि प्रत्येक महार बटालियनला मानचिन्ह म्हणून मान्यता मिळालेली आहे. नंतरच्या दोन वर्षातच कोरेगावाचा स्तंभ १ जानेवारी हा सर्व फुटीरवादी, विभक्तवादी, व्यक्तिवादी दलालांचा राजकीय परवाने नूतनीकरण करण्याचा अड्डा झाला. त्याचे फलित असे की, लष्कराने स्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमातूनच माघार घेतली. हे फुटीरवादी नेत्यांची, गटवादी नेत्यांच्या कामाची लष्कराला हुसकावून लावणे ही फलश्रुती आहे. आज कोरेगाव स्तंभाला शौर्याचे चिन्ह किंवा अस्पृश्य/महार समाजाने इतिहास घडवला याचा कसलाही लवलेश राहिलेला नाही. तर त्याला जत्रेचे स्वरूप आले आहे. इतर ठिकाणी जशा जत्रा होतात तसेच स्वरूप आता भीमा कोरेगावाचे झालेले आहे. ज्यावर्षी भीमा कोरेगावाची जत्रा झाली त्या दिवसापासून लांबूनच कोरेगावाच्या स्तंभाला जिथे आहे तिथून मानवंदना करतो. त्या जत्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छाच होत नाही. उलट आताचे स्वरूप बघून तर लढणाऱ्या शूरांचा तमाशा होतो की, काय असे वाटते. आताच्या परिस्थितीमध्ये कोरेगावाचा इतिहास हा आदर्श इतिहास आहे, याची जत्रा होण्यापेक्षा त्या शौर्याचे, व्यक्तीचे, इतिहासाचे गुणगौरव करणे, अंगीकारणे आणि त्या समाजव्यवस्थेत सन्मानजनक स्थान कसे मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. ज्या बेबंदशाहीने, निर्लज्जपणाने स्वतःच्या राजकीय व्यभिचाराचे समर्थन तिथे येऊन केले जाते त्यातून भीमा कोरेगावातल्या शूरवीरांना त्यागाबद्दल आम्ही बक्षीस देत नाही.
या शूरवीरांनी जाणते-अजाणतेपणे जे स्वातंत्र्य दिले ते जपण्याऐवजी आम्ही आता उद्दामपणाने वागून कोणाशीही राजकीय संग करून पुढच्या पिढीला पुन्हा सामाजिक, धार्मिक कैदी करून ठेवण्याची तजवीज करणारी श्रद्धांजली तर स्तंभाजवळ आपण वाहत नाही ना ?

प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत

4 Comments

 1. खूपच सुंदर विश्लेषण केलंत आपण साहेब…!!!
  जय भीम

 2. Gaikwad vishwambar dharma Reply

  सुंदर विश्लेषण!!!

 3. खुप छान विचार!!
  धर्म जाती पाती नसत्या तर सगळे सुखी झाले असते..
  यात कितीतरी पिढ्या भरडल्या गेल्या आणि भरडल्या जातील.. हे कधी थांबेल???
  Imagine there’s no countries
  It isn’t hard to do
  Nothing to kill or die for
  And no religion too
  Imagine all the people living life in peace,
  –John Lennon

Write A Comment