गौरी मांडत असेलेले सगळेच्या सगळे विचार सगळ्यांनाच मान्य होतील असं नाही. पण त्यालाच विचारस्वातंत्र्य म्हणतात. न पटणाऱ्या विचारांचा तुम्ही प्रतिवाद करु शकता. न्यायालयात दाद मागू शकता. पण कट्टरतावादाला विचारस्वातंत्र्याचा हा लोकशाही अवकाश कधीच मान्य नसतो. त्यापेक्षा तोंड झाकून चोरपावलांनी येत गोळ्या घालणं त्यांना अधिक आवडतं किंवा जमतं. तोंड झाकलेल्या नथुरामाने महात्म्यावर गोळ्या झाडल्या. आज नथुरामाचे वारसदार जागोजाग दबा धरुन बसले आहेत. कुजबुजत आहेत. ऐका, ती कुजबुज वाढत आहे. विचार करणारे मेंदू शोधत आहे.
– संध्या नरे-पवार
मारला…
आणखी एक मेंदू मारला त्यांनी…
फार बोलत होता, आवाज करत होता, मुख्य म्हणजे विचार करत होता, विचार करणारा मेंदू चालत नाही त्यांना…
त्यांना म्हणजे कोणाला? पोलिसांनी तर अजून गुन्हेगाराला शोधलं नाही. मग आरोप कोणावर करता आहात?… ऐका, दरडावणारा आवाज ऐका… खरं आहे. गुन्हेगार अद्याप सापडायचे आहेत. गोळी घालणारे मारेकरी उद्या सापडतीलही कदाचित. पण ज्यांनी गोळी घालायचे आदेश दिले, ज्यांनी गोळी घालायला पुरक असे विखारी वातावरण तयार केले ते सापडतीलच असं नाही. गुन्हेगाराचा चेहरा अद्याप स्पष्ट नाही पण त्या चेहऱ्यामागचा विचार स्पष्ट आहे. या एकसाची विचाराला स्वतंत्र विचार करणारे मेंदू चालत नाहीत. त्यामुळेच तर्क असा आहे की ज्यांनी आधीचे तीन मेंदू मारले त्यांनीच हा चौथा मेंदूही मारला असणार.
तर्क नका करु, पुरावे द्या…परत दरडावतंय कोणीतरी…सांगा त्यांनी की, तर्क हीच विचारांची पहिली पायरी असते. पोलीस पुरावेही विविध तर्कांच्या आधारेच शोधतात. आधुनिक विज्ञानाचा पायाही तर्कावरच उभा आहे. शिवाय थोर भारतीय संस्कृतीत फार फार प्राचीन काळी वादविवादांची परंपरा होती. त्यात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष असे वाद होत. वादे वादे जायते तत्वबोधः असं म्हणत आधी अग्नी की आधी धूर असे वाद घातले जात. पण मध्येच कधीतरी ही वादविवादांची परंपरा खंडित झाली. थेट मुंडकी उडवायंचंच सत्र सुरु झालं. बौद्ध धम्म विस्तारला भारतभूमीत तेव्हा त्याला पायबंद घालण्यासाठी बौद्ध भिख्खूंची मुंडकीच छाटली ना. उघड मुंडकी छाटता येत नसतील तर सदेह वैकुंठाला पाठवायचं. संत तुकारामांना पाठवलं तसं. स्वामी चक्रधरांना नष्ट केलं तसं. आजच्या गोली मार भेजेमें…ची परंपरा इथूनच कुठूनतरी सुर झालेली आहे. विचार करणारा मेंदू चालत नाही या पंरपरेला. तिकडे पार युरोपातही सॉक्रेटिस, गॅलिलिओ असेच मारले गेले. मध्य पूर्वेत तालिबानी ’आम्ही सांगू तोच कायदा’, असा उद्घोष गेली कित्येक वर्षं करतच आहेत. जगभरच्या कट्टरतावादाला स्वतंत्र विचारांचं बीज चालत नाही. ‘भेजेकी सुनेगा तो मरेगा कल्लू’ हे सडकछाप गाणं हेच त्यांचं तत्वज्ञान असतं.
आधी त्यांनी तीन म्हाताऱ्यांचे मेंदू नष्ट केले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी…सत्तरीतले म्हातारे होते. निवांत गप्पगुमान आपल्या घरी बसायचं. देवदेव करायचं. पारमार्थिक चर्चा करायची. एखाद्या सत्संगाला जात एखाद्या बाबामहाराजाचं भक्त बनायचं. पण यातलं काहीच न करता यातले पहिले दोन म्हातारे गावगन्ना भटकत होते. लोकांशी बोलत होते. त्यांना तर्काच्या आधारे पुरावे गोळा करुन स्वतंत्रपणे विचार करायला सांगत होते. एकजण श्रद्धा-अंधश्रद्धेचा गुंता उलगडत होता. एकजण छत्रपती शिवरायांचं खरं स्वरुप काय ? ते सांगत होता. तिसरा म्हातारा संशोधन करत होता. पण हे समाजशास्त्रातलं संशोधन तंत्रज्ञानातल्या संशोधनाप्रमाणे अणुबाँम्ब किंवा मोबाईल तयार करत नाही. समाजशास्त्रातलं संशोधन समाजातल्या मान्यतांमध्ये बदल घडवू पाहातं. वेगळा विचार रुजवू पाहतं. पण कट्टरतावादाला वेगळा विचार मान्य नाही. स्वतंत्र विचार करणारा मेंदू मान्य नाही.
आताचा चौथा ताजा मेंदू बाईचा निघाला. गौरी लंकेश नाव तिचं. बाईच्या जातीने कसं गप्प बसावं, सांगितलेलं ऐकावं, आपल्या मानमर्यादेत रहावं. पण ही बाई पत्रकार. गौरी लंकेश पत्रिके या मासिकाची संपादक. आता पत्रकार स्त्रियाही कमी नाहीत भारतात. गार्गी मैत्रेयीचा वारसा असणाऱ्या भारतात बायकाही वेगवगेळ्या क्षेत्रात काम करत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. व्हावं बाईनेही पत्रकार. पण मग त्यांनी कसं कौटुंबिक घडामोडींची चर्चा करणारी पुरवणी काढावी. समानतेच्या बाष्कळ गप्पा न करता कुटुंबसंस्था अधिक बळकट कशी होईल, आधुनिक पालकत्व कसं असावं, नात्यांमधले विसंवाद कसे कमी करावेत (समाजात विसंवाद असले तरी चालतील), कोणत्या साडीवर कोणते दागिने घालावेत, फॅशनमध्ये भारतीय संस्कृती कशी आणावी, भारतीय पाककला, जगभरची पाककला, हसत-खेळत शिक्षण, करियर का घर यावरची चर्चा असं काहीतरी करत राहावं. तेही परंपरागत संस्कृतीच्या ढाच्याला धक्का न लावता. यातही काही आगाऊ पुढारलेपणा केला असता तर आमच्या भावनांना धक्का का लावता म्हणून चार करवादलेले फोन आले असते, दहा खरमरीत टीका करणारी पत्रं आली असती, तुमच्या वर्तमानपत्रावर, मासिकावर बंदी घालू असं सांगणारं एखादं धमकीवजा पत्रंही आलं असतं. पण थेट डोक्यात गोळी तर कोणी नसती ना घातली.
पण गौरी लंकेश आपल्या पत्रकारितेच्या पेशाला जागायला निघाली. थेट धर्मनिरपेक्षता वगैरे काही बोलू लागली. जातधर्मवर्चस्ववादाला प्रश्न विचारु लागली. आपल्या वडिलांचा पुरोगामी वारसा स्वीकारत ती वडिलांनी स्थापन केलेल्या ‘लंकेश पत्रिके’ या मासिकात पत्रकारिता करु लागली. वडिलांच्या पश्र्चात मासिकाच्या ध्येयधोरणावरुन भावाशी वाद झाल्यावर तिने स्वतःचं ‘गौरी लंकेश पत्रिके’ हे स्वतंत्र मासिक काढलं. वडिलोपार्जित इस्टेट स्वतःच्या नावावर करुन घ्यायला भावाने ना हरकत प्रमाणपत्राचा कागद पुढे केल्यावर मोठ्या उदात्तभावनेने त्यावर सही करुन भावाला वडिलोपार्जित इस्टेट देणाऱ्या, आम्हाला भावाची माया हवी, संपत्ती नको, असं म्हणणाऱ्या आदर्श बहिणींची या भारतभूमीत बहुसंख्या आहे. आता ‘सहोदरा, सह उदराचा हक्क दे’ असं म्हणत वडिलोपार्जित इस्टेटीसाठी थेट कोर्टात जाणाऱ्या काही नाठाळ भगिनीही आहेत. पण गौरी थोडी आणखी वेगळी होती. तिने पैशांसाठी नाही तर विचारांसाठी भावाशी भांडण केलं. मासिक कोणत्या विचारांच्या आधारे चालवावं यावरुन तिने वाद घातला आणि विचार पटले नाहीत तेव्हा भावापासून, वडिलांच्या मासिकापासून स्वतंत्र होत स्वतःचं वेगळं मासिक काढलं. तिची पत्रकारिता विचारांची होती, विचारांसाठी होती.
विचारांचं अधिष्ठान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक कणखरपणा देतं. असं कणखर व्यक्तिमत्त्व जसं धमक्यांना बळी पडत नाही तसंच ते प्रेमालाही शरण जात नाही. प्रेमाच्या राज्यातही या व्यक्तिमत्त्वाचा कणा ताठच असतो. गौरीने प्रेम केलं, लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतरही माजी नवऱ्यासोबत असलेलं मित्रत्वचं नातं तिने कायम ठेवलं. दोघांच्या भेटीगाठी सुरु राहिल्या. दोघांचं एकमेकांच्या घरचं जाणंयेणं थाबलं नाही, दोन्ही घरातल्या वडिलधाऱ्यांची विचारपूस करणं थांबलं नाही. हे सुसंस्कृत, समजुतदार वागणं विचारांच्या अधिष्ठानातूनच येतं. गौरीचा विभक्त नवरा पत्रकार चिदानंद राजघट्ट याने गौरीच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘अमेझिंग ग्रेस’ या लेखामध्ये दोघांमधल्या या अनोख्या नात्याची माहिती दिली आहे. या लेखामधून गौरीच्या व्यक्तिमत्तावाची कणखर बाजू अधिक ठळकपणे सामोरी येते. नवरा अमेरिकेत वॉशिंग्टनला पत्रकारिता करायला जाणार म्हटल्यावर इतर अनेक भारतीय स्त्रियांप्रमाणे गौरीही नवऱ्याच्या मागोमाग अमेरिकेत जाऊन सुखासीन आयुष्य जगू शकली असती. अगदी करियरचा विचार करायचा झाला तरी अमेरिकेत जाऊन इंग्रजी भाषेतून जागतिक पत्रकारिता करु शकली असती. पण गौरी नवऱ्याला घटस्फोट देऊन इथेच राहिली. प्रेमाच्या राज्यातही केवळ बायको होऊन राहाणं नाकारलं तिने. कन्नड भाषेत लिहित ती इथल्या मातीतली पत्रकारिता करत राहिली. इथली आव्हानं स्वीकारत राहिली. न पटणाऱ्या गोष्टींविरुद्ध लढत राहिली. स्वतःचा मेंदू वापरत राहिली. कोणत्याही दडपणाखाली न येता विचार करत राहिली. आणि गोळ्यांच्या वर्षावाला बळी पडली. गौरीने अक्कमहादेवीचा, कर्नाटकातल्या १२ व्या शतकातल्या या विद्रोही संत स्त्रीचा कसदार वारसा आपला मानला. अक्कमहादेवी समाजाने लादलेली सर्व बंधनं झुगारत आयुष्यभर विवस्त्र राहून शिवाची भक्ती करत राहिली. भक्तीच्या मार्गात, मुक्तीच्या क्षेत्रात स्त्रीला प्रवेश नाही ही सनातन्यांची आज्ञा तिने झुगारली. गौरीनेही स्त्री-शूद्रांना सर्व अधिकार नाकारणाऱ्या जातीव्यवस्थेचं विश्लेषण करत सनातन्यांना प्रश्न विचारणं सुरु केलं. जातिव्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या बसवेश्वरांचं स्वतंत्र अस्तित्त्व अधोरेखित करत हिंदु धर्म म्हणजे जातीव्यवस्थेची श्रेणीबद्ध उतरंड आहे अशी मांडणी केली. खरं तर बसवेश्वरांपासून ते फुले-आंबेडकर-पेरियार असा वारसा असेलेल्या या देशात जातिव्यवस्थेची याहून अधिक कठोर चिकित्सा झालेली आहे. पण सध्याच्या ‘आमच्या धर्माविरुदध बोलाल तर खबरदार’ अशा वातावरणात चिकित्सेची कोणतीच पायरी, पद्धती मान्य केली जात नाही. कारण चिकित्सा करणारा कोणताच मेंदू त्यांना नको आहे.
गेली काही वर्ष कट्टरतावादाचा सूर अधिकाधिक कर्कश आणि बेबंद होत असताना इथल्या काही मंडळींना एक भाबडी आशा होती. सत्तर वर्षांच्या म्हाताऱ्या गृहस्थांचे मेंदू संपवले गेले असले तरी बाईच्या वाट्याला कोणी जाणार नाही. स्त्रीदाक्षिण्याची थोर परंपरा आहे ना या मातीची. विविध देवतांना पूजणारा देश आहे हा. गार्गी मैत्रेयीचा वारसा अभिमानाने मिरवला जातो इथे. पण ही आशा भाबडीच होती. मुलींनी शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंवर शेणगोळ्याचा मारा करणारा, त्यांना रोखण्यासाठी गुंडाना पाठवणारा समाजही इथलाच आहे. सावित्रीबाई आज असत्या तर त्यांनाही शेणगोळ्यांऐवजी बंदुकींच्या गोळ्यांनाच बळी पडावं लागलं असतं. स्त्री शिकली तर विचार करेल, विचार केला तर व्यवस्थेला प्रश्न विचारेल. त्यापेक्षा तिला प्रथापरंपरांच्या बेड्यांमध्ये, बुवाबाबांच्या सत्संगामध्ये अडकवणं अधिक सोप्पं आणि अधिक बरं. देवतांना पुजणाऱ्या या देशातच स्त्रीभ्रूणहत्यांचं प्रमाण अधिक आहे ही एकच गोष्ट या समाजातील सनातन्यांची आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या सामान्यांची दुभंग मानसिकता स्पष्ट करायला पुरेशी आहे. अशा स्थितीत म्हाताऱ्या गृहस्थांच्या पाठोपाठ एका स्त्रीचा मेंदू संपविला गेला यात आश्चर्य ते काय? काही दिवसांपूर्वीच अरुंधती रॉयना मानवी ढाल म्हणून लष्कराच्या जीपला बांधावी अशी सूचना एका सद्गृहस्थाने केलीच होती. कारण काय तर अरुंधती रॉय यांचे विचार त्यांना मान्य नाहीत. जे जे आपल्याला मान्य नाही ते ते संपवावे, यालाच कट्टरतावाद म्हणतात. कधी धर्माच्या पायावर त्याची मांडणी केली जाते तर कधी राष्ट्रवादाच्या वलयामध्ये त्याला फोफावू दिलं जातं.
गौरी मांडत असेलेले सगळेच्या सगळे विचार सगळ्यांनाच मान्य होतील असं नाही. पण त्यालाच विचारस्वातंत्र्य म्हणतात. न पटणाऱ्या विचारांचा तुम्ही प्रतिवाद करु शकता. न्यायालयात दाद मागू शकता. पण कट्टरतावादाला विचारस्वातंत्र्याचा हा लोकशाही अवकाश कधीच मान्य नसतो. त्यापेक्षा तोंड झाकून चोरपावलांनी येत गोळ्या घालणं त्यांना अधिक आवडतं किंवा जमतं. तोंड झाकलेल्या नथुरामाने महात्म्यावर गोळ्या झाडल्या. आज नथुरामाचे वारसदार जागोजाग दबा धरुन बसले आहेत. कुजबुजत आहेत. ऐका, ती कुजबुज वाढत आहे. विचार करणारे मेंदू शोधत आहे.
6 Comments
संध्या नरे पवार, तुम्ही फार उत्तम व नेमके विवेचन केले आहे.
नथुरामने तोंड झाकून गोळ्या झाडल्या नाहीत । तुलना अयोग्य आहे ।
It’s worst reality mam . You’re each and every word is true. They want ideal Indian women who has no words it means they want ideal slave women[ Adarsh Gruhini]
विचार करायला लावणारे लिखान — साध्या सोप्या भाषेत मांडलेत .
लेख खूप छान आहे.
खूप छान आपला लेख आहे
शशीकांत बापू कांबळे
संस्थापक भिमदल सामाजीक संघटना