fbpx
विशेष

क्रांती मोर्चाचा आतला आवाज

मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी प्रतिमा समजून माध्यमांतून या मोर्चाविषयी लिखाण होतंय. वास्तवातला पाटील, देशमुख आज गांजलेला आहे, शेती पिकत नसल्याने तो हलाखीत आहे, तो सावकार नाही तर सावकाराच्या पेढीवर व्याज भरणारा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मराठा क्रांती मोर्चाचा काही आतला आवाज असेलच तर तो हा आहे, पण प्रत्येक जातीची असते तशी मिडिया लॉबी मराठ्यांची नसल्याने हे चित्रच पुढे येत नाही. –अमर जाधव

कुठल्याही घटनेचा आतल्या आवाजाशी संबंध जोडायची फॅशन अशात आलेली आहे. नितीशकुमारांनी भाजपाशी पाट जोडून माती का खाल्ली यापासून ते सुनील ग्रोवरने कपिल शर्माच्या शो ला रामराम का ठोकला यापर्यंत सगळ्याच घटनांचं खरं-खोटं किंवा आपल्याला हवं तसं विश्लेषण हे आतल्या आवाजाच्या नावावर खपवल्या जातंय.

महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर मोठा परिणाम घडवू शकणारी घटना म्हणजे मुंबईत झालेला मराठा क्रांती मोर्चा, या मोर्चाचं आणि त्याच्या राजकीय फायदा तोट्याचं गणित मांडायला मोर्चेकर्यांतून कुणी पुढे आलेलं नसलं तरी महान पत्रकारांनी “श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची दिशाभूल करून त्यांना आपल्या राजकीय फायद्यासाठी मोर्चात आणलं” असं विश्लेषण बिनधोकपणे ठोकून दिलेलं आहे. मोर्चाच्या अग्रस्थानी असणार्या मुलींनी जी जोशपूर्ण भाषणे केली किंवा टीव्हीवर जी भूमिका मांडली त्यात त्यांचा अभ्यास किती असाही प्रश्न विचारण्यात येतोय, खरंतर कुठल्याही मोर्चात चिरकत चिरकत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्या प्रश्नावर किती खोल अभ्यास असतो हा संशोधनाचा विषय ठरावा, पण नेमक्या याच मुलींना चर्चेत बोलावून त्यांना तेच चिरके मुद्दे टीव्हीवर मांडायला लावायचं कारस्थान मात्र पद्ध्तीशीरपणे खेळल्या गेलं.

मराठा समाजाचं नेतृत्व कोण हा एक मोठा प्रश्न आहे, जुने संस्थानिक, राजे महाराजे, किंवा राजकीय नेते हे मराठा समाजाचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत कारण इतर जातींमधल्या सुखवस्तू वर्गाप्रमाणे त्यांनीही स्वतःची झोळी व तिजोरी गच्च भरून घेतली आहे (उदारीकरणानंतर प्रत्येक जातीत असे अंतर्गत उच्चवर्णीय तयार झाले आहेत ). पण आपल्या समाजाच्या व्यथा जाणणारा, सुशिक्षित, ग्रामीण भागातलं दैन्य उघड्या डोळ्यांनी बघितलेला अभ्यासू तरुण हाच या मोर्चाचं अन समाजाचं नेतृत्व होऊ शकतो, पण असा तरुण टीव्हीच्या चर्चांतून कुणीच बोलावला नाही कारण तो बोलावला असता तर अँकरचे वाभाडे निघाले असते. म्हणूनच घोषणा देणाऱ्या अन त्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्या मुलींना कार्यक्रमात बोलवून त्यांना प्रश्न विचारणे, त्याही पुढे जाऊन या मुलींची लग्न होतील का इतकी उत्कंठा दाखवणे, हि सर्व पेड कर्तव्ये मराठी इलेक्ट्रोनिक मेडियाने खाल्ल्या नोटांना जागून पूर्ण पाडले.

मराठा हा राष्ट्रीय विचार करणारा समाज आहे, मराठा कन्फेडरसीतून राज्याबाहेर गेलेली नातीगोती व उत्तर दक्षिणेतल्या कित्येक मोहिमांतून मराठा समाजाचा परंपरागत कलेक्टीव्ह कॉनशियसनेस घडला आहे. त्यामुळे एक साधारण मराठा स्वतःची जातीय ओळख कधीही दाखवत नसायचा मात्र शेतीतून येणारं उत्पन्न घटलं, नोकर्या मिळवण्याची मानसिकता मराठा समाजाला कधीच तयार करता आली नाही, त्यात आरक्षण नसल्याने उच्च शिक्षणाची व सरकारी नोकर्यांची दारे शैक्षणिक-आर्थिक दृष्ट्या अशक्त मराठ्यांसाठी कधीच उघडी नव्हती, त्या तुलनेत सवर्ण समाजाने आधीच शहरांतून बस्तान बसवलं होत, जोवर शेती परवडत होती तोवर मराठ्यांनी तग धरला पण आताच्या सरकारच्या बेअक्कल धोरणांमुळे शेतीतही मराठे बुडू लागले आहेत. मराठा मोर्चाला आलेल्या कृषक समाजाचं हे दुखणं कुठल्याच माध्यमाला दिसलं नाही.

त्याउलट मराठा मोर्चा म्हणजे जमीनदार अन गळ्यात पाचपाच तोळ्यांच्या सोन्याच्या चेन घालून फिरणाऱ्या मराठ्यांचा मोर्चा असं चित्र रंगवण्यात माध्यमे दंग झाली होती, हि लोक समाजाचा भाग असली तरी समाजाच्या लोकसंख्येत त्यांचा टक्का किती हे कुणीही बघितले नाही, शिवाय मराठ्यांना आरक्षण मिळालेच तर क्रीमिलेयरच्या अटींतून त्या आरक्षणाचा फायदा या लोकांना घेता येणार नाही हा मुद्दाही कुणीच उठवला नाही.

सरसकट शेतकरी कर्जमाफीची जी मागणी या मोर्चात होती तिने काही फक्त मराठा समाजाचा फायदा होणार नव्हता, मराठ्यांचा मोर्चा निघाला म्हणजे त्या मोर्चात इतर जातींना यायला बंदी होती असंहि नव्हतं , या देशातल्या काही विचारधारांनी मराठ्यांशी कायम झुंजवत ठेवलेल्या मुसलमानांनीहि मराठा समाजाच्या मोर्चात सहभाग घेतला, कित्येक ठिकाणी तर स्टेज लावून स्वागत केलं, पाणी व खाद्यपदार्थहि वाटले, विदर्भात मराठा मोर्चांना सकल मराठा समाज असं टायटल होतं आणि त्यात कुणबी समाजासह इतर ओबीसी व दलितहि सामील झाले होते. असं असताना हिंदूधर्मातील इतर जातींनीही या मोर्चाला दिलखुलास पाठींबा दिला असता तर काही बिघडले नसते पण सत्ताधारी वर्गाने मराठा विरुद्ध इतर असा जो प्रोपगंडा चालवला आहे त्यातून हे शक्य झालं नाही. ओबीसींच आताचं आरक्षण आहे तसच ठेवून आम्हाला वेगळं आरक्षण द्या हि मागणी असताना मराठ्यांना ओबिसीतून आरक्षण हवं आहे असा जो द्वेषपूर्ण प्रचार केला गेला तोही चुकीचा होता.

मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी प्रतिमा समजून माध्यमांतून या मोर्चाविषयी लिखाण होतंय. वास्तवातला पाटील, देशमुख आज गांजलेला आहे, शेती पिकत नसल्याने तो हलाखीत आहे, तो सावकार नाही तर सावकाराच्या पेढीवर व्याज भरणारा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मराठा क्रांती मोर्चाचा काही आतला आवाज असेलच तर तो हा आहे, पण प्रत्येक जातीची असते तशी मिडिया लॉबी मराठ्यांची नसल्याने हे चित्रच पुढे येत नाही.

सरकारला यातून जे साधायचे होते ते साधले, आपल्या चेल्यांकरवी एक शिक्का मारलेला कागद बाहेर भिरकावून मुख्यमंत्र्यांनी मोर्चा शांत केला, या आधीच्या मोर्च्यांचा राजकीय फायदा घेत मराठा विरुद्ध इतर असे ध्रुवीकरण करत जिल्हापरिषदांची सत्ता मिळवली, आपल्या झालेल्या फसवणूकीची जाणीव मराठ्यांना आहेच पण इतर समाजांतून मोर्चाविरुद्ध जी आगपाखड मिडीयातून केली गेली त्याबद्दलही मराठा समाजमन व्यथित आहे.

आपली भूमिका सोडून शासनाने जी राजकीय खेळी खेळली ती निंदनीय आहेच पण यापेक्षा जास्त निंदनीय आहे ते मराठा मोर्चावर टीका करणारे उपटसुंभ, मोर्चा आपल्या मागण्या पुढे मांडण्या साठी निघाला होता, त्याला इतर जातींविरुद्धचा मोर्चा असं लेबल लावलं ते या उपटसुंभांनी. दुर्दैवाने कुणालाही या मूक मोर्चाचा आतला आवाज ऐकूच आला नाही.

पुणे येथे वास्तव्य. पुना हॉस्पिटल येथे कार्यरत.

Write A Comment