fbpx
राजकारण

वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रम : चाहूल भारताच्या नाझीकरणाची

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर उंच गोरी बुद्धिमान पोरं तयार करणं हे असल्या कार्यक्रमामागचं खरं उद्दिष्ट नाहीच – वंशवादी -वर्चस्ववादी मूल्ये समाजात पेरणे , सामाजिक विषमता नैसर्गिकच असल्याची धारणा रुजवणे हे एकंदर संघपरिवाराचेच जे मूळ उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठीचेच एक पाऊल म्हणून या गर्भ संस्कार कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे . एकंदरीतच 19व्या आणि 20व्या शतकात वंश कल्पनेचा वापर राजकीयसामाजिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वसाहतवाद्यांपासून ते नाझींपर्यंत अनेकांनी केला . नाझींचे आर्यवंशाच्या शुद्धीचे खूळ इकडच्या हिंदुत्ववाद्यांसाठी परके नाहीच. किंबहुना वर्णजातीच्या उतरंडीच्या व्यवस्थेला वांशिक आधार असल्याचा तर्क कधी उघड तर कधी छुप्या तऱ्हेने ब्राह्मणी सनातनी देत आले आहेत. ‘शुद्ध बीज’ या भ्रामक कल्पनेचा आग्रह हे जातीव्यवस्थाआणि पितृसत्ताक टिकवून ठेवण्याचे साधन आहे . काही लोक वांशिक दृष्टया मुळातच- म्हणजे अगदी जनुकीय पातळीवर गर्भावस्थेपासूनच श्रेष्ठ असतात आणि काही लोक निकृष्ट असतात या गृहीतकास समाजमान्यता मिळवून देण्यासाठीची उठाठेव म्हणजे हा गर्भ संस्कार कार्यक्रम.

— नचिकेत कुलकर्णी

थोर इतिहासतज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबीनी प्राचीन काळातील हिरण्यगर्भ विधीबद्दल लिहिलं आहे. एखाद्या राजाला क्षत्रियपद बहाल करण्यासाठी हा विधी ब्राह्मण पुरोहितांकडून केला जात असे . सोन्याच्या मोठ्या भांड्यात राजाला बसवून मंत्र म्हणून बाहेर काढणे असे त्या विधीचे स्वरूप होते .
सोन्याचे भांडे हे गर्भाशय असून आमच्या मंत्रानी त्यात बसलेल्या व्यक्तीवर क्षत्रिय कुळाचे गर्भसंस्कार आम्ही केले आहेत व त्यातून बाहेर येणार्या राजाचा आता शुद्ध क्षत्रिय म्हणून पुनर्जन्म झाला आहे अशी हि बनवाबनवी होती. हा विधी करण्याची फी देखील भरभक्कम असे.

अशाप्रकारे विधीवत क्षत्रियपद बहाल करून त्याची भरपूर दक्षिणा उकळून त्या राजाच्या क्षत्रियत्वाला भक्कम आधार देण्यासाठी बोगस वंशावळ्या सनावळ्या लिहिण्याचेही काम , जबर दक्षिण घेऊन ब्राह्मण पुरोहित करीत असत. अवैदिक समूहांना वैदिक धर्मीय वर्णजाती व्यवस्थेत सामील करून घेण्याचा हा मार्ग होता. भूतकाळातच फेरफार करून वर्तमानाच्या गरजा भागवण्याचे तंत्रमंत्र ब्राह्मणीपुरोहितशाहीने असे विकसित केलेले होते.

आजच्या विज्ञानयुगात देशात चिवटपणे टिकून राहिलेल्या ब्राम्हण पुरोहितवर्गाने आपली बनवाबनवीची परंपरा कायम ठेवलेली दिसते. फरक एवढाच कि नवीन ‘प्युअर क्षत्रीय’ राजा पैदा करण्या ऐवजी उत्तम प्रजेची पैदास करण्याचा ‘शास्त्रीय विधी’ यांनी विकसित केलेला दिसतो. आरोग्य भारती हि संघ परिवारातील एक संघटना आहे. आरोग्य भारती राबवत असलेला गर्भ विज्ञान संस्कार कार्यक्रम तसे पहिले तर मनोरंजक आहे. कारण त्यात आचरटपणा ओतप्रोत भरलेला आहे.परंतु या कार्यक्रमामागील वंशवादी प्रेरणा भयावह आहे.आणि म्हणूनच या कार्यक्रमाचा निषेध करणे गरजेचे आहे.

तर नेमके काय आहे या ‘वैज्ञानिक’ गर्भ संस्कार कार्यक्रमात ? इंडियन एक्सप्रेस च्या वृत्तानुसार , या संस्कार शिबिरात सामील झालेल्या जोडप्यांचे ३ महिने ‘शुद्धीकरण ‘ केले जाते, नंतर ग्रहदशा-ज्योतिषानुसार ठरवलेल्या वेळेलाच शरीरसंबंध घडवून आणला जातो. गर्भधारणेनंतर कडक
ब्रम्हचर्याचे पालन करून घेतले जाते. हा गर्भ विज्ञान संस्कार कार्यक्रम आरोग्य भारतीच्या जामनगर (गुजरात) येथील गर्भविज्ञान अनुसंधान केंद्राने विकसित केला आहे आणि त्याच्या कार्यशाळा देशात जागोजागी आयोजित केली जात आहेत. ह्या कार्यक्रमातून ‘उत्तम संतती’ निर्माण होईल असा त्यांचा दावा आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमातून आजवर ४५० ‘उत्तम संतती ‘ पैदा केल्याचा दावा करणाऱ्या या संघटनेचे लक्ष्य २०२० पर्यंत देशाच्या प्रत्येक राज्यात अशी गर्भविज्ञान अनुसंधान केंद्रे स्थापन करून हजारो च्या संख्येने ‘उत्तम संतती ‘ पैदा
करण्याचे आहे. २०१५ पासून हा कार्यक्रम देशपातळीवर राबवायची सुरुवात झाली आणि संघाच्या विद्या भारतीच्या सहकार्याने गुजरात आणि मध्यप्रदेशात १० शाखा उघडण्यात आल्या , बंगाल आणि उत्तर प्रदेशात लवकरच हा कार्यक्रम सुरु करण्याचा त्यांचा इरादा आहे. उत्तम संततीची पैदास करून ‘समर्थ भारत ‘घडवण्याच्या उद्दात्त कार्यास या पेडीग्री प्रजेस जुंपण्याचा मानस यातून स्पष्ट दिसतो.

जनुकविज्ञान ( जेनेटिक्स ) आणि वैद्यकशास्त्र अशा विषयातले तज्ज्ञ ह्या सगळ्या कार्यक्रमाला काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचे सहजच स्पष्ट करू शकतील , या असल्या थोतांडापेक्षा निदान वैज्ञानिकदृष्ट्या वरचा दर्जाचा असणाऱ्या eugenics -सुप्रजनशास्त्राचे दावे आणि त्याची मूलतत्वे या क्षेत्रातील शास्त्रज्ञानी वेळोवेळी खोडून काढली आहेत या सगळ्या विषयाचा तपशीलवार आणि ओघवता आढावा सिद्धार्थ मुखर्जी यांनी त्यांच्या द जीन या पुलित्झर पुरस्कार प्राप्त पुस्तकात घेतला आहे. , या कार्यक्रमाच्या सूत्रधारांचीच गर्भाच्या सहाव्या महिन्यात आयक्यू तयार होतो गर्भातच जेनेटिक इंजिनियरिंग केले जाते अशी विधाने , ग्रहदशेनुसार शरीरसंबंध ठेवावेत असले सल्ले , आईने श्लोकमंत्र म्हणून गर्भातल्या बाळाची मानसिक स्थिती मजबूत होते असले दावे बघूनच हा कार्यक्रम छद्म किंवा भोंदू विज्ञानाचा (pseudo sceince ) प्रकार असल्याचे उघडच दिसते. या कार्यक्रमाची प्रेरणा आरोग्य भारतीला कशी मिळाली ? तर त्याची हि एक भाकडकथा तयार आहे. म्हणे ४० वर्षांपूर्वी संघाचे कोणी पदाधिकारी जर्मनीला गेले आणि तिथे ‘मदर ऑफ जर्मनी ‘ म्हणवल्या जाणाऱ्या कुठच्यातरी बाईला भेटले तेंव्हा , या मदर ऑफ जर्मनीने त्या पदाधिकाऱ्याला सांगितले की तुमच्याकडच्या अभिमन्यूच्या गोष्टीतच गर्भसंस्काराचे रहस्य दडले आहे त्याच तंत्राचा वापर करून जर्मनीने नवी पिढी दुसऱ्या महायुद्धानंतर घडवली आणि त्यामुळेच जर्मनी विकसित झाला !.

हे सगळं हास्यास्पद तर आहेच पण जर्मनीच्या आईची गोष्ट रचून कळतनकळत या कार्यक्रमाचा प्रेरणास्रोत जर्मनीतला असल्याचे सांगून आरोग्य भारतीवाल्यांनी आपला आणि संघपरिवाराचा बाप नाझी जर्मनी असल्याची कबुली मात्र दिली आहे. सुप्रजननशास्त्र म्हणजे तथाकथित उत्कृष्ट जनुकीय गुण असलेल्या स्त्रीपुरुषांच्या शरीरसंबंधातून उत्कृष्ट संतती निर्माण करण्याचे तथाकथित शास्त्र. याचा वापर करून उबेरमेन्श -(शब्दशः भाषांतर सुपरमॅन !) म्हणजे सर्व गुणसंपन्न संतती तयार करून’शुद्ध आर्य’वंशीय पोरं जन्माला घालायचे प्रकार हा नाझी वंशवादी समाजकारणाचा एक महत्वाचा भाग होता. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग , मिश्र वंशीय विवाहावर बंदी , कनिष्ठ वंशीयांची नसबंदी असे अमानुष उपाय वापरून हिटलरी जर्मनीत असले काही सुपरमॅन तयार केले गेले असतीलही – या गर्भ संस्कारात कणभरही वैज्ञानिक तथ्य नसल्यामुळे त्यातून तेवढंही निष्पन्न होणार नाही मात्र मागची वंशवर्चस्ववादी -वंशशुध्दीची धारणा मात्र थेट नाझी वळणाचीच आहे. एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आरोग्यभरतीचे हितेश जानी सरळसरळ सांगतातच कि काळ्या वर्णाच्या बुटक्या स्त्रीपुरुषांनीही आमचा कार्यक्रम अमलात आणला तर त्यांची मुलं उंच आणि गोरी पैदा होतील , आईबापाचा आयक्यू कमी असला तरी बुद्धिमान पोरं पैदा होतील . उंची गोरा रंग वगैरे संतती उत्तम असण्याचे निकष आहेत आणि समर्थ भारतासाठी ते आवश्यक असल्याचं सांगून संघपरिवारातले लोक आपल्या वंशवादी मानसिकतेचा आणखी एक दाखला देत आहेत ,ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही ,अलीकडेच तरुण विजय यांनी केलेलं विधान ताजंच आहे . संघानं कितीही झाकायचं म्हणलं तरी त्यांची नाझी फॅसिस्ट मुळं लपत नाहीत ती अशी आणि आता तर हळूहळू ती लपवायचीही गरज त्यांना वाटेनाशी झाली आहे.

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर उंच गोरी बुद्धिमान पोरं तयार करणं हे असल्या कार्यक्रमामागचं खरं उद्दिष्ट नाहीच – वंशवादी -वर्चस्ववादी मूल्ये समाजात पेरणे , सामाजिक विषमता नैसर्गिकच असल्याची धारणा रुजवणे हे एकंदर संघपरिवाराचेच जे मूळ उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठीचेच एक पाऊल म्हणून या गर्भ संस्कार कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे . एकंदरीतच 19व्या आणि 20व्या शतकात वंश कल्पनेचा आधार राजकीयसामाजिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वसाहतवाद्यांपासून ते नाझींपर्यंत अनेकांनी केला . नाझींचे आर्यवंशाच्या शुद्धीचे खूळ इकडच्या हिंदुत्ववाद्यांसाठी परके नाहीच. किंबहुना वर्णजातीच्या उतरंडीच्या व्यवस्थेला वांशिक आधार असल्याचा तर्क कधी उघड तर कधी छुप्या तऱ्हेने ब्राह्मणी सनातनी देत आले आहेत. ‘शुद्ध बीज’ या भ्रामक कल्पनेचा आग्रह हे जातीव्यवस्थाआणि पितृसत्ताक टिकवून ठेवण्याचे साधन आहे . काही लोक वांशिक दृष्टया मुळातच- म्हणजे अगदी जनुकीय पातळीवर गर्भावस्थेपासूनच क्ष्रेष्ठ असतात आणि काही लोक निकृष्ट असतात या गृहीतकास समाजमान्यता मिळवून देण्यासाठीची उठाठेव म्हणजे हा गर्भ संस्कार कार्यक्रम. शिवाय जातीय उतरंडीच्या मर्यादेत सामाजिक दर्जा वाढवून मिळण्याची आकांक्षा पुरी करण्याचा भ्रामक मार्ग ही यातून दाखवला जातो, तुम्ही भले शूद्रतिशूद्र जातीय असा गर्भ संस्कार शिबिरात जाऊन संभोग केलात कि उत्तम संतान निपजेल. अगोदर सांगितलेल्या हिरण्यगर्भ विधीशी गर्भ संस्काराचा सांधा हा असा जुळतो. म्हणजे हा आहे एक सामाजिक सांस्कृतिक परिमाण असलेला आणि फॅसिस्ट विचारसरणीने प्रेरित असा कार्यक्रम मात्र फसवी वैज्ञानिक भाषा चलाखपणे वापरून हा जणू काही एक शास्त्रीय प्रयोग असल्याचा आव आणला जातोय. वर खास संघाच्या रीतीनुसार हे सगळं प्राचीन भारतीय विज्ञान आणि आयुर्वेदावर आधारित असल्याच्या बंडला मारून परंपरेचा पोकळ गौरवहि साधला आहे. म्हणजे आपली प्राचीन परंपरा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर कशी श्रेष्ठ ठरते हे सांगायचीही सोय झालीच . परंपराही पोकळ ,तथाकथित विज्ञानही बिनबुडाचं पण याचं जे काय कॉकटेल बनतं त्याची नशा हिंदुराष्ट्राच्या पाईकांना बेफाम चढते. आधुनिक काळातील सनातन्यांना आपल्या विचारला टेकू म्हणून फसव्या विज्ञानाचा आसरा घ्यावा लागला आहे.फसवे विज्ञान म्हणजे परिभाषा विज्ञानाची परंतु आतील ऐवज कोठल्याही वैद्ज्ञानिक कसोटीवर न टिकणारा. लोकशाही प्रक्रिया वापरून ज्याप्रमाणे फॅसिझम आणता येऊ शकतो त्याचप्रमाणे आधुनिकतेने रूढ केलेल्या वैज्ञानिक भाषेचा फसवा वापर करून समता -लोकशाही अशा आधुनिक मूल्यांच्या पूर्णपणे विरोधी मूल्यं रुजवण्याचे प्रयत्न नवे नाहीत. 50 च्या दशकात हिंदुसमाजरचनाशास्त्र नावाचे पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद महादेव जोशी या सनातनी महाभागाने जातीसंस्था म्हणजे सुप्रजननशास्त्राचे सामाजिक उपयोजन-आहे ,निसर्गातच असलेले भेद टिकवण्याची यंत्रणा आहे त्यामुळे ती मोडता कामा नये असले तारे तोडले होते. आधुनिकतेने उभ्या केलेल्या वैचारिक आव्हानासमोर विषमता वर्चस्वाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्राचीन शास्त्रपुराणातले दाखले पुरेसे नसतात -अर्धकच्च्या फसव्या वैज्ञानिक परिभाषा वापरून नवी पुराणं रचत राहावी लागतात , ती गळी उतरवणं सोपं जातं . शिक्षित मध्यमवर्गालाही एकाच वेळी स्वतःची आधुनिक इमेज जपत परंपरेचे अभिमानी राहण्याची रूढी चाली जपत राहण्याची सोय होते. गर्भ संस्कार कार्यक्रमाची आयडियॉलॉजी हि अशी आहे.

गर्भ संस्कार सारख्या थिल्लर कार्यक्रमाची नाझी वंशवादाशी तुलना करून तुम्ही राईचा पर्वत करत आहात ,असल्या गोष्टींचा बागुलबुवा करण्यात अर्थ नाही, संघ काही होलोकॉस्ट सारख्या वंशविच्छेदाच्या मार्गाने जाणार नाही असं काही लोकांना वाटू शकतं . २००२ साली आपल्या वंशविच्छेदी प्रवृत्तींचा दाखला संघाने दिला होता ही गोष्ट तर आहेच पण नाझी जर्मनीमध्येही गॅस चेम्बर मध्ये ज्यू -जिप्सीचं जी हत्यासत्र झाली ती हिटलरने सत्ता हस्तगत केल्यानंतर सुमारे ७वर्षानी झाली होती. वंशवादी प्रचारयंत्रणा आणि वंशभेदी कार्यक्रम राबवून हत्यासत्राची पूर्वतयारी मात्र अगोदरपासून चालू होती हे लक्षात घेतलं पाहिजे. गर्भ संस्कारासारखे कार्यक्रम संघाच्या फायनल सोल्युशन पर्यंतच्या नियोजनबद्ध वाटचालीतले टप्पे असतात , समाजात अशा तऱ्हेच्या विचाराला किती आणि कसा प्रतिसाद मिळतो आहे ,कशाप्रकारचं पॅकेजिंग करून तो लोकांच्या गळी उतरवता येईल याची चाचपणी करण्याचा हा भाग आहे . त्यामुळेच आज संघपरिवाराचा या कार्यक्रमाशी संबंध नाही किंवा संघ आणि आरोग्य भारतीचा संबंध नाही किंवा आरोग्य भारतीचा आणि वर उल्लेख केलेली विधाने करणाऱ्यांचा सम्बन्ध नाही अशी हरप्रकारे मखलाशी करताना ते दिसतील . altnews.in नावाच्या वेबसाईटने या मखलाशीमागचे दावे उघडे पाडले आहेत , संघाचे पदाधिकारी -या कार्यक्रमाचे चालक, समन्वयक आणि पदाधिकारीही यांचा परस्परसंबंध वेबसाईटवर तपशीलवार पद्धतीने समोर आणला आहे. (https://www.altnews.in/link-arogya-bharati-promises-genius-babies-rashtriya-swayamsevak-sangh-rss-opindia-couldnt-find/ ) बुद्धिभेद करण्याची गोंधळ निर्माण करण्याची हि संघाची मुरलेली रीत आहे. पण त्यामुळे आज वारंवार पाहता थिल्लर वाटणाऱ्या – फारसा आवाका/पोच नसलेल्या या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोलकात्यामध्ये झालेल्या गर्भसंस्कार वर्कशॉपवर प.बंगालच्या बाल हक्क रक्षण आयोगाच्या अध्यक्ष अनन्या चटर्जी यांनी हा कार्यक्रम बुरसटलेल्या विचाराना बढावा देणारा -समाजाला घातक ठरणार कार्यक्रम आहे असा आक्षेप घेतला. कार्यक्रम रोखण्यासाठी कोर्टात धाव घेतली धाव घेतली , कोर्टाने वर्कशॉपवर बंदी आणली नाही पण गर्भसंस्कार तंत्र वापरून उपचार करण्यावर प्रतिबंध घातले- कार्यक्रमाची चित्रफीत कोर्टाला सादर करण्याचे आदेशही दिले. प्रत्यक्ष वर्कशॉपच्या ठिकाणी उपस्थित राहण्यापासून मात्र आयोजकांनी चॅटर्जी यांना बळजबरीने अडवले ,शिवीगाळ मारहाण केली .याविरोधात चॅटर्जी यांनी आरोग्य भारती विरोधात एफ आय आर दाखल केला आहे . अशाप्रकारे गुप्तता पाळण्याचा आटापिटा केल्यामुळे संशय अधिकच बळावतो . त्यामुळेच बंगालच्या बाल हक्क आयोगाचे उदाहरण समोर ठेवून पावलोपावली अशा कार्यक्रमाला संघटित विरोध करत राहणे आणि जोडीला सातत्याने वैज्ञानिक प्रबोधनाचा मार्ग पत्करणे याला पर्याय नाही.

सुप्रजननाच्या प्रयोगांच्या मागोमाग वंशविच्छेदाचे विचार किंवा थेट कार्यक्रमच येत असतात आणि त्याची न चुकवण्याजोगी किंमत मोजावी लागते हा विसाव्या शतकाचा दाखला आहे. आरोग्य भारतीच्या गर्भ संस्कार कार्यक्रमातून ठसवल्या जाणाऱ्या संततीच्या उत्तम -निकृष्टतेची कल्पना म्हणजे ‘काही माणसं हि जगायला नालायक असतात ‘ हे सहज स्वीकारण्याची मनोभूमिका घडवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक माणसाचे मोल समान आहे ह्या समतेच्या संकल्पनेशी त्यांचा उभा दावा आहे. प्रत्येक व्यक्तीने पूर्णपणे बहरण्याची शक्यता खुली करणारा निरोगी समाज घडवण्याची आस ज्यांना आहे त्यांनी आरोग्य भारतीच्या घातक कारवाया रोखण्यासाठी पुढे सरसावलेच पाहिजे .

नचिकेत कुलकर्णी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज मध्ये 'आधुनिक भारतीय राजकीय विचार'या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आहेत. लोकवाग्मय गृह या प्रकाशन संस्थेतहि ते सक्रिय आहेत.

6 Comments

 1. Alka Gadgil Reply

  Nachiket, bhayanak ahhe he. Geli anek varshe under/over ground karvaya suru ahet, khedachi goshta mhanje moththa samaj either udasin ahe kinva supporter.

 2. देवकुमार अहिरे Reply

  नचिकेत!
  महाराष्ट्रात हे नवीन नाहीये. वासाहतिक भारतात महाराष्ट्र हा असा प्रदेश होता की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिटलरच्या सु(?) प्रजननशास्त्राचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रवाद, ब्राह्मण्य आणि पुरुषत्वाच्या कल्पनेतून आर्यवंशीय गोरा ब्राह्मण हिंदू निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. सुप्रजननशास्त्रासारखे फसवे विद्न्यान त्याकाळात खूपच प्रसिद्ध होते.

  महाराष्ट्रात वासाहतिक काळापासून हिंदुत्ववादी लोकांना आणि ब्राह्मण्यग्रस्त लोकांना फसव्या विद्न्यानाचे आकर्षण राहिले आहे. सध्या वेदात अनु आणि विमान शोधण्याचा एकीकडे प्रयत्न होतो तर दुसरीकडे बुध्दीवादी हिंदुत्व अशी चर्चा होतांना दिसते.

  हिंदुत्ववादी लोकांना नुसते नाझीवादी म्हणून चालणार नाही कारण हिंदुत्वात नुसते नाझीत्व नाहीये, नाझीत्वासोबत ब्राह्मण्य हे सुद्धा त्यांच्या केंद्रस्थानी आहे. हिंदुत्ववादी लोकांनी जसे नाझींकडून प्रेरणा घेतली आहे तशीच नाझींनी ब्राह्मण्याकडून प्रेरणा घेतली आहे. निश्तेच्या माध्यमातून नाझींपर्यंत मनुस्मृती गेली होती. तिचा हिटलर आणि कंपनीवर प्रभाव होता असे काही अभ्यासकांचे मत आहे.

  • दांडेकर Reply

   Bullshit. This Garbhsanskar idea is big bullshit. विकृत आणि सडक्या मेंदूतून निघालेल्या तितक्याच सडक्या कल्पनांचा हा लेख उत्कृष्ट समाचार घेतो. ह्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीच उपमा नाही. अडाणी माणसाला समजावता शिकवता येते , पण या वर्ण वंश वर्चस्व वादि लोकांना ब्राह्मदेव सुद्धा समजावू शकत नाही. त्यामुळे या ब्राम्हणवादी विचारांच्या शेणातच ते मश्गुल राहाणार . धन्यवाद.

 3. Yes, Nachiket, the revival of this tradion is wide spread campaign going on under cover of Yoga by Balaji Tambe n others. Through community level groups it spread.

  The question is whether Are we equipped to refute this apparantly rational argument ? Tell me how will U answer the question by a common person, who are aware of n not concerned with whole indeology.
  Whats wrong in Garbh Sanskar? Music therapy works as well.

 4. Vaishali vaidya Reply

  नचिकेत, very good. ह्यासंबधात Medico friends circle, lokvidynan सारख्या संघटनांशी बोलून लोकजागरण करणं गरजेचं आहे..साथी, पुणे यांच्याशीही बोलून पाहिले पाहिजे.।..।वैशाली वैद्य.

 5. मोहन मद्वाण्णा Reply

  हा सर्व छ्द्मविज्ञानाचा प्रयत्न आहे. वास्तुशास्त्र, सुवर्ण प्राशन व गर्भसंस्कार हे कसे थोर आहेत हे आम्ही सांगतो त्याला प्राचीन ग्रंथांचा आधार आहे. हे सर्व विज्ञान काहीं शतके खंडित झाले होते याचे पुनुरुज्जीवन आता आम्ही करतो असे सांगण्याची फॅशन आलेली आहे. जर असे काहीं असते तर सुवर्ण कारांच्या घरी फक्त गोरी सुदृढ व सुंदर मुलेच जन्मली असती. आपण अशाने सारासार विचार करण्याची शक्ती कुंठित केलेली आहे. ज्याची तर्क बूद्धी शाबूत आहे त्याने अशा ‘भंपक’ कल्पनांच्या मागे लागून पैसे खर्च करू नयेत. गर्भसंस्कार हे थोतांड गेल्या पंचवीस वर्षात वाढलेले आहे. त्या आधी जन्मलेली मुले हुषार नव्हती असा निष्कर्ष काढायचा का?

Write A Comment