Category: राजकारण (Page 2 of 2)

गोवंश विक्री निर्बंध: एक गुरोगामी आणी बिनडोक निर्णय

 

 

अति उजव्या विचारसरणीच्या एका विशिष्ट्य गटाला संतुष्ट करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामागे गुरांच्या कत्तलीचा प्रामुख्याने व्यवसाय करणाऱ्या मुसलमान समुदायाला आर्थिक दृष्ट्या अपंग करण्याचे एक षडयंत्र आहे पण यातून गोपालन करणारा, बहुसंख्य हिंदू असलेला शेतकरी वर्ग जास्त भरडला जाणार आहे.  

 

शैलेंद्र मेहता

आपल्या जवळच्या माणसांवरचा विश्वास उडाला म्हणून एक राजा एका माकडाला आपला अंगरक्षक नेमतो. एक दिवस राजा झोपलेला असताना राजाच्या नाकावर बसलेली माशी मारण्यासाठी माकड आपल्या हातातला सोटा राजाच्या नाकावर हाणतो आणि राजा तात्काळ गतप्राण होतो. अशा आशयाची एक गोष्ट लहानपणी वारंवार वाचनात आली  होती. गोष्टीचे तात्पर्य, मूढमती – मूर्खांवर विसंबून राहणे म्हणजे मरणाला आमंत्रण .

सद्याची राजकीय परिस्थिती पाहता  सोटा हातात धरलेले सरकारी माकड डोळ्यांसमोर येते आणि म्हणूनच त्याच्यावर विसंबून झोपून न राहता जनतेवर सतत डोळे उघडे ठेवून जागरणे करायची पाळी आली आहे.

Read More

मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.

राजेंद्र साठे

माझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही  कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही. ही शाळा कॉन्वेंट किंवा चर्चद्वारा चालवली जाणारी नव्हती. सीबीएसई अभ्यासक्रमाची होती. ज्यांची बदली देशभर होण्याची शक्यता आहे असे पालक अशा शाळांमध्ये मुलांना घालतात असे ऐकून होतो. पण त्या दहा वर्षांच्या काळात अपवादानेही असा एकाही मुस्लिम नोकरदार या शाळेकडे आलेला दिसला नाही.

Read More

होय हे शक्य आहे

विल्यम शेनस्टोन नावाचा ब्रिटीश कवी म्हणायचा कि “ वेडे लोक हे एकामेकांना घट्ट पकडून असतात अन हुशार लोकांत सतत काहीना काही मतभेद असतात” काँग्रेस पुरेशी पुरोगामी नाही म्हणुन आधी कम्युनिस्ट बाहेर पडले मग समाजवादी, त्याचवेळी काँग्रेस पुरेशी उजवी नाही म्हणुन धर्मकेंद्रित राजकारण करू पाहणारे काही लोकही तिथून बाहेर पडले. हेडगेवार, मालवीय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे एकेकाळी काँग्रेस मध्ये होते. डाव्यांच्या संघटनेची पुढे असंख्य शकले झाली. हिंदुत्ववादी मात्र एकचालकानूवर्तीत्व मानत थोडे फार अपवाद वगळता एकत्रच राहिले. त्याला बराच काळ उलटून गेल्यावर आता निवडणुकीच्या राजकारणात या फरकामुळे कसा परिणाम जाणवला हे बघणे रंजक ठरेल.

— डॉ अमर जाधव

मागच्या सात वर्षांची तुलना केली तर २०१६-१७ हे आर्थिक वर्ष “बेरोजगारीचे वर्ष” म्हणुन जाहीर व्हायला हरकत नसावी, कारण केंद्र शासनाच्याच लेबर मिनिस्ट्रीने दिलेल्या आकडेवारी नुसार यावर्षी देशात सर्वात कमी रोजगार निर्माण झालेले आहेत. मोदींनी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारात तरुणांना दरवर्षी तब्बल दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशी आशा दाखवली होती, प्रत्यक्षात देशात त्या आश्वासनाच्या फक्त वीस टक्केच नोकऱ्या कशाबशा नवीन तयार झालेल्या आहेत. मोठमोठ्याने देशप्रेमाच्या घोषणा देत अन जो भाजपचा विरोधी तो देशद्रोही असलं बीभत्स समीकरण पुढे आणत संघपरिवार या देशावर राज्य करतो आहे, अन निवडणुकीतलं यश हे आम्हीच बरोबर असल्याची पावती म्हणुन सादर करत आहे. पण देशातली जनता नेमकी यांनाच निवडून देत आहे, कि समाजवादी, घटनाप्रेमी वर्गाचा घात पुरोगामी विचारांच्या आपसातल्या गटबाजीने होतोय हे समजून घेतले पाहिजे.

Read More

न्यायमूर्ती गोखले आणि सर परेश रावल नवहिंदुत्ववादी भारतवर्षाचे लक्ष्मीकांत प्यारेलाल

गोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे. तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि कन्हय्या कुमारला ठार मारणे हे देखील आहे. गोखले आणि रावल हे गेली साठ वर्षे काँग्रेस च्या कार्यकाळात मुर्दाड झालेल्या भारतीयांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचा अंगार फुलवू पाहात आहेत. नवहिंदुत्ववादी भारतीयांच्या देशप्रेमाचे मंगल स्त्रोत्र नव्याने रचू पाहणारे हे लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत.

आपण दोन गोष्टी तात्काळ करायला हव्यात. आपण म्हणजे आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी. त्यांनी तात्काळ अरुंधती रॉय या विदुषीस मिळेल तिथून पकडून आणावे आणि तिला जीपच्या पुढच्या भागावर बांधून काश्मीर खोऱ्यातील वस्त्या वस्त्यांमधून फिरवावे. दुसरे म्हणजे कन्हैया कुमार नावाच्या जेएनयुमधील विद्यार्थ्यास तात्काळ सजा ए मौत म्हणजे मारून टाकावे. या दोन्ही गोष्टी तातडीने करण्याची गरज आहे कारण तसे सर परेश रावल (त्यांच्या ट्वीटर हँडलवर त्यांनी स्वतःचे नाव तसेच लिहिले आहे.) आणि माहात्मा विक्रम गोखले (यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर स्वतःचे नाव तसे लिहिलेले नाही) असे म्हटले आहे. आता या दोन गोष्टी केल्याने जगभरात भारताची प्रतिमा अत्यंत बलशाली म्हणून जाण्यास सुरुवात होईल. खरंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर ती झालेलीच आहे. परेश रावल हे भाजपचे खासदार आहेत, विक्रम गोखले नक्की कुठल्या पक्ष संघटनेशी संबंधित आहेत किंवा कसे माहित नाही, मात्र त्यांचा सावरकर आणि संघाच्या विचारांना पाठिंबा असल्याचे नाट्य व सिनेसृष्टीतील अनेकांचे म्हणणे आहे.

Read More

‘हिंदुत्व की विकास की सहिष्णू हिंदू धर्म’- खोटे प्रश्न, भ्रामक पर्याय

सं.पु.आ. सरकारच्या काळातील नियोजन आयोगाचे सदस्य, कॉंग्रेस चे राज्य सभेवरील माजी सदस्य, इतकेच नाही तर अर्थतज्ञ, आंबेडकरी, पुरोगामी चळवळ यांच्याशी संबंधित असे डॉ. मुणगेकर जेव्हा हिंदू धर्माला (हिंदुत्वापासून वेगळे काढण्याच्या नादात) सहिष्णू ठरवतात तेव्हा त्यातले ऐतिहासिक वैदिक-अवैदिक, ब्राह्मण- ब्राह्मणेतर आदि संघर्ष, फुले- आंबेडकर यांची क्रांती या सगळ्याचा विसर पडलेले ‘सबगोलंकारीपण’ प्रकर्षाने खटकते. इतकेच नाही तर हे सबगोलंकारीपण अंतिमतः हिंदुत्वालाच पोषक ठरणारे आहे, याचे भान नसणे ही मुणगेकर यांचीच नव्हे तर बऱ्याच हिंदुत्व विरोधकांची उणीव आहे.

राहुल वैद्य

‘सबका साथ, सबका विकास’, ‘अच्छे दिन’ वगैरे घोषणा आणि विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’ चे गाजर दाखवत २०१४ च्या लोकसभा निवडणुका भाजपने जिंकल्या त्याला आता तीन वर्षे पूर्ण होतील. अनेक प्रस्थापित पत्रकार, अभ्यासक आणि विश्लेषक २०१४ च्या त्या ‘मोदी लाटे’कडे ‘विकासान्मुख राजकारणाचे यश’ म्हणून पाहत होते. २०१३ चे मुझफ्फरनगर दंगे, संघ परिवाराच्या ‘लव्ह जिहाद’ आणि इतर मोहिमा यांच्याकडे डोळेझाक करायची त्यांची तयारी होती. दस्तुरखुद्द ‘नरेंद्र मोदी’ या संघाचे ‘मुखवटे आणि चेहरे’ असले दुहेरी ढोंग फोल ठरवणाऱ्या, हुकुमशाही आणि हिंदुत्ववाद यांना प्रतिष्ठित करणाऱ्या व्यक्तिमत्वाला ‘नवउदारवादी विकासाचे लोकप्रिय नेतृत्व’ आणि ‘भारतीय डेंग’ म्हणून जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली होती.

Read More

वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रम : चाहूल भारताच्या नाझीकरणाची

अधिक खोलात जाऊन पाहिलं तर उंच गोरी बुद्धिमान पोरं तयार करणं हे असल्या कार्यक्रमामागचं खरं उद्दिष्ट नाहीच – वंशवादी -वर्चस्ववादी मूल्ये समाजात पेरणे , सामाजिक विषमता नैसर्गिकच असल्याची धारणा रुजवणे हे एकंदर संघपरिवाराचेच जे मूळ उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठीचेच एक पाऊल म्हणून या गर्भ संस्कार कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे . एकंदरीतच 19व्या आणि 20व्या शतकात वंश कल्पनेचा वापर राजकीयसामाजिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वसाहतवाद्यांपासून ते नाझींपर्यंत अनेकांनी केला . नाझींचे आर्यवंशाच्या शुद्धीचे खूळ इकडच्या हिंदुत्ववाद्यांसाठी परके नाहीच. किंबहुना वर्णजातीच्या उतरंडीच्या व्यवस्थेला वांशिक आधार असल्याचा तर्क कधी उघड तर कधी छुप्या तऱ्हेने ब्राह्मणी सनातनी देत आले आहेत. ‘शुद्ध बीज’ या भ्रामक कल्पनेचा आग्रह हे जातीव्यवस्थाआणि पितृसत्ताक टिकवून ठेवण्याचे साधन आहे . काही लोक वांशिक दृष्टया मुळातच- म्हणजे अगदी जनुकीय पातळीवर गर्भावस्थेपासूनच श्रेष्ठ असतात आणि काही लोक निकृष्ट असतात या गृहीतकास समाजमान्यता मिळवून देण्यासाठीची उठाठेव म्हणजे हा गर्भ संस्कार कार्यक्रम.

— नचिकेत कुलकर्णी

थोर इतिहासतज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबीनी प्राचीन काळातील हिरण्यगर्भ विधीबद्दल लिहिलं आहे. एखाद्या राजाला क्षत्रियपद बहाल करण्यासाठी हा विधी ब्राह्मण पुरोहितांकडून केला जात असे . सोन्याच्या मोठ्या भांड्यात राजाला बसवून मंत्र म्हणून बाहेर काढणे असे त्या विधीचे स्वरूप होते .
सोन्याचे भांडे हे गर्भाशय असून आमच्या मंत्रानी त्यात बसलेल्या व्यक्तीवर क्षत्रिय कुळाचे गर्भसंस्कार आम्ही केले आहेत व त्यातून बाहेर येणार्या राजाचा आता शुद्ध क्षत्रिय म्हणून पुनर्जन्म झाला आहे अशी हि बनवाबनवी होती. हा विधी करण्याची फी देखील भरभक्कम असे.

Read More

मनुस्मृतीचा मेकओव्हरः दलित बहुजनांच्या गुलामगिरीची गीता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘संस्कारभारती’ ही संस्था ‘मनुस्मृती’चा मेकओव्हर करणार असून मनूविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. मुळात जो ग्रंथ या भूमीतल्या दलित-बहुजनांच्या गुलामगिरीचा उद्घोष करतो, त्याचा मेकओव्हर कशासाठी? कोणासाठी? या मेकओव्हरमधून काय दडवायचे आहे, काय झाकायचे आहे? हे प्रश्न आजच्या सामाजिक वास्तवात महत्त्वाचे आहेत. मुळात ज्या ग्रंथाच्या पानापानावर इथल्या दलित बहुजनांच्या गुलामगिरीचा उच्चार आहे त्याचा मेकओव्हर करावासा वाटणं, हाच इथल्या दलित-बहुजनांचा, समस्त स्त्रियांचा आणि देशाच्या समतावादी राज्यघटनेला मानणाऱ्या विचारी नागरिकांचा अधिक्षेप आहे.

— संध्या नरे-पवार

 

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड इथल्या चवदार तळ्याकाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’चं दहन केलं. बाबासाहेबांचं हे कृत्य कोणत्याही गैरसमजांवर आधारित नव्हतं तर मनुस्मृतीच्या पानापानांवर जे काही विषमतावादी, विषारी उच्चार आहेत, त्यांचा निषेध म्हणून हे दहन करण्यात आलं. महाड इथल्या सार्वजनिक चवदार तळ्यावरील पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांनाही मिळावा, या मागणीसाठी तसंच पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर अस्पृश्यांचाही स्पृश्य हिंदूंइतकाच अधिकार आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आधी मार्च १९२७ मध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसह महाड इथे गेले. पण सनातनी हिंदूंनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना पिऊ दिलं नाही. तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसह चवदार तळ्याकाठी जमले. पुन्हा एकदा सनातनी हिंदूंच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चवदार तळ्याभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला.

Read More

नरेंद्र मोदी - मोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची!

मोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची!

भारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं. हा मार्ग बदलून संघाला भारताचं ‘हिंदू राष्ट्र’ बनवायचं आहे. भौतिकदृष्ट्या अमेरिका वा युरोपीय राष्ट्रांसासारखं अत्यंत विकसित, पण सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सौदी अरेबियासारखं पुराणमतवादी, असं ‘हिंदू राष्ट्र’ संघाला हवं आहे. ज्या ‘गुजरात मॉडेल’चा सतत उदाउदो होत आला आहे, ते हेच आहे. तेच आता देशाच्या स्तरावर अंमलात आणण्याचे प्रयत्न होत आहेत.

—  प्रकाश बाळ

येत्या २६ मेला मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

मोदी सरकारच्या या तीन वर्षांकडं आपण कसं बघू शकतो?

Read More

Page 2 of 2

Powered by WordPress & Theme by Anders Norén