“भूक ही भूक असते, पण शिजवलेलं मांस काटा-चमच्याने खाणाऱ्याच्या भूकेपेक्षा कच्चं मांस हात, नखं आणि दाताने तोडणाऱ्याची भूक वेगळी असते.” कार्ल मार्क्सचे हे शब्द भारतासारख्या देशातील करोडो गरीब जनतेला लागू होतात. पण अशा देशातही अन्नावरून लोकांची हत्या केली जाते, विशिष्ट अन्नं खाल्लं म्हणून लोकांना धमकावलं जातं, माणसाच्या स्पर्शाने अन्न अपवित्र होतं तर काहींच्या नशिबी केवळ उष्टावळीचं जेवण असतं. अनेक जण केवळ अन्नाच्या आठवणीने उपाशीपोटी झोपतात. इथल्या अन्नाला जात, धर्म, पंथ यांचा वास येतो तर अन्नासाठी एकत्र यायला हवीत अशी माणसं त्याच अन्नावरून एकमेकांचा जीवही घेतात. अन्न जेवणं ही खरंतर सामूहिक प्रक्रिया आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की आपलं ताट लपवून खाण्यातच शहाणपणा आहे. कारण ताटातला कोणता पदार्थ आपल्यासाठी संकट घेऊन येईल सांगता येत नाही.
अन्नाबाबत हा सगळा विचार देण्याचं कारण म्हणजे सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर “सेतूमान” हा एक वेगळा तामिळ चित्रपट पाहण्यात आला. प्रसिद्ध लेखक पेरुमल मुरुगन यांच्या तामिळमधील “वेरुगारी” या कथेवर आधारित हा चित्रपट दलित कुटुंबातले आजोबा-नातू यांचं नातं आणि डुकराचं मांस यांची कथा सांगतो. सेतूमान म्हणजे डुकराचं मांस. देशात सुरू असलेल्या गोमांसाच्या हिंसाचाराचं हे कुटुंब बळी आहे. आजोबाच्या मुलगा-सुनेला गोमांसाच्या संशयावरून मारून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे टोपल्या बनवून, एका श्रीमंत जमीनदाराकडे पडेल ते काम करून आजोबा त्याच्या नातवाला शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी सतत मेहनत करत असतात. शाळा गावापासून खूप दूर असली तरी स्वतः त्याला तिथे घेऊन जाणं, त्याचं खाणं-पिणं, लाड पुरवणं असं कष्टाचं पण सन्मानाचं आयुष्य दोघे जगत असतात. पण गरिबांच्या आयुष्यात गोष्टी एवढ्या सरळ कधीच होत नाहीत. दलित म्हणून हेटाळणी, डुकराचं मांस खाणारे म्हणून शाळेत चिडवणं आणि त्यांच्या प्रती घृणा, जमीनदाराकडून होणारी पिळवणूक, त्याच्या बायकोकडून होणारा अपमान, पैसे नसणं असे अनेक प्रश्न या दोघांसमोर असतात. त्यात जमीनदाराला डुकराचं मांस खाण्याची हुक्की येते त्यामुळे तो आपल्या मित्रांना बोलावून एका पार्टीचं आयोजन करतो. अर्थात जमीनदार हा उच्च जातीचा असल्याने त्याची बायको या गोष्टीला विरोध करते मग ही जबाबदारी आजोबावर येऊन पडते. डुक्कर विकत आणण्यापासून त्याला मारणं, साफ करणं, मांस चामडीपासून वेगळं करणं आणि ते शिजवणं ही सर्व कामं करायला आजोबा तयार होतो कारण त्याला जमीनदाराला नाराज करायचं नसतं. एकूणच उच्च वर्णीयांमध्ये डुकराच्या मांसाच्याप्रती असणारी घृणा आणि त्यामुळेच ते चोरून खाण्यात येणारा आनंद हा खूपच सुंदर पातळीवर दाखवलं आहे. डुक्कर विकत तर घ्यायचंय पण ते विकणारा दलित असल्याने त्याच्याबद्दल असलेली तुच्छता, जास्त लोकांना हे कळू नये म्हणून पहाटे तीन वाजता अंधारामध्ये जाऊन डुकराची खरेदी करणं, जमीनदाराच्या बायकोची गोमूत्र टाकून मगच घरात येण्यासाठीची धमकी असा मानवी स्वभावातला जो भंपकपणा आहे तो उत्तम रंगवला आहे. जमीनदाराच्या मित्रांमध्ये एक शिक्षक असतो. तो नातवाला त्याच्या जातीवरून कायम हिणवत असतो. पण डुकराचं मांस खायच्या वेळी मात्र तो हे शाळेत कोणाला सांगू नको, असं मुलाला बजावून सांगतो. जात व्यवस्थेतील कितीतरी लहान-मोठे बारकावे यामध्ये टिपले आहेत. अर्थात शेवटी एक अनर्थ होतोच.
भास्कर हजारिका या दिग्दर्शकाचा “आमीस” नावाचा एक आसामी चित्रपट हॉटस्टारवर आहे. याचाही विषय मांसाहारच आहे कारण हा शब्द आसामीमध्ये मांसाहाराला वापरला जातो. देशातल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस खाल्लं जातं आणि तो तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. पण आपण अन्नाविषयी नियम लादून वैविध्यपूर्ण अन्नसंस्कृती नष्ट करू पाहतो आहोत. इथे एक मध्यमवयीन महिला डॉक्टर आणि विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी यांची अन्नातील रुचीमुळे मैत्री होते. मग तो मुलगा त्या डॉक्टरसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून घेऊन जातो, तिला वेगवेगळ्या प्राण्याचं मांस मिळेत अशा लहान-मोठ्या हॉटेलमध्ये नेतो. खाण्यावरून सुरू झालेल्या या मैत्रीचं रुपांतर त्या मुलाच्या बाजूने प्रेमात होतं. त्यामुळे आपल्या प्रेमिकेला उत्तम मांस खायला घालणं हे त्याच्यासाठी एक आयुष्याचं उद्देश बनतं आणि नशाही. एकवेळ अशी येते की तो स्वतःच्या मांसाचा तुकडा शिजवून तिला खायला घालतो अर्थात हे न सांगताच. पण त्या दिवशी ती त्या मांसाची खूपच तारीफ करते आणि हे सगळ्यांत उत्तम मांस असल्याचं सांगते. त्यातून मग हा सातत्याने आपल्या शरिराच्या मांसाचे तुकडे कापायला लागतो. पण एक दिवस त्याला सारखं जखमी बघून तिला संशय येतो. आणि तिला त्या मांसाचं रहस्य कळतं. आपण माणसाचं मांस खाल्लं याचा तिला भयंकर धक्का बसतो. आपली मुलगी, नवरा यांना कळलं तर काय होईल, लोकांना कळलं तर काय होईल, असं कसं आपण माणसाचं मांस खाल्लं याचं तिला भयंकर मनस्ताप होतो. पण त्या मांसाची चव इतकी चांगली असते की तिला आता ते पुन्हा खाल्ल्याशिवाय राहवत नाही. मग रुग्णालयात मेलेल्या माणसांचं मांस काढण्याचा ते प्रयत्न करतात. पण या सगळ्यामध्ये त्या मुलाचं मांसाविषयी प्रेम एवढ्या अतिरेकी पातळीवर गेलेलं असतं की तो माणसाचं मांस मिळवण्यासाठी एकाचा खून करू पाहतो आणि त्यातच दोघे फसतात. हा विषय अर्थातच न पटणारा न रुजणारा आहे. पण चित्रपट, कथा या जितक्या वास्तविक असतात तेवढ्याच काल्पनिकतेने भरलेल्याही असतात. देशामध्ये गायीचं मांस खाण्यावरून जेवढा गदारोळ सुरू आहे. अशावेळी माणसाचं मांस खाण्याबद्दल असलेली ही कथा लिहिणं आणि चित्रपटाच्या स्वरुपात सादर करणं हे धाडस म्हणावं लागेल.
तिसरा चित्रपट निकोलस खारकोंगोरचा “अखुनी” जो नेटफ्लिक्सवर आहे. उत्तर-पूर्वेकडील आसाम, मणिपूर, नागालँड आदी राज्यांतून शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दिल्लीमध्ये राहणाऱ्या मुलांची ही कथा आहे. त्यांच्या वेगळ्या दिसण्यावरून,कपड्यांवरून, अन्नपद्धतीवरून त्यांच्याप्रती बहुसंख्यकांच्या मनात असलेला तिरस्कार आणि परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी या मुलांची उडणारी धावपळ अशी एकूण कथा आहे. पण खरी गंमत सुरू होते जेव्हा त्यांच्यात दोघं जण लग्नं करायचं ठरवतात आणि त्या पार्टीसाठी अखुनी (AXONE) नावाचा पारंपरिक पदार्थ त्यांना बनवायचा असतो. हा पदार्थ शाकाहारी असतो पण सोयाबीन आंबवून बनवत असल्याने त्याला भयंकर उग्र वास येतो. तो वास शेजाऱ्यांपासून, घरमालकापासून लपवणं हे एक मोठं आव्हान या मुलांपुढे असतं.
स्वतःच्या घरात बनणारं अन्न आपण जेवढ्या सहजतेने स्वीकारतो तेवढ्या सहजतेने दुसऱ्याच्या घरातलं अन्न स्वीकारत नाही. भारताच्या अन्न परंपरेमध्ये जाती व्यवस्था एवढी शिरलेली आहे की अन्नाची विभागणीच जातीनुसार झाली आहे. मागास जातीच्या कोणी अन्नाला हात लावल्याने विटाळ होतो अशी परिस्थिती आजही आहे. उच्च जातीचं अन्न म्हणून केवळ शाकाहाराचा पुरस्कार विविध पातळ्यांवर केला जातो. टिव्हिवरचे कुकरी शो बहुतेकवेळा शाकाहारीच पदार्थ दाखवतात. पाकाकृतींची पुस्तकंही शाकाहारीच जास्त असतात. फक्त सोशल मिडियाने सर्वसामान्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने बहुजनांची वेगळी खाद्य संस्कृती थोड्याफार प्रमाणात आपल्याला समजते. भारतात मांसाहारही बहुसंख्य लोकांसाठी मासे, मटण, चिकन एवढ्यापुरता मर्यादीत झाला आहे. पण बैल, म्हैस, डुक्कर, पक्षी, बेडकासारखे प्राणी अपवादाने खाल्ले जातात. आणि आता बैल खाणंही अनेक ठिकाणी कायद्याने गुन्हा आहे. बिहारच्या एका गावामध्ये राहणारी रुमा सिंग नावाची एक मध्यमवयीन बाई युट्यूब चॅनेल चालवते. तिची अलीकडेच गोगलगाय बनवण्याची पाकाकृती सोशल मिडियामध्ये एकदम हिट झाली. एक लाखाहून अधिक लोकांनी ती पाहिली. हे त्या बाईचं अन्न आहे. पण त्या व्हिडिओच्या खाली कमेंट पाहिल्या तर लोकांनी तिला अक्षरशः शिव्या घातल्या आहेत. असाच एक व्हिडिओ बिहारमधल्या शाळकरी मुलांचा प्रसिद्ध झाला होता. ते बेडूक पकडून खात होते. लोकांनी त्याला गरिबी वगैरे कारणं देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यावर वक्तव्य करायला भाग पाडलं. पण गोगलगाय, बेडूक खाणं हे गरिबीचं लक्षण आणि चकचकीत पाकिटातलं महागडं अन्नं खाणं हे श्रीमंतीचं लक्षण हा विचारच मूर्खपणाचा आहे. प्रत्येक भागातल्या उपलब्धतेनुसार, हवामानानुसार, स्थानिक काय पिकतं आणि काय मिळतं यानुसार अन्न संस्कृती बनते. गाय पाळणाऱ्या शेतकऱ्याला तिचं दूध बंद झालं की ती कसायाकडे देण्यात गैर वाटत नाही कारण ती जागा नवीन गाय घेते. या शाळकरी मुलांना स्वतः बेडूक पकडून ते शिजवून खाण्याचं ज्ञान असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण इतरवेळी मुलांचं ज्ञान केवळ शाळेत किती गुण मिळतात यावर ठरतं. पण आयुष्य जगण्यासाठी लागणारी कौशल्यं मात्र त्यात गृहीत धरली जात नाहीत. अभिजन संस्कृतीने अन्नाला एका विशिष्ट चाकोरीतून पाहण्याची लावलेली सवय हे वैविध्यपूर्ण परंपरा असलेल्या भारतासाठी घातक आहे. अशावेळी वरील चित्रपट आणि त्यांचे विषय, यूट्यूबवर वेगळे पदार्थ दाखवणारी सर्वसामान्य लोकं हे एक प्रकारे आपली अन्न संस्कृती टिकवून ठेवण्याची धडपड करत आहेत.
1 Comment
thnak for sharing