fbpx
राजकारण सामाजिक

गांधींची धर्मकल्पना

गांधीजींची धर्मकल्पना हा विषय आजच्या काळात समजावून घेणं महत्त्वाचं आहे; कारण एक वेळ गडगडलेलं अर्थकारण सावरता येईल, विस्कळीत झालेली राजसत्ता एकत्र आणता येईल, लोकांचे अधिकार त्यांना परत मिळवून देता येतील, पण धर्मकारणात जी विकृती आजच्या काळात निर्माण झाली आहे, ती जर तशीच चालू राहिली, तर या देशाचं विघटन व्हायला वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती आहे.

आजच्या परिस्थितीचं जर एका वाक्यात वर्णन कराचं झालं, तर अनियंत्रित आणि झुंडीचं राजकारण, मुक्‍त अ(न)र्थकारण व उन्मादी धर्मकारण असे करावं लागेल. धर्मकल्पनेचा जो आविष्कार आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत आहे, तो अत्यंत चिंताजनक आहे.

एका बाजूनं धर्माला आपण हृदयाऐवजी डोक्यात स्थान दिलं आहे. धर्म या अर्थानं लोकांच्या डोक्यामध्ये गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला धर्माला आपण आपली अस्मिता म्हणून पाहतो. अस्मितेवर हल्ला झाला, तर तो धर्मावरचा हल्ला हे म्हणताना आपण धर्माच्या नावाखाली अधिकाधिक शोषक आणि आक्रमक होत आहोत. दुसर्‍या बाजूला जागतिकीकरणानंतर बाजारपेठेचं जे महात्म्य वाढलेलं आहे, त्या बाजारपेठेच्या परिणामी धर्मकारणातही एक प्रचंड अर्थकारण शिरलेलं आहे. त्यामुळं धर्माचे जे सण, उत्सव असतात, त्यांचं गांभीर्य हरवलेले आहे आणि साध्या साध्या सणांचं उत्सवीकरण झालेलं आहे. धर्म ही गर्वानं मिरवायची बाब आहे, अस्मिता म्हणून जपायची बाब आहे आणि धोक्यात आला तर लोकांवर हल्ला करण्यासाठीचं हत्यार आहे, असं मानलं जाऊ लागलं आहे. या पद्धतीनं धर्म हा आज आपल्याला सातत्यानं आजूबाजूला वावरतांना दिसतो. त्याचबरोबर धर्मसंस्था ज्या लोकांच्या हातामध्ये आहेत, त्या लोकांच्या धर्मभावनेच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. मी धार्मिक आहे, म्हणजे काय आहे? मी धार्मिक आहे म्हणजे अंध धर्माभिमानी आहे, असा आज अर्थ रूढ झालेला आहे. धर्मात सांगितलेलं अध्यात्म असेल, सर्व जीवांच्या ठायी असलेली एकात्मता असेल, इतरांच्यासाठी असणारी सहिष्णुता असेल, या सर्व गोष्टी आज आपण विसरुन गेलो आहोत. माझा धर्म, तुमचा धर्म अशा पद्धतीनं आपण सतत विचार करताना दिसतो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव रस्त्यावर आणला आणि त्या निमित्तानं घरातले देव आणि धर्म रस्त्यावर आले. हा रस्त्यावर आलेला धर्म काही केल्या पुन्हा घरात जायला तयार नाही; कारण धर्माचा बडेजाव व वावर हा रस्त्यावर अत्यंत वाढलेला आहे, असं आपल्याला दिसतं.

धर्म आज जगभर संघर्षाचा विषय झालेला आहे. जगभर कोणत्या कोणत्या धर्मांमध्ये संघर्ष आहे, असं पाहिलं तर एका बाजूला इस्लाम-खिश्चॅनिटी यातला संघर्ष दिसतो. आपल्या समाजात पाहिलं तर धर्म हा अशा प्रकारे आक्रमक झालेला आहे की, आम्ही सांगतो, तोच धर्म आहे आणि तुम्ही तो न पाळलात, तर तुमच्याकडे वेगळ्या त-हेनं पहावं लागेल. या धर्माची चिकित्सा कराल, तर जीव गमवावा लागेल. [आणि गमावला आहे आपल्याकडे पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांनी] म्हणजे धर्माचं जे संस्थात्मक स्वरूप आज ज्या मंडळींच्या हातामध्ये गेलेलं आहे, त्या मंडळींमुळं धर्मभावनाच एका अंगाने धोक्यात आलेली आहे. सामान्य माणसाच्या ठायी असणारी भोळी धर्मश्रद्धा याचासुद्धा वापर हे धर्मसंस्थेचं जे आज ठेकेदार स्वत:ला म्हणवतात, त्यांनी केलेलं आहे. दुसर्‍या बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये ‘बहुसंख्यांकांचं राष्ट्र’’ ही संकल्पना जोर धरत असल्यामुळं बहुसंख्यांकांचा धर्म याला एक विलक्षण महत्त्व आलेलं आहे. धर्म आणि राष्ट्र यांची गल्लत एका बाजूला व्हायला लागलेली आपल्याला दिसते. त्यामुळं एका बाजूला राष्ट्रवादाचा उन्माद आहे, अनिर्बंध धर्मकारणाचा उन्माद आहे आणि याच्यातून तयार झालेल्या झुंडी आज आपल्याला सार्वजनिकदृष्ट्या नियंत्रित करायला पाहतात. असा हा सगळा परिस्थितीचा माहोल आहे.

या धर्माला मर्यादा घालण्याचे प्रयत्न झाले की नाही इतिहासामध्ये? भारताच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिला प्रयत्न केला, तो आपण घटना सेक्युलर राहील, असं ठरवून. म्हणजे शासनाला धर्म नसेल. पण त्याच्यामुळं धर्म घरात गेला का? तर नाही गेला. काही देशांनी धर्मावर बंदी घालण्याचा प्रयत्न करून पाहिला विशेषत: सोविएत युनियनमध्ये ७० वर्षे लोकांना चर्चमध्ये जायला मोकळीक नव्हती. पण सोविएत क्रांती जेव्हा फसली, तेव्हा पुन्हा लोकांच्या धर्मभावना तेवढ्याच उफाळून आल्या. लोक चर्चमध्ये, मशिदींमध्ये मोकळ्या मनानं जायला लागले. धर्माला मर्यादा घालता आली का? सार्वजनिक जीवनातून धर्म हद्दपार करता आला का? तर नाही करता आला. त्याचं एक कारण असं आहे की, माणसाच्या विकासक्रमामध्ये त्याच्या जन्मापासून दोन गोष्टी माणसाच्या बरोबर सतत राहिल्या आहेत. एक म्हणजे धर्म आणि दुसरी आहे नीती. या दोन गोष्टींशिवाय माणूस राहू शकत नाही. हा माणसाच्या उत्क्रांतीचा एक परिणाम किंवा दाखला म्हणून दाखवता येतो. त्यामुळे धर्म राहणार. तो राहणारच असेल सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात तो कसा राहायला पाहिजे? याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. म्हणून धर्मभावनेचं सतत नव्याने परिष्करण होण्याची गरज असते. धर्माचा पुन्हा पुन्हा बदलत्या काळात नव्याने विचार करायला हवा. त्यातील कुठल्या गोष्टी बाद झालेल्या आहेत, कुठल्या गोष्टी नव्या काळाला अनुरूप स्वीकारल्या पाहिजेत, याचं एक सतत परिष्करणात्मक आंदोलन चालवायची गरज असते. ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या देशात चालवलं गेलं नाही. उलट धर्म हा राजकारणाचं हत्यार म्हणून पाहिला गेल्यामुळं आज धर्म पाळणाऱ्या माणसांनासुद्धा जी आंतरिक शांतता हवी आहे, ती लाभत नाही. धर्मपालनाने मिळणारी शांतता आज माणसाच्या ठायी उत्पन्न होत नाही. धर्मपालन करत असल्यामुळं संघर्ष मिटले असंही दिसत नाही. म्हणून धर्माचा विचार कशा पद्धतीनं करायचा, धर्माकडे कसं पहायचं या गोष्टीला विलक्षण महत्त्व आलेलं आहे. धर्मवचनांचे अर्थ कोणी लावायचे? धर्मगुरुंनी लावायचे, मुल्ला-मौलवींनी लावायचे, शंकराचार्यांनी लावायचे का पोपने लावायचे? या प्रश्‍नाला पारंपरिक उत्तर धर्मगुरुंनी लावायचे असेच आजही मानले जाते.

या पार्श्वभूमीवर गांधींच्या धर्मविचारांचं वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं धर्माचा विचार केला आहे. इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला धर्मसंस्था लोकांना जाचक वाटली त्या त्या वेळेला धर्मसंस्थेविरुद्ध बंड झालेली आहेत. बुद्धांचं बंड आहे, महावीरांच बंड केलेलं आहे. बुद्ध आणि महावीर हे दोघे क्षत्रिय समाजातून आलेले घटक आहेत. त्यांनी त्या काळातील धर्माविरुद्ध बंड केलेलं आहे आणि हिंसेला अहिंसेने उत्तर दिलेलं आहे. तिसरा पंथ चार्वाकाचा होता. आम्हाला यातील काहीच मान्य नाही आहे, आम्ही स्वतंत्रपणे, स्वत:च्या बुद्धीनं जगू म्हणणारा. १९व्या शतकात आपल्याला असं दिसतं की, ब्रिटिश आल्यानंतर मिशनऱ्यांकडून भारतातील धर्मावर जे हल्ले झाले, म्हणजे हिंदू धर्मावर हल्ले झाले, त्यानं त्या काळातील इथले सुशिक्षित बुद्धिजीवी खडबडून जागे झाले. आपल्या धर्माचा बचाव कसा करता येईल, याचा विचार करायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा लक्षात हे आलं की, या धर्मामध्ये पुष्कळ दोष आहेत, रूढी आहेत, त्या टाकल्या पाहिजेत आणि धर्म नव्या जगाला सुसंवादी केला पाहिजे. म्हणून त्यातील काही मंडळींनी निरनिराळे प्रयोग केले उदाहरणपार्थ, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून एकेश्वरी धर्माची संकल्पना त्यांनी मांडली. धर्मामध्ये देवदेवतांचा जो बुजबुजाट झालेला आहे, त्याच्याऐवजी एकेश्वरी पद्धतीचा असणारा धर्म राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापन केला. तो पारंपरिक धर्मापेक्षा वेगळा होता. महाराष्ट्रामध्ये तसाच पुरस्कार न्यायमूर्ती रानडे व भांडारकर इत्यादींनी प्रार्थना समाजाच्या रूपाने केला. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ साली झाली. तिकडे बंगालमध्ये राममोहन, दुसऱ्या बाजूलामहाराष्ट्रात रानडे व भांडारकर आणि तिसऱ्या बाजूला १८७३ च्या आसपास म. जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सार्वजनिक सत्यधर्माचा आविष्कार केला. म्हणजे त्यांनी धर्माचं एक वेगळं रूप आपल्यापुढे ठेवलं आहे. नंतर त्याच्या आसपास दयानंदांचा आर्य समाज (१८७५) निर्माण झाला. हे चारही पंथ जे आहेत, ते हिंदू धर्मामधील सुरुवातीला नवा धर्मविचार घेऊन उभे राहिले. सगळे एकेश्वरी विचारांचे होते. दयानंदांचं वेगळेपण हे होतं की, त्यांनी वेद अपौरुषेय मानले, पण जातिभेद अमान्य केला व अस्पृश्यता वगेरे गोष्टींना फाटा दिला. आर्य समाजानं अनेक दलित समूहातील मुलांच्या व स्त्रियांच्या मुंजी लावल्या. इतकं क्रांतिकारी काम आर्य समाजानं एका टप्प्यावर केलं. पण वेदांचं अपौरुषेत्व सोडलं नाही. त्याच्यामुळं एका धारदार हिंदुपंथाची निर्मिती झाली, असं आपल्याला दिसतं. रानडे यांचा प्रार्थना समाज उत्तरोत्तर क्षीण होत गेला. आजही प्रार्थना समाजाच्या शाखा आहेत काही ठिकाणी, पण समाजजीवनावर त्याचा कुठलाही ठसा वा परिणाम दिसत नाही. तेच ब्राह्मो समाजाचं झालं. फुल्यांनी एकेश्वरी पद्धतीचा निर्मिकप्रधान असणारा सार्वजनिक सत्यधर्म उभा केला. त्याचे विधी तयार केले. ते सगळे आधुनिक पद्धतीचे होते. पण तोही धर्म काळाच्या ओघामध्ये पंथामध्ये रूपांतरीत झाला. त्याचाही आज फारसा कुठे बोलबाला दिसत नाही. सत्यशोधक पद्धतीने विवाह आज होतात पण तेही मोजकेच. हे सगळे प्रयत्न म्हणजे त्या त्या वेळचा धर्मविचार अमान्य आहे, जाचक आहे, असं ज्या निरनिराळ्या सामाजिक गटांना वाटलं होत. त्यांची बंडे होती. त्याची पुढे चाकोरी तयार झाली. म. बसवेश्वरांचं उदाहरण आहे लिंगायत धर्माचं. आज झगडा आहे, तो लिंगायत हा धर्म आहे की नाही, याबद्दल आणि लिंगायत समुदायाला असं वाटतं की, हा स्वतंत्र धर्म आहे व तो हिंदूंच्यापेक्षा वेगळा आहे, त्याला ती मान्यता मिळाली पाहिजे. त्यांनीही बंड केलं. आज लिंगायत हा एक पंथ तयार झाला आणि त्यांच्यामधील विवाह त्यांच्या त्यांच्यातच होतात. म्हणजे नवीन निर्माण झालेल्या धर्मांना, धर्मविचारांना, पंथांना आपापल्या समुदायांचे भेद ओलांडून सर्वाना कवेत घेता आला नाही.

सामन्यात: जसे दोन धर्मांमध्ये लग्न होत नाहीत तशी दोन पंथांमध्येही लग्ने होत नाहीत. आजही आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्नाचे विधी देशाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतात, पण तेही पुन्हा त्या त्या वर्तुळातच होतात. आपलं वर्तुळ ओलांडून जातीच्या, धर्माच्या पलीकडे विवाह झाला आहे, अशा प्रकारची मानवी समता या पंथांनासुद्धा प्रस्थापित करता आली नाही. त्याची चाकोरी तयार झाली. म्हणजे धर्माला मर्यादित करायचे प्रयत्न झाले, तो मर्यादित झाला नाही. त्याला घरात ठेवण्याचे प्रयत्न झाले, तर तो महाआरती असेल, रस्त्यावरची नमाज असेल या रूपाने रस्त्यावर आला. जी बंड झाली त्यातूनही चाकोऱ्या निर्माण झाल्या.

गांधी जेव्हा धर्मकल्पनेचा विचार करतात तेव्हा त्याच्या पाठीमागची ही सगळी पार्श्वभूमी त्यांनी विचारात घेतली आहे. मग गांधींनी कसं बघितलं धर्माकडं? गांधींनी पहिली गोष्ट अशी केली की, मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे, हा धर्म मला जन्माने लाभलेला आहे, तो मी त्याच्या गुणदोषांसकट मनापासून स्वीकारतो. गुणदोषांसह हे महत्त्वाचं आहे. त्याचा मी आदर करतो. त्यांनी जी भूमी मला दिली आहे उभं राहण्याची त्या रणभूमीमध्ये मी घट्ट उभा राहून या धर्माविषयी माझा विचार करणार आहे. ते त्या हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये घट्टपणे उभे आहेत. (धर्म नाकारून धर्माच्या बाहेर जाऊन ते धर्माविषयी विचार करत नाहीत. जसं काही अंशी आगरकरांनी केला, एम्‌.एन्‌. रॉय यांनी केला.) हे गांधीच पहिले वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट, हिंदू म्हणून माझ्या धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार मला आहे आणि त्यामुळे सर्वधर्मसमभावाचा अर्थ, सर्व धर्मातील चांगल्या बाबींचा स्वीकार करणं आणि वाईट बाबींचा त्याग करणं या व्यापक पातळीवर गांधीनी हा अर्थ लावलेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणूनच गीतेविषयी टिळकांनी लावलेला जो अर्थ आहे तो गांधींनी अमान्य केला आहे. टिळकांपुढे एक प्रश्‍न होता. धर्माला समाजाची धारणा करावी लागते. व्यक्तीलाही काही आचारधर्म घालून द्यावा लागतो. तिसऱ्या बाजूला समाज जीवनात जे संघर्ष निर्माण होतात त्या पेचांनाही उत्तर द्यावं लागतं. हे संघर्ष करताना माणसाच्या अंत:करणामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो किंबहुना होतोच. आज जसं आपण पाकिस्तान, चीन हा शब्द उच्चारला को आपल्या आत काय काय होतं ते आपणच तपासून बघा. हे जे घडतं याच्यात अंत:करणाची शुद्धी रहात नाही आणि मग जी प्रेरणा तुम्हाला मिळते त्यात शुद्ध बुद्धी, प्रेम यांचा अभाव असतो शत्रुभाव असतो. अर्जुनाला कृष्णाने काय सांगितलं की लढणं तुझं कर्तव्य आहे समोर तुझे भाऊबंद आहेत, पितामह आहेत पण तुला न्यायासाठी व धर्माच्या प्रस्थापनेसाठी लढावंच लागेल. न्याय आणि धर्माची प्रस्थापना लढूनच होणार होती का ? हा पहिला प्रश्‍न उपस्थित होतो. संवादाचे मार्ग संपले होते का? येथे गांधींचं वेगळेपण आहे. संवादाचा मार्ग कधीही संपत नाही यावर त्यांची श्रद्धा आहे. आपण माणसं आहोत म्हणूनच संवाद केला पाहिजे. लढाई हे माणसाचं कर्तृत्व नाही. शौर्य ही नाही. युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना आपण महत्त्व देतो. हे वीरत्व कोणत्या तरी जीवाची किंमत मोजून तयार झालेलं असतं म्हणून लढाईमध्ये त्यांची माणसं मेली तर मला आनंद होतो आणि माझी माणसं मेली तर त्यांना आनंद होतो. माणूस मेल्याचं दु:ख कोणालाच होत नाही. इथे गांधी सांगतात की आपल्याला लढाई का करायची आहे? जर सगळीच माणसं सारखी आहेत, त्यांना जीवमात्राचे सर्व अधिकार आहेत, तरत्यांना मारण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी? आपण आपल्या संकुचित कल्पनांनी उभं केलेलं जे जग आहे धर्माचं असेल, राष्ट्रांचं असेल, कल्पनांचं असेल त्याच्या संरक्षणासाठी इतर माणसांना मारणं म्हणजे लढाई आणि ती जेवढी जास्त माणसं मारेल त्या माणसाला वीर म्हणून गौरवणं ही कुठल्याही स्वरूपात मानवी गोष्ट नाही. ती मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे. म्हणून गांधींच्या वाड्.मय वीरत्वाच्या संकल्पनेचा गौरव नाही. नाइलाजाने युद्ध करावं लागलं आणि त्यात माणसं मेली तर त्याबद्दल गांधी नक्कीच दुःख व्यक्‍त करतील. रास्त सन्मानही करतील पण माणूस आणि मानवी संस्कृती म्हणून जर विचार केला तर वीरत्वाची गोष्ट ही मानवी संस्कृतीला शोभणारी नाही. कारण कोणाच्या तरी हत्येवर कोणाचं तरी वीरत्व अवलंबून असणं ही गोष्टच अयोग्य आहे. म्हणून गीतेकडे ते कसं पाहतात? टिळकांनी गीता कर्ममार्गी ठरवली कारण अर्जुनाला कृष्णाने सांगितले की कर्म केल्याशिवाय तुला पर्याय नाही. त्याच्या आधी शंकराचार्यांनी गीतेला संन्यासमार्गी ठरवली होती. संन्यास हा गीतेचा सर्वश्रेष्ठ आदेश आहे. टिळकांना शंकराचार्यांचं म्हणणं मान्य नाही. त्यांना स्वातंत्र्यलढा चालवायचा होता म्हणून प्रेरणा कर्मातून मिळत असेल तर कर्मयोगी गीता असं ते म्हणाले. मुळात शंकराचार्य जगच मिथ्या मानतात त्यामुळे गीता कर्मयोगी ठरली काय? संन्यासमार्गी ठरली काय? याला अर्थ उरत नाही. पण टिळक तसं म्हणत बसले नाहीत. त्यांनी गीतेला कर्ममार्गी ठरवली. गांधींनी त्या कर्मयोगाचा पुढे संघर्षामक आविष्कार सत्याग्रहाच्या व्दारा केला. कारण एकाच वेळेला लोकसंग्रह आणि अंत:करणाची शुद्धी आणि संघर्ष य तिनही गोष्टी अशक्य आहेत असं टिळकांचं म्हणणं होतं. टिळकांचं म्हणणं संघर्ष करताना साध्य व साधनांमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते आणि म्हणून चांगल्या कामासाठी कदाचित हिंसेचा वापर करावा लागतो. चांगल्या कामासाठी हिंसेचा वापर केल्यामुळे अंत:करणात दोष निर्माण होतात, मलिनता, येते पण ती ‘नेसेसरी इव्हिलच्या’ स्वरूपात आहे, ती अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. गांधींनी इथेच टिळकांशी नेमका मतभेद व्यक्‍त केला. गांधी म्हणाले असं काहीच नाही. लोकसंग्रही करता येतो, संघर्षही करता येतो फक्त संघर्ष करत असताना इकडचे आणि तिकडचे या ज्या कॅटॅगिरीज आहेत या काढून टाका. संघर्ष कशा विरुद्ध करायचा आहे? सुष्ट विरुद्ध दुष्ट. सुष्ट इकडेही आहेत तिकडेही आहेत. दुष्टते विरुद्ध संघर्ष करायचा असेल तर आमचे दुष्ट निराळे तुमचे दुष्ट निराळे याची गरज नाही. सगळ्या दुष्टांविरुद्ध संघर्ष उभा राहू शकतो आणि तो संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शत्रूभावी दृष्टिकोन सोडावा लागतो. संघर्ष म्हणजे शत्रू, शत्रू म्हणजे कोणाला तरी निश्‍चित करणं आणि शत्रूचा नायनाट करण्यासाठी तयारी करणं ही कल्पनाच गांधींनी बाजूला टाकून दिली. म्हणून ते समाजाचा शत्रूभावी पद्धतीनं विचारच करत नाहीत. पाक असेल, चीन असेल किंवा दुसरं एखादं राष्ट्र असेल ज्याच्याशी आपलं भांडण झालं त्या राष्ट्रामध्ये खूप लांब राहणारा एखादा नागरिक तुमचा काय म्हणून शत्रू असेल, मी त्याचा काय म्हणून शत्रू असेन? शत्रू होण्यासाठी लागणारा संबंधही आमच्यामध्ये निर्माण होत नाही. भारत-पाक किंवा भारत-चीन किंवा भारत आणि कुठलंही इतर राष्ट्र घ्या. या दोन नागरिकांच्यामध्ये भांडण का तर यांच्या राज्यकर्त्यांनी ठरवलय कि आपण शत्रू आहोत एकमेकांचे, लोकांनी ठरवलेलं नाही. माझा पाकिस्तानातील सर्वसामान्य माणसाशी काही संबंध नसतो. शत्रू निर्माण करण्यासाठी सुद्धा सहवास लागतो तोच नाही आहे मग शत्रुत्व का? म्हणून गांधींची कायमची लढाई एका राष्ट्राविरोधाची नाही, व्यवस्थेविरोधातील आहे. शत्रूकेंद्री व्यवस्था जी असते तिच्या विरुद्ध गांधी बोलतात, तिच्या विरुद्ध लढतात. ब्रिटिश साम्राज्याविरोधी लढले का तर साम्राज्यशाही वाईट आहे. तुम्ही दुसऱ्यावर राज्य करता. गांधी ब्रिटिश विरोधात लढले नाहीत. ब्रिटिश व्यवस्थेच्या विरोधात लढले हा फरक लक्षात घ्यायला हवा. म्हणून इंग्रजांना सुद्धा असा प्रश्‍न पडला को या गांधींचं काय करायचं. ब्रिटिश काळातील एक सुपरिटेडेंट ऑफ पुलिस होते ज्यांनी त्यांच्या कागदपत्रात नोंद करून ठेवली आहे को या गांधींचं काय करायचं हेच आम्हाला कळत नाही. का तर हा आमचा नाही म्हणावं तर तो आमच्यावर प्रेम करतो आणि आमचा आहे म्हणावं तर आमच्या विरुद्ध उभा राहतो. याच कारण ब्रिटिश माझे शत्रू नाहीत. तुमचं साम्राज्य आणि तुमची जी व्यवस्था आहे शोषण करणारी, गुलाम करणारी त्याच्या विरुद्ध माझी लढाई आहे. म्हणून हा पेच अशा अधिकाऱ्यांपुढे किंवा अनेकांपुढे त्या काळात निर्माण झालेला दिसतो.

हे गांधींच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण आहे. ते अतिशय निर्मळ होते. त्यांना आयुष्यात कधी कोणाची भीती वाटली नाही. सत्याचा शोध हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि त्यासाठी कितीही त्रास मी सोसायला तयार आहे. प्रसंगी जगाविरुद्ध मी एकटा राहीन. अशी ही त्यांची धारणा होती. गांधींनी स्वत:साठी जी मूल्यव्यवस्था तयार केलेली आहे ती त्यांनी स्वत:च्या आयुष्यामध्ये अत्यंत काटेकोरपणे आणि कठोरपणे अमलात आणली आहे. प्रसंगी कस्तुरबांना रात्री घराबाहेर काढायला निघाले होते अस्पृश्यतेच्या मुद्यावरून स्वत:च्या बहिणीला सेवाग्रामच्या आश्रमातून रात्रीत गाडीत बसून पाठवली कारण जर तुला हरिजनांच्या हातच अन्न खायचं नसेल तर आश्रमात राहता येणार नाही. व्यक्तिगत आयुष्यामध्ये मूल्यांचं वर्तन त्यांनी कठोरपणे केलेलं आहे. आपल्याला हे अशक्य आहे. सार्वजनिक जीवनात गांधी तडजोडीला तयार आहेत. मी जेवढे कठोरपणाने पुढे जायचा प्रयत्न करतो तेवढं कठोरपणे सामान्य माणसाला वागणं जमणार नाही हे मला समजतं म्हणून माझ्यामागे एक पाऊल चाललात तरी पुरेसं आहे, १०० पावलं नका चालू पण एक पाऊल तरी चाला हा त्यांचा आग्रह होता. म्हणजे सार्वजनिक जीवनात तडजोडीची तयारी आहे. मुद्दा न सोडता लोकांच्या कलाने घ्यायचं आणि व्यक्‍तिगत जीवनात कठोर मूल्याचरण हे त्याचं वैशिष्ट्य होत. आपल्या इथे उलट आहे. आपल्याला सार्वजनिक जीवन शुद्ध पाहिजे, व्यवितगत जीवन कितीही अशुद्ध असलं तरी चालेल. म्हणून गांधींच्या व्यक्तिमत्वाला जे एक वेगळं वलय आले आहे त्याचं कारणच त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यांच्यावरचे प्रभाव ही साधे नाहीत. विवेकानंदांकडून त्यांनी दरिद्रीनारायण हा शब्द घेतला आणि तो त्यांनी त्यांच्या वाड्मयात कायम वापरला. गांधींच्या संध्याकाळच्या प्रार्थना सर्व धर्मीयांच्या असत. हा सगळा रामकृष्ण परमहंसांचा परिणाम आहे. परमहंस हे सर्व धर्मांच्या साधनांचा वापर करून ईश्वराचा शोध करणारे योगी होते. ते नमाज सुद्धा पढले आहेत. हा परिणाम रामकृष्ण परमहंसांचा आहे. गांधींच्या सर्वधर्मसमभाव, सर्व धर्म समानत्व जे आहे ते यातून आले आहे. राजचंद्र जैन,गांधीना जैन वाड्मयातील ज्या सगळ्या अडचणी आणि शंका होत्या त्यांचं निरसन त्यांच्याकडून त्यांनी करून घेतलेले आहे. लिओन टॉलस्टॉय आहेत. त्यांच्या नावाने त्यांनी फार्म काढला होता टॉलस्टॉय फार्म म्हणून. प्रत्येकाला श्रम करूनच जगावे लागेल ही त्यात भूमिका होती. सर्वांना समान मजूरी मिळेल हा नियम होता. ४-५ हजार पगार असलेली नोकरी सोडून गांधी त्या आश्रमात राहिले. जेवढं इतरांना मिळेल तेवढंच मी घेईन याच्यापेक्षा कोणालाही जास्त मिळणार नाही आणि कष्ट केल्याशिवाय कोणाला जेवणही मिळणार नाही ही त्या टॉलस्टॉय फार्मची रूपरेषा होती. रस्किनचं ‘अन टू द लास्ट’ वाचून गांधींना सर्वोदयाची संकल्पना सुचली.इंग्लडमध्ये बॅरिस्टरचा अभ्यासक्रमाला गांधी जेव्हा गेले होते तेव्हा अनेक खिश्चन संप्रदायांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. तिथे त्यांनी अनेकांशी धर्मविषयक चर्चा केलेल्या आहेत. शाकाहार-मांसाहार पासून अनेक गोष्टींवर चर्चा केल्या आहेत. त्या सगळ्याचं सार गांधींच्या धर्मविषयक चिंतनात किंवा कल्पनांमध्ये आपल्याला दिसतं. याच्यातून त्यांना काय साधलं? पहिली गोष्ट त्यांनी शत्रूभावी दृष्टिकोन सोडून दिला. निर्भयपणा स्वीकारला. जगातील कुठलीही शक्‍ती जर सत्य माझ्या बाजूला असेल तर मला अडवू शकत नाही. मग जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल “एकला चलो रे’ ची भूमिका घेऊन मी उभा आहे.

दांडीयात्रा करायची की नाही, मीठ उचलून काय होणार हा प्रश्‍न मोतीलाल नेहरूंना पडला होता. गांधींनी एकच सांगितलं की ‘कर के देखो’. बघता बघता मिठाचं प्रतीक राष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडलं गेलं. देशातील सर्वसामान्य माणूस स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला गेला. ही किमया गांधींच्या पूर्वी कोणत्याही नेत्याला जमली नाही. साधा चरखा जो त्यांनी सुरू केला. त्या चरख्यावरून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाल्याच्या नोंदी आहेत. त्या रोजगाराचे लाभार्थी त्या काळातील दलित समुदायातील माणसं आहेत. चरखा नुसत प्रतिक न राहता रोजगाराचं प्रतीक झालं आणि स्वावलंबन आणि रोजगार करणारा माणूस कोणाचाही अंकित नसल्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायला मोकळा झाला. बाकीच्यांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या गांधींच्या आदेशावरून. गांधीच्या शब्दाला देशाच्या सदसदविवेकबुद्धीचं स्वरूप प्राप्त झालं. हे सगळं कशातून येतं, तर तुमचं मन निर्भय पाहिजे, निष्पक्ष व निर्वैर पाहिजे, सत्याच्या शोधाची तुमची सतत तयारी असली पाहिजे. म्हणून सत्याग्रहाच्या आधारे जर संघर्ष केला तर अंत:करण मलीन व्हायचं कारण नाही. साध्य-साधनांची सुसंगती राहते कारण सत्याग्रहाचं अधिष्ठान प्रेम आहे द्वेष नाही. माझा मुद्दा पटवण्यासाठी मी दुसऱ्याला शारीरिक इजा करणार नाही त्याऐवजी मी स्वतःला आत्मक्लेश करून घेईन. उपोषण काय होतं? स्वत:चे क्लेश आहेत. उपोषणाचा निर्णय ते कसा घ्यायचे हे गांधींनी लिहिलं आहे. रात्री विचार करत असताना, ईश्वरचिंतन करत असताना एकदम एक प्रकाश दिसला आणि म्हणाले उपास कर. किती काळ ते तुझं तू ठरव. दुसर्‍या दिवशी २१ दिवसांचा उपवास सुरू झाला. गांधींचा उपवास सुरू झाला की सरकारी यंत्रणेची घाई उडायची कारण टिळकांचा कालखंड आणि गांधींच्या कालखंडामध्ये गुणात्मक फरक झाला होता. टिळक जोपर्यंत नेते होते स्वातंत्र्य आंदोलनाचे तोपर्यंत टिळक सरकार काय करतं हे बघायचे आणि आपली रणनीती आखायचे, प्रतियोगी सहकारिता. तुम्ही चांगले वागा आम्ही चांगले वागू पण सरकार काय करतं हे आधी बघणार. गांधींच्या काळात उलट झालं. सरकारचं लक्ष गांधी काय करतात इकडेच जास्त. सगळ्यात त्रासदायक माणूस ब्रिटिश साम्राज्याला कोण होता तर गांधी. बाकी जे हिंदुत्ववादी मित्र आहेत सावरकरांपासून सगळे यांची कधीही इंग्रजांना भीती वाटली नाही. ते इंग्रजांविरुद्ध काही करणार नाही याची त्यांना खात्री होती. गांधींबद्दल कोणतीच खात्री नाही. गांधींचं वेगळेपण काय, तर मी जे काही करेन ते जाहीरपणे करेन, सांगून करेन, होणारे परिणाम भोगेन. रॅम्से मॅक्डोनाल्डनी जेव्हा अॅवार्ड दिलं (गोलमेज परिषद १९३२). तेव्हा त्या संदर्भात त्या दिवशी गांधींनी पत्र लिहिलं आहे को मला हे अॅवार्ड मान्य नाही, मी एक महिना तुम्हाला देतो. महिन्यात जर दुरुस्त झालं नाही तर मी उपोषणाला बसेन. एक महिन्याने उपोषणाला सुरुवात केली. ही पारदर्शकता जगण्यात, बोलण्यात, वागण्यात, राजकारणात, निर्णयात सगळीकडे. मी करेन ते सांगून करेन व परिणाम भोगायला तयार आहे, मी सत्याग्रह केला मी जामीन मागणार नाही. आपण बघतो आपले आजचे सत्याग्रही अटकपूर्व जामीन घेतात. मी केलं तर मी भोगेन ही हिंमत नाही, ती गांधींकडे होती. मी सत्याग्रह केला मला शिक्षा द्या, मी वकीलही देणार नाही आणि जामीनही देणार नाही. शिक्षा मी भोगणार मी कायदा तोडला आहे कायद्याने असेल ती शिक्षा द्या. शिक्षा मी भोगणार आहे पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा कायदा तोडणार. मला अन्याय कायदा मान्य नाही ही शेवटपर्यंत भूमिका त्यांनी घेतली. माझा कोणी शत्रू नाही त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही त्यामुळे मी कोणाविरुद्ध द्वेषाने उभा राहणार नाही, माझ्या मनात सर्वांच्याबद्दल प्रेम आहे त्यामुळे चुका, दोष सांगताना मी सत्याग्रहाचा वापर करीन हे सगळं त्यांच्या धर्मकल्पनेमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. म्हणून समाजाभिमुख अध्यात्माची निर्मिती गांधी परंपरेत झाली. तोपर्यंतचं सगळं अध्यात्म हे गूढ व गुहेत बसलेलं, हे सगळं आवरण गांधींनी काढून टाकलं. अध्यात्म एका अर्थानं मोकळं केलं. धर्मकल्पना खुली केली. तुमचा धर्म त्याचा अर्थ तुम्ही लावायला पाहिजे, हि मोकळीक त्यातून मिळाली.

नंतर गांधींनी समाजसुधारणेकडे कटाक्ष टाकला. त्यावेळी त्यांची धर्माकडे बघण्याची जी भूमिका होती त्या भूमिकेतच गांधींची समाजसुधारणेची बीजं दिसतात. गांधी ‘स्पिरिट ऑफ द रिलिजन इज डिफरन्ट अँण्ड टेक्स्ट ऑफ रिलिजन इज डिफरन्ट’ असे मानतात. स्पिरिट का महत्वाचं आहे तर ईश्वराने सर्व धर्म निर्माण केलेले आहेत. ते शुद्ध स्वरूपातील आहेत. त्या आज्ञा माणसाने धर्मग्रंथात लिहिल्या आहेत. माणसं अपूर्ण असतात म्हणून त्या आज्ञा सदोष असू शकतात. म्हणून ईश्वराच्या कृपेला पात्र व्हायचं असेल, ईश्वराच्या शुद्ध धर्माच्या दिशेने जायचं असेल तर या धर्मग्रंथात असलेले जे हीण आहे, जे अशुद्ध आहे ते काळाप्रमाणे काढून टाकलं पाहिजे. हे काढून टाकण्याचा निकष त्यांनी सांगितला की जे माझ्या बुद्धीला पटणार नाही, जे काळाच्या कसोटीवर टिकणार नाही आणि जे विज्ञानाच्या चौकटीत बसणार नाही ते मी काढून टाकेन. हे हीण का काढायचं तर ईश्‍वरी प्रेरणेशी माझं जगणं सुसंगत करायचं आहे. ईश्‍वरी प्रेणेशी जगणं सुसंगत करणं म्हणजे काय तर मी अधिकाधिक चांगलं वर्तन करणे, अधिकाधिक मानवतेच्या जवळ जाणे आणि त्याचा सगळा परिणाम समाजात पसरत जाणे हे गांधींच्या दृष्टीनं ईश्‍वरी प्रेरणेशी सुसंगत होणं होत. आणि म्हणून मग धर्मग्रंथामध्ये ज्या इतर बाबी आहेत अन्यायाच्या, विषमतेच्या त्या सदोष माणसांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्या काढून टाकायला पाहिजे. म्हणून स्पिरिट ऑफ द रिलिजन कायम असतं टेक्स्ट ऑफ द रिलिजन तुम्हाला वारंवार बदलावं लागतं. म्हणून अस्पृश्यता मान्य नाही, जातिभेद मान्य नाही. ही जी शुद्धी आहे टेक्स्टची ही करणं म्हणजे मानवी समाजामध्ये सुधारणा करणं. समाजसुधारणेचं बीज या वेगळेपणात त्यांनी पाहिली. लोकांना प्रश्‍न पडायचा की ईश्वर कसा मानावा आपण? भारतामध्ये ईश्वर सगुणही मानला जातो आणि निर्गुणही मानला जातो. सगुणसाकार एक रूप आहे ईश्‍वराचं, मूर्तीपूजा आहे, कर्मकांड आहे. दुसर्‍या बाजूला निराकार आहे. फुल्यांचा निर्मिक असेल तसाच गांधींचा ईश्वर आहे. फुले असं म्हणाले की निर्मिकानं एक पृथ्वी निर्माण केली आणि ती आपल्या ताब्यात दिली. त्याचं काम संपलं आणि आता आपलं काम सुरू झालं. त्याने दिलेली पृथ्वी विश्वस्त वृत्तीने सांभाळायची हे आपलं काम. ती सांभाळतांना समतेची दृष्टी ठेवायची, कोणावर अन्याय करायचा नाही आणि सगळ्या चराचर विश्वाची काळजी घ्यायची म्हणजे प्राण्यांचं विश्व आणि माणसांचं विश्‍व. मानव व मानवेतर प्राण्यासाठी फुल्यांचं विश्‍व समान आहे. म्हणून पशुबळी नकोत, नवस नकोत. हे विश्‍व त्याने निर्माण केलेलं असं सांभाळायचं की पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडलं पाहिजे. तीच भूमिका गांधींची आहे.

गांधी असं म्हणाले को ज्यांना मूर्तीपूजा मान्य आहे ती त्यांनी करावी पण मला स्वत:ला निराकारात रस आहे आणि निराकार ईश्वर मी मानतो. निराकार ईश्वर मी मानतो आणि तो ईश्वर सत्य आहे. ईश्वर सत्य आहे नंतर ते म्हणाले सत्य ईश्‍वर आहे. मग सत्य हाच ईश्वर आहे आणि सत्याशिवाय काहीच नाही. त्यामुळे सत्याची आराधना करणं, उपासना करणं, सत्याच्या जवळ जाणं म्हणजे ईश्‍वराच्या जवळ जाणं आहे. एक वेगळं अध्यात्म गांधींनी सत्याभोवती उभं केलेलं आहे. सगळं गूढ काढून टाकलं आहे. गांधींच्या धर्मकारणामध्ये सुद्धा आणि समाजकारणामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या हयातीमध्ये एकही मंदिर बांधलं नाही, एकही चर्च उभं केलं नाही किंवा मशिदही उभी केली नाही किंवा पाडलीही नाही. सायंकाळच्या सर्वधर्मीय प्रार्थना ज्या गांधी करायचे त्या खुल्या मैदानात असायच्या. ईश्वराला तेवढं पुरे आहे. भक्तीचा सोपा मार्ग संतांनी सांगितला होता तोच गांधींनी पुढे नेला. नामस्मरण करा. गांधींच्या मुखात सदैव रामनाम असायचं. वेगळी भक्‍ती करण्यासाठी मला मंदिरात जायची गरज नाही. मला मंदिर, चर्च वगैरेची गरज नाही कारण देव आणि मी यांच्यामध्ये थेट संबंध असू शकतो. नामस्मरण मला पुरेसं आहे. मंदिर, चर्च, मशिदी ही गांधींनी भ्रष्टाचाराची केंद्रं म्हणून पाहिली आहेत. घाणीची केंद्र आहेत सगळी हे काशी विश्वनाथाच देऊळ पाहिल्यावर त्याचं मत झाल. तेथे फक्त पाप करणं आणि भक्तीचा आणि धर्माचा व्यापार होतो. त्यांनी विश्वनाथाच्या देवळात गेले असताना कनवटीला असलेला एक पैसा देवापुढे टाकला. तो पैसा पुजाऱ्याने उचलला आणि तो इतक्या घृणास्पद रीतीने बाहेर टाकला की पुन्हा गांधी त्या देवळात गेले नाहीत. गांधींच्या आश्रमात त्यांनी नियम केला होता ज्या देवळांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते, जिथे अस्पृश्यांना प्रवेश नाही तिथे माझ्या आश्रमातील माणूस जाणार नाही. हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला. महादेवभाई देसाई व कस्तुरबा यांच्याकडून तो चुकून तोडला गेला तेव्हा महादेवभाईंना हे गांधींनी ऐकवलं तोतिथे तू. सत्याग्रह करून मेला असतास तर मला जास्त आनंद झाला असता. तू परत का आलास इकडे. इतकं ते बोलले त्यावेळेला. विनोबा भावे आणि त्यांचे भाऊ बाळकोबा भावे साबरमती आश्रमात होते तेव्हा पायखाने साफ करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. बाळकोबांनी ते मागून घेतलं होतं कारण तिथे जो दलित माणूस होता पायखाना साफ करणारा त्याला जड जायला लागलं म्हणून विनोबा म्हणाले आम्ही करतो. तू स्वयंपाकाचं काम कर. दलित माणूस स्वयंपाकाच्या कामाला गेल्याबरोबर गांधींच्या बहिणीनी अन्न खाण्यास नकार दिला. गांधी म्हणाले तू जाऊ शकतेस. सुरुवातीच्या काळात वर्णाश्रम धर्माला गांधींची मान्यता होती तेव्हा सुद्धा त्यांची ही भूमिका होती को माझा वर्णाश्रम धर्म मला दलितांबरोबर सहभोजनाला परावृत्त करत नाही. लक्ष्मी नावाची मुलगी त्यांच्याकडे होती दलित समाजातील, ती त्यांच्याबरोबर कायम होती.

पुढे मग गांधींनी वर्ण आणि कर्म यांचा संबंध सोडला. वर्णव्यवस्था याचा अर्थ कर्माची जर विभागणी असेल तर कोणी कोणतं कर्म करावं हे कोणी कोणत्या वर्णात जन्माला आलं यावर अवलंबून नाही. गांधींच्या धर्मकल्पनेची व्याती कशी कळत नकळत सामाजिक होते हे यातून दिसते. त्यांचे जे अनुयायी आहेत त्याच्यामध्ये अप्पासाहेब पटवर्धन होते, कोकणातला गांधी ज्यांना म्हणतात ते तुरुंगात असताना त्यांनी जेलरला अशी मागणी केली की मला संडास साफ करायचं काम द्या. जेलर सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेच्या प्रभावाखाली होता. तो म्हणाला अहो तुम्ही ब्राह्मण आहात तुम्हाला मी हे काम देणार नाही. ते म्हणाले मी उपोषण करीन. मी मागतो आहे तुम्हाला हे काम. शेवटी द्यावं लागलं ते काम. कोकणस्थ ब्राह्मण जो वर्णव्यवस्थेमध्ये उच्चस्थानी आहे तो भंगीकाम करतो. वर्णाशी जोडलेला जो अहंकार होता तो गांधींनी मोडलेला आहे. नागपूरमध्ये मेलेली गुरं सोलण्याचं काम फक्त दलितांनीच का करायचं? १००-१५० ब्राह्मण मंडळी तयार झाली त्या कामात पुढे. (आजही आमचे मित्र विजय दिवाण म्हणून आहेत वाईला त्यांचे वडील विनोबांबरोबर होते. विजय आणि जयंत दोघंही आज सर्वोदयाच्या कामात कार्यकर्ते आहेत. विजय अजूनही मेलेली गुरं व्यवस्थित सोडवतो) कर्माचा आणि वर्णाचा काहीच संबंध नाही. वर्णव्यवस्था वर्णानुसार कर्म द्यायची ती कर्मानुसार वर्ण ठरवा अशी गांधींची भूमिका होती. जातिव्यवस्थेबद्दल सुद्धा हीच भूमिका होती. उत्पादक जाती राहतील कारण तो व्यवसाय आहे. उत्पादक जाती म्हणजे तेली, कुंभार हे खऱ्या अर्थानं व्यवसाय आहेत. व्यवसायाच्या जाती झाल्या आंबेडकर म्हणतात तसंच. हे व्यवसाय राहतील, ही कौशल्य राहतील त्यांना श्रम केल्याशिवाय जगता येणार नाही. सगळ्यात वरचा ब्राह्मण त्याला कष्टाचं काम दिलंच पाहिजे. हे जे त्यांच्या मनामध्ये होतं ही धर्मकल्पनेची व्याप्ती कुठे गेली तर वर्णव्यवस्था मोडण्यापर्यंत गेली, जातिव्यवस्था उलटी पालटी करण्यापर्यंत गेली आणि सगळ्या सवर्ण समाजाला अस्पृश्यता हे तुमचं पाप आहे ते तुम्ही निस्तरलं पाहिजे, तुम्ही ती घालवली पाहिजे, म्हणून त्यांच्या विवेकाला टोचणी लावणं जे असतं ते काम गांधींच्या धर्मकल्पनेने आयुष्यभर केलं. त्याही वेळेला सनातनी लोक होते. ते म्हणत वर्णव्यवस्था काय, अस्पृश्यता ही ईश्वरनिर्मित आहे, ती धर्मशास्त्रात आहे. गांधी म्हणाले की पडताळून पाहू आपण धर्मशास्त्र. म्हणून येरवड्याच्या तुरुंगात त्यांनी वाईचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, त्यांचं गुरू नारायणशास्त्री मराठे, (स्वामी केवलानंद सरस्वती) या दोघांना निमंत्रण दिलं चर्चेला येण्यासाठी. त्यांच्याबरोबर भगवान दास, के.एल्‌. दप्तरी ही सगळी मंडळी होती आणि सनातनी ब्राह्मणांचा एक गट होता शास्त्रार्थाला या. त्या गटातील काही लोकांनी आधी भेटून गांधींना धमकी दिली होती को असलं काही करत असाल तर तुमच्या जीवाला धोका आहे. गांधी म्हणाले बघू, तुम्ही चर्चेला तर या. चर्चेला आल्यानंतर त्यावेळी एक पद्धती होती समयबंधाची. त्याचा खर्डा सनातनी मंडळींनी दिला या लोकांना. शास्त्रीबुवांनी आणि केवलानंदांनी त्याच्यात बदल केला. अस्पृश्यतेला मान्यता आहे की नाही हा प्रश्‍न होता चर्चेसाठी. यांनी काय केलं त्याच्यात आज ज्यांना अस्पृश्य म्हणतात त्याला धर्मशास्त्रात मान्यता आहे की नाही? हा प्रश्न तयार केला. हे म्हटल्याबरोबर सनातनी पक्ष चर्चा करायला नाहीच म्हणाला व ते निघून गेले. तर्कतीर्थ व इतरांचं म्हणण होत की आज फक्त चांडाळ हेच अस्पृश्य असू शकतात. शूद्र वर्णव्यवस्थेत आहेत. वर्णाचा अधिकार त्यांनाही आहे. याच्या पलीकडे जो चांडाळ आहे पंचम वर्णीय त्याला अस्पृश्य मानलं जातं तुमच्याकडून. चांडाळाची निर्मिती उच्चवर्णीय स्त्री व शूद्रवर्णीय पुरुष यांच्या संयोगातून होते. मग आजच्या चांडाळांना अस्पृश्य ठरवायचं असेल तर, ते उच्चवर्णीय स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेले आहेत, शूद्रांच्या पोटी जन्माला आले म्हणजे शूद्र बाप आहे त्यांचा, उच्चवर्णीय स्रिया या त्यांच्या माता आहेततर तुम्ही उच्चवर्णीय स्त्रियांना अस्पृश्य ठरवणार का? हा पेच लक्षात आल्यावर सनातनी बाहेर निघून गेले. मग शास्त्रीजी असं म्हणाले की कुठेही अस्पृश्यतेला याला आधार नाही. त्या काळात सेवा करणाऱ्या ज्या अस्पृश्य जाती होत्या त्या सगळ्या यांना अस्पृश्य म्हणून अभिप्रेत होत्या. त्यांची सेवा तशीच चालू राहिली पाहिजे आपल्यासाठी पण त्यांना गावाबाहेर ठेवलं पाहिजे आणि त्यांना हे अधिकार देता कामा नये. ही भूमिका गांधींनी धर्मशास्त्राची चर्चा करणारी जी मंडळी होती त्यांच्या साह्याने उधळून लावली. पुढे ते असं म्हणाले की समजा जरी धर्मशास्त्राने अस्पृश्यतेला मान्यता दिली तरी सुद्धा आय वील गो विदाऊट दॅट. मला धर्मशास्त्राची गरज नाही कारण मानवता, माणुसकी, मनुष्यत्व हे माझ्यासाठी पहिल्यांदा आहे बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. इतकी कणखर भूमिका त्यानी त्यांच्या धर्मकल्पनेमध्ये सामावून घेतली होती. म्हणन दिसायला धर्मकल्पना व्यक्‍तिगत दिसते पण गांधींनी तिची व्याप्ती वाढवत सामाजिक केली. दुसरं, गांधींचं एक वैशिष्ट होते. भारतीय धर्मकल्पनांमध्ये व्रतांना महत्त्व आहे. कठोर व्रत आहेत. त्या कठोर व्रताचा संबंध गांधींनी तुमच्या आत्मक्लेशाच्या क्षमतेशी जोडलेला आहे. कुठून येते आत्मबळ? स्त्रियांना या कठोर व्रतांची सवय आहे. ८-८ दिवस निर्जली राहतात बायका नवरात्रात, आता धान्य-फराळाची कल्पना आली पण पूर्वी नव्हती. निर्जली ‘एकादशा होत्या. कितीही उपाशी राहण्याची तयारी होती माणसांची. त्यातून तुमचे आत्मबळ व आत्मक्लेशाची व्याप्ती वाढते. त्या आत्मक्लेशाचा वापर गांधींनी सत्याग्रहाच्या तंत्रात केलेला आहे. भारतीयांना व्रत माहीत आहेत. पण माहीत नसणाऱ्या अजून दोन गोष्टी आहेत श्रम आणि सेवा. सेवा हे भारतीय धर्मकल्पनेमध्ये नाही. सेवा ही गांधींची भर आहे भारतीय ब्रतव्यवस्थेत. व्रतामध्ये नुसती व्रत नव्हे तर जोडीला श्रम आणि सेवा ही दोन व्रते त्यांनी अधिक सांगितली. त्यांनी मग एकादश व्रताची मांडणी केली आहे. ब्रह्मचर्य, अस्तेय, असंग्रह वगैर अकरा व्रत आहेत ती पर्यायी समाजरचनेचा आराखडा होऊ शकतात. त्या सगळ्यात प्राथमिक मूल्य आहे ते संयमाचं आहे. नरहर कुरुंदकर नेहमी असं म्हणायचे को गांधींचं अर्थकारण मला मान्य नाही, पण उन्मत्त राजसत्तेला लगाम घालण्यासाठी आणि उपभोगप्रधान समाजामध्ये भोगाला लगाम लावण्यासाठी संयमाची गरज असते त्या संयमाचा प्रतिनिधी म्हणून मी गांधींकडे पाहतो. ही कुरुंदकरांची मांडणी योग्य होती. गांधी हा संयमाचा प्रतिनिधी म्हणून पाहिला गेला आहे. खांडेकरांच्या ययाती कादंबरीतील ययाती सुद्धा पारंपरिक ययाती नाही तो गांधीसारखा संयमाचा प्रतिनिधी म्हणून खांडेकरांनी उभा केला आहे, असे कुरुंदकरानी प्रतिपादन केले आहे.

म्हणून त्या एकादश व्रतामध्ये सेवा नावाची गोष्ट गांधींनी जोडली आणि धर्माला सेवेचं रूप द्यावं लागेल ही भूमिका घेतली. खिश्चनांच्या पोपला पाच महारोग्यांचे पाय धुवावेच लागतात, हे आपल्याला माहिती आहे. आपल्या शंकराचार्यांनी कधीही कुणाचे पाय धुतले नाहीत. उलट सगळ्यांनी त्यांचे पाय सारखे धुवायचे. पूर्वीचे शंकराचार्य हिंडायचे. आद्य शंकराचार्यांनी सबंध देशाचं भ्रमण करून चार ठिकाणी मठ स्थापन केले. सांस्कृतिकदृष्ट्या असं म्हणतात की, देश जोडला त्यांनी संस्कृतीच्या अंगानं. पुढच्या शंकराचार्यांच्या पिढ्यांनी काहीच केलं नाही. म्हणून इथे सेवेला किंमत नाही आणि ती सेवा गांधी म्हणतात,तशी त्यांनी सांगितली नाही नुसती, तर परचुरेशास्त्रींना (महारोग झालेल्या माणसाला) आपल्या कुटीत आणून ठेवले आणि काँग्रेस कमिटीच्या बैठका चालू असतानासुद्धा त्यांची वेळ झाली की, गांधी रोग्याच्या जखमा धुवून यायचे,पट्टया करायचे. कुष्टरोग्याची सेवा करणं त्या कामाला पुढे प्रतिष्ठा आली. आमट्यांसारख्या सबंध कुटुंबाने या कामाला वाहून घेतलं. त्याची बीजं गांधींच्या या भूमिकेमध्ये आहेत. किती तरी माणसांना किती तरी क्षेत्रामध्ये गांधींच्या विचारांनी चालना दिलेली आहे. लॉरी बेकरचे उदाहरण ही असेच. जगातला मोठा वास्तुशिल्प शास्त्रज्ञ मानला जातो. भारतात आला होता, गांधींना भेटला. गांधींनी विचारलं इंग्लंडला जाऊन काय करणार? तिथे जाऊन घरं वगैरे बांधणार मी आर्किटेक्ट आहे. गांधी म्हणाले मी कोणाला आर्किटेक्ट म्हणतात ते सांगतो. ते म्हणाले माझ्या मनात असा आर्किटेक्ट आहे को जो जगातील कानाकोपऱ्यातून साहित्य आणणार नाही. जो पन्नास कि.मी.च्या परिघातील साहित्यावर उत्तम आणि हवेशीर घर बांधून देईल तो माझ्यासाठी उत्तम आर्किटेक्ट आहे. बेकरने ऐकलं, इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकली आणि केरळला येऊन स्थाईक झाला आणि लॉरी बेकरने जी घरं बांधली आहेत केरळमध्ये व अन्यत्र ती त्या त्या ५० कि.मी.मध्ये मिळणाऱ्या विटांवर उभी केलेली घरं आहेत. हवेशीर, प्रशस्त व पर्यावरणाच्या दृष्टीनं पूरक आहेत. लॉरी बेकरचं संपूर्ण आयुष्य आर्किटेक्ट म्हणून भारतात गेलं (भारतातल्या उत्तमातील उत्तम इमारती लॉरी बेकरने बांधल्या) गांधींच्या एका वाक्यामुळे किती परिणाम होऊ शकतो याच हे उदाहरण आहे. गांधी या माणसाच्या आत जी नैतिकता ठासून भरली आहे तिचा हा परिणाम आहे. अनेक वकिलांनी, डॉक्टरांनी व्यवसाय सोडले, नोकऱ्या सोडल्या. गांधींच्या एका आदेशानुसार झालेली ही कामं आहेत. एवढी नैतिकता बाळगणारा हा माणूस होता म्हणून त्यांची धर्मकल्पना सुद्धा तेवढीच नैतिक व व्यापक झाल्याची आपल्याला दिसते.

धर्माच्या अंगाने गांधी आणि आंबेडकर असा जर आपण विचार केला, तर या हिंदू धर्माने आमच्यावर अन्याय केला, अत्याचार केले, माणूस म्हणून आम्हाला जगू दिलं नाही, आमच्यापेक्षा प्राणी या धर्माने श्रेष्ठ ठरवले, कुत्रा चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊ शकतो, पण अस्पृश्य माणूस जाऊन पाणी पिऊ शकत नाही, अशा सगळ्या घटना मांडून आंबेडकरांनी म्हणून मी हा धर्म सोडणार आहे, मी या धर्मात मरणार नाही,असं ते म्हणाले. त्यांनी धर्मांतर केलं. पण पारंपरिक बुद्ध धर्म स्वीकारला नाही. नवबुद्ध धम्म स्वीकारला. धर्माचा नवा ‘चेहरा’ उभा केला. २२ प्रतिज्ञा आखून आणि त्या सगळ्या २२ प्रतिज्ञा म्हणजे (त्यांच्या धर्मसंकल्पनेचा आधार) ‘सिव्हिल सोसायटी’ या आधार असल्याचं निदर्शक होतं. नागरी जीवनात धम्म म्हणजे नीती. नीतीने वागणारा माणूस, घटनेनं वागणारा माणूस असं आंबेडकरांना अभिप्रेत होतं. त्यामुळे या धर्माचा त्याग करून या मार्गाने त्यांनी ‘सिव्हिल सोसायटी’शी धम्म जोडला. हिंदू धर्माचा त्याग न करता त्या धर्माच्या रणांगणातच राहून, त्या धर्मालाच वळण देऊन, त्या धर्मातूनच नव्या व्रतांचं निर्माण करून ‘सिव्हिल सोसायटी’कडे गांधी या मार्गाने गेले. मार्ग दोन आहेत, वेगळे आहेत पण एकाच ठिकाणी येतात, हे महत्त्वाचं. म्हणून गांधी व आंबेडकर यांची पूरकता बघावी लागते. या ठिकाणी गांधी काय म्हणाले, तिथे आंबेडकर काय म्हणाले, या गोष्टी व्यर्थ होतात आणि दोघंही आपल्या भूमिका घेऊन समान असणा-या ‘सिव्हिल सोसायटी’मध्ये येऊन आपापल्या भूमिका विसर्जित करतात.म्हणूनच गांधीची धर्मकल्पना प्रागतिक, काळाभिमुख होती हे मान्य करायला हवे.

लेखक हे सातारास्थित राजकीय आणि सामाजिक विश्लेषक आहेत.

Write A Comment