२८ सप्टेंबर १९०७ हा भगतसिंगांचा जन्मदिवस. अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांचे स्मरण त्यांच्या जन्माला ११० वर्षे होत असतानाही केले जाते, याचे कारण भगतसिंग क्रांतिकारक आंदोलनाचे नेते होते आणि त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी अतुलनीय धैर्याने स्वतःला फासावर चढविले, इतकेच नसून ते अंतर्दृष्टी असलेले विचारक होते. आपल्या कुशाग्र बुद्धीने, वैज्ञानिक दृष्टीकोनाने, सखोल अध्ययनाने त्यांना त्यांच्या काळातील एक विचारवंत बनविले. त्यांनी केवळ ब्रिटिशांना येथून घालविण्याचेच नाही, तर भारतीय समाजाच्या परिवर्तनाचे स्वप्न पहिले. त्यासाठी त्यांनी जे विचार मांडले, ते विचार आजही प्रासंगिक आहेत. म्हणूनच त्यांचे स्मरण आजही केले जाते.
भगतसिंग मार्क्सवादी विचारसरणी मानणारे एक क्रांतिकारक नेते होते. मार्क्सवादी विचारसरणीने ‘जगातल्या साऱ्या कामगारांनी एक व्हावे’ अशी घोषणा दिली. मार्क्सवादाची ओळख एक राष्ट्रवादी विचारसरणी म्हणून नाही, उलट मार्क्सवादाने राष्ट्रवादाला शोषक वर्गाचे मुख्य हत्यार मानले आहे. भारतीय राष्ट्राच्या निर्माणासाठी संघर्ष करत आपल्या जीवनाचे बलिदान करणाऱ्या नेत्यांमध्ये भगतसिंग अग्रणी होते. हा संघर्ष राष्ट्रीयतेच्या भावनेशिवाय होऊच शकत नव्हता. या अर्थाने ते राष्ट्रवादी होते; पण त्यांचा राष्ट्रवाद मुस्लिम लीग वा हिंदुमहासभेसारखा सांप्रदायिक नव्हता. ते धर्मनिरपेक्षतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचे देशप्रेम या देशाच्या पवित्र नद्या आणि तीर्थस्थळांपुरते वा ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यापुरते मर्यादित नव्हते; तर या देशातील सर्वसामान्यांना शोषणमुक्त करण्यासाठी, मनुष्याचे मनुष्याकडून आणि राष्ट्रांचे राष्ट्रांकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी होते. त्यांचा राष्ट्रवाद म्हणजे आंधळे देशप्रेम नव्हते. राष्ट्रवादी असण्याबरोबरच ते आंतरराष्ट्रवादीही होते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना त्यांना मान्य होती; पण त्याचा अर्थ ‘साऱ्या विश्वाची समानता’ याखेरीज दुसरा कोणताही नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते.
भगतसिंगांच्या देशप्रेमाचा अर्थ बलिदान होता, त्याग होता. असे कोणत्याही त्यागास तत्पर असलेले देशप्रेम भगतसिंगांना तरुणांमध्ये निर्माण करायचे होते. चीन व पाकिस्तानबरोबरचे सीमेवरचे अघोषित युद्ध, दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या समस्यांशी सामना करायला अशा त्यागी देशप्रेमी तरुणांची आजही तितकीच गरज आहे, जितकी ती १९३०च्या दशकात होती. देशप्रेमाची मर्यादा केवळ अन्यधर्मीय समुदायांचा द्वेष यापुरती मर्यादित केली असताना भगतसिंगांचे या बाबतीतील विचार आजही प्रासंगिक आहेत.
तेव्हाही भारतीय समाज बहुधर्मी होता आणि आजही तो बहुधर्मी आहे. अशा समाजामध्ये जर विभिन्न धर्मांमध्ये सौहार्द नसेल तर समाजात शांती निर्माण होणे दुरापास्त होईल. भगतसिंग धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करताना दिसतात आणि ही धर्मनिरपेक्षता आमच्या संविधानात व्यक्त झाली आहे. शासनात धर्माचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही, परंतु प्रत्येक नागरिकाला त्याच्या पसंतीच्या धर्माचे आचरण, प्रसार वा प्रचार करता येईल वा कोणताच धर्म न पाळण्याचे स्वातंत्र्य नागरिकास असेल, असे आमचे संविधान म्हणते.
भगतसिंगांनी धर्मनिरपेक्षतेचे स्वागत केले असले तरी, ते पुढे धर्महीनतेचा पुरस्कार करताना दिसतात. ते अध्यात्मवादी नव्हते; एक नास्तिक होते. ते धर्माच्या विरुद्ध होते. धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करूनही आज समाजाचे विघटन करणारे राजकारण जोराने सामोरे आणले जात आहे. धर्माच्या नावे, गाईच्या नावे गोरखधंदे उघडले गेले आहेत. वास्तविक प्रश्नांपासूनच्या विन्मुखतेसाठी धार्मिक प्रवचनांचे डोस पाजले आहेत. धर्मनिरपेक्षतेचा संविधानात समावेश होऊन सुमारे ७० वर्षे उलटली असताना आजही धार्मिक उन्माद फैलावून समाजस्वास्थ्य बिघडवता येत असेल, तर भगतसिंगांचा धर्महीनतेचा अर्थातच धर्मांना नाकारण्याचा विचार आजच्या तरुणांना प्रेरक होऊ शकेल.
अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था या समस्या भारताच्या विशेष समस्या आहेत. याबाबतीत धर्म परिवर्तन हा उपाय अनेकदा सुचविला गेला आहे, आजामावलेलाही आहे. हिंदू समाज अल्पसंख्य बनेल या भीतीने तरी जातीव्यवस्था संपेल, असा विचार तेव्हा केला गेला आणि आताही केला जातो. एक विचारवंत म्हणून ही सारी प्रक्रिया भगतसिंग पाहात होते. अस्पृश्यांच्या धर्मांतराकडे असहिष्णूपणे पाहणाऱ्यांसाठी आपल्या ‘अस्पृश्यतेची समस्या’ या लेखात ते लिहितात, “जर तुम्ही यांना पशुंपेक्षाही हीन समजाल तर ते जेथे त्यांना अधिक अधिकार मिळतील, जेथे त्यांना माणूस म्हणून वागविले जाईल, अशा दुसऱ्या धर्मात जाणारच. नंतर, बघा ख्रिश्चन आणि मुसलमान हिंदू धर्माचे नुकसान करत आहेत, असे म्हणणे व्यर्थ आहे.” तथापि, विभिन्न धर्माचे लोक संख्यावृद्धीसाठी त्यांना आपल्या धर्मात सामील करून घेतात, ही गोष्ट भगतसिंगांना पसंत नव्हती. या समस्येचे निवारण कसे करावे, याविषयी ते लिहितात, “नौजवान भारत सभा आणि नौजवान काँग्रेस यांनी जी पद्धत अवलंबिली आहे, ती फारच चांगली आहे. ज्यांना आजवर अस्पृश्य म्हटले गेले, त्यांची या पापासाठी क्षमायाचना केली, तसेच त्यांना आपल्यासारखेच मानव समजून त्यांच्यावर अभिमंत्रित पाणी न शिंपडता, वा कलम न वाचता त्यांना आपल्यात सामील करून घेऊन त्यांच्या हाताने पाणी प्याले, ही उत्तम गोष्ट आहे आणि आपसांत चढाओढ करणे, व्यवहारात प्रत्यक्ष कोणते हक्क न देणे, या गोष्टी बरोबर नाहीत.” धर्मांतरानंतरही जातीव्यवस्था संपलेली नाही. कारण शेवटी अन्यधर्मीय लोकांनीही आपली जात बरोबर ठेवलेली आहे. म्हणूनच भगतसिंगांचा या बाबतीतील विचारही प्रासंगिक आहे.
जातीय दंगली, अंधश्रद्धा, शोषण, पत्रकारिता, साहित्य, धर्म, ईश्वर, नास्तिकता, तरुण स्त्री-पुरुषांतील प्रेम अशा जीवनाच्या साऱ्याच अंगांवर भगतसिंगांचे मूलभूत चिंतन होते. या बाबतीतील त्यांचे विचार तरुणांना स्फूर्ती देतील आणि त्यांना देशकार्यास प्रवृत्त करतील.
भगतसिंग लिहितात, “जर आपण आपल्या जीवनात पैशांना सर्वात जास्त महत्त्व देत असाल, जर आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष ती व्यक्ती दुसऱ्या धर्माची आहे म्हणून करत असाल आणि जर आपण भारताच्या भूत आणि वर्तमानकाळाकडे टीकात्मक दृष्टीने पाहण्यास तयार नसाल, तर आपण कुणी दुसरा आदर्श शोधा. मी तुमच्यासाठी नाही.”
आदर्शांची वानवा निर्माण झालेल्या या काळात भारतीय तरुणांना देशकार्यासाठी आदर्श आणि प्रेरणांची आवश्यकता आहे, तो आदर्श आणि प्रेरणा भगत सिंगांच्या विचारांतून मिळेल.
भगतसिंगांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या तरुणांची आजही आवश्यकता आहे.