fbpx
OTT कला

अरब जगातील स्त्रियांचे प्रश्न: तीन देशातील तीन सिनेमा

अरब जगातील स्त्रियांचे प्रमुख प्रश्न आपल्याला दिसतात ते त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध, बुरख्यामधील वावर आणि पतीला चार लग्न करण्याची परवानगी, अगदी चार विवाह नाही केले पण दुसरं लग्न केलं तरीही त्रास आहे. हा आपला दृष्टिकोन झाला, परंतु त्या स्त्रियांना त्याविषयी काय वाटतं, तिथल्या लोकांना त्याविषयी काय वाटतं हे जाणून घेणं आवश्यक आहे. अरब जगातील या प्रश्नांवर तीन देशातील तीन सिनेमा बघायला मिळाले. या सिनेमांचा परिचय करून घेऊ, त्या अनुषंगाने थोडी माहिती मिळवू आणि याकडे बघू.

वजदा: सौदी अरेबियाचा प्रसन्न सिनेमा
वजदा: सौदी अरेबियाचा प्रसन्न सिनेमा

वजदा: सौदी अरेबियाचा प्रसन्न सिनेमा

पहिला सिनेमा आहे, वजदा Wadjda हा सौदी अरेबियाचा २०१२चा सिनेमा. सौदी अरेबिया हा अतिशय कर्मठ देश म्हणून माहिती आहे, त्यामुळे तिथे सिनेमा दाखवायला परवानगी आहे का इथपासून सुरुवात होते, मग तिथे फिल्म इंडस्ट्री आहे का हा पुढचा प्रश्न येतो आणि या सिनेमाची माहिती वाचली तर कळतं, हैफा अल-मन्सूर Haifaa al-Mansour ही एक सौदी अरेबियन स्त्री या सिनेमाची दिग्दर्शक आहे, त्यामुळे तर धक्काच बसतो. सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचं काही पुरस्कारांसाठी नामांकनही झालं होतं. दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला पुरस्कारही मिळाला, इतरही काही पुरस्कार मिळाले.

सिनेमात वजदा ही सौदी अरेबियातील रियाध ह्या मोठ्या शहरात राहणारी दहा वर्षाची शाळेत शिकणारी मुलगी आहे. मुलगी चुणचुणीत आहे, हुशार आहे आणि त्याचबरोबर धूर्तही आहे. ती आणि तिची आई या दोघीच राहत आहेत, वडील वेगळे राहत असले तरी येऊन जाऊन असतात. वजदाची आई दुसरं मुल देऊ शकत नाही आणि वंश चालवण्यासाठी मुलगा तर हवाच म्हणून तिचा नवरा दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. वजदाच्या आईचा बेत आहे एक सुंदर लाल रंगाचा ड्रेस विकत घ्यायचा, तिने तो बघून ठेवलेला आहे, त्याची ट्रायल घेतलेली आहे आणि तो घालून दिराच्या लग्नात जायचं म्हणजे नवऱ्याला दुसऱ्या कोणा स्त्रीकडे पाहण्याची इच्छाच होणार नाही. ती त्या ड्रेसमध्ये खरोखर सुंदर दिसते. हा कथानकाचा एक भाग आहे. कथानकाचा फोकस आहे तो वजदावर. ती एका फक्त मुलींसाठी असलेल्या शाळेत शिकत आहे. शाळेच्या रस्त्यावर अब्दुल्ला हा एक तिच्याच वयाचा एक सवंगडी तिला भेटत असतो. त्याच्याकडे एक सायकल आहे, त्याच्यामुळे वजदालाही आता सायकल हवी आहे. सायकलची किंमत ८०० रियाल आणि मुलींनी सायकल चालवणे मंजूर नाही. मुलींनी सायकल चालवली तर त्यांना मुलं होणार नाहीत अशीही धास्ती दाखवली जाते. पण वजदा तर सायकल घ्यायचीच असा निश्चय करून बसलेली आहे. ती त्याकरता ब्रेसलेट तयार करून ते विक, कोणाचे निरोप पोचव असं करून पैसे जमा करते आहे. या छोट्या मुलीला काय बंडखोर म्हणणार? पण थोडंसं परंपरेच्याविरुद्ध ती वागत असते. डोकं झाकणार नाही, पायात स्पोर्ट्स शूज घालणार. ती धार्मिक नाही पण कुराणासंबंधीच्या एका स्पर्धेत भाग घेऊन ८०० रियाल पारितोषिक मिळवायचं यासाठी तिची मेहनत सुरू आहे.

ही स्पर्धा जिंकते का, तिला पैसे मिळतात का, ती सायकल घेऊ शकते का हे सिनेमात आहे, त्याचबरोबर वजदाच्या आईचा प्रश्नही आहे. शेवटी एक ट्विस्ट आहे आणि प्रसन्न करणारा शेवट आहे. मायलेकींचे मधूर संबंध दिसतात. मुलीला समोर ठेवलं आहे, पण आईच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

मुलगाच हवा हा अट्टाहास इथे दिसतो, त्यासाठी नवरा दुसरे लग्न करतो ते दिसतं. स्त्रियांवर किती निर्बंध आहेत ते कळतं, दोन मुली शाळेच्या पटांगणात बसून आहेत पण गच्चीवरुन एक पुरुष त्याला बघू शकतो म्हणून त्यांना आत पिटाळण्यात येतं. इतक्या बंदोबस्तातूनही प्रेमप्रकरण जुळवणारी एखादी बहाद्दर जोडी दिसते. त्यात किती धोका आहे, पुढे त्यांचं काय होतं माहीत नाही. स्त्रिया आणि पुरूष एकत्र येत नाहीत, पण स्त्रिया नोकरी करतात. पुरुष पारंपरिक वेषात दिसतात. स्त्रिया बाहेर बुरखा घालतात, डोकं झाकणं तर अगदी आवश्यक, पण घरी शर्ट-पॅन्टवर दिसतात.

तरुण-तरुणी बागेत एकत्र दिसले, एखादं टोळकं येतं, त्यांना मरहाण करतं किंवा त्यांचा अपमान करतं, विशेषतः व्हॅलेंटाईन डेला हे प्रकार होतात, बेंगलोरला पबमधून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना मारहाण करण्यात आली हे आपल्याकडचे प्रकार. हे काही सरकारने नेमलेले लोक नसतात, जुन्या विचारांचे हे टोळके असते, ते कायदा हातात घेतात, याला मॉरल पोलिसिंग असे म्हणतात. सौदी अरेबियात तर सरकारनेच नेमलेले असे मॉरल पोलिस आहेत त्यांना मुतावा (Mutawa) म्हणतात आणि ते काटेकोरपणे स्त्री-पुरुष यातील अंतर, स्त्रियांनी पूर्ण डोकं झाकलं आहे की नाही यावर लक्ष ठेवून असतात व लगेच हरकत घेतात. वजदा सिनेमात या मुतावांचा दोनदा ओझरता उल्लेख आहे. त्यातून त्यांचा धाक दिसतो.

सौदी अरेबियात १९८०च्या आधी असे निर्बंध नव्हते, मोकळे वातावरण होते, स्त्री-पुरुष एकत्र येत, मुलींचा शाळेचा युनिफॉर्म स्कर्ट ब्लाउज असा होता, सांस्कृतिक कार्यक्रम, आर्ट गॅलरी होत्या. अशा कार्यक्रमांना लोक एकत्र जमायचे. परंतु हा देश इस्लामच्या नियमांचे पुरेसे पालन करत नाही, तो पुरेसा इस्लामिक नाही याला विरोध म्हणून तिथे एक फार मोठी दहशतवादी घटना घडली, शिवाय त्याच सुमारास इराणमध्येही क्रांती झाली होती व कर्मठ सरकार तिथे आले होते, त्याचाही परिणाम झाला. प्रतिक्रीया म्हणून सौदी अरेबियाच्या सरकारने तिथे हे कठोर इस्लामी कायदे लागू केले, उलेमांना सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान दिले. तिथून ते कुठपर्यंत आले बघायला मिळते. स्त्रियांची काय स्थिती झाली ते दिसते.

बायसिकल थीफचा या वजदा सिनेमाशी खरेतर काही संबंध नाही, परंतु लहान मुलगी, तिची आई आणि बायसिकल असल्यामुळे आणि त्या मुलीच्या अवखळपणामुळे त्या सिनेमाची आठवण होते.

सिनेमाची दिग्दर्शक हैफा अल-मन्सूर हिने लघुपट बनवण्यापासून सुरुवात केली त्यात तिला पुरस्कार मिळाले, नंतर माहितीपट बनवले. वूमन विदाऊट शॅडो हा तिचा अरब देशातील स्त्रियांच्या आयुष्यावरचा माहितीपट आहे. वजदा हा सिनेमा तिने संपूर्णपणे सौदी अरेबियात चित्रीत केला, यातील सर्व कलाकारही सौदी अरेबियाचेच आहेत. त्यांच्या कामात नवखेपणा अजिबात नाही, चांगले काम केलेले आहे. हा एका स्त्रीने दिग्दर्शित केलेला सौदी अरेबियातील पहिलाच सिनेमा, इतकेच नाही तर संपूर्णपणे सौदी अरेबियात चित्रीकरण केलेली ही पहिलीच फिचर फिल्म. हा बनवण्यासाठी तिला पाच वर्षे लागली. सौदी अरेबियात स्त्री आणि पुरुष एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळे एका बंद व्हॅनमध्ये बसून, मॉनिटरवर बघून, वॉकीटॉकीवरून कलाकार आणि तंत्रज्ञांना सूचना देऊन तिने याचं दिग्दर्शन केलं.

हैफा अल-मन्सूर एका संपन्न घरातील. तिच्या वडिलांना बारा मुलं, त्यातील ही आठवी. वडिलांना सिनेमा बघण्याची हौस होती, ते सिनेमाच्या व्हिडिओ कॅसेट घेऊन यायचे आणि सगळे कुटुंब सिनेमा बघायचे. लोक नावं ठेवायचे, पण त्यांनी पर्वा केली नाही. त्यातून तिला सिनेमाची आवड निर्माण झाली. पुढे तिचे इजिप्तमधील कैरो येथील अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण झाले आणि फिल्म स्टडीजमधील मास्टरची डिग्री तर तिने ऑस्ट्रेलियामधून घेतली. तिचे आई-वडील, मुख्यत: वडिलांचे प्रोत्साहन होते म्हणून हे शक्य झाले. तिने दिग्दर्शित केलेले आणखीही काही सिनेमा आहेत.

सौदी अरेबियात जन्मलेल्या, वाढलेल्या सौदी अरेबियन स्त्रीने केलेला हा सिनेमा, त्यामुळे कोणी परकी व्यक्ती तिच्या उपर्‍या दृष्टीकोनातून बघत आहे असे म्हणता येणार नाही. तिनेही मारझोड, क्रूरपणा, हिंसा दाखवलेली नाही पण बोचणार्‍या गोष्टी बरोबर दाखवलेल्या आहेत.

सौदी अरेबियातील फिल्म इंडस्ट्री याविषयी थोडक्यात; वर म्हटल्याप्रमाणे कर्मठ, सनातनी लोकांच्या विरोधामुळे १९८० नंतर अनेक निर्बंध तिथे आले. त्यात १९८३ पासून तिथे सिनेमावर बंदी आली होती, ती थेट २०१८ पर्यंत होती. त्यादरम्यान फक्त एकच थिएटर होते. लोक सॅटेलाईट, व्हिडिओ यावर सिनेमा बघण्याची हौस भागवायचे. २०१८नंतर हळुहळू आता तिथे थिएटर सुरू होत आहेत. चित्रपट निर्मितीसुद्धा होत आहे. तिथले सरकारही त्याकरता उत्तेजन देत आहे.

वजदा Wadjda सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे, अवश्य बघावा, गोड सिनेमा आहे.

सँड स्टॉर्म: २०१६चा इस्रायलचा सिनेमा आहे
सँड स्टॉर्म: २०१६चा इस्रायलचा सिनेमा आहे

सँड स्टॉर्म: केवळ नि:शब्दतेतूनही अंगावर येणारी हिंसा

दुसरा सिनेमा आहे सँड स्टॉर्म Sand storm. हा २०१६चा इस्रायलचा सिनेमा आहे. इस्रायल म्हटल्यावर तिथे सगळे ज्यू आहेत असा विचार मनात येतो, तिथे अरब कुठून आले हा प्रश्न पडतो. पण इस्रायलमध्ये एकूण लोकसंख्येपैकी साधारण ७४% लोक ज्यू आहेत, २०% अरब आहेत आणि साधारणपणे ५-६ % इतर धर्माचे लोक आहेत. तिथे एका भागात बेदाऊं Bedouin ह्या अरब जमातीचे लोक राहतात. साधारणपणे मेंढ्या पाळणे वगैरे त्यांचा व्यवसाय असतो आणि ती भटकी जमात पण समजली जाते. त्यातील एका कुटुंबाची कहाणी सिनेमात आहे. वजदा सिनेमासारखेच यातही मायलेकींची कहाणी आहे, पण यातील मुलगी तरुण आहे. सिनेमा सुरू होतो तसं दिसतं गावाबाहेर सुलेमान हे मध्यमवयीन वडील आपल्या लैला नावाच्या तरुण मुलीला छोटा ट्रक चालवायला शिकवत आहेत. गावात शिरताना मात्र ते स्टिअरिंग स्वतःकडे घेतात. ते घरी पोचतात तेव्हा आपल्याला कळतं हे वडील सुलेमान यांच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि ती करावी लागते आहे त्याची पहिली बायको जलीला हिलाच. कारण सांगितलं नाही तरी ते स्पष्ट आहे, जलीलाला एकापाठोपाठ एक चार मुली झालेल्या आहेत आणि वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवाच, त्यासाठी हे दुसरे लग्न. जलीलाला हे मान्य नसलं किंवा तिचा राग असला तरी ते सगळं बाजूला ठेवून तिला यासाठी राबावं लागत आहे. लैलाही तिला मदत करत आहे. लग्नात नाचगाणी होतात तेव्हा दिसतं, पुरुष वेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करत आहेत तर स्त्रिया वेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करत आहेत. सुलेमानची दुसरी बायको तरुण आहे. वधूने पांढरा रंग चेहऱ्यावर थापायचा अशी प्रथा तिथे दिसते. याच वेळेस लैलाच्या मोबाईलवर एक फोन येतो. तिची आई तो उचलते आणि तिला कळतं अन्वर नावाच्या मुलाबरोबर लैलाचं प्रेमप्रकरण सुरू आहे. लैला कॉलेजमध्ये जात असते. इस्रायलमधील कॉलेज असल्यामुळे ते मुलं-मुली दोघांसाठीचं कॉलेज आहे. हा अन्वर तिच्याबरोबरचा कॉलेजमधला मुलगा आहे, देखणा आहे. जलीला त्याला सांगते पुन्हा फोन करू नकोस, लैलालाही ताकीद देते. पण अन्वर आणि लैला यांना वाटतं आपण प्रेम आहे सांगितलं तर आई-वडील मान्यता देतील. परंतु अन्वर दुसर्‍या जमातीचा. हे लग्न संबंध मंजूर नाहीत. सुलेमान त्याला अजिबात मान्यता देत नाही. उलट गावपंचायत भरवून लैलाचं लग्न एका माणसाबरोबर ठरवतो. त्याच वेळेला जलीला म्हणते अन्वरबरोबर लग्न नको पण निदान एक चांगला मुलगा तरी मुलीसाठी बघ. ती दोन शब्द जरा जास्त बोलते, त्याच्यावरून सुलेमानला राग येतो आणि तो तिला घरातून बाहेर काढतो, म्हणजे बायकोला सोडून देतो. जलीलाचे वडील येऊन तिला घेऊन जातात. आता तिच्या भविष्याचा प्रश्न. शिवाय मुली सुलेमानकडे राहणार म्हणजे त्याची जबाबदारी कोणावर की दुसर्‍या तरुण बायकोला त्यांना सांभाळावे लागणार? लैला पळून जाण्याचा विचार करते, पण ऐनवेळी माघार घेते. वडिलांनी ठरवलेलं लग्न करणं याशिवाय तिच्याकडे पर्याय नाही. शेवटी तीसुद्धा पांढरा रंग तोंडाला थापून बसलेली आहे. याही सिनेमात बघितलं तर नवऱ्याने दुसरे लग्न करणे आहे शिवाय तरुण मुलीची कशी मुस्कटदाबी होत आहे तेही दिसतं. सुलेमानची दुसरी बायको आणि लैला यांची भेट होते तेव्हा ती दुसरी बायको म्हणते तू चांगलं शिक्षण घे नाहीतर तुझ्याही वाट्याला माझ्यासारखी अवस्था येईल. लैला तिला उद्धटपणे म्हणते तुझं काय बिघडलं आहे? पण यातून त्या दुसऱ्या बायकोचं दुःख लक्षात येतं, तिला तिच्या मनाविरुद्ध एका मध्यमवयीन माणसाशी लग्न करावं लागलेलं आहे. एकूणच पितृसत्ताक पद्धतीत स्त्रियांना जे भोगावं लागतं त्याविषयी हा सिनेमा आहे.

मारझोड, हिंसा, शाब्दिक अत्याचार असं काहीही दाखवण्याची गरज नाही केवळ नि:शब्दतेतूनही अंगावर येणारी हिंसा यात दिसते. सिनमाने प्रभावी परिणाम साधण्यासाठी शेवटी कोणाचे मरणही आवश्यक नाही हेही दिसते. सुन्न करणारा सिनेमा आहे. जलीलाचं काम रुबा ब्लाल हिने केलेलं आहे. तिने कमाल काम केलेलं आहे.

एलाईट झेक्सर- Elite Zexer ही सिनेमाची दिग्दर्शक. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. ती ज्यू. तिने बेदाऊं Bedouin ह्या अरब जमातीच्या संस्कृतीचा, त्यांच्या चालीरितींचा काही वर्षं अभ्यास करून हा सिनेमा काढलेला आहे. २०१६च्या सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये याला ग्रँड ज्युरी प्राईस मिळालं, इतरही काही पुरस्कार मिळाले. नेटफ्लिक्सवर आहे.

६७८: इजिप्तचा स्फोटक सिनेमा
६७८: इजिप्तचा स्फोटक सिनेमा

६७८: इजिप्तचा स्फोटक सिनेमा

तिसरा सिनेमा आहे, ६७८ हा इजिप्तचा २०१०चा सिनेमा. सिनेमाचा परिचय करून घेण्याआधी थोडी इजिप्तची माहिती. इजिप्तला जगाच्या संस्कृतीचा पाळणा म्हटले जायचे, तिथे सिव्हिलायझेशनचा उदय झाला. इजिप्तमध्ये बहुसंख्य लोक अरब आहेत. सिनेमातून दिसतं त्याप्रमाणे येथील संपन्नवर्गातील पुरुष सुट-कोट-टाय घातलेले असतात. संपन्नवर्गातील स्त्रियाही आधुनिक वेष परिधान करतात. उच्च आर्थिक वर्गातील लग्न ठरलेली स्त्री भावी नवऱ्याबरोबर बाहेर फिरू शकते, जे इतरांना शक्य नाही. निम्न आर्थिक स्तरातील स्त्रिया मात्र पारंपरिक वेषात दिसतात डोकं झाकणं त्यांना आवश्यक असतं. स्त्रिया ऑफिसातही काम करताना दिसतात.

इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना सेक्शुअल हरासमेंट – लैंगिक छळ सहन करावा लागतो त्याविषयीचा हा सिनेमा आहे. तीन स्त्रियांच्या कहाणीमधून त्यांनी हा विषय आपल्यासमोर आणलेला आहे. पहिली फायजा ही निम्नस्तरातील स्त्री आहे. ती महानगरपालिकेत नोकरीला आहे. कामाच्या ठिकाणी तिला जाणं-येणं करावं लागतं तेव्हा टॅक्सीतून जातानाही तिला त्रास सहन करावा लागतो. शिवाय रोज टॅक्सीने जाण्याइतकी तिची ऐपतही नाही. बसमध्ये तर तिला खूपच त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये खूप गर्दी, उभ्याने प्रवास करावा लागणार आणि मागून येऊन कोणी पुरुष वाईट हेतूने चिकटणार. त्याला काही बोललं तर उलटं तोच आवाज करणार, इतकी गर्दी आहे, मी काय करू? रस्त्यावरून जातानाही कोणी पुरुष मागे लागणार, जवळ येणार आणि त्रास देणार.

दुसरी सेबा ही संपन्न घरातील विवाहित स्त्री आहे. तिचा नवरा डॉक्टर आहे. ते फुटबॉलची मॅच बघायला जातात. तिथे प्रचंड गर्दी आहे. इजिप्तने मॅच जिंकल्याचा लोकांना उन्माद चढलेला आहे. स्टेडियमच्या बाहेर पडताना तिची नवऱ्यापासून ताटातूट होते आणि मग एकटी स्त्री बघून पुरुषांचा जमाव तिला घेरतो आणि बलात्कार सोडून सर्व प्रकारचे गैरप्रकार करतो. तिला ते सहन करावं लागतं. तिचा नवराही यानंतर घरात येत नाही आणि तिचे फोनही घेत नाही. तिला तिच्यावरच्या अत्याचाराची पोलिसात तक्रार करायची आहे, परंतु तिची आई म्हणते यामुळे तिच्या वडिलांची ही इभ्रत जाईल.

नेल्ली ही तिसरी ती स्त्री आहे. ती मध्यमवर्गातील आहे. नेल्ली ही स्टँड अप कॉमेडीयन आहे आणि ती कॉल सेंटरमध्येही काम करते. तिचा वाग्दत्त वर ओमर हाही स्टँड अप कॉमेडीयन आहे. कॉल सेंटरमध्ये काम करताना नेल्लीला ग्राहकांशी फोनवर बोलावं लागतं, तेव्हा ते लगट करायला बघतात, कुठे राहतेस घराचा पत्ता दे म्हणतात. एकदा ती काम संपवून घरी जात आहे तर घराजवळच एका छोट्या ट्रकचा ड्रायव्हर खिडकीतून हात बाहेर काढून तिला उचलतो, तिच्या शरीरावर हात फिरवतो आणि तिला ट्रकबरोबर फरफटवत नेतो. मात्र ती त्याही परिस्थितीत त्याचा सामना करते आणि इतरांच्या मदतीने त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. पोलीस म्हणतो मी फक्त हल्ला आणि मारहाण याची तक्रार नोंदवून घेईन. सेक्शुअल हरासमेंटची नाही. तो म्हणतो ती तक्रार तुम्हाला नोंदवायची असेल तर तुम्हीच आरोपीला घेऊन वरच्या पोलीस स्टेशनमध्ये जा. नेल्ली टीव्हीवर आपली बाजू मांडते तेव्हा काही स्त्रिया तिला पाठिंबा देतात तर काही पुरुष तिलाच दोष देतात, तू उत्तजित करणारे कपडे घातले असतील म्हणतात. शिवाय इजिप्तमध्ये सेक्शुअल हरासमेंट हा प्रकारच नाही म्हणतात. हा इजिप्तला बदनाम करण्याच्या कारस्थानचा भाग आहे असंही एकदा तिला ऐकावं लागतं.

सेबाला जे भोगावं लागलेलं असतं, त्यामुळे ती याबाबत स्त्रियांना जागरूक करण्यासाठी पुढाकार घेते. ती म्हणते स्त्रियांनी लैंगिक छळ सहन केला नाही पाहिजे. अशा छळ करणाऱ्या पुरुषांचा प्रतिकार केला पाहिजे, त्याकरता जुडो कराटे यायला पाहिजे असं नाही तर मानसिक कणखरपणा हवा. तुम्ही जी केसात पिन लावतात, त्याचाही वापर करून धडा शिकवा. ती हे टीव्हीवरही सांगते. क्लासेसही घेते. पण तिथे येणार्‍या स्त्रियांपैकी कोणीही लैंगिक छळ झाला हेच मान्य करत नाही.

सिनेमा खूप चांगला आहे आणि समस्या नेमकेपणाने पोचलेली आहे. या तीनही कथानकांचा नंतर छान मेळ घातलेला आहे. मोहम्मद दियाब हे या सिनेमाचे लेखक व दिग्दर्शक आहेत.

सेक्शुअल हरासमेंट – लैंगिक छळ याबाबत शिक्षा झालेली ही पहिलीच केस असं सिनेमातून कळतं. त्यामुळे समस्येचा आणखी शोध घेतला तर कळालं २००८मध्ये अशा केसमध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली, याचं कारण अशा केसेस स्त्रिया दाखल करत नव्हत्या किंवा त्या दाखल करायला गेल्या तरी पोलिस दाखल करून घेत नव्हते. त्यामुळे देशाची बदनामी होते असा सूर होता. मास सेक्शुअल हरासमेंट – जमावाने मिळून स्त्रीचा लैंगिक छळ करणे अशा केसेसमध्ये २०११पासून वाढ झाली असं कळतं. स्त्री निदर्शकांवर तर हमखास एक हत्यार म्हणून त्याचा वापर केला जातो असंही कळतं.

या सिनेमाला इजिप्तमध्ये विरोध झाला. एका अॅटर्नीने त्याचं दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शन होऊ नये म्हणून प्रयत्न केले. त्याचं म्हणणं होतं, यामुळे इजिप्तची बदनामी होत आहे. असोसिएशन फॉर वुमन राइट्स अँड सोशल जस्टीस असे नाव धारण करणार्‍या संस्थेच्या प्रमुखांनी म्हटलं, या सिनेमामुळे स्त्रियांना पुरुषांच्या गुप्तांगावर जखम करायला प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे या सिनेमावर बंदी घालावी. पण असल्या सगळ्या हरकतींना डावलून हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक सर्वोच्च पुरस्कारही मिळाला.

सिनेमातून धक्कादायक माहिती मिळते, सर्रास लैंगिक छळ होतो ते वेगळं, पण ते कबूलच केलं जात नाही, एखाद्या स्त्रीने तक्रारे केली तरी तिलाच दोष दिला जातो हे कळतं. आता याबाबत तिथे जागृती होत आहे. अशा गोष्टी सिनेमातून दाखवल्या तर त्यामुळे देशाची बदनामी होते, आपली संस्कृती अशी नाही असं म्हणून या गोष्टी कार्पेटखाली झाकायला बघणारे लोक तिथेही आहेत दिसते.

अशा या तीन देशातील अरब स्त्रियांच्या कहाण्या. या प्रातिनिधिक आहेत का असा प्रश्न येईल. यापैकी इजिप्तचा सिनेमा हा तर स्पष्टपणे प्रातिनिधिक आहे. या सिनेमावर जी चर्चा झाली आणि त्याला तसा विरोध झाला, तसेच उपलब्ध असलेली माहिती त्यामुळेही हे स्पष्ट आहे. तसेच दुसऱ्या दोन सिनेमाबाबतही ते नक्कीच प्रातिनिधिक आहेत. त्यातही सौदी अरेबियाबाबत १९८० पूर्वी तो देश उदार विचारसरणीचा होता, तिथे कठोर निर्बंध नव्हते, तेच कट्टरतावादी जुनाट विचारांच्या लोकांच्या मतानुसार देश चालायला लागला तर किती घसरण होते ते दिसून येतं. यामुळेच स्त्री- पुरुष समानता, आधुनिक शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन, समाजातील सर्व घटकांमध्ये सलोखा यासारखी आधुनिक मुल्ये व विचारसरणी यांची कास धरणे किती आवश्यक आहे हे कळतं.

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

Write A Comment