डिजिटल जगामध्ये कितीही नवीन तंत्रज्ञान आलं आणि एखादी गोष्ट तयार करणारा शोधणं मुश्कील होऊन बसलं तरी त्याचे “फूटप्रिंट” राहतातच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात कायदेतज्ज्ञ असलेल्या ब्रिटिश अध्यापक डॉ. लिझा लोडो गॉमसेन यांनी फेसबुकच्या विरोधात दावा केला असून कंपनीने आपल्या ४४ दशलक्ष सदस्यांना तीन बिलियन डॉलरची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. या बाईंचा असा आरोप आहे की, फेसबूकने २०१९ मध्ये कॅम्ब्रिज ॲनालिटिका या कंपनीला फेसबूक सदस्यांचा सर्व डेटा/विदा उपलब्ध करून दिला. बाईंचया आरोपात तथ्यही आहे. कारण फेसबुकने एक डॉलर प्रति व्यक्ती एवढ्या स्वस्तात अमेरिकन नागरिकांचा डेटा विकला होता जे प्रकरण पुढे उघड झालं आणि फेसबूक आणि तत्सम सोशल मिडिया वेबसाइट्सववर काहीतरी बंधनं यावीत म्हणून मागणी जोर धरू लागली. आता या सोशल मिडिया कंपन्यांचं पितळ कसं उघडं पडलं त्याची रोचक कहाणी ख्रिस्तोफर वायली या तरुणाने लिहिली आहे.
हजारो वर्षांपासून माणसाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत, त्यापासून उपयुक्त वस्तू बनवत आपली अर्थव्यवस्था बळकट केली. कापसापासून कापड, खनिज लोखंडापासून स्टील, जंगलकापून लाकूड बनवलं. पण इंटरनेटचा वापर सुरू झाल्यापासून आपलं आयुष्य, आपलं वागणं, आपली ओळख याच गोष्टी उपयुक्त वस्तू बनून गेल्या. नव्याने आलेल्या डेटा किंवा विदाउद्योगासाठी माणूस हाच कच्चा माल बनला. – ख्रिस्तोफर वायली.
सोशल मिडियाच्या क्रांतीनंतर माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल तर तो म्हणजे माणसाचाच उपयुक्त वस्तू म्हणून होणारा वापर. अमेरिकेमध्ये २०१६ साली डॉनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड ही या सोशल मिडियाच्या केलेल्या गैरवापराचा परिणाम होती आणि त्यामागे कॅम्ब्रिज ॲनालिटिका नावाची एक कंपनी होती. ही गोष्ट जगासमोर आणणाऱ्या ख्रिस्तोफर वायली या तरुणाच्या “माइंडफक” नावाच्या पुस्तकामध्ये सोशल मिडिया, विदा आणि कॅम्ब्रिज ॲनालिटिका कंपनीची उभारणी आणि लोकांचा मानसशास्त्रीय अभ्यासकरून, त्यांच्या भीती, असुरक्षितता समजून त्याचा वापर ट्रम्पला निवडणूक जिंकून देण्यासाठी, ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान फिरवण्यासाठी, नायजेरियामधील उदारमतवादी उमेदवारालापाडण्यासाठी कसा करण्यात आला याची फारच रोचक पण अत्यंत धक्कादायक अशी कहाणी आहे.
ख्रिस्तोफर या कॅनडामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेला आणि आपल्या शारिरीक उणींवामुळे कमी वयात संगणकामध्ये बुडालेला असा एक मुलगा. मात्र या संगणकातील कौशल्यामुळेच त्याला कॅनडामधल्या एका राजकीय नेत्याच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यावेळी अमेरिकेमध्ये बराक ओबामांचा निवडणूक प्रचार सुरू होतो आणि कॅनडला त्यामध्ये अर्थातच रस असतो. कॅनडा एक टीम अमेरिकेमध्ये रवाना करते आणि त्यात ख्रिस्तोफरचा समावेश असतो. त्यावेळी त्याला पहिल्यांदा सोशल मिडियाचा वापर निवडणुकीसाठी कसा केला गेला, लोकांचा विदा कसा वापरला गेला याची माहिती मिळते आणि एक नवीन जग त्याच्यासमोर खुलं होतं. सिलिकॉन व्हॅली आपलं तांत्रिक कौशल्य वापरून निवडणुका हायटेक करण्यात यशस्वी होते खरी, पण त्याचबरोबर अब्जावाधी डॉलरचा फायदाही करून घेते. त्यामुळेच विदा हा परवलीचा शब्द बनतो आणि प्रत्येक टेक कंपनी हा विदा मिळवण्याच्या मागे लागते. पण कॅनडामध्ये मात्र अशापद्धतीचं मॉडेल वापरलं जात नाही. काही काळानंतर उच्च शिक्षणासाठी ख्रिस्तोफर इंग्लंडला जातो आणि इथेच त्याचा कॅम्ब्रिज ॲनालिटिकाबरोबरचा प्रवास सुरू होतो. कॅम्ब्रिज ॲनालिटिका आधी १९९० मध्ये स्ट्रॅटर्जिक कम्युनिकेशन लॅबोरेटरिज (SCL) म्हणून ओळखली जात असते. त्या कंपनीचं काम हे प्रामुख्याने लष्करासाठी असतं. विकसनशील देशांतल्या दहशतवादी, ड्रगमाफिया, स्थानिक बंडखोर, देहविक्रेय थांबवण्यासाठी मानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यामध्ये पाकिस्तानातल्या जिहादी भरती विरोधात, दक्षिण सुदानमध्ये शस्त्रास्त्र विरोधी काम, लॅटिन अमेरिकेतील देहविक्रय अशा काही भागांमध्ये हे काम सुरू असतं. कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचा प्रमुख हा ॲलेक्झंडर निक्स नावाचा उच्च वर्गातून आलेला ब्रिटीश माणूस असतो. टेक्नॉलॉजीप्रेमी असलेला ख्रिस्तोफर या कंपनीसाठी जून २०१३ पासून काम सुरू करतो. कंपनीचं बहुतांशी काम हे वेगवेगळ्या लष्करांसाठी असतं. ब्रिटिश मिलिटरी डिफेन्स, अमेरिकन सरकार, नाटो वगैरे. लष्कराला थेट ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या गोष्टी या कंपनीच्या माध्यमातून केल्या जातात. उदाहरणार्थ लॅटिन अमेरिकेमध्ये लॅटिन अमेरिकेतल्या एका ड्रगविरोधीमिशनमध्ये ड्रग माफियांना लक्ष्य करण्यासाठी लष्करातर्फेच खोट्या बातम्या पसरवून कोकोची शेती करणाऱ्या स्थानिकांना भडकवलं जातं.
या सगळ्या ऑपरेशनमध्ये मानसशास्त्राचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला गेला. लोकांची मानसिकता, त्यांची जडण-घडण याची माहिती मिळवून त्याचा वापर आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीकेला गेला. मानसशास्त्रामध्ये परस्पेक्टिसाइड (perspecticide) असा एक शब्द विशिष्ट नातेसंबंधासाठी वापरला जातो. यामध्ये एक जण हा दुसऱ्याला दोषी ठरवून सातत्याने अपमानास्पद वागवणं, शिवीगाळ करणं असंच करत असतो. या नात्यात बळी ठरणाऱ्या माणसाला काही काळाने आपण दोषी आहोत हे पटायला लागतं. त्याच्यावर होणारे खोटे आरोप खरे वाटायला लागतात. त्यामुळे खऱ्या-खोट्याचा भेद त्याच्यासाठी संपून जातो. याच धर्तीवर संगणक प्रोग्रॅम तयार करून लोकांना संभ्रमित करणं, खऱ्या-खोट्याचा अर्थ लागू न देणं आणि लोकांची स्वतःचं व्यक्तिमत्वं पार नष्ट करून त्यांना आपल्याला पाहिजे तसं वागायला भाग पाडणं हे या मानसशास्त्रीय युद्धाचा भाग आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. थेट होणाऱ्या युद्धापेक्षाही मानसशास्त्रीय युद्ध हे कितीतरी भयंकर, खूप मोठा परिणाम निर्माण करणारं आणि यातून होणारी हानी कधीच भरून न निघणारी, कायमस्वरुपी घाव घालणारं असंच असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये तंत्रज्ञान तज्ज्ञांबरोबर मानसशास्त्रज्ञांचाही समावेश होता.
या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात राबवण्याची संधी कंपनीला चालून आली ती त्रिनिदाद मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी या कॅरेबियन सरकारकडून. त्यांना गुन्हेगारी कमी करण्यासाठी लोकांच्या माहितीचा वापर करता येऊ शकतो का, कोण गुन्हेगार आहेत, गुन्हा कधी घडण्याची शक्यता आहे असं काही मॉडेल तयार करता येऊ शकतं का म्हणून या सरकारने कंपनीकडे चाचपणी केली. त्याासाठी सरकारने जनगणनेच्या मार्फत जमवलेला सगळा डेटा या कंपनीला दिला जे खरंतर बेकायदेशीर आहे. त्याशिवाय मोबाइल कंपन्यांनीही आपला डेटा सहज दिला. मोबाइल कंपन्यांनी दिलेल्या डेटामुळे ख्रिस्तोफरच्या कंपनीला घराघरातली माहिती मिळवता आली, वैयक्तिक आयुष्यात घुसता आलं आणि एकप्रकारे सरकारी मदतीने हेरगिरी केली गेली. एका अदृश्य लष्कराने त्रिनिदादच्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांना कळलंही नाही. यामध्ये सरकारी सहभागी असल्याने ख्रिस्तोफरची कंपनी कायम नामानिराळी राहिली. अशापद्धतीची कामं या कंपनीने वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू केली आणि त्यांच्याकडे येणारी लोकांची वैयक्तिक माहिती, पैशांचा ओघ आणि मक्तेदारी वाढत गेली.
हळूहळू कंपनीचा पसारा आणि कीर्ती (?) वाढत गेली आणि स्टीव बॅनन नावाचा उजव्या विचारसणीचा एक अमेरिकेन या कंपनीशा जोडला गेला. याने कंपनीला रॉबर्ट मर्सर या एका अब्जाधीशाशी जोडून दिलं. डॉनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीसाठी ओतलेला पैसा अशाच अमेरिकेन गर्भश्रीमंतांकडून आला होता. या मर्सरने ख्रिस्तोफरच्या कंपनीला अमेरिकेन लोकांचा प्रोफाइल बनवण्यासाठी सांगितलं म्हणजे अमेरिकन नागरिक काय विचार करतो, त्याची मानसिकता काय आहे वगैरे. हे एक मोठं आव्हान होतं आणि कंपनीकडे तशाप्रकारची माहिती अर्थातच नव्हती. त्यामुळे वर्जिनिया हे राज्य पहिल्यांदा निवडण्यात आलं. सुरुवातीला कंपनीने लोकांना भेटून, पारंपरिक पद्धतीने सर्वेक्षण करून माहिती जमवली. काही माहिती त्यांनी डेटा कंपन्यांकडून, क्रेडिटकार्ड कंपन्यांकडून घेतली. या कामाच्या दरम्यान कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचा जन्म झाला. मग २०१४च्या सुरुवातीपासून या कंपनीने अमेरिकन निवडणुकीसाठी आपलं काम सुरू केलं. आता त्यामध्ये मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, डेटा शास्त्रज्ञ, संशोधक यांचाही समावेश करण्यात आला. कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचं काम सर्वात सोपं झालं जेव्हा त्यांना फेसबूकने आपल्याकडचा डेटा एक ते दोन डॉलर प्रति माणूस एवढ्या स्वस्तात उपलब्ध करून दिला. अमेरिकेतल्या बहुसंख्य लोकांचे फोटो, कौटुंबिक माहिती, लोकांची मतं, असं मोठं घबाडच फेसबूकच्या माध्यमातून कॅम्ब्रिज ॲनालिटिकाच्या हाती सापडलं.
मग लक्ष्य कोणाला आणि कशापद्धतीने करायचं याची आखणी झाली. अमेरिकन गोऱ्या लोकांची मतं मिळवण्यासाठी त्यांच्या मनातली इतर वर्णियांबद्दल असलेली असुरक्षितता लक्ष्य करण्यात आली, तिला खतपाणी घालण्यात आलं. आरक्षणासारख्या तरतुदींच्या माध्यमातून गोऱ्या लोकांवरच अन्याय होत आहे याला त्यांनी हवा दिली. वर्णद्वेषाच्या मुद्द्यांवर सोशलमिडियाच्या माध्यमातून, जाहिराती, वाद-विवाद आयोजित करून गोऱ्या लोकांमधला राग वाढवत नेला. मग लोकांना “तुमच्या मुलीने मेक्सिकन माणसाशी लग्नं केलेलं चालेल का?” असे खाजगी प्रश्न विचारून, गोऱ्या मुलीबरोबर इतर वर्णाच्या लोकांचे फोटो टाकून पद्धतशीर लोकांची माथी भडकवली आणि एका मोठ्या समूहाचं मत परिवर्तन केलं.
बेकायदेशीर चाललेलं हे काम कोणत्या राज्यकर्त्यांना नको होतं. त्यामुळे राजकारणी, दलाल, सुरक्षा यंत्रणा, उद्योगपती असे सगळेच या कंपनीकडे येऊ लागले. त्यातूनच रशियाचा यामध्येप्रवेश झाला. मग अमेरिकन मतदारांना पुतिनविषयी मत विचारणं, रशियाविषयी कौल घेणं असेही उद्योग या कंपनीने केले. अमेरिकन निवडणूक ट्रम्प यांच्या बाजूला झुकवण्यामध्ये रशियाचाही हात होता हे आता उघड झालं आहे. हे सगळं योग्य सुरू नाहीये हे ख्रिस्तोफरला कळत होतं, पण तोही इतका अडकला होता की यातून पूर्ण बाहेर पडण्याचा निर्णय त्याला लगेच घेता आला नाही. मग २०१६ पासून अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला थेट सुरुवात झाली आणि कंपनीने ट्रम्प यांच्यासाठी काम सुरू केलं. ट्रम्प यांचा निवडणूक प्रचार किती एकांगी होता आणि अध्यक्ष झाल्यावर त्या माणसाने काय काय केलं हे सगळ्या जगानेच पाहिलं. पण त्यांना जिंकून आणण्यासाठी अमेरिकन लोकांचं मतपरिवर्तन करण्यात कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचा मोठा वाटा होता हे स्पष्टच आहे. निवडणूक ही मोकळ्या वातावरणात न होता ती पाहिजे तशी, हवी ती पद्धत वापरून, लोकांमध्ये खोटं पसरवून, त्यांना घाबरवून फिरवण्यात आली होती.
पण कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचे कारनामे केवळ अमेरिकन निवडणुकीपुरते मर्यादीत राहिले नाहीत. राजकारणी, विविध सरकार, लष्करं यांच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे कॅम्ब्रिज ॲनालिटिकाची राक्षसी महत्त्वाकांक्षा वाढत गेली. ब्रिटनमध्ये युरोपियन युनियन सोडण्याचा ब्रिटिश जनतेने दिलेला कौल म्हणजेच ब्रेक्झिट हेसुद्धा कॅम्ब्रिज ॲनालिटिकाचं अपत्यं होतं. यातून अखेर बाहेर पडून ख्रिस्तोफर वायली या मोठ्या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिला आणि कंपनीचे, अनेक सरकारांचे कारनामे त्याने जगजाहीर केले. याविरोधात अमेरिका, ब्रिटन येथे न्यायालयात सुनावणीही झाल्या.
कॅम्ब्रिज ॲनालिटिका बंद झाली. पण तिच्यासारख्या अनेक लहान-मोठ्या कंपन्यांना मात्र हा मार्ग दाखवून गेली. आजही जगभरात ५५० हून अधिक कंपन्या या राजकीय कारणासाठी मग ते निवडणुका असोत किंवा इतर लोकांच्या खाजगी माहितीचा गैरवापर करतात. भारतासारख्या देशात तर याबद्दल लोकांना फारशी माहितीही नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती सहज अशा कंपन्यांना आपण पुरवत राहतो. ही माहिती परस्पर विकणं, त्याचा आपल्याच विरोधात वापर करणं ही या तंत्रज्ञानाची काळी बाजू आहे. पैसा आणि सत्ता याजोरावर आपल्या मतलबासाठी आभासी दुनिया तयार करणं हे अशा कंपन्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज शक्य झालं आहे. तंत्रज्ञान खरंतर माणसाच्या प्रगतीसाठी असतं. पण ते कोणाच्या हाती पडतं यावरही त्याचा वापर अवलंबून असतो. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समाज प्रगत झाला पण विचारसरणी मात्र तशीच सरंजामी, हुकुमशाहीची राहिली. त्यामुळे या आधुनिक गोष्टींचा वापर माणसाला पुन्हा गुलाम बनवण्यात होत आहे. माणसाच्या त्याच्या शरिरावर, मनावर काही ताबा न ठेवता तो कंपन्या आणि सत्ताधारी, श्रीमंत यांनी घेणं म्हणजे आपल्याला पुन्हापारतंत्र्यात ढकलण्यासारखं आहे. आतापर्यंत माणसाच्या इतिहासामध्ये कायम अन्याय करणारी माणसं, अत्याचारी यंत्रणा, हुकुमशाही असे अनेक लढे लोकांनी लढले. पण त्यामध्ये शत्रूमाहित होता. सध्याच्या आभासी जगामध्ये आपला शत्रू नक्की कोण आहे हेच आपल्याला माहित नाही अशा एका विचित्र टप्प्यावर आपण उभे आहोत. याचं भविष्य काय असेल याचीकल्पनासुद्धा करता येत नाही. कारण पुढचा लढा हा अदृश्य शक्तींशी आहे.