fbpx
सामाजिक

बेछूट

अमेरिकेतल्या एकूण एक लोकांचं एका गोष्टीबद्दल एकमत आहे आणि ती म्हणजे जगातील कोणत्याही दुसऱ्या देशापासून अमेरिकेला शिकण्यासारखं काही नाही. किंबहुना बाकीचे देश अस्तित्त्वात आहे हेच त्यांच्या खिजगणतीत नसतं. मग त्यांना इतिहास आहे, त्यांचे काही अनुभव असू शकतील या गोष्टी बाजूलाच राहिल्या. जगाचा इतिहास अमेरिकेपासून चालू होतो आणि अमेरिकेपर्यंत संपतो यावर सर्वांचा गाढा विश्वास आहे. जशी प्राणीमात्रांमधली मनुष्य ही शेवटची अवस्था तशी मनुष्यमात्रांमधली अमेरिकन ही शेवटची अवस्था. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं बंदुकींवर बंदी घातली, किंवा त्यांची संख्या कमी केली, तर हत्या कमी होतील ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. नागरिकांनी बंदुका बाळगण्यामुळे देशाची सुरक्षा वाढते हे खरं असेल तर अमेरिकेसारखा सुरक्षित कोणताही देश नाही. हे सत्य असेलही पण ते अजून सिद्ध व्हायचं आहे.


काय्ल रिटनहाउस या १७ वर्षाच्या मुलाने केलेल्या गोळीबारात दोन जण मृत्यू पावले आणि एक गंभीर रित्या जखमी झाला. आपण स्वसंरक्षणाकरता गोळीबार केला या बचावाखाली तो सुटला. कोर्टाचा निर्णय बरोबर का चूक यावर आता दिवस-रात्र वाद चालले आहेत. पण १७ वर्षाच्या मुलाच्या हातात शाळेतली वही असावी तशी अतिशय नैसर्गिक रित्या मशीन गन होती याचं कुणाला आश्चर्य वाटलं नाही, यातच सर्व आलं. हाताला सहावं बोट फुटावं अशा तर्‍हेने बंदूक घेऊन एका सुसंस्कृत देशात माणसं उघडउघड फिरतात हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही.

काय्ल रिटनहाउस हा इलिनॉय या राज्याचा रहिवासी. त्याने गोळीबार केला तो विस्कॉन्सिन या शेजारच्या राज्यातील कनोशा या गावी. तिथे दंगल चालली होती ती तो मिटवायला गेला होता. अमेरिकेत बंदुक घेऊन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं गुन्हा असल्यामुळे त्याने कुणाला तरी विस्कॉन्सिनमध्ये बंदूक विकत घ्यायला सांगितलं होतं. म्हणजे सर्व पूर्वनियोजीत होतं. ही घटना झाली त्यापासून साधारण एका वर्षाने तिथून १०० किमी अंतरावर असलेल्या राज्यातल्या मिल्वॉकी या सर्वात मोठया शहरातील संघाने बास्केटबॉलचं राष्ट्रीय विजेतेपद पन्नास वर्षांनी जिंकलं. शेवटचा पाॉइंट होऊन जल्लोश चालू होतोय न होतो तर दोन ठिकाणी गोळीबाराचा आवाज आला. माणसांची पांगापांग झाली. चेंगराचेंगरी झाली. नेहमीप्रमाणे काही जण मेले, काही जखमी झाले, आठ दिवस भरपूर चर्चा झाल्या. या घटनेची पुनरावृत्ती होणार याबद्दल कोणाच्याही मनात संदेह नव्हता. फक्त आपली मूलं त्यात नसावीत अशी आशा बाळगण्यापलीकडे त्यांच्या हातात काय होतं?

आज अमेरिकेत माणसांची संख्या आहे ३४ कोटी आणि बंदुकींची संख्या आहे ४१ कोटी. जगातल्या एकूण बंदुकींच्या ४० टक्के! म्हणजे माणसांपेक्षा बंदुकी जास्त. ३४ कोटी लोकांमधले “फक्त” चार कोटी बंदूकधारक आहेत. याचा अर्थ प्रत्येक बंदूकधारकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सरासरी दहा बंदुका आहेत. बऱ्याचशा बंदुका एका वेळी शेकडो गोळ्या मारू शकणाऱ्या, स्वयंचलित, अर्धस्वयंचलित. बहुतेक लष्करात वापरल्या जाणाऱ्या. अशा बंदुका शिकारीकरता उपयोगी नाहीत किंवा स्वरक्षणाच्या कामाच्या नाहीत. त्यांचा उपयोग केवळ माणसं मारण्यासाठी आणि तीही लढाईमध्ये. अर्थात त्या बंदुका शाळेतली छोटी मुलंही तितक्याच कार्यक्षमतेने मारतात, असा अनुभव आहे आणि असे प्रसंग जेव्हा येतात—आणि ते वारंवर यायला लागलेत—तेव्हा अश्रुपात होतो, मेणबत्त्या पेटवल्या जातात, प्रार्थना म्हटल्या जातात आणि मुख्य म्हणजे बंदुकीवर नियंत्रण या विषयावर जोरदार चर्चा होतात. पण बंदुकीवर नियंत्रणाच्या दिशेने कणभरही प्रगती होत नाही. झालीच तर अधोगती.

बंदुकीनं होणाऱ्या हत्त्या या गोष्टीचा अभ्यास एका वृत्तवाहिनीनं केल्यावर खालील आकडेवारी उपलब्ध झाली. देशामध्ये सर्वसाधारण एक आठवडयात असे प्रसंग दोन हजारापेक्षा अधिक घडतात. त्यातले १० टक्के बेछूट गोळीबाराचे असतात. सरासरी ४३० मृत्यू होतात, १००० जखमी होतात. हे आकडे दर वर्षी वाढत असले तर आश्चर्य नाही. इ.स. २०२० या कोव्हिडच्या वर्षी असे प्रसंग जरा दबले गेले असले तरी २०२१ साली ते उसळून वर आले—२०२० च्या मानानं ७० जास्ती. गुन्ह्यांची “गुणवत्ता” सुद्धा वाढलेली आहे. बरेच गुन्हे आता बिनदिक्कत दिवसाढवळ्या व्हायला लागलेले आहेत. तुरुंग तर भरले आहेतच. शिवाय कोर्टंही तुंबली आहेत. एका न्यूयॉर्क शहरात ५००० च्या वर खटले कोर्टाच्या अभावी अडलेले आहेत. नवी प्रगती म्हणजे बंदूकधाऱ्यांमध्ये ४० स्त्रिया आहेत. आफ्रिकन-अमेरिकन म्हणजे निग्रोंमध्ये बंदूकधार्‍यांची संख्या ५० झाली आहे. बंदुकींच्या विक्रीचं प्रमाण मात्र सातत्याने वाढत आहे, कोव्हिड असो वा नसो. २०१९ साली २.८ कोटी बंदुका विकल्या गेल्या, तर २०२० साली ४ कोटी!

सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या बेछूट गोळीबारांना जरी प्रसिद्धी मिळत असली तरी त्या एकावर एक होणार्‍या वैयक्तिक हत्त्यांच्या तुलनेने ते फार कमी, म्हणजे ३ टक्के आहेत. प्रसिद्धीत ही अशी तफावत असायची कारणं दोन. एक म्हणजे बातमीच्या दृष्टीने वैयक्तिक हत्त्या एवढया सनसनाटी नसतात. दुसरं कारण म्हणजे वैयक्तिक हत्त्यांमध्ये गेलेले बळी आफ्रिकन-अमेरिकन म्हणजे निग्रो बहुसंख्य असतात. त्यांच्यातील खुनाखुनी ही इतकी नित्यनेमाची झाली आहे की त्यात विशेष ते काय असा दृष्टीकोन असतो. त्यांच्यातल्या हत्त्या पार्किंगसाठी जागा असल्या क्षुल्लक कारणांपासून ते गॅंगमधील युद्धांमधून उद्भवलेल्या असतात.

जगातील बहुतेक देशात बंदुकीवर नियंत्रण म्हणजे बंदीच. तसं नियंत्रण अमेरिकेत आजन्म शक्य नाही. जो पक्ष नियंत्रण असावं असं म्हणतो तोदेखील या “थराला” जात नाही. संपूर्ण नियंत्रण ते संपूर्ण अंदाधुंदी यामध्ये भरपूर पायऱ्या आहेत. बंदुक विकत घ्यायला आला असेल त्याची पार्शभूमी तपासणं, त्याचं वय तपासणं, त्याचं नाव लिहून घेणं, त्यानं बंदुक वापरायचं प्रशिक्षण घेतलं आहे याची तपासणी करणं. असलेलं हत्यार उघडपणे न्यायचं की लपवून नेता येईल? कोणत्या प्रकारच्या बंदुकी दुकानात ठेवता येतील याचं बंदुकीच्या दुकानांवर बंधन आणणं. अशा टप्प्याटप्प्यांनी पुढे जाता येईल. पण एकेक टप्पा पार पडण्यातच भरपूर अडचणी येतात. मुख्य म्हणजे अमेरिकेत कायदे दोन प्रकारचे असतात. राज्याचे आणि केंद्राचे. अमेरिकेच्या संविधानाप्रमाणे बंदुकीसंबंधी कायदे राज्याने करायचे. तेव्हा कोणताही कायदा झाला की सर्वप्रथम तो केंद्र विरुद्ध राज्य या वादात अडकून राहतो. मग येतं पक्षीय राजकारण. तेथून जर कायदा, किंवा उपकायदा, सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टात कोणत्या पक्षाचं बहुमत आहे यावर यांचं भवितव्य काही काळापर्यंत तरी ठरतं. अमेरिकेतील सुप्रीम कोर्ट स्वत:चेच निर्णय केव्हाही बदलू शकतं. तेव्हा कोणत्याही कायद्याला कायमस्वरूप येणार की नाही याची अनिश्चितता असते.

२०१० पर्यंतची उच्च उत्पन्न देशांमधील आकडेवारी
२०१० पर्यंतची उच्च उत्पन्न देशांमधील आकडेवारी

अमेरिकेत रिपब्लिकन हा एक असा पक्ष आहे की जो स्वत:ला व्यक्तिस्वातंत्र्याचा पाईक समजतो, आणि त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्या अफाट आहेत. लस टोचून घेणं किंवा मुखपट्टी (मास्क) लावणं हे त्या पक्षाच्या दृष्टीनं जुलूमशाही आहे. बंदुकी बाळगण्याबद्दल कसलाही कायदा केला तरी त्याचं पित्त खवळतं. संधी मिळाली की तो कायद्याला दोन पावलं मागे घ्यायला लावतो. याचं ठराविक चक्र असं चालतं. सार्वजनिक ठिकाणी एक मोठा गोळीबार होतो. माणसं मरतात. हे थांबलं पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटतं. जर रिपब्लिकन पक्ष अल्पमतात असेल तर एखादा कायदा होतोसुद्धा. पुढच्या निवडणूकीत जर रिपब्लिकन पक्ष निवडून आला तर तो कायदा रद्द होतो. एक उदाहरण. टेक्सस या राज्यात बंदूक विकत घेणार्‍याची पार्श्वभूमी आणि बंदूक वापरण्याचं त्याचं प्राथमिक प्रशिक्षण झालंय की नाही यांची तपासणी व्हावी असा कायदा झाला. दोन वर्षांनी रिपब्लिकन पक्षानं तो कायदा रद्द केला!

डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे अशा राज्यांत—बरीचशी उत्तर भागात– बंदूक नियंत्रणांचे कायदे रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे अशा राज्यांपेक्षा अधिक कडक आहेत. कमी नियंत्रण आहे अशा राज्यांतून जास्ती नियंत्रण आहे अशा राज्यांत बंदुकी आणणं हा मोठा ग्रामोद्योग आहे. या व्यवसायात अर्थातच गॅंग आहेत. अशा गँग सापडल्या तर त्यांची आणि त्यांच्या मेंबरची नावे एक राज्याने जाहीर केली तर त्याचा फायदा इतर राज्यांना होऊ शकतो. रिपब्लिकन पक्षाला यात कुठेतरी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला पडलेला दिसला. त्यांनी अशी माहिती एफबीआयने किंवा ATEE (Alcohol, tobacco, Firearms, Explosives) या खात्याने सार्वजनिक करायची नाही असा कायदा २००३ साली केला. या कायद्यासाठी टाय्आर्ट नावाच्या सभासदाने ठराव मांडला म्हणून या कायद्याला त्याचं नाव दिलं आहे. याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे आज न्यूयॉर्क शहरात होणार्‍या गोळीबारात वापरात येणार्‍या बंदुकांपैकी ७० टक्के बंदुका बाहेरच्या राज्यांतल्या आहेत.

बंदुकींनी होणार्‍या हत्त्या हा एक मानसिक रोग आहे असं समजून त्यावर नियंत्रण आणि उपाय Centre for Disease Control and Prevention (CDC) या संस्थेने करावा असा उपक्रम अमेरिकन सरकारने करायचं योजलं आणि त्या उद्देशानं १९९८ साली पावलं उचलली. ते पाहून रिपब्लिकन पक्षाचं डोकं फिरलं. (CDC आणि रिपब्लिकन पक्ष यांचं एकमेकांवरचं प्रेम किती उतू चाललं आहे हे हल्लीच्या कोव्हिडच्या सुनावणीत झालेल्या झोंबझोंबीवरून लक्षात येईल.) CDC मध्ये control हा एक शब्द आहे, हे त्यामागचे कारण असू शकेल! असली “बकवास” कामं करायची असतील तर CDC च्या निधीबद्दल नव्यानं विचार करावा लागेल असा दम त्या संस्थेच्या संचालकास दिला. जेव्हा त्या संचालकबाईंनी पुन्हा आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला तेव्हा एका लोकप्रतिनिधीनं त्यांना सुनावलं, “तुमच्या तोंडून बंदूक हा शब्द पुन्हा आला तर CDC ला द्यायचा सर्व निधी मला बंद करावा लागेल.” बाईंनी तोंड बंद केलं! संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचं २०१८ मध्ये बहुमत जेव्हा आलं तेव्हा कुठे बंदुकींनी होणार्‍या हत्त्यांच्या संशोधनासाठी पुन्हा निधी चालू झाला.

अमेरिकेतल्या एकूण एक लोकांचं एका गोष्टीबद्दल एकमत आहे आणि ती म्हणजे जगातील कोणत्याही दुसर्‍या देशापासून अमेरिकेला शिकण्यासारखं काही नाही. किंबहुना बाकीचे देश अस्तित्त्वात आहे हेच त्यांच्या खिजगणतीत नसतं. मग त्यांना इतिहास आहे, त्यांचे काही अनुभव असू शकतील या गोष्टी बाजूलाच राहिल्या. जगाचा इतिहास अमेरिकेपासून चालू होतो आणि अमेरिकेपर्यंत संपतो यावर सर्वांचा गाढा विश्वास आहे. जशी प्राणीमात्रांमधली मनुष्य ही शेवटची अवस्था तशी मनुष्यमात्रांमधली अमेरिकन ही शेवटची अवस्था. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं बंदुकींवर बंदी घातली, किंवा त्यांची संख्या कमी केली, तर हत्या कमी होतील ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. नागरिकांनी बंदुका बाळगण्यामुळे देशाची सुरक्षा वाढते हे खरं असेल तर अमेरिकेसारखा सुरक्षित कोणताही देश नाही. हे सत्य असेलही पण ते अजून सिद्ध व्हायचं आहे.

बाकीचे देश मूर्ख आहेत हे जरी क्षणभर मान्य केलं तरी इतर इंग्लिशभाषक भाईबंदांचे अनुभव काय सांगतात?अमेरिकला सर्वात जवळचा देश म्हणजे कॅनडा—भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टया. तिथेही बंदुकी मुक्तपणे मिळत असत. आजही कॅनडात मृगया हा आवडता खेळ आहे. त्यासाठी बंदुका परवान्यावर मिळतात. कॅनडात शंभर माणसांमागे ३४ बंदुका आहेत. १९७७ साली एक दुर्घटना झाली आणि कॅनडाच्या सरकारने मुक्त बंदुकींवर चाप लावला. तसेच प्रकार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झाले आणि त्या देशांनी बंदुकींवर बंदी आणली. ऑस्ट्रेलियाने तर लोकांच्या ताब्यात असलेल्या बंदुका दुप्पट किंमतीत परत विकत घेतल्या. इंग्लंडमध्ये तर पोलीसही बंदुका वापरत नाहीत. या सर्व देशांत बंदुकींमुळे होणार्‍या दुर्घटना जवळजवळ बंद झाल्या आहेत.

खरं म्हणजे इतकंही लांब जायची गरज नाही. खुद्द अमेरिकेत राज्याराज्यांत बंदुकींसंदर्भातील कायद्यातील कठोरता आणि बंदुकींमुळे होणार्‍या हत्त्या यांचा आलेख काढला तर दोघांमधला संबंध लक्षात येईल. रोड आयलंड या राज्यात प्रौढ प्रजेतील दहा टक्के लोकांकडे बंदुका आहेत, आणि बंदुकींमुळे होणार्‍या हत्त्यांचं प्रमाण एक लाख लोकांमागे पाच इतकं आहे. इथून आलेखपत्रावर सरळ रेषेत पुढे गेलं की शेवटी शेवटी आर्कन्सॅा राज्य येतं. इथे बंदुकधार्‍यांचं प्रमाण पासष्ट टक्के आहे तर बंदुकींनी होणार्‍या हत्त्या एक लाख लोकांमागे वीस इतक्या आहेत. वास्तविक बंदुका वाढल्यास बंदुकींनी होणार्‍या हत्त्या वाढतात हे सांगायला ब्रम्हदेव नकोय. पण अमेरिकेत तो लागतो! बंदुका घरी असल्यास अपघात, विशेषत: मुलांकडून, आणि आत्महत्त्या यांचं प्रमाणही अर्थातच वाढतं. एका गावात दहा वर्षाच्या मुलीला मशीन गनचं शिक्षण देत असताना तिला ते जड हत्यार पेलवलं नाही आणि त्यातून सुटलेल्या गोळीनं प्रशिक्षकाचाच बळी गेला!

जगातल्या जवळजवळ कुठल्याच देशात लोकांना बंदूक धारण करण्याचा अधिकार संविधानानं दिला नाहीय. १९०० सालापर्यंत सात देश असे होते की ज्यांत लोकांना संविधानानं असा अधिकार दिला होता. पण चार देशांनी तो नंतर काढून घेतला. उरलेल्या दोन देशात लष्करातील सेवा सक्तीची आहे. अमेरिकेतील बंदूकधारणेचा अधिकारही तो हेतू धरूनच दिला होता. इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकेचं संविधान अडीचशे वर्षं जुनं आहे. म्हणजे आधुनिक युगाच्या आधीचं आहे. चाळीस लाख वस्तीचा—म्हणजे आपल्या पुण्याएवढा—देश होता. घटनाकार हुशार नक्की होते. पण त्यांची हुशारी लोकांना वाटतं तशी काही अमर्याद नव्हती. अध्यक्षीय उमेदवार रॉस परोंनी म्हटलं होतं, Our founder did not know about electricity, the train, telephones, radio, television, automobiles, airplanes, rockets, nuclear weapons, satellite or space exploration. There’s a lot they didn’t know about. संविधानातली भाषाही जुनी आणि अस्पष्ट आहे.

आणि ज्या घटनादुरुस्तीच्या जोरावर बंदुकीचा आग्रह धरणारे उडया मारतात त्यात म्हटलं आहे, “या देशाला खडं लष्कर नको. त्या ऐवजी नियमबद्ध स्वयंसेवी सैनिक असावेत. त्यांच्या हत्यार बाळगण्याच्या अधिकारावर आडकाठी नसावी.” यातील फक्त हत्यार बाळगण्यावर भर द्यायचा आणि बाकी सबंध मजकूराकडे दुर्लक्ष करायचं हा खरं म्हटलं तर नैतिक अप्रामाणिकपणा आहे. गंमत म्हणजे या विषयावर १९०० सालापर्यंत फार कुठे चर्चा झाली नाही. १९३४ मध्ये शिकागोमध्ये एक गॅंगवॉरमध्ये बर्‍याच लोकांचा बळी गेला आणि हत्यारबंदीवर पहिला कायदा भीतभीत झाला. राष्ट्राध्यक्ष जॉन्सनने हत्यारबंदीवर पहिला कडक कायदा केला, आणि तेव्हापासून या प्रश्नाला असंख्य फाटे फुटत गेले.

सेंट पॉल, मिनेसोटा - २० एप्रिल २०१८ - बंदुकीचा हिंसाचार रोखण्यासाठी राजकारणी निष्क्रीयतेच्या विरोधात देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून सुमारे १००० विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले आणि मिनेसोटा कॅपिटल येथे एकत्र आले. त्यांनी फेडरल (केंद्र), राज्य आणि स्थानिक सरकारला बंदूक हिंसा कमी करण्यासाठी कडक पाऊलं उचलण्याचे आवाहन केले.
सेंट पॉल, मिनेसोटा – २० एप्रिल २०१८ – बंदुकीचा हिंसाचार रोखण्यासाठी राजकारणी निष्क्रीयतेच्या विरोधात देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून सुमारे १००० विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले आणि मिनेसोटा कॅपिटल येथे एकत्र आले. त्यांनी फेडरल (केंद्र), राज्य आणि स्थानिक सरकारला बंदूक हिंसा कमी करण्यासाठी कडक पाऊलं उचलण्याचे आवाहन केले.

अमेरिकन संविधानाबद्दल सर्वात जास्त आदर कुणाला वाटत असेल तर तो बंदुकी आणि दारूगोळा तयार करणार्‍या उद्योगधंद्यांना! हे शुक्लेंदुवत सतत वाढत आहेत. २००८ ते २०२० या बारा वर्षांच्या काळात हे २७० टक्क्यांनी वाढले. आज हा वर्षिक चौसष्ट अब्ज डॉलरचा धंदा आहे. राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी १९६८ साली हत्यारबंदीवरचा कायदा केल्याबरोबर त्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी हालचाल करायला सुरुवात केली. प्रथम रायफलच्या प्रशिक्षणासाठी १८४० साली स्थापन केलेली नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) नावाची संस्था काबीज केली. मग रिपब्लिकन पक्षाशी पाट लावला. बंदुकींबरोबर इतर राजकरणात भाग घेणं चालू केलं. वर्षाला २० लाख डॉलर (प्रत्येक विकलेल्या बंदुकीमागे १० सेंट!) फेकून संसदेला बटीक केलं.

जनसंपर्क आणि प्रचार यावरही NRA चा काही प्रमाणात खर्च होतो. खरं म्हणजे याकरता फार खर्च करायची गरजही नाही. लोकांना बंदुकींचं व्यसन लागलेलंच आहे. त्यांचा सतत पुरवठा ठेवला म्हणजे झालं. बंदुक हा अमेरिकन जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. हल्लीचीच एक मजेशीर गोष्ट. इथल्या मुलांना टिक टॉक फार प्रिय आहे. त्याच्यावर कोणतरी कसलं तरी आव्हान टाकतो आणि ते अमेरिकेतली सर्व मुलं स्वीकारतात. एकदा एका मुलाने शिक्षकाच्या थोबाडीत मारायचं आव्हान दिलं. झालं! अमेरिकेतल्या लाखो शिक्षकांनी त्या दिवशी थोबाडीत खाल्ली. काही महिन्यांपूर्वी एका मुलाने शाळेत बंदूक न्यायची आणि गोळ्या झाडायचं आव्हान दिलं! सबंध अमेरिकेत घबराट झाली. सुदैवाने ते आव्हान फार मुलांनी स्वीकारालं नाही. काही शाळा बंद केल्या. ज्या चालू होत्या त्यांना पोलीस संरक्षण दिलं.

पण अधूनमधून अशा घटना घडतात की त्यामुळे बंदूकसमर्थकांचा बुद्धीभ्रम व्हायची शक्यता असते. अशी एक घटना २०१२ मधील डिसेंबर महिन्यात कनेटीकट या राज्यातील न्यू टाउन या गावातल्या सॅंडी हुक नावाच्या प्राथमिक शाळेत घडली. तिथे एका पिसाळलेल्या तरुणाने आपल्या आईची स्वयंचलीत रायफल चोरली आणि शाळेत येउुन बेछूट गोळीबारास सुरुवात केली. वीस बालके आणि सहा शिक्षक बळी पडले. अशा प्रसंगी कसं वागायचं याचा NRA चा प्रोटोकॉल ठरलेला आहे. काही दिवस भीषण शांतता. मग हे सगळं खोटं आहे, अशी आरोळी. नंतर “माणसं माणसांना मारतात, बंदूकी नाही,” असे सडलेले युक्तिवाद.

असले युक्तिवाद अमेरिकन लोकांना पटतात, याचं कारण या लोकांची नैसर्गिक हिंसक वृत्ती. आणि श्रेष्ठत्चाची भावना. या जेवढया हिटलर आणि जर्मन लोकांत होत्या तेवढयाच अमेरिकन लोकांत आहेत. अमेरिकन इंडीयन यांची कत्तल, नीग्रोंची गुलामगिरी यातून त्या व्यक्त झाल्या. आणि इतकंही दूर जायची गरज नाही. गेल्या वीस वर्षांतील मध्यपूर्वेत केलेली अमानुष वर्तणूक आणखी वेगळं काय सांगते? दुर्दैवाने, ती हिंसक वृत्ती चित्रपट, कादंबर्‍या, व्हिडीओ गेम यांच्यात जोपासली जाते. यातलं कपोलकल्पित विश्व आणि वास्तव यांच्यात गफलत होते. खेळातली माणसं ही खेळ चालू असताना हाडामांसाची असतात. हातात हत्यार आलं की हाडामांसाची माणसं खेळातली होतात. दुसरं म्हणजे अमेरिकन लोकांनी फक्त बाहेरच्या देशातलीच माणसं मारायची, आपल्या देशातली नाही असा आग्रह कसा धरता येईल?

आपल्या देशात अशी हिंसाकांडं अविरत चाललेली असताना बाहेरच्या देशांची काय प्रतिक्रिया असावी अशी अमेरिकन लोकांची अपेक्षा आहे? आपल्याबद्दल आदर वाटावा, की आपल्या स्वातंत्र्याचा हेवा वाटावा, आपल्याकडे दुर्लक्ष करावे, की आणखीन काही?शक्यता अशीही आहे की अमेरिकन लोकांच्या लेखी बाहेरच्या देशांना किंवा त्यांच्या प्रतिक्रियांना किंमत शून्य आहे. यांपैकी काही असलं तरी आपला आणि आपल्या लोकशाहीचा आदर्श इतर देशांनी ठेवावा अशी मागणी अमेरिकने करणं यासारखी दुसरी व्याजोक्ती नाही.

डॉ. द्रविड हे फिजिक्समधील पीएच. डी. असून यांचे राजकारणविज्ञानइतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे मुक्काम पोस्ट अमेरिका हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

2 Comments

  1. डॉ अनिल खांडेकर Reply

    ” बेछूट ” हा लेख वाचून किंवा वाचतानाच सतत प्रश्न पडत होता . . अमेरिका खरच हिंसक आहे का ? बंदुका , गोळीबार , यांची चर्चा चालूच असते. अशावेळी अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जातात . त्यातील एक महत्वाचा — अमेरिकेत कायदा झुगारून दिला जातो किंवा अमानुष हिंसा केली जाते . पण अमेरिकेतील व्यवस्था , अमेरिकन स्पिरीट जिवंत असल्यामुळे , कायदा समान असल्यामुळे कोणीही त्यातून सुटत नाही . त्यातून पुढे प्रश्न निर्माण होतोच — जर कायद्यातून कोणीही सुटत नसेल तर कायदा बेछूट पणे मोडला जातो — वारंवार . ते का ? हिंसक मनोवृत्ती – आणि प्रभुत्वाची भावना – अमेरिकन व्यक्तीची आणि समाजाची , सरकारची असल्या मुळे अंतर्गत हिंसाचार आणि जगभर युद्ध खोरी कित्येक दशके आपण बघत आहोत .
    या लेखात वास्तव दाहकपणे मांडले आहे , पण त्याची चर्चा किंवा कारणांचा शोध घेणे अपेक्षित नाही का ?
    हा प्रश्न मनात आला . कारण अशा सामाजिक वातावरणात अमेरिकेतील शिक्षण — उच्च शिक्षण , तेथील नेहमीच श्रेष्ठ कामगिरी करणारी विध्यापिठे , शैक्षणिक संस्था , संशोधन संस्था यांचा संबध कसं काय लावायचा . अशा हिंसक वातावरणात जगभरातील विद्यार्थी , प्राद्यापक अमेरिकेत जाण्यासाठी का धडपडत असतात .?
    अमेरिकेत हिंसा आहे हा एक भाग — ज्या बद्धल वर्तमान पत्रात माहिती येत असते. त्या पलीकडे त्याचा शोध महत्वाचा आहे . असे वाटते .

  2. Atul Vivek KOTA Reply

    अत्यंत छान, भरपुर माहिती, references ने उपयुक्त असा हा लेख ‘ बेछूट’ आहे.
    मला आवडले, कारण – भारतीय रूचीला, अभिलाशेला, मानसिकतेला पटेल असे अनेक rationalizitions, justifications त्यात आहेत, म्हणुन.
    thanks for sharing this, cheers.
    hny-2022 ✌️💎✊👍🏼🙏👌👏🇮🇳🫂🤗🤝

Write A Comment