fbpx
विशेष

रोबॉट माणूस बनताना…

माणसाच्या पेशीतून माणूस जन्माला येतो. अशा माणसाची आपल्याला सवय आहे, तोच माणूस आपल्याला आजवर माहित आहे.

आता धातूचे तुकडे विणून माणूस तयार होतोय आणि त्या माणसाचं काय करायचं असा प्रश्ण मानवजातीसमोर पडला आहे.

धातूचे तुकडे जोडून तयार केलेला माणूस म्हणजे रोबॉट. धातूच्या तुकड्यांची विविध इंद्रियं, त्या इंद्रियांचं व्यवस्थापन करणारा मेंदूही धातूच्या तुकड्याचा. धातूच्या तुकड्याचा प्रोग्रॅम्ड मेंदू. सभोवताली घडणाऱ्या क्रियांना मेदूनं काय प्रतिक्रिया द्यायची आणि ती प्रतिक्रिया धातूच्या अवयवांनी कशी अमलात आणायची याचा कार्यक्रम, प्रोग्राम धातूच्या मेंदूत लिहून ठेवलेला असतो.

शरीरात कुठंही रक्त नाही, मांस नाही असा रोबॉट. परफेफ्ट, निर्दोष, कोणतीही चूक न करणारा, सांगू ती कामं करणारा परिपूर्ण माणूस. जवळपास तयार झालाय. अनेक कारखान्यांत असे रोबॉट वापरले जाताहेत. माणसाच्या मेंदूत जितक्या रासायनिक क्रिया होऊ शकतात त्याच्या कितीतरी पट जास्त क्रिया रोबॉटच्या मेंदूत होऊ शकतात कारण तो एक कंप्यूटर असतो. तो रोबॉट आता रक्तामासाच्या माणसासारखा माणूस बनू पहातोय.

‘आय एम युवर मॅन’ या जर्मन सिनेमात टॉम नावाचा एक रोबॉट दाखवलाय. आयमा नावाच्या संशोधक स्त्रीला कंपनी देण्यासाठी, तिची सगळी कामं करण्यासाठी, तिच्याशी एकरूप होण्यासाठी टॉम तयार केलाय. तो कायच्या काय गणितं क्षणार्धात सोडवू शकतो, त्याला जगाचा इतिहास पाठ आहे. इतकंच नव्हे तर कार चालवतांना सीटच्या पाठीचा अँगल किती ठेवला आणि सीट किती वर उचलली तर अपघात होण्याची शक्यता कितीनं कमी होते तेही या टॉमला माहित आहे. टॉम आयमाचं घर एकदम चकाचक ठेवतो. तो चक्क संभोगही करू शकतो. लोचा असा की चित्रपटाच्या शेवटी तो रोबॉट न रहाता जवळजवळ माणूस होतो आणि मेंदूत घातलेला प्रॉग्रॅम धुडकावून लावून आयमाच्या प्रेमात पडतो.

सिनेमा पहाताना धमाल येते.

ही लोकांना यंत्रमानव वगैरे शिकवणारी प्रवचनात्मक सायन्सवाली फिल्म नाही. चक्क एक रोमँटिक फिल्म आहे. छान नर्म विनोद आहेत. मेलोड्रामा आहे. टॉम भले रोबॉट असेल; देखणा आहे, सुदृढ आहे, कोणीही दाणकन प्रेमात पडावं असा आहे.
रोबॉट किती विकसित होतो, तो माणूसच होतो काय याच्या शक्यता तंत्रज्ञ तपासत आहेत. तो तपास या सिनेमात दिसतो.

विचारवंत, लेखकही हा प्रश्न हाताळू लागले आहेत. कार्ला अँड दी सन नावाची एक कादंबरी प्रकाशित झालीय. ही कादंबरी नोबेल विजेता काझुओ इशिगिरो यांची आहे. या कादंबरीत एआय म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स असलेले रोबॉट आहेत. छोट्या मुलांना त्यांचं एकाकीपण घालवण्यासाठी, त्यांना सवंगडी मिळावा यासाठी हे एआय मित्र तयार करण्यात आलेत. मुलांबरोबर वावरताना आलेल्या अडचणींचा अभ्यास करून या यंत्रमित्राच्या प्रत्येक नव्या पिढीत सुधारणा करण्यात आल्यात.

गंमत म्हणजे या यंत्र मित्रांना हे सारं कळतंय. आपल्या आधीच्या पिढीतल्या यंत्रमित्रांपेक्षा आपण कसे अधिक चांगले आहोत हे यंत्रमित्राला माहित आहे. प्रत्येक यंत्रमित्राला स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. हे यंत्र मित्र सूर्याच्या ऊर्जेवर जगतात. आपण अन्नपाणी घेतो, त्यावर जगतो. यंत्रमित्र सूर्याच्या ऊर्जेवर जगतात. संध्याकाळ झाली की ते मलूल होतात. ढगांनी सूर्य झाकला की ते गळून जातात. कडक ऊन पडलं की ते जोसात येतात.

मुख्य म्हणजे हे यंत्रमित्रं शिकत असतात. टॅब म्हणजे काय, सेलफोन म्हणजे काय, तो कसा वापरतात इत्यादी गोष्टी यंत्रमित्राला माहीत नसतात, त्या गोष्टी तो समजून घेतो, शिकतो. हे यंत्रमित्रं दुकानाच्या शोकेसमधे असताना रस्त्यावर दोन टॅक्सी ड्रायव्हरमधे बाचाबाची, मारामारी होते. एका यंत्रमित्राला वाटतं की ते ड्रायव्हर व्यायाम करत आहेत, खेळत आहेत. मारामारी पहाणारा दुसरा यंत्रमित्र म्हणतो की ते भांडत आहेत,त्यांचे ऊग्र झालेले चेहरे बघ म्हणजे कळेल तुला असं तो यंत्रमित्र दुसऱ्याला सांगतो.

रस्त्यावर एक भिकारी असतो, त्याचा एक कुत्रा असतो. भिकारी म्हणजे काय, जगानं नाकारलेली माणसं म्हणजे काय या गोष्टी यंत्रमित्राला माहित नसतात, कळत नसतात. हळूहळू काही दिवस त्या भिकाऱ्याचं वर्तन पाहून भिकारीपण, समाज इत्यादी गोष्टी यंत्रमित्राला समजू लागतात.

माणूस कसा शिकत गेला? शिकायला त्याला शंभर वर्षं लागली, हजार वर्षं लागली, दहा हजार वर्षं लागली. यंत्रमित्र माणसापेक्षा अधिक वेगानं शिकतो.त्याच्या मेंदूची रचनाच तशी करून ठेवल्यामुळं.

रे कर्झवेल नावाचा तंत्रज्ञ वैज्ञानिक म्हणत होता की तो माणसाचा प्रत्येक अवयव दुरुस्त करेल, प्रत्येक बिघाड दुरुस्त करेल. तो म्हणतो की माणसाला होणाऱ्या व्याधींची मुळं तो माणसाच्या डीएनएमधे हुडकून काढेल आणि तो डीएनएच दुरूस्त करून टाकेल. मग माणूस एकदम परफेक्ट, काहीही दुःख वेदना नसणारा होईल, सहज चार पाचशे वर्षं जगेल. तो म्हणतो की माणूस मरायचंच कारण नाही.

कर्झवेल रक्तामासाच्या माणसामधे सुधारणा करायचं म्हणतो. रोबॉट तयार करणारे तंत्रज्ञ म्हणतात की कशाला ती रक्तमासाच्या माणसाची भानगड. एक कायच्या काय वेगळा माणूस आणि मेंदूच तयार करूया.

आय एम युवर मॅन पहाताना, कार्ला अँड सन वाचताना, आपण चक्रावतो.

माणूस परफेक्ट नाही हीच तर त्याची गंमत आहे. माणसाचा डीएनए बदलून किवा माणूसच नवा तयार करून परफेक्ट माणसं केली तर गंमतच नाहिशी होणार. नकार देणारी स्त्री किंवा पुरुष अधिक तीव्रपणे हवाहवासा वाटतो ही तर माणसाची मजा आहे. शाळेत ज्यानं खूप फटके दिलेत तो मास्तर आपल्याला मोठे झाल्यावर आवडू लागतो हीच तर माणसाची मजा आहे.

आय एम युवर मॅन आनंदात, मजेत, पहाताना आपण विचारात पडतो.

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक व सिद्धहस्त लेखक

Write A Comment