अ – अरे, तुला सांगायचंच राहिलं तुला दाखवलं होतं , ते लाल, ग्रे टोपी घातलेले, इअर टू इअर स्माईल करणारे ‘बोअर्ड एप यॉट क्लब’च माकड ‘ओपन ओशन ‘ वर विकत घेतलं बर्का! माझ्या ८९० डॉलर्सच्या बोलीवर मिळालं बरं का. नाहीतर त्यांची माकडं किती महाग आहेत. सध्या मी ते डिजिटल वॉलेट मधेच ठेवलयं, पण ‘निफ्टी गेटवे’ वरून डिस्प्ले घ्यायचाय लोकांना माकडं दाखवायला !
ब – स्वस्तच मिळालं की ,सप्टेंबरमध्ये ‘सदबीज’च्या ऑक्शनमध्ये १०१ माकडांना २४ मिलियन डॉलर्स, मिळाल्याचं वाचलं होतं मी. त्यांची रंगीत कुत्री पण दीड-दोन मिलिअन डॉलर्सला गेली, म्हणे, आपलं इतकं बजेट नाही ना, म्हणून मी तेव्हा पहिल्या पिढीचे डिनोसॉर आणि डिनोसॉर सॅव्हियर्स घेतले. साधारण तीन एकहजारांना एक प्रमाणे मी १० घेऊन टाकले, ते डिनोज त्यांच्या स्पेशल प्रोग्रॅम नुसार अंडी घालून उबवू शकतात घरच्या घरी, नंतरच्या पिढ्यात ते महाग होणार आहेत फक्त सहाच पिढ्या होणार आहेत. मग ते महाग होत जाणार, अल्गोरिथम मधेच लिहिलंय तसं. तू क्रिप्टोडिनो च्या वेबसाईट वर वाचच. त्यांनी पूर्ण स्टोरी पण दिलीये .
क – काय तुम्ही दोघे. लहान मुलांसारखे डायनॉसॉर्स आणि माकडांचे अवतार घेऊन बसले आहात. आर्टिस्ट पाकच्या ‘द मर्ज’ प्रोजेक्ट ची हुशारी नाही त्यात. तुम्ही जितक्या वस्तूमानाचे पैसे ( १ वस्तूमान (मास) फक्त ५७५ डॉलर्स ) भराल त्यानुसार वेगवेगळं आर्ट देणार तो. आणि जसजसे तुम्ही जास्त वस्तूमान (मास) विकत घ्याल त्यानुसार तुमच्या डिजिटल वॅलेट मधलं चित्र वेगळ्या रंगाचं आणि मोठ्ठं होत जाईल. निफ्टी गेटवे च्या वेबसाईटवर लिहिलचं आहे ठळक अक्षरात
M (२)+ M (१०) =M (१२) ,
म्हणजे आधी तुम्ही २ वस्तूमान विकत घेतलत तेव्हा लगेच तुम्हाला छोटासा गोल मिळाला, मग तुम्ही आणखी वस्तूमान विकत घेतलंत मग तुम्हाला २ वेगवेगळ्या इमेज मिळणार नाहीत काई …तर तुमच्या डिजिटल वॉलेट मधून आधीची फाईल जाणार आणि तुम्हाला मोठा एक गोल इमेज मिळणार!! आहेत कुठे? ह्या प्रोजेक्ट मध्ये पाक ने सर्वाधिक ‘वस्तुमान’ विकत घेणाऱ्यांसाठी फिरती ट्रॉफी पण ठेवलीये. हो ती पण तशीच इमेज आहे पण पूर्ण काळा गोल मिळणार!!
NFT च्या जगात काय चाललय आणि तुम्ही अजून त्याच नॉन-डायनॅमिक इमेज मधेच. पाक आहेच जिनियस. त्याच्या ह्या ‘द मर्ज ‘ प्रोजेक्टमध्ये२,६६,४३४ लोकांनी ५७५ डॉलर्स प्रत्येकी देऊन वस्तूमान विकत घेतलं आणि ‘पाक ‘ कला जगतातला जिवंतपणी सर्वात जास्त कमाई (९२ मिलियन डॉलर्स) करणारा कलाकार ठरला !! (ह्या आधी हा विक्रम जेफ कूनच्या नावावर स्टील सश्याच्या मूर्तीच्या नावे होता). उगीच नाही ‘पाक’ ला NFT जगाचा ‘सातोशी नाकोमोटो’ म्हणत . हा त्याचा पहिला प्रोजेक्ट नाहीये. आधी सुद्धा त्याने एप्रिल मध्ये सद्बीज आणि निफ्टी गेटवेज बरोबर ‘Cubes’ प्रोजेक्ट केला होता. त्यात त्याला तब्बल १७ मिलियन डॉलर्स कमाई झाली. काय आयडिया होती!! उगाच का सदबीज त्यांचे प्रतिनिधित्व करेल.
विंकलवास जुळे भाऊ आहेत ना, तेच ज्यांची ‘फेसबुक’ ची आयडिया म्हणे मार्क झुकरबर्गनी चोरली होती, मग त्यांना जे ६५ मिलियन कोर्टाबाहेर केस मिटवायला मिळाले त्यातून त्यांनी ‘जेमिनी’ हा क्रिप्टो-एक्सचेंज बनवला. आणि आता सहा,सात बिलियन डॉलर्सचे ते मालक आहेत. तेच भाऊ ह्या ‘निफ्टी गेटवे’ चे मालक आहेत. तिथूनच हा पाक जो कोणी आहे तो आर्ट विकतो. तर त्याच्या ह्या ‘cubes’ प्रोजेक्ट मध्ये त्याने लोकांना हलणाऱ्या क्युब्सच्या इमेजेस विकल्या. तिथेपण गम्मत बघा, त्याने सगळ्यांना एकच एक इमेज नाही विकली काही. पण त्याने काय आयडिया केली कि आपल्या चलनातल्या नोटा कशा वेगवेगळ्या मूल्यांच्या असतात, तश्या काही वेगवेगळ्या इमेज तयार केल्या,
जसे १ ओपन एडिशन क्यूब
५ क्यूब्जचा संयुक्त क्यूब
१० क्युब्जचा संयुक्त क्यूब,
२० क्युब्जचा संयुक्त क्यूब,
५० क्युब्जचा संयुक्त क्यूब
१०० क्युब्ज चा संयुक्त क्यूब
५०० क्युब्जचा संयुक्त क्यूब
आणि १००० क्यूब्जचा संयुक्त क्यूब
आणि मग त्यांनी लोकांना २७ क्यूब्जचे पैसे दिले तर २० चा एक , ५ चा एक आणि १ चे २ असे क्यूब्ज दिले. आहे कि नाही ओरिजिनल आयडिया?
शिवाय ट्विटरवर स्पर्धा पण ठेवली . “जो किती क्यूब्ज विकले जातील ह्याचा बरोबर अंदाज लावेल त्याला एक विशेष इमेज आणि जो जास्तीत जास्त क्यूब्ज घेईल त्याला दुसरी एक विशेष इमेज !!( इमेज म्हणण्यापेक्षा ती इमेज तुमच्या वॉलेट मध्ये आहे सांगणारी पावती)
आता पाकच्या इतक्या हुशार कल्पना चालल्या (आधीच त्याच्या आर्टवर विश्वास ठेवणारे मालामाल गुंतवणूकदार आणखी गब्बर झाले ), आता ओपन सी वर त्याच ‘द मर्ज’ च्या इमेज सेकंडरी मार्केट मध्ये विकून आणखी पैसे मिळवतील,पाक मध्ये गुंतवणूक म्हणजे प्रश्नच नाही !!! तुम्ही बसा क्युट मांजरं आणि रंगीत माकडं गोळा करत.
अ – त्याच ‘सद्बीज’ नी ‘बोअर्ड एप यॉट क्लब’ ची १०१ माकडं २४ मिलियन डॉलर्सना विकली, इतकी पण बालिश आवड नाहीये आमची.
ब – आजचे डिनोसोर्स कदाचित उद्या सद् sबीज विकेल, म्हणून तर मार्केट स्वस्त असताना त्यात उतरायला पाहिजे, माझ्यासारखं.
आता ह्या अ, ब आणि क मधला संवाद जरी काल्पनिक असला, तरी संवादातले तपशील मात्र शंभर टक्के खरे आहेत, कुठल्यातरी वेड्यांच्या इस्पितळातले लोकच डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतील अशा गोष्टीवर भुलून लोकांनी ह्या NFT मध्ये गुंतवणूक केल्या आहेत. हे आणि असेच अनेक संवाद रेड्डीट आणि इतर डिस्कशन फोरमवर वाचायला मिळतात, इथे अ, ब आणि क बोलत आहेत एन. एफ. टी. बद्दल.
एन. एफ. टी. म्हणजे ‘नॉन फंजिबल टोकन’ एखादी डिजिटल फाईल, ज्यात जिफ, विडिओ, डिजिटल चित्र नाहीतर म्युझिक असा काहीही असू शकते. अगदी ट्विटरच्या संस्थापकाच्या पहिल्या ट्विट् पासून ते ‘चार्ली बिट मी’च्या विडिओपर्यंत आणि बॅन्क्सीच्या ‘आई कॅन्ट बिलिव्ह यु मोरॉन्स ऍक्च्युल्ली बाय धिस शीट’ ह्या नावाच्या स्क्रीनप्रिंट स्क्रीनच्या जाहीर दहनाच्या व्हिडिओपासून पॅरिस हिल्टनच्या कुत्र्याच्या गुलाबी चित्रापर्यंत कशाचीही एन. एफ.टी. बनवता येते. एन. एफ. टी. म्हणजे काय हे समजायला ‘नॉन -फंजीबिलिटी ‘ म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. समजा माझ्याकडे १ किलो गहू आहे, तर त्याच पोत्यातून मी १ किलो गव्हाचे दाणे तुम्हाला बदलून दिले तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही किंवा १०० रुपयांच्या नोटेबादल्यात, १०० रुपयांची नोट, अगदी बिटकॉइन ह्या बदल्यात दुसरे बिटकॉइन दिले तरी तुमच्या मालमत्तेत फरक पडत नाही. पण जर तुमच्याकडे जगप्रसिद्ध असे ‘मोनालिसा’ पेंटिंग आहे. तितकेच छान दिसणारे आणि तज्ज्ञ नजरेशिवाय फरक समजणार नाही इतके हुबेहूब पेंटिंग बेमालूम त्या मोनालिसाच्या जागी ठेवले तरीही फक्त ते खऱ्या ‘लिओनार्डो –द विंची’ने ते पेंटिंग न केल्याने, त्याचे मूल्य धुळीला मिसळते. म्हणजेच ज्याची अदला-बदल, तत्सम वस्तूबरोबर होऊ शकत नाही अशी कोणतीही गोष्ट -‘नॉन-फंजिबल’ असते. अशा वस्तूची मालकी कुणाकडे आहे ते सांगणारा संगणकीय दस्तऐवज म्हणजे – ‘नॉन -फंजिबल टोकन ‘ एन एफ टी म्हणजे चित्र नाही तर चित्राच्या मालकी हक्काची रिसीट. एन.एफ.टी. बरोबर बऱ्याचदा कॉपी राईट्स ही मिळत नाहीत. बऱ्याच एन. एफ. टी. ते ट्रॅडिशनल कॉपीराइट्स मूळ चित्रकाराकडे, फोटोग्राफरकडे सुरक्षित असतात.
गेल्या दहा -पंधरा वर्षात ब्लॉक-चेन तंत्रज्ञानाने आपली पाळंमूळं, डिजिटल विश्वात अगदी खोलवर पसरवली. सर्वसामान्य व्यक्तीला मध्यवर्ती पार्टीने हिशेब ठेवण्यात प्रॉब्लेम्स काय? हे ही सांगता येणार नाही तरी पण मिडलमॅनरहित हस्तांतरणाची गोडवे अगदी सामान्य माणूसही गाऊ लागला. (सामान्य व्यक्तीला बँकेसारख्या मध्यवर्ती नोंदणीप्रणालीचे जास्त फायदेच आहेत तरीही) सध्या सोप्या शब्दात ब्लॉकचेन म्हणजे काय तर कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी – कोणाकडून कोणाकडे मौल्यवान वस्तू गेली, ह्या ट्रॅडिशनल नोंदीं ऐवजी – कोणती वस्तू कोणत्या (संगणकीय ) पत्त्यावरुन,ब्लॉकचेनमध्ये संलग्न असणाऱ्या कोणत्या पत्त्यावर पाठवली गेली ह्याचा हिशेब ज्यात ठेवला जातो अशी व्यवस्था. अर्थात मध्यवर्ती अशी कोणती प्रणाली ह्या नोंदी ठेवत नसल्याने, हे काम सगळ्यांनी मिळून करावे लागते. आणि मग त्या नोंदी एकमेकांशी पडताळून पाहून त्या खऱ्या आहेत असा ‘एकमताने ठराव ‘ झाला कि त्या गोठवून ब्लॉक मध्ये ठेवतात.
ह्या तंत्रज्ञानात, कोणी कोणाला किती मूल्य हस्तांतरित केले ह्याचा हिशेब न ठेवला गेल्याने बेनामी हस्तांतरण होणे शक्य होते ,कारण कुठून कुठे मौल्यवान वस्तू गेली ह्याचा हिशेब ठेवला जातो , मौल्यवान वस्तू कोणी, कोणाला दिले हा नाही. त्यामुळेच बिटकॉइन सारखा चलनाचा विचार करता, बिटकॉइनचा प्रत्येक तुकडा-सातोषी हा फंजिबल (म्हणजे अदलाबदल झाली तरी मूल्य कायम राहणारा ) असल्याने प्रत्येक सातोषींचा हिशेब ही ‘चलन-विनिमयाचे’ साधन ह्या दृष्टीने बिटकॉइन नाही गरज नसणारी (redundant ) क्रिया आहे. ब्लॉकचेनचा खरा वापर हा नॉन-फंजिबल टोकन हस्तांतरणात होऊ शकतो हाच ब्लॉकचेन चा सर्वात महत्वाचा उपयोग ठरू शकतो.
दुर्मिळ जडजवाहिरांपासून बनवलेले मौल्यवान हेरिटेज दागिने, विशेष महत्वाच्या अशा कलाकृती, अँटिक मूर्ती ह्यांच्या आजच्या बाजारभावात त्यांचे ‘ओरिजिनल ‘ असणे विशेष महत्वाचे असते. टिपू सुलतानाची तलवार, म्हणून तिचे विशेष मूल्य. अगदी तितकीच जुनी आणि तशीच कारागिरी असणारी त्याच काळातली तलवर अगदी जशीच्या तशी असली तरी ती टिपू सुलतनाची नाही म्हणून तिचे मूल्य लगेच घसरते. लोकांना ‘ओरीजिनल’ पीसचंमिळावा म्हणून दर्जेदार मानल्या जाणाऱ्या ऑक्शन हाऊसेस कडेच लोक ती घ्यायचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांना इतर निकषांखेरीज त्याचे अस्सल असणे निर्धारित करायला मदत होते ती वस्तू कोणाकडून कोणाकडे कधी गेली, हे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या हस्तांतरणाच्या इतिहासाची – ज्याला ऑक्शनच्या भाषेत ‘प्रोव्हिनन्स’ म्हणतात. हा इतिहास जितका विश्वासार्ह तितक्याच विश्वासाने श्रीमंत गुंतवणूकदार डोळे मिटून गुंतवणूक करू शकतो
कोणताही मध्यस्त, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीत मध्यवर्ती ठिकाणी मध्ये मालकीहक्क नोंदवत नसल्याने, आणि नोंदी ह्या सगळ्यांनी सहमतीने ठेवलेल्या असल्याने त्या ‘डिजिटल प्रोव्हिनन्स’ मध्ये बदल करणे तितकेसे सोपे नसते, म्हणून अशा मौल्यवान गोष्टींची नोंद ब्लॉकचेन वर करणे, हा ब्लॉकचेनच्या संभाव्य उपयोगामधला महत्वाचा उपयोग ठरू शकतो.
आता ब्लॉकचेन वर ज्याच्या उत्पत्तीचा इतिहास ठेवला गेलेली अशी, समकालीन प्रत्येक कलाकृती मौल्यवान असेलच असे नाही पण, कोणास ठाऊक का पण लोक ते तारतम्यच गमावून बसलेत कि काय वाटावे अशी परिस्थिती NFT च्या बाजारपेठांमधून फेरफटका मारला तर दिसते. एन.एफ.टी म्हणजे ज्या डिजिटल कलाकृतीचा हिशेब ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवला आहे ती वस्तू. ह्या टोकन मध्ये ज्या संगणकीय पत्यावर विकलेली कॉपी डिलिव्हर झालीये तो संगणकीय पत्ता. ती मूळ कॉपी असेल असाही नाही कारण कॅनवासवरच्या चित्राची अगदी हुबेहूब कॉपी बनवणे मूळ चित्रकारही शक्य नसतेच. पण डिजिटल माध्यमाला ती सीमा नाही. इनफॅक्ट तोच तर डिजिटल माध्यमाचा युनिक सेलिंग पॉईंट आहे. अगदी पिक्सल बाय पिक्सल जसेच्या तसे डिजिटल चित्र आपण फक्त राईट क्लीक करून आपापल्या डिजिटल युनिट्स वर साठवून ठेऊ शकतो. अगदी श्रीमंत लोकांची गोष्ट सोडू पण अनेक NFT परवडण्याजोग्याही आहेत आणि सामान्य लोकच त्या विकत घेत आहेत. एका रिपोर्ट नुसार मध्यम वर्गीय ३८-४० वर्षाचे पुरुष हाच NFT चा जास्तीत जास्त ग्राहक आहे. असे का होत असावे?
रॉबर्ट श्चिलर ह्या नोबल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्र्याचा ‘असेट बबल ‘ विषयात सखोल अभ्यास आहे. त्यांच्या मते, एक ‘असेट बबल’ तयार झाला आणि फुटला असे ते शक्यतो होत नाही. तर हा बबल कधी मोठा होतो कधी आक्रसतो. खूप वर्ष हे चक्र चालूच राहते. त्यांच्या मते, लोक स्वतःला एखाद्या मालमत्तेच्या किमतींविषयी काय वाटतं, ह्यापेक्षा इतर लोकांच्या भविष्यातल्या किमतींविषयी काय अपेक्षा असू शकतात, ह्या आडाख्यांवर स्वतःच्या गुंतवणुकीचे निर्णय घेतात, त्यामुळे स्वतः रॉबर्ट श्चिलर ह्यांनी बिटकॉइन मध्ये हा ‘बबल-फॅड’ असूनही ते गुंतवणूक करू शकतात असे मत नोंदवले. त्यांच्या मते NFT हा बबल नाही, फॅडही नाही तर ती एक ‘साथ ‘आहे.
२०१४ त केविन मेकॉय ने तब्बल १.४ मिलियनला डॉलर्स ला पहिली एन.एफ.टी विकली, पुढच्या एक दोन वर्षात वर्षात ‘गेमिंग कॅरेक्टर्स’, गेमिंग मधल्या बंदुका वगैरेच्या स्वरूपातले, डिजिटल आर्टचे मार्केट बदलले. जसजसा लोकांचा विश्वास ब्लॉकचेनवर बसला तसतसे त्यांनी बाजारपेठेत क्रिप्टोकीटी, सायबरपन्कसारखे १०,००० संख्येतले लिमिटेड एडिशन डिजिटल प्राणी उतरले. आर्टिस्ट्स ना आपले असे अवतार, चित्र वगैरें एन.एफ.टी.त सामावून घेण्यासाठी ब्लॉकचेन मध्ये जोडून घ्यावे ह्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रॅम्स आणि ऍप्स ना साधारण एका बातच साठी २०० ते ३०० डॉलर्स गॅस फी म्हणून द्यावे लागतात. त्यांचा उदय जसा झाला तसाच एन.एफ.टी विनिमय करायला २०१७ त ओपनसी तर २०१८ मध्ये निफ्टी गेटवे सारख्या कंपन्या उगवल्या. डिजिटल स्पेस मध्ये पावसाळी भूछत्र्यांसारख्या अचानक उगवलेल्या अनेक वेबसाइट्स फक्त डिजिटल चित्रकारांनाच नाही इतर अनेक प्रकारच्या कलाकारांना भुरळ पाडू लागल्या. वोग मॅगझीन असो किंवा नाइके शूज. प्रत्येक जण डिजिटल स्पेस मध्ये आपलीपण एखादी एन.एफ.टी घालून ठेऊ म्हणून प्रयत्न करताना दिसला. पण तरी पारंपारिक कलेला जी ‘किंमत’ ऑक्शन मिळवून देतो ती मिळाली नव्हती. डिजिटल कलेला नवी ‘किंमत मिळवून दिली ती ‘बीपल’ने. ह्या बीपल नावाने कलाकारी करणाऱ्या माईक विंकलेमनची ‘५००० डेज‘ ही कलाकृती तब्बल ६९ मिलियन डॉलर्सला क्रिस्टीजनी लिलावात विकली पुढे ह्या किमतीवर काही तज्ञानी आक्षेपही नोंदवले. ज्या व्यक्तीने बीपलचे हे मोठे चित्रं विक्रमी किमतीत विकत घेतले. त्याचं व्यक्तीने ह्याच कलाकाराचे अगोदरचे चित्र हि विकत घेतले होते. अगोदरच्या चित्राचे हक्क त्याने २० भागात विभाजित करून विकायला काढले तेव्हाच इकडे त्याने बोली लावायला सुरुवात केली. त्या २ एक महिन्यात, जसजशी इकडे किंमत वाढली तसतशी त्याच्या अगोदरच्या चित्राची किंमत वाढली आणि त्यातून त्याने फायदा कमावला असा आक्षेप त्याच्यावर घेतला गेला तरी कायदेशीरदृष्ट्या अजूनतरी त्याला ‘इन -साईडर’ माहिती आधारे त्याने गैरफायदा घेतला असे म्हणता येत नाही.
पण ह्यातला विरोधाभास बघा, ज्यात मध्यस्त नाहीत हाच ज्या तंत्रज्ञानाचा युनिक सेलिंग पॉईंट आहे, त्याच तंत्रज्ञानावर आधारित कलाकृतीची किंमत वाढवण्यासाठी त्याच पूर्वीच्या मध्यस्थाची मदत घ्यायला लागावी.
हे पूर्वपरंपरागतरित्या गर्भश्रीमंतांच्या खिश्यात राहणारे, क्रिस्टीज, सदबीज सारखे आर्ट डीलर्स, श्रीमंतांना गैरकायदेशीर मार्गातून येणाऱ्या डागाळलेल्या पैशांना, उजळवून द्यायचही काम करतात. देशोदेशी वेगवेगळे कायदे आहेत, नाही अस नाही, पण श्रीमंतीच्या मर्जीवरच तर प्रत्येक देशातली सरकार चालतात, त्यामुळे पळवाटा सोडूनच कायदे बनवले जातात आणि मग कायद्यांची अंमलबजावणी म्हणजे फक्त ‘कागदावर रकाने भरणे’ होऊन बसते. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रत्येक ऑक्शन हाउसला प्रत्येक विकत घेणाऱ्या व्यक्तिच्या उत्पन्नाचा स्रोत हा गुन्हेगारीतून आला नाही ह्याची खातरजमा करून घ्यावी लागते. पण आर्ट हाउस मध्ये लोक मॉल मध्ये खरेदी करायला जावे तशी खरेदी करत नाहीत. त्यांच्या ह्या गुंतवणुकी एजन्ट्स थ्रू होतात, आर्ट हाउस चे एजन्ट, खरेदीदाराच्या एजन्ट्सशी बोलणी करतात तेव्हा बऱ्याच खरेदीमध्ये फायनल विकत घेणारा कोण हे अँडिसक्लोज्डच राहते. आर्ट हाऊस ही जबाबदारी खरेदीदाराच्या एजन्ट्सनी पार पडलीच असावी अशी बतावणी करून, केली पडताळणी म्हणून रकाने भरतात. वेगवेगळ्या देशात स्थापन केलेल्या कंपन्या, ट्रस्ट, पार्टनरशिप्सच्या जाळ्यातून खूप सारी चित्र, शिल्प आणि तत्सम मालमत्ता विकत घेतली जाते आणि अशी फिरवली जाते कि कोणती वस्तू कुठे आहे आणि त्याबद्दल फेरपाडताळणी करायची तर ते हक्क मागण्यातच १० सरकार दरबारी खेटे घालावे लागावेत.
ह्या उद्योगात त्यांची साथसंगत देतात ते हे सद्sबीज, क्रिस्तीज सारखे एजन्ट्स. कागदोपत्री सगळं आलबेल करायला ते प्रसंगी गर्भश्रीमंतांना लोनहीदेतात. आता बऱ्याचदा हा सारा उद्योगच कागदोपत्री फायदे करून द्यायला असल्याने, बऱ्याचदा ना लोकांना विकत घेतलेली आर्ट बघायची असते ना त्या अशक्य महाग वस्तूची निगराणीचा बंदोबस्त करायचा असतो . बऱ्याचदा करचुकवी ऑक्शन हाऊसेस आणि विकत घेणारे दोन्ही हा व्यवहार लक्सेमबर्ग सारख्या ‘टॅक्स हेवेन्स’ मध्ये करतात. आणि ती पेंटिंग्स कधी वेयरहाऊस सोडत सुद्धा नाहीत. अशी वेयर हाऊसेस अशा देशात फ्री पोर्ट मध्ये असतात आणि मोठी फी आकारून मोठमोठी प्रसिद्ध पेंटिंग्स गोदामात पडून राहतात. कागदावर मालक बदलतात. तरी डिलिव्हरी देण्या– घेण्याची सिम्बॉलिक वेळ येतेच. आणि अशाच पार्श्वभूमीवर, श्रीमंत आणि ऑक्शन हाऊस ह्या दोघांसाठी डिजिटल आर्ट हा मोठा आकर्षक पर्याय आहे. सर्वसामान्य माणूस, अ, ब आणि क, सर्वसामान्य चित्रकार ज्यांना ऑक्शन हाऊसचे पाठबळ नाही त्यांच्यासाठी ते एक मृगजळच आहे.
पण म्हणतात ना उम्मीदपे दुनिया कायम है. स्वप्न बघताना लॉजिक गुंडाळून ठेवावं लागतं म्हणे आणि जोवर स्वप्न आहेत तोवर लोक डिजिटल माकडं, कुत्रे ,मांजरी काय तर पिक्सल्सच्या मालकीच्या रीसिट्स घेतच राहणार. आणि एन एफ टी ची नवनवी प्रदर्शने ट्रॅडिशनल मध्यस्थ भरवत राहणार.त्यामुळे मूळ संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे होत नाही का ह्या सारख्या लॉजिकल विचारात येत्या काही दिवसात मी पुन्हा पुन्हा पडत राहणार, असं दिसतंय.
एन एफ टीच्या स्वप्ननगरीच्या मायाजालात जरी मी अडकले नाही तरी लोक काय विकत घेऊ शकतात ह्याचे आडाखे मांडण्याच्या वैचारिक भूलभूल्लयातून मला मला कोण वाचवणार?