सध्याच्या करोना साथीमुळे भारताच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत. स्पॅनिश फ्लू साथीचे उदाहरण आपल्याला भविष्यात करोना साथीनंतरच्या भारतीय समाजाचे चित्र स्पष्ट करण्यास मदत करू शकते. या लेखात होऊ घातलेल्या बदलांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी भारतात पहिला करोनाचा बाधित रुग्ण केरळ येथे आढळला. चीनमध्ये सुरुवात होऊन सध्या जगभर करोनाची साथ पसरलेली आहे. सध्य स्थितीस भारतात ८२७८८ करोनाचे रुग्ण असून, २६५७ बळी गेलेले आहेत, याचबरोबर २८५९० रुग्ण संपूर्णपणे बरे झालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सध्याची करोना साथ ही जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे संकट आहे. जवळ जवळ सगळे देश लॉकडाउन मध्ये असून, नागरिकांना अनावश्यक बाहेर फिरण्यास आणि काम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत हे संकट खूपच वेगळे आहे. प्रत्यक्ष युद्धभूमी वगळता जगातील इतर भाग आणि देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या चालू होते. युद्ध चालू असल्यामुळे अन्नधान्य, युद्ध सामुग्री, तंत्रज्ञान संशोधन आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंची मोठी मागणी तयार झाली होती. यामुळे युद्धाचा परिणाम जरी वाईट असला तरी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बहुतेक जग सुरू राहिले होते.
करोना साथीच्या संकटात संपूर्ण जग सामाजिक, आर्थिक आणि बहुतेक प्रमाणात राजकीय दृष्ट्या बंद पडलेले आहे. अशी घटना भांडवली जगाच्या किंवा औद्योगिक क्रांतीनंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. यामुळे या संकटाचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज लावणे अत्यंत महत्वाचे आणि अवघडही आहे. समाजाच्या आरोग्यावर आघात करणाऱ्या या संकटाचे दुष्परिणाम आपल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संस्थांवर होणे क्रमप्राप्त आहे.
१९९१ नंतर भारतात आणि त्याचबरोबर जगात झपाट्याने झालेल्या जागतिकीकरणामुळे जगातील प्रत्येक देश आणि नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर एकमेकांजवळ आलेले आहेत. उदाहरणादाखल चीनच्या वुहान प्रांतात सुरु झालेली करोना साथ झपाट्याने जगभरात पसरवण्यात विमान प्रवास करणाऱ्यांचा खूप मोठ सहभाग राहिला आहे. जगभरातील लॉकडाउनची स्थिती सगळ्याच देशांवर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संकट आणणारी आहे. जागतिकीकरणामुळे जोडले गेलेल्या जगामध्ये हे संकट खूप कमी वेळेत मोठे रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
स्पॅनिश फ्लू साथीचा भारतावरील परिणाम
१९१८ ते १९१९ च्या काळात जगभरात थैमान घातलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने अविभाजित भारतात जवळ जवळ २ कोटी म्हणजे त्या वेळेच्या लोकसंखेच्या ६% बळी गेले. साथरोगशास्र संशोधक सिद्धार्थ चंद्रा यांच्या मते, सप्टेंबर १८१८ ला पहिल्या महायुद्धातून परत आलेल्या सैनिकांच्या बोटीतून मुंबई मध्ये स्पॅनिश फ्लूची सुरुवात झाली. ऑक्टोबर १९१८ पर्यंत उत्तर भारतात झपाट्याने स्पॅनिश फ्लू पसरला. याचे प्रमुख कारण रेल्वे होती असे ते म्हणतात. पत्रकार सौत्विक विश्वास यांच्या मते भारतात या साथीचा प्रादुर्भाव झाल्यावर ब्रिटीश अधिकारी सर्व काही मागे सोडून थंड हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते . तत्कालीन ब्रिटीश सरकारने साथीचा प्रादुर्भाव वाढण्याचा ठपका भारतीयांच्या अस्वच्छ राहणीमानावर ठेवला. शेवटी भारतातील स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि जनतेनेच पुढाकार घेऊन फ्लु निवारण कमिट्या बनवून बाधित रुग्णांची सुश्रुषा करण्यास आणि रोगाविषयी जनजागरण करण्यास सुरुवात केली. उत्तर भारतात स्पॅनिश फ्लूची साथ इतकी भयंकर होती कि मृतदेह जाळण्यास लाकूड नसल्यामुळे गंगा नदीचे पात्र मृतदेहांनी भरून वाहत होते. तत्कालीन भारतातील आरोग्य अधिकाऱ्याच्या मते ही स्थिती जवळ जवळ भारताच्या सर्वच नद्यांमध्ये होती. पुढे सन १९१९ मधील देशात कमी पावसामुळे आलेल्या दुष्काळात अजून लाखो लोकांनी कुपोषण आणि उपासमारीने प्राण गमाविले.
इकॉनॉमिक टाईम्स मधील लेखात अमित कपूर म्हणतात, “स्पॅनिश फ्लूमुळे सर्व वयोगटात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. खालच्या जातीतील दर हजारी ६१ लोक मरण पावत होते तर उच्चवर्णीयांमध्ये हेच प्रमाण १८.९ होते. याचबरोबर ब्रिटीश लोकांमध्ये हे प्रमाण ८.३ होते. स्पॅनिश फ्लूच्या संकटामुळे भारतातील संपूर्ण समाज रोग निवारणाच्या एका ध्येयासाठी काम करू लागला, यामुळे महात्मा गांधी आणि कॉंग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीस ग्रामीण आणि शहरी भागात चांगले समर्थन मिळू लागले.”
स्पॅनिश फ्लूमुळे १९१८-१९ मध्ये भारत संपूर्णपणे बदलून गेला होता. आपल्या समाजातील जातीव्यवस्था आणि स्रीचे दुय्यम स्थान यामुळे साथीच्या काळात खालच्या जातीतील लोकांनी आणि स्रीयांनी सर्वात जास्त जीव गमावले. ब्रिटीश सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी नसल्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली. स्वातंत्र्याची चळवळ, अस्पृश्यता निर्मुलन, जातीअंताची लढाई आणि स्रियांचा चळवळीतील सहभाग वाढला. विशेष करून भारतात प्रखर राष्ट्रवादाची सुरुवात याच काळात झाली. स्पॅनिश फ्लूचे उदाहरण आपल्याला हे दाखवून देते की, एका रोगाच्या साथीमुळे भारतात कशा प्रकारे समाजिक व राजकीय स्थित्यंतरे झाली आणि नवीन बदलाचे वारे कसे वाहू लागले.
करोना साथ आणि सध्याचा भारत.
भारतातील करोना साथ येण्याचे मुख्य कारण विदेशातून विमान प्रवास करून येणारे नागरिक ठरले. सुरुवातीपासून केंद्र सरकारचा या बाबतीतील प्रतिसाद नगण्य राहिला. सरकारचे संपूर्ण लक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष्य डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीच्या तयारीकडे होते. जशी साथ पसरू लागली तसे सरकार जागे झाले. आधी एक दिवस देश बंद ठेऊन, नंतर फक्त चार तासांचा अवधी देऊन कोणतेही व्यवस्थापन न करता २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु केला. तो आता वाढतच जात असून साथ न संपल्यामुळे तो मागे घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांना योग्य कालावधि मिळणे कठीण होत चालले आहे.
दिल्ली येथील निजामुद्दिन दर्गा आवारात तबलीग जमात या मुस्लिम संघटनेची सभा भरली होती. या सभेत वेगवेगळ्या देशांतून आलेले करोना बाधित मौलवी सहभागी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे या रोगाचा प्रसार झाला. वेगवेळ्या राज्यातून या सभेत सहभागी झालेले लोक बाधित होऊन परत आल्यानंतर त्यांच्यामुळे पुढे करोनाचा प्रभाव वाढला, असा एक भ्रम या निमित्ताने बहुतांशी उजव्या विचारसरणीच्या वृत्तवाहिन्या व काही वृत्तपत्रांनी पसरवण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यातून मग करोना साथीच्या प्रसारासाठी फक्त तबलीग जमातच कारणीभूत आहे असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली.
प्रसारमाध्यमांनी तबलीग जमातला धारेवर धरून मुस्लिमांच्या विरोधात विष पेरायला सुरुवात केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून पद्धतशीरपणे मुस्लिम विक्रेते भाजी, फळांवर थुंकून करोना पसरवित असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. विलगीकरण कक्षात मुस्लिम रूग्ण अश्लिल, अभद्र चाळे करत आहेत. मुस्लिमबहुल भागात मदत करायला गेलेल्या डॉक्टर्स, परिचारिका आणि पोलिसांवरही काही ठिकाणचे हिंसक हल्ले खूप अतिशोयक्ती करून प्रसारित केले गेले. या सगळ्या गोष्टींचा परिमाण असा झाला कि संपूर्ण देशात मुस्लिम धर्मियांच्या बाबतीत एक द्वेषाचे वातावरण पसरले.
या सगळ्याच्या परिणामस्वरूप रस्त्यावर भाजी आणि फळे विकणाऱ्या मुस्लिम लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली. काही हिंदू मुलतत्ववादी संघटनांनी हिंदू फळे आणि भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांच्या गाडीवर भगवे झेंडे लावायला सुरुवात झाली. मुस्लिम द्वेष इतका वाढला की काही ठिकाणी मुस्लिम विक्रेत्यांना मारझोड करण्यात आली तर काही गावांमध्ये शिरकाव करण्यास बंदी घालण्यात आली.
लॉकडाउनचा सर्वात जास्त वाईट परिणाम हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीय कमागरांवर झाला. काम बंद झाल्यामुळे हातात पैसे नाहीत. अन्न धान्य संपल्यामुळे त्यांची उपासमार वाढली. घराच्या दिशेने निघावे तर रस्ते आणि रेल्वे बंद. संपूर्ण देशाच्या रस्त्यांवर आज हे कामगार पायी चालून घरी जातानाचे चित्र दिसत आहेत. केंद्र सरकारने या कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविल्या. परंतु कामगारांकडून प्रवासाचे भाडे आणि अतिरिक्त अधिभार लावून सरकारने त्यांची पिळवणूक करायला सुरुवात केली. या विरोधात आवाज उठल्यावर केंद्र सरकारने नमते घेऊन ८५% तिकिटाचे पैसे देण्याचे कबुल केले. पण अजूनही बहुतांश ठिकाणी कामगार संपूर्ण तिकिटाचे पैसे देऊन प्रवास करत आहेत.
गावाकडे हजारो किलोमीटर पायी चालत असताना कामगार उपासमार, अतिश्रम आणि उष्माघाताने रस्त्यात मरण्याच्या बातम्या येत आहेत. रस्त्यावर आणि रेल्वे रुळावर चालत जात असताना अपघाताने कामगार मरत आहेत. स्थलांतरित कामगारांची ही परिस्थिती काही प्रसारमाध्यमे दाखवत आहेत, परंतु बहतेक प्रसारमाध्यमे कामगारांविषयी काहीच दाखवत नाही. दुसरीकडे विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ‘वंदे भारत’ मिशन राबवून फुकट भारतात आणले जात आहे. यामुळे सध्याच्या सरकारची प्राथमिकता काय आहे ते स्पष्ट आहे. त्यातल्या त्यात गरीब आणि स्थलांतरित मजुरांना स्पष्टपणे समजत आहे की हे सरकार त्यांच्यासाठी नाही.
करोना साथीनंतर भारत कसा असेल.
भारतातील सध्याच्या उजव्या विचारसरणीच्या संस्था, संघटनांनी या साथीच्या प्रसाराचा ठपका भारतीय मुस्लिम समाजावर आधीच टाकला आहे. गेल्या ९० वर्षांत पेरलेल्या मुस्लिम द्वेषाने आत विक्राळ रूप धारण केले आहेत. देशभरातील उजव्या विचारसरणीच्या संस्था संघटना मुस्लिम द्वेषाला आता संस्थात्मक रूप द्यायला लागल्या आहेत. या सगळ्याचे भविष्य खूप भयानक असू शकते. भारतातील मुस्लिमांचे व्यवसाय, उपजीविकेची साधने आणि राहण्याच्या ठिकाणांवर बहिष्कार टाकणे आता सुरु झाले आहे. या परिस्थितीचे साम्य पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उदयाच्या काळात ज्यु लोकांवरील सामाजिक बहिष्काराशी दाखवते.
आपला भारतीय समाज जातीव्यवस्थेत विभागाला गेला आहे. बहुतांश स्थलांतरित कामगार हे ओबीसी, दलित, आदिवासी आहेत. यामुळे त्यांच्या विरोधातील जाती आणि वांशिक द्वेष अजून वाढीस लागणार आहे. गावी परत आलेल्या मजुरांना गावात येऊ न देण्याच्या घटना वाढत आहेत. एक तर हे मजूर बहुतांश दलित-ओबीसी असल्यामुळे त्यांच्याबाबत आधीच जातीय द्वेष आहे. आता करोनाच्या भीतीने तो द्वेष अधिकच वाढण्याची भिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अस्पृश्य मुळचे कोण या पुस्तकात, बौद्ध लोकांचा तिरस्कार आणि द्वेष हे अस्पृश्यता सुरु होण्यासाठीचे महत्वाचे कारण आहे असे म्हटले आहे. भारतीय समाजात उजव्या विचारसरणीचे जातिगत आणि धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन देणारे अति-अधिकारवादी सरकार आज सत्तेत आहे. करोना साथीच्या काळात अजून जास्त राजकीय सत्ता एकवटण्यावर या सरकारचा जोर असणार आहे. २०१४ पासून सरकारने केलेले अर्थव्यवस्थेचे वाटोळे आता ते करोनाच्यामुळे येणाऱ्या आर्थिक संकटावर टाकून स्वतःची जबादारी झटकणार आहे. सरकार आत्मनिर्भरतेच्या नावाखाली आणि स्वदेशीचे ढोंग घेऊन फक्त सत्तेवरील पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या सगळ्यातून भारतीय समाजाला मुक्त करून एक निकोप व समतामूलक समाज निर्माण करायचा असल्यास त्यासाठी परिवर्तनावर विश्वास असणाऱ्या प्रगतीशील नागरिकांनी कुठल्याही द्वेषापासून समाजाला मुक्त करण्यासाठी कंबर कसणे गरजेचे आहे. द्वेष पसरवणाऱ्यांशी प्रसंगी वैचारिकदृष्ट्या व प्रसंगी आंदोलनात्मक मार्गाने दोन हात करणे हेच या प्रश्नाचे उत्तर असू शकते.
1 Comment
Khupach marmik vastavashi julnara Vivechan Jinda…