fbpx
विशेष

फिल्मी प्रचार मोहीम

उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी ठाण्यावर हल्ला केला आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्काराने  सर्जिकल स्ट्राइक केला. अर्थात असे सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही भारतीय लष्कराने अनेकदा केले होते. मात्र भारतीय लष्कराचे श्रेय लोकनियुक्त सरकारने घेण्याच्या प्रथा तेव्हा पडलेल्या नव्हत्या. उरीनंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक मात्र छप्पन इंच छातीच्या नरेंद्र मोदी यांच्या कणखर भूमिकेमुळेच होऊ शकला, या प्रचाराची राळ देशभरातील मोदी भक्तांनी उडवून दिली होती. या उडवलेल्या राळेचं हिंदी चित्रपटसृष्टीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे या आठवड्यात प्रदर्शित झालेला उरी हा सिनेमा. भारतीय जवानांच्या बरोबरीने या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोलाचा वाटा कोणाचा राहिला असेल तर विष्णू पुराणातल्या गरुडावरून प्रेरणा घेऊन गरुडाच्या आकाराचे ड्रोन बनवणाऱ्या इस्रोसदृश्य संस्थेतील एका बचकांड्या पोराचा! होय हे खरं आहे. लष्करासाठी शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्या इस्रोसदृश्य संस्थेमध्ये एक विद्यार्थी विष्णू पुराणावरून प्रेरणा घेऊन उडणारा गरुड-ड्रोन बनवतो आणि हा गरुड पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची सगळी माहिती थेट रेकॉर्ड करून पाठवतो. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या उरी” या चित्रपटातला हा प्रसंग.

त्यानंतर शुक्रवारीच मोठा गाजावाजाकरत प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट म्हणजे  द अॅक्सिडंटल प्राइम मिनिस्टर.” त्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कसे गांधी घराण्यापुढे हतबल झाले होते हे जनतेच्या मनात ठसवण्यासाठी सोनिया गांधीराहूल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना कपटीकारस्थानी असं दाखवण्यात आलं आहे. खरंतर चित्रपटाची कथा काँग्रेसवर असली तरी शेवटी प्रतिमा मात्र नरेंद्र मोदी यांची उजळवण्याचा केविलवाणा प्रयत्न यामध्ये केलेला दिसतो. पुढच्या आठवड्यामध्ये माजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही प्रदर्शित होत आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने मोदी सरकारने पहिल्या दोन चित्रपटांमधून आपल्या सरकारविषयी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या मोदी यांनी पहिल्यापासून वापरल्या मग ते सोशल मिडिया असो वा जाहिराती. यावेळी चित्रपटाचाही त्यांनी वापर केला.  

एकूणच मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी आपला कार्यक्रम राबवण्याची जोरदार मोहीम उघडली. आधी काय तर एकदम देशभक्तीचा मुद्दा हाती घेतला. मग भारतमाता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणा आणल्या. सैनिकांच्या प्रती त्यांचं प्रेम उतू जाऊ लागलं आणि या घोषणा न देणारे थेट देशद्रोही ठरू लागले. कोणत्याही नेत्यानेराष्ट्र के हित में” असं म्हणायला सुरुवात केली की समजावं त्याचा प्रवास फॅसिझमच्या दिशेने वेगाने सुरू झाला आहे. हिटलरने ज्यूंच्या कत्तलीही राष्ट्राच्या हितातच किंबहुना ज्याला पितृभू मानत होता त्या जर्मनीच्या भल्यासाठीच केल्या होत्या की. मोदी सरकारने या राष्ट्रवादाच्या लाटा कधी भारतमातेच्या नावाने किंवा कधी गोमातेच्या नावाने आणून देशभक्तीच्या कसोट्या तयार केल्या आहेत. मग माध्यमंसमाजातील उच्छृंखल गट याला अपवाद कसे काय राहणारयाच देशभक्तीचा प्रत्यय उरी हा चित्रपट पाहताना वारंवार येतो. गोष्ट २०१६ मधली. आपल्या सर्वांनीच ती पाहिली आहे. उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ला झाल्यावर भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव वाढला.  मोदी भक्तांनी तर आता युद्ध होऊनच जाऊ दे आणि पाकिस्तानला बेचिराख करून टाका असा धोशाच लावला. अनेक भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या विरोधात प्रक्षोभक भाषणबाजी करून वातावरण पेटतं ठेवलं. मग पाकिस्तानी खेळाडू आणि चित्रपट कलावंतांबाबतही विरोधाचा एक सूर आळवला गेला. अशावेळी थेट युद्ध न करता पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याचा उपाय पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार ( परेश रावल यांची भूमिका ही अजित डोवाल यांच्यावरच बेतलेली आहे.) डोवाल यांची  या पदी नियुक्ती झाल्यापासूनच ते कसे जेम्स बॉन्ड” पेक्षा कमी नाहीत आणि देशाला अनेक संकटातून त्यांनी कसं वाचवलं आहे याच्या अनेक सुरस कहाण्या माध्यमांमधील भक्तांनी चविने चघळल्या होत्या. सिनेमातील ही डोवाल यांच्यावर बेतलेली व्यक्तिरेखा (परेश रावल)  सर्जिकल स्ट्राइकची कल्पना म्युनिक ऑलिंपिकच्यावेळी त्यांच्यावर पॅलेस्टाईनसाठी लढणाऱ्या एका अतिरेकी जथ्थ्याने इस्रायली खेळाडू चमुंच्या केलेल्या हत्यांचा बदला युरोपातील विविध ठिकणी विखुरलेल्या या संघटनेशी संबंधितांचा मोसादने कसा बळी घेतला होता त्यावरून सुचल्याचे या सिनेमात म्हटले आहे. बहुदा यावर निघालेला व गाजलेला म्युनिक नावाचा सिनेमा पाहून लेखक दिग्दर्शकाला या सिनेमाची कल्पना सुचली असण्याचीच शक्यता अधिक आहे. इस्त्रायलबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटणारे कोतुक सर्वश्रुतच आहे. अमेरिकी डॉलर्सच्या मदतीवर उभ्या असणाऱ्या या देशाच्या प्रगतीचं कोण कौतुक भाजप आणि संघवाले कायम करत असतात. तर मुद्दा असा कीउरी सर्जिकल स्ट्राइकची आखणी सुरू होते. पण त्यासाठी माहिती जमवणं हे मोठं जिकरीचं काम असतं. मग डोवाल सदृश्य व्यक्तिरेखा सुपरमॅनच्या भूमिकेत शिरते. परेश रावल यांनी ही डोवाल यांच्यासारखी दिसणारी भूमिका मात्र उत्तम केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावबोलण्याची पद्धत एकदम हुबेहुब आहे. गंमत म्हणजे या सर्जिकल स्ट्राइकबाबत मोदी (रजत कपूर) चक्क मंत्र्यांना विश्वासात घेऊन मत वगैरे विचारताना दाखवले आहेत. मग त्यात मनोहर पर्रिकरराजनाथ सिंगसुषमा स्वराज यांच्यासारखी दिसणारी पात्रं मस्त जमवली आहेत. पण एक-दोन संवादापलिकडे त्यांचं काहीच काम नाही (हेही अगदी वास्तवदर्शी म्हणावं असंच).  

आता माहिती जमवण्यासाठी काय तर वर सांगितलेला गरुड तयार केला जातो. मग खास सैनिकांची एक टीम निवडून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ते थेट निघतात कामगिरीवर. यांचं नेतृत्व विहान शेरगिल (विक्की कौशल) या अत्यंत धाडसी मेजर करत असतो. मग त्यात अनेक अडचणी येतातपण त्यावर मात करून मिशन फत्ते होतं. या दरम्यानपाकिस्तानपाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा अगदीच मूर्ख आणि बावळट असल्याचं दाखवणं स्वाभाविक आहे. मला आठवतं १९९०-२००० च्या दरम्यान असे चित्रपट खूप यायचे. ज्यामध्ये भारतीय सैनिकांचं शौर्य दाखवण्यासाठी पाकिस्तानला अगदीच मूर्ख दाखवलं जायचं. प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानसोबत पूर्ण युद्ध इंदिरा गांधींनी हा देश तोडून बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर एकाही सरकारने दाखवलेलं नाही. याचं कारण बदललेले आंतरराष्ट्रीय संदर्भ. पाकिस्तान भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेसाठी इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे की अमेरिकेची त्यांना असलेली मदत कधीच थांबत नाही व कायम परदेश दौऱ्यांवर राहणाऱ्या मोदी यांच्या पंतप्रधान बनल्यानंतर तर पाकला चीनचाही पाठिंबा मिळाला आहे. युद्धज्वर आणि युद्ध यात जमिन अस्मानाचा फरक असतो हे सिनेमात विसरलं तर हरकत नाही. पण प्रत्यक्ष राजकारणात विसरता येत नाही हे छप्पन इंची छातीवाल्यालाही पाकिस्तानसोबत पूर्ण युद्ध न छेडता आल्याने सिद्धच झाले आहे. 

राजकीय प्रचारासाठी सिनेमांचा वापर करणारे मोदी काही एकटे नाहीत. हिटलर सत्तेत आल्यावर त्याचा प्रचार मंत्री गोबेल्सने तर संपूर्ण नाझी चित्रपटसृष्टीच निर्माण केली होती. गंमत म्हणजे १९३३ मध्ये जर्मनीची सत्ता मिळाल्यावर हिटलर समर्थकांनी मॉर्गेनरॉट (Morgenrot) हा पहिला नाझी प्रचारी चित्रपट बनवला होता. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीची सबमरिन बुडायला लागते. त्यावर दहा सैनिक असतात आणि केवळ आठ सुरक्षा जॅकेट. आता सगळे वाचू शकत नसल्याने ते सगळे जण जर्मनीसाठी एकत्र मरायचं ठरवतात. त्यावेळी त्यांचे संवाद असे असतात मी जर्मनीसाठी दहा काय शंभरवेळा मरेन”, “आम्हांला जर्मनांना जगण्याबद्दल फारसं काही माहीत नाहीपण मरणं- ते आम्ही नक्कीच स्वीकारू.” तर देशभक्तीचे हे धडे पाहून हिटलरचा ऊर एकदम भरून आला होता. अगदी तसंच काहीसं देशभक्तीचं बालिश प्रदर्शन उरीमध्येही आहे. चित्रपटाचं चित्रिकरण मात्र चांगल्या पद्धतीने केलं आहे. दृश्य निर्मिती उत्तम आहे.  

सर्जिकल स्ट्राइक करून त्याची स्वतःच जाहिरात करून या सरकारने आपण पाकिस्तानला कसं नमवलं याच्या कहाण्या त्यावेळी माध्यमांमध्ये पसरवल्या होत्या. मोदींची प्रतिमा उजळण्याचा तो प्रयत्न होता. पण त्यानंतरही दहशवाद्यांचे हल्ले भारतावर होत राहिले आणि अजूनही होत आहेत. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकने नक्की काय मिळवलं हे मोदी सरकारला कधीच सांगता येणार नाही. उलट तज्ज्ञांकडून सर्जिकल स्ट्राइकबद्दल टीकाच अधिक झाली होती. तसंच ही गोष्ट सुरक्षेशी संबंधित असल्याने गुप्त ठेवण्याची गरज होती. पण पत्रकार परिषद घेऊनच हे मोदी सरकारने जाहीर केलं. भारत-पाकिस्तान सीमा रेषेवर अनेक कारवाया होत असतात. दोन्ही बाजूचे सैनिक-नागरिक मारले जातात. पण केवळ पाकिस्तानने असं केलं-तसं केलं अशी ओरड करून आपला राजकीय फायदा करून घ्यायचा ही नीती कोणत्याही सरकारांसाठी खूपच उपयुक्त राहिलं आहे. त्यातच शौर्यबलिदानदेशभक्ती असे शब्द आले कीसामान्य नागरिकही भावनिक होतात आणि अशा गोष्टी योग्यचं असल्याचं त्यांना वाटतं. आता निवडणुका जवळ आल्याने या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदी सरकारने केलेल्या देशभक्तीची आठवण मतदारांना करून देण्याचा प्रयत्न त्यातून झाला आहे.

दुसरा चित्रपट द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” म्हणजे उघड गांधी घराण्याच्या बदनामीसाठी आहे. एकीकडे उरीच्या माध्यमातून मोदींची प्रतिमा उजळायची आणि दुसरीकडे आपले विरोधक सोनिया आणि राहुल गांधी यांना बदनाम करायचं अशा दोन्ही पातळ्यांवर मोदींची प्रचार मोहीम सुरू आहे. कोणत्याही राजकीय पक्षामध्ये मतभेद असतातच. ते भाजपमध्येही आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून केवळ त्यांचं नावच सगळीकडे दिसतं. त्यांनी भलेभले नेते लालकृष्ण अडवाणीसुषमा स्वराज यांना झोपवलं. अशावेळी केवळ मनमोहन सिंगांनाच केविलवाणे,आत्मविश्वास नसलेलेसतत काळजी आणि तणावाखाली असलेले दाखवण्याचं कारण कायअनुपम खेर हे इतरवेळी उत्तम नट असले तरी त्यांनी यावेळी मात्र मनमोहन सिंग कसे हतबल आणि दयेस पात्र असे मुद्दाम उभे केले आहेत. पुन्हा ते किती भोळे होते आणि गांधी घराण्यासाठी त्यांनी कसा त्याग केलात्यांचे माध्यम सल्लागार संजया बारू यांनी कसं पक्षाच्या राजकारणाला प्रतिउत्तर देताना त्यांची प्रतिमा माध्यमांमध्ये सुधारेल याचा प्रयत्न केले असा हा संपूर्ण चित्रपट आहे. त्यामध्ये सोनियाराहूलप्रियांकाचिदंबरमनटवरसिंगकपिल सिब्बलअहमद पटेलपृथ्वीराज चव्हाणअमर सिंगमुलायम सिंग यादवअब्दुल कलाम अशी अनेक पात्र खऱ्या व्यक्तींशी मिळतीजुळती दाखवली आहेत. पण तो प्रयत्नही एकदम केविलवाणा आणि हास्यास्पद वाटतो. कारण मुख्य चित्रपट हा संजया बारू यांच्या निवेदनाभोवती फिरत राहतो आणि त्यात अहमद पटेलपंतप्रधान कार्यालयातील आयएएस अधिकारी हे सगळे एकदम व्हिलन म्हणून दाखवले जातात. राजकारणामध्ये प्रत्येक जण आपापली खेळी खेळत असतो याच वादच नाही. त्यामुळे इथे मनमोहन सिंग कसे निरागस होते हे वारंवार सांगण्याचा झालेल्या प्रयत्न एकदमच हास्यास्पद आहे. एवढ्या मोठ्या देशाचे ते पंतप्रधान होते आणि प्रचंड सत्ता त्यांच्या हातात होती. पक्षाची काही बंधनं त्यांच्यावर असणं हे स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी टूजीकोळसा भ्रष्टाचारअण्णा हजारेंनी भ्रष्टाचार हटाओच्या नावाने देशात घातलेला धुमाकूळ याबद्दल मनमोहन सिंग गप्प होतेती हतबलता नव्हती. तो त्यांनी निवडलेला पर्याय होता. अर्थात पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कारकीर्दीमध्ये झालेल्या वादांवर बारू फारसं भाष्य करत नाहीत कारण तेव्हा त्यांनी पंतप्रधान कार्यालयातून राजीनामा दिला होता.    

चित्रपट हे माध्यमंच असं आहे की लोकांना त्यावर पटकन विश्वास बसतो. वर्तमानपत्रटिव्ही वरील चर्चासत्रं यापेक्षा चित्रपट हे प्रचाराचं एकदम प्रभावी माध्यमं आहे. तेच वापरण्याचा प्रयत्न मोदी सरकारने या दोन चित्रपटांमधून केलेला दिसतो. याआधीही स्वच्छ भारत अभियान या मोदी सरकारच्या कार्यक्रमाशी मिळता जुळता टॉयलेट एक प्रेमकथा”,  पोखरण अणुचाचणीवर आधारित परमाणू” असे काही प्रचारी सिनेमा मोदी सरकारच्या काळात आलेच.

महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्येही उघड दोन गट पडले आहेत. त्यात या दोन्ही चित्रपटांमध्ये मोदी समर्थकांची नावं दिसतातच. अशोक पंडित यांचं नाव उरीमध्ये दिसतं तर अनुपम खेर यांनी स्वतःच मनमोहन सिंग यांची भूमिका केली आहे तर परेश रावलही डोवलच्या भूमिकेमध्ये दिसतात. व्योमकेश बक्षीची भूमिका अजरामर करणारे रजत कपूर मात्र मोदींच्या भूमिकेत शोभत नाहीत. पंडितरावलखेर यांच्या निष्ठाच भाजपचरणी वाहिलेल्या असताना या चित्रपटातून काय अपेक्षा करावी हे ज्याचं त्याने ठरवा.  पण त्यातही काही जण म्हणतील कीप्रचारकी चित्रपटांमध्ये गैर काय आहेमोदी सरकारने त्यांची बाजू मांडण्याची प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रचारकी चित्रपटांतकलेत खऱ्या-खोट्याचं मिश्रण केलं जातं आणि सत्य सोयीस्कररित्या लोकांपासून लपवलं जातं. जे दाखवलं आहे तेच खरं आहे असं वारंवार सांगितलं जातं. लोकांच्या भावनांचा वापर करून आपल्याला हवं तेच दाखवलं जातं आणि दिशाभूल केली जाते. लोक आपल्या आयुष्यातील दुःखताणतणाव विसरण्यासाठी चित्रपट बघायला जातात. कला ही कलाकाराचा राजकीय विचार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रसिकांच्या गळी उतरवतच असते. दो बिघा जमिन ते नया दौरनेही तेच केलं. या देशातील शेतकरी, कामगार यांचे प्रश्न ऐरणीवर आणणं ही राजकीय भूमिका बिमल रॉय, बी. आर. चोपडा या दिग्दर्शकांनी केलीच होती. आता परेश रावल, अनुपम खेर मोदींची छाती खरोखरीच छप्पन इंची आहे हे मिथक लोकांच्या नेणिवेत रूजवायचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न आहे तो याला त्याच माध्यमातून विरोध कोण, कधी व कसा करणार याचा!

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

Write A Comment