गेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये गोमाता आणि राष्ट्रवादाच्या नावावर ही हिंसा करून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. त्याचा परिणाम असा झाली की, अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेतची भावना वाढीला लागली असून ते आपल्या समाजातल्या इतरांमध्ये न मिसळता घेटो केल्यासारखे राहतात. देशाच्या सामाजिक एकतेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर जमायत-ए-उलेमा-ए-हिन्द या युवा संघटनेद्वारा वेगवेगळे क्लब स्थापन करून तरुणांना स्वसंरक्षणचे धडे देण्याच्या करण्यात आलेल्या घोषणेवर चर्चा व्हायला हवी.
जमायतचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितलं की, कठीण सामाजिक परिस्थितीतून निभावून नेण्यासाठी तरुणांना स्वसंरक्षण शिकवलं जाईल. कारण देशावर आलेल्या कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी हे तरुणच कामी येऊ शकतात. या क्लबमध्ये स्काउट-गाईडसचंही प्रशिक्षण देण्यात येईल. त्यावर भाजपचे विनय कटियार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रवक्त्यांनी लगेच या उपक्रमामुळे कशी हिंसा वाढेल किंवा हे संघाचंच मॉडेल राबवलं जात असून ते अयशस्वी होईल, असं सांगायला सुरुवात केली. त्यांचा आणखी एक आरोप होता की, मदनी स्काउटस आणि गाईडसप्रमाणे प्रशिक्षण देण्याचा दावा करत आहेत, पण स्वसंरक्षणासाठी दिलं जाणारं प्रशिक्षण हल्ले करण्यासाठीही वापरलं जाऊ शकतं.
अनेक मुस्लिम संघटनांनी जमायतच्या या घोषणेचा विरोध केला आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं सांगितलं. तसंच नागरिकांना संरक्षण देण्याचं काम सरकारचं आहे, असंही त्यांचं म्हणणं होतं. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व असुरक्षिततेच्या भावनेमध्ये वाढ झाली आहे हे सांगायला नकोच. संघ आणि त्याचे कच्चबच्चे संघटना लाठ्या, बंदूकी चालवण्याचं प्रशिक्षण गेली अनेक वर्ष देत आहेत. संघाच्या शाखांवर लाठी बाळगणं हा त्यांच्या गणवेषाचा भाग आहे. संघाची स्थापना झाली तेव्हा देशामध्ये सर्वांत मोठी समस्या ब्रिटिशांची होती. पण लाठ्या-काठ्या घेऊन फिरणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांनी त्याचा वापर ब्रिटिशांच्या विरोधात केला का? मूळीच नाही. ही लाठी तर त्यांनी भारतीयांवरच चालवली आहे.
गेल्या काही दशकांपासून बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देत आहेत. हे सर्व स्वसंरक्षणाच्या नावाखाली केलं जात आहे. आमच्या देशात कायदे नियम लागू होत नाहीत का? देशामध्ये संविधानाचा आदर केला जात नाही का? आम्हांला सुरक्षा देण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था अस्तित्वात नाही का? मग अशावेळी संघ परिवाराला शस्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम का राबवावा लागतो? मूळात संघाचं शस्त्रास्त्रांबद्दल एक आकर्षण आहे. प्रत्येक दसऱ्याला ते शस्त्रांची पूजा करतात, प्रदर्शन मांडतात. या शस्त्रांबद्दल पोलिसांना काहीच माहिती नसल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत असतात. संघ अहिंसेच्या गोष्टी करतो पण या शस्त्रांची पूजा करतात आणि तरुणांना ते चालवण्यासाठी प्रशिक्षणही देतात.
त्याशिवाय संघाशी संबंधित काही संघटना त्रिशूळ वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करतात. शंकराशी संबंधित त्रिशूळ हे धारदार नसतं. पण संघाच्या या संघटना चाकू प्रमाणे धारदार त्रिशूळ लोकांना वाटतात. कायद्याची बाब तात्पुरती बाजूला ठेवली तरी कोणत्याही समूदायाने अशा प्रकारे हत्यारांचा वापर स्वसंरक्षणासाठी करणं हे आक्षेपार्हच आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि जमायतसारख्या संघटनांची द्वीधा मनस्थिती आपण समजू शकतो. सध्याच्या स्थितीमध्ये मुस्लिम अल्पसंख्यांक संघटनांची काय भूमिका असायला हवी? काही मुस्लिम संघटनांनी जमायतचा सुरुवातीलाच विरोध केला आहे. त्यांच्या मते, काही तरुणांना स्काउट-गाईडसारखं प्रशिक्षण दिल्याने किंवा संघाची नक्कल केल्याने समाजासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याएेवजी जमायतने अशी मागणी करायला हवी की, कायदा योग्य पद्धतीने लागू झाला पाहिजे, पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.
जातीय-धार्मिक दंग्यांचा तपास घेण्यासाठी नेमलेल्या समित्या, आयोग यांचे अहवाल नेहमी सांगतात की, पोलिसांचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आणि राजकीय पक्षांमध्ये जातीय-धार्मिक वादातून फायदा उचलण्याची वृत्ती यामुळे देशामध्ये हिंसक घटना, दंगे वाढत आहेत. १९८४मध्ये झालेल्या शीखांविरोधातल्या दंग्यांच्या आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळालेली नाही. मुंबई दंग्यांनंतर श्रीकृष्ट आयोगाच्या अहवालाचा अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढतो आणि निरपराध बळी जातात, त्यांना न्यायही मिळत नाही. गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये झालेले दंगे हे तेव्हाच्या सर्वात कार्यकुशल मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली झाले होते. राज्य सरकारनेच भडकवलेल्या या दंग्यामध्ये किमान दोन हजार लोक यात मारले गेले. त्यामुळे जमायतच्या नेतृत्वाला हा विचार करावा लागेल की, ते जे काही करत आहेत ते योग्य आहे का? जमायचा प्रयत्न हा हिंसेच्या मूळाशी पोहोचण्याचा हवा. समाजामध्ये जाणीवपूर्वक पसरवला जाणारा द्वेष हा हिंसेचं प्रमुख कारण आहे. या द्वेषामध्ये अल्पसंख्यांकांबद्दल पूर्वग्रह दूषित मत आणि चुकीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पेरल्या जातात. इस्लाम हा हिंसक धर्म आहे आणि ख्रिश्चन हे दुसऱ्यांचे धर्मपरिवर्तनच करतात असं पसरवलं जातं. गुजरातमध्ये तीस्टा सेटलवाड यांच्याबरोबर जे झालं ते पाहता देशात न्याय मिळवणं कठीण झालंय असं वाटतं. त्याचबरोबर काही टीव्ही चॅनेल, माध्यमातील काही भाग आणि सोशल मिडिया यांतून सुरू असलेला खोटा प्रचार थांबवण्याची किंवा त्याच्याशी मुकाबला करण्याची गरज आहे. स्वातंत्र्याचा लढा असो की, स्वातंत्र्यानंतरचा काळ याबद्दल योग्य ती माहिती लोकांना द्यायला हवी. आपल्याला हे लोकांना सांगायला हवं की, भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची आहे.
देशाची सुरक्षा आणि मानवी अधिकारांबद्दल काळजी असणाऱ्यांनी एका मंचावर यायला हवं. जमायतसारख्या संघटनांनी तरुणांना असं प्रशिक्षण द्यायला हवं की, मुस्लिमांविरोधात पसरवण्यात येणाऱ्या द्वेषाचा सामना कसा करायचा. त्यांनी तरुणांना हे सांगायला हवं की, शांतता आणि प्रेमाच्या माध्यमातून ही लढाई लढली जाऊ शकते. अशा पद्धतीने मुस्लिमांच्या विरोधात द्वेष पसरवणाऱ्या या भावना जमायतने थोड्यातरी कमी केल्या तरी स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणापेक्षा कितीतरी मोठं काम त्यांच्याकडून झालं असं म्हणता येईल.
1 Comment
आजच्या तारखेला हिंदूंनी काय करावं हे जास्त महत्वाचा आहे. हिंदुत्व हा पाकिस्तानापेक्षा मोठा शत्रू आहे ह्या देशाचा आणि इथल्या हिंदूंचा – हे इथल्या हिंदूंना कधी समजणार? अल्पसंख्याकांनी काही केलं किंवा नाही केलं तरीही त्यांच्यावर हल्ले होणारच आहेत.