देशात जातजमातवादी शक्तींचा अक्षरशः नंगानाच सुरु आहे. महाराष्ट्र २०१८ सालच्या पहिल्याच महिन्यापासून त्याचा अनुभव घेत आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गावखेड्यातून आलेल्या निरपराध जनतेवर दगडफेक करून हल्ला केला गेला. त्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. ते फारसे सफल झाले नाहीत म्हणून १ जानेवारी रोजी निरपराध जनतेवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजीत असल्याचे अनेकांनी तर्काचा आणि पुराव्यांच्या आधारे सांगण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. परंतु राजसत्तेचे अभय आरोपींना मिळाले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत असे जाहीर केले. या हल्ल्याच्या मागे असणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण करणार्यांचे मुख्य सूत्रधार म्हणून मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांची नावे घेतली गेली. त्यासाठी सामाजिक माध्यमांवर असलेले फोटो, व्हिडीओ, पोस्ट पुराव्यांच्या स्वरुपात उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष करत पोलीस यंत्रणा ‘निवडक’ व्हिडीओ माध्यमांवर दाखवत आहे. हा पक्षपातीपणा एका विशिष्ठ विचारसरणीतून येतो. कोणालातरी वाचवायचे आणि निरपराध्याना गोवायचे अशी चलाखी सध्या सुरु आहे असे दिसते.
मनोहर भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल असतानाही त्यांना साधे चौकशीसाठी सुद्धा पोलिसांनी बोलवले नाही. मोदी आणि फडणवीस यांना गुरुस्थानी असल्याचा पुरता फायदा भिडे यांना मिळाला अशी चर्चा म्हणूनच सामाजिक माध्यामतून मोठ्याप्रमाणात झाली. राजसत्तेचे पूर्ण कवच प्राप्त असल्यामुळेच मनोहर भिडे यांची हिम्मत अधिक वाढली असे मानण्यास पूर्ण जागा आहे. भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. गडकोट मोहिमा, दुर्ग दौड या कार्यक्रमांच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकविण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे मत संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांचे आहे. त्यांची विचारसरणी ही राज्यघटनाविरोधी, स्त्रीविरोधी म्हणजे पुरुषसत्ताक , धर्मांध व अल्पसंख्यांकविरोधी अशी आहे. समाजात वेद्वेषाची बीजे पेरण्याचे काम ते करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. मिलिंद एकबोटे यांना तर याच कारणांमुळे अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली होती, याचे पुरावे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांसमोर आणले होते. असे असतानाही या प्रवृत्तींचा बंदोबस्त केला गेला नाही आणि परिणामी भिडे आता सुसाट सुटले आहेत.
नुकतेच त्यांनी धुळे, नाशिक व अहमदनगर येथे मुक्ताफळे उधळली आहेत. ज्या संविधानाच्या भाषण स्वातंत्र्याच्या आधारे ते बोलत आहेत त्याच संविधानाच्या गाभ्याला नख लावण्याचे काम त्यांनी धुळे येथील सभेत केले आहे. संविधानाची तुलना त्यांनी मनुस्मृतीशी केली आहे. संविधान ही मुळात आधुनिक संकल्पना आहे. श्रुती, स्मृती, पुराणे यांना संविधान म्हणणे शुद्ध बालीशपणा आहे आणि तो भिडेनी जाणीवपूर्वक केला आहे. त्यांच्या मते, मनुने जगातील पहिली घटना दिली आहे. त्याच्या जवळही जाण्याची आपली लायकी नाही. मनुस्मृतीवर टीका करणे म्हणजे कुत्र्यांनी हत्तीवर भुंकण्यासारखे आहे. मनुस्मृतीचे नाव मानवधर्मशास्त्र असून निधर्मीपणा हा नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव या संकल्पना थोतांड आहे. धर्माच्या नावावर हरामखोरपणा करणाऱ्यांनी देशाचे तुकडे केले. निधर्मी, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव हे थोतांड आहे. हे सारे देशद्रोही आहेत. हे देशाला मातीत घालणारे धोरण आहे.
भिडे त्यांच्या भाषणातून नेमके कोणाला हत्ती आणि कोणाला कुत्रा म्हणतात? खरेतर भिडे काही संविधानाचे साधे अभ्यासकही नाहीत. मनुस्मृतीवर टीका करणाऱ्यांना कुत्रे म्हणण्या इतका त्यांना नेमका कशाचा राग आला आहे? आजवर मनुस्मृतीवर म. जोतीराव फुले, दीनमित्रकर मुकुंदराव पाटील, ब्राह्मणेतर चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे इ. नी खरमरीत टीका केली आहे. मनूमताचा समाचार घेतला आहे. मनूमताची चिकित्सा केली आहे. मनुस्मृती स्त्रीशुद्रादीशूद्रांना दास्यात ढकलणारी संहिता असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. म. फुले यांनी मनुस्मृतीला ‘पाखंडची मुळी’ म्हटले तर दिनकरराव जवळकर यांनी स्मृती, पुराणांमधून ब्राहमणेतर, शेतकरी जातीतील स्त्रियांची निंदा केली असल्याने ती जाळून टाकावी असे म्हंटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर महाड मुक्कामी मनुस्मृतीची जाहीर होळी केली होती. देशभक्त केशवराव जेधे यांनी त्यांना जाहीर पाठिंबाही दिला होता॰ भिडेंची तेच म्हणतात त्या प्रमाणे मनूच्या जवळ जायची लायकी नसेलही; पण म. फुलेंपासून डॉ. आंबेडकरांची ती होती. म्हणूनच त्यांनी या मनूच्या ‘वेडेपणा’विरुद्ध बंड पुकारले होते. भिडे ज्या वर्णजातीस्त्रीदास्यसमर्थक श्रुती, स्मृती, पुराणे यांचा उदोउदो करतात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ ब्राह्मणी ग्रंथ’ संबोधतात हे लक्षात घेतले पाहिजे. भारताच्या (हिंदुस्थान नव्हे!) संविधानाच्या सुरवातीलाच- प्रास्ताविकेत गणराज्य, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता याचा स्वीकार आम्ही करत आहोत असा उल्लेख आहे. जनतेसाठी मुलभूत हक्क, कर्तव्य नमूद आहेत. संघराज्य पद्धतीचा स्वीकार, अल्पसंख्याकाना संरक्षण आणि अनेक महत्वाच्या तरतुदी त्यात आहेत. याच नेमक्या भिडेप्रवृतीना मान्य नाहीत. रा.स्व.संघानेही भारताच्या संविधान निर्मिती काळातच याला विरोध केला होता. या घटनेत ‘आपले म्हणावे असे काही नाही’ अशीच त्यांची धारणा आहे. भिडे आज तोच पाढा वाचत आहेत इतकेच.
भिडे यांना धर्मनिरपेक्षता हे थोतांड वाटते. याचा अर्थ काय? मुळात आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ राज्याचा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही, धर्माधिष्ठित राष्ट्र नसेल हा आहे. त्यांना हिंदुराष्ट्र हवे आहे, ते निर्माण करण्यातील मुख्य अडचण संविधान आहे, म्हणून हा पोटसूळ नसेल ना? त्यांचा हिंदुधर्म इतरांना वगळणारा आहे. खरेतर तो ब्राह्मणीधर्म आहे. मुठभर उच्चजातववर्गीयांच्या हितसंबधाची जोपासना करणारा आहे. बहुसांस्कृतिकता, विविधता नाकारणारा आहे.
मनुस्मृतीचे समर्थन भिडेप्रवृत्तींना कुठे घेऊन जाते? रा.स्व.संघाने काही महिन्यांपूर्वीच मनूचा मेकओव्हर मोहीम हाती घेतली होती. ‘संस्कारी गर्भवती’चा पाठ गिरवला होता. भिडेनी नाशिक मध्ये तोच पाठ वेगळ्या संदर्भात गिरवला आहे. नाशिक जिल्ह्यात समतावादी चळवळीसाठी दोन प्रेरणादायी बाबी आहेत. त्या म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि धर्मांतरची घोषणा. येवला येथे ‘जो धर्म आम्हाला साधे माणूसपणाचे अधिकार देत नाही अशा ब्राह्मणी धर्मात आम्ही राहू इच्छित नाही अशी भूमिका घेत, ‘ मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी गर्जना डॉ. आंबेडकरांनी केली होती. तसेच नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. त्याच नाशिक मध्ये भिडेनी ‘ मनुवादी आंब्याचे ’ आख्यान गाईले. आंब्यांच्या झाडाची महती सांगतो असे म्हणत स्वतःच्या बागेतील चमत्कारी आंबे पुराण सांगितले. त्यांच्या मते त्यांच्या झाडाचे आंबे विवाहित स्त्रीपुरुषांनी खाल्ले तर पुत्र प्राप्ती होते. हे सांगताना ही गोष्ट मी फक्त माझ्या आईला सांगितली होती आता तुम्हाला सांगत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. हा तर आपल्या भंगड म्हणण्यासाठी स्त्रियांचा केलेला वापर आहे. आपल्या आईचे, आंबा खाऊन पुत्र प्राप्ती होते या बद्दल काय मत होते हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. पुत्रप्राप्तीच्या विषयापुरता आईचा उल्लेख करायचा आणि हातात तलवारी घ्या अशी तरुणांना चिथावणी देताना मात्र तो टाळायचा, ३६ मण सोन्याचे सिंहासन उपक्रम याबाबत आईचा उल्लेख येत नाही, हे ब्राह्मणी- पुरुषसत्ताक राजकारण ही मनुवाद्याची खासियत आहे. आंब्याचे फळ खाऊन १८० पैकी १५० जोडप्याना मुलगा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या अगम्य विचारांचा समाचार सामाजिक माध्यमांवर घेतला गेलाच. टर उडवली गेली. फोलपणा सांगितला गेला. ‘ नवसे कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती’ या तुकाराम महाराजांचे वचनही आठवणीने सांगितले गेले.
रा. स्व. संघाने ‘संस्कारी गर्भवती’ प्रकरणात धष्ठपुष्ठ पुत्र, उंच, गोरा पुत्र प्राप्तीसाठी गर्भवती स्त्रियांना उपाय सुचविले होते. जात-पुरुषसत्ताक मूल्यांचे रखवालदार नेहमीच उच्चजातीतीलपुरुषकेंद्री विचार पसरवीत आले आहेत. त्यांचा आद्य नायक परशूरामपासून ते गोळवलकर-हेड्गेवार यांच्या पर्यंतचा हा प्रवास दिसतो. स्त्रियांना केवळ जननयंत्र मानणे, गृहश्रमाचा बोजा संस्कृतीच्या नावे त्यांच्यावर लादणे, त्यांना दुय्यम वागणूक देणे इ. विचारमूल्य यातूनच येतात. भिडेगुरूजी याला अजिबात अपवाद नाहीत. या उच्चजातीतील पुरुषकेंद्री विचारांच्या पगड्यातूनच त्यांनी नाशिक मुक्कामी ‘पुरुषी आंब्या’त ‘मनुवादी किडे’ पेरले होते. विवाहित स्त्री पुरूषांना १०-१२ वर्षानंतरही अपत्य न झाल्यास आंबा हे माझ्या बागेतील फळ खा असे सांगणे हा केवळ अंधश्रद्धेचा भाग नसून जातीअहंकाराचा भाग आहे. जानवेधारी, छपरी मिशाधारी (म्हणजे मिशा ओठांच्या खालपर्यन्त छपरासारख्या वाढविणे), सनातन विचारधारी ‘ हिज हायनेस ’ भिडेगुरूजींचा पुत्रप्राप्तीचा उपाय अशा आविर्भावात ते बोलत होते. हे बोलण्याचे धाडस एक पुरुष म्हणून ते ज्या जातीवर्गातून येतात त्यातून आकाराला येते. त्याला मिळणार्या राज्यसंस्थेच्या पाठिंब्यातून येते. पुत्र व्हावा ऐसा बंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !, अष्टपुत्र सौभाग्यवती भव! या पुरुषश्रेष्ठत्वाच्या मूल्य-संस्कृतीचा गौरव हा त्यांना महत्वाचा वाटत असल्याने जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असतानाही ‘मनुवादी आंबा’ पुराण ते गिरवत राहतात.
नाकात औषध टाकून पुत्रप्राप्ती किंवा आंबा खाऊन पुत्र प्राप्ती होत नाही हे भिडे गुरुजीसारख्या ‘उच्चाविद्याविभूषितला’ माहीत नसेल का ? परंतु सनातन सर्व उत्तमच, पुरातन सर्व उत्तमच होते, जुनी समाजव्यवस्था उत्तमच होती, असे म्हणत ब्राह्मणी – सनातनी विचारांचे पुनरुज्जीवन, पुनरुत्पादन हा त्यांचा मुख्य गाभा आहे, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी ते कधी धुळ्यात मनुस्मृतीचे गोडवे गात तर कधी नाशिकमध्ये पुत्रप्राप्तीचा आंबा मंत्र गात, तर कधी अहमदनगर मध्ये तलवारी हातात घ्या चा आदेश देत फिरत आहेत. स्त्रियांची प्रजनन क्षमतेवर मनुवादी पहारा भिडे बागेतील अंब्याच्या रूपात पुढे आला आहे. स्त्रियांकडे पुरुष पुनरुत्पादनचे साधन म्हणून बघण्याचा उपयुक्ततावादी विचार सार्वजनिक क्षेत्रात उघडपणे सांगितलं जात आहे. १९ व्या शतकात सत्यशोधक चळवळीने गर्भधारणा, त्यातील तथाकथित वैध-अवैधता, मातृत्व आणि सामाजिक किंवा ‘सत्यशोधक मातृत्व’ या महत्वपूर्ण संकल्पना पुढे आणल्या होत्या. स्त्रीपुरुषांचा विवाह आणि वैवाहिक जीवन फक्त अपत्य निर्मितीसाठीच नाही. अपत्य, आप्त परिवार यांनी ‘गुण्या गोविंदाने’ राहावे तसेच ‘स्त्रीपुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने’ असा विचार त्यांनी सांगितला होताच. मुलबाळ नसणार्या दांपत्याला दोषी न मानण्याचा क्रांतिकारी विचारही सत्यशोधक चळवळीने दिला होता. दत्तक मूल हा पर्यायही सांगितलाच आणि त्याची आपल्या जीवनात अमलबजावणीही केली होती. अर्थात ब्राहणी वर्चस्व मुक्त, शोषण मुक्त, स्त्रीपुरुष समतेवर उभा समाज निर्माण व्हावा, शेतकर्याची लूट थांबावी, शेटजी-भटजी-लाटजी या साखळीचे शोषण थांबावे हा त्यामागे हेतु होता. उरफाटा हेतु असेल तेर काय? याचे उत्तम उदाहरण म्हणजे भिडेकृत पुत्रप्राप्तीचा मनुवादी आंबा मंत्र!