fbpx
सामाजिक

सामाजिक मातृत्त्वाची सत्यशोधक संकल्पना!

२००८ च्या ऑगस्ट  मधील घटना आहे. ऑगस्ट- क्रांतीदिनाच्या अगोदरचा एक दिवस, या दिवशी इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रात एक वृत्त प्रसिध्द झाले होते ते ‘सरोगेट बाळाच्या’ संदर्भात. १२ दिवसांच्या एका मुलीच्या जन्माची हकीकत अशी – या चिमुरडीचे आई-वडील ज्यांना इंग्रज़ीत बायोलॉजिकल पेरेंटस म्हणतात. मराठी पर्यायी शब्द म्हणून ‘जन्मदाते’ हा शब्द वापरण्यात येत होता. पण आता प्रत्यक्ष आईने जन्म न देता दुसर्‍या ‘बाई’ च्या गर्भपिशवीत आपले बाळ वाढविण्याची सोय उपलब्ध झाल्याने मराठी शब्द अपूर्ण ठरला आहे. तर त्या १२ दिवसांच्या चिमुरडीचे ‘बायोलॉजिकल पेरेंटस्’ जपानी होते. युकी यामादा व डॉ. इकुफुमी यामादा यांनी युकी यामादा यांना गर्भधारणे बाबत काही शारिरीक अडचणी येत असल्यामुळे अमहदाबाद येथील प्रीतीबेन मेहता यांच्या मार्फत आपले बाळ वाढविण्याचा निर्णय घेतला. म्हणजे प्रितीबेन ह्या ‘सरोगट मदर’ बनल्या.
२५ जुलै २००८  रोजी प्रितीबेन यांनी यामादा दांपत्याच्या अपत्याला जन्म दिला. मुलगी झाली. पण तिच्या जन्माचे स्वागत तीच्या ‘बायोलॉजिकल आईने’ केले नाही. कारण मुलीच्या प्रत्यक्ष जन्माच्या अगोदरच युकी यामादांनी डॉ. इकुफुमी यामादांशी घटस्फोट घेतला. घटस्फोटाने मुलीसोबतचे नाते तोडले गेले!
या घटनेचे पडसाद कसे उमटले होते ? बिचारी १२ दिवसांची  मुलगी. तिचा काय दोष ? किंवा या मुलीला जन्म देणारीने एक स्त्री म्हणून तिला का वाढवू नये ? इ. भाबड्या प्रतिक्रिया, भूतदयावादी  प्रतिक्रिया मध्यमवर्गीय मानसिकतेने चघळल्या . पण प्रश्नाचे स्वरुप वरवर वाटते (भावनिक किंवा कायद्याच्या चौकटीत अडकणारे असे) असे सोपे  नाही. त्या मुलीचे वडील डॉ. यामादा हे तिला आपल्या घरी नेऊ इच्छितात. पण त्यांना त्यासाठी स्वत:च्याच मुलीला प्रथम दत्तक घ्यावे लागेल आणि भारतातील दत्तक कायदा एकट्या पुरुषाला मुल दत्तक देत नाही. खरेतर १२० वर्षापूर्वी केलेल्या दत्तक कायद्यात हीच नाही तर अनेक गंभीर त्रुटी आहेत. उदा. दत्तक विधान करताना कोर्टात पुरुषच पिटिशनर असावा लागतो. त्याची बायको (स्त्री) पिटीशनर होवू शकत नाही. इ. गोष्ट आहेत. ह्याच काय अनेक कायद्यात अशा गंभीर त्रुटी स्त्रीवादी नजरेतून सहज मांडता येतात. पण सरोगेट आई किंवा मुलांसंदर्भात केवळ कायद्यातील लिंगभावाचा प्रश्न नाही.
‘सरोगेट मदर’ म्हणजे नेमक काय? आपल गर्भाशय भाड्याने देण्याचा आणि आपल बीज दुसर्‍या स्त्रीच्या गर्भात वाढू देण्याचा निर्णय सहमतीन घेणं. असे निर्णय घेण्यामुळे ‘निपुत्रीक’ मानसिकता टाळता येते, मुलं वाढवण्याचा आनंद मिळू शकतो असा दावा केला जातो.
पण खरच यात दावा केल्याप्रमाणे मुद्दा  मातृत्त्वाचा-पितृत्वाचा आनंद घेण्याचा आहे का? कारण मूल वाढविण्यासाठी ‘सरोगेट मदर’ हा पर्याय निवडण हा एकमेव मार्ग नाही. ‘सरोगेट’ पर्याय मूळात वांशिक, जातीय मानसिकता वृध्दिंगत करणारा किंवा त्याच मानसिकतेपोटी स्विकारला जाणार पर्याय आहे. कारण ‘आपलं बीज’ म्हणजे शुध्द बीजं (?) आणि म्हणून जन्माला येणार ते ‘नैतिक’ अपत्य असा सारा तर्क आणि वास्तव त्या मागे दडलेल आहे. आणि म्हणूनच ज्यांच बीज, घराण, कुल आपल्याला माहित नाही किंवा तपासून पहाण्याची अजिबात सोय नाही अशा मुलांचा सांभाळ करुन मूलं वाढविण्याचा आनंद ‘सरोगेट’ मार्गाने जाणारे घेत नाहीत.
यामादा कुटुंबिय ‘आई-वडिल’ बनविण्साठी भारताकडे का वळले ? हा प्रश्न बातमी वाचून मनात आल्या शिवाय रहात नाही. कारण आता प्रगत देशात आपली प्रजननशक्ती विकणं, आपल गर्भाशय भाड्याने देण्याचे प्रकार बरेच सर्वमान्य झाले आहेत. ८ ऑगस्टच्याच टाईम्स ऑफ इंडिया मध्ये अमेरिकेत (Poor economy) च्या परिणामी प्रजोत्पदनाची विक्री केंद्र कशी निर्माण होऊ लागली आहेत. अशी बातमी प्रसिध्द झाली होती. ह्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा परिणाम स्त्रियांवरील लैंगिक नियंत्रणावर अधिकाधिक होत आहे हेच ह्या बातमीवरुन स्पष्ट होते.  अमेरिकेत ५ ते १० हजार डॉलर्स मिळविण्यासाठी ह्या प्रकारांकडे वळावे लागत असल्याचे बातमीवरुन दिसते.
यामादा दांपत्याने ज्या प्रकारचा व्यवहार केला तो त्यांची पारंपारिक, सनातनी बुरसटलेली मानसिकता दाखविणारा आहे. त्यामागे एक वांशिक शुध्दतेचा विचार आहे आणि म्हणूनच ते जातीशुध्दीचा विचार व्यवहारात करणार्‍या देशाकडे भारताकडे ‘सरोगेट’ मार्गासाठी आकर्षित झाले असावेत.
पण भारतात एकीकडे वंशशुध्दीचा जातीय शुध्दाशुध्दतेचा विचार मांडला जात असतानाच त्याच्या विरोधात १९ व्या शतकात म. फुलेंनी या ‘शुध्देतेला’ आणि पर्यायाने पुरुषसत्तेला, जातीय उतरंडीलाच विरोध केला होता. भारतासारख्या जातिव्यवस्थाक देशात जाती उपजाती ह्या परस्परांशी श्रेणीबध्द विषमतेने बांधल्या गेल्याचे डॉ. आंबेडकरांनी सांगितले होते. म. फुल्यांनी पुरुषसत्ताक व्यवहार जातिव्यवस्थेला बंदिस्तता प्राप्त करुन देतात म्हणून त्यावर प्रहार केला होता. स्त्रियांना ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळालाच पाहिजे यासाठी विद्रोह केला होता. कुटुंब-विवाह-पती पत्नी आणि त्यांचे ‘औरस’ मूलं या सूत्रातून जपली जाणारी पुरुषी-ब्राह्मणी-जातीय मूल्यव्यवस्था म.फुलेनी नाकारली होती आणि म्हणूनच विधवांनाही आपली अपत्ये जन्मास घालण्याचा अधिकार आहे म्हणत भ्रुणहत्येला विरोध केला होता. याही पुढे जावून विधवेचा मुलगा-ज्याला समाज, बाप माहित नसल्यामुळे ‘अनौरस’ मानत होता-असा मुलगा दत्तक घेतला आणि औरस-अनौरस चौकटीलाच तिलांजली दिली. इतर अशाच मुलांचा सांभाळ त्यांनी व सावित्रीबाईंनी केला होता आणि हेच ‘सामाजिक मातृत्वाचे’ सर्वोत्कृष्ट उहाहरण आहे.
जागतिकीकरणाच्या ‘मोकाट’ बाजारपेठ केंद्रित युगात स्त्रियांचे बीज, गर्भाशय इ. गोष्टी विक्रीयोग्य ( कमोडिटी) बनत असताना, स्त्रियांना नव्या प्रकारच्या शोषणाला सामोरे जावे लागत असताना सत्यशोधकांनी पुढे आणलेल्या ‘सामाजिक मातृत्वाच्या’ संकल्पनेचा पुरस्कार केला पाहिजे. सत्यशोधक दिशेने गेले पाहिजे. कारण विज्ञान-आरोग्याच्या क्षेत्रात स्त्रियांच्या शरिराला गिनिपिगचे स्वरुप आले आहे. ते आता ‘सरोगेट’ पर्यंत येऊन ठेपले आहे. तेव्हा ब्राह्मणी-भांडवली-पुरुषप्रधानकेंद्री विचारव्यवहारांच्या विरुध्द सत्यशोधक समतावादी मूल्य संस्कृतीचा प्रचार प्रसार हाच पर्याय आपल्या सर्वांना तारु शकतो.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment