fbpx
सामाजिक

बांगलादेशातील उन्माद

शहाझान बछ्छु यांची बांगला देशात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. बांगला देशातील उदारमतवादी, पुरोगामी, डाव्या विचारांसाठी झटणाऱ्या एका प्रामाणिक ज्येष्ठाचा मुस्लिम पुनरुज्जीवनवाद्यांनी पुन्हा एकदा क्रूर खून केला. भारत, पाकिस्तान आणि बांगला देश हे मूळात एकाच देशाचे तुकडे आहेत, हे या देशांमधील चांगली आणि वाईट दोन्ही माणसे वारंवार सिद्ध करत असतात. किती साम्यस्थळे असावीत या देशांमध्ये. बांगला देश तर बंगाली संस्कृतीचा मक्काच खऱ्या अर्थाने. फाळणीच्या प्रलायातून आपल्याकडे राहिला तो खरेतर गौड, पलिकडे गेला तो बंगाल. बंगाली लोक या फाळणीला दुसरी फाळणीच समजतात. लॉर्ड कर्झनने केली ती पहिली आणि १९४७ साली झाली ती दुसरी. कर्झनने देखील धर्माच्या नावावरच पहिली फाळणी केली होती.  असो तर धर्माच्या नावावर पाकिस्तान नावाने वेगळे झालेल्या बंगाल्यांनी काही वर्षांमध्येच भाषेच्या नावावर पुन्हा एकदा वेगळं व्हायचा निर्णय घेतला. त्याला आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी पूर्ण मदत केली. त्यातूनच या बांगला देशाची निर्मिती झाली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बांगला देशातील मुस्लिम धर्मांधांनी इथल्या उदारमतावादी परंपरा मानणाऱ्या लेखक, कलाकार, बुद्धिवंतांचे खून पाडण्याचे सत्र सुरू केले आहे. ज्या देशाचं राष्ट्रगीत हे रविंद्रनाथांसारख्या हिंदू माणसाने लिहिले आहे. ज्या गीतगोविंदावरून बाऊल संगीताची परंपरा बंगालमध्ये रुजली आणि ती हिंदू वैष्णव आणि मुस्लिम सुफींनी आजवर टिकवली. ज्या बंगाल्यांना (हिंदू असो की मुसलमान) सुसंस्कृत म्हणजे केवळ तोंडात रोशोगुल्ला ठेवून बोलणारेच, असा कायम माज असायचा व आजही अनेकदा तो दिसतो, त्याच बंगाल्यांच्या मानगुटीवर हे धार्मिकतेचं भूत बसलं आहे.

बंगाल आणि महाराष्ट्राचं नातंही तसं खूप जून म्हणावं लागेल. तिकडून प्रवास करत आलेले गौड सारस्वत इथे वसले इतकंच नाही, तर वंगभंगाच्या चळवळीतील महाराष्ट्राने खूप हिरीरीने पुढाकार घेतला होता. हे नातं, पुढं कट्टरतेपर्यंतही येऊन पोहोचलं असावं. इथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गोविंद पानसरेंना दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारल्यावर तिथल्या बंगाली मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हेच नातं जपायला की काय बांगलादेशी कम्युनिस्ट पार्टीच्या शहाझान यांना गोळ्या घालून मारलं. तेही दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेशप्रमाणे मोटारसायकवलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी.  अगदी मोटारसायकल वापरण्याची क्लृप्ती ही किती सेम टू सेम म्हणायची.

असो, जसे इथे विवेकवाद्यांची टिंगल, टवाळी, शिव्याशीवी, प्रसंगी, धक्काबुक्की व तरीही ऐकलं नाही की, थेट मोटरसायकलवरून येऊन हेल्मेट न उतरवता नंतर गोळ्या घालणे अव्याहत सुरू आहे, तसेच ते तिथेही आहेच. कारण सिमेवर काहीतरी फुटकळ तारांचे कुंपण घातले म्हणून हजारो वर्षांची सांस्कृतिक वीण अशी काय पाच पन्नास वर्षांमध्ये सुटत नाही.

यापूर्वी निलॉय मील नावाच्या एका नास्तिकतेचा प्रचार करणाऱ्या ब्ल़ॉगरला बांगला देशात घरात घुसून ठार करण्यात आलं होतं. अनंत बिजॉय दास, अविजित रॉय, वशिकुर रहेमान, रफिदा अहमेद बोन्या, असे कितीतरी विवेकवादी बंगाली कट्टर मुस्लिम पुनरुज्जीवनवाद्यांनी ठार केले. विद्यापीठातील एका प्राध्यापकाला ठार केलं गेलं, एका एलजीबीटी मासिकाच्या संपादकाला दिवसाढवळ्या मारलं गेलं, कितीतरी प्रकरणे. हे  प्रकार गेल्या पाच सहा वर्षांपासून बांगला देशात अव्याहत सुरू आहेत.

या सगळ्या मागे नक्की कारण काय असावे? धर्माच्या नावावर वेगळ्या झालेल्या बंगाली मुसलमानांना पंजाबी मुसलमानांची दादागीरी पचनी पडली नाही. धर्मापेक्षा भाषा श्रेष्ठ ठरली व अखेर ते पंजाब्यांच्या धांगडधिंगा संस्कृतीतून एकदाचे वेगळे झाले. मग तरीही आता पुन्हा ही धार्मिक कट्टरता त्यांच्यात नक्की कुठून आली असावी?

साधारण ९०च्या दशकात जगभरातील भांडवलशाहीसमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे भांडवलशाही ही कधीच अव्याहत तगणारी गोष्ट नाही. त्यात विरोधाभास अंतर्भूतच आहे. भांडवली व्यवस्था ही मागणीप्रमाणे पुरवठा या अर्थशास्त्रीय प्रमेयावर चालत नाही. ती बाजारपेठीय समीकरणांवर चालते. बाजारपेठीय समिकरणे म्हणजे अफाट नफा कमावणे. अफाट म्हणजे किती तर त्याला काही मर्यादा नाही असा. त्यामुळे भांडवली बाजारेपठेत मागणी तसा पुरवठा होत नाही. तर अवाढव्य उत्पादन करून प्रचंड पुरवठ्याचे सामर्थ्य भांडवलशहा उभे करतात. मग हा पुरवठा ग्राहकांच्या तोंडात कोंबण्यासाठी तशा प्रकारचा दबाव तयार करतात. तो सांस्कृतिक असतो, सामाजिक असतो, राजकीयही असतो. उदाहरणच द्यायचं तर पूर्वी एक पायताण वापरणारे सध्या स्निकर्स, लेदर शू, सँडल्स, स्लिपर्स असे कितीतरी प्रकार आपल्या शू कबर्डमध्ये सजवून ठेवतात, हे असे खरेदी करणे म्हणजेच तुमचा विवेक शाबूत आहे, अन्यथा काहीतरी विचित्र घडतय, असे अनेकजणांना वाटते कारण आजूबाजूच्या सगळ्यांकडेच ते आपण पाहतो, तशा प्रकारचा सांस्कृतिक दबाव, सिनेमा, टीव्ही, नेट, विविध माध्यमांमधून आपल्यावर टाकला जात असतो. असो, तर अशा या भांडवलशाहीसमोर नव्वदच्या दशकात मोठा प्रश्न उभा राहिला, तो या अशाच अमर्याद उत्पादन शक्तीमुळे. उत्पादन केलेल्या वस्तू विकायच्या तर त्याच्या बदल्यात पैसे मिळायला लागतात. या वस्तू काही फुकट विकायला कुणी उत्पादन करत नाही. तर अवाढव्य उत्पादन शक्ती असलेल्या विकसित देशांमधील भांडवलशहांनी स्वतःच्या विकसित देशांमधील ग्राहकांची खरेदीची भूक संपल्यामुळे जगभरातील विविध विकसनशील देशांमध्ये बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली. दक्षिण आशियातील भारतीय उपखंडातील देशांवर त्यांची नजर असणे सहाजिकच होते. त्यामुळेच जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे गुलछबू नावांखाली या देशातील बाजरपेठांचे दरवाजे सताड उघडे केले गेले. या उघड्या दरवाज्यांमधून अनेक वाईट-साईट गोष्टी आत घुसल्या. भांडवलशाहीचे समर्थक हे मान्य करायला कचरतात, मात्र त्यामुळे सत्य लपून राहात नाही.

परदेशी बाजारपेठेवर ताबा ठेवायचा असेल, तर त्या देशातील राजकीय नाड्या हातात ठेवणे गरजेचे असते. राजकीय परिप्रेक्ष्य डाव्या बाजूला झुकायला सुरुवात झाली की, या असमान व्यवहारावर बोटं ठेवणारे बुद्धिवंत तयार होतात. असे बुद्धिवंत सामान्य लोकांना सजग करण्याचे काम करतात. त्यातून मग संघर्ष उभे राहतात आणि होत्याचे नव्हते व्हायला थोडाही वेळ लागत नाही, हे चाणाक्ष भांडवलशहा ओळखून असतात. बांगला देशासारख्या मुस्लिम देशातील बाजरपेठ ताब्यात ठेवण्यासाठी तिथल्या मुस्लिम पुनरुज्जीवनवादाला खतपाणी घालणे तर फारच सोपे होते. त्याची सोय अमेरिकेचा कायम अंकित असलेल्या सौदी अरेबिया नावाच्या देशाने करून ठेवलीच होती. त्यांच्या वहाबी पंथाच्या प्रचारासाठी पेट्रोडॉलर्सचा जो काय जगभरात पाऊस पाडण्याचे धोरण अवलंबिले होते, त्यातून तद्दन धर्मवेड्यांची फौज जशी पाकिस्तानात तयार झाली होती, तशीच ती बांगला देशात व्हायलाही वेळ लागणारच नव्हता.

धर्म आणि विवेक यांची सांगड काही महाभाग घालतातही, मात्र दैववादाशिवाय धर्म उभाच राहू शकत नाही आणि दैववाद आला की विवेक संपला यात वाद नाही. त्यामुळे धार्मिक राहूनही विवेकवादी ही एक तात्पुरती स्थिती आहे. बांगला देशातही नेमके तेच घडले. या देशात राहायचे असेल, तर ते मुसलमान बनूनच राहावे लागेल व तेही बांगला देशी नाही. म्हणजे तुम्ही बांगला देशात जन्मले असाल तरीही तुम्हाला सौदी अरेबियातील अरबांचा वहाबी पंथच पाळावा लागेल, असा सांस्कृतिक दबाव टाकणाऱ्या टोळ्या तयार होऊ लागल्या. ज्या सुफी परंपरेतून आशियाई देशांमध्ये इस्लामचा पाया रचला गेला होता, तो पायाच ठिसूळ करण्यासाठी पेट्रोडॉलर्सचा खच पडू लागला. मग त्याला काही विवेकवाद्यांनी त्यांच्या क्षीण शक्तीसह विरोध सुरू केला. मात्र त्यांच्या या क्षीण शक्तीपुढे त्यांचा कितीसा निभाव लागणार, हे म्हणजे सुई घेऊन एके-५६ रायफलशी लढण्यासारखा प्रकार होता. त्यांनी नास्तिकता, विवेक, उदारमतवाद अशा भूमिका घेऊन तोंड उघडणाऱ्यांची तोंडे बंद करण्याचा सपाटा सुरू केला, तो आजवर संपलेला नाही. शहाझान यांच्या खुनाने त्या साखळीची एक कडी आणखी वाढली आहे इतकेच.

आता अशा प्रकारच्या क्रूर हल्ल्यांचा मुकाबला विचारांनी करावा, वगैरे असे विश्लेषण करणारेही अनेक असतात. मात्र इतिहासात अशा कितीतरी प्रगत संस्कृती हिंसेमुळे लयाला गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडील तक्षशीला असेल किंवा मध्य आशियाई मंगोल मुस्लिमांमुळे अब्बासीद राजघराण्यासारख्या प्रचंड सुसंस्कृत व शक्तीशाली साम्राज्याला पार धुळीस मिळवले, ही उदाहरणे इतिहासात प्रकर्षाने दिसतात. त्यामुळे विवेक, उदारमतवाद, विज्ञानवादी दृष्टीकोन, लोकशाही वगैरे टिकवायची असेल, तर अशा प्रकारच्या धर्मांध अतिरेक्यांचा शक्तीने बंदोबस्त करणे भाग आहे. अन्यथा पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, अनंत बिजॉय दास, अविजित रॉय, वशिकुर रहेमान, रफिदा अहमेद बोन्या आणि आता शहाझान बछ्छु अशा विवेकवाद्यांच्या यादीत आपले नाव कधी येते याची वाट पाहात बसणेच विवेकवाद्यांच्या हातात राहील.

लेखक एक राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

Write A Comment