fbpx
विशेष

….म्हणे रेल्वे प्रवासी शाकाहारी होणार!

गोमांसावर बंदी घालून, लोकांना ठेचून मारल्यानंतर शाकाहारी व मांसाहारी या भ्रामक भेदातून प्रत्यक्षात हिंदू व मुसलमान अशी दरी तयार करण्याची पुढची पायरी म्हणून आता रेल्वेने २ अॉक्टोबर या महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी रेल्वेमध्ये फक्त शाकाहारी अन्न देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, २ अॉक्टोबरला देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांमध्ये, रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना केवळ शाकाहारी अन्नच मिळेल. भारतात ८० टक्के लोक मांसाहारी असताना भारताची शाकाहारी देश अशी प्रतिमा बनवण्याची गरज हिंदुत्ववादाच्या नावाखाली मनूवादी राज्यव्यवस्था राबवू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांना कायम वाटत आली आहे. मूळात शाकाहार हा ब्राह्मणांमधील काही पोट जाती आणि वैष्णव पंथामध्ये पाळला जातो आणि तोच वर्ग देशात सत्ताधारी असल्याने संपूर्ण भारतालाच भविष्यात सक्तीने शाकाहार करावा लागणार असं दिसतंय. हिंदुत्ववादी गांधीजींच्या नावावर शाकाहार खपवत असताना गांधीवादी मात्र शांत आहेत. गांधी स्वतः शाकाहारी असले तरी त्यांनी इतरांना मांसाहार करू नका, असं कधीच सांगितलं नव्हतं. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाचा सोयिस्कर अर्थ काढण्यात हिंदुत्ववादी पटाईत आहेत. आताही शाकाहाराचा हा डाव गांधींच्या नावे सुरू केल्याने त्याला कोणीचाही विरोध होणार नाही, असे दिसते.

खरंतर भारताच्या इतिहासामध्ये भारत शाकाहारी होता, असं दिसणार नाही. पुराणं, धर्मग्रंथ, संहिता, इतिहास या सगळ्यांमध्ये भारतात काय काय खाल्लं जायचं याचं पुरावे सापडतात. (हिंदूंमध्ये गोमांस भक्षणाबद्दल मी यापूर्वी याच पोर्टलवर विस्तृत लेख लिहिला आहे. https://rightangles.in/2017/11/16/politics-of-deitification-of-cow/)त्याचबरोबर इतरही मांसाहारी पदार्थ हे जेवणाचा अविभाज्य भाग होते. अयोध्येच्या आजूबाजूला राहणारे लोक काय खात होते याचे इतिहासात पुराव्यासह दाखले आहेत. अयोध्येच्या जवळ बस्ती जिल्ह्यामध्ये सिसवानिया म्हणून गावात १९९५ च्या दरम्यान आर्किओलॉजिकल सर्व्हे अॉफ इंडियाने खोदकाम केलं. त्या वृत्तांतानुसार वेदिक काळाच्या शेवटच्या टप्प्यात, त्या भागामध्ये बैल, म्हैस, घोडा, बकरा, मेंढा, हरिण, सांबर, जंगली डुक्कर, पाळीव डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, उंदिर, कासव, मासा, कोंबडी व तत्सम पक्षी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले. यातील बहुतेक प्राणी (कुत्रा आणि मांजर सोडून) हा त्यावेळच्या माणसांचा आहार होता. कारण या प्राण्यांची जी हाडे उत्खननात सापडली त्या हाडांवर कापल्याचे आणि तुकडे केल्याच्या खूणा आहेत, असं हा वृत्तांत सांगतो. दक्षिण भारतामध्ये चरबीयुक्त उंदराचं मांस जेवणाच्या ताटात हमखास असायचं. उंदिर कसा भाजून खायला जायचा याची पाकाकृती आजही उपलब्ध आहे.  के. टी. अच्चया यांच्यासारख्या साक्षेपी खद्य इतिहासकारानेही यावर खूप विस्तृत लिखाण केले आहे. अगदी हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याचं मांसही भारतीयांमध्ये प्रिय समजलं जायचं. अश्मयुगीन काळामधील सापडलेली माणसाची दगडी हत्यारं ही प्राण्यांची शिकार करण्यासाठीच वापरली जायची. त्यामुळे मांसाहार हे जगभरातल्या  माणसाचं मूळ अन्न आहे. शेतीचा शोध हा खूप नंतर लागला. त्यातही गेल्या हजारो वर्षांमध्ये जगभरातील अन्न पदार्थांची, पिकांची, पाकाकृतींची, धान्य-बियांची एवढी देवाण घेवाण झाली आहे की, शाकाहाराच्या नावाखाली चालणारे असंख्य पदार्थ हे मूळचे भारतीय नाहीत. ज्वारी-बाजरी आफ्रिकेतून आली आहे. अगदी चणा, चवळी, मसूर, मटार ही कडधान्यं-भरडधान्यं यांचा उगम भारतात झालेला नाही. उपवासाच्या नावाखाली खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमधील बटाटा, साबुदाणा, मिरची, रताळं यातला एकही पदार्थ भारतातला नाही. बटाटा मूळचा बोलिविया आणि पेरूमधला, मिरची-मेक्सिको तर रताळं पेरू आणि मेक्सेकोतून आणि साबुदाणा दक्षिण पूर्व अशियात पहिल्यांदा सापडला. गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम ज्याला मूळचं नाव लुकमत अल कादी आहे हे मेडेटेरिनियन आणि पर्शियन आहे. जिलबी सिरियातील झलेबिया या त्या काळच्या शहारातून मजल दरमजल करत इथे स्थिरावली आहे.  अशा पद्धतीने प्रत्येक धान्याचा, फळाचा, अन्न पदार्थाचा इतिहास शोधत राहिलं तर आपल्या जेवणामध्ये किती सरमिसळ झाली आहे हे दिसून येईल. अशावेळी भारत हा शाकाहारी लोकांचा देश आहे, हे आपण कोणत्या आधारावर सांगत आहोत?

भारतामध्ये जैन, बौद्ध आणि नंतरही अनेक राजकीय नेत्यांनी अहिंसेच्या तत्त्वाचा केलेला पुरस्कार हा थेट शाकाहारी जेवणाशी जोडला जातो. मूळात जैन आणि बौद्ध धर्माचं अहिंसेचं तत्त्वं हे जेवणासाठी होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीविरोधात कधीच नव्हतं. यज्ञामध्ये विनाकारण प्राण्यांची आहुती देण्यासाठी होणाऱ्या हिंसेला त्यांचा विरोध होता. गौतम बुद्धांनी भिक्कूंना मांस खाण्यासाठी पशू मारण्यावर बंदी घातली होती. पण मरून पडलेल्या किंवा इतर कुठल्या प्राण्याने मारलेला पशू खाण्यावर बंदी नव्हती. अगदी समोर जेवण देणाऱ्याने मांस दिलं तरी ते खाण्याची परवानगी होती.  गौतम बुद्धांचा मृत्यू डुकराचे मांस खाल्ल्याने झाल्याबद्दल वाद प्रतिवाद आहेत. ते डुकराचं मांस  होतं की विषारी अळंबी यावर बरचं लिहिलं गेलं आहे. जैन धर्मातही मांस कशा पद्धतीने श्रमणांनी खावं याचं वर्णन आहे. विहायापनत्ती शतका १५ मध्ये खूप आजारी असलेले महावीर आपल्या शिष्याला एक निरोप देतात. महावीर म्हणतात की, “तू मेढिक गावातील रेवती नावाच्या स्त्रीकडे जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरे शिजवून ठेवली आहेत. ती मला नको आहेत. तू तिला सांग की, काल मांजराने मारलेल्या कोंबडीचे मांस तू शिजवले आहेस तेवढे दे.” या श्लोकाला अनेक जैन मुनींचा आक्षेप आहे. काहींच्या मते, ती दोन कबुतरं नसून महावीरांनी दोन भोपळ्यांचा उल्लेख केला होता. सांगण्याचा मुद्दा हा की, अहिंसेचा पुरस्कार करणारे बौद्ध आणि जैन धर्मही त्यावेळी संपूर्ण मांसबंदी घालू शकले नाहीत कारण लोकांनी त्यांचा धर्म स्वीकारलाच नसता. बौद्ध धर्म जेव्हा अति पूर्वकडच्या देशांत गेला तिथे तर मांस सर्रास खाल्लं जातं अगदी आजही. त्यामुळे शाकाहाराला हे दोन धर्म नक्कीच जबाबदार नाहीत. अगदी कलिंगाच्या युद्धामध्ये झालेल्या हिंसेने बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या राजा अशोकानेही विशिष्ट प्राण्यांचे मांस जेवणातून बाद केलं होतं. पण तो संपूर्ण शाकाहारी झाला नव्हता. ब्राह्मणांचं मांसाहारी असणं, आयुर्वेदाच्या औषधांमध्ये विशिष्ट प्राण्यांचं मांस वापरणं याचे लिखित पुरावे आजही आहेत.

आदि शंकराचार्यांनी जेव्हा बौद्ध आणि जैन धर्मांविरोधात आघाडी उघडली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी ब्राह्मण म्हणजे राज्यकर्त्या वर्गाला शाकाहारी होण्याचं आवाहन केलं. हिंसेने बरबटलेल्या हिंदू धर्माला त्यावेळी जैन आणि बौद्ध धर्माशी स्पर्धा करायची होती. त्यामुळे हिंदू धर्मात इतरांपेक्षा वेगळं आणि त्याचवेळी इतरांसारख्या काही गोष्टी आहेत हे दाखवण्याच्या राजकारणातून ब्राह्मण वर्गाने मांस खाणं सोडलं. मात्र ब्राह्मणांमधल्याही काही जाती उदाहरणार्थ सारस्वत किंवा मैथिली ब्राह्मण पूर्वापार मांस खात आल्या आहेत. त्यामुळे शाकाहाराची सुरुवात अगदी अलिकडच्या काळामध्ये आदि शंकराचार्यांच्या काळामध्ये शोधावी लागेल. मूळात विशिष्ट अन्न पदार्थांवर बंदी आणि काही अन्न पदार्थांचा पुरस्कार यामध्ये राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात. कधी ते सत्ताधारी वर्गाचे असतात तर कधी ते कॉर्पोरेट कंपन्यांचे असतात. राजकारण्यांना आपली विचारसरणी जनतेवर लादण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी अन्नाची बंदी घालावी लागते. कॉर्पोरेट कंपन्या नफा कमावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अन्नाची अशी काही जाहिरात करतात की, आपलं मूळचे अन्न पदार्थ आपण बाजूला सारतो आणि हळूहळू ते इतिहास जमा होतात. शाकाहाराचा मुद्दा भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो राजकीयच मुद्दा आहे. भारतामध्ये केवळ शाकाहारी अन्नाची कोणतीही परंपरा नसताना राजकीय हेतूने संपूर्ण देशाच्या जनतेवर ते अन्न लादलं जातं आहे.

आहार तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमधून मिळणारी प्रथिनं ही माणसाच्या शरिरातील प्रथिनांशी मिळतीजुळती असल्याने त्याचा अन्नामध्ये वापर हा अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे इतर मार्गांनी मिळणाऱ्या प्रथिनांपेक्षा मांसाहारातून आलेली प्रथिनं ही उच्च दर्जाची असतात. मूळात गाय- बैल, म्हैस, रेडा यांसारख्या प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिनं ही गरिबांना परवडणारी होती. त्यांच्या शरिराची प्रथिनांची गरज त्यामुळे भागवली जात होती. पण धर्माचं नाव पुढे करून त्यावर तर बंदी घातली गेली. गायीबाबत असलेल्या भावनिक प्रतिमेमुळे त्या मांसबंदीबाबत अगदी पुरोगामीही त्यावर फारस बोलले नाहीत, मात्र बैलाचे मांस खाण्यावरही बंदी घालून गरिबांना प्रथिनांपासून वंचित करण्याचे व भविष्यातील एक पिढीच्या पिढीच कुपोषित जन्माला घालण्याचे षड्‌यंत्र रचले गेले आहे. सध्या महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यामध्ये आदिवासी बालकं आणि मातांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याचं मूळ त्यांना त्यांच्या पद्धतीचं अन्न खावू न देणं यामध्येही आहे. सरकारी योजनांमधले केवळ चिक्की आणि लाडू खायला घालून त्यांची भूक कशी भागेल? अंडी, दूध, मांस हे पदार्थ मिळाल्याशिवाय कुपोषणाचा प्रश्न थांबूच शकत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये आणि भारतातही शाकाहारी अन्नाचा पुरस्कार करणारे एक थिअरी मांडतात. उदाहरणार्थ एका बैलाला कापून सहा लोकांना अन्न मिळत असेल. पण त्यासाठी बैलाला दहा लोकांचं अन्न द्यावं लागतं. ही संकल्पनाच मूळात चुकीची आहे. निकामी झालेला बैल, गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याला अन्न हे लागतंच. भारतात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांवर ही निकामी झालेली जनावरंही हक्क सांगू लागली तर चांगली जनावरही उपाशी राहतील. त्यामुळे निकामी झालेल्या जनावरांचा अन्नासाठी वापर करणं उत्तम आहे, असं अनेक कृषी आणि अर्थतज्ज्ञ पुराव्यासह दाखवून देतात.

आता गांधीजींकडे वळूया. त्यांनी कायम शाकाहाराचा पुरस्कार केला. अगदी दूधही ते बकरीचं पित आणि त्यापासूनच बनवलेलं दहीसुद्धा खात. मात्र त्यांनीही गोहत्या बंदीला विरोध केला नव्हता. “माझा एकट्याचा धर्म हा भारतातल्या इतरांचा धर्म कसा असू शकतो,” असं म्हणत त्यांनी गोमांस खाणाऱ्यांबद्दल कोणताही आक्षेप घेतलेला नाही. गोमांसाबद्दलचा आक्षेप हा कायम हिंदुत्ववाद्यांनी घेतला होता. तेच हिंदुत्ववादी आता शाकाहाराकडे वळण्याचे धडे देत आहेत. मांसाहार विरुद्ध शाकाहार हा वाद एवढा समाजामध्ये भिनवला गेला आहे की, मांसाहार करणाऱ्यांना अनेक सोसायट्या घर विकत घेऊ देत नाहीत. अनेक मॉल्समध्ये विशिष्ट वर्ग किंवा जातींसाठी मांसाहारी पदार्थ ठेवले जात नाहीत. जैन धर्मियांच्या पर्यूषणाच्या काळात कत्तलखाने बंद ठेवण्यावरून मुंबईत तर दरवर्षी वाद होतात. शाकाहार म्हणजे काहीतरी उच्च प्रथा असल्याचा अहंकार त्यातून वाढीस लागला आहे. त्यामुळे शाकाहारी हॉटेलाच्या पाट्या नेहमी “शुद्ध शाकाहारी” असं लिहितात म्हणजे त्यांना हेच सूचित करायचं असतं की मांसाहार हा अशुद्ध आहे. केवळ २० टक्के शाकाहार करणाऱ्या उच्च जातींची ही जबरदस्ती ८० टक्के हिंदूंना सहन करावी लागते. मग सण कार्य असो किंवा सार्वजनिक उपक्रम यामध्ये शाकाहारीच जेवणावर किंवा पदार्थांवर भर असतो. माणसाची सर्व मेहनत, नोकरी-धंदा ही मूळात पोट भरण्यासाठी असते. ते पोट त्याने कसं भरायचं, काय जेवायचं हे ठरवण्याचं हक्क त्यालाच आहे. सरकारी पत्रकं काढून लोकांच्या ताटातले अन्नपदार्थही सरकार ठरवणार असेल तर लोकांच्या पोटावर मारणाऱ्या या सरकारला पाठीवर आपटण्याचं काम जनता नक्कीच करेल.

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत

5 Comments

  1. Vrindawan co-op.society Reply

    खूप छान पद्धतीने शाकाहारी आहारावरील बंधन उलगडणारा लेख.

  2. आपण ज्या विहायपनती शतकाचा उल्लेख केला आहे तो ग्रंथ मिळेल का?
    जर आपण तो वाचला असेल तर कृपया येथे स्पष्ट करावे

  3. Shivaji v pitalewad Reply

    प्रत्येक वेळी एक वेगळा दृष्टिकोन घेवून लेखन करण हे तुमच वैशिष्ट्य. त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन!!.मांसाहार, शाकाहार तुलना करून विनाकारण साधनसुचितेच्या गोष्टी करणे व तेलाच्या भाववाढीसारख्या विषयावर गपगुमान राहणे.सद्या खूप विचित्र अस वातावरण अनुभवायला मिळते.

    खूपच सुंदर!!!

  4. Sanket Bhausaheb Munot Reply

    अप्रतिम व अभ्यासपूर्ण

  5. रामेश्वर खामकर Reply

    चौफेर लिहलय सरकार लोकशाही न चालतय का हुकूमशाही लादतय काहि कळत नाहि आपल्या सारख्या प्रतिभासंपन्न लेखकाला यावर सजग राहत आवाज ऊठवायलाच पाहिजे

Write A Comment