fbpx
विशेष

किले का रहस्य

लगता नही है दिल मेरा उजडे दयार में

किस की बनी है आलम ए ना पाएदार में

कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें

इतनी जगह कहाँ है दिल ए दाग दार में

काँटों को मत निकाल चमन से ओ बागबाँ

ये भी गुलों के साथ पले हैं बहार में

बुलबुल को बागबाँ से न सय्याद से गिला

किस्मत मे कैंद लिक्खी थी फस्ल ए बहार में

कितना है बद नसीब जफर दफ्न के लिए

दो गज जमीन भी न मिली कू ए यार में

शेवटचा मोगल बादशहा बहादुर शहा जफर याची ही अजरामर गजल. त्यातला शेवटचा शेर आजही आपल्या देशात अनेकदा वाक्प्रचारासारखा वापरला जातो. शेवटच्या मोगल बादशहाला त्याच्या राहत्या घरी म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्यात दफन करावं अशी त्याची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. कारण १८५७चं इंग्रजांविरोधातील बंड! हे बंड मंगल पांडेपासून सुरू झालं आणि महाराष्ट्रात तात्या टोपेंपर्यंत पसरलं. अनेक भारतीय सैनिकांनी इंग्रजी कवायती फौजांना आव्हान दिलं, तेच मुळी बहादूरशहा जफर हा आमचा म्हणजे हिंदुस्तनाच राजा आहे व त्याच्या आज्ञेने कारभार चालेल असं म्हणून. मात्र इंग्रजांनी हे बंड मोडून काढलं. त्या पहिल्या क्रांतीत सामील अनेकांना तोफेच्या तोंडी दिलं गेलं. मेरठ ते दिल्ली या रस्त्यावरील प्रत्येक झाडाला या क्रांतीत सहभागी अनेकांना प्रत्येक झाडावर टांगून फाशी दिलं. ज्या बहादूर शहाच्या नावाखाली हे स्वातंत्र्य समर सुरू झालं होतं. त्याच्या दोन्ही मुलांचा शिरच्छेद केला गेला व बाहदूर शहाला ब्रह्मदेशात नजर कैदेत पाठवून दिलं. तिथेच मातृभूमीच्या आठवणीत त्याने अखेरचे दिवस काढले व उर्दू शायरीतील हे अजरामर काव्य जगाला दिलं.

बहादूर शहा जफरची आठवण येण्याचं कारण म्हणजे लाल किल्ल्याला दालमिया भारत ग्रूपला २५ कोटी रुपयांनी भाडे तत्त्वावर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णय. हा निर्णय वरवर पाहता, अनेकांना वाटेल, की आपल्या देशात अशा प्रकारे अनेक सरकारी गोष्टींचे खाजगीकरण करण्याचे पर्व हे काँग्रेसच्या काळात व विशेषतः मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्री पदाच्या कारकीर्दीपासूनच सुरू झाले. हे वाटणं योग्यही आहेच. मात्र दालमिया ग्रूपला लाल किल्ला देण्यामागे तितकी सोपी अर्थनिती नाही. त्यामागे एक कूट राजनितीचं समीकरण आहे.

कोण आहेत हे दालमिया? या दालमिया परिवारापैकी विष्णू हरी दालमिया हे विश्व हिंदु परिषदेच्या अत्यंत निष्ठावान अशा देणगीदार व नेत्यांपैकी एक समजले जातात. दालमिया परिवाराने स्वातंत्र्यपूर्व काळापासून उद्योग धंद्यातून मिळवलेली संपत्ती कशी मिळवली याच्या सुरस काहाण्या भारतीय व्यवसायिकांमध्ये अत्यंत चवीने चघळल्या जातात. या ग्रूपचा पाया रचणारे राम कृष्ण दालमिया यांचा हनमंत प्रसाद पोद्दार यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता. आर. के. दालमिया यांचे बंधू जयदयाल दालमिया यांच्या मते पोद्दार हे त्यांचे एका अर्थाने पालकच होते. दालमिया यांच्या एकंदरच यशात पोद्दार यांचा मोठा हात असल्याचे जयदयाल यांचे म्हणणे आहे. बरं मग असला समजा हात पोद्दार यांचा तर काय त्यात इतकं मोठसं, असा प्रश्न येणं साहजिकच आहे. तर हे हनमंत प्रसाद पोद्दार म्हणजे गीता प्रेसचे अध्वर्यू, कल्याण नावाचं नियतकालिक चालवून स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. गांधीजींसोबत आंबेडकरांच्या जातीविरोधी कार्यक्रमावरून वाद घालणाऱ्या पोद्दार यांना गांधीजींच्या खूनाच्या कितीतरी आधीच त्यांचा खून होणार असल्याचं स्वप्न पडलं होतं व त्यांनी तसं गांधीजींना कऴवलं असल्याचेही दाखले आहेत. हिंदु महासभेचे सदस्य असलेले व देशातील हिंदुत्ववादी विचारधारेला पैसे पुरवण्यासाठी संपूर्ण मारवाडी समाजात जनजागृती करणारे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक व्यक्तीमत्व म्हणजे हनमंत प्रसाद पोद्दार होय! यांच्यावर फारसे काही ऐतिहासिक संशोधन झालेले नसले, तरी अक्षय मुकूल या दिल्लीस्थित पत्रकाराने गिता प्रेस अँड मेकिंग ऑप हिंदू राष्ट्रा या आपल्या पुस्तकात या सगळ्याचा सविस्तर गोषवारा मांडला आहे.

तर या पोद्दार साहेबांनी दालमिया या ग्रूपला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या खूप जवळ आणले. दालमियांच्या व्यावसायिक भांडणातही पोद्दार यांनी त्यांना वेळोवेळी सल्ले देणं, आवश्यक तिथे मदत करणं अशी अनेक दिव्य पार पाडलेली होती. एसीसी व दालमिया यांच्यात सिमेंटच्या भावावरून सुरू झालेल्या युद्धात पोद्दार यांनी जमनालाल बजाज यांची मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे दालमिया यांच्यासोबत भागिदारीत असलेल्या साहू जैन (ज्यांच्याकडे टाइम्स ऑफ इंडियाची मालकी होती) यांच्यात मतभेद झाले. या प्रचंड औद्योगिक साम्राज्याचे वाटे करणं भाग पडलं. पण त्यांच्या बेनामी संपत्ती व इतर गोष्टींचे वाटे अशक्य होते. त्यामुळे अधिकृतरित्या हे वाटे कागदावर कधीच झाले नाहीत. या भांडणातून त्यांच्यावर १९५६ साली विविआन बोस यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती बसली. या चौकशी समितीसमोर एक हिंदीतील पत्र आले. या पत्राबाबत चौकशी केली असता शांती प्रसाद जैन यांनी समितीला सांगितले की, हनमंत प्रसाद ताऊजी यांनी या साम्राज्याची वाटणी अशी केली की, प्रत्यक्षात कागदावर कसलेही हिस्से होणार नाहीत. मात्र प्रत्येकाला प्रत्येक उद्योगातील हिस्सा योग्य रितेने मिळेल.

पुढे या सगळ्या प्रकरणात दालमिया, जैन यांना तुरुंगात जावे लागले. मात्र नेहरुंच्या मृत्यूपश्चात लालबहादूर शास्त्री आल्यानंतर पोद्दार यांनी त्यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे आर के दालमिया आणि शांती प्रसाद साहू यांना खूप सहन करावे लागले असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावे, अशी विनंती केली व ती मान्य करण्यात आली.

तर  अशी ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या औद्योगिक समुहाकडे लाल किल्ला सांभाळण्यासाठी देण्यात आलेला आहे. इरफान हबीबसारख्या विख्यात इतिहासतज्ज्ञांनी याला विरोध केला असला, तरी पु. ना. ओक यांच्या इतिहासाला प्रमाण मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्याचे काडीइतकेही सोयर सुतक असण्याचं काहीच कारण नाही.

हो. पु. ना. ओक यांचं नाव येणं संयुक्तिकच आहे. याबाबतही थोडं समजून घ्यायला हवं. सध्या सत्ताधारी पक्षाकडून इतिहासाचे जे काही मतितार्थ लावणं सुरू आहे, त्यामुळे विवेकवादी लोकांना ते विनोदी वाटायला लागलं असून त्यावर समाजमाध्यमांमध्ये जोरदार विनोदांच्या मालिका वगैरे सुरू असतात. मात्र त्रिपुराचे मुख्यमंत्री किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा आपले परमआदरणीय पतंप्रधान जे काही ऐतिहासिक दाखले देतात, उदाहरणार्थ, महाभारताच्या काळात इंटरनेट होते, गणपतीला हत्तीचे शिर लावणे ही प्लास्टिक सर्जरीच होती वगैरे थाटाचे ते विनोदी बिलकूलच नसते. याचा पाया पु. ना. ओक यांनी अनेक वर्षांपूर्वी घालून ठेवला आहे. पु. ना. ओक यांचा हा विचार सावरकरांच्या सहा सोनेरी पाने आणि गोळवलकारांच्या बंच ऑफ थॉट्सचा परिपाक आहे. त्यातूनच ताजमहाल नव्हे तेजोमहाल. ताजमहाल हा शहाजानने बांधलेलाच नसून ते शिवमंदिर आहे. या गोष्टी जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवण्याची ही रणनिती आहे. इतिहासाच्या आधुनिक तंत्राच्या आधारे विश्लेषणाची पद्धत पाश्चिमात्य देशात विकसित झाली असली तरी, त्यात भारतीय इतिहासकारांनी मोठी भर घातल्याचे जगभरातील इतिहासतज्ज्ञ मान्य करतात. भारताच्या प्राचीन इतिहासाचे विश्लेषण करण्याकरिता डी. डी. कोसंबींसारख्या थोर इतिहासकाराने नाणेशास्त्रासारखी आधुनिक विश्लेषण पद्धती शोधून काढली व इतिहासातील अनेक न उकल झालेल्या प्रश्नांची शास्त्रोक्त पद्धतीने उकल झाली. शास्त्रोक्त उकल होण्याकरिता तर्कसंगत उत्तरे मिळावी लागतात. कुणी तरी म्हणाले म्हणून काहीतरी मान्य करणे अशी सर्वसाधारणतः शास्त्रीय पद्धत नसते. म्हणजे महाभारत काळात इंटरनेट होते. असा शोध त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी लावल्यानंतर याचा काय दाखला आहे, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. तसा तो झाला व त्यांना विचारण्यातही आला. त्यावर मी म्हणतो म्हणून, असे जबरदस्त उत्तर या मुख्यमंत्री महाशयांनी दिले. तर तशी उत्तरे इतिहासाच्या क्षेत्रात मान्य केली जात नाहीत.

असो हे सांगण्याचे कारण म्हणजे. दालमिया ग्रूपकडे लाल किल्ल्याचा सांभाळ दिल्यानंतर जशी बाबरी मशिदीत अचानक रामाची मुर्ती अवतरली होती, तसाच प्रकार का होणार नाही, असा स्वाभाविक तर्कसंगत प्रश्न उपस्थित होतो. पुढे लाल किल्ल्यानंतर, कुतुबमिनार, ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, अशी अनेक जागतिक नकाशावर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळेही अशांना सांभाळण्यासाठी दिली जाऊ शकतात. त्याचा सांभाळ ते यथायोग्यपणे करतीलच, अशी आशा आहे. मात्र पु. ना. ओक यांचे ऐतिहासिक दाखले खरे करण्याची ही नामी संधी परिवाराला यातून उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. विकासाच्या वाजलेल्या तीन तेऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या नव्या घटना दुहीच्या ठिणगीवर पेट्रोल ओतण्याचेच काम करतील, त्यातून काहीजणांना राजकीय फायदे होतील ही, मात्र देशाचे काय होईल, याचा विचार आत्ताच करून ठेवायला हवा हे मात्र तितकेच खरे!

लेखक जोहान्सबर्गस्थित व्यवस्थापन सल्लागार आहेत. इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, संविधान हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.

Write A Comment